धर्म, जीवन व तत्त्वज्ञान

शांतिनिकेतन

बोलपूर

त्या गोष्टीला सुमारे ४०-५० वर्षे झाली असतील, महर्षी देवेंद्रनाथ ठाकूर हे कलकत्त्यापासून सुमारे १०० मैलांवर बिरभूम जिल्ह्यात धर्मसाधनार्थ भ्रमण करीत होते. कलकत्त्यापासून फार दूर नाही व फार जवळही नाही व जेथे सृष्टीचे शांत आणि सौम्य मुखावलोकन निरंतर घडेल असे चिंतनानुकूल ठिकाण शोधून काढण्यात ते बरेच दिवस गुंतले होते. इतक्यात त्यांचे स्नेही बाबू श्रीकांत सिंह (हल्लीच्या नामदार एस्.पी. सिंहचे चुलते) ह्यांनी महर्षींना वरील जिल्ह्यातील आपल्या जमीनदारीच्या ठिकाणी काही दिवस रहावयास बोलाविले आणि त्यांना ज्या प्रकारचे ठिकाण हवे होते, ते आपल्या जमिनीतून पसंत करण्यास आग्रहाने सांगितले. त्यावरून महर्षींनी बोलपूर गाव आणि कोपाईनदी ह्यांच्या मधोमध १||-२ मैलांवरच्या अफाट ओसाड उंचवट्यावरील एका माळावर थोडीशी जागा आश्रमाकरिता पसंत केली.

असे सांगतात की, त्यावेळी ह्या प्रदेशात चोरट्यांची व वाटमा-यांची फारच भीती होती म्हणून दुसरी जागा पसंत करण्यास महर्षीना सांगण्यात आले. तरी पण त्यांनी तिकडे लक्ष दिले नाही. ह्याच माळावर एक जुना सप्तपर्ण वृक्ष (बंगालीत ह्याला छातीम हे नाव आहे) होता. त्याचे खाली बसून सूर्यास्ताकडे पाहात पाहात ध्यानस्थ होणे त्यांना फार आवडत असे. एकादोघांकडून माझे ऐकण्यात असे आले की, येथील चोरट्यांचा मुख्य दारिक सरदार नावाचा रामोशी एकदा महर्षींच्या अंगावर अपाय करण्यासाठी चालून आला, पण त्यांची ती भव्य, पण निरूपद्रवी आकृती व सौम्य मुद्रा आणि ते लवकरच ध्यानात गढून गेलेले पाहून, त्याची वृत्ती अगदी पालटून गेली! पुढे पुढे तर महर्षींची तेथेच कायमची वसती होऊ लागल्यामुळे दारिक सरदाराने आपला क्रूर पेशा अजीबात सोडून दिला, शेवटी हल्लीचा शांतिनिकेतन आश्रम तयार झाल्यावर महर्षीजवळ त्याने बरीच वर्षे दरवानाची नोकरी केली. दारिक सरदार अद्यापि जिवंत आहे, असे ऐकल्यावर तर मी मोठ्या कौतुकाने जवळच्या भुवनडांगा नावाच्या खेड्यात त्याला मुद्दाम भेटावयास गेलो, तो त्याने खेड्याबाहेरील कालीच्या देवळासमोरील अंगणात गुरांची पात जुंपून धान्याची मळणी चालविली होती. जवळ जवळ ऐंशीच्या घराला येऊन पोहोचला आहे तरी त्याची आंगकाठी सरळ आहे आणि त्याच्या डोळ्यांत एक प्रकारची चमक आहे. तो आमच्याशी फार नम्रपणे बोलला, व त्याच्या पारदर्शक संभाषणातून महर्षीसंबंधाचा त्याचा आदर स्पष्ट दिसत होता, इतकेच नव्हे तर त्यांनी त्याचा आयुष्यात नव्हे, आसमंतातील सर्व माळरानात घडवून आणलेली  क्रांती अंधुक अंधुक दिसून येत होती. राकट रामोशाचा हा प्रामाणिक शेतकरी बनलेला आणि गुरे जुंपून धान्याची मळणी करण्याच्या मिषाने प्रत्यक्ष चामुंडीच्या नाकासमोर शांतिदेवीचे स्तुतिपाठ म्हणणारा दारिक सरदार पाहून मला आतल्या आत गहिवर आला! असो.

दारिक सरदाराच्या ह्या भुवनडांगा खेड्यापासून अर्ध्या मैलाच्या आतच महर्षींचा पवित्र आणि रम्य शांतिनिकेतन नावाचा प्रसिद्ध आश्रम आहे. भरतखंडातील दूरदूरच्या ब्राह्मांना हे एक तीर्थयात्रेचे ठिकाण आहे म्हणण्यास हरकत नाही.

गुजराथेत स्वामीनारायणपंथ आणि बंगाल्यात ब्राह्मधर्म ह्या दोहोंचा उदय समकालीन असून स्वामिनारायणपंथी भाविक भक्तांना गुजराथेतील क्षेत्रे पाहून ‘दर्शनहेळा मात्र तया होय मुक्ति’ हा अनुभव यावा आणि बंगाल्याबाहेरच्या आमच्या बहुतेक ब्राह्मबंधूंना शांतिकनिकेतनासारखे प्रेरक, पवित्र आणि क्रांतिकारक स्थळ नुसत्या नावानेही माहीत नसावे हे काय गौड-बंगाल! आमचा धर्म मोठा ‘सुधारलेला धर्म’ आहे असे म्हणून आम्ही वेळोवेळी स्वत:स थोपटून घेतो पण सुधारणा आणि धर्म ह्या दोहोंच्या झटापटीत ‘सुधारणे’ चे चाळे फार माजून बिचा-या धर्मबुद्धीस नावडतीप्रमाणे मागील दारीच बसून रहावे लागते हे आम्हा ‘अप-टू-डेट’ ब्राह्मांच्या लक्षात यावे तसे येत नाही. ते काही असो, कितीही कडकडीत पोषाकाचा, इंग्लंडाहून नुकताच परतलेला तरणाबांड ब्राह्म ह्या निकेतनात आला असता त्याच्यावर जुन्या जगातल्या धर्मभावनेचा किंचित तरी परिणाम येथे झाल्याशिवाय रहाणार नाही, असे एक आपले मला वाटते.

कलकत्त्याहून इ. आय. आर. ने बरद्वानपर्यंत ६७ मैल गेल्यावर लूपलायन रेल्वेचा फाटा लागतो. त्याने पुढे ३३ मैल गेल्यावर ६ वे स्टेशन बोलपूर हे लागते. येथून १||मैलावर शांतिनिकेतन आहे. वाट चांगली सडकेची आहे. अगोदर तेथील कोणाही रहिवाशास किंवा नुसते सुपरिंटेंडेंट अशा पत्त्यावर लिहिल्यासही स्टेशनावरून पाहुण्यांचा नेण्याकरिता गाडीची व्यवस्था सहज करण्यात येते. निकेतनात पाहुण्याची राहण्याची वगैरे व्यवस्था ज्या ठिकाणी करण्यात येते तो एक छोटेखानी राजवाडाच आहे; एकंदर ढब बडेजावीची असल्यामुळे असल्या वन्य आश्रमातही महर्षींच्या गर्भश्रीमंतीची साक्ष पटविणारा त्यांचा पाहुणचार त्यांच्यामागे अजूनही अनुभवास येतो. शांतिनिकेतनाचा सर्व खर्च व व्यवस्था महर्षींनी ट्रस्टीकडे सोपविली आहे, व ती त्यांचे विरक्त चिरंजीव बाबू रविंद्रनाथ व नातू द्विपेंद्रनाथ अगदी नियमाप्रमाणे चालवितात. एकांतात काही दिवस धर्मसाधन करू इच्छिणा-या कोणाही प्रचारक अगर लोकसेवकाने येथे येऊन रहावे अशी महर्षींची इच्छा असे. तिला विसंगत असे अद्यापि घडलेले काही दिसून येत नाही. तरी ह्या उदार इच्छेचा फायदा कलकत्त्यातील कोणत्याही शाखेच्या प्रचारकांनी किंवा इतरांनी आजवर घ्यावा तितका घेतलेला आढळून येत नाही, बाहेरच्यांची तर गोष्टच राहिली.

महर्षींनी आश्रमाकरिता हीच जागा का पसंत केली ह्यासंबंधी विचारपूस करिता उत्तर असे मिळाले की ह्या ठिकाणची नैसर्गिक शोभा आणि शांती, हेच कारण होय. वरवर पाहणारास ह्या ठिकाणी निसर्गाची मनास थक्क करून सोडणारी अशी काही विशेष शोभा आहे असे मुळीच दिसत नाही. शांती म्हणावी तर महर्षी प्रथम येथे आले तेव्हा वाटमा-यंनी हा मुलूख बेजार करून सोडला होता. असे सांगतात की ज्या सप्तपर्णवृक्षाखाली बसून महर्षी तासानुतास ध्यानमग्न होऊन जात त्याच्या तळाशी एकदा खणून पाहिले असता एक नरकपाळांची रासच आढळली! ह्यावरून आजच्या शांतिनिकेतनाच्या स्थळाचे स्वरूप १-२ पिढ्यांमागे किती भेसूर होते हे कळून येईल. ह्याप्रमाणे वरवर पाहत नैसर्गिक शोभा आणि मानवी शांती ह्यांपैकी कोणतेही म्हणण्यासारखे कारण हेच स्थान विशेषेकरून पसंत करण्यास दिसून येईना. म्हणून मी दुसरे दिवशी पहाटे उठून ह्या स्थळाचे अधिक निरीक्षण करण्याचे हेतूने त्याचे आसमंतात ४-५ मैल हिंडून आलो. परत येऊन विशेष विचार करिता ह्या स्थळाचे रहस्य मला कळले. महर्षी हे सृष्टीचे मोठे भोक्ते होते. हिमालयाची उंच शृंगे व गंभीर द-या, खोरी, गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा अशा नद्यांचे प्रशस्त प्रवाह, विस्तीर्ण पात्रे आणि समुद्राच्या लाटा इ. रूपाशी ज्या महर्षींचा अहर्निश सहवास घडत असे त्यांची सृष्टीसंबंधी अभिरूची कळसाला पोहोचली असली पाहिजे. सृष्टीची शोभा तिच्या अपवादक रूपातच आढळते असा सामान्य माणसासारखा महर्षींचाही ग्रह असणे शक्य नाही. शांतिविषयी म्हणावे तर हिंस्त्र पशू अथवा लुटारूंच्या उपद्रवामुळे प्राचीन मुनींच्या शांतीचा जसा भंग होत नसे, त्याचप्रमाणे आधुनिक महर्षींच्या शांतीलाही ह्या नैसर्गिक अपायांची बाधा वाटली नाही. मुनींच्या मनाच्या शांतीला बाधा होते ती सृष्टीच्या अपायामुळे नव्हे, तर ह्या संसारात सरपटणा-या क्षुद्र नरनारी आपल्या ऐहिक अथवा पारलौकिक योगक्षेमाचे वेळोवेळी नीच उपाय योजतात त्यामुळेच होते. ज्या ठिकाणी अशा उपायांचा शिरकाव नाही, जेथे भूमीचा विस्तीर्ण प्रदेश एकदम नजरेच्या आटोक्यात येतो आणि जेथून भोवताली दुरवर पाहता क्षितिजाचे सुंदर आणि विशाल वलय-जणू जमीन अस्मानाचे गाढ आलिंगनच- अहोरात्र दिसते त्याच ठिकाणी शांती आणि शोभा ह्या दोन्ही जुळ्या बहिणींचे चिरसाम्राज्य पहावयास मिळते. महर्षींनी स्थापलेले शांतिनिकेतन ह्या साम्राज्याचे एक सिंहासनच होय!

भोवताली भला मोठा ओसाड उघडा माळ आहे आणि मधअये सुमारे २ एकर जमीन ह्या निकेतनासाठी पसंत करून महर्षींनी ती आता तरूलतांनी गजबजून टाकिली आहे. आम्र, अशोक, देवदार इत्यादी प्रकारचे गगनचुंबी वृक्ष एकमेकांच्या खांद्यावर आपले प्रशस्त बाहू ठेवू ठेवून डोलत आहेत. मध्यभागी महालवजा दोनमजली पक्की आणि भव्य इमारत आहे. तिच्यासमोर बागेत टुमदार, स्वच्छ, शुभ्र संगमरवरी दगडाचे ब्राह्ममंदिर आहे. त्याचे अग्रभागी मोकळा मंडप असून त्यावर लोहशलाकाचे नाजुक, निमुळते, गोल घुमट आहे. मंदिराच्या चारी भिंती भिंगाच्याच असल्याने उपासनेस बसले असताही चहूबाजूंचा दूरवर देखावा दिसतो. उपासकांसाठी रांगेने आसने मांडली असून, मध्यभागी वेदीसाठी एक लहानसा संगमरवरी चौरंग आणि त्यावर दोन शुभ्र शंख ठेविले आहेत. भिंतीला लागूनच चारी बाजूंनी प्रधक्षिणा करण्याकरिता येण्यासारखी उंच चबुत-यावरून वाट आहे. त्यानंतर चोहोंकडून थोडीशी मोकळी जागा राखून, भोवताली छातीइतका प्राकार आहे. मंदिराच्या दारावर अँ हे अक्षर लावलेले असून त्याच्या खालील कमानीवर पुढे दिल्याप्रमाणे त्याचा अर्थ लिहिला आहे.

सर्वे वेदा यत्पदमामनंति तपांसि सर्वाणि च यद्वदन्ति|
यदिच्छन्तो ब्रह्मचर्य चरंति तत्ते पदं संग्रहेण ब्रवीम्योत्येतत् ||१||
बाहेरील बागेत जागजागी सुंदर वृंदावने आणि कुंड्या आहेत. त्यांच्या बाजूंवर उपनिषदांतील गंभीर उतारे व लहान मोठी वचने उल्लेखिली आहेत. त्यांपैकी खाली लिहिलेले अवतरण वाचून तर ह्या स्थळाचे महत्म्य मनात चांगले बाणते.

“एष सेतुर्विधरण एषां लोकांनामसम्भेदाय |
नैनं सेतुमहोरात्रे तरतो न जरा न मृत्युर्न शोको न सुकृतं न दुष्कृतं|
सर्वे पाप्मानोSतो निवर्तन्तेSअपहतपाप्मा ह्येष ब्रह्मलोक:||”

इ. इ. ही वचने वाचीत प्रेक्षक अगदी बाहेरील दाराजवळ आला असता भिंतीत बसविलेला खालील लेख वाचून ह्या आश्रमाच्या उदार आणि पवित्र हेतूची त्याला कल्पना येते इतकेच नव्हे तर ही स्वर्गीय तत्त्वे खुद्द त्याच्या अंत:करणात खोल रूजू लागतात:

“सर्वेषामेवास्मिन् शांतिनिकेतने ब्रह्मोपासनायामधिकार: इह खल निराकारमेकं ब्रह्मैवोपासीत| संप्रदायप्रथितां देवमूर्ति मनुष्यं पशुं पक्षिणं प्रतिकृतिं लिंगं देवप्रतीकं च नाचयेत| नापि पावकं जुहुयात् धर्म स्वोदरं वा समुद्दिदश्य किमपि भूतं मा हंस्यात्| आमिषं मद्यपानं विवर्जयेत्| कस्याप्युपास्यं नावमन्येत| ब्रह्मयोगं मैत्री शमादिकं च परामृश्य समुदपदिशेत्| ब्रीडाकरं प्रमोदं चोतसृजेत|

ह्या निकेतनातील मुख्य प्रेक्षणीय भाग म्हणजे उपरिनिर्दिष्ट सप्तपर्ण वृक्षच होय. महर्षींचे हे अत्यंत आवडीचे स्थान होते. ह्या आश्रमात चोहींकडेच पण विशेषत: ह्या ठिकाणी महर्षींचा पुण्यात्मा जणू घेर घालीत आहे असा भास होतो. ह्या जीर्ण वृक्षाचे तळाशी जेथे महर्षी नेहमी बसत तेथे आता एक सुंदर संगमरवरी वेदी बांधली आहे. तिच्या शिरोभागी ‘तिनि अमार प्राणेर आराम, मनेर आनंद, आत्मार शांति’, हे शब्द आहेत. ह्या वेदीवर बसले असता सुमारे १०-१२ पावलांवर एका संगमरवरी स्तंभावरील फलकावरची ‘शांतं शिवमद्वैतम्’ ही अक्षरे डोळ्यांत भरतात. तेथून हालावेसेच वाटत नाही.

मंदिरात दररोज प्रात:काळी ७ वाजता नित्याची उपासना होते, त्यासाठी एके आचार्य व दोन गायक ह्यांची नेमणूक झाली आहे. एरव्ही वाटेल तेव्हा वाटेल त्यास ध्यान, भजन तेथे करता येण्यासारखे आहे. दर बुधवारी व गुरूवारी मुख्योपासना होतात, त्या बाबू रविंद्रनाथ हे चालवितात. त्यावेळी येथील ब्रह्मचर्याश्रमातील १२५-१५० विद्यार्थी सर्व हजर असतात. पौष्य मासी (डिसेंबर) दरवर्षी येथे एक मोठी जत्रा भरते, तेव्हा आजूबाजूच्या खेड्यांतील ३-४ हजार खेडवळ जमून जुन्या जत्रेतलेच निरनिराळे खेळ करून १-२ दिवस करमणुकीत घालवितात.

ह्या ठिकाणी महर्षींची समाधी कशी नाही, ह्याचे आश्चर्य वाटल्यावरून शोधाअंती त्यांचे नातू द्विपेंद्र बाबू ह्यांनी असे कळविले की आपल्या रक्षेवर समाधी, थडगे अगर कोणतेही स्मारक कोठेही उभारू नये अशी महर्षींनी अगदी कडकडीत आज्ञा दिली आहे, भोवतालच्या खेड्यांतील लोकांत महर्षींसंबंधी इतका अलोट आदर आहे की, ह्या निराकाराच्या निष्काम आणि एकांतिक भक्तांची ही शेवटची इच्छा जर पूर्णपणे पाळली गेली नाही तर त्यांचे देव्हारे हा हा म्हणता माजतील, ह्यात तिळमात्र संशय नाही.

धर्म, जीवन व तत्त्वज्ञान

  संपादकीय
  पुरस्कार
विभाग पहिला : प्रवासवर्णन
 - जलप्रवास
 - मार्सेय शहर
 - पॅरीस शहर
 - नॉटर डेम द ला गार्ड देऊळ व ते
     पाहून सुचलेले विचार
 - लंडन शहर
 - ब्रिटिश म्युझिअम
 - लंडन येथील बालहत्यानिवारक गृह
 - सोमयागाचे वर्णन वाचून वाटलेला
    विस्मय व विषाद
 - डेव्हनपोर्ट येथील गुड फ्रायडे
 - बोअर युद्धाचा शेवट व ऑक्सफर्ड
    येथील उल्हास
 - राष्ट्रीय निराशा
 - बर्टन खेड्यातील शाळा कशी दिसली?
 - विभूतीपूजा
 - मॅंचेस्टर कॉलेज
 - पृथ्वीच्या पोटात ४४० यार्डाखाली
 - जनातून वनात आणि परत
 - बंगलूरच्या रस्त्यातील एक फेरी
 - मंगळूर येथील काही विशेष गोष्टी
 - बंगालची सफर
 - शांतिनिकेतन
 - सह्याद्रीवरुन-१
 - सह्याद्रीवरुन-२
 विभाग दुसरा : धर्मपर लेख
 - युनिटेरियन समाज
 - इंग्लंडातील आधुनिक धर्मविषयक
   चळवळ आणि लिव्हरपूल
 - सुशिक्षित धर्मभगिनींस अनावृत पत्र
 - ब्राह्मसमाज व आर्यसमाज (ह्यातील
    हल्लीचे साम्य,भेद व पुढे ऐक्यार्थ यत्न)
 - धर्मजागृती
 - निवृत्ती व प्रवृत्ती आणि अवतारवाद व विकासवाद
 - ईश्वर आणि विश्वास
 - बौद्धधर्म जीर्णोद्धार
 - ब्राह्मधर्म व ब्राह्मसमाज
 - आत्म्याची यात्रा
 - आत्म्याची वसती
 -  हिंदुस्थानातील उदार धर्म
 - कौटुंबिक उपासनेच्यावेळी केलेला
    उपदेश देवाचा व आपला संबंध
 - आवड आणि प्रीती
 - स्तुती, निर्भत्सना व निंदा
 - विनोदाचे महत्त्व
 - प्रेमप्रकाश
 - संग व विषय
 - मरण म्हणजे काय?
 - धर्मप्रसारार्थ स्वानुभवाची आवश्यकता
 - ब्राह्म आणि प्रार्थनासमाजास एक विनंती
 - दास्यभक्तीची ध्वजा
 - प्रेमसंदेश
प्रो. ऑयकेन ह्यांची जीवनमीमांसा
 - धर्म-१
 - धर्म-२
 - नीती-१
 - नीती-२
 - नीती-३
 - शास्त्र आणि तत्वज्ञान-१
 - शास्त्र आणि तत्वज्ञान-२
 - सार्वजनिक नित्य व नैमित्तिक
    उपासनेच्यावेळी केलेले उपदेश
 - संतांचा धर्म आणि राष्ट्राचा उत्कर्ष
 - धर्म, समाज आणि परिषद
 - धर्मसंघाची आवश्यकता
 - विनययोग
 - शासनयोग
 - पितृशासन
 - गुरुशासन
 - राजशासन
 - धर्म आणि व्यवहार
 - प्रेरणा आणि प्रयत्न
 - मानवी आदर आणि दैवी श्रद्धा-१
 - मानवी स्नेह आणि ईश्वरभक्ती -२
 - मनुष्यसेवा आणि ईश्वरोपासना -३
 - मनाची प्रसन्नता आणि मोक्षप्राप्ती-४
 - परमार्थाची प्रापंचिक साधने-५
 - आधुनिक युग आणि ब्राह्मसमाज
 - धर्मसाधन
 - नैराश्यवाद
 - आनंदवाद
 - संसारसुखाची साधने
 - वृत्ती, विश्वास आणि मते
 - व्यक्तित्वविकास
 - स्त्री-दैवत
 - दान आणि ऋण
 - राज्यरोहण
 - नाममंत्राचे सामर्थ्य
 - मनुष्यजन्माची सार्थकता
 - आपुलिया बळे घालावी हे कास
 - कालियामर्दन
विभाग तिसरा : इतर लेख
 - आपला व खालील प्राण्यांचा संबंध
 -  स्वराज्य आणि स्वाराज्य
 - देशभक्ती आणि देवभक्ती
 - समाजसेवेची मूलतत्वे
 - निराश्रित साहाय्यकारी मंडळी व आक्षेपनिरसन
 - रा.गो.भांडारकर ह्यांचे धर्मपर लेख व व्याख्याने
 - प्रार्थनासमाज अप्रिय असल्यास तो का?
 - राजा राममोहन रॉय
 - मुरळी अथवा पश्चिम हिंदुस्थानातील हिंदू
    देवळांतील अनितिमूलक आणि बीभत्स प्रकार
 - श्रीशाहू छत्रपतींच्या मनाचा विकास
 - रावसाहेब थोरात ह्यांच्या "बोधमृत" ला प्रस्तावना
 - जमखिंडी येथील परशुरामभाऊ हायस्कूलचा
    सुवर्णमहोत्सव
 - थोरल्या शाहू महाराजांच्या कारकीर्दीचे मराठ्यांच्या
    इतिहासातील महत्त्व
 - डॉ. भांडारकरांस मानपत्र
 - मराठी भाषेद्वारा ब्राह्मधर्माचा प्रचार
 - राजा राममोहन व बुवाबाजी
 - प्रार्थनासमाजाचा एक नमुना
 - क्षात्रधर्म
 - स्वराज्य विरुद्ध जातिभेद
 - इतिहास, संशोधन व भाषाशास्त्र
 - गुन्हेगार जातीची सुधारणा
 - निराश्रित साह्यकारी मंडळी
 - वाई प्रार्थना संघ मंदिर प्रवेश
 - ब्रह्मानंद केशवचंद्र सेन
 - साधारण ब्राह्मसमाजाची पन्नास वर्षे
 - निराश्रित साहाय्य
 - मुंबई येथील मानपत्रास उत्तर
 - सत्यशोधकांना इशारा अथवा नव्या पिढीचे राजकारण
 - बंदिस्त बळीराजा
 - सही नाही; सहानुभूती!
 - टिळकांच्या मानपत्रास विरोध
 - A Scientific Catechism
 - Gleanings from Periodicals
 - The Arya Samaj of India
 - Liberal Religion in Japan
 - The New Light of Persia
 - Liberal Christianity in Europe
 - Unitarianism in England and America 
विभाग चौथा : परिशिष्टे
 - महर्षी शिंदे ह्यांचे पहिले कीर्तन
 - रामजी बसाप्पा शिंदे ह्यांचा मृत्यू
 - लाहोर येथील धर्मपरिषद

 - कोल्हापूर येथील धर्मविषयक चळवळ व

    प्रगतीपत्रातील अहवाल

 - विसावे व्याख्यान
 - आख्यान
 - महाराष्ट्र सुधारक आगळा
 - भगिनी जनाबाई ह्यांची स्मृतिचित्रे
 - परलोकवासी विठ्ठल रामजी शिंदे
 -  The Late Mr. V. R. Shinde
 - कै. अण्णासाहेब शिंदे, चरित्र व कार्य
 - प.वा. अण्णासाहेब शिंदे
 - व-हाड मध्यप्रांतीय सत्यशोधक हीरक महोत्सव
 - १९ मार्च १९३३-७१ वा वाढदिवस
 - श्री. महाराजांचे अस्पृश्योद्धारक कार्य-श्रीमंत
   सयाजीराव गायकवाड
 - दांभिक देशभक्तापेक्षा
 - धर्मरहस्य अथवा अंत्यजोद्धार
 - लाहोर येथील धर्म परिषद
 - आपुले स्वहित करावे पै आधी
 - सुखवाद व सुखाची साधने
 - लुटूपुटूची पार्लमेंट
 - बहाई समाजाचा ब्राह्मसमाजास संदेश
 - प्रेमाचा विकास
 - भोकरवाडी येथील आपत्ती
 - सुधारकांची जुनी परंपरा (स्फुट)
 - सुधारकच हिंदूधर्माचे खरे रक्षक
 - निष्ठा व नास्तिक्य
 - विठ्ठल रामजी शिंदे व श्री शाहू छत्रपती
 - विठ्ठल रामजी शिंदे व सयाजीराव गायकवाड
 - विठ्ठल रामजी शिंदे व महात्मा गांधी
 - वि.रा. शिंदे व राजाराम छत्रपती
 - विजापूर येथी धर्मकार्य, विजापूर
 - सोमवंशीय सन्मार्गदर्शक समाज
 - रोगनिवारक प्रयत्न-एक निकडीची विनंती
 - कवित्व आणि भरारी
 - मोफत व सक्तीचे शिक्षण नको !!
 - बहुजन पक्ष
 - डी.सी.मिशनचा १७ वा वाढदिवस
 - अहंकार नासाभेद
 - यश परिणामात नसून प्रयत्नात आहे.
 -  Maharashtra Provincial Social Conference
 - प्रांतिक सामाजिक परिषद-सातारा
 - शिवाजी की रामदास?
 - बडोदे-तत्वज्ञान व समाजशास्त्र विभागाचे अध्यक्ष
 - श्री. विठ्ठल रामजी शिंदे व सुबोध पत्रिका
 - कै. डॉ. संतूजी रामजी लाड
 - मागासलेले व अस्पृश्य
 -  Shree V. R. Shinde’s Work
 - पुण्यातील मानपत्रास उत्तर
-   Liberal Religion in India
- वाई ब्राह्मोसमाज-विश्वास लेख
 - गुरुवर्य शिंदे सूक्ती