धर्म, जीवन व तत्त्वज्ञान

बौद्धधर्म जीर्णोद्धार

व्याख्यान जुळवून आणणारे, व्याख्यानाचे स्थळ व प्रसंग, श्रोते आणि वक्ता ह्यांपैकी कोणीही बौद्धधर्माचे नसताना ह्या विषयावर व्याख्यान का होत आहे, अशी शंका येणे साहजिक आहे. प्रस्तुत विषयाचा समाजशास्त्राच्या दृष्टीने विचार करावयाचा आहे. कोणत्याही लोकांची धर्मसंबंधी मते, विश्वास, विधी आणि व्यवहार ही सर्व त्या लोकांची सामाजिक प्रगती किती झाली आहे हे पाहण्याची मुख्य साधने होत; व समाजशास्त्राच्या अध्ययनाची मुख्य सामग्री म्हणण्यासही हरकत नाही. आधुनिक समाजशास्त्राचे प्रधान आचार्य स्पेन्सर साहेब हे होत. इतर भौतिक शास्त्रे ज्या स्वयंभू नैसर्गिक बाह्य नियमांनी बांधली गेली आहेत, त्याच नैसर्गिक नियमांचा अम्मल मानवी समाजाची उत्पत्ती, वाढ व लय ह्या गोष्टींतही आहे, हे मत स्पेन्सरने जोराने प्रतिपादिले आहे. स्पेन्सरचे मत समाजशास्त्र (Sociology) हा जीवनशास्त्र (Biology) ह्यांचा एक केवळ खांब आहे असे होते, पण ह्या मतात अलीकडे बरीच सुधारणा होत चालली आहे. व्याख्यात्यांनी ह्या ठिकाणी प्रो. मॅकॅन्झी ह्यांच्या ऑक्सफर्ड येथील मँचेस्टर कॉलेजातील ह्युमॅनिझम “Humanism” वरील व्याख्यानातील एक उतारा वाचून दाखविला. त्यातील आशय असा होता की, खालील प्राण्यातील व्यक्तीच्या व जातीच्या पूर्वेतिहासाचा परिणाम तिच्याच वर्तमान व भावी जीवनक्रमावर घडतो. पण तो तिला कळून येत नाही. मनुष्याला हा घडून येणारा परिणाम समजतो, इतकेच नव्हे तर मनुष्य जाणूनबुजून आपल्या व्यक्तीच्या तशाच जातीच्या पूर्वेतिहासातील महत्त्वाच्या गोष्टींचा फायदा घेऊन त्यांच्या बळावर आपला पुढील आयुष्यक्रम रचीत असतो व ह्यातच त्याचा मनुष्यपणा खालील प्राण्यांहून विशेष आहे. ह्यावरून समाजशास्त्र हा केवळ जीवनशास्त्राचा एक भाग आहे, ही समजूत अपूर्ती ठरते.

बौद्धधर्म हा आमच्या लोकांच्या पूर्वेतिहासातील एक केवळ महत्त्वाचा भाग आहे. इतकेच नव्हे तर तो आमच्या हल्लीच्या धार्मिक व सामाजिक जीवनाचा एक मोठा घटक आहे. ही जाणीव आम्ही आमच्यामध्य ठेविली नाही म्हणून वस्तुस्थिती तशी नाही असे होणार नाही. आमचे जीवन मात्र पशूप्रमाणे जाणीवहीन, आणि केवळ बाह्य नियमांच्या बळावर वाहत चालले आहे, असे होईल. बौद्धधर्म हा आमचा बिनमोल वारसा आहे. त्याची नुसती जाणीव ठेवूनच तृप्त न राहता मागे काय झाले असेल ते असो. अत:पर त्यावर आपला अभिमानाने हक्क शाबीत करून आम्ही त्याचा लाभ घ्यावयाला पाहिजे आहे. ह्या दृष्टीने पाहता आजचा विषय नुसता समाजशास्त्राच्या अध्ययनाचाच नसून तो समाजसुधारणेचाही आहे असे दिसून येईल. पण खरोखर तो ह्याहीपेक्षा जास्त आहे. व्याख्यात्यांनी स्वत:ला ज्या धर्मसंप्रदायाला वाहून घेतले आहे, त्याची त्यांना अशी आज्ञा आहे की, सर्व धर्मांचे चौकस व निरपेक्ष बुद्धीने संशोधन व तुलना करून त्यातून जे सारभूत सत्य निघेल त्याच्या आधारे दुस-याची सेवा व स्वत:ची उन्नती करून घ्यावी व हेच काय ते खरे धर्माचरण समजावे. ह्या दृष्टीने आजचे व्याख्यान उज्ज्वल धर्माची एक लहानशी कामगिरीच होय.

भगवान गौतमबुद्धाने शिकविलेले धर्मसिद्धांत, त्यांनी घालून दिलेले आचरणाचे नियम व रेखाटलेली ध्येये ह्यांचा समग्र विचार करण्याची आज जरूरी नाही व तसे करण्यास अवकाशही नाही. अलीकडे प्रसिद्ध होणा-या कोणत्याही पुस्तकात ती सापडतील. त्या सर्वांच्या सामान्य लक्षणांपैकी काही मुख्य लक्षणांचा ऊहापोह करणे हे आजच्या प्रसंगाला अनुसरून आहे.

लक्षण १ ले- बुद्धाच्या सिद्धांताचे पहिले लक्षण म्हणजे त्याची अत्यंत सयुक्तिकता हे होय. आधुनिक तत्त्वज्ञानामध्ये ऑगस्ट कॉम्ट ह्याने जो निश्चितज्ञानवाद (Positivism) सुरू केला, त्याचा उपक्रम गौतमबुद्धाने जवळजवळ १५०० वर्षांपूर्वीच ह्या देशात केला होता. एकापक्षी अंधविश्वास, अंधकल्पना, पोकळ तर्क, रूढी अथवा आत्मवाक्याचे अवलंबन इ. मनाचे जे हीन दर्जाचे व्यापार व अन्यपक्षी श्रद्धा, प्रेरणा, प्रतिभा इत्यादी उच्च दर्जाचे जे व्यापार आहेत, त्या दोन्हींपासून सारखेच अलिप्त राहून तथागताने आपले सिद्धांत स्थापित करण्याचा शक्य तो प्रयत्न केला आहे. म्हणून त्याच्या शिक्षेत चमत्कार, गूढ तत्त्वे, गुप्तज्ञान वगैरेंना थारा नाही. इतकेच नव्हे तर मानवी बुद्धिशिवाय ज्ञानाची इतर द्वारे त्याने जणू काय बंदच केल्यामुळे त्याचे सिद्धांत काही अंशी नीरस आणि नैराश्यजनक भासण्याचाही संभव आहे. पण ते काही असो, इतक्या प्राचीन काळी तथागताने कडकडीत युक्तिवादाची इतकी शिकस्त केली हे पाहून रीस डेव्हीडसारख्या आधुनिक युक्तिवाद्यासही त्याचे कौतुक केल्यावाचून राहवत नाही. पण युक्तिवादाची शिकस्त करणे ह्यातच बौद्ध सिद्धांताच्या पहिल्या लक्षणाची  परिसमाप्ती होत नाही. युक्तिवाद आणि बुद्धिवाद ह्यांत पुष्कळ फरक आहे. साहजिक विचाराने एकादी गोष्ट युक्त किंवा अयुक्त दिसेल तशी ती बरी किंवा वाईट ठरविणे व त्याप्रमाणे वागणे हा युक्तिवाद होय. आणि मानवी बुद्धीच्याच द्वारे सर्व सत्याचा निर्णय करण्याचा आग्रह धरणे व मानवी बुद्धीने ठरविलेले तत्त्व तेच अखेरचे सत्य मानणे हा बुद्धिवाद होय. मनुष्य स्वाभाविकपणे युक्तिवादाच्या साहाय्याने विचार करू लागला म्हणजे सहजच त्याच्या युक्तिवादाचा परिणाम वरील बुद्धिवादात होतो. पण तेथेच त्याची वाढ थांबत नाही, तर लवकरच त्याच्या बुद्धिवादाचा विकास विज्ञानवादात होतो. म्हणजे आपल्या बुद्धीनेच अंतिम सत्य ठरविण्याचा आग्रह कमी होऊन अंतिम सत्य म्हणून काही कायमची वस्तू आहे, तिला कशाचीही अपेक्षा किंवा अवलंब नसता ती केवळ निर्गुण आहे, अशा प्रकारचा आग्रह वाढू लागतो. शेवटी निरनिराळ्या दर्शनकारांनी ह्या ‘केवला’ ची किंवा ब्रह्माची किंवा ‘निर्गुणा’ ची निरनिराळ्या रीतीने उपपत्ती केल्यावर त्याच्या सामान्य अनुयायी समूहामध्ये वरील युक्तिवाद, बुद्धिवाद, किंवा विज्ञानवाद हे तिन्ही मावळून जाऊन त्यांचे अखेरचे पर्यवसान  जो हटवाद तो मात्र कायम राहतो. भगवान गौतमबुद्धाने आपल्या युक्तिवादामध्ये बुद्धिवादाचाही आग्रह शिरू दिला नाही. मग पुढील आपत्तीपरंपरेचा तर प्रश्नच उरला नाही.

युरोपातील मध्ययुगातील हटवादाशी झगडण्यासाठी प्रथम साहजिक युक्तिवादाचा उदय झाला. त्याचा विकास १८ व्या व १९ व्या शतकांतील आधुनिक बुद्धिवादात (Rationalism) व केवलवादात (Absolutism) झाला. ह्या दोन्ही वादांतील आग्रहाचा भाग तेवढा निरस्त करण्यासाठी युरोप आणि अमेरिकेत हल्ली पुन: युक्तिवाद आणि व्यवहारवाद अधिक व्यवस्थित रीतीने व नेटाने मांडण्यात येत आहे. लंडनमध्ये शिलर आणि ड्यूवेप्रभृती, फ्रान्सात प्रो. बर्गसन् आणि इतालीत सिनोर पॉपिनी ह्या मंडळीने (Humanism) ह्या नावाने व अमेरिकेतील प्रसिद्ध तत्त्ववेत्ता प्रो. वुइल्यम जेम्स प्रभृतिमंडळीने (Pragmatism) व्यवहारवाद ह्या नावाने वरील बुद्धिवाद आणि केवलवादाच्या उलट चळवळ करण्याचा तर अगदी विडाच उचलला आहे. ह्या नवीन विचारक्रांतीच्या दृष्टीने पाहता खालील उता-यावरून बौद्ध विचाराची पद्धत २० व्या शतकातल्याप्रमाणे अगदी ताजी होती असे दिसते.

बॅक्ट्रिया देशातील सागलचा राजा मिलिंद (Minander) ह्याने नागसेन नावाच्या बुद्ध भिक्षूला प्रश्न केला-“तुमचे नाव काय?” भिक्षूने उत्तर केले, “माझे आई बाप, माझे सोबती व इतर मला ‘नागसेन’ ह्या शब्दाने  हाक मारितात, पण तेवढ्यावरून ‘नागसेन’ म्हणून काही निराळीच वस्तू आहे से आपण समजू नये.”

राजा म्हणाला,-‘काय! नागसेन म्हणून काहीच वस्तू नाही, तर तुमच्या पापपुण्याचा अधिकारी कोण? तुम्ही मिथ्यावादी आहा...’ नागसेनाने राजास उलट प्रश्न विचारला, ‘राजा, आपण ज्या रथात बसून आला तो रथ म्हणजे त्याचे चाक काय? जू काय? वरील छत्र काय? सारथी काय? घोडे काय? वरील ध्वज काय?’ इ. ह्या सर्व बारीक प्रश्नांस राजाने नकारार्थी उत्तर दिल्यावर नागसेनाने पुन: विचारले,-‘....ही सर्व पृथक् साहित्ये रचून ठेविल्यास जो ढीग होईल तो रथ होईल काय? किंवा ही एकत्र रचलेली साहित्ये काढून घेतली असता मागे रथ म्हणून काही उरेल काय?...’ ह्याही प्रश्नास राजास नकारार्थीच उत्तर द्यावे लागले. तेव्हा नागसेनाने राजास म्हटले ‘राजा, आपमही मजप्रमाणेच मिथ्यावादी ठरता.’

ह्याप्रमाणे निरर्थक आणि दुराग्रही केवलवादाच्या उलट भगवान् बुद्धाची शिक्षा होती. ते नास्तिक नव्हते, केवळ (Pragmatist) व्यवहारवादी होते. तथापि तत्कालीन ब्राह्मणांनी व मध्ययुगातील शंकराचार्यांनी त्यांना नास्तिक ठरविले. इतकेच नव्हे इतर प. लोकवासी राजारामशास्त्री भागवतासारख्या विचारी आधुनिकांनी देखील ‘बौद्धधर्म म्हणजे अंधार’ शी हूल उठवावी हे किती आश्चर्य?

लक्षण २ रे- बोद्ध सिद्धांत ज्याप्रमाणे सयुक्तिक असून केवळ पोकळ, तार्किक किंवा विज्ञानवायूने भरलेले नसत, तर उलट निश्चित व्यवहारवादी असत. त्याप्रमाणेच बौद्धधर्माचरणही पूर्णपणे प्रागतिक असून शिवाय उलटपक्षी अत्यंत सहिष्णुतापर व सहानुभूतिपर असे. सुधारक झाला की तो सहिष्णु झालाच असे पुष्कळ वेळां आढळून येत नाही. मताने मात्र कडकडीत प्रागतिकता मिरविणे, त्यातही केव्हा केव्हा कचरणे, पण कृतीचे वेळी सपशेल अंग चोरणे आणि उलट केवळ आपल्या विचारसुधारणेच्या जोरावरच पुराणपक्षाशीरणे माजविणे असली खोटी सुधारक लक्षणे दुर्दैवाने इतिहासात वेळोवेळी आढळून येतात. बौद्धधर्मातील आचार अशा कोटीतला मुळीच नव्हता.

परवा चवथ्या प्रांतिक सामाजिक परिषदेची बैठक काशी येथे झाली त्यावेळी परिषदेच्या स्वागत कमिटीच्या अध्यक्षांनी मोठ्या अभिमानाने सांगितले की, हिंदुस्थानातील आद्य सुधारक श्रीगौतमबुद्ध ह्याने आपल्या सुधारणेच्या मंगल कार्यास ह्याच पुण्यक्षेत्री सुरूवात केली आणि खरोखरीच तेव्हापासून ह्या मंगलकार्याचा ओघ आमच्या देशात अप्रतिम वेगाने व सर्व बाजूंनी चालला होता. स्त्रियांस पुरूषांप्रमाणेच हक्क होते; किंबहुना धर्मप्रसाराचे कामी देखील स्त्रिया पुढाकार घेत होत्या. सिव्हलद्वीपात धर्माचा प्रसार करण्यासाठी अशोक राजाने प्रत्यक्ष आपल्या कन्येस दीक्षा देऊन पाठविले. पशुमेध, नरमेधादिकांचे क्रूर प्रकार, विधिवैकल्याचे वेडेचार आणि अशा सर्वच प्रकारच्या धर्मभ्रमाचे पटल ह्या नवीन धर्माने दूर केले. हिंदुस्थानातील बद्धमूल झालेल्या ज्या जातिभेदाचे निरसन करण्याचे कामी ख्रिस्ती धर्माला, किंवा त्याहून करड्या महंमदी धर्मालाही पूर्ण यश आलेले नाही. त्या जातिभेदाला आणि वर्णभेदाला श्रीगौतमाच्या धर्मछत्राखाली थाराच मिळेनासा झाला. कारण विहितधर्माचे आचरण करण्याचे बाबतीत तथागताने अर्धवटपणाचे किंवा तिशहाणपणाचे अवलंबन कधीच केले नाही. पण चमत्कार हा की जे कोणी आग्रहाने एकादी सुधारणा घडवून आणतात त्यांच्या त्या आग्रहाची धुमी एकदम पेटली म्हणजे मग तिच्यात परपक्षविषयक सहिष्णुतेची, सहानुभूतीची किंबहुना सदयतेची देखील आहुती पडते, ते त्यास कळत नाही किंवा कळले तरी त्याची ते पर्वा करीतनासे होतात. प्रॉटेस्टंट लोकांना रोमन कॅथॉलिकांचा व प्युरिटन पंथाच्या लोकांना पूजाविषयक विधींचा व उपकरणांचा कसा तिरस्कार येतो किंवा मुसलमानांनी धर्मसुधारणेच्या नावाने  मूर्तिपूजकांचा किती छळ केला ह्या उदाहरणांवरून सुधारकांच्या असहिष्मुतेविषयी काही अंशी तरी कल्पना करता येईल.

बौद्धधर्माचा प्रसार असा नाही. स्वत:गौतमानेच काय पण त्याच्या कोणत्याही अनुयायाने सुधारणा घडवून आणण्याच्या आपल्या आवेशाला स्वत:च्या सहिष्णुतेचा बळी दिला असल्याने उदाहरण कोठेच आढळत नाही. उलट असा प्रकार पुष्कळदा घडण्याचा उल्लेख आहे की, परधर्मीयांनी तथागताकडे वादविवाद करण्यास यावे व तथागताचे विचार, विनय व प्रसन्नता पाहून वादात हार जाऊन शेवटी त्याच्याच धर्माचा उघड स्वीकार करण्यास तयार व्हावे व अशा समयी तथागतानेच उलट त्यास आपला जुना पंथ अशा उतावीळपण एकाएकी सोडण्याचे कारण नाही म्हणून त्यातलीच चांगली बाजू त्यांना, दाखविण्याचा प्रयत्न करावा. लालूच दाखवून किंवा जबरी करून केवळ आपल्या अनुयायांची संख्या वाढविण्याची प्रवृत्ती बौद्धधर्मात कधीच नव्हती. हिंदुस्थानात किंवा जेथे बौद्धधर्माचा प्रसार झाला आहे अशा चीन, जपान देशांत तेथील पूर्वीच्या धर्मानुयायाशी मिळून मिसळून राहण्याचा प्रथमपासूनच कल आहे. पण ह्या अपूर्व सौम्यतेचे कारण आपला धर्म वाढला काय किंवा न वाढला काय ह्याविषयी बेपर्वाई किंवा नेभळेपणा होता असेही नाही. धर्मप्रसारासाठी गौतमाने स्वत: जसे आपले राज्य, तरूण भार्या आणि नूतन बालक ह्या सर्वांवर पाणी सोडले, तसाच स्वार्थत्याग करणारे हजारो भिक्षू त्याला त्याच्या ह्यातीतच मिळाले आणि मागाहून त्यांची परंपरा कायम राहिली म्हणूनच एके काळी बौद्धधर्म बहुतेक आशिया खंडभर पसरला व अद्यापि जगातील एक-तृतियांशावर लोकसंख्या त्या धर्माची आहे, ह्याप्रमाणे मतासारखी कृती करण्याचे शौर्य, आपले मत व आचार दूरवर पसरण्याचे वीर्य, परमत-सहिष्णुता व सहानुभूती ह्या वृत्तीचे औदार्य इ. परस्पर भिन्न गुणांचा समावेश एका गौतम बुद्धाच्या धर्माशिवाय इतरत्र सापडणे दुर्मिळ ह्यात शंका नाही.

लक्षण ३ रे-बौद्धधर्म निश्चितवादी, व्यवहारवादी आणि प्रागतिक होता. ह्यावरून तो केवळ जडवादी व ऐहिक गोष्टीतच गुरफटलेला असा होता असे नव्हे. बौद्धधर्मातील विरक्ती आणि निर्वाणविषयक अत्युच्च आध्यात्मिक आदर्श सर्वश्रुत आहेत. बौद्धधर्मातील प्रचारक भिक्षूंना कडकडीत वैराग्य पाळावे लागत असे. पण त्यासंबंधीही श्रीगौतमांनी मध्यमा प्रथिपत्तीचा मार्ग घालून देऊन विरक्ती किंवा विषयासक्ती ह्या दोन्हींचाही अतिरेक होऊ न देण्याची खबरदारी घेतली होती. ह्या मध्यमाप्रतिपत्तीच्यायोगे बुद्धभिक्षूंना कडकडीत वैराग्य असताही त्यांचे इतरत्र दिसून येणारे दुष्परिणाम त्यांना भोवले नाहीत. म्हणजे त्यांच्यातील सहृदयतेच्या प्रवृत्तीचे झरे आटले नाहीत. सहृदयतेचे दोन प्रकार आहेत. एक भूतदया व दुसरी सदभिरूची. भूतदया हा तर बुद्धाच्या शिक्षेचा विशिष्ट गुण होय. पण ब्राह्मणाचे रक्त ढेकणांना पाजणे हा अलीकडच्या जैनधर्मात आढळणारा अहिंसेचा प्रकार बौद्धामध्ये नाही. पशुयज्ञातील केवळ पशूंची प्राणहानी पाहूनच नव्हे तर पशूंचे हे अत्यंत हाल होत असत त्यामुळे श्रीगोतमाच्या कोमल अंत:करणास पाझर फुटला आणि त्यांनी सर्व प्रकारची हवने व क्रूर विधी बंद केले. त्यामुळे सर्वत्र मांसभक्षण बंद झाले असे नाही, तरी हल्ली भरतखंडात जो निर्मांसाहार प्रचलित झाला आहे त्याचे बरेच श्रेय बौद्धधर्माकडेच आहे. वैद्यशास्त्राचे शोध लावण्यासाठी प्राण्याच्या शरीरावर जिवंतपणी जे कठोर प्रयोग करण्यात येतात, त्याच्या प्रतिबंधार्थ हल्ली पाश्चात्य देशात जोराची चळवळ चालू आहे. पण ही चळवळ करणा-यांत सर्वच निर्मांसाहारी आहेत असे नाही. ह्या मंडळीमध्ये जरी केवळ क्रूरता आणि क्लेशनिवारण करण्यापुरतीच अहिंसा असते, तशीच बौद्धधर्मातही आहे. तिच्यात हिंदूंचा सोवळेपणा किंवा जैनांचा वेडगळपणा ही दोन्ही नाहीत.

सहृदयतेचा दुसरा प्रकार जी सदभिरूची ह्याविषयी ‘चीन देशातील बुद्धधर्म’ ह्या ग्रंथाचे कर्ते रेव्ह. बील (हे चीन देशात पुष्कळ दिवस राहिलेले ख्रिस्ती मिशनरी आहेत, त्यांची बुद्धधर्माविषयी पक्षपातबुद्धी असण्याची मुळीच भीती नाही.) हे म्हणतात की, चीन देशात बौद्धधर्मी लोकांनी सुंदर देवळे बांधून चित्रकला आणि शिल्पकला ह्यांची मोठी अभिवृद्धी केली. तसेच सुंदर बागांतून चित्रविचित्र नवीन फुलांची लागवड करून व त्यांची आपल्या उपासना मंदिरातून नित्य नैमित्तिकप्रसंगी थाटाची मांडणी करून लोकांच्यासदभिरूचीची पुष्कळ वाढ केली.

ह्यावरून बुद्ध भिक्षू म्हणजे अलीकडच्या बैराग्यासारखे सर्व संसारावर रूसलेले सदा असंतुष्ट व तुसड्या स्वभावाचे परावलंबी व परान्नपुष्ट होऊन गावाबाहेरच्या घाणेरड्या धर्मशाळांतून लोळत पडलेले असे नव्हते हे सिद्ध होते. आज सर्व हिंदुस्थानभर निर्जन गिरिकंदरांतून लहान मोठ्या गुंफा आणि लेणी आढळतात. ती एके काळी उद्योगी, शांत आणि सहृदय भिक्षूंनी गजबजलेली, आल्हादकारक वस्तीची ठिकाणे होती. ती लोकवस्तीच्या अशुद्ध वातावरणापासून जरी अलिप्त असली, तरी खालील मैदानात रहाणा-या जनसमूहाच्या शिक्षणार्थ व कल्याणार्थ ह्या भिक्षूंच्या अविश्रांत प्रयत्नांचे जे प्रवाह वहात असत, त्यांची ही ठिकाणे केवळ उगमस्थानेच असत.

बौद्धधर्माचे प्राचरक विरक्त आणि सहृदय असत, इतकेच नव्हे, तर त्यांचे प्रयत्न प्रवृत्तिपर असत. ह्या प्रचारकांचा शिरोमणी जो अशोक राजा त्याने तर अगदी भिक्षूप्रमाणेच निरंतर जनसेवेत आपले सर्व आयुष्य वेचले आणि आपल्या स्वत:च्या मुलांमुलींनाही भिक्षू केले. त्याने धर्ममहामात्रा नावाचा एक नवीनच अधिकारी नेमून त्याच्याकडून आपल्या विशाल साम्राज्याच्या शिवेवर राहणा-या जंगली लोकांचीही सुस्थिती आणि अभिवृद्धी व्हावी अशी तरतूद केली होती. त्याने आपल्याच नव्हे, तर आपल्या मांडलिकांच्या व आपल्या शेजारच्या राज्यातही मनुष्याकरिता व पशूंकरिता दवाखाने स्थापिले व अरण्यातून उपयुक्त औषधी वनस्पतींची व फळझाडांची लागवड सुरू केली. जागजागी तळी, विहिरी इत्यादी खणून व वाटेने सावलीसाठी झाडे लावून माणसांना व गुरांना सारखेच सुखविले.

विस्तार

ह्या वरील तीन लक्षणांनी युक्त हा धर्म होता म्हणून जुन्या काळात जेव्हा प्रवासाची साधने आतासारखी नव्हती, तरीही त्याचा इतका प्रसार झाला. अशोकाच्या वेळीच हा धर्म सर्व हिंदुस्थानभर पसरला, इतकेच नव्हे, तर बाहेर बॅक्ट्रिया व पार्थिया व आशियाच्या पश्चिम किना-यापर्यंत ह्याचे प्रचारक गेले. पूर्वेस सयाम, ब्रह्मदेश, ह्या देशांत दक्षिणेस सिलोनातही ह्याची स्थापना झाली. चीन व जपानकडे ह्याची माहिती झाली ती प्रथम आशियातील पश्चिम राष्ट्रात ह्या धर्माचा जो ख्रिस्ती शकाच्या आरंभी प्रसार झाला होता, त्यावरून झाली. त्यावरून चीन देशाच्या मिंगही (इ. स. ५८-७६) राजाने प्रथम हिंदुस्थानात १८ चिनी विद्यार्थ्यांना बुद्धधर्माची माहिती करून घेण्यासाठी पाठविले. ते हिमालयाला वळसा घालून वायव्येकडून ह्या देशात आले व येथील बरेच धर्मग्रंथ व दोघे भिक्षू त्यांनी आपल्या बरोबर चिनात गेले. त्या लोकांकडून बौद्धधर्माचा चीन देशात झपाट्याने प्रसार झाला व लवकरच जपान, कोरिया, मंगोलिया, सौबिरिया व तिबेट वगैरे बहुतेक आशियाचे भाग ह्याने व्यापून टाकले.

पुढे हिंदुस्थानात ह्या धर्माला उतरती कळा लागून तो शेवटी बहुतेक नामशेष झाला, त्याची जी कारणे आहेत, त्यांपैकी त्या धर्माची वर सांगितलेली सहिष्णुता व सौम्यता हेही एक कारण आहे. मुसलमानांच्या स्वा-या व हिंदूंचा छळ ही कारणे आहेतच. प्रसिद्ध चिनी प्रवासी हिंदुस्थानात आला त्यावेळी देखील ज्या ज्या प्रांती ह्या धर्माला तेथील प्रबळ राजाचा आश्रय होता, तेथे बौद्ध धर्माइतकाच हिंदुधर्माचा जोर चालू होता, हे बुद्धधर्माच्या अपूर्व सौम्यपणाचेच फळ म्हणावयाचे. कान्यकुब्ज देशाचा प्रसिद्ध शिलादित्य राजा ज्याने इ. स. ६३४ साली एक मोठी धर्मपरिषद भरविली, तो बुद्धधर्माचा अनुयायी व मोठाच पुरस्कर्ता होता, तरी त्याच्या राजधानीत जसे १०० बौद्ध विहार होते, तशीच १०० ब्राह्मणधर्माची देवळेही होती. पुढे लवकरच कुमारिल भट्ट व शंकराचार्य ह्यांच्या चिथावणीने, बौद्धांचा राजाश्रय नाहीसा होऊन घोर जुलूम व छळ सुरू झाला. व शेवटी ह्या सात्विक व सौम्य धर्माने आपल्या मायदेशाला कायमचा रामराम ठोकला.

जीर्णोद्धार

आधुनिक निरपेक्ष ओघामुळे व विचारपद्धतीमुळे ह्या धर्माची खरी तत्त्वे व मोठी कामगिरी लोकांपुढे येऊन पाश्चात्य देशांत व आमचेकडेही ह्याविषयी बरीच सहानुभूती वाढू लागली आहे. ज्यांच्या पूर्वजांनी एकाद्या नवीन धर्मस्थापकावर धोंडे मारून त्याचा प्राण घ्यावा, त्यांनीच पुढे त्याचे भले मोठे सुंदर थडगे बांधण्यास पुढे यावे हा प्रकार सर्वत्रच आहे. परवा पेशावर येथे ज्या बुद्धाच्या अस्थी सापडल्या त्या ब्रह्मदेशात न पाठविता ह्याच देशात ठेवण्याविषयी व्हाइसरायसाहेबांना विनंती करण्याकरिता एक डेप्युटेशन गेले होते, तोही वरच्याचाच प्रकार. पण ह्यापेक्षा बौद्धधर्माच्या जीर्णोद्धाराची अधिक महत्त्वाची चिन्हे अलीकडे दिसू लागली आहेत. मद्रास येथील सरकारी कॉलेजातील प्रॉफेसर नरसू ह्यांनी बौद्धधर्मावर एक पुस्तक करून तेथे एक संघ स्थापन केला आहे आणि तो केवळ सुशिक्षित लोकांचाच नव्हे, तर तेथील बरीच पारिया वगैरे अस्पृश्य जातीची मंडळी ह्या समाजात आहेत. अद्यापि ह्या उद्धाराचे काम वरील सुशिक्षित व समजुतदार वर्गातच व तेही वाड्मयाच्याद्वारे बरेच व्हावयाला पाहिजे आहे. हल्ली प्रसिद्ध पाली पंडित व बुद्धधर्माचे तेजस्वी प्रचारक प्रो. धर्मानंद कोसंबी ह्यांच्या विद्वत्तेमुळे व परिश्रमामुले कलकत्ताव मुंबई ह्या दोन युनिव्हर्सिटींत तरी पाली भाषेचा शिरकाव झाला आह. ह्या बाबतीत बहुजनसमाजास सहज समजेल अशा सुलभ वाडंमयाचा जारीने प्रसार व्हावयाला पाहिजे. अशावेळी धर्मानंद हे तूर्त काही वर्षे अमेरिकेत रहाणार असल्यामुळे, त्यांच्या येथील कामात व्यत्यय आला आहे, तरी अमेरिकेतील हॉवर्ड युनिव्हर्सिटीत पाली भाषेतील महत्त्वाच्या व कठीण ग्रंथाचे भाषांतर करण्याच्या कामीच त्यांचा उपयोग होणार असल्यामुळे जीर्णोद्धाराचे काम चालू राहीलच. एकंदरीत आता जो बौद्धधर्माचा जीर्णोद्धार व्हावा अशी आमची इच्छा आहे, तो हल्ली इतरत्र प्रचलित असलेल्या त्या धर्माच्या विधिवैकल्यांचा, टिळाटोपीचा किंवा निर्जीव आचाराचा नव्हे, तर ज्या उदार तत्त्वाच्या योगे मागील काळी मनुष्यजातीची उन्नती झाली, त्यांचा आमच्यामध्ये पुन: उद्धार होऊन आमच्या धर्मसमजुतीस सर्वदेशीयता व आचरणाला अधिक उज्ज्वलता येवो इतकीच इच्छा आहे.

धर्म, जीवन व तत्त्वज्ञान

  संपादकीय
  पुरस्कार
विभाग पहिला : प्रवासवर्णन
 - जलप्रवास
 - मार्सेय शहर
 - पॅरीस शहर
 - नॉटर डेम द ला गार्ड देऊळ व ते
     पाहून सुचलेले विचार
 - लंडन शहर
 - ब्रिटिश म्युझिअम
 - लंडन येथील बालहत्यानिवारक गृह
 - सोमयागाचे वर्णन वाचून वाटलेला
    विस्मय व विषाद
 - डेव्हनपोर्ट येथील गुड फ्रायडे
 - बोअर युद्धाचा शेवट व ऑक्सफर्ड
    येथील उल्हास
 - राष्ट्रीय निराशा
 - बर्टन खेड्यातील शाळा कशी दिसली?
 - विभूतीपूजा
 - मॅंचेस्टर कॉलेज
 - पृथ्वीच्या पोटात ४४० यार्डाखाली
 - जनातून वनात आणि परत
 - बंगलूरच्या रस्त्यातील एक फेरी
 - मंगळूर येथील काही विशेष गोष्टी
 - बंगालची सफर
 - शांतिनिकेतन
 - सह्याद्रीवरुन-१
 - सह्याद्रीवरुन-२
 विभाग दुसरा : धर्मपर लेख
 - युनिटेरियन समाज
 - इंग्लंडातील आधुनिक धर्मविषयक
   चळवळ आणि लिव्हरपूल
 - सुशिक्षित धर्मभगिनींस अनावृत पत्र
 - ब्राह्मसमाज व आर्यसमाज (ह्यातील
    हल्लीचे साम्य,भेद व पुढे ऐक्यार्थ यत्न)
 - धर्मजागृती
 - निवृत्ती व प्रवृत्ती आणि अवतारवाद व विकासवाद
 - ईश्वर आणि विश्वास
 - बौद्धधर्म जीर्णोद्धार
 - ब्राह्मधर्म व ब्राह्मसमाज
 - आत्म्याची यात्रा
 - आत्म्याची वसती
 -  हिंदुस्थानातील उदार धर्म
 - कौटुंबिक उपासनेच्यावेळी केलेला
    उपदेश देवाचा व आपला संबंध
 - आवड आणि प्रीती
 - स्तुती, निर्भत्सना व निंदा
 - विनोदाचे महत्त्व
 - प्रेमप्रकाश
 - संग व विषय
 - मरण म्हणजे काय?
 - धर्मप्रसारार्थ स्वानुभवाची आवश्यकता
 - ब्राह्म आणि प्रार्थनासमाजास एक विनंती
 - दास्यभक्तीची ध्वजा
 - प्रेमसंदेश
प्रो. ऑयकेन ह्यांची जीवनमीमांसा
 - धर्म-१
 - धर्म-२
 - नीती-१
 - नीती-२
 - नीती-३
 - शास्त्र आणि तत्वज्ञान-१
 - शास्त्र आणि तत्वज्ञान-२
 - सार्वजनिक नित्य व नैमित्तिक
    उपासनेच्यावेळी केलेले उपदेश
 - संतांचा धर्म आणि राष्ट्राचा उत्कर्ष
 - धर्म, समाज आणि परिषद
 - धर्मसंघाची आवश्यकता
 - विनययोग
 - शासनयोग
 - पितृशासन
 - गुरुशासन
 - राजशासन
 - धर्म आणि व्यवहार
 - प्रेरणा आणि प्रयत्न
 - मानवी आदर आणि दैवी श्रद्धा-१
 - मानवी स्नेह आणि ईश्वरभक्ती -२
 - मनुष्यसेवा आणि ईश्वरोपासना -३
 - मनाची प्रसन्नता आणि मोक्षप्राप्ती-४
 - परमार्थाची प्रापंचिक साधने-५
 - आधुनिक युग आणि ब्राह्मसमाज
 - धर्मसाधन
 - नैराश्यवाद
 - आनंदवाद
 - संसारसुखाची साधने
 - वृत्ती, विश्वास आणि मते
 - व्यक्तित्वविकास
 - स्त्री-दैवत
 - दान आणि ऋण
 - राज्यरोहण
 - नाममंत्राचे सामर्थ्य
 - मनुष्यजन्माची सार्थकता
 - आपुलिया बळे घालावी हे कास
 - कालियामर्दन
विभाग तिसरा : इतर लेख
 - आपला व खालील प्राण्यांचा संबंध
 -  स्वराज्य आणि स्वाराज्य
 - देशभक्ती आणि देवभक्ती
 - समाजसेवेची मूलतत्वे
 - निराश्रित साहाय्यकारी मंडळी व आक्षेपनिरसन
 - रा.गो.भांडारकर ह्यांचे धर्मपर लेख व व्याख्याने
 - प्रार्थनासमाज अप्रिय असल्यास तो का?
 - राजा राममोहन रॉय
 - मुरळी अथवा पश्चिम हिंदुस्थानातील हिंदू
    देवळांतील अनितिमूलक आणि बीभत्स प्रकार
 - श्रीशाहू छत्रपतींच्या मनाचा विकास
 - रावसाहेब थोरात ह्यांच्या "बोधमृत" ला प्रस्तावना
 - जमखिंडी येथील परशुरामभाऊ हायस्कूलचा
    सुवर्णमहोत्सव
 - थोरल्या शाहू महाराजांच्या कारकीर्दीचे मराठ्यांच्या
    इतिहासातील महत्त्व
 - डॉ. भांडारकरांस मानपत्र
 - मराठी भाषेद्वारा ब्राह्मधर्माचा प्रचार
 - राजा राममोहन व बुवाबाजी
 - प्रार्थनासमाजाचा एक नमुना
 - क्षात्रधर्म
 - स्वराज्य विरुद्ध जातिभेद
 - इतिहास, संशोधन व भाषाशास्त्र
 - गुन्हेगार जातीची सुधारणा
 - निराश्रित साह्यकारी मंडळी
 - वाई प्रार्थना संघ मंदिर प्रवेश
 - ब्रह्मानंद केशवचंद्र सेन
 - साधारण ब्राह्मसमाजाची पन्नास वर्षे
 - निराश्रित साहाय्य
 - मुंबई येथील मानपत्रास उत्तर
 - सत्यशोधकांना इशारा अथवा नव्या पिढीचे राजकारण
 - बंदिस्त बळीराजा
 - सही नाही; सहानुभूती!
 - टिळकांच्या मानपत्रास विरोध
 - A Scientific Catechism
 - Gleanings from Periodicals
 - The Arya Samaj of India
 - Liberal Religion in Japan
 - The New Light of Persia
 - Liberal Christianity in Europe
 - Unitarianism in England and America 
विभाग चौथा : परिशिष्टे
 - महर्षी शिंदे ह्यांचे पहिले कीर्तन
 - रामजी बसाप्पा शिंदे ह्यांचा मृत्यू
 - लाहोर येथील धर्मपरिषद

 - कोल्हापूर येथील धर्मविषयक चळवळ व

    प्रगतीपत्रातील अहवाल

 - विसावे व्याख्यान
 - आख्यान
 - महाराष्ट्र सुधारक आगळा
 - भगिनी जनाबाई ह्यांची स्मृतिचित्रे
 - परलोकवासी विठ्ठल रामजी शिंदे
 -  The Late Mr. V. R. Shinde
 - कै. अण्णासाहेब शिंदे, चरित्र व कार्य
 - प.वा. अण्णासाहेब शिंदे
 - व-हाड मध्यप्रांतीय सत्यशोधक हीरक महोत्सव
 - १९ मार्च १९३३-७१ वा वाढदिवस
 - श्री. महाराजांचे अस्पृश्योद्धारक कार्य-श्रीमंत
   सयाजीराव गायकवाड
 - दांभिक देशभक्तापेक्षा
 - धर्मरहस्य अथवा अंत्यजोद्धार
 - लाहोर येथील धर्म परिषद
 - आपुले स्वहित करावे पै आधी
 - सुखवाद व सुखाची साधने
 - लुटूपुटूची पार्लमेंट
 - बहाई समाजाचा ब्राह्मसमाजास संदेश
 - प्रेमाचा विकास
 - भोकरवाडी येथील आपत्ती
 - सुधारकांची जुनी परंपरा (स्फुट)
 - सुधारकच हिंदूधर्माचे खरे रक्षक
 - निष्ठा व नास्तिक्य
 - विठ्ठल रामजी शिंदे व श्री शाहू छत्रपती
 - विठ्ठल रामजी शिंदे व सयाजीराव गायकवाड
 - विठ्ठल रामजी शिंदे व महात्मा गांधी
 - वि.रा. शिंदे व राजाराम छत्रपती
 - विजापूर येथी धर्मकार्य, विजापूर
 - सोमवंशीय सन्मार्गदर्शक समाज
 - रोगनिवारक प्रयत्न-एक निकडीची विनंती
 - कवित्व आणि भरारी
 - मोफत व सक्तीचे शिक्षण नको !!
 - बहुजन पक्ष
 - डी.सी.मिशनचा १७ वा वाढदिवस
 - अहंकार नासाभेद
 - यश परिणामात नसून प्रयत्नात आहे.
 -  Maharashtra Provincial Social Conference
 - प्रांतिक सामाजिक परिषद-सातारा
 - शिवाजी की रामदास?
 - बडोदे-तत्वज्ञान व समाजशास्त्र विभागाचे अध्यक्ष
 - श्री. विठ्ठल रामजी शिंदे व सुबोध पत्रिका
 - कै. डॉ. संतूजी रामजी लाड
 - मागासलेले व अस्पृश्य
 -  Shree V. R. Shinde’s Work
 - पुण्यातील मानपत्रास उत्तर
-   Liberal Religion in India
- वाई ब्राह्मोसमाज-विश्वास लेख
 - गुरुवर्य शिंदे सूक्ती