महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य

अंत:प्रेरणेचा निर्णय

१९०० सालच्या सप्टेंबर महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यातील एका संध्याकाळी पुणे प्रार्थनासमाजात एक विशेष उपासना आयेजित करण्यात आली होती. समाजातील वृद्ध आणि तरुण मंडळी समाजाच्या मंदिरामध्ये हळूहळू जमली. नेहमी आस्थेवाईकपणाने व उल्हासाने एकमेकांची चौकशी करणारी व प्रेमळपणे भेटणारी ही मंडळी आज अबोल होती.  चेहर्‍यावर नेहमीचा उल्हास नव्हता. त्यावर खिन्नपणाचे सावट पसरले होते.  प्रार्थनासमाजाचे ॠषितुल्य पुढारी डॉ. रा. गो. भांडारकर हे उपासना चालविणार होते.  त्यांच्या नेहमीच्या कठोर व उग्र दिसणार्‍या चेहर्‍यावर उदासपणाची छटा दिसत होती. ही विशेष उपासना आयोजित करण्याला एक दुःखद कारण घडले होते.  दोन वर्षांपूर्वीच प्रार्थनासमाजाची दीक्षा घेतलेले बुद्धिमान होतकरू तरुण श्री. मोती बुलासा यांची ब्राह्म व प्रार्थनासमाजाने ऑक्सफर्ड येथील मँचेस्टर कॉलेजमध्ये दोन वर्षांच्या धर्मशिक्षणासाठी निवड केली होती.  म्हणून ते १५ सप्टेंबर रोजी बोटीने विलायतेस रवाना झाले होते.  वाटेत पोर्टसय्यद येथे वातज्वराचा विकार होऊन त्यांचे आकस्मिक निधन झाले होते.  ही बातमी ऐकून मुंबई व पुणे येथील प्रार्थनासमाजीयांना अतीव दुःख झाले.  डॉ. भांडारकर याच्या मनाला ही गोष्ट फारच लागून राहिली.  मोती बुलासांच्या निधनानिमित्त ही विशेष उपासना आयोजित केली होती.

डॉ. भांडारकरांनी भरल्या अंतःकरणाने ही उपासना चालविली.  या वेळी त्यांच्या अंतःकरणातून अत्यंत कळकळीचे दुःखोद्‍गार प्रकट होत होते.  ह्या उपासनेसाठी श्री. मोती बुलासांच्या बरोबरीने प्रार्थनासमाजाची दीक्षा घेतलेले एक निष्ठावंत तरुण श्री. विठ्ठल रामजी शिंदे हे उपस्थित होते.  त्यांचे स्वतःचे मन मोती बुलासांच्या वियोगाने आधीच व्याकूळ झाले होते.  गुरुवर्य डॉ. भांडारकर यांच्याबद्दल त्यांच्या मनात अतीव आदराची भावना होती.  उपासना चालवीत असताना डॉ. भांडारकरांच्या डोळ्यांतून सतत अश्रुधार चालू होती.  ह्या प्रकाराचा शिंदे यांच्या हृदयावर जोराचा परिणाम झाला.  डॉ. भांडारकर व्यासपीठावरून उतरताच ते त्यांच्याजवळ गेले व म्हणाले, ''मोती बुलासांच्या निधनाने रिकाम्या पडलेल्या जागेसाठी मला जर गुरुवर्यांनी पात्र ठरविले तर मी विलायतेस जाण्यास तयार आहे.''१  अंतःप्रेरणेच्या एका प्रबळ क्षणी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्याला कलाटणी देणारा व आयुष्याचे ध्येय निश्चित करणारा निर्णय घेतला.  त्यांच्या तोंडचे शब्द ऐकून डॉ. भांडारकरांना आनंदाचे भरते आले व त्यांनी ह्या तरुणाला जवळ घेऊन मोठ्या प्रेमाने कुरवाळले.

वस्तुतः हा निर्णय घेणे ही विठ्ठल रामजी शिंदे यांच्या दृष्टीने सोपी गोष्ट नव्हती.  वडिलोपार्जित श्रीमंती जाऊन खाण्यासाठी अन्नाची भ्रांत पडावी एवढे दारिद्र्य लहानपणी त्यांच्या वाट्याला आले होते.  अतिशय प्रतिकूल अशा आर्थिक परिस्थितीत स्कॉलरशिपवर आणि शिकवण्या करून शिक्षणाचा खर्च त्यांना भागवावा लागत होता. बी. ए. ची पदवी मिळविल्यानंतर कायद्याच्या परीक्षेच्या दोन वर्षं टर्म्स भरून शेवटची परीक्षा अखेरच्या टप्प्यामध्ये आली होती.  आपल्या बुद्धिमान आणि कर्तबगार मुलाला चांगल्या प्रकारची नोकरी लागून घराचे दारिद्र्य फेडून तो आपल्याला सुखाचे आणि समृद्धीचे दिवस दाखविणार अशी आस त्यांच्या वृद्ध आईवडिलांना लागून राहिली होती.  त्यांच्यासारख्या एवढे शिकलेल्या मराठा तरुणाला बडोद्यासारख्या संस्थानात उत्तम पगाराची आणि वरच्या दर्जाची नोकरी मिळणे कठीण नव्हते.  परंतु ज्या क्षणी विठ्ठल रामजी शिंदे यांनी विलायतेस जाऊन मँचेस्टर कॉलेजमध्ये धर्मशिक्षण घेण्याची तयारी दाखविली त्याच क्षणी ह्या सगळ्या गोष्टींकडे पाठ फिरवून आयुष्यभर फकिरी पत्करण्याची तयारीही दाखविली होती.  कारण धर्मशिक्षणाला जाण्यासंबंधीच्या अटी बिकट होत्या, ह्याची त्यांना उत्तम प्रकारे कल्पना होती.  दरसाल शंभर पौंडाप्रमाणे दोन वर्ष स्कॉलरशिप मिळणार होती.  पण केवळ उदरनिर्वाहाला जेमतेम पुरावी इतकी ती अत्यल्प होती.  त्याशिवाय विलायतेला जाण्यायेण्याच्या प्रवासखर्चाची तरतूद त्या विद्यार्थ्याने स्वतःच करावयाची होती व सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे तेथे धर्मशिक्षण घेऊन स्वदेशी परत आल्यानंतर सदर विद्यार्थ्याने धर्मप्रचाराचे कार्य आजन्म करावयाचे असते.  निदान ह्या उद्देशाला विसंगत असे उदर भरण्याचे दुसरे कार्य करावयाचे नसते.  ह्या सर्व अटींचा, घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीचा व जवळ आलेल्या एल. एल. बी. च्या परीक्षेचा कोणताही अडथळा मनात येऊ न देता त्यांनी आपल्या अंतःप्रेरणेने हा निर्णय तत्क्षणी घेतला व गुरुस्थानी असलेल्या डॉ. भांडारकरांकडे गंभीरपणाने प्रकट केला.

विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबाबत आयुष्याला वळण देणारी व जीवितकार्याची निश्चिती करणारी ह्या घटनेसारखीच दुसरी एक घटनाही अशाच एका अंतःप्रेरणेच्या क्षणी घडली.

ऑक्सफर्डच्या मँचेस्टर कॉलेजमधील धर्मशिक्षणाचा अभ्यासक्रम आटोपून परत आल्यानंतर त्यांनी मुंबई प्रार्थनासमाजाच्या प्रचारकपदाची जबाबदारी पत्करली होती त्याला दीड वर्ष झाले होते. ठिकठिकाणचे स्थानिक प्रार्थनासमाज उत्तम प्रकारे चालावेत म्हणून महाराष्ट्रातील विविध स्थानिक समाजांना भेटी देऊन तेथील प्रार्थनासमाजाचे काम सुसंघटित करण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्‍न सुरू केले होते. ह्या कामाच्या उद्देशाने अहमदनगर येथील समाजाच्या वार्षिक उत्सवासाठी ते तेथे गेले होते.

शनिवार दिनांक २८ ऑक्टोबर १९०५.  अमावास्येची काळोखी मध्यरात्र.  दगदगीची कामे करून रात्री बर्‍याच उशिरा त्यांनी जमिनीवर अंग टेकले होते.  अवचित अस्पृश्यवर्गाचे एक शिष्टमंडळ रात्री बाराच्या सुमारास त्यांना भेटण्यास आले.  भिंगार हे अहमदनगरपासून चार मैलावर असणारे खेडेगाव.  तेथील स्थानिक अस्पृश्यवर्गीय मंडळींनी अशा वेळी एक जाहीर सभा बोलावली होती.  तिचे अध्यक्षस्थान स्वीकारून विठ्ठल रामजी शिंदे यांनी चार शब्द सांगावेत म्हणून हे शिष्टमंडळ अपरात्री आले होते.  शिंदे यांच्याबरोबर स्वामी स्वात्मानंदजी होते.  त्यांच्या मनात काही शंका आली; परंतु तिचे विठ्ठल रामजींनी निरसन करताच तेही उत्साहाने सभेला जाण्यासाठी त्यांच्याबरोबर टांग्यात बसून निघाले.  भिंगार गावाच्या हद्दीवर दोघे महारवाड्यात उतरले.

त्यांना समोर दिसलेले दृश्य अपूर्व होते.  मोठमोठे हिल्लाळ पेटलेले होते.  लहानथोर, बायकामुले ह्यांनी गजबजलेली सभा पाहुण्यांची वाट पाहत बसली होती.  शिंदे आणि स्वात्मानंदजी सभास्थानी पोहोचल्याबरोबर टाळ्यांच्या प्रचंड गजरात त्यांचे स्वागत झाले.  खेडेगावातील मागासलेल्या समाजाचा एवढा जमाव पाहून स्वामीजींना आश्चर्य वाटले.  ही सभा अशा अवेळी का बोलाविली असे त्यांनी सभा भरविणार्‍या मंडळींना विचारले. त्यांनी उत्तर दिले, ''साहेब आम्ही गरीब लोक.  दिवसभर कष्टात राबावे लागते.  आम्हाला हिच्याशिवाय दुसरी वेळ कोणती ?  तशात आम्ही सर्व चालक मंडळी शेजारच्या जिल्ह्याच्या गावच्या परकी साहेबांच्या घरगुती कामात गुंतलेले असतो.  आम्हाला ह्यावेळेशिवाय हूं की चूं करण्यास मिळत नाही.  आपल्यास तसदी दिली याची माफी असावी.''  ह्या प्रसंगाचे वर्णन करताना विठ्ठल रामजी शिंदे म्हणतात, ''माझ्या अंतःकरणात चक्क उजेड पडला.  ह्या लोकांची हजारो वर्षांची कहाणी अभ्यासून माझे मन हळुवार झाले होते.  अधिक खुलासा नको होता.''  ह्या अस्पृश्य मंडळींच्या सहवेदनेने त्यांच्या मनाची अत्यंत हळुवार स्थिती झाली.  त्यांचे मन करुणेने भरून आले.  मनाच्या या अवस्थेतच सभेच्या कामाला सुरुवात झाली.

नागपूर जवळील मोहपा येथील किसन फागुजी बनसोडे ह्या स्वार्थत्यागी तरुणाने धर्माच्या पायावर एक समाज स्थापन करून अस्पृश्यवर्गाची सुधारणा करण्याचे प्रयत्‍न आरंभिले होते.  त्यांच्या सूचनेवरून अहमदनगर येथील अस्पृश्यांचे पुढारी श्रीपतराव थोरात (बटलर), पांडुरंग लक्ष्मण डांगळे (हेडमास्तर) रावी सदोबा गायकवाड (नगर म्युनिसिपालिटीचे शिक्षक) वगैरे मंडळींनी ही सभा बोलाविली होती.  मोहपा येथील मंडळींकडून आलेले छापील जाहीरपत्र जमलेल्या सभेत वाचून दाखविण्यासाठी शिंदे यांच्या हातात देण्यात आले.  एकेक उद्देश ते समजावून सांगत होते.  शिंदे यांनी ह्या प्रसंगाचे वर्णन करताना लिहिले आहे, ''हजारो वर्षे वरच्या जातीचा जुलूम सहन करूनही 'वरिष्ठ वर्गाची मने न दुखविता किंबहुना कोणत्याही प्रकारे त्यांच्या वाटेस न जाता अस्पृश्यवर्गाने आपल्या स्वतःच्या हिताचे प्रयत्‍न करावेत' अशा अर्थाचा एक उद्देश सभेला मी नीट समजावून सांगत असता हे उद्धाराचे काम आपण स्वतः अंगावर घेऊन या कामात स्वतःचे भावी चरित्र वाहून घ्यावे अशी प्रेरणा मला जोराने होऊ लागली.  इतर सर्व काम टाकून एका घडीचाही वेळ न दवडिता ह्या कार्यास लागावे असा संकल्प परमेश्वराला स्मरून ह्याच रात्रीच्या मुहूर्तावर केल्याचे मला पक्के आठवते.''२

ह्या सभेच्या प्रसंगी अंतःप्रेरणेच्या क्षणी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आपल्या जीवितकार्यातील महत्त्वाचे अंग निश्चित केले आणि आपले भावी आयुष्य अस्पृश्यतानिवारणाच्या कार्यासाठी आणि अस्पृश्य समजल्या जाणार्‍या लोकांच्या उन्नतीसाठी वाहून टाकण्याचा दृढ निश्चय केला.  त्यांच्या भूमिकेनुसार अस्पृश्यतानिवारणाचे कार्य हे धर्मकार्यच होते व धर्मकार्याचा भाग म्हणून वर्षभरात म्हणजे १८ ऑक्टोबर १९०६ रोजी 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया' अथवा 'भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळी' ही संस्था स्थापन करून अखिल भारतीय पातळीवर अस्पृश्यतानिवारणाच्या कार्याला संस्थात्मक स्वरूपाचा प्रारंभ केला.  ह्या कामाचा अपूर्व विस्तार करून अस्पृश्यतेचा प्रश्न सोडविण्यासाठी भारतभर जागृती केली. सामाजिक पुनर्घटनेच्या अपूर्व अशा कामासाठी त्यांनी सगळे आयुष्य व्यतीत केले. आपले जीवितकार्य ठरविण्याचा त्यांनी जो निर्णय घेतला तो भावनेच्या एका उत्कट क्षणी प्रबळ अशा अंतःप्रेरणेने.

विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवितध्येयाचे व जीवितकार्याचे स्वरूप निश्चित करणार्‍या त्यांच्या आयुष्यातील या दोन घटना होत.

या दोन्ही वेळचे निर्णय त्यांनी भावनेच्या उत्कट क्षणी अंतःप्रेरणेने घेतले असे त्यांनी म्हटले आहे व तसे आपल्याला जाणवतेही.  येथे आपल्याला हेही लक्षात घ्यावे लागेल की, जीवनाच्या निर्णायक क्षणी त्यांच्या अंतःकरणामध्ये भावनेचा स्फोट हा काही आकस्मिकपणे झालेला नव्हता अथवा निर्णयास कारणीभूत ठरणारी अंतःप्रेरणाही त्यांच्या अंतःकरणात अपरिचित स्वरूपात आकस्मिकपणे निर्माण झालेली नव्हती.  वस्तुतः भावनेची उत्कट अवस्था आणि अंतःप्रेरणेचा आविष्कार ह्या अकल्पितपणे घडणार्‍या गोष्टी नव्हेत.  हे घडण्यासाठी अंतःकरणाची भावनामय घडण काही संस्कारानेच व्हावी लागत असते.  अशा काही संस्करांनी मनाची भावनामय उत्कट अवस्था बनल्यावर अंतःप्रेरणा जोराने उफाळून येते.  अंतःकरणाच्या भावनामयतेचा आणि प्रेरणेचा जो उगम असतो तो काही संस्कारांनी झालेल्या मनाच्या घडणीमध्ये.  विठ्ठल रामजी शिंदे यांनी आपल्या आयुष्याला अभूतपर्वू कलाटणी देणारे, एकमेकांशी सुसंगत असणारे हे जे दोन निर्णय अंतःप्रेरणेने घेतले त्यांच्या मुळाशी विशिष्ट संस्कारामुळे झालेली त्यांची घडणच कारणीभूत आहे असे म्हणावे लागते.  विसाव्या शतकाच्या प्रारंभी आपले आयुष्य उन्नत धर्माचा प्रसार करण्याचे कार्य करण्यासाठी खर्च करण्याचा आणि त्या कार्याचाच एक भाग म्हणून अस्पृश्यतानिवारणाचे कार्य करण्याचा विठ्ठल रामजी शिंदे यांनी जो निर्णय घेतला तो लोकोत्तर स्वरूपाचा म्हणावा लागेल.  अशा प्रकारचा निर्णय घेणार्‍या त्यांच्या मनाची घडण कशी झाली होती व तिला अनुसरून त्यांचे चरित्र कसे घडले हे आपण पाहू.

संदर्भ
१. विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, श्री लेखन वाचन भांडार, पुणे, १९५८, पृ. ११३.
२.  तत्रैव, पृ. २१५-२१६.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य

   निवेदन
    लेखकाचे मनोगत
    दुस-या व तिस-या आवृत्तीच्या निमित्ताने
    प्रस्तावना 
 -   अंत:प्रेरणेचा निर्णय
 -   आजी-आजोबा आणि आई-वडिल
 -   बालपण 
 -   कॉलेजची पहिली दोन वर्षं
 -   जनाबाईंची संसारकथा
 -   जनाबाईंचे शिक्षण
 -   हुजूरपागा शाळा आणि शांता सुखटणकरची
     करुण कहाणी
-    इंटरमीजिएटचे दुसरे वर्ष
 -    पदवी परीक्षेचा अभ्यास आणि एकोणिसाव्या
      शतकाच्या अखेरचे पुणे
   प्रार्थनासमाजाची दीक्षा 
 -    पदवी परीक्षा
 -   अंत:स्थ भावजीवनातील खळबळ 
 -    एकेश्वरी उदार धर्मपंथ
 -    प्रार्थनासमाज
 -    धर्मशिक्षणासाठी निवड आणि परदेशगमन
 -    मुंबई ते ऑक्सफर्ड
 -     मॅंचेस्टर कॉलेज
 -    ऑक्सफर्डमधील पहिले दोन महिने
 -    नाताळची सुट्टी : मुक्काम लंडन 
 -    पत्रांचा विरंगुळा
 -    दक्षिण किना-यावरील पंधरवडा
 -    प्रोफेसरांच्या कुटुंबात सरोवर प्रांती
 -    एडिंबरो आणि स्कॉच सरोवरे
 -    हिंदू गृहस्थिती आणि समाजस्थिती 
      व्याख्यान व नाट्यप्रयोग 
 -    पारीस येथील एक महिना
 -   लिव्हरपूल येथील त्रैवार्षिक युनिटेरियन परिषद
 -    ऑक्सफर्डमधील शेवटची टर्म
 -    ऍमस्टरडॅम येथील आंतराष्ट्रीय उदार धर्मपरिषद
 -    परतीचा प्रवास
 -    स्वदेशी आगमन, बडोदा भेट आणि
      धर्मप्रचारकार्याला प्रारंभ
 -    मद्रासच्या परिषदा आणि हिंदुस्थानचा दौरा
-    जमखंडी-मुधोळ येथील प्रचारकार्य
 -    काठेवाडचा दौरा 
 -    मुंबईतील बि-हाड आणि प्रार्थनासमाजातील नवचैतन्य
 -    धर्मप्रचाराचे विस्तारित कार्य
 -    कौटुंबिक अडचणी, पुणे प्रार्थनासमाजातील नवचैतन्य
 -    धर्मप्रचारार्थ दौरा
 -    प्रवासातील अनुभव
 -    जनाबाई पनवेलमध्ये शिक्षिका
 -    विविध प्रार्थनासमाजांतील सहभाग
 -    भारतीय एकेश्वरी धर्मपरिषद
 -    ब्राह्मधर्मसूची ग्रंथ
 -    अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीविषयक कार्याचे प्रारंभिक प्रयत्न
 -    मिशनच्या स्थापनेचा संकल्प
 -    मिशनची स्थापना
 -  मिशनची घटना व पुणे येथील अंगभूत शाखा
 -    मिशनमधील दोन समारंभ 
 -    मिशनच्या स्थापनेनंतर वातावरणातील बदल
 -    निधीची योजना
 -    मुंबई प्रार्थनासमाजाशी दुरावा आणि फारकत
 -    पुण्यास स्थलांतर
 -    मिशनची महाराष्ट्र परिषद
 -    तुकोजीराव महाराजांची देणगी व मांगांचे
      शेतकी खेडे वसविण्याचा प्रयत्न
 -   अहल्याश्रमाची पूर्वतयारी 
 -    मराठ्यांची सांस्कृतिक जबाबदारी 
 -    काँग्रेसमध्ये अस्पृश्यतानिवारणाचा ठराव
 -    अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीची दिशा व मार्ग
 -    अस्पृश्यतानिवारक परिषद
 -   राष्ट्रीय प्रवाहात मराठा समाज
 -    अस्पृश्यवर्गाचे कायदेमंडळात प्रतिनिधित्व
 -    गैरसमजाचा ससेमिरा 
 -    १९२० सालातील निवडणूक 
-    शिंदे आणि ब्राह्मणेतर पक्ष
 -    कुटुंबातील मृत्यू
 -    मुलींसाठी सक्तीचे शिक्षण
 -    मद्यपाननिषेधाची चळवळ व अन्य सामाजिक कार्य
 -    मिशनचा कार्यविस्तार : कर्नाटक-मध्यप्रांतातील शाखा 
 -    मिशनसंबंधी आक्षेप व समस्या
 -    मिशनची पुनर्घटना
 -    खटल्याचा दैवदुर्विलास
 -    मिशनमधील सहकारी व सहका-यांच्या
       दृष्टीतून विठ्ठल रामजी शिंदे
 -    मंगलोरमधील कार्य
 -   व्हायकोम सत्याग्रह
 -    मंगलोर ब्राह्मसमाजातील पेचप्रसंग
 -    कौटुंबिक उपासनामंडळ
 -    सत्याग्रहात सहभाग आणि नेतृत्व
 -    अस्पृश्यतानिवारणाचे कार्य व म. गांधीशी संबंध
 -    येरवड्याच्या तुरुंगात
 -    ब्रह्मदेशाची यात्रा 
 -    शेतकरी चळवळ
 -    परिषदा, संमेलने यांमधील सहभाग
 -   कौटुंबिक वातावरण
 -    बहुमान, अवमान आणि निष्ठा
 -    वाई ब्राह्मसमाज आणि ग्रामीण भागातील धर्मकार्य
 -    विचारविश्व
 -    साहित्यसेवा आणि संशोधनकार्य
 -   अपूर्व स्नेहसंमेलन
 -   अखेरचे दिवस
 -   उपसंहार 
 -   परिशिष्टे १/२ आणि ३ 
 -   मनोगते
 -   महर्षी शिंदे यांचे फोटो व काही हस्तलिखिते