धर्म, जीवन व तत्त्वज्ञान

मनुष्यसेवा आणि ईश्वरोपासना-३

देवाची पूजा हे भूताचे पाळण| मत्सर तो शीण बहुतांचा||१|
                                           -तुकाराम

ईश्वरावर श्रद्धा बसण्यास आपण भूतमात्राचे ठिकाणी आदरबुद्धी ठेविली पाहिजे व त्यावरील भक्ती दृढ करण्यास मनुष्याशी स्नेहभाव अखंड वाढविला पाहिजे, ह्या दोन गोष्टींविषयी मागे विचार केला आहे. ईश्वराबद्दल आपल्या मनात श्रद्धा उत्पन्न होऊन त्याची भक्ती बाणल्यानंतरची तिसरी गोष्ट म्हटली म्हणजे त्याची पूजा, उपासना, आराधना करणे ही होय. म्हणजे सदैव त्याच्या इच्छेला आपली इच्छा अनुसरून राखणे हे होय. श्रद्धेचे पर्यवसान भक्तीत आणि भक्तीचे सेवेत झाले तरच ती स्थिती खरी म्हणता येईल. आता ही पूजा करण्यास गंध, पुष्प, धूप, दीप इत्यादी पूजेच्या उपकरणांची, किंवा भव्य मंदिर, सुस्वर गायन, नामांकित वक्तृत्ववान उपासक ह्या बाह्य साधनांची, किंबहुना गहन विचार, गूढ ज्ञान, सूक्ष्म कल्पना आणि साक्षात्कार इत्यादी अंत:साधनांचीही आवश्यकता आहे असे मुळीच नाही. प्रपंचात राहून आपले नित्याचे व्यवहार करीत करीतच ईश्वरोपासना साधणे हे अगदी शक्य आहे. ‘देवाची पूजा हे भूताचे पाळणे’ असे तुकारामबुवा म्हणतात “ईश्वरावर प्रीती, पूज्यबुद्धी व अनन्यभाव ही ठेवून त्याप्रमाणे त्याचे मनाने भजन-पूजन करणे व त्यास प्रिय अशी कृत्ये करणे हीच त्याची खरी उपासना होय.” असे प्रार्थनासमाज सांगत आहे. म्हणून आपण आज परमार्थाचे तिसरे प्रापंचिक साधन (मनुष्यसेवेच्याद्वारे ईश्वरोपासना) कसे घडते ह्याचा विचार करू.

ईश्वरविषयक पद्ये गाऊन, ब्रह्मांडी आत्मा नेऊन मुक्तदशेप्रत जाऊन, सर्वसंगपरित्याग करून, मन निश्चल करून, ईश्वराची पूजा होईल. ईश्वरपूजेचा हा मार्ग आम्हांला नापसंत आहे किंवा कमी महत्त्वाचा वाटतो असे मुळीच नाही. पण मनुष्याची सेवा केल्यानेही (निष्कामपणे लोककल्याणासाठी झटल्याने) ईश्वरोपासना उत्तम रीतीने घडते हेच आज सांगावयाचे आहे.

श्रवणं कीर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनम्|
अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम्||

वगैरे नवविधा भक्तीचे सर्व प्रकार ह्या सेवाधर्मानेही घडतात. पण मनुष्याची सेवा करीत असताना त्याचा पायपोस डोक्यावर घ्यावा लागल्यामुळे अंगामध्ये जशी आणि जितकी कसलेली विनम्रता बाणते, तशी आणि तितकी मंदिरामध्ये कितीही प्रेमळ प्रार्थना ऐकल्याने बाणणार नाही. आपल्या धनदौलतीचे व इतर बडेजावीचे विस्मरण झाल्याशिवाय, मनातील ताठा व अहंभाव पूर्ण नाहीसा झाल्याशिवाय ह्या सेवासदनामध्ये मुळी शिरकावच होणे कठीण पडते मग एकदा शिरकाव होऊन सेवा करीत राहिल्यावर मन नम्र झाल्याशिवाय राहील असे होणार नाही. नम्रतेशिवाय आणखी दुसरे सेवाधर्माने मिळणारे फळ म्हणजे मनाची अखंड शांती हे होय. केवळ ज्ञानाने, अनुभवाने, तर्काने किंवा श्रवणाने मिळणारी शांती केव्हा ना केव्हा भंग पावणारी असते, पण सेवाधर्माने प्राप्त झालेली शांती अखंड आणि अभंग अशी असते. कारण, शांतीचा भंग करणा-या सर्व काही कारणांना न जुमानण्याची सवय ह्या सेवाधर्मातच लागण्याचा संभव आहे. सेवाधर्मानेच लागण्याचा संभव आहे. सेवाधर्मानेच मनाला एकाग्रता येते. ध्यान करीत असताना अंत:करण शुद्ध होते खरे, पण केवळ ध्यानाने त्यास तशी सवय लागत नाही. आत्मपरीक्षणाच्या तीव्र कसोटीस उतरण्याला सेवाधर्म हाच एक मार्ग आहे. आपण बरे करीत असताना लोक मत्सराने किंवा अज्ञानाने वाईट का म्हणतात! किंवा आपण धडधडीत वाईट करीत असताना लोक बळेच मतलबान किंवा भोळेपणाने आपले विनाकारण देव्हारे का माजवितात! ह्या दोन्ही परस्पर भिन्न अनुभवांचा विचार करून, अशा ह्या व्यर्थ निंदास्तुतीपासून आपल्याला दूर कसे ठेवावे हे सेवेशिवाय साधणार नाही. ह्यावरून सेवेमध्ये भक्तीचे नऊच नव्हे तर अनेकविध सारेच प्रकार आणि त्यांची फळेही लाभतात हे दिसून येईल.

स्वत:च्या आप्तांच्या, जातीच्या, किंवा देशाच्या उत्कर्षाकरिता झटणे हाही सेवाधर्मच होय. पण त्यामधील स्वत:चा मध्यबिंदू पुसून टाकून केवळ नि:स्वार्थपणाने जर आम्ही सेवा करू तर ती अधिक श्रेष्ठ होईल. ह्या सेवेची किंमत आणि तिचे महत्त्व तिच्या प्रमाणावर नसून तिच्या प्रकारावर आहे. म्हणजे पुष्कळ लोकांचे आपण कल्याण करीत असू, पण ते “आपले” लोक आहेत अशा भावनेने जर करीत असू तर त्याची किंमत एकाच मनुष्यावर पण नि:स्वार्थपणाने केलेल्या उपकारापेक्षा कमी मानता येईल. स्वार्थाने आणि अहंभावाने एकाद्या संग्रामात मिळविलेल्या द्ग्विजयाची किंमतही एका अनाथ विधवेस दु:खातून मुक्त करणे, निराश्रित वृद्धाची आजारात शुश्रुषा करणे, अनीतीच्या आडवाटेने अडखळणा-यास सरळ वाट दाखविणे, किंबहुना तान्हेलेल्यास पेलाभर पाणी देणे ह्या साध्या दिसणा-या गोष्टीहूनही कमी आहे.

ईश्वराची आराधना करणे म्हणजे तो मनुष्यासारखा स्तुतिप्रिय आहे, किंवा मनुष्याप्रमाणेच काही तरी इकडचे तिकडे त्याला खूष ठेवण्याची जरूरी आहे, अशातला मुळीच प्रकार नाही, किंवा वरील जे उपकाराचे प्रकार सांगितले ते वेळप्रसंग पडल्यास त्यांची फेड इतरांकडून आपणास व्हावी अशा बुद्धीने करावेत असेही नाही तर दुस-याची दु:खे आणि गरजा पाहून आपल्यामध्ये अनुकंपेची जी प्रेरणा होते, ती ईश्वरानेच केलेली एक सूचना असे समजून ती मानली पाहिजे, एरवी ईश्वराच्या स्तुतीचे उगीच अवडंबर माजवून त्याची आज्ञा न पाळल्यास त्याची उपासना केली असे कधीच होणार नाही. अशी फाजील स्तुती व तोंडपुजेपणा साधारण मनुष्यालाही आवडत नाही, मग सर्वज्ञ परमेश्वरास तो कसा गोड लागेल?

ह्या वरील विवेचनावरून प्रपंच आणि परमार्थ ह्यांमध्ये एकवाक्यता कशी आहे हे दिसून येईल. स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ ही निरनिराळ्या स्थळी आहेत ही जशी अडाणी समजूत आहे, तशीच प्रपंच आणि परमार्थ हे दोन भिन्न मार्ग आहेत, ही अडाणी समजूत आहे. हे दोन भिन्न नसून एकच आहेत.

धर्म, जीवन व तत्त्वज्ञान

  संपादकीय
  पुरस्कार
विभाग पहिला : प्रवासवर्णन
 - जलप्रवास
 - मार्सेय शहर
 - पॅरीस शहर
 - नॉटर डेम द ला गार्ड देऊळ व ते
     पाहून सुचलेले विचार
 - लंडन शहर
 - ब्रिटिश म्युझिअम
 - लंडन येथील बालहत्यानिवारक गृह
 - सोमयागाचे वर्णन वाचून वाटलेला
    विस्मय व विषाद
 - डेव्हनपोर्ट येथील गुड फ्रायडे
 - बोअर युद्धाचा शेवट व ऑक्सफर्ड
    येथील उल्हास
 - राष्ट्रीय निराशा
 - बर्टन खेड्यातील शाळा कशी दिसली?
 - विभूतीपूजा
 - मॅंचेस्टर कॉलेज
 - पृथ्वीच्या पोटात ४४० यार्डाखाली
 - जनातून वनात आणि परत
 - बंगलूरच्या रस्त्यातील एक फेरी
 - मंगळूर येथील काही विशेष गोष्टी
 - बंगालची सफर
 - शांतिनिकेतन
 - सह्याद्रीवरुन-१
 - सह्याद्रीवरुन-२
 विभाग दुसरा : धर्मपर लेख
 - युनिटेरियन समाज
 - इंग्लंडातील आधुनिक धर्मविषयक
   चळवळ आणि लिव्हरपूल
 - सुशिक्षित धर्मभगिनींस अनावृत पत्र
 - ब्राह्मसमाज व आर्यसमाज (ह्यातील
    हल्लीचे साम्य,भेद व पुढे ऐक्यार्थ यत्न)
 - धर्मजागृती
 - निवृत्ती व प्रवृत्ती आणि अवतारवाद व विकासवाद
 - ईश्वर आणि विश्वास
 - बौद्धधर्म जीर्णोद्धार
 - ब्राह्मधर्म व ब्राह्मसमाज
 - आत्म्याची यात्रा
 - आत्म्याची वसती
 -  हिंदुस्थानातील उदार धर्म
 - कौटुंबिक उपासनेच्यावेळी केलेला
    उपदेश देवाचा व आपला संबंध
 - आवड आणि प्रीती
 - स्तुती, निर्भत्सना व निंदा
 - विनोदाचे महत्त्व
 - प्रेमप्रकाश
 - संग व विषय
 - मरण म्हणजे काय?
 - धर्मप्रसारार्थ स्वानुभवाची आवश्यकता
 - ब्राह्म आणि प्रार्थनासमाजास एक विनंती
 - दास्यभक्तीची ध्वजा
 - प्रेमसंदेश
प्रो. ऑयकेन ह्यांची जीवनमीमांसा
 - धर्म-१
 - धर्म-२
 - नीती-१
 - नीती-२
 - नीती-३
 - शास्त्र आणि तत्वज्ञान-१
 - शास्त्र आणि तत्वज्ञान-२
 - सार्वजनिक नित्य व नैमित्तिक
    उपासनेच्यावेळी केलेले उपदेश
 - संतांचा धर्म आणि राष्ट्राचा उत्कर्ष
 - धर्म, समाज आणि परिषद
 - धर्मसंघाची आवश्यकता
 - विनययोग
 - शासनयोग
 - पितृशासन
 - गुरुशासन
 - राजशासन
 - धर्म आणि व्यवहार
 - प्रेरणा आणि प्रयत्न
 - मानवी आदर आणि दैवी श्रद्धा-१
 - मानवी स्नेह आणि ईश्वरभक्ती -२
 - मनुष्यसेवा आणि ईश्वरोपासना -३
 - मनाची प्रसन्नता आणि मोक्षप्राप्ती-४
 - परमार्थाची प्रापंचिक साधने-५
 - आधुनिक युग आणि ब्राह्मसमाज
 - धर्मसाधन
 - नैराश्यवाद
 - आनंदवाद
 - संसारसुखाची साधने
 - वृत्ती, विश्वास आणि मते
 - व्यक्तित्वविकास
 - स्त्री-दैवत
 - दान आणि ऋण
 - राज्यरोहण
 - नाममंत्राचे सामर्थ्य
 - मनुष्यजन्माची सार्थकता
 - आपुलिया बळे घालावी हे कास
 - कालियामर्दन
विभाग तिसरा : इतर लेख
 - आपला व खालील प्राण्यांचा संबंध
 -  स्वराज्य आणि स्वाराज्य
 - देशभक्ती आणि देवभक्ती
 - समाजसेवेची मूलतत्वे
 - निराश्रित साहाय्यकारी मंडळी व आक्षेपनिरसन
 - रा.गो.भांडारकर ह्यांचे धर्मपर लेख व व्याख्याने
 - प्रार्थनासमाज अप्रिय असल्यास तो का?
 - राजा राममोहन रॉय
 - मुरळी अथवा पश्चिम हिंदुस्थानातील हिंदू
    देवळांतील अनितिमूलक आणि बीभत्स प्रकार
 - श्रीशाहू छत्रपतींच्या मनाचा विकास
 - रावसाहेब थोरात ह्यांच्या "बोधमृत" ला प्रस्तावना
 - जमखिंडी येथील परशुरामभाऊ हायस्कूलचा
    सुवर्णमहोत्सव
 - थोरल्या शाहू महाराजांच्या कारकीर्दीचे मराठ्यांच्या
    इतिहासातील महत्त्व
 - डॉ. भांडारकरांस मानपत्र
 - मराठी भाषेद्वारा ब्राह्मधर्माचा प्रचार
 - राजा राममोहन व बुवाबाजी
 - प्रार्थनासमाजाचा एक नमुना
 - क्षात्रधर्म
 - स्वराज्य विरुद्ध जातिभेद
 - इतिहास, संशोधन व भाषाशास्त्र
 - गुन्हेगार जातीची सुधारणा
 - निराश्रित साह्यकारी मंडळी
 - वाई प्रार्थना संघ मंदिर प्रवेश
 - ब्रह्मानंद केशवचंद्र सेन
 - साधारण ब्राह्मसमाजाची पन्नास वर्षे
 - निराश्रित साहाय्य
 - मुंबई येथील मानपत्रास उत्तर
 - सत्यशोधकांना इशारा अथवा नव्या पिढीचे राजकारण
 - बंदिस्त बळीराजा
 - सही नाही; सहानुभूती!
 - टिळकांच्या मानपत्रास विरोध
 - A Scientific Catechism
 - Gleanings from Periodicals
 - The Arya Samaj of India
 - Liberal Religion in Japan
 - The New Light of Persia
 - Liberal Christianity in Europe
 - Unitarianism in England and America 
विभाग चौथा : परिशिष्टे
 - महर्षी शिंदे ह्यांचे पहिले कीर्तन
 - रामजी बसाप्पा शिंदे ह्यांचा मृत्यू
 - लाहोर येथील धर्मपरिषद

 - कोल्हापूर येथील धर्मविषयक चळवळ व

    प्रगतीपत्रातील अहवाल

 - विसावे व्याख्यान
 - आख्यान
 - महाराष्ट्र सुधारक आगळा
 - भगिनी जनाबाई ह्यांची स्मृतिचित्रे
 - परलोकवासी विठ्ठल रामजी शिंदे
 -  The Late Mr. V. R. Shinde
 - कै. अण्णासाहेब शिंदे, चरित्र व कार्य
 - प.वा. अण्णासाहेब शिंदे
 - व-हाड मध्यप्रांतीय सत्यशोधक हीरक महोत्सव
 - १९ मार्च १९३३-७१ वा वाढदिवस
 - श्री. महाराजांचे अस्पृश्योद्धारक कार्य-श्रीमंत
   सयाजीराव गायकवाड
 - दांभिक देशभक्तापेक्षा
 - धर्मरहस्य अथवा अंत्यजोद्धार
 - लाहोर येथील धर्म परिषद
 - आपुले स्वहित करावे पै आधी
 - सुखवाद व सुखाची साधने
 - लुटूपुटूची पार्लमेंट
 - बहाई समाजाचा ब्राह्मसमाजास संदेश
 - प्रेमाचा विकास
 - भोकरवाडी येथील आपत्ती
 - सुधारकांची जुनी परंपरा (स्फुट)
 - सुधारकच हिंदूधर्माचे खरे रक्षक
 - निष्ठा व नास्तिक्य
 - विठ्ठल रामजी शिंदे व श्री शाहू छत्रपती
 - विठ्ठल रामजी शिंदे व सयाजीराव गायकवाड
 - विठ्ठल रामजी शिंदे व महात्मा गांधी
 - वि.रा. शिंदे व राजाराम छत्रपती
 - विजापूर येथी धर्मकार्य, विजापूर
 - सोमवंशीय सन्मार्गदर्शक समाज
 - रोगनिवारक प्रयत्न-एक निकडीची विनंती
 - कवित्व आणि भरारी
 - मोफत व सक्तीचे शिक्षण नको !!
 - बहुजन पक्ष
 - डी.सी.मिशनचा १७ वा वाढदिवस
 - अहंकार नासाभेद
 - यश परिणामात नसून प्रयत्नात आहे.
 -  Maharashtra Provincial Social Conference
 - प्रांतिक सामाजिक परिषद-सातारा
 - शिवाजी की रामदास?
 - बडोदे-तत्वज्ञान व समाजशास्त्र विभागाचे अध्यक्ष
 - श्री. विठ्ठल रामजी शिंदे व सुबोध पत्रिका
 - कै. डॉ. संतूजी रामजी लाड
 - मागासलेले व अस्पृश्य
 -  Shree V. R. Shinde’s Work
 - पुण्यातील मानपत्रास उत्तर
-   Liberal Religion in India
- वाई ब्राह्मोसमाज-विश्वास लेख
 - गुरुवर्य शिंदे सूक्ती