धर्म, जीवन व तत्त्वज्ञान

मराठी भाषेद्वारा ब्राह्मधर्माचा प्रचार

सुबोध पत्रिकेत ब्राह्मधर्माच्या प्रचाराविषयी एका ति-हाईताचे विचार नुकतेच प्रसिद्ध होत होते. केवळ मराठी भाषेच्या दृष्टीनेच ह्या प्रचार कार्याविषयी काही माझे अल्प अनुभव व विचार प्रसिद्ध करणे अप्रासंगिक होणार नाही, ह्या आशेने हा लेख मी लिहीत आहे. पण मी ति-हाईत नसून एक प्रचारक आहे. एवढाच जर दोष असेल किंवा माझ्या प्रचारकपणामुळेच काही विचारांत दोष असतील तर ते पाहण्याची माझी इच्छा. एरव्ही मुद्द्यावर वादविवाद वाढविण्याची मात्र माझी इच्छा नाही.

(१) अलीकडे केवळ अभिमानाच्या दृष्टीनेच मराठीची बाजू वाचकांपुढे काही तेजस्वी पुरुष मांडीत आहेत. त्यांना माझे एवढेच सांगणे आहे की, कोणत्याही गोष्टीचा योग्य अभिमान बाळगणे दुर्गुण नसून उलट सद्गुणच आहे. पण धर्माच्या बाबतीत अभिमान ही चीज निर्भेळ विघ्न आहे. निदान तुलसीदासाने तरी “नरक मूल अभिमान” असा सिद्धांत केला आहे, तो मी तूर्त खरा धरून चालतो. आमचा ब्राह्मसमाज जातिभेद मानीत नाही व धर्मभेदही मानीत नाही, मग तो भाषाभेद कोठून मानणार ? शिवाय ब्राह्मसमाज ही एक प्रांतिक किंबहुना राष्ट्रीय संस्था नसून ती सार्वत्रिक असल्याने अखिल ब्राह्मसमाजाला भाषेचा अभिमान धरून चालणार नाही, हे उघड आहे. तथापि, आजच्या लेखापुरते मला ह्या सार्वत्रिक ब्राह्मधर्माचे औपपत्तिक विवेचन करावयाचे नसून त्या धर्माचा प्रांतिक व लौकिक प्रसार कसा होईल, ह्या व्यावहारिक विषयाचा संक्षिप्त विचार करावयाचा आहे. ह्या आकुंचित दृष्टीने पाहता महाराष्ट्रात मुख्यत्वेकरून ह्या धर्माचा मराठीतून प्रसार करण्याचा प्रयत्न व्हावा आणि इंग्रजी, संस्कृत किंबहुना राष्ट्रीय गणलेल्या हिंदी भाषेलाही गौणत्व असावे असे मला वाटते. परंतु अनेक ख-या खोट्या कारणांमुळे हे प्राधान्य व हे गौणत्व आमच्या महाराष्ट्रात असावे तितके अद्यापि आलेले नाही. त्यामुळे आमचा प्रसार व्हावा तितका न होण्याची जी कारणे आहेत त्यातच (सुबोध पत्रिका, १७ ऑक्टोबर, १९२६) मराठी जी लोकभाषा तिची हेळसांड हेही एक कारण असावे, असेही मला वाटते.

(२) अव्वल इंग्रजशाही सुरू झाल्याबरोबर हिंदुस्थानात ज्या सार्वत्रिक चळवळी सुरू झाल्या, त्यांपैकी ब्राह्मसमाज ही एक अत्यंत प्रमुख चळवळ होय. कोणी ज्ञानकोशकार काही म्हणोत, माझे हे वरील विधान समतोल मनाला पटेल असे वाटते. अव्वल इंग्रजीतल्या काही चळवळींप्रमाणे ब्राह्मसमाजाला इंग्रजी भाषेचे साहाय्य अद्यापि घेणे भाग आहे. असहकाराला निदान काही काळ वाहिलेल्या काँग्रेसलाही जर अद्यापि इंग्रजी भाषेची मध्यस्थी पत्करावी लागते, तर अखिल ब्राह्मसमाजाने ती पत्करल्यास काय नवल ? तथापि, प्रांतोप्रांती ब्राह्मधर्माचे जे कार्य चालले आहे, त्यात मात्र अद्यापि इंग्रजीचा जो अनाठायी तोरा मिरविण्यात येतो, तो पाहून मात्र माझे हसे आवरत नाही. हा माझाच दोष असल्यास तो मी कबूल करण्यास तयार आहे. मुंबई, मद्रास व कलकत्ता ह्या बकाली वस्तींच्या व्यासपीठांवरून अजून हिंदी लोकांचे इंग्रजी वक्तृत्व चमकते, ते काही अंशी अपरिहार्य असेल; पण असल्या परकीय भाषेतल्या वक्तृत्वाचे मासले मला स्वतःला लंडन, पॅरिस, एडिम्बरो, आमस्टरडॉम, कलोन, जिनीवा, रोम अथवा नेपल्स वगैरे बकाली वस्तींच्या शहरी मागे कित्येक दिवस राहूनही का दिसले नाही, ही विचारात घेण्यासारखी गोष्ट आहे. इकडे पाहावे तर महाराष्ट्रातील जिल्ह्याचे शहरीही जरी मी प्रचारास गेलो तरी केव्हा केव्हा मी इंग्रजीत व्याख्यान द्यावे अशी सूचना होत असते, ह्याचे इंगित काय ? एकदा तर समाजाशी संबंध नसलेल्या एका असहकारी महाराष्ट्रीय मित्राने ही सूचना केली ! तेव्हा केवळ मला मराठीत बोलता येते हे दाखविण्यासाठी मला मराठीतच बोलावे लागले आणि श्रोतृसमाज सर्व मराठीच असल्याने माझे बोलणे सर्वांस कळले.

(३) कोणी म्हणतील की महाराष्ट्रात ब्राह्मधर्माचे कार्य विशेषतः मुंबई शहरातच आहे आणि तेथे पार्शी, मुसलमान, गुजराथी लोकांचाच श्रोतृसमाज असणार आणि स्वभाषा मराठी असली तरी मुंबईतील मराठ्यांच्या बायकामुलांनाही आजकाल इंग्रजी येत असल्याने, सर नारायणसारख्या एकाद्या नामांकित वक्त्याचे इंग्रजी ऐकल्याने आपले इंग्रजीही सुधारण्याचा संभव आहे. पण मी स्वतः इंग्रजीच्याच काय परंतु अरबी किंवा आफ्रिकी भाषेच्याही उलट नाही. वक्त्याला श्रोतृवृंदांची भाषा येत नसल्यास त्याच्याच भाषेत व्यवहार होणे शक्य आहे व इष्ट आहे. परंतु केव्हा केव्हा आमच्या उत्सवातून केवळ इंग्रजी एक व्याख्यान असावे, असा संप्रदाय पडला आहे. म्हणूनच कोणीतरी गोमागणेश इंग्रजी वक्ता पाहण्याची जी तारांबळ उडते तिचा ब्राह्मधर्माशी काय संबंध आहे, हे मात्र मला समजत नाही. समाजात जे लोक वाट चुकुन येतात ते देखील इंग्रजी अगर कोणत्याही परकीय भाषेत प्रगती व्हावी म्हणून नव्हे तर खरोखर आपल्या धर्मबुद्धीतच प्रगती व्हावी म्हणून येतात व आलेही पाहिजेत. केवळ वक्तृत्व ऐकण्यास कोणी नेहमी येत आहे असा संशय आल्यास आम्ही प्रचारकांनी त्याला वक्तृत्व सभेकडची वाट दाखवावी, निदान अशांच्यासाठीच इंग्रजी वक्ते शोधीत बसू नये असे मला वाटते.

(४) जो युक्तिवाद संभाषणाला तोच लेखनालाही लागतो. हिंदुस्थानातील बहुतेक सर्व प्रांतांचा मला जो प्रत्यक्ष थोडाबहुत अनुभव आहे, त्यावरून मी जर असे सामान्य विधान केले की, बंगालप्रांत व काही अंशी आंध्रप्रांत खेरीज करून बाकी सर्व प्रांतांत आम्हा ब्राह्मप्रचारकांकडून चालू लोक-भाषांची फारच हेळसांड झालेली आहे, तर त्यात अतिशयोक्ती झाल्याचे कोणी मला दाखवून दिल्यास मी आभारी होईन. विशेष ध्यानात ठेवण्यासारखी गोष्ट ही की ह्या हेळसांडीमुळे इंग्रजीचा फायदा किंबहुना तद्देशीय प्रांतिक भाषांचा तोटाही झाला नसून केवळ त्या त्या प्रांती ब्राह्मधर्माच्या प्रचाराचे रोपटे मात्र झपाट्याने कोमेजू लागले आहे. ह्या विधानास महाराष्ट्रातील प्रार्थनासमाजाचे प्रवर्तकही मुळीच अपवाद ठरणार नाहीत, अशी मला भीती वाटते. एकच उदाहरण घेऊ.

मराठीत प्रार्थनासमाजाचे पुरेसे वाङ्मय नाही असे कोण कळकळीचा मराठा ब्राह्म म्हणणार नाही ? पण नुसते म्हणून काय ? येत्या वर्षी मुंबई प्रार्थनासमाजाचा हिरकणी वाढदिवस साजरा होणार आहे. म्हणून एक इंग्रजीत पुस्तक तयार होणार आहे. गोष्ट उत्तम आहे. इंग्रजी वाचकांची सोय झाली. पण मराठी वाचकांसाठी तशी निदान दहा तरी पुस्तके तयार होतील, तर ती कमीच, आणि ती तशी न होतील तर हे इंग्रजी पुस्तक आणखी दहा वर्षांनी प्रसिद्ध झाले तरी इंग्रजी वाचक दम धरतील अशी मला आशा आहे. मात्र तितक्याच खर्चात तीन मराठी पुस्तके वाटण्यास लहान प्रमाणावर व लौकिक स्वरूपात प्रसिद्ध व्हावीत, असा माझा अनुभव मला ग्वाही देत आहे.

(५) जुन्या किंवा दिमागखोर लोकांना न जुमानता तुर्कस्थानात कोमालपाशाने कुराणाचे धर्ममंदिरातून वाचन अरबी भाषेतून न होता तुर्की भाषेतून करविण्याची तजवीज चालविली आहे. धर्ममंदिरात बायबलचे वाचन लॅटिन भाषेत झाले पाहिजे असा दुराग्रह धरण्यात रोमन कॅथॉलिक पंथाचा नंबर अद्यापि पहिला आहे. पण रोम येथील हल्लीचे पोपने इटाली भाषेसंबंधी आपली अनुकूलता दाखविली आहे. त्याहीपेक्षा अधिक अनुकूलता मराठीसंबंधी दाखविण्यास आमच्या प्रार्थनासमाजाला आज काय हरकत आहे ? कलकत्त्यास ब्राह्मसमाजातील इंग्रजीचा मोह बाबू प्रतापचंद्र मुजुमदाराबरोबर मावळून गेला तरी आमचा अद्यापि रेंगाळत आहे.

(६) प्रार्थनासमाजाचे काम बायकामुलांमध्ये होत नाही ह्या बाबतीत नुकताच सुबोध पत्रिकेच्या एका अंकात इंग्रजी बाजूकडे कळकळीने खेद प्रदर्शित झाला होता. हा सुंदर लेख मराठीकडे आला असता तर अधिक बायकामुलांना कळला असता, ब्राह्मधर्माची एकंदर ठेवणच मुळी बायकामुले आणि बहुजनसमाज ह्यांना सहज गम्य नाही.--निदान ती बंगाल्याबाहेर तरी—अशी माझी खडतर खात्री होऊन चुकली आहे. अशा अडचणीत परकीय भाषेचे तट्टू उधळू लागले म्हणजे बिचा-या बायकामुलांची—विशेषतः अशिक्षित वर्गाची—जी दाणादाण होते ती त्याच्या वंशास गेल्याशिवाय कळणे दुरापास्त ! सा-या कानडी प्रांतात मंगळूर येथे एकच ब्राह्मसमाज आहे. मला जरी कानडीत उत्तम बोलता येत नाही, तरी मी कशी तरी त्या भाषेत गरज भागवीत असे. पण समाजातील काही मंडळी मला इंग्रजीतच नव्हे तर मराठीतही बोलण्याचा आग्रह करीत असत. त्याचे कारण त्यांना मराठी समजत असे हे नसून मला कानडीपेक्षा मराठी चांगले बोलता येते हेच होते. म्हणूनच आपल्या कानांची कीव न करता बोलण्याच्या जीभेचे कौतुक करण्यात जी नादलुब्धता आजकालच्या असहकाराच्याही काळात सर्वत्र दिसत आहे, ती आमच्या प्रचारकार्यातून तरी अजीबात निघाली पाहिजे, असे मला वाटते. शेवटी पुष्कळशी खबरदारी करून ब्राह्मधर्माच्या ठोकळ तत्त्वांची जाहिरात कानडी जाणणारांत व्हावी म्हणून मी एक कानडीतून लहानसे चोपडे प्रसिद्ध करविले. पण समाजाबाहेरील परकीय वाचणा-यांपेक्षा आतील स्वकीय वाचणा-यांमध्येच स्वभाषेची कळकळ कमी असल्यामुळे त्या प्रती तशाच पडून आहेत. वीस वर्षांपूर्वी मुंबई प्रार्थना मंदिराच्या वरल्या माळ्यावर अशाच एका मराठी चोपड्याचा गठ्ठा धूळ खात पडलेला पाहिला, तेव्हा माझे मनात हेच विचार आले होते.

(७) शेवटी एका नाजूक मुद्द्यावरील माझे किंचित विक्षिप्त मत कळवून आटोपते घेतो. हल्ली आम्ही इंग्रजी शिकलेले लोक मराठी म्हणून जी भाषा बोलतो व लिहितो ती अशिक्षित बहुजनसमाजास—विशेषतः खेड्यात राहणा-यांस—कळत नाही. ह्याचे कारण, आमचे शब्द जरी मराठी असतात तरी विचार इंग्रजी किंवा संस्कृत असल्यामुळे आमची एकंदर वाक्यरचना व संप्रदाय केवळ परकीय व आबालबोध असतात. “अबालबोध” हा अवघड शब्द मी येथे मुद्दाम वरील दुबळेपणाच्या उदाहरणार्थच योजिला आहे. खरी मराठी भाषा ज्ञानेश्वरापासून तुकारामापर्यंतच होती. ती प्रथम मोरोपंताने बिघडविली. बिघडता बिघडता लोकहितवादी आणि ज्योतीबा फुले ह्यांचेपर्यंत ती कशीबशी जीव धरून होती. पण चिपळूणकरांनी व आगरकरांनी तिचा गळाच चेपला ! टिळकांनी व हरिभाऊ आपट्यांनी तोंडात शएवटचे दोन पाण्याचे घोट सोडले. पण ते शेवटचेच ठरले. आजकाल चिपळूणकरांचा इंग्रजी-संस्कृत कित्ताच आम्ही सर्वजण आधाशासारखे मिरवीत आहो; त्यामुळे आम्ही एकाद्या खेड्यातील पिंपळाचे पारावर आमच्या मराठीचा होर्मोनियम सुरू केल्याबरोबर खेडवळ समाज अर्थ न कळल्यामुळे आम्हांला पाहून आपल्या कानांपेक्षा डोळ्याचेच पारणे अधिक फेडीत असतो व ते आम्हांला कोणी विनोदाने सुचविले तरी आम्हांला समजतही नाही. प्रार्थनासमाजात काही मराठी वाङ्मय आहे, मुळीच नाही असे नाही. पण ते बहुजन समाजात फुकट वाटले तरी कळण्यासारखे नाही. आमच्या समाजात पूर्वी सदाशिवराव केळकरांशिवाय व आता काही अल्पांशाने हल्लीच्या सुबोध पत्रिकांशिवाय इतरांना मराठी येत होते, किंवा येत आहे असे मला दिसत नाही. ही भाषेची उणीव भरून आल्याशिवाय आणि ख-या बालबोध मराठी सुलभ ग्रंथांचा प्रसार होण्यापूर्वीच महाराष्ट्रात ब्राह्मधर्माचा प्रसार कधी होईल हा प्रश्न विचारणे म्हणजे लग्नापूर्वीच मुलाचे नाव काय ठेवू असे विचारण्यासारखेच विनोदाचे ठरेल.

धर्म, जीवन व तत्त्वज्ञान

  संपादकीय
  पुरस्कार
विभाग पहिला : प्रवासवर्णन
 - जलप्रवास
 - मार्सेय शहर
 - पॅरीस शहर
 - नॉटर डेम द ला गार्ड देऊळ व ते
     पाहून सुचलेले विचार
 - लंडन शहर
 - ब्रिटिश म्युझिअम
 - लंडन येथील बालहत्यानिवारक गृह
 - सोमयागाचे वर्णन वाचून वाटलेला
    विस्मय व विषाद
 - डेव्हनपोर्ट येथील गुड फ्रायडे
 - बोअर युद्धाचा शेवट व ऑक्सफर्ड
    येथील उल्हास
 - राष्ट्रीय निराशा
 - बर्टन खेड्यातील शाळा कशी दिसली?
 - विभूतीपूजा
 - मॅंचेस्टर कॉलेज
 - पृथ्वीच्या पोटात ४४० यार्डाखाली
 - जनातून वनात आणि परत
 - बंगलूरच्या रस्त्यातील एक फेरी
 - मंगळूर येथील काही विशेष गोष्टी
 - बंगालची सफर
 - शांतिनिकेतन
 - सह्याद्रीवरुन-१
 - सह्याद्रीवरुन-२
 विभाग दुसरा : धर्मपर लेख
 - युनिटेरियन समाज
 - इंग्लंडातील आधुनिक धर्मविषयक
   चळवळ आणि लिव्हरपूल
 - सुशिक्षित धर्मभगिनींस अनावृत पत्र
 - ब्राह्मसमाज व आर्यसमाज (ह्यातील
    हल्लीचे साम्य,भेद व पुढे ऐक्यार्थ यत्न)
 - धर्मजागृती
 - निवृत्ती व प्रवृत्ती आणि अवतारवाद व विकासवाद
 - ईश्वर आणि विश्वास
 - बौद्धधर्म जीर्णोद्धार
 - ब्राह्मधर्म व ब्राह्मसमाज
 - आत्म्याची यात्रा
 - आत्म्याची वसती
 -  हिंदुस्थानातील उदार धर्म
 - कौटुंबिक उपासनेच्यावेळी केलेला
    उपदेश देवाचा व आपला संबंध
 - आवड आणि प्रीती
 - स्तुती, निर्भत्सना व निंदा
 - विनोदाचे महत्त्व
 - प्रेमप्रकाश
 - संग व विषय
 - मरण म्हणजे काय?
 - धर्मप्रसारार्थ स्वानुभवाची आवश्यकता
 - ब्राह्म आणि प्रार्थनासमाजास एक विनंती
 - दास्यभक्तीची ध्वजा
 - प्रेमसंदेश
प्रो. ऑयकेन ह्यांची जीवनमीमांसा
 - धर्म-१
 - धर्म-२
 - नीती-१
 - नीती-२
 - नीती-३
 - शास्त्र आणि तत्वज्ञान-१
 - शास्त्र आणि तत्वज्ञान-२
 - सार्वजनिक नित्य व नैमित्तिक
    उपासनेच्यावेळी केलेले उपदेश
 - संतांचा धर्म आणि राष्ट्राचा उत्कर्ष
 - धर्म, समाज आणि परिषद
 - धर्मसंघाची आवश्यकता
 - विनययोग
 - शासनयोग
 - पितृशासन
 - गुरुशासन
 - राजशासन
 - धर्म आणि व्यवहार
 - प्रेरणा आणि प्रयत्न
 - मानवी आदर आणि दैवी श्रद्धा-१
 - मानवी स्नेह आणि ईश्वरभक्ती -२
 - मनुष्यसेवा आणि ईश्वरोपासना -३
 - मनाची प्रसन्नता आणि मोक्षप्राप्ती-४
 - परमार्थाची प्रापंचिक साधने-५
 - आधुनिक युग आणि ब्राह्मसमाज
 - धर्मसाधन
 - नैराश्यवाद
 - आनंदवाद
 - संसारसुखाची साधने
 - वृत्ती, विश्वास आणि मते
 - व्यक्तित्वविकास
 - स्त्री-दैवत
 - दान आणि ऋण
 - राज्यरोहण
 - नाममंत्राचे सामर्थ्य
 - मनुष्यजन्माची सार्थकता
 - आपुलिया बळे घालावी हे कास
 - कालियामर्दन
विभाग तिसरा : इतर लेख
 - आपला व खालील प्राण्यांचा संबंध
 -  स्वराज्य आणि स्वाराज्य
 - देशभक्ती आणि देवभक्ती
 - समाजसेवेची मूलतत्वे
 - निराश्रित साहाय्यकारी मंडळी व आक्षेपनिरसन
 - रा.गो.भांडारकर ह्यांचे धर्मपर लेख व व्याख्याने
 - प्रार्थनासमाज अप्रिय असल्यास तो का?
 - राजा राममोहन रॉय
 - मुरळी अथवा पश्चिम हिंदुस्थानातील हिंदू
    देवळांतील अनितिमूलक आणि बीभत्स प्रकार
 - श्रीशाहू छत्रपतींच्या मनाचा विकास
 - रावसाहेब थोरात ह्यांच्या "बोधमृत" ला प्रस्तावना
 - जमखिंडी येथील परशुरामभाऊ हायस्कूलचा
    सुवर्णमहोत्सव
 - थोरल्या शाहू महाराजांच्या कारकीर्दीचे मराठ्यांच्या
    इतिहासातील महत्त्व
 - डॉ. भांडारकरांस मानपत्र
 - मराठी भाषेद्वारा ब्राह्मधर्माचा प्रचार
 - राजा राममोहन व बुवाबाजी
 - प्रार्थनासमाजाचा एक नमुना
 - क्षात्रधर्म
 - स्वराज्य विरुद्ध जातिभेद
 - इतिहास, संशोधन व भाषाशास्त्र
 - गुन्हेगार जातीची सुधारणा
 - निराश्रित साह्यकारी मंडळी
 - वाई प्रार्थना संघ मंदिर प्रवेश
 - ब्रह्मानंद केशवचंद्र सेन
 - साधारण ब्राह्मसमाजाची पन्नास वर्षे
 - निराश्रित साहाय्य
 - मुंबई येथील मानपत्रास उत्तर
 - सत्यशोधकांना इशारा अथवा नव्या पिढीचे राजकारण
 - बंदिस्त बळीराजा
 - सही नाही; सहानुभूती!
 - टिळकांच्या मानपत्रास विरोध
 - A Scientific Catechism
 - Gleanings from Periodicals
 - The Arya Samaj of India
 - Liberal Religion in Japan
 - The New Light of Persia
 - Liberal Christianity in Europe
 - Unitarianism in England and America 
विभाग चौथा : परिशिष्टे
 - महर्षी शिंदे ह्यांचे पहिले कीर्तन
 - रामजी बसाप्पा शिंदे ह्यांचा मृत्यू
 - लाहोर येथील धर्मपरिषद

 - कोल्हापूर येथील धर्मविषयक चळवळ व

    प्रगतीपत्रातील अहवाल

 - विसावे व्याख्यान
 - आख्यान
 - महाराष्ट्र सुधारक आगळा
 - भगिनी जनाबाई ह्यांची स्मृतिचित्रे
 - परलोकवासी विठ्ठल रामजी शिंदे
 -  The Late Mr. V. R. Shinde
 - कै. अण्णासाहेब शिंदे, चरित्र व कार्य
 - प.वा. अण्णासाहेब शिंदे
 - व-हाड मध्यप्रांतीय सत्यशोधक हीरक महोत्सव
 - १९ मार्च १९३३-७१ वा वाढदिवस
 - श्री. महाराजांचे अस्पृश्योद्धारक कार्य-श्रीमंत
   सयाजीराव गायकवाड
 - दांभिक देशभक्तापेक्षा
 - धर्मरहस्य अथवा अंत्यजोद्धार
 - लाहोर येथील धर्म परिषद
 - आपुले स्वहित करावे पै आधी
 - सुखवाद व सुखाची साधने
 - लुटूपुटूची पार्लमेंट
 - बहाई समाजाचा ब्राह्मसमाजास संदेश
 - प्रेमाचा विकास
 - भोकरवाडी येथील आपत्ती
 - सुधारकांची जुनी परंपरा (स्फुट)
 - सुधारकच हिंदूधर्माचे खरे रक्षक
 - निष्ठा व नास्तिक्य
 - विठ्ठल रामजी शिंदे व श्री शाहू छत्रपती
 - विठ्ठल रामजी शिंदे व सयाजीराव गायकवाड
 - विठ्ठल रामजी शिंदे व महात्मा गांधी
 - वि.रा. शिंदे व राजाराम छत्रपती
 - विजापूर येथी धर्मकार्य, विजापूर
 - सोमवंशीय सन्मार्गदर्शक समाज
 - रोगनिवारक प्रयत्न-एक निकडीची विनंती
 - कवित्व आणि भरारी
 - मोफत व सक्तीचे शिक्षण नको !!
 - बहुजन पक्ष
 - डी.सी.मिशनचा १७ वा वाढदिवस
 - अहंकार नासाभेद
 - यश परिणामात नसून प्रयत्नात आहे.
 -  Maharashtra Provincial Social Conference
 - प्रांतिक सामाजिक परिषद-सातारा
 - शिवाजी की रामदास?
 - बडोदे-तत्वज्ञान व समाजशास्त्र विभागाचे अध्यक्ष
 - श्री. विठ्ठल रामजी शिंदे व सुबोध पत्रिका
 - कै. डॉ. संतूजी रामजी लाड
 - मागासलेले व अस्पृश्य
 -  Shree V. R. Shinde’s Work
 - पुण्यातील मानपत्रास उत्तर
-   Liberal Religion in India
- वाई ब्राह्मोसमाज-विश्वास लेख
 - गुरुवर्य शिंदे सूक्ती