महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य

आजी-आजोबा आणि आई-वडिल

विठ्ठल रामजी शिंदे यांचे बालपण कसे गेले या संदर्भातील घटना जर आपण बघितल्या तर कालानुक्रमे त्यांच्या बालपणी काय घडले एवढी साधी माहिती मिळते असे नव्हे, तर त्यांच्या बालपणीच्या चरित्रातील तपशीलही महत्त्वाचा वाटतो.  याचे कारण, त्यांचे जे व्यक्तिमत्त्व घडले व भावी आयुष्यात त्यांच्या हातून जे कार्य घडले त्याच्याशी ह्या तपशिलाचा महत्त्वपूर्ण संबंध आहे असे खोलपणे पाहिले असता जाणवते.

विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म २३ एप्रिल १८७३ रोजी जमखंडी या हल्ली कर्नाटक राज्यात असलेल्या गावी झाला.  हे गाव विजापूरच्या पश्चिमेस ३६ मैलांवर आहे.  त्या काळी जमखंडी हे पटवर्धनांच्या अमलाखालील ५२४ चौ.मैल क्षेत्रफळ असलेले छोटेखानी संस्थान होते.१  कोण्णूरच्या देसायांच्या अमलाखाली काही काळ हा भाग होता.  पुढे गोपाळराव पटवर्धन सरदारांनी हा मुलूख आपल्या ताब्यात घेतला.  गोपाळराव पटवर्धनांनी रामचंद्रराव आप्पासाहेब यांना दत्तक घेतले.  १८५३ मध्ये राज्याच्या अधिकाराची सूत्रे हाती घेतल्यापासून सुमारे ५० वर्षे त्यांनी आपल्या संस्थानामध्ये लोकहिताच्या दृष्टीने राज्यकारभार केला.  विशेषतः प्रजाजनांना मोफत शिक्षण मिळण्याची सोय त्यांनी उपलब्ध केली.  वाचनालये काढण्यास उत्तेजन दिले.  पाश्चिमात्य सुधारणेचा चांगला भाग आपल्या संस्थानात आणला.  या ब्राह्मणी संस्थानामध्ये शिक्षणाला अनुकूल अशा प्रकारचे वातावरण होते.  

विठ्ठल रामजी शिंदे यांच्या पूर्वजांपैकी त्यांच्या आजोबांपासूनची निश्चित स्वरूपाची माहिती मिळू शकते.  त्यांच्या आजोबांचे वडील चंद्रोजीराव हे विजापूरपैकी सुरापूरचे जहागीदार असण्याची शक्यता स्वतः शिंदे यांनी नमूद केली आहे.  सौंदत्ती येथे बाराव्या शतकात शिंदे घराण्याचे राज्य होते.  त्या घराण्याशी सुरापूरच्या शिंदे घराण्याचा संबंध असण्याचा तर्क तेवढा करता येतो.  चंद्रोजीराव हे लढाईत मारले गेले व त्यांचे चिरंजीव, म्हणजे शिंदे यांचे आजोबा बसवंतराव हे जमखंडीस आप्पा दफ्तरदारांचा मळा करून स्वतंत्र राहू लागले.  त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्त्वाबद्दल व त्यांच्या हिकमती विनोदी स्वभावाबद्दल बालपणीच लहानग्या विठूला आदर आणि आकर्षण वाटत होते.  त्यांची छबी कशी दिसत होती याचे वर्णन करताना त्यांनी लिहिले आहे, ''ते फार पाणीदार व कर्तृत्ववान पुरुष होते.  शरीर सडपातळ, उंच, वर्ण चांगला गोरा, डोळे लाल, भुवया कोरलेल्या, अशी एकंदर उठावदार आकृती होती.  त्यांचा पोशाख अस्सल दरबारी मराठेशाहीचा होता.  तंगदार पांढरी विजार, घोळदार अंगरखा, पांढरी बिपिळाची बत्ती, मिशा झुपकेदार, शुभ्र, लांब व ताठ.  एकंदर रुबाब मनात भरण्यासारखा होता.  पुरुष हिकमती व विनोदी होता.''२  त्यांचे बोलणे चटकदार व विनोदी असायचे.  बसप्पा अथणी ह्या, आपल्या मुलाच्या वाणी मित्रावर त्यांनी विनोदी पद्य रचले होते.  बसवंतराव हे जमखंडीस मान्यतेने व सुखवस्तूपणे राहत होते.  ते लष्करी पेशाचे वाटत असत, पण त्यांनी धंदा शेतकीचाच केला.  लोक त्यांना सुभेदार म्हणत असत.  ह्यावरून त्यांनी लष्करात कोठेतरी सुभेदारी केली असावी असा तर्क विठ्ठल रामजी शिंदे यांनी केला आहे.  त्यांचा मृत्यू सुमारे १८७८-७९ मध्ये झाला.  विठ्ठल रामजींचे आजोबा बसवंतराव यांचा खानदानीपणा, स्वाभिमानाने राहणे व विनोदी स्वभाव हे गुण विठ्ठल रामजींच्यामध्ये उतरले असावेत असे म्हणावेसे वाटते.

शिंदे यांच्या आजीचे नाव संताबाई असे होते.  मुधोळच्या जवळ असलेले लिंगनूर नावाचे खेडे ही त्यांच्या आजीची जन्मभूमी.  शिंदे यांच्या घराण्याची कुलदेवता तुळजापूरची अंबाबाई.  येथील भोपे भाऊराव कदम हे त्यांचे आश्रित.  त्यांच्या वहीमध्ये विठ्ठल राजमींच्या आजोबांचे नाव बसवंतराव आणि आजीचे संताबाई आहे असे त्यांनी स्वतःच विठ्ठल रामजी शिंदे यांना सांगितले होते.  या कानडी मुलखात त्यांच्या आजोबांना बसप्पा व आजीला सत्यव्वा असे म्हणत.  त्यांच्या आजीचा स्वभाव करारी व काही प्रमाणात तामसी होता.  ती वर्णाने काळी, रूपाने राकट पण संसारात शहाणी, उद्योगी व कर्तृत्ववान बाई होती.  त्यांच्या आजीचे माहेर गरीब असावे.  म्हणून आजीचा भाऊ व्यंकप्पा हा आपल्या मुलासह बसवंतरावांच्याच घरी राहावयाला होता.  आजीची माहेरकडील कुलदेवता सौंदत्तीची यल्लमा होती.  आजी कष्टाळू व कर्तृत्ववान असल्याने शेतीवाडी, देवधर्म आणि घराचा कारभार आजोबांनी तिच्यावरच सोपविला होता.  शिंदे यांनी म्हटले आहे की त्यांच्या आजोबांत मराठ्यांची व आजीत कर्नाटक्यांची लक्षणे भरपूर दिसत होती.  आजी खेडवळ, राकट व कुणबाऊ, तर आजोबा नागरिक, दरबारी व गुलहौशी दिसत.  आजी सौंदत्तीच्या यल्लमाची भक्ति निष्ठापूर्वक करीत असे.  मार्गशीर्ष पौर्णिमेला दरवर्षी जमखंडी येथील पुढारी यल्लमाची मूर्ती सौंदत्तीला घेऊन जात व यात्रा संपल्यावर मिरवणूक काढून थाटाने मूर्ती देवळात आणीत असत.  शिंदे लिहितात, ''गोड खावयास व मौज पाहावयास मिळे, म्हणून मला लहानपणी यल्लमाच नव्हे तर आजीदेखील तेवढ्या वेळेपुरती फार आवडे.  धर्माचे पहिले संस्कार माझ्या कोमल मेंदूवर आजीच्या त्या द्राविडी देवतेने उठवले.  आठवण झाल्यावर मला ते अजून रमणीय वाटतात.''३  तुळजापूरची अंबाबाई व सौंदत्तीची यल्लमा याशिवाय कुंचनूरच्या महादेवाची ती यात्रा करीत असे.  शिवाय कर्नाटकातल्या चालीप्रमाणे ताईबाई ऊर्फ येळमक्कळ ताई (म्हणजे सात मुलांची माता) नावाच्या देवीची स्थापनाही करीत असे.  आजीमुळे द्राविड संस्कृतीचा आणि द्राविड देवतांचा परिचय लहानग्या विठ्ठलास झाला.  मोठपणी द्राविड संस्कृतीबद्दल अनुकूल ग्रह निर्माण व्हायला बालपणातील ह्या संस्काराची मदत झाली असणार.

आजोळ

विठ्ठल रामजींवर त्यांचे आजोबा व आजी ह्यांचे जसे काही एक संस्कार झाले, त्याचप्रमाणे त्यांच्या आईचे आई-वडील ह्या आजोळच्या माणसांचेही संस्कार झाले.  जमखंडीच्या पूर्वेस सहा मैलावर आलगूर म्हणून कृष्णाकाठी असलेले खेडेगाव हे शिंदे यांचे आजोळ.  त्यांच्या आईचे नाव यमुनाबाई.  तिच्या आईचे नाव गंगाबाई व वडिलांचे नाव कृष्णराव काळे असे हाते.  गुडघीच्या रोगाने त्यांचा एक पाय गुडघ्यात अगदी वाकडा झाला होता व तरुणपणीच ते कायमचे लंगडे झाले होते.  म्हणून या कानडी भाषिक प्रदेशात त्यांना कुंट कृष्णप्पा म्हणजे लंगडा कृष्णराव असे म्हणत.  बसवंतराव व संताबाई ह्या शिंदे यांच्या आजी-आजोबांच्या नेमकी विरोधात्मक वैशिष्ट्ये त्यांच्या आजोळच्या गंगाबाई व कृष्णराव ह्या आजी-आजोबांच्या जोडीमध्ये होती.  इकडे बसवंतराव मराठी व संताबाई कानडी, तर तिकडे गंगाबाई मराठी व कृष्णराव कानडी असे हे जोडपे होते.  कृष्णराव हे गुडघीच्या रोगाने वर्षभर अंथरुणावर खिळले होते.  तेव्हा गंगाबाईने त्यांची अतिशय प्रेमाने व श्रध्देने रात्रंदिवस शुश्रूषा केली.  आलगूरचे कुलकर्णी गोविंद आप्पा या वैष्णव ब्राह्मण कुटुंबाचा लोभ शिंदे यांच्या आजोळच्या घरावर असे.  शिंदे यांची आजी संताबाई ही जशी धार्मिक होती तशी आईची आई धार्मिक दिसत नव्हती, पण ती स्वतःच धर्माची मूर्ती होती.  गंगाबाईचा देव म्हणजे तिचा लंगडा नवरा.  आपल्या दोन आज्यांमधील फरक वर्णन करताना शिंदे म्हणतात, ''माझ्या बाबांची आई उघड्यात वाढलेली रानदांडगी बाई होती.  पण गंगाबाई सावलीतील तुळस होती.  ज्या कुलकर्ण्यांच्या घराचा आज्याला आश्रय होता ते घराणे वैष्णव ब्राह्मणाचे असून मोठे धार्मिक होते.  वैष्णव कर्मठ असावयाचेच.  विधी, संस्कार, उपवास, व्रते, गाणी न्हाणी, सौभाग्यलेणी इत्यादींची तेथे लयलूट होती.  ह्या सर्वांचा जन्मजात संस्कार माझ्या आईच्या हाडामासांत व रोमारोमांत शिरला होता.  ती एखाद्या वैष्णव ब्राह्मणीप्रमाणे दिसत होती.  पण माझी आजी अगदी साधी.  तिच्यात रूढ धर्माचा कसलाही वरपंग नव्हता.  इतकेच नव्हे तर तिच्यात धर्मभोळेपणाही नव्हता.  मग कर्मठपणाचे तर नावच नको.''४ आपल्या आजी व आईबद्दल शिंदे लिहितात, ''माझी आजी व तिची नमुनेदार मुलगी- माझी आई- ही दोन माणसे सार्‍या आलगूर गावाला पातिव्रत्याचा व हिंदू स्त्रियांच्या चांगुलपणाचा एक अनुपम नमुनाच वाटत होता.''५  जमखंडीची आजा-आजी वारल्यावर लवकरच सुमारे १८८२-८३ मध्ये आलगूरचे आजोबा कृष्णराव वारले व १९०१ च्या सुमारास त्यांच्या आईची आई गंगाबाई ही जमखंडीस विठ्ठल रामजी शिंदे यांच्या घरी वारली.  आलगुरातील त्यांचा एकुलता एक मामा रामजी हा मात्र दिवाळखोर, कर्जबाजारी निघाला.  त्याची एकुलती एक मुलगी मथुराबाई ही पोरकी होऊन जमखंडीस शिंदे यांच्या घरीच वाढली.  तिचे लग्न विठ्ठल रामजींचे धाकटे बंधू एकनाथराव यांच्याशी पुढे झाले.

जमखंडीस शिंदे यांच्या घराण्याचा लौकिक व प्रतिष्ठा मोठी असल्याने आलगुरास आजोळी त्यांचा मोठा मान ठेवला जात असे आणि ही मुलेही आलगुरास गेल्यानंतर तोर्‍यात वागत असत.  आम्ही शहरात राहणारे, शाळेत शिकणारे, मराठी बोलणारे, खाणे, पिणे, पोशाख यांची मिजास चालविणारे आणि सरकार-दरबारात वजन असलेल्या सुप्रसिद्ध व कडक बापाची मुले अशी अहंकाराची जाणीव त्या भावंडांमध्ये असे.  त्यांचे सर्व चोचले पुरविले जायचे म्हणून आजोळ आलगूर त्यांना फार आवडत असे.

विठ्ठल रामजींचे आजोबा बसवंतराव यांना दोनच अपत्ये होती.  वडील मुलगा रामजीबाबा आणि धाकटी मुलगी अंबाबाई.  रामजीबाबा यांचा जन्म अदमासे १८३५ चा.  वस्तुतः बसवंतरावांचा पेशा शेतकर्‍याचा असला तरी रामजीबाबा मात्र शेतकीकडे वळले नाहीत.  कोणा एका शास्त्रीबोवांच्याजवळ ते लिहावयाला व हिशेब ठेवायला शिकले.  ज्या आप्पा दफ्तरदारांचा मळा बसवंतराव करीत असत, त्यांच्या घरी रामजीबाबा सकाळीच फुले देण्यास जात असत व तेथे शिकणार्‍या दफ्तरदारांच्या मुलांमुळे त्यांनाही शिक्षणाची गोडी लागली असे विठ्ठल रामजींच्या भगिनी जनाबाई ह्यांनी आपल्या आठवणीमध्ये लिहून ठेवले आहे.६  एवढे खरे की, त्यांनी उत्तम प्रकारचे कारकुनी शिक्षण घेतले.  त्यांचे मोडी अक्षर इतके सुंदर होते की, त्या वेळच्या शिकणार्‍या मुलांना ते कित्ते घालून देत.  मुलकी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर संस्थानातील बिद्री या गावी त्यांना प्रथम शिक्षकाची नोकरी मिळाली.  नंतर संस्थानिकांनी त्यांना संस्थानी कारभारामध्ये बदलून घेतले.  जमाखर्चात जमखंडी दरबारात त्यांचा हात धरणारा कोणी नव्हता, अशी त्यांची ख्याती होती.

त्यांचे केवळ कारकुनी शिक्षणच झाले नव्हते तर धर्मशास्त्र, ज्योतिषशास्त्र, वैद्यकशास्त्र वगैरे तांत्रिक विषयाची बरीच माहिती त्यांना होती.  मराठी पोथ्यांचे त्यांचे वाचन चांगले झाले होते व पोथ्यांचा तसाच शास्त्रीय वाङ्‌मयाचा संग्रहही त्यांनी चांगला केला होता.  विठ्ठलाच्या लहानपणी त्यांच्या घरी एक शास्त्री पुराण सांगायला येत असत.  यावरून गुणी माणसांची संभावना करून खानदानी लौकिक राखण्याची रामजीबाबांची प्रवृत्ती दिसून येते. त्यांच्या राहणीचे वळण ब्राह्मणी होते.  त्यांच्या पोशाखाची पद्धतीही ब्राह्मणी असे.  आजोबांप्रमाणे त्यांचा मराठेशाही वळणाचा पोशाख नसायचा.  त्या वेळच्या रूढीप्रमाणे ते ब्राह्मणासारखे दहा हात लांब धोतर नेसत असत.  त्यांचा अंगरखा मात्र मराठा बाण्याचा असे.  सर्व जातीतील संभावित माणसांचा त्यांना स्नेह होता.

विठ्ठल रामजींच्या भगिनी जनाबाई ह्यांनी आपल्या आठवणीमध्ये एक गोष्ट मोठ्या अभिमानाने नमूद केलेली आहे.  ती म्हणजे जमखंडीत पहिल्या प्रथम मुलींची शाळा स्थापन करण्यात पुढाकार घेतला तो त्यांच्या वडिलांनी म्हणजे रामजीबाबांनी.  रामजीबाबांचा स्पष्टवक्तेपणा, निर्लोभीपणा व खानदानीपणा यामुळे जमखंडी गावामध्ये लोक त्यांच्याकडे आदराने पाहत असत.  संस्थानिक श्रीमंत आप्पासाहेब हे त्यांचे बालमित्रच होते.  कारण त्यांच्या बालपणीचे मित्र आप्पा यादवाडकर यांनाच गोपाळराव पटवर्धनांनी दत्तक घेतले होते व तेच पुढे संस्थानचे अधिपती झाले होते.  रामजीबाबांनी श्रीमंतांचे मन ह्या शाळेच्या स्थापनेसाठी वळविले.  ही शाळा इ.स. १८७० च्या सुमारास स्थापन झाली असावी.  शाळा स्थापन झाल्यावर श्रीमंतांच्या आप्‍तांपैकी रास्ते वगैरेंच्या मुलींनाही शाळेमध्ये पाठविण्यात येऊ लागले.  संस्थानचे अधिपती एकंदरीतच शिक्षणप्रसाराला अनुकूल होते.  परंतु तो काळच असा होता की, मुलींना शाळेमध्ये पाठविण्याची मानसिक तयारी मुलींच्या आईबापांची नसे.  ब्राह्मणेतरांची तर बात सोडाच, ब्राह्मणांच्या मुलींनादेखील शाळेत पाठविण्याची फारशी तयारी नसायची.  मुलींना शाळेत पाठविण्यासाठी पालकांचे मन वळवावे लागत असे.  रामजीबाबांनी हे काम आपल्या अंगावर घेतले.  शाळेतील पटावर मुलींची संख्या फार तर सतरा-अठारा असावयाची.  ब्राह्मणांच्या सात-आठ मुली, मराठ्यांच्या तीन-चार, मुसलमानांच्या दोन-तीन, साळी, माळी, वडार अशा मुलींचा भरणा केवळ रामजीबाबांच्या मोहबतीखातरच त्यांच्या पालकांनी केला असणार.  त्या काळाला अनुसरून अस्पृश्यांच्या मुलींकरिता निराळे बसण्याची सोय केली होती.  परंतु त्या क्वचितच येत असल्याचे भगिनी जनाबाई यांनी नमूद केले आहे.  मुलींची शाळेतील हजेरी पाच-सहा एवढीच असावयाची.७

रामजीबाबांचा स्वभाव फार बोलका होता.  ते आपल्या मित्राजवळ बोलत बसले म्हणजे लहानग्या विठूला ऐकण्याची फार मोठी मौज वाटत असे.  अशा वेळी बाबांचे भाषण ऐकावयास मिळावे म्हणून ते जवळपास घुटमळत असायचे.  मराठी, कानडी व मुसलमानी ते सफाईदारपणे बोलत व ऐकणार्‍यावर त्याचा प्रभाव पडत असे.  त्यांच्या बोलण्यात म्हणी फार असत.  विठ्ठल रामजी शिंदे यांनी म्हटले आहे, ''मला वाटते माझे अंगी जर काही वक्तृत्व आले असेल तर त्याचे प्रथम बीजारोपण बाबांच्या अकृत्रिम, साध्या व जोमदार रसवंतीने केले असावे.''८

रामजीबाबा फार रागीट स्वभावाचे होते.  ''श्रीमंतांशी भांडून, सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन जेव्हा ते घरी बसले, तेव्हा त्यांनी काही प्रकरणी स्वतःची तसलमात २५८९/- रुपये (पंचवीसशे एकोणनव्वद) सरकारात खर्ची घातले होते.  तेही त्यांनी १५-१६ वर्षे मागितले नाहीत.  त्यांच्या घराला भयंकर दारिद्र्य आले असता तसलमात परत मागण्याच्या याद्या केल्या खर्‍या परंतु त्यांपैकी श्रीमंत आप्पासाहेबांकडून एक कवडीही परत मिळाली नाही.''९

तरुणपणी रामजीबाबांच्या हातात पैसा खेळत असे त्या वेळी त्यांनी ऐषआराम केला.  पण नंतर त्यांचा धर्माकडे स्वाभाविक असलेला ओढा बळावला.  पंढरपूरच्या वारकरी संप्रदायाबद्दल त्यांच्या मनात अनन्यश्रद्धा निर्माण झाली.  जमखंडीस पंढरपूरचा भजनी संप्रदाय वाढविण्याच्या कामी रामजीबाबांचा पुढाकार होता.  विठोबाचा सप्‍ताह करण्यातही त्यांचाच पुढाकार असे.  फाल्गुन वद्य द्वितीयेपासून म्हणजे तुकारामबीजेपासून षष्ठीअखेर हा सप्‍ताह विठोबाच्या मठात साजरा केला जात असे.  आरती धरण्याचा मान रामजीबाबांचा असे.  विठ्ठल रामजींनी आपल्या धार्मिक विकासात या सप्‍ताहाच्या सोहळ्याचा मोठा परिणाम झाल्याचे नमूद केले आहे.

रामजीबाबांनी आपले घराणे स्वतःच्या कर्तृत्वावर वर उचलले होते खरे, परंतु त्यांचे घर दुर्दैवाच्या फेर्‍यात सापडले.  १८७३ च्या सुमारास जमखंडीच्या यजमानांशी भांडून ते आपण होऊनच घरी बसले.  यजमानांनी दोन-तीनदा बोलाविले तरी ते गेले नाहीत.  सुमारे सोळा वर्षे त्यांनी कोणत्याही नोकरीधंद्याशिवाय काढली.  ह्या काळात देवधर्माचे कर्मकांड फार वाढले होते.  बाबलादीच्या लिंगायत स्वामींचे त्यांच्या घरी येणे-जाणे वाढले.  बाबलादीचे स्वामी एक प्रसिद्ध सिद्ध गणले जात.  ते उघडपणे दारू पीत आणि मांसही खात हे सारे धर्माच्या नावावर उघड चालत असे.  रामजीबाबांच्या घरी आठराविश्वे दारिद्र्य असूनही ही टोळधाड आठ-आठ दिवस त्यांच्याकडे उतरत असे.  ह्यांच्यावर खर्च करण्यासाठी कर्जाचा भार मात्र वाटतस असे.  अंबाबाई, यल्लमा, विठोबा, दत्तात्रय, महालक्ष्मी ह्या प्रसिद्ध दैवतांचे संप्रदाय तर असतच, पण त्याशिवाय बबलादीचे स्वामी, रामदासी पंथ, गोसावी, बैरागी, अतिथी, अभ्यागत वगैरे अनेक खुळांचा सुळसुळाट त्यांच्या घरी सदैव चाललेला असे.  मिळकत मुळीच नाही.  उलट खर्चाचा घरबंद राहिला नाही.  ह्याचा परिणाम म्हणून शेते गेली, गुले गेली, घर गेले, दागिने गेले.  सर्व सावकाराच्या हाती गेले आणि एके दिवशी आपला मोठा वडिलोपार्जित वाडा सोडून भाड्याच्या घरात जाऊन राहावे लागले.  याही परिस्थितीत भयंकर दारिद्र्यात घराचा डोलारा सांभाळून सार्‍यांचे जिणे शक्य व सुसह्म करण्याचे श्रेय विठ्ठल रामजींची आई यमुनाबाई ह्या साध्वीकडे जाते.  शिंदे यांनी म्हटले आहे, ''या सर्व करुणरसाने भरलेल्या नाटकात मुख्य नायिकेचे पात्र माझी आई साध्वी यमुनाबाई ही होय.''१०

विठ्ठल रामजींच्या आईचा जन्म अदमासे १८४० मध्ये झाला.  लग्नाच्या वेळी रामजीबाबा बारा वर्षांचे तर यमुनाबाई सुमारे सात वर्षांची असणार.  तिला लिहिता-वाचता येणे शक्य नसले तरी वैष्णव ब्राह्मणाचे वळण, सात्त्विक राहणी, शाकाहार, घरकामात कष्टाळूपणा व हुशारी हे गुण तिच्या ठायी होते.  ह्या दोन्ही घराण्याचे वळण ब्राह्मणी होते.  विठ्ठल रामजी शिंदे यांच्या आईची कानडी भाषा शुद्ध वैष्णव ब्राह्मणांची तर त्यांच्या बाबांची मराठी भाषा शुद्ध देशस्थ ब्राह्मणाची.  पेहराव सवयी ह्याही ब्राह्मणी वळणाच्या.  गोपी-कृष्णावरची कितीतरी सुंदर सुंदर कानडी गाणी व पुरंदर विठ्ठलाची भजने म्हणून आई लहान मुलांना पाळण्यात निजवीत असे.  तिचा गळा फार गोड व म्हणण्यात स्वाभाविकपणेच करुणरसाचा उठाव असे.  शिंदे यांनी नमूद केले आहे की, ''मोठेपणीही ही गाणी ऐकवून व गोपीकृष्णाच्या गोष्टी सांगून ती आम्हा भावंडांच्या दारिद्र्याच्या कठीण वेदना हळुवार करीत असे.  व्रते, उपवास व इतर गृहकृत्ये ब्राह्मणांप्रमाणे करण्याला आई आलगुरात लग्नापूर्वीच शिकली असावी.''  केवळ सांपत्तिकदृष्ट्या पाहता रामजीबाबा हे आपल्या वडिलांपेक्षाही अधिक संभावित व श्रीमंत स्थितीला पोहोचले होते पण पुढे चित्र पालटले.  १८७३ पासून, म्हणजे विठ्ठलाच्या जन्मापासून, पुढची पंधरा-सोळा वर्षे ते जमखंडीच्या यजमानांशी भांडून घरी बसले.  पुढे गांजेकस साधू-बैराग्यांच्या कोंडाळ्यात अडकले.  त्यांनाही नशापाणी करण्याचा नाद लागला.  नोकरी गेल्याने मिळकत थांबली.  उघडपणे मांसाहार करणार्‍या व दारू पिणार्‍या बाबलादीच्या लिंगायत साधूच्या भजनीही ते काही काळ लागले.  ह्या सर्व प्रकारांमुळे रामजीबाबांकडून आपल्या घराची धुळधाण झाली.  मुले अन्नालाही महाग झाली.  शिंदे लिहितात, ''आईची जोड व एक प्रकारचा निर्बंध नसता, तर बाबा आम्हाला कोणावर तरी टाकून बैरागी होऊनही गेले असते.  म्हणून आम्ही सर्वस्वी आईचे ॠणी आहोत.''  शिंदे यांनी आपल्या आईच्या अंगी ही दैवी पात्रता येण्याची तीन कारणे नमुद केली आहे. ''एक, माहेरच्या दारिद्र्यामुळे व बाप लंगडा व आई कर्तृत्वहीन असल्यामुळे त्यांच्या आईचे झालेले हाल, दुसरे वैष्णव ब्राह्मणाचे लागलेले वळण आणि तिसरे, तिला झालेला कठीण सासुरवास.  तिसरा जो सासुरवास त्याच्या गोष्टी आईने आमच्या लहानपणी उठता-बसता सांगितल्या.  त्या ऐकून कोवळे हृदय करपत होते.''११  विठ्ठल रामजींची आजी म्हणजेच आईची सासू संताबाई ही स्वभावाने खाष्ट, हेकट व सहानुभूतिशून्य आणि पक्षपाती होती.  गरिबीमुळे आईची नणंद अंबाबाई हीही रामजीबाबांच्या घरीच येऊन राहिली होती.  घरचा रयतावा मोठा, आठ बैल तर असतच शिवाय गाई, म्हशी व वासरांचे खिल्लार.  घरकामाचा बोजा त्यांच्या आईवरच पडे.  नणंद होती तिचा उपयोग चहाड्या सांगण्यापुरताच.  घरातील पंधरा-वीस माणसे आणि शिवाय अतिथी, बैरागी, पाहुणे यांचा नेहमी राबता. सकाळी चार वाजल्यापासून दळणाची घरघर सात वाजेपर्यंत चाले.  मग विहिरीतून पाणी आणणे, स्वयंपाक, भांडी, धुणे, जेवण झाल्याबरोबर सूत कातणे.  मग इतक्या बैलांच्या शेणाच्या गोवर्‍या करणे. शिवाय रात्रीचा स्वयंपाक.  या कामात भर म्हणजे सासूच्या छळाची.  सासूच्या ठिकाणी सुनेचे कौतुक करणे तर सोडाच पण माणुसकीने वागविण्याची वृत्ती नसायची.  त्यांच्या आईला एकंदर वीस मुले झाली.  परंतु एकाच वेळी पाचाहून जास्त कधीच नव्हती.  म्हणजे पंधरा मुलांचा शोक त्यांच्या आईला करावा लागला.  आजा-आजी असेतोपर्यंत म्हणजे १८८० पर्यंत त्यांच्या आईला स्वातंत्र्य म्हणजे काय ते माहीत नव्हते.  परंतु आजी गेल्यावर लवकरच घरची सुबत्ताही गेली.  स्वातंत्र्य मिळते न मिळते तोच अठराविश्वे दारिद्र्याने तिला गाठले.  विठ्ठल रामजी म्हणजे आईचा पाचवा मुलगा, सातवी मुलगी जनाक्का ही घरातील पहिलीच मुलगी.  म्हणून ती सगळ्यांची लाडकी होती.  विठ्ठल रामजींचा मोठा भाऊ १८८५ साली पावसाळ्यात पटकीने वारला.  त्यांची राहती जागा ही आरोग्याला अत्यंत प्रतिकूल कशी होती ह्याचे बारीक तपशिलाने वर्णन केल्यानंतर शिंदे लिहितात, ''अशा स्थितीत इतकी मुले लहानपणीच वारली हे आश्चर्य नसून आम्ही पाच-सातजण कसे वाचलो हेच आश्चर्य होय.''१२

दर दुसर्‍या वर्षी विठ्ठल रामजींच्या आईचे बाळंतपण ठरलेले असे आणि त्या वेळी मागले मूल काहीं जिवंत नसे.  बाळंतपण, मुलांचा आजार किंवा मृत्यू या खाली त्यांच्या आईची सर्व शक्ती खचली.  पण मुलांचा कंटाळा किंवा संसाराचा तिटकारा, किंबहुना दुःखाचा किंवा निराशेचा एक उद्‍गारही कधी त्यांच्या आईच्या तोंडातून मुलांच्या कानावर आला नाही.  आपल्या आईबद्दल शिंदे लिहितात, ''दारिद्र्याच्या असह्य वेदना, नवर्‍याचा रागीट स्वभाव व मुलांचा जोजार सोसूनही आम्हा लहानग्यांना नेहमी आपल्या माहेरच्या सुखदुःखाच्या गोष्टी रसिकपणाने सांगून आई आमची गोड करमणूक करीत असे.  आईच्या गोष्टी व गाणी हाच आमचा मोठा मेवा होता.  तिची आनंदी आणि विनोदी वृत्ती हीच आमची विश्रांती होती.  तिच्या गोष्टींची आम्हाला पुढे पुढे चटक लागली.  इतकी की, जर भूक लागली असली, स्वयंपाकाला अवकाश असला, किंबहुना भाकरीबरोबर खावयास चांगली भाजी नसली, तर आम्ही आईच्या काठवटीभोवती जमून तिला गोष्टी सांगण्यास लावीत असू.  मग तिने आम्हास अशा प्रेमळ कहाणीत गुंतवावे की, स्वयंपाक केव्हा झाला, आम्ही काही खाल्ले की मुळीच काही खाल्ले नाही याचे आम्हास भान राहात नसे.  बाबा एखाद्या वेळी रात्री उशिरा आले की, आमच्या गोष्टींची मेजवानी लांबे !  केव्हा केव्हा आम्ही वन्समोअरही म्हणत असून !  एकंदर आईच आमची खेळगडी होती.''१३  अत्यंत दारिद्र्याच्या प्रतिकूल परिस्थितीत स्वतःची आत्मसंतुष्ट वृत्ती टिकवून मुलांच्याही ठिकाणी जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती निर्माण करण्याची थोरवी विठ्ठल रामजींच्या आईच्या ठिकाणी होती.  कितीही त्रास असो व कसलाही प्रसंग येवो, बाबा घरी असोत-नसोत आई आम्हा चौघा पिलांस एखाद्या पक्षिणीप्रमाणे पंखाखाली घेऊन आनंदाने बसे व आम्हालाही तिच्या पंखाशिवाय दुसरा आसरा नको असे.  विठ्ठल रामजींचे आजा-आजी असेतोपर्यंत ज्या वाड्यात मोठ्या दणक्याने रयतावा चालत असे तेथे त्यांच्या मागे थोड्याच वर्षांत सर्व वैभव होरपळून रानात शेत नाही, गोठ्यात गुरे नाहीत, घरात माणसे नाहीत अशी ओसाड स्थिती झाली, तरी बाबांना संसाराची काळजी म्हणून कसली ती लागली नाही किंवा आईच्या स्वभावात कडूपणाची छटा कधी दिसून आली नाही.  आईबापाच्या ह्या संतोषी वृत्तीचे संस्कार विठ्ठल रामजींच्या मनावर झाले.  दारिद्र्याच्या ह्या अत्यंत वेदनादायक काळात विठ्ठल रामजींना आणि त्यांच्या भावंडांना कुणी तारले असेल व सुसंस्कारित केले असेल तर ते त्यांच्या आईने.  तिच्या सासूचा स्वभाव कडक आणि सहानुभूतिशून्य असल्यामुळे यमुनाबाईंना कठोर सासुरवास सोसावा लागला.  शिंदे सांगतात, ''आपण भोगलेल्या त्रासाचे मासले ती आम्हास बालपणी सांगू लागली, म्हणजे आमच्या कोमल अंतःकरणाला घरेच पडत.''  विठ्ठल रामजी असेही नमूद करतात की, ''माझ्याकडे पुढे पुढे जे स्त्री-दाक्षिण्य आणि हिंदू विवाहपद्धतीसंबंधी कायमची तेढ उत्पन्न झाली, तिचे पहिले बीज ह्या आईच्या खडतर सासुरवासातच आहे.''१४ निसर्गाच्याही आधी आपण पहिले हृदयदान दिले ते आईला असे ते म्हणतात.  एकंदरीतच स्त्रीवर्गाबद्दल त्यांच्या मनामध्ये अतीव आदराची जी भावना निर्माण झाली होती तिचा उद्‍गम त्यांच्या मातृप्रेमातच आहे.  त्यांच्या मातोश्रींच्या आद्य श्राद्धानिमित्त स्त्रीची अनेक अंगांनी महती वर्णन केलेली आहे.  स्त्रीच्या ठिकाणी अपूर्व शक्ती आहे.  ती म्हणजे तिची सहनशीलता.  ''ह्या सहनशीलतेच्या द्वारे स्त्री पती, पुत्र आणि पिता ह्या तिघांची आज्ञा पाळते.  इतकेच नव्हे तर ती त्यांचे लळेही पाळिते.  वरवर पाहणार्‍यास ती पती आणि पिता ह्यांची आज्ञा पाळते असे दिसेल, पण खोल पाहिल्यास ती त्यांचे लळे पाळिते असे दिसेल.''१५  स्त्रीच्या थोरवीचे विठ्ठल रामजी शिंदे यांनी अशा प्रकारे आकलन केलेले दिसते.  स्त्रीची थोरवी केवळ माता ह्या नात्यापुरती मर्यादित नाही.  पती, पिता, पुत्रादिकांचे ती सर्वच काळी अपराध सहन करते.  शुश्रूषा करते आणि लाड पुरविते.  म्हणून ती सर्वांची सारखीच माता म्हणावयाची.  तर आपण केवळ 'मातृदेवोभव' असे न म्हणता 'स्त्रीदेवोभव' असे म्हटले पाहिजे, असे ते सांगतात.  त्यांना स्त्रीची मती जी जाणवली ती आपल्या आईमुळेच.  म्हणून विठ्ठल रामजी शिंदे यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या घडणीत त्यांच्या आईचा फार मोठा वाटा आहे.  समग्र स्त्रीजातीबद्दल त्यांच्या मनात जी अपरंपार करुणा व कोवळीक भरून राहिलेली जाणवते तिचा उगम त्यांच्या आईबद्दल निर्माण झालेल्या आदराच्या, भक्तीच्या भावनेत आहे असे म्हणता येते.

संदर्भ
१.  रा. द. रानडे इ. (संपा), जमखंडी येथील परशुरामभाऊ हायस्कूलचा सुवर्ण महोत्सव स्मारक ग्रंथ, चिटणीस, सुवर्ण महोत्सव स्मारक ग्रंथ मंडळ, जमखंडी, १९३८, पृ. २६०.
२.  विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. २.
३.  तत्रैव, पृ. ७-८.
४.  तत्रैव, पृ. १३.
५.  तत्रैव, पृ. ११.
६.  जनाबाई शिंदे, 'स्मृतिचित्रे', साप्‍ताहिक.  तरुण महाराष्ट्र, पुणे, ७.१.१९४९.
७.  तत्रैव, ७.१.१९४९.
८.  विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. १७.
९.  तत्रैव, पृ. १६.
१०. तत्रैव, पृ. १८.
११. तत्रैव, पृ. २०-२१
१२. तत्रैव, पृ. २४.
१३. तत्रैव, पृ. २४.
१४. तत्रैव, पृ. ११.
१५. विठ्ठल रामजी शिंदे, धर्म, जीवन व तत्त्वज्ञान, (संपा.) मा. प. मंगुडकर, इ., समाज कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई, १९७९, पृ. ३९१.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य

   निवेदन
    लेखकाचे मनोगत
    दुस-या व तिस-या आवृत्तीच्या निमित्ताने
    प्रस्तावना 
 -   अंत:प्रेरणेचा निर्णय
 -   आजी-आजोबा आणि आई-वडिल
 -   बालपण 
 -   कॉलेजची पहिली दोन वर्षं
 -   जनाबाईंची संसारकथा
 -   जनाबाईंचे शिक्षण
 -   हुजूरपागा शाळा आणि शांता सुखटणकरची
     करुण कहाणी
-    इंटरमीजिएटचे दुसरे वर्ष
 -    पदवी परीक्षेचा अभ्यास आणि एकोणिसाव्या
      शतकाच्या अखेरचे पुणे
   प्रार्थनासमाजाची दीक्षा 
 -    पदवी परीक्षा
 -   अंत:स्थ भावजीवनातील खळबळ 
 -    एकेश्वरी उदार धर्मपंथ
 -    प्रार्थनासमाज
 -    धर्मशिक्षणासाठी निवड आणि परदेशगमन
 -    मुंबई ते ऑक्सफर्ड
 -     मॅंचेस्टर कॉलेज
 -    ऑक्सफर्डमधील पहिले दोन महिने
 -    नाताळची सुट्टी : मुक्काम लंडन 
 -    पत्रांचा विरंगुळा
 -    दक्षिण किना-यावरील पंधरवडा
 -    प्रोफेसरांच्या कुटुंबात सरोवर प्रांती
 -    एडिंबरो आणि स्कॉच सरोवरे
 -    हिंदू गृहस्थिती आणि समाजस्थिती 
      व्याख्यान व नाट्यप्रयोग 
 -    पारीस येथील एक महिना
 -   लिव्हरपूल येथील त्रैवार्षिक युनिटेरियन परिषद
 -    ऑक्सफर्डमधील शेवटची टर्म
 -    ऍमस्टरडॅम येथील आंतराष्ट्रीय उदार धर्मपरिषद
 -    परतीचा प्रवास
 -    स्वदेशी आगमन, बडोदा भेट आणि
      धर्मप्रचारकार्याला प्रारंभ
 -    मद्रासच्या परिषदा आणि हिंदुस्थानचा दौरा
-    जमखंडी-मुधोळ येथील प्रचारकार्य
 -    काठेवाडचा दौरा 
 -    मुंबईतील बि-हाड आणि प्रार्थनासमाजातील नवचैतन्य
 -    धर्मप्रचाराचे विस्तारित कार्य
 -    कौटुंबिक अडचणी, पुणे प्रार्थनासमाजातील नवचैतन्य
 -    धर्मप्रचारार्थ दौरा
 -    प्रवासातील अनुभव
 -    जनाबाई पनवेलमध्ये शिक्षिका
 -    विविध प्रार्थनासमाजांतील सहभाग
 -    भारतीय एकेश्वरी धर्मपरिषद
 -    ब्राह्मधर्मसूची ग्रंथ
 -    अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीविषयक कार्याचे प्रारंभिक प्रयत्न
 -    मिशनच्या स्थापनेचा संकल्प
 -    मिशनची स्थापना
 -  मिशनची घटना व पुणे येथील अंगभूत शाखा
 -    मिशनमधील दोन समारंभ 
 -    मिशनच्या स्थापनेनंतर वातावरणातील बदल
 -    निधीची योजना
 -    मुंबई प्रार्थनासमाजाशी दुरावा आणि फारकत
 -    पुण्यास स्थलांतर
 -    मिशनची महाराष्ट्र परिषद
 -    तुकोजीराव महाराजांची देणगी व मांगांचे
      शेतकी खेडे वसविण्याचा प्रयत्न
 -   अहल्याश्रमाची पूर्वतयारी 
 -    मराठ्यांची सांस्कृतिक जबाबदारी 
 -    काँग्रेसमध्ये अस्पृश्यतानिवारणाचा ठराव
 -    अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीची दिशा व मार्ग
 -    अस्पृश्यतानिवारक परिषद
 -   राष्ट्रीय प्रवाहात मराठा समाज
 -    अस्पृश्यवर्गाचे कायदेमंडळात प्रतिनिधित्व
 -    गैरसमजाचा ससेमिरा 
 -    १९२० सालातील निवडणूक 
-    शिंदे आणि ब्राह्मणेतर पक्ष
 -    कुटुंबातील मृत्यू
 -    मुलींसाठी सक्तीचे शिक्षण
 -    मद्यपाननिषेधाची चळवळ व अन्य सामाजिक कार्य
 -    मिशनचा कार्यविस्तार : कर्नाटक-मध्यप्रांतातील शाखा 
 -    मिशनसंबंधी आक्षेप व समस्या
 -    मिशनची पुनर्घटना
 -    खटल्याचा दैवदुर्विलास
 -    मिशनमधील सहकारी व सहका-यांच्या
       दृष्टीतून विठ्ठल रामजी शिंदे
 -    मंगलोरमधील कार्य
 -   व्हायकोम सत्याग्रह
 -    मंगलोर ब्राह्मसमाजातील पेचप्रसंग
 -    कौटुंबिक उपासनामंडळ
 -    सत्याग्रहात सहभाग आणि नेतृत्व
 -    अस्पृश्यतानिवारणाचे कार्य व म. गांधीशी संबंध
 -    येरवड्याच्या तुरुंगात
 -    ब्रह्मदेशाची यात्रा 
 -    शेतकरी चळवळ
 -    परिषदा, संमेलने यांमधील सहभाग
 -   कौटुंबिक वातावरण
 -    बहुमान, अवमान आणि निष्ठा
 -    वाई ब्राह्मसमाज आणि ग्रामीण भागातील धर्मकार्य
 -    विचारविश्व
 -    साहित्यसेवा आणि संशोधनकार्य
 -   अपूर्व स्नेहसंमेलन
 -   अखेरचे दिवस
 -   उपसंहार 
 -   परिशिष्टे १/२ आणि ३ 
 -   मनोगते
 -   महर्षी शिंदे यांचे फोटो व काही हस्तलिखिते