धर्म, जीवन व तत्त्वज्ञान

इंग्लंडातील आधुनिक धर्मविषयक चळवळ आणि लिव्हरपूल

सर्व सुधारलेल्या जगातील अत्यंत प्रमुख जे इंग्रजी राष्ट्र, त्याचा गेल्या चार शतकांचा इतिहास वाचून, एकादा परकीय गृहस्थ ह्या राष्ट्राच्या निरनिराळ्या संस्था आणि जीवन प्रत्यक्ष पाहण्यास येथे आल्यावर काही काळाने त्याच्या मनाची विलक्षण स्थिती होते. त्याचे बाहेरचे इतिहाससाध्ययन व येथील प्रत्यक्ष निरीक्षण, ही दोन्ही जर केवळ फावल्या वेळची असतील, तर त्याचा ग्रह ह्या देशासंबंधी फारसा अनुकूल न होता, उलट तो स्वदेशी गेल्यावर सा-या आधुनिक सुधारणेसही नावे ठेवीत सुटण्याचा संभव आहे. त्यात विशेष त्याचा कटाक्ष धर्मसंबंधी असतो. पण वरील अध्ययन व प्रवास निर्मळ मनाने, केवळ शिकण्याच्या व साधनाच्या हेतूने, व कळकळीने कोणत्याही बाजूस तोल न जाऊ देता, घडेल तर मनासच नव्हे तर आत्म्यासही मोठी मिळकत मिळेल अशी माझी खात्री आहे. इतकेच नव्हे तर जगाच्या इतिहासात वेळोवेळी ज्या सुधारणा झाल्या, जी मन्वंतरे घडली आणि एकंदरीत पाहता मानवी प्राण्यांची जी सारखी उन्नतीच होत आहे त्या सर्वांच्या तळाशी, मानवतेचे मुख्य लक्षण जी धर्मबुद्धी, तिचेच मंगल आणि सतत कार्य घडत आहे. ह्या साधारण सिद्धांताची प्रत्यक्ष साक्ष ह्या अध्ययनात व प्रवासात पटते!

सोळाव्या शतकाच्या आरंभी युरोपात जी प्रचंड धर्मक्रांती झाली तिच्यानंतर आधुनिक युगास आरंभ झाला. वरील शतकात इंग्लंडात सुधारलेल्या धर्माची पूर्ण संस्थापना झाल्यावर धर्माचे कार्य संपले असे नव्हे तर उलट तेव्हापासून त्याचा आरंभ झाला. पोपच्या कचाट्यातून इंग्लंड सुटले खरे, म्हणून ते स्वतंत्र झाले असे नव्हे. पोपचे स्थान इंग्लंडच्या राजाने घेतले. संस्थापित चर्च नावाच्या राष्ट्रीय धर्माची संस्थापना झाली. आणि त्या उलट खरे स्वातंत्र्य मिळविण्यास पुन: एक शतकभर ह्या राष्ट्रास थोरांच्या रक्ताची सारखी आहुती द्यावी लागली. सतराव्या शतकाचे अखेरीस (१६८९) (Toleration Act) सहिष्णुतेचा कायदा पास झाला. लोकांस आपल्या मताप्रमाणे आपल्या हुकमतीने व आपल्या बळावर, पंथ, समाज व मंदिरे स्थापण्याची मोकळीक झाली. अठराव्या शतकात प्रेस्बिटेरिअन (गुरूजनसत्तात्मक), काँग्रिगेशनल (लोकसत्तात्मक) बाप्टिस्ट, वेस्लीयन इत्यादी अनेक पंथांचा प्रसार झाला. पण अद्यापि लोकांत विचारांचे स्वातंत्र्य व औदार्य आले नव्हते. चौथ्या पाचव्या शतकांत ख्रिस्ती धर्माची जी एकदा मते व सिद्धांत बनून गेले होते त्याच्या उलट ब्र काढल्यास डोके फुटण्याची अद्यापि भीती होतीच. १९ व्या शतकाच्या आरंभी ती भीती समूळ नाहीशी झाली. १८१३ साली युनिटेरिअन लोकांसही पूर्ण स्वातंत्र्य मिळाले.

ह्याप्रमाणे १६ व्या शतकात पोपची सत्ता झुगारून दिल्यावर ह्या राष्ट्राने सतराव्या अठराव्या शतकांत, धर्मबाबतीत राजकीय सत्तेपासूनही स्वतंत्र होण्याचे प्रयत्न केले, आणि ते बहुतांशी सफळ झाले. हल्ली राष्ट्रातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या नॉनकनफार्मिस्ट म्हणजे स्वतंत्र सत्तेची आहे. बाकीची जी राष्ट्रीय संस्थेत आहे तीही केवळ आपखुषीने आहे. १९ व्या शतकात धर्मचळवळीची दिशा अगदीच बददली. आधुनिक शास्त्राचा व तत्त्वज्ञानाचा प्रसार होऊ लागल्यापासून धर्माच्या मुळाशीच कु-हाडीचे घाव बसू लागले. ख्रिस्तीधर्मपंथांचे शास्त्रीय व ऐतिहासिक पद्धतीने संशोधन, निरनिराळ्या राष्ट्रांचे आचारविचारात दळणवळण वाढल्यामुळे निरनिराळ्या धर्माची होऊ लागलेली तुलना, विश्वविद्यालयात चाललेले सर्व धर्मांचे तुलनात्मक अध्ययन इत्यादी अनेक कारणांमुळे निरनिराळ्या पंथांतील लोकांच्या मतांत परस्पर अधिकाधिक सहानुभूती, सहिष्णुता व औदार्य वाढू लागले, इतकेच नव्हे तर युनिटेरिअन, ह्युमेनिटेरिअन, पॉझिटेव्हिस्ट इ. नवीन विचाराला अनूकूल अशा नवीन पंथांचा उदय व प्रसार होऊ लागला.

हल्ली स्थिती कशी आहे? राष्ट्रीय संस्था, तद्विरोधी निघालेले नाना स्वतंत्र पंथ, आणि ह्या सर्वांसही न जुमानता स्वतंत्रपणे व उदारपणे धर्माचरण करणारे युनिटेरिअनादी समाज ह्या सर्वांचेही कार्य सारखे जोराने चालले आहे. साप्ताहिक उपासना, रविवारच्या धर्मशिक्षणाच्या शाळा, मासिक आणि वार्षिक सभा, गरिबांकरिता स्वदेशातील मिशने आणि परकीयांकरिता चारी खंडांतील परदेशांत जगडव्याळ मिशनची योजना इ. निरनिराळी कामे सर्व पंथांतून चढाओढीने होत आहेत.

हा सर्व प्रकार पाहून परकीयांचे मन प्रथमदर्शनी गोंधळून जाते. धर्मासारख्या पवित्र बाबतीत ह्या राष्ट्राने ३-४ शतके इतकी डोईफोड व रक्तस्त्राव का केला? आताच्या ह्या शांततेच्या व समजुतीच्या काळीदेखील ह्यांच्यात इतके भिन्नभिन्न पंथ व इतक्या चुरशीची चढाओढ का आहे? नवे पंथ आणि नव्या संस्था निघाल्या आहेत त्यांत जुन्यांचा लय का होत नाही? उलट दोहोंचेही कार्य इतक्या नेटाने चालणे येथे कसे शक्य आहे? इ. प्रश्नांमुळे बिचा-या नवख्याची त्रेधा उडते आणि अखेर इंग्लंडातील प्रॉटेस्टंट धर्माचे खरे लक्षण काय, त्याची मुख्य बळकटी कशात आहे हे नीट कळेपर्यंत त्याचे समाधान होत नाही.

आजपर्यंत धर्मबाबतीत आमची दोन भिन्न प्रकारची स्थिती होत आली आहे ती अशी: जगाच्या सांसारिक उपाधीचा शीण आणि वीट येऊन आम्ही एकदम विरक्त होतो आणि जगातून उठतो. मानवी आत्म्याची अंतिम अवस्था काय होणार तिचा ठाव घेण्यात आणि अखिल विश्वाची पाळेमुळे शोधून काढण्यात आमच्या बुद्धीचा लय लागतो. ह्याप्रमाणे आमचे बंड म्हणजे सा-या विश्वाविरूद्ध, आमची स्वतंत्रता म्हणजे निस्संगता, आमचे जय म्हणजे व्यक्तीचे जय, आमचा मोक्ष आमच्यापुरताच, आमचे अनुभव, आमचे शोध व आमची भारती ही जगाच्या वाड्मयात कालवशाने अत्यंत उच्च स्थान घेतात. पण आमच्या समाजाची काय वाट! गोरगरीब, तडीतापडी ह्यांस शांतीचे व शेवटचे वाक्य कोण सांगतो? त्यांची धार्मिक भूक निवारण्याची काय योजना आहे?

उलट पक्षी, आमची भव्य व पुरातन देवस्थाने, बारा ज्योतिर्लिंगे, तीर्थे, यात्रा, पूजेचे संभार, विधीचे अवडंबर, ब्राह्मण, बडवे, पुजारी व सेवेकरी, वर्णव्यवस्था आणि मठस्थापना, शंकराचार्य आणि जगदगुरू, वेदकालापासून चालत आलेले आचार, नवीन नवीन निघणारे धार्मिक उत्सव आमि वेदोकक्तासारख्या नव्या सुधारणा इ. एक का दोन अनेक त-हेने धर्माच्या दुस-या बाजूची आमची जय्यत तयारी आहे. असे असून आमच्यात धर्म नाही असे कोण म्हणेल?

पण वर जी धर्माची दोन लक्षणे सांगितली त्यांतील एकही इंग्लंडातील धर्मास मुळीच लागू पडत नाही. येथेही नाना पंथ, नाना मते, धार्मिक कलह आमि वैमनस्य ही आहेत. केव्हा केव्हा दंगे, क्वचित खूनही होतात. पण ह्या सगळ्यांचे एक सामान्य लक्षण आहे. एक प्रकारचे राष्ट्रीय ऐक्य आहे आणि त्यातच नव्याजुन्या सा-यांची बळकटी आहे. हे लक्षण दोन शब्दांतच सांगता येते ते असे. स्वातंत्र्य आणि व्यावहारिकता. ह्या स्वातंत्र्यासाठी राष्ट्र पोपविरूद्ध उठले. प्रजा राजाचे ऐकत नाही, फार काय, मुलगा बापाची पर्वा ठेवीत नाही! हे स्वातंत्र्य म्हणजे एक नुसते खूळ नाही. सर्व योजना व सर्व खर्च राष्ट्राकडून मिळत असता त्या सर्वांवर पाणी सोडून उलट अत्यंत कष्टमय छळ सोसूनही लोकांनी आपापले पंथ स्थापले. इतकेच नव्हे, तर सुंदर आणि टोलेजंग मंदिरे बांधली, मंडळ्या स्थापिल्या, धर्मशिक्षणाच्या शाळा व कॉलेजे उभारली आणि परदेशी प्रचंड मिशने पाठविली. हे सर्व केवळ स्वातंत्र्याचे खूळ नव्हे तर स्वत:ची हिम्मत व कळकळ. दुसरा मोठा गुण म्हणजे व्यावहारिकता. लोकशिक्षण आणि गरिबाची दाद ह्या बाबतीत ह्या पंथानी आजवर अविश्रांत परिश्रम केले आहेत व अद्यापिही करीत आहेत. लोकोपयोगी कृत्ये करण्यात नाना प्रकारच्या लालुची व करमणुकी दाखवून गरीब व उनाड लोकांस व्यसनापासून दूर ठेवण्यात ह्या निरनिराळ्या पंथांची एकमेकांवर ताण होत असते. अगदी लहान लहान कंगाल खेड्यांत जाऊन काही एक वेतन न घेता, अडाणी लोकांच्या कानांवर येथूच्या सदबोधाची चार वाक्ये ठेवण्याचे कामी गृहस्थ उपदेशकांची योजना करण्याची मेथॉडिस्ट पथाची हातोटी, लंडनसारख्या मोठ्या शहरी कुमार्गात पडून सर्वतोपरी भ्रष्ट झालेल्या तरूण बालिकांचा उद्धार करून पुन: त्यांच्याकडूनच तशा दुस-या पतितांस हातभार देण्याचे मुक्तिफौजेचे प्रयत्न, क्वेकरपंथाची सात्विकता, काँग्रिगेशनल पंथाचे स्वातंत्र्य आणि स्वावलंबन इत्यादी अनेक बाजूंनी अनेक पंथांकडून देशाचा व्यावहारिक फायदाच होत आहे. ह्या विरोधी पंथात परस्पर भिन्नता आहे तरी राष्ट्रहिताच्या कामी ह्यांचा तात्काल एक दिल होतो.

गेल्या पाचपंचवीस वर्षांत धर्माची नवी चलबिचल चालली आहे ती ही की ह्या विरोधी पंथाच्या मोठमोठ्या वार्षिक परिषदा जमू लागल्या आहेत आणि त्या सर्वांचे एक साधारण सम्मेलन स्थापन झाले आहे. ह्या जुटीमुळे ह्यांना अधिकाधिक बळ येत चालले आहे, व संख्या वाढत आहे. ह्याप्रमाणे सुमारे अर्ध्या राष्ट्राचा विरोध पडल्यामुळे धर्माची जी राष्ट्रीय संस्था तिला राजकीय मदत मिळते ती बंद करण्याची खटपट चालू आहे.

पण वरील साधारण सम्मेलनात युनिटेरिअन पंथाचा मात्र अद्यापि शिरकाव होऊ शकत नाही. कारण ह्या पंथाची मते इतकी उदार आहेत की जुन्या ख्रिस्ती लोकांच्या आग्रहास ती पटत नाहीत. म्हणून युनिटेरिअनांस अद्यापि वाळीतच रहावे लागत आहे. त्यांचीही लिव्हरपूल येथे थोड्या दिवसांपूर्वी एक मोठी त्रैवार्षिक सभा भरली होती.

इंग्लंडातील युनिटेरिअन चळवळीचे वास्तविक स्वरूप वाचकांच्या मनात नीट भरविण्याकरिता गेल्या आठवड्याच्या पत्रात इंग्लंडात हल्ली धर्माचे कार्य कसे चालले आहे, ह्याचा साधारणपणे विचार केला आहे. पंधरा दिवसांपूर्वी लिव्हरपूल येथे युनिटेरिअन लोकांची आठवी त्रैवार्षिक परिषद भरली होती, तिजसंबंधी एक-दोन विचार ह्या पत्री कळविण्यात हेतू आहे.

युनिटेरिअन मताचा आणि समाजाचा पूर्वापार इतिहास आणि हल्ली हा समाज, धर्मात कोणती व कशी सुधारणा घडवीत आहे, ह्यासंबंधी मी मागे एका पत्रात त्रोटक माहिती दिली आहे. इंग्लंड देश सुधारणेच्या शिखरास पोहोचला आहे, विद्येची व लोकशिक्षणाचा अत्यंत प्रसार झाला आहे व अद्यापि झपाट्याने होत आहे, व्यक्तिस्वातंत्र्यास पूर्ण मुभा आहे आणि उलटपक्षी युनिटेरिअन समाजही, ऐतिहासिक ख्रिस्तीधर्मात जी शुद्ध व सार्वत्रिक तत्त्वे आहेत ती कायम राखून त्यांवर मध्ययुगात जी धूळ साचली आहे ती झाडून टाकण्याचा सावधपणे व सादरपणे प्रयत्न करीत आहे. इ. गोष्टी मनात आणता कोणाही परकीयास सहज असे वाटण्याचा संभव आहे की, इंग्लंडात सर्वत्र नाही तरी बहुसंख्या तरी ह्याच मताची असेल. पण आश्चर्याची गोष्ट ही की, प्रकार अगदी उलट आहे. इंग्लंड, स्कॉटलंड आणि आयर्लंड येथील एकंदर मिळून ३६४ च युनिटेरिअन मंदिरे आहेत. इतकेच नव्हे तर ह्याहून आश्चर्याची गोष्ट ही की, १८४० त ह्या समाजाची जी स्थिती होती त्याहून हल्ली केवळ संख्येच्या मानाने पाहता मुळीच प्रगती झालेली नाही. ह्यास पुष्कळ कारणे आहेत, ती सर्व येथे लिहिण्यास स्थळ नाही. तथापि ही परिषद कशी अस्तित्वात आली ह्याचा वरील गोष्टीशी बराच संबंध असल्यामुळे त्याचा थोडक्यात उल्लेख करणे इष्ट आहे.

सन १८१३ त युनिटेरिअन लोकांस कायद्याने पूर्ण स्वातंत्र्य मिळाल्यावर १८२५ त ब्रिटिश अँड फॉरेन युनिटेरिअन असोसिएशन नावाची, हल्ली मोठ्या प्रमाणावर काम करणारी मंडळी स्थापण्यात आली. ठिकठिकाणच्या गरीब समाजास मदत करणे, मंदिरे बांधून देणे, पुस्तके छापून वाटणे, बाहेर देशी मिशन पाठविणे आणि बाहेर देशी उदार धर्माची चळवळ करणा-याशी स्नेहसंबंध जोडणे इत्यादी महत्त्वाची कामे ही मंडळी आजपर्यंत करीत आली आहे. पण ही मंडळी केवळ व्यक्तिविषयक सभासदांची बनलेली आहे आणि हिची कमिटी अर्थात ह्या सभासदांकडूनच नेमण्यात येते. उलपक्षी ठिकठिकाणच्या समाजांची सर्व अंतर्बाह्य व्यवस्था लोकसत्तात्मक पायावर, तेथील सभासदांकडून होत असते. स्थानिक समाजाची सर्व व्यवस्था राखण्याची जबाबदारी जशी त्या त्या समाजांच्या सर्व सभासद व्यक्तींवर आहे तशीच अशा सा-या समाजांची एक मध्यसंस्था स्थापून तिच्याकडून मध्यव्यवस्थेचे व प्रसाराचे काम करविण्याची जबाबादारीही ह्या ठिकठिकाणच्या समाजांच्या कमिटीवरच आहे हे उघड आहे. पण आजपर्यंत हे काम ब्रिटिश अँड फॉरेन ह्या थोड्या व्यक्तींच्या मंडळीकडूनच होत असल्यामुळे, समाजात यावा तितका जोर अद्यापि आला नाही. ही स्थिती लक्षात आणून सन १८८२ साली सर्व समाजांच्या प्रतिनिधींची ही परिषद स्थापण्यात आली. दर तीन वर्षांनी तिची एक बैठक होते. गेल्या पंधरवड्यात तिची आठवी बैठक लिव्हरपूर शहरी झाली. उपदेशकांचा पगार वाढविणे, त्यांना पेन्शन देणे, मँचेस्टर कॉलेज ऑक्सफर्ड येथे आणणे, वगैरेसाठी मोठमोठे फंड जमविणे आणि इतर बरीच कामे ह्या परिषदेमुळे ह्या २१ वर्षांत झाली आहेत. ही आठवी परिषद भरण्यापूर्वी गेल्या सबंध वर्षात एका महत्त्वाच्या प्रश्नासंबंधी वाटाघाट होत होती, ती अशी की, आजपर्यंत परिषदेने नुसते ठराव पास केले आहेत, तर ह्यापुढे तिच्या कमिटीची एक मोठी कार्यकारी संस्था बनावी, तिच्या सेक्रेटरीने नेहमी देशभर हिंडून सर्व समाजाचा प्रत्यक्ष समाचार घ्यावा व लागेल ती मदत करावी, ह्या कामास त्याने आपणास वाहून घ्यावे व त्यास भरपूर पगार द्यावा, थोडक्यात सांगावयाचे म्हणजे युनिटेरियनांचा एक मोठा संघ (Church) स्थापावा.

ह्याप्रकारे आज वर्षभर चर्चा होऊन शेवटी परवा एकसारखे चार दिवस ह्या परिषदेचे काम लिव्हरपूल येथे झाले. ह्याची साद्यंत हकीकत इन्क्वायर पत्रात प्रसिद्ध झाली आहे. त्यातील अध्यक्षांचे भाषण व उपदेश, मुख्य कामासंबंधी रेव्ह. वुड ह्यांचा कागद, जाहीर सभेतील रेव्ह. जॅक्स व विक्सटीड ह्यांची भाषणे फार मनन करण्यासारखी आहेत. परिषद मला कशी दिसली हे थोडक्यात लिहितो.

लिव्हरपूल हे शहर अत्यंत श्रीमंत आणि सा-या इंग्लंडात पुढारलेले आहे. तेथील परिषदेच्या व्यवस्थापक मंडळीने बाहेरून आलेल्या सुमारे ६०० प्रतिनिधींची उत्तम व्यवस्था सर्व आपल्या खर्चाने केली होती. टाऊन हॉलातील सुंदर आणि भव्य गायनशाळेत चार दिवस सकाळी १० पासून तो रात्री १० पर्यंत सभेचे काम चालत असे. नेहमी सुमारे १००० चा श्रोतृवृंद शांतपणे बसून ऐकत असे. मध्यंतरी एका जवळच्या मोठ्या हॉटेलात सर्व प्रतिनिधींचा व पाहुण्यांचा एकाच स्थळी मोठ्या समारंभाने भोजनविधी होत असे. तिस-या प्रहरी चहासाठी एकदा बैठक उठे तेव्हाही निरनिराळ्या भागांतून आलेल्या बंधुभगिनींची परस्पर ओळख होऊन अगत्याची संभाषणे होत. ह्या समाजात स्त्रीपुरूषांची संख्या बहुतेक समसमानच होती. मुख्य दिवसाचे काम बरेच महत्त्वाचे आणि वादग्रस्त असूनही वादविवाद अगदी सुरळीतपणे झाला. पहिले दिवशी परिषदेच्या उपासनेच्या वेळी फिलार्मोनिक हॉल नावाच्या अत्यंत भव्य सार्वजनिक मंदिरात सुमारे १३०० स्त्री-पुरूषांची गर्दी जमली होती. प्रार्थनेच्या आरंभी (Awake our souls! Away our fears!) ह्या पद्याचा टाहो एकदम जेव्हा १३०० कंठांतून फुटून बाहेर आला, तेव्हा इमारतीच्या दगडांनाही जणू हुरूप येऊन ते प्रतिध्वनीच्या मिषाने आम्हांस हाक देऊ लागले. जाहीरसभेत श्रोतृवृंद १६०० वर हजर होता. मी मागे एकदा युनिटेरिअन समाज म्हणजे सुधारलेल्या जगाचे प्रबुद्ध अंतर्याम असे म्हटले होते. त्याची मला येथे चांगली प्रचीती आली. राजकीय, सामाजिक आणि धार्मिक ह्या सर्व बाजूंनी जरी जहाल सुधारकी भाषणे झाली, तरी चहूंकडून टाळ्यांचा गजरच झाला. जणू वॉकर्स आर्ट ग्यालरी नावाच्या एका अफाट चित्रसंग्रहालयात परिषदेचा सामाजिक मेळा (Conversazione) जमला, त्यावेळी इकडील रिवाजाप्रमाणे सायंकाळचा प्रेक्षणीय पेहराव करून येथील कुलीन व प्रमुख कुटुंबातील सुमारे दोन हजार स्त्री-पुरूषे जमली होती. अखेरीस शहरच्या कंगाल वस्तीत गरीबांसाठी स्थापलेल्या एका मिशन-मंदिरात मद्यपान निषेधाची एक टोलेजंग सभा होऊन परिषदेचे काम आटपले. मुख्य काम जे मध्यसंघ स्थापण्याविषयीचे त्याविषयी सर्व समाजांच्या मतानुरूप सविस्तर विचार करून अखेर निकाल लावण्याचा अधिकार परिषदेच्या कमिटीस देण्यात आला.

असो. वाचकहो, आणि विशेषत: ब्राह्मबंधूंनो, ह्या सातासमुद्रांपलीकडच्या सात हजार मैलांवरच्या परदेशी गप्पा तुम्हांला सांगण्यात काय तात्पर्य बरे! आज आम्ही ब्राह्मबंधू युनिटेरिअनांप्रमाणे सारख्याच नावेत बसून संगतीने एकाच तीराकडे निघालो आहो. त्यांच्यासारख्याच पण शतपट अधिक आम्हांपुढे अडचणी आहेत. त्यांच्यासारखीच पण सहस्त्रपट अधिक आमच्यावर जबाबदारी आहे. पण ते करीत आहेत त्या खटपटी, नजरेने पाहून त्यांच्या अंशमात्रही खटपट करण्यास आम्ही कचरतो, ह्याला काय म्हणावे! इंग्लिश लोकांचे युनिटेरिअन चळवळीवाचून विशेषसे अडतेच असे नाही. येथे कोणी नव्या पंथाचा असो की जुन्या पंथाचा असो, मानवी प्रगतीच्या प्रत्येक बाबतीत हरत-हेने तो आपले पाऊल पुढेच टाकीत असतो. आमचे तसे आहे काय? नवीन घोडे जुंपलेल्या गाडीप्रमाणे आमच्या राष्ट्राची ओढाताण होत आहे. आम्ही एकीकडे ओढावे तर ब्राह्मसमाजाबाहेरचे आमचे बंधू अगदी उलट दिशेने ओढ घेतात. फार काय तर समाजातीलच आमचे बंधू वेळेला अंग चोरतात! सपशेल जूं टाकून मोकळे होतातही केव्हा केव्हा! प्रत्येकाने आपली शिकस्त केली तरी आमच्या अवजड राष्ट्राची गाडी हालेल की नाही ह्याची भीती असूनही आम्ही धरसोड चालविली आहे! आमचे समाज थोडे, आमचे सभासद कमी, ह्याबद्दल वाईट वाटावयाला नको. आहेत. त्याच समाजांचा परस्पर संबंध समाधानकारक नाही, आहेत त्याच सभासदांच्या कर्तव्याची वाटणी न्यायाची नाही, ह्याबद्दल मात्र अवश्य वाईट वाटले पाहिजे, वाटत नसेल तर मग सभासदांची संख्या कशी वाढेल? आणि वाढून तरी काय फळ! आमच्या युनिटेरिअन मित्रांना मध्यसंघाची आवश्यकता वाटून तिच्या तयारीला ते लागलेदेखील. पुढील त्रैवार्षिक परिषदेच्या आधीच ते काम उरकून जाईल. पण आमची वाट काय? आम्ही आमचा प्रसार का होत नसावा ह्याबद्दल नुसते आश्चर्य मानीतच बसणार काय?

धर्म, जीवन व तत्त्वज्ञान

  संपादकीय
  पुरस्कार
विभाग पहिला : प्रवासवर्णन
 - जलप्रवास
 - मार्सेय शहर
 - पॅरीस शहर
 - नॉटर डेम द ला गार्ड देऊळ व ते
     पाहून सुचलेले विचार
 - लंडन शहर
 - ब्रिटिश म्युझिअम
 - लंडन येथील बालहत्यानिवारक गृह
 - सोमयागाचे वर्णन वाचून वाटलेला
    विस्मय व विषाद
 - डेव्हनपोर्ट येथील गुड फ्रायडे
 - बोअर युद्धाचा शेवट व ऑक्सफर्ड
    येथील उल्हास
 - राष्ट्रीय निराशा
 - बर्टन खेड्यातील शाळा कशी दिसली?
 - विभूतीपूजा
 - मॅंचेस्टर कॉलेज
 - पृथ्वीच्या पोटात ४४० यार्डाखाली
 - जनातून वनात आणि परत
 - बंगलूरच्या रस्त्यातील एक फेरी
 - मंगळूर येथील काही विशेष गोष्टी
 - बंगालची सफर
 - शांतिनिकेतन
 - सह्याद्रीवरुन-१
 - सह्याद्रीवरुन-२
 विभाग दुसरा : धर्मपर लेख
 - युनिटेरियन समाज
 - इंग्लंडातील आधुनिक धर्मविषयक
   चळवळ आणि लिव्हरपूल
 - सुशिक्षित धर्मभगिनींस अनावृत पत्र
 - ब्राह्मसमाज व आर्यसमाज (ह्यातील
    हल्लीचे साम्य,भेद व पुढे ऐक्यार्थ यत्न)
 - धर्मजागृती
 - निवृत्ती व प्रवृत्ती आणि अवतारवाद व विकासवाद
 - ईश्वर आणि विश्वास
 - बौद्धधर्म जीर्णोद्धार
 - ब्राह्मधर्म व ब्राह्मसमाज
 - आत्म्याची यात्रा
 - आत्म्याची वसती
 -  हिंदुस्थानातील उदार धर्म
 - कौटुंबिक उपासनेच्यावेळी केलेला
    उपदेश देवाचा व आपला संबंध
 - आवड आणि प्रीती
 - स्तुती, निर्भत्सना व निंदा
 - विनोदाचे महत्त्व
 - प्रेमप्रकाश
 - संग व विषय
 - मरण म्हणजे काय?
 - धर्मप्रसारार्थ स्वानुभवाची आवश्यकता
 - ब्राह्म आणि प्रार्थनासमाजास एक विनंती
 - दास्यभक्तीची ध्वजा
 - प्रेमसंदेश
प्रो. ऑयकेन ह्यांची जीवनमीमांसा
 - धर्म-१
 - धर्म-२
 - नीती-१
 - नीती-२
 - नीती-३
 - शास्त्र आणि तत्वज्ञान-१
 - शास्त्र आणि तत्वज्ञान-२
 - सार्वजनिक नित्य व नैमित्तिक
    उपासनेच्यावेळी केलेले उपदेश
 - संतांचा धर्म आणि राष्ट्राचा उत्कर्ष
 - धर्म, समाज आणि परिषद
 - धर्मसंघाची आवश्यकता
 - विनययोग
 - शासनयोग
 - पितृशासन
 - गुरुशासन
 - राजशासन
 - धर्म आणि व्यवहार
 - प्रेरणा आणि प्रयत्न
 - मानवी आदर आणि दैवी श्रद्धा-१
 - मानवी स्नेह आणि ईश्वरभक्ती -२
 - मनुष्यसेवा आणि ईश्वरोपासना -३
 - मनाची प्रसन्नता आणि मोक्षप्राप्ती-४
 - परमार्थाची प्रापंचिक साधने-५
 - आधुनिक युग आणि ब्राह्मसमाज
 - धर्मसाधन
 - नैराश्यवाद
 - आनंदवाद
 - संसारसुखाची साधने
 - वृत्ती, विश्वास आणि मते
 - व्यक्तित्वविकास
 - स्त्री-दैवत
 - दान आणि ऋण
 - राज्यरोहण
 - नाममंत्राचे सामर्थ्य
 - मनुष्यजन्माची सार्थकता
 - आपुलिया बळे घालावी हे कास
 - कालियामर्दन
विभाग तिसरा : इतर लेख
 - आपला व खालील प्राण्यांचा संबंध
 -  स्वराज्य आणि स्वाराज्य
 - देशभक्ती आणि देवभक्ती
 - समाजसेवेची मूलतत्वे
 - निराश्रित साहाय्यकारी मंडळी व आक्षेपनिरसन
 - रा.गो.भांडारकर ह्यांचे धर्मपर लेख व व्याख्याने
 - प्रार्थनासमाज अप्रिय असल्यास तो का?
 - राजा राममोहन रॉय
 - मुरळी अथवा पश्चिम हिंदुस्थानातील हिंदू
    देवळांतील अनितिमूलक आणि बीभत्स प्रकार
 - श्रीशाहू छत्रपतींच्या मनाचा विकास
 - रावसाहेब थोरात ह्यांच्या "बोधमृत" ला प्रस्तावना
 - जमखिंडी येथील परशुरामभाऊ हायस्कूलचा
    सुवर्णमहोत्सव
 - थोरल्या शाहू महाराजांच्या कारकीर्दीचे मराठ्यांच्या
    इतिहासातील महत्त्व
 - डॉ. भांडारकरांस मानपत्र
 - मराठी भाषेद्वारा ब्राह्मधर्माचा प्रचार
 - राजा राममोहन व बुवाबाजी
 - प्रार्थनासमाजाचा एक नमुना
 - क्षात्रधर्म
 - स्वराज्य विरुद्ध जातिभेद
 - इतिहास, संशोधन व भाषाशास्त्र
 - गुन्हेगार जातीची सुधारणा
 - निराश्रित साह्यकारी मंडळी
 - वाई प्रार्थना संघ मंदिर प्रवेश
 - ब्रह्मानंद केशवचंद्र सेन
 - साधारण ब्राह्मसमाजाची पन्नास वर्षे
 - निराश्रित साहाय्य
 - मुंबई येथील मानपत्रास उत्तर
 - सत्यशोधकांना इशारा अथवा नव्या पिढीचे राजकारण
 - बंदिस्त बळीराजा
 - सही नाही; सहानुभूती!
 - टिळकांच्या मानपत्रास विरोध
 - A Scientific Catechism
 - Gleanings from Periodicals
 - The Arya Samaj of India
 - Liberal Religion in Japan
 - The New Light of Persia
 - Liberal Christianity in Europe
 - Unitarianism in England and America 
विभाग चौथा : परिशिष्टे
 - महर्षी शिंदे ह्यांचे पहिले कीर्तन
 - रामजी बसाप्पा शिंदे ह्यांचा मृत्यू
 - लाहोर येथील धर्मपरिषद

 - कोल्हापूर येथील धर्मविषयक चळवळ व

    प्रगतीपत्रातील अहवाल

 - विसावे व्याख्यान
 - आख्यान
 - महाराष्ट्र सुधारक आगळा
 - भगिनी जनाबाई ह्यांची स्मृतिचित्रे
 - परलोकवासी विठ्ठल रामजी शिंदे
 -  The Late Mr. V. R. Shinde
 - कै. अण्णासाहेब शिंदे, चरित्र व कार्य
 - प.वा. अण्णासाहेब शिंदे
 - व-हाड मध्यप्रांतीय सत्यशोधक हीरक महोत्सव
 - १९ मार्च १९३३-७१ वा वाढदिवस
 - श्री. महाराजांचे अस्पृश्योद्धारक कार्य-श्रीमंत
   सयाजीराव गायकवाड
 - दांभिक देशभक्तापेक्षा
 - धर्मरहस्य अथवा अंत्यजोद्धार
 - लाहोर येथील धर्म परिषद
 - आपुले स्वहित करावे पै आधी
 - सुखवाद व सुखाची साधने
 - लुटूपुटूची पार्लमेंट
 - बहाई समाजाचा ब्राह्मसमाजास संदेश
 - प्रेमाचा विकास
 - भोकरवाडी येथील आपत्ती
 - सुधारकांची जुनी परंपरा (स्फुट)
 - सुधारकच हिंदूधर्माचे खरे रक्षक
 - निष्ठा व नास्तिक्य
 - विठ्ठल रामजी शिंदे व श्री शाहू छत्रपती
 - विठ्ठल रामजी शिंदे व सयाजीराव गायकवाड
 - विठ्ठल रामजी शिंदे व महात्मा गांधी
 - वि.रा. शिंदे व राजाराम छत्रपती
 - विजापूर येथी धर्मकार्य, विजापूर
 - सोमवंशीय सन्मार्गदर्शक समाज
 - रोगनिवारक प्रयत्न-एक निकडीची विनंती
 - कवित्व आणि भरारी
 - मोफत व सक्तीचे शिक्षण नको !!
 - बहुजन पक्ष
 - डी.सी.मिशनचा १७ वा वाढदिवस
 - अहंकार नासाभेद
 - यश परिणामात नसून प्रयत्नात आहे.
 -  Maharashtra Provincial Social Conference
 - प्रांतिक सामाजिक परिषद-सातारा
 - शिवाजी की रामदास?
 - बडोदे-तत्वज्ञान व समाजशास्त्र विभागाचे अध्यक्ष
 - श्री. विठ्ठल रामजी शिंदे व सुबोध पत्रिका
 - कै. डॉ. संतूजी रामजी लाड
 - मागासलेले व अस्पृश्य
 -  Shree V. R. Shinde’s Work
 - पुण्यातील मानपत्रास उत्तर
-   Liberal Religion in India
- वाई ब्राह्मोसमाज-विश्वास लेख
 - गुरुवर्य शिंदे सूक्ती