महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य

दुस-या आवृत्तीच्या निमित्ताने

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य हा चरित्रग्रंथ ४ जुलै २००४ रोजी प्रकाशित झाला. दीड वर्षातच ग्रंथाची पहिली आवृत्ती संपली व आता दुस-या आवृत्तीचा योग येत आहे, याचा मला फार आनंद वाटतो.

ग्रंथ प्रकाशनाचा समारंभ ऍड. गोविंदराव पानसरे यांनी कोल्हापूर येथील शाहू स्मारक सभागृहात मोठ्या सुंदर रीतीने आयोजित केला होता. प्रा. राम बापट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभात भाई एन्. डी. पाटील यांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन झाले. या दोघांसह प्रा. रा. ग. जाधव, ऍड. गोविंदराव पानसरे, श्री. सतीश काळसेकर या सर्वांची भाषणे विचारप्रवर्तक, महर्षींच्या कार्याचे महत्त्व आणि थोरवी विवेचन करणारी व चरित्रग्रंथाची गुणवत्ता विशद करणारी झाली.

ग्रंथ प्रकाशित झाल्यानंतर त्याचे सर्व थरांतून जे स्वागत झाले त्यामुळे मी आनंदित तर झालोच, शिवाय कृतज्ञतेच्या भावनेने भारावूनही गेलो. ग्रंथ वाचल्याबरोबर प्रा. भगवंत देशमुख, प्रा. गंगाधर गाडगीळ, प्रा. म. द. हातकणंगलेकर, प्रा. भालचंद्र नेमाडे, प्रा. रवींद्र किंबहुने, प्रा. भास्कर भोळे, श्री. पन्नालाल सुराणा, श्री. वसंत पळशीकर, श्री. सदा डुंबरे, श्री. म. श्री. दीक्षित या व अन्य मित्रांनी पत्रद्वारे अथवा दूरध्वनीवरून प्रस्तुत ग्रंथलेखनामुळे महत्त्वाचे कार्य झाले आहे असा निर्वाळा देत ग्रंथलेखनाबद्दलही मुक्तपणे प्रशंसा केली. विचारवंत, अभ्यासक यांप्रमाणेच सर्वसामान्य वाचकवर्गानेही प्रस्तुत ग्रंथाचे मोठ्या आत्मीयतेने स्वागत केले हेही मला आवर्जून कृतज्ञतापूर्वक नमूद केले पाहिजे. अनेक अपरिचित वाचकांनी मला अभिनंदनाची पत्रे लिहिली व अभिप्राय कळविले. त्यांपैकी एक प्रातिनिधिक निर्देश मी करतो. उल्हासनगर येथील एक वाचक सेवानिवृत्त फौजदार श्री. गणेश मा. पोतदार यांनी मला पत्र लिहून मोठ्या मर्मज्ञपणे आपला अभिप्राय कळविला. दीड वर्षात या ग्रंथाची पहिली आवृत्ती संपली ही बाबही सर्वसामान्य वाचकांनी या ग्रंथाची दखल घेतली याचेच चिन्ह म्हणता येईल.

ग्रंथ प्रकाशित झाल्यावर चार-सहा महिन्यांत त्यावर विचारप्रेरक, मार्मिक तसेच आस्वादक स्वरूपाचे परीक्षण-लेख विविध नियतकालिकांतून व वृत्तपत्रांच्या साप्ताहिक आवृत्त्यांतून प्रसिद्ध झाले. हे लेख लिहिणा-या व्यासंगी विचारवंतांपैकी डॉ. ग. वा. तगारे, प्रा. गो. पु. देशपांडे, प्रा. गंगाधर गाडगीळ, श्री. दीपक घारे, डॉ. विलास खोले, कन्नड लेखक प्रा. वसंतराव दिवाणजी यांचा मी कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतो.

चरित्रग्रंथाच्या प्रकाशन समारंभात कवी सतीश काळसेकर म्हणाले होते, 'या ग्रंथाला अनेक पुरस्कार लाभतील.' त्यांचे शब्द सार्थ ठरले. प्रस्तुत ग्रंथाला वर्षभरात पुढील आठ पुरस्कार प्राप्त झाले. सोलापूरचा भैरूरतन दमाणी साहित्य पुरस्कार; कुर्डुवाडीचा शिवगिरिजा प्रतिष्ठानचा स. ना. कदम गुरुजी साहित्य पुरस्कार; वाई येथील रा. ना. चव्हाण प्रतिष्ठानचा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार; प्रवरानगर येथील पद्मश्री विखे पाटील पुरस्कार; महाराष्ट्र फाउण्डेशनचा मराठी साहित्य पुरस्कार; महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा राज्य पुरस्कार; औरंगाबाद येथील धोंडीराम माने साहित्यरत्न पुरस्कार आणि सोलापूर येथील शरद प्रतिष्ठानचा शरद पुरस्कार. या पुरस्कारांमुळे महर्षी शिंदे यांच्या कार्याकडे लक्ष वेधण्याचे महत्त्वाचे कार्य साधले गेले. पुरस्कार देणा-या या सगळ्या संस्थांच्या संयोजकांचे मी अंतःकरणपूर्वक आभार मानतो.

ग्रंथ प्रकाशनाच्या समारंभातल्याप्रमाणेच पुरस्कार वितरण सोहळ्यात व गौरवप्रसंगी सुशीलकुमार शिंदे, प्रा. केशव मेश्राम, प्रा. रावसाहेब कसबे, प्राचार्य रा. कृ. कणबरकर, श्री. अनंत दीक्षित, खासदार बाळासाहेब विखे पाटील, भाई वैद्य, श्री. विजय कुवळेकर, डॉ. राम ताकवले, डॉ. दिलीप जोग, डॉ. जनार्दन वाघमारे या मान्यवरांनी मोठ्या आत्मीयतेने भाषणे केली. या सगळ्यांचा मी अतिशय ऋणी आहे.

प्रस्तुत ग्रंथाच्या प्रथम प्रकाशनाच्या वेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचे विश्वस्त श्री. ज्ञानेश्वर खैरे व सचिव श्री. शरद काळे यांचे साह्म झाले याबद्दल त्यांचा मी आभारी आहे.

प्रस्तुत ग्रंथप्रकाशनानंतर त्यावरील परीक्षणलेखांमुळे तसेच पुरस्कारप्राप्तीमुळे महर्षी शिंदे यांच्या कार्याकडे मोठ्या प्रमाणात लक्ष वेधले गेले याचे निदर्शक चिन्ह म्हणजे प्रस्तुत लेखकाला विविध शहरांतून मान्यवर संस्थांकडून महर्षी शिंदे यांच्या जीवनकार्यावर व्याख्याने देण्यासाठी निमंत्रित करण्यात आले. बेळगाव येथील सार्वजनिक वाचनालय, जमखंडीची नगर परिषद, वाई येथील प्राज्ञपाठशाळा, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर; डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद; रयत शिक्षण संस्था, सातारा; पुणे येथील प्रार्थनासमाज; नगर परिषद, लातुर; आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी या सगळ्या सुप्रतिष्ठित संस्थांनी व्याख्यानासाठी निमंत्रित केले याबद्दल मी त्यांचा अतिशय आभारी आहे.

प्रस्तुत चरित्रग्रंथाचे एवढे जे स्वागत झाले त्याचे एक मुख्य कारण म्हणजे महर्षी शिंदे यांच्या कार्याचे व विचाराचे महत्त्व आजच्या काळात तर विशेषच आहे हे विचारवंतांना तसेच सर्वसामान्य वाचकांना जाणवत असणार, हे होय. इतके समीक्षक म्हणतात त्या अर्थी या चरित्रग्रंथाची गुणवत्ताही वाचकांना भावली असेल. चरित्रग्रंथाला लाभलेल्या प्रा. राम बापट यांच्या प्रस्तावनेमुळे या ग्रंथाचे मोल निश्चितच वाढले. या सगळ्यांच्या जोडीने आणखी एका बाबीचा मला कृतज्ञतापूर्वक निर्देश करावासा वाटतो. ती म्हणजे अतिशय आकर्षक, सुंदर स्वरूपात या ग्रंथाची केली गेलेली निर्मिती. 'लोकवाङ्मय गृहा'चे श्री. प्रकाश विश्वासराव हे मुळातील उत्तम चित्रकार. त्यांनी आपल्या कलावंताच्या दृष्टीनेच प्रस्तुत ग्रंथाचे मुद्रण, पानाचा आकार, बांधणी या बाबींकडे लक्ष दिले असल्याने ग्रंथाला एवढे देखणे रूप प्राप्त झाले आहे. त्यांचे सहकारी श्री. सतीश काळसेकर यांचाही ग्रंथनिर्मितीत महत्त्वाचा सहभाग आहे. 'लोकवाङ्मय गृहा'तील त्यांचे अन्य सहकारी प्रा. नितीन रिंढे, श्री. जयप्रकाश सावंत, कु. माधवी विचारे यांनीही आपापल्या कामाचा वाटा मोठ्या आत्मीयतेने उचलला होता. या सर्वांचा मी अतिशय आभारी आहे.

प्रस्तुत दुस-या आवृत्तीत 'उपसंहार' या प्रकरणाची अखेरीस भर घातली आहे. ग्रंथ प्रसिद्ध झाल्यानंतर माझे मित्र श्री. सदा डुंबरे यांनी मला सुचविले, की एकंदरीत समाजसुधारकांत महर्षी शिंदे यांच्या स्थानासंबंधी विवेचन करणारे एक प्रकरण ग्रंथाच्या अखेरीस असावे. त्यांची ही सूचना मला एकदम पटली; व ह्या दुस-या आवृत्तीत 'उपसंहार' या प्रकरणाचा समावेश केला आहे. प्रा. गो. पु. देशपांडे यांनी हे प्रकरण वाचून काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. प्रा. भालचंद्र नेमाडे, प्रा. दिगंबर पाध्ये व श्री. सदा डुंबरे यांनी केलेल्या सूचनांचाही मला फार उपयोग झाला. श्री. विलास गिते यांनी काही उपयुक्त माहिती कळविली. या सर्व मित्रांचा मी फार आभारी आहे.

महर्षी शिंदे १९२७ साली ब्रह्मदेशात गेले असता तेथे त्यांना भेटलेल्या महाराष्ट्रीय मंडळींचे एक छायाचित्र व महर्षी शिंदे यांच्या मोडी अक्षराचा नमुना (त्यांनी राजर्षी शाहू महाराज यांना लिहिलेल्या पत्राचा प्रारंभिक भाग) प्रस्तुत आवृत्तीत नव्याने समाविष्ट केला आहे.

प्रस्तुत चरित्रग्रंथाची दुसरी आवृत्ती काढण्यात 'लोकवाङ्मय गृहा'चे श्री. प्रकाश विश्वासराव यांनी पहिल्या आवृत्तीप्रमाणेच आत्मीयता व तत्परता दाखविली याबद्दल त्यांचा मी फार आभारी आहे.
गो. मा. पवार

तिस-या आवृत्तीच्या निमित्ताने

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य या चरित्रग्रंथाची दुसरी आवृत्ती २००६ मध्ये प्रसिद्ध झाली व तीही अडीच-तीन वर्षांत संपली. वाचकांनी, अभ्यासकांनी व विचारवंतांनी या चरित्रग्रंथास जो मनःपूर्वक प्रतिसाद दिला याबद्दल माझ्या मनात कृतज्ञतेची भावना आहे.

प्रस्तुत चरित्रग्रंथाबद्दल कॉ. गोविंदराव पानसरे, श्री. प्रकाश विश्वासराव, श्री. सतीश काळसेकर यांना प्रारंभपासून उत्साह वाटत आलेला आहे. त्यांच्या आस्थेमुळेच या ग्रंथाची तिसरी आवृत्ती प्रसिद्ध होत आहे, याचा मी कृतज्ञतापूर्वक उल्लेख करू इच्छितो.

हा चरित्रग्रंथ प्रसिद्ध झाल्यानंतर पहिल्या वर्षातच त्याला प्राप्त झालेल्या आठ पुरस्कारांचा उल्लेख आधी केलेला आहेच. दुस-या आवृत्तीनंतरही प्रस्तुत ग्रंथास महत्त्वपूर्ण पुरस्कारांची मान्यता मिळतच राहिली. मिळालेले नंतरचे चार पुरस्कार असे :

१. औरंगाबाद येथील मराठवाडा साहित्य परिषदेचा स्व. लोकनेते यशवंतराव चव्हाण पुरस्कार,
२. दिल्ली येथील साहित्य अकादेमीचा २००७ चा पुरस्कार,
३. सातारा येथील भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था व फुले-आंबेडकर साहित्य पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा फुले-आंबेडकर साहित्य पुरस्कार व
४. मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या वतीने कै. प्रा. अ. का. प्रियोळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ असलेला ज्येष्ठ संशोधक पुरस्कार.

साहित्य अकादेमीचा पुरस्कार मिळाल्यामुळे त्याचप्रमाणे प्रस्तुत चरित्रग्रंथाचे महत्त्व पटल्याने त्याचे इंग्रजीत व अन्य भारतीय भाषांमध्ये अनुवाद होऊ लागले. प्रा. सुधाकर मराठे यांनी इंग्रजीत व प्रा. चंद्रकांत पोकळे यांनी कन्नडमध्ये केलेले अनुवाद साहित्य अकादेमीच्या वतीने लवकरच प्रसिद्ध होणार आहेत. तंजावरचे डॉ. विवेकानंद गोपाल हे तमीळमध्ये अनुवाद करीत आहेत.

चरित्रग्रंथाच्या या अनुवादामुळे महर्षी शिंदे यांच्या असाधारण ऐतिहासिक स्वरूपाच्या कार्याची माहिती अन्य भारतीय भाषांतील वाचकांना तसेच भारताबाहेरील जिज्ञासू वाचकांना व अभ्यासकांना होईल याचे मला विशेष समाधान वाटते.

आधीच्या आवृत्तीत राहून गेलेले मुद्रणदोष डॉ. रोहिणी तुकदेव व डॉ. रणधीर शिंदे यांनी निदर्शनास आणले; व माधवी विचारे यांनी ते काळजीपूर्वक रीतीने दुरुस्त केले याचा मी आभारपूर्वक निर्देश करतो.

महर्षी शिंदे यांनी मोठ्या द्रष्टेपणाने व निष्ठावंतपणे आरंभिलेल्या कार्याचे मोल उत्तरोत्तर विशेषत्वाने जाणवू लागले आहे. अशा या काळात प्रस्तुत ग्रंथाचे स्वागत वाचक मोठ्या आत्मीयतेने करतील, असा मला विश्वास वाटतो.

गो. मा. पवार
सोलापूर, २१ जून २०१०

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य

   निवेदन
    लेखकाचे मनोगत
    दुस-या व तिस-या आवृत्तीच्या निमित्ताने
    प्रस्तावना 
 -   अंत:प्रेरणेचा निर्णय
 -   आजी-आजोबा आणि आई-वडिल
 -   बालपण 
 -   कॉलेजची पहिली दोन वर्षं
 -   जनाबाईंची संसारकथा
 -   जनाबाईंचे शिक्षण
 -   हुजूरपागा शाळा आणि शांता सुखटणकरची
     करुण कहाणी
-    इंटरमीजिएटचे दुसरे वर्ष
 -    पदवी परीक्षेचा अभ्यास आणि एकोणिसाव्या
      शतकाच्या अखेरचे पुणे
   प्रार्थनासमाजाची दीक्षा 
 -    पदवी परीक्षा
 -   अंत:स्थ भावजीवनातील खळबळ 
 -    एकेश्वरी उदार धर्मपंथ
 -    प्रार्थनासमाज
 -    धर्मशिक्षणासाठी निवड आणि परदेशगमन
 -    मुंबई ते ऑक्सफर्ड
 -     मॅंचेस्टर कॉलेज
 -    ऑक्सफर्डमधील पहिले दोन महिने
 -    नाताळची सुट्टी : मुक्काम लंडन 
 -    पत्रांचा विरंगुळा
 -    दक्षिण किना-यावरील पंधरवडा
 -    प्रोफेसरांच्या कुटुंबात सरोवर प्रांती
 -    एडिंबरो आणि स्कॉच सरोवरे
 -    हिंदू गृहस्थिती आणि समाजस्थिती 
      व्याख्यान व नाट्यप्रयोग 
 -    पारीस येथील एक महिना
 -   लिव्हरपूल येथील त्रैवार्षिक युनिटेरियन परिषद
 -    ऑक्सफर्डमधील शेवटची टर्म
 -    ऍमस्टरडॅम येथील आंतराष्ट्रीय उदार धर्मपरिषद
 -    परतीचा प्रवास
 -    स्वदेशी आगमन, बडोदा भेट आणि
      धर्मप्रचारकार्याला प्रारंभ
 -    मद्रासच्या परिषदा आणि हिंदुस्थानचा दौरा
-    जमखंडी-मुधोळ येथील प्रचारकार्य
 -    काठेवाडचा दौरा 
 -    मुंबईतील बि-हाड आणि प्रार्थनासमाजातील नवचैतन्य
 -    धर्मप्रचाराचे विस्तारित कार्य
 -    कौटुंबिक अडचणी, पुणे प्रार्थनासमाजातील नवचैतन्य
 -    धर्मप्रचारार्थ दौरा
 -    प्रवासातील अनुभव
 -    जनाबाई पनवेलमध्ये शिक्षिका
 -    विविध प्रार्थनासमाजांतील सहभाग
 -    भारतीय एकेश्वरी धर्मपरिषद
 -    ब्राह्मधर्मसूची ग्रंथ
 -    अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीविषयक कार्याचे प्रारंभिक प्रयत्न
 -    मिशनच्या स्थापनेचा संकल्प
 -    मिशनची स्थापना
 -  मिशनची घटना व पुणे येथील अंगभूत शाखा
 -    मिशनमधील दोन समारंभ 
 -    मिशनच्या स्थापनेनंतर वातावरणातील बदल
 -    निधीची योजना
 -    मुंबई प्रार्थनासमाजाशी दुरावा आणि फारकत
 -    पुण्यास स्थलांतर
 -    मिशनची महाराष्ट्र परिषद
 -    तुकोजीराव महाराजांची देणगी व मांगांचे
      शेतकी खेडे वसविण्याचा प्रयत्न
 -   अहल्याश्रमाची पूर्वतयारी 
 -    मराठ्यांची सांस्कृतिक जबाबदारी 
 -    काँग्रेसमध्ये अस्पृश्यतानिवारणाचा ठराव
 -    अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीची दिशा व मार्ग
 -    अस्पृश्यतानिवारक परिषद
 -   राष्ट्रीय प्रवाहात मराठा समाज
 -    अस्पृश्यवर्गाचे कायदेमंडळात प्रतिनिधित्व
 -    गैरसमजाचा ससेमिरा 
 -    १९२० सालातील निवडणूक 
-    शिंदे आणि ब्राह्मणेतर पक्ष
 -    कुटुंबातील मृत्यू
 -    मुलींसाठी सक्तीचे शिक्षण
 -    मद्यपाननिषेधाची चळवळ व अन्य सामाजिक कार्य
 -    मिशनचा कार्यविस्तार : कर्नाटक-मध्यप्रांतातील शाखा 
 -    मिशनसंबंधी आक्षेप व समस्या
 -    मिशनची पुनर्घटना
 -    खटल्याचा दैवदुर्विलास
 -    मिशनमधील सहकारी व सहका-यांच्या
       दृष्टीतून विठ्ठल रामजी शिंदे
 -    मंगलोरमधील कार्य
 -   व्हायकोम सत्याग्रह
 -    मंगलोर ब्राह्मसमाजातील पेचप्रसंग
 -    कौटुंबिक उपासनामंडळ
 -    सत्याग्रहात सहभाग आणि नेतृत्व
 -    अस्पृश्यतानिवारणाचे कार्य व म. गांधीशी संबंध
 -    येरवड्याच्या तुरुंगात
 -    ब्रह्मदेशाची यात्रा 
 -    शेतकरी चळवळ
 -    परिषदा, संमेलने यांमधील सहभाग
 -   कौटुंबिक वातावरण
 -    बहुमान, अवमान आणि निष्ठा
 -    वाई ब्राह्मसमाज आणि ग्रामीण भागातील धर्मकार्य
 -    विचारविश्व
 -    साहित्यसेवा आणि संशोधनकार्य
 -   अपूर्व स्नेहसंमेलन
 -   अखेरचे दिवस
 -   उपसंहार 
 -   परिशिष्टे १/२ आणि ३ 
 -   मनोगते
 -   महर्षी शिंदे यांचे फोटो व काही हस्तलिखिते