धर्म, जीवन व तत्त्वज्ञान

व्यक्तित्वविकास

जगातील कोणत्याही प्रमुख धर्मामध्ये आत्मा, जग आणि ईश्वर ह्या तीन तत्त्वांविषयी विचार केलेला आढळतो. पैकी आत्मा हे तत्त्व इतरांपेक्षा अधिक महत्त्वाचे असते. परंतु त्याविषयीचा विचार फार सामान्य आणि तात्त्विक पद्धतीने झालेला असल्यामुळे, व्यक्तीच्या जीवनावर आणि लोकव्यवहारावर अशा मोघम विचारांचा व्हावा तसा परिणाम झालेला आढळून येत नाही. “नैनं छिदंति शस्त्राणि नैनं वहति पावकः ।” .. .. “य एनं वेत्ति हंतारं । यो वा मन्यते हतं” अशा प्रकारची आत्मविषयक वर्णने गीतेत सांगितलेली आहेत. तरी व्हावा तितका व्यावहारिक बोध ह्यावरून होत नाही. आज आत्मा म्हणजे व्यक्तित्व ह्या अर्थाने व केवळ व्यावहारिक दृष्टीनेच ह्या विषयाचा विचार कर्तव्य आहे.

प्रत्येक प्राणी म्हणजे एक व्यक्ती हे जरी एका दृष्टीने खरे आहे, तरी प्रत्येक प्राण्यामध्ये व्यक्तित्व असतेच असे नाही. किंबहुना मनुष्यप्राण्यातील बहुसंख्येमध्ये देखील हे व्यक्तित्व फारच अल्प प्रमाणाने विकसित झालेले असते, असे म्हणण्यास काही हरकत नाही. मी म्हणून कोणी आहे, माझे विचार, माझी सुखदुःखे आणि कृत्ये ह्यांचे, इतर कोणाचीही अपेक्षा न ठेवता, मला अत्यंत थोर महत्त्व आहे, अशी जाणीव राखून तदनुरूप वर्तन ठेवणे, ह्यातच व्यक्तित्व आहे, आणि दुस-याच्या कोणत्याही हितसंबंधास बाधा न आणिता ह्या व्यक्तित्वाचा शक्य तितका विकास करण्याचा मला पूर्ण हक्क आहे असे प्रत्येक व्यक्तीस वाटले पाहिजे. एका थोर ग्रंथकाराने म्हटले आहे की, ह्या जगात मनुष्य जी जी कामगिरी करीत आहे, त्या सर्वांत मोठी म्हणजे तो आपल्या स्वतःला बनवीत आहे हीच होय. (Among the works of man which human life is rightly employed in perfecting and beautifying the first in importance surely is man himself – J.S. Mill.) तथापि अगदी सुधारलेल्या आणि पुढारलेल्या राष्ट्रांतही ह्या व्यक्तित्वाचे महत्त्व ( फूट नोट पान क्र. ३८४ रविवार ता. १०-१२-१९११ रोजी केलेल्या उपदेशाचा सारांश. ) कळावे तितके अद्यापि मुळीच कळलेले नाही. ह्याला एक दोन उदाहरणेच पुरी आहेत. कोणी कोणाची हत्या केली असताना त्यास देहांत शिक्षा द्यावी असे जे मनुष्यांनी ठरविले आहे, त्यावरून मनुष्यजीविताचे महत्त्व मनुष्यास कळलेले आहे, असा क्षणमात्र भास होतो, परंतु देहांताची शिक्षा दिल्यामुळे हत्येच्या गुन्ह्यास पुनः हत्येचीच शिक्षा आहे, ह्यावरून हा भास खोटा आहे असे लागलेच कळून येते. शिक्षेचा उद्देश सूड हा नसून गुन्ह्याचा प्रतिबंध, गुन्हेगाराची सुधारणा, समाजाची सुरक्षितता आणि शक्य असल्यास ज्याचे अहित झाले असते, त्याची भरपाई इतकेच असताना त्यांपैकी एकही ह्या देहांत शिक्षेने साधत नाही. तथापि सुधारलेल्या देशांतून ह्या शिक्षेच्या रानटी पद्धतीविषयी ओरड चालली असूनही ती अजून बंद होत नाही. ह्याहून दुसरा चमत्कार असा आहे की, व्यक्तीस आपल्या जीविताची कशीही विल्हेवाट लावण्याचा पूर्ण हक्क असताही आत्महत्या हा एक बहुतेक सुधारलेल्या समाजामध्ये गुन्हा मानिला जात आहे, जणू काय व्यक्तीचे जीवित ही एक समाजाची मालमत्ता आहे. कोणा एकाने आत्महत्या खरीच केली तर मग शिक्षा देण्याचा प्रश्नच उरत नाही, परंतु त्याचा तो प्रयत्न सिद्धीस न जाता उघडकीस आला म्हणजे सामाजिक गुन्ह्याबद्दल त्याला जी शिक्षा भोगावी लागते, ती म्हणजे समाजाच्या अडाणीपणाचा एक मासलाच आहे. कित्येक अडाणी आईबाप आपले मूल जिन्यावरून खाली पडले किंवा त्यास ठेच लागली म्हणजे त्याला मायेने उचलून त्याची शुश्रूषा न करता किंवा त्यास काही दुखापत झालेली नसल्यास त्याच्याकडे केवळ दुर्लक्ष करून न राहता, त्याच्या निष्काळजीपणाबद्दल त्यांना चीड येऊन त्यास दोन चार थपडा का मारतात, ही जी ह्या आईबापांची अडाणीपणाची माया आहे, तशातलाच समाजाचा वरील प्रकार आहे.

ही दोन विक्षिप्त उदाहरणे बाजूस ठेविली, तरी अर्धी मनुष्यजाती ज्या स्त्रिया, ह्याच्यामध्ये व्यक्तित्वाचा आजवर जो पूर्ण अभाव आहे, तिकडे अद्यापिही मनुष्यजातीचे लक्ष गेलेले नाही. काव्य आणि कादंब-या ह्यांमधून मुख्य नायकाचे जसे व्यक्तित्वपूर्ण चित्र रेखाटलेले असते तसे नायिकेचे नसते. सीता, तारा, दमयंती, मंदोदरी इत्यादी आमच्या पुराणातल्या ज्या पुण्यकन्यका प्रसिद्ध आहेत, त्यांचा जो आजवर गौरव होत आहे तो त्यांच्या सौम्य आणि निष्क्रीय गुणांबद्दलच होय. मराठी भाषेतले उत्तमोत्तम काव्य रघुनाथपंडिताचे नलदमयंती आख्यान, त्यात कवीने पुण्यश्लोक नळाचे चित्र किती सर्वांगसुंदर रेखाटले आहे आणि दमयंतीविषयी पहावे तर तिच्या केवळ शारीरिक सौंदर्याचीच बहार उडविली आहे.

ज्याची शब्दांवर एवढी मोठी सत्ता, ज्याच्यामध्ये एवढी मोठी प्रतिभा आणि प्रेरणा, त्याला दमयंतीच्या नैतिक आणि आध्यात्मिक भावनांचा किंचित तरी उल्लेख करता आला नसता काय ! पण क्रियात्मक व्यक्तित्वाची स्त्रियांमध्ये मुळी जरुरीच वाटत नाही, मग तशा प्रकारचे चित्र वठविणे म्हणजे त्यांची एक अमर्यादाच करणे असे पुरुष चित्रकारास वाटणे साहजिक झाले आहे. आपल्या स्त्रीजातीविषयी अत्यंत अभिमान बाळगणा-या एका तेजस्वी पाश्चात्य ग्रंथकर्तीने असे म्हटले आहे की स्त्रियांमध्ये अद्यापि व्यक्तित्वविकास न पावल्यामुळे त्यांच्यामध्ये मोठे कर्तृत्व आणि हिंमत दिसून येत नाही, एवढेच नाही तर, काव्य, चित्र, लेखन इत्यादी ललितकलांचीही जोराची प्रतिभा त्यांच्यात दिसून येत नाही, पण साधारणतः पुरुषांनाच व्यक्तित्वाचे महत्त्व अद्यापि कळून आले नाही तर स्त्रियांमध्ये त्याचा अभाव असल्याचे दिसून आल्यास त्यात नवल ते काय !

हल्लीच्या काळी निरनिराळ्या जातींच्या सुधारणेविषयी प्रयत्न होत आहेत. राष्ट्राच्या उत्कर्षासंबंधी व सर्व मनुष्यजातीच्या प्रगतीविषयी चळवळी निघत आहेत, परंतु प्रत्येक माणसातील व्यक्तित्वाची थोरवी किती आहे, तिचा विकास होण्याच्या मार्गामध्ये किती घनघोर अडचणी आहेत, सामाजिक हिताच्या दाबाखाली हे व्यक्तित्व कसे चिरडून जात आहे, इकडे विचारी माणसांचे जावे तितके लक्ष जात नाही, म्हणून आपण व्यक्तित्वाचा विकास करण्याची कोणकोणती साधने आहेत हे पाहू.

हा विकास होण्याला प्रथम तीन प्रकारचे स्वातंत्र्य पूर्णपणे प्रस्थापित व्हावयास पाहिजे. दुस-यला कोणत्याही प्रकारचे नुकसान न पोहोचविता व्यक्तीला स्वतंत्रपणे : (१) विचार करण्याचा, (२) प्रेम करण्याचा आणि (३) यत्न करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. आपल्या शक्तीप्रमाणे राष्ट्राचा शोध लावणे, विचार करणे आणि मनात आलेले विचार लेखाने आणि भाषणाने प्रदर्शित करणे, हा विचारस्वातंत्र्याचा मनुष्याचा पहिला उपजत हक्क होय. अंत:करणाच्या प्रवृत्तीप्रमाणे आपली आवड, नावड ठरविणे, अभिरुचींचा उपभोग घेणे, आणि प्रेमाचा विषय संपादणे हा प्रेमस्वातंत्र्याचा दुसरा उपजत हक्क होय. आपल्या कर्तबगारीच्या जोरावर इष्ट पुरुषार्थासंबंधाने प्रामाणिकपणे यत्न करणे, किंवा यत्नापासून विराम पावणे हा यत्नस्वातंत्र्याचा तिसरा उपजत हक्क होय. ह्या तिन्ही हक्कांच्या आड सारे जग आले तरी तेवढ्यावरून हे आपले हक्कच नव्हते असा कधी कोणी गैरसमज करून घेऊ नये.

आज आपण प्रथम स्वातंत्र्याविषयी विचार करू. स्वातंत्र्याचा अगदी प्रमुख प्रवक्ता जॉन स्टुअर्ट मिल्ल ह्याने आपल्या स्वातंत्र्य नामक वेदप्राय ग्रंथामध्ये असे निक्षून सांगितले आहे की विचाराच्या बाबतीत एकच व्यक्ती एकीकडे आणि सर्व मनुष्यजात दुसरीकडे असा जर विरोध आला तर तद्विरहित सर्व मनुष्यजातीच्या एकवटलेल्या विचाराला दाबून टाकण्याला त्या एका व्यक्तीला जसा मुळीच अधिकार नाही तसाच सर्व मनुष्यजातीलाही त्या एका व्यक्तीच्या विचारालाही दडपून टाकण्याचा अधिकार नाही. सत्याचा स्वतंत्रपणे शोध करण्याचा आणि तद्नुसार आपले विचार लोकांत प्रदर्शित करण्याचा व्यक्तीला पूर्ण अधिकार आहे. ह्यासंबंधी मिल्लसाहेबांनी आपल्या विचारांचा निष्कर्ष शेवटी सिद्धांतरूपाने असा दिला आहे की समाजाने व्यक्तीला ह्या बाबतीत अडथळा आणणे म्हणजे समाजाचे जे मत असेल ते सर्वांशी प्रमाणभूत आहे असे समजणे होय. सर्व मनुष्यजातीचे निश्चयात्मक जरी एकमत ठरले तरी तेही जर सर्वांशी प्रमाणभूत असू शकत नाही तर एक व्यक्ती शिवाय करून बाकीच्या सर्वांच्या मतांचे प्रामाण्य कमीच ठरणार. मग त्यास त्या व्यक्तीचे मत दाबून टाकण्याचा अधिकार कसा येईल ? एका व्यक्तीचे मत जरी सर्वांशी सत्य नसले तरी सत्याचा काही तरी अंश त्यामध्ये असण्याचा संभव आहेच आणि समाजाच्या मतात चुकीचा काही अंश असणे तितकेच संभवनीय आहे. अशा स्थितीत एका व्यक्तीचे मत मुळीच पुढे आणू न देणे योग्य होणार नाही. दुस-या पक्षी त्या एका व्यक्तीचे विचार सपशेल चुकीचे असले तरी ते दाबून टाकण्याने केणाचे हित होणार नाही, कारण, असत्याचा सत्याशी झगडा होण्यानेच सत्य पक्षाचे हित आहे. तिसरे पक्षी, समाजाचे मत सर्वांशी प्रमाणभूत असले तरी व्यक्तीने स्वत: काही विचार न करता ते जशाचे तसेच स्वीकारण्याने त्याचे हित होणार नाही.

आमच्या ब्राह्मसमाजात सर्व प्रकारे व्यक्तीला स्वातंत्र्य असणे हे एक पायाभूत मूलतत्त्व मानले आहे. वेदादी धर्मग्रंथांचे, गुरूंचे, परंपरांचे, इत्यादी कोणत्याही प्रकाराचे बाह्य प्रामाण्य ब्राह्मधर्माने मुळीच झुगारून दिले आहे. तथापि ही बाह्य प्रामाण्ये निराधार आहेत हे सत्य आमच्या समाजात जन्मास आलेल्या मुलांना आम्ही जर आयतेच देऊ तर ते त्यांना हितकारक नाही. स्टोअर्समध्ये मिळणा-या तयार केलेल्या कपड्यांप्रमाणे सत्याची ही आंगडी पांघरून समाजातील सभासदांच्याही मनाची खरी वाढ होणे शक्य नाही. कैद्यास तुरुंगात ठेविले काय किंवा राजवाड्यात ठेविले काय तो जसा कैदीच त्याप्रमाणे मनावर असत्याचा बोजा असला काय किंवा सत्याचा बोजा असला काय, जोपर्यंत ते स्वतंत्र नाही तोपर्यंत ते कैदीच समजावयाचे. भूमितीसारख्या गणितशास्त्रासंबंधी विचार करताना प्रमाणांची बहुतेक एकदेशीयताच असते. काही स्वयंसिद्ध गोष्टींचा स्वीकार केल्याबरोबर तर्कशास्त्राच्या नियमांप्रमाणे ह्या सामान्य शास्त्राचे ठराविक सिद्धांतांकडे आपले मन जाऊन पोहोचते. तेथे दुसरी तिसरी बाजू संभवत नाही. परंतु धर्म, नीती, राजकारण इत्यादी व्यावहारिक शास्त्रांची गोष्ट तशी नाही. ह्या बाबतीत जितकी विविध आणि विपुल मते आपल्यापुढे येतील आणि त्यांचे जितके घनघोर घर्षण होईल, तितके आपण सत्याच्या जवळजवळच जाण्याचा संभव आहे.

ग्रंथप्रकाशनाचे बाबतीत ज्या ग्रंथात नवीन विचार असतात, त्याला बाजारात अधिक किंमत येते, आणि एरवी नुसते भाषांतर किंवा इतर असेच संपादित ग्रंथ, त्यांची किंमत एकदम अर्ध्याहून कमी होते, आणि केव्हा केव्हा तर त्यांची कागद आणि शाईच्या किंमतीनेच विक्री होण्याची मारामार पडते. ह्याप्रमाणे जो प्रकार वाङमयामध्ये आढळतो तो जीवनव्यवहारामध्ये असू नये काय ? विद्यार्थ्याने एकाद्या शास्त्राचे अध्ययन आपल्या गुरूजवळ काही वर्षे केल्यावर त्याचे अंगी व्युत्पत्ती येते आणि तशी व्युत्पत्ती आल्याशिवाय त्याचे अध्ययन संपले, असे सजण्यात येत नाही. जशी विद्यार्थ्यास व्युत्पत्ती तसेच संसारात वावरणा-या माणसाचे व्यक्तित्व हे होय. मनुष्य बालवयात असतो तोपर्यंत आईबाप त्याला जे सांगतील ते ऐकून व त्याचे अनुकरण करून त्याचे चालते. परंतु मोठा झाल्यावर त्याला केव्हाना केव्हा तरी त्याच्यामध्ये व्युत्पत्ती आल्यावाचून त्याचे चालणार नाही. बाळपणी स्वाभाविक उत्साह आणि जीवनाचा ताजा जोम असतो म्हणून मुलाला अनुकरणाची बाधा होत नाही, पण मोठेपणी हा उत्साह संपून गेल्यावर व्यक्तित्वाचा आतून जोम आल्याशिवाय मनुष्य राहू लागल्यास जे अनुकरण आजपर्यंत त्याला तारक झाले, ते ह्यापुढे मारक होते. विद्या खात्याच्या आधुनिक शिक्षणक्रमाकडे पाहिले असतानाही हीच गोष्ट निदर्शनास येते. प्राथमिक शिक्षणात लहान मुलाला केवळ श्रवण आणि दर्शन ह्यांच्या द्वारा काही ज्ञानाच्या साधनांची वरवर प्राप्ती करून घ्यावयाची असते. दुय्यम प्रतीच्या शिक्षणात इतिहास, भूगोल, इत्यादी विषयांची स्मृतिद्वारा माहिती संपादन करावयाची असते. परंतु विद्यार्थी ह्या प्रकारे एकदा विश्वविद्यालयामध्ये प्रविष्ट झाला म्हणजे हे पारडे उलटते. तेथे त्याचे नियमित विषयांचे आवश्यक अध्ययन कमी होऊन निरनिराळ्या विषयांची आपल्या आवडीप्रमाणे निवड करावी लागते, आणि ह्याप्रकारे विषयाची पसंती करूनच चालत नाही, तर पसंत केलेल्या विषयांमध्ये त्याच्यापुढे मोठमोठे ग्रंथकार, कवी आणि शोधक ह्यांच्या कृती मांडण्यात येतात आणि त्यांवर त्याला स्वत:ची मखलाशी करावयाची असते. ह्या पायरीवर आल्यावर त्याने कोणतेही सत्य जशाचे तसेच स्वीकारावे अशी विद्यालयाची योजना नसते, तर त्याच्यापुढे ज्या गोष्टी मांडण्यात येतात त्यांची तुलना करून, स्वत:च्या मनाची शक्ती त्याने वाढवावी हा विद्यालयाच्या योजनेचा हेतू असतो. विद्यालयात प्रविष्ट झालेल्या उमेदवारावर जर ही जबाबदारी आहे, तर त्यातून पार उतरून संसार-समरांगणावर आरूढ झालेल्याची व्यक्तित्वासंबंधी जबाबदारी कमी असणे इष्ट आहे काय ? तथापि असे असताही वस्तुस्थिती अगदी उलट आहे. जडसृष्टीमध्ये ज्याप्रमाणे झाडांना कोट्यवधी पाने दरवर्षी लागून त्यांना थोडीच फुले येतात, कोट्यवधी फुलांतून थोडीच फळे येतात आणि बाकी सर्व वृथा गळून जातात, त्याचप्रमाणे चैतन्यसृष्टीमध्येही अत्यंत खेदजनक आणि वृथा व्यय चाललेला आहे. असंख्य कोटी प्राणी जन्मास येऊन व्यक्तित्वशून्य आणि व्यक्तित्वहीन असे मृत्युमुखी पडतात, त्यांची उत्पत्ती, स्थिती, लय ही जणू काय अहेतुक भासतात, आणि व्यक्तित्वपूर्ण प्राणी हे अपवादादाखल कोठे तरी टमकतात. असा प्रकार न व्हावा, प्रत्येक प्राण्यामध्ये व्यक्तित्व पूर्णत्वास यावे, अशी दैवी योजना असून तिला अनुकूल वर्तन ठेवणे हा प्रत्येक प्राण्याचा आद्य आणि अंतिम धर्म होय आणि ह्या मंगल हेतूस अडथळा आणणे ह्यापरता दुसरा कोणताही अधर्म नाही.

धर्म, जीवन व तत्त्वज्ञान

  संपादकीय
  पुरस्कार
विभाग पहिला : प्रवासवर्णन
 - जलप्रवास
 - मार्सेय शहर
 - पॅरीस शहर
 - नॉटर डेम द ला गार्ड देऊळ व ते
     पाहून सुचलेले विचार
 - लंडन शहर
 - ब्रिटिश म्युझिअम
 - लंडन येथील बालहत्यानिवारक गृह
 - सोमयागाचे वर्णन वाचून वाटलेला
    विस्मय व विषाद
 - डेव्हनपोर्ट येथील गुड फ्रायडे
 - बोअर युद्धाचा शेवट व ऑक्सफर्ड
    येथील उल्हास
 - राष्ट्रीय निराशा
 - बर्टन खेड्यातील शाळा कशी दिसली?
 - विभूतीपूजा
 - मॅंचेस्टर कॉलेज
 - पृथ्वीच्या पोटात ४४० यार्डाखाली
 - जनातून वनात आणि परत
 - बंगलूरच्या रस्त्यातील एक फेरी
 - मंगळूर येथील काही विशेष गोष्टी
 - बंगालची सफर
 - शांतिनिकेतन
 - सह्याद्रीवरुन-१
 - सह्याद्रीवरुन-२
 विभाग दुसरा : धर्मपर लेख
 - युनिटेरियन समाज
 - इंग्लंडातील आधुनिक धर्मविषयक
   चळवळ आणि लिव्हरपूल
 - सुशिक्षित धर्मभगिनींस अनावृत पत्र
 - ब्राह्मसमाज व आर्यसमाज (ह्यातील
    हल्लीचे साम्य,भेद व पुढे ऐक्यार्थ यत्न)
 - धर्मजागृती
 - निवृत्ती व प्रवृत्ती आणि अवतारवाद व विकासवाद
 - ईश्वर आणि विश्वास
 - बौद्धधर्म जीर्णोद्धार
 - ब्राह्मधर्म व ब्राह्मसमाज
 - आत्म्याची यात्रा
 - आत्म्याची वसती
 -  हिंदुस्थानातील उदार धर्म
 - कौटुंबिक उपासनेच्यावेळी केलेला
    उपदेश देवाचा व आपला संबंध
 - आवड आणि प्रीती
 - स्तुती, निर्भत्सना व निंदा
 - विनोदाचे महत्त्व
 - प्रेमप्रकाश
 - संग व विषय
 - मरण म्हणजे काय?
 - धर्मप्रसारार्थ स्वानुभवाची आवश्यकता
 - ब्राह्म आणि प्रार्थनासमाजास एक विनंती
 - दास्यभक्तीची ध्वजा
 - प्रेमसंदेश
प्रो. ऑयकेन ह्यांची जीवनमीमांसा
 - धर्म-१
 - धर्म-२
 - नीती-१
 - नीती-२
 - नीती-३
 - शास्त्र आणि तत्वज्ञान-१
 - शास्त्र आणि तत्वज्ञान-२
 - सार्वजनिक नित्य व नैमित्तिक
    उपासनेच्यावेळी केलेले उपदेश
 - संतांचा धर्म आणि राष्ट्राचा उत्कर्ष
 - धर्म, समाज आणि परिषद
 - धर्मसंघाची आवश्यकता
 - विनययोग
 - शासनयोग
 - पितृशासन
 - गुरुशासन
 - राजशासन
 - धर्म आणि व्यवहार
 - प्रेरणा आणि प्रयत्न
 - मानवी आदर आणि दैवी श्रद्धा-१
 - मानवी स्नेह आणि ईश्वरभक्ती -२
 - मनुष्यसेवा आणि ईश्वरोपासना -३
 - मनाची प्रसन्नता आणि मोक्षप्राप्ती-४
 - परमार्थाची प्रापंचिक साधने-५
 - आधुनिक युग आणि ब्राह्मसमाज
 - धर्मसाधन
 - नैराश्यवाद
 - आनंदवाद
 - संसारसुखाची साधने
 - वृत्ती, विश्वास आणि मते
 - व्यक्तित्वविकास
 - स्त्री-दैवत
 - दान आणि ऋण
 - राज्यरोहण
 - नाममंत्राचे सामर्थ्य
 - मनुष्यजन्माची सार्थकता
 - आपुलिया बळे घालावी हे कास
 - कालियामर्दन
विभाग तिसरा : इतर लेख
 - आपला व खालील प्राण्यांचा संबंध
 -  स्वराज्य आणि स्वाराज्य
 - देशभक्ती आणि देवभक्ती
 - समाजसेवेची मूलतत्वे
 - निराश्रित साहाय्यकारी मंडळी व आक्षेपनिरसन
 - रा.गो.भांडारकर ह्यांचे धर्मपर लेख व व्याख्याने
 - प्रार्थनासमाज अप्रिय असल्यास तो का?
 - राजा राममोहन रॉय
 - मुरळी अथवा पश्चिम हिंदुस्थानातील हिंदू
    देवळांतील अनितिमूलक आणि बीभत्स प्रकार
 - श्रीशाहू छत्रपतींच्या मनाचा विकास
 - रावसाहेब थोरात ह्यांच्या "बोधमृत" ला प्रस्तावना
 - जमखिंडी येथील परशुरामभाऊ हायस्कूलचा
    सुवर्णमहोत्सव
 - थोरल्या शाहू महाराजांच्या कारकीर्दीचे मराठ्यांच्या
    इतिहासातील महत्त्व
 - डॉ. भांडारकरांस मानपत्र
 - मराठी भाषेद्वारा ब्राह्मधर्माचा प्रचार
 - राजा राममोहन व बुवाबाजी
 - प्रार्थनासमाजाचा एक नमुना
 - क्षात्रधर्म
 - स्वराज्य विरुद्ध जातिभेद
 - इतिहास, संशोधन व भाषाशास्त्र
 - गुन्हेगार जातीची सुधारणा
 - निराश्रित साह्यकारी मंडळी
 - वाई प्रार्थना संघ मंदिर प्रवेश
 - ब्रह्मानंद केशवचंद्र सेन
 - साधारण ब्राह्मसमाजाची पन्नास वर्षे
 - निराश्रित साहाय्य
 - मुंबई येथील मानपत्रास उत्तर
 - सत्यशोधकांना इशारा अथवा नव्या पिढीचे राजकारण
 - बंदिस्त बळीराजा
 - सही नाही; सहानुभूती!
 - टिळकांच्या मानपत्रास विरोध
 - A Scientific Catechism
 - Gleanings from Periodicals
 - The Arya Samaj of India
 - Liberal Religion in Japan
 - The New Light of Persia
 - Liberal Christianity in Europe
 - Unitarianism in England and America 
विभाग चौथा : परिशिष्टे
 - महर्षी शिंदे ह्यांचे पहिले कीर्तन
 - रामजी बसाप्पा शिंदे ह्यांचा मृत्यू
 - लाहोर येथील धर्मपरिषद

 - कोल्हापूर येथील धर्मविषयक चळवळ व

    प्रगतीपत्रातील अहवाल

 - विसावे व्याख्यान
 - आख्यान
 - महाराष्ट्र सुधारक आगळा
 - भगिनी जनाबाई ह्यांची स्मृतिचित्रे
 - परलोकवासी विठ्ठल रामजी शिंदे
 -  The Late Mr. V. R. Shinde
 - कै. अण्णासाहेब शिंदे, चरित्र व कार्य
 - प.वा. अण्णासाहेब शिंदे
 - व-हाड मध्यप्रांतीय सत्यशोधक हीरक महोत्सव
 - १९ मार्च १९३३-७१ वा वाढदिवस
 - श्री. महाराजांचे अस्पृश्योद्धारक कार्य-श्रीमंत
   सयाजीराव गायकवाड
 - दांभिक देशभक्तापेक्षा
 - धर्मरहस्य अथवा अंत्यजोद्धार
 - लाहोर येथील धर्म परिषद
 - आपुले स्वहित करावे पै आधी
 - सुखवाद व सुखाची साधने
 - लुटूपुटूची पार्लमेंट
 - बहाई समाजाचा ब्राह्मसमाजास संदेश
 - प्रेमाचा विकास
 - भोकरवाडी येथील आपत्ती
 - सुधारकांची जुनी परंपरा (स्फुट)
 - सुधारकच हिंदूधर्माचे खरे रक्षक
 - निष्ठा व नास्तिक्य
 - विठ्ठल रामजी शिंदे व श्री शाहू छत्रपती
 - विठ्ठल रामजी शिंदे व सयाजीराव गायकवाड
 - विठ्ठल रामजी शिंदे व महात्मा गांधी
 - वि.रा. शिंदे व राजाराम छत्रपती
 - विजापूर येथी धर्मकार्य, विजापूर
 - सोमवंशीय सन्मार्गदर्शक समाज
 - रोगनिवारक प्रयत्न-एक निकडीची विनंती
 - कवित्व आणि भरारी
 - मोफत व सक्तीचे शिक्षण नको !!
 - बहुजन पक्ष
 - डी.सी.मिशनचा १७ वा वाढदिवस
 - अहंकार नासाभेद
 - यश परिणामात नसून प्रयत्नात आहे.
 -  Maharashtra Provincial Social Conference
 - प्रांतिक सामाजिक परिषद-सातारा
 - शिवाजी की रामदास?
 - बडोदे-तत्वज्ञान व समाजशास्त्र विभागाचे अध्यक्ष
 - श्री. विठ्ठल रामजी शिंदे व सुबोध पत्रिका
 - कै. डॉ. संतूजी रामजी लाड
 - मागासलेले व अस्पृश्य
 -  Shree V. R. Shinde’s Work
 - पुण्यातील मानपत्रास उत्तर
-   Liberal Religion in India
- वाई ब्राह्मोसमाज-विश्वास लेख
 - गुरुवर्य शिंदे सूक्ती