महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य

कॉलेजची पहिली दोन वर्षं

विठ्ठल रामजी शिंदे मॅट्रिक्युलेशनच्या परीक्षेला पुणे सेंटरला बसून १८९१ च्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पास झाले. ह्या वर्षी जमखंडीच्या हायस्कूलमधून पाच विद्यार्थी मॅट्रिकच्या परीक्षेस बसण्यास पाठविले होते. त्यांपैकी चार उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांत विठ्ठल रामजी शिंदे यांचा पहिला क्रमांक होता.

मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे काय करावे ही त्यांना विवंचना पडली. घरची आर्थिक स्थिती पाहता आपण नोकरी करावी असा त्यांनी विचार केला. नोकरी पाहण्यासाठी त्यांनी बेळगावात सुमारे सहा महीने काढले. परंतु नोकरीचे कोठे जमत नव्हते. त्या सुमारास जमखंडी हायस्कुलात शिक्षकाची जागा रिकामी झाली. हेडमास्तर श्री.त्रिंबकराव खांडेकर यांचे विठ्ठल रामजींबद्दल चांगला विद्यार्थी म्हणून अनुकूल मत झाले होतेच, त्यातून ते मॅट्रिकच्या परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. याचा स्वाभाविक परिणाम म्हणून श्री. खांडेकरांनी त्यांना जमखंडीस बोलावून घेतले आणि रिकाम्या झालेल्या शिक्षकाच्या जागेवर त्यांची नेमणूक केली. हायस्कुलच्या सन १८८८ सालापासून नेमल्या गेलेल्या शिक्षकवर्गात २९व्या क्रमांकावर त्यांची ‘विठू रामा शिंदे, असिस्टंट मास्तर’ अशी नोंद केलेली पहावयास मिळते.१ हायस्कुलमध्ये नविन वाङ्मय, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र इत्यादी शास्त्रविषयांच्या अभ्यासामुळे त्यांच्या ठिकाणी बुद्धिवादाचा प्रादुर्भाव झाला होता. शिक्षक असताना आगरकरांचा सुधारक त्यांच्या हाती पडू लागला. त्यामुळे त्यांच्या ठायी निर्माण झालेल्या बुद्धिवादी विचाराला चालना मिळु लागली. मात्रा हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून दीर्घकाळ काम करण्याचा त्यांच्याबाबतीत योग नव्हता. इंग्रजी दुस-या इयत्तेवर दोन-तीन महिने त्यांनी काम केले नाही तोच जमखंडीकर सरकार रामचंद्रराव आप्पासाहेब यांनी त्यांना रामतीर्थास राजवाड्यावर बोलावून नेले व मुंबईस व्हेटरनरी कॉलेजमध्ये पंधरा रुपयांची स्कॉलरशिप देऊन पाठवितो, असे सांगितले. घरच्या वातावरणाचे संस्कार, वाङ्मय व शास्त्र यांच्या अभ्यासामुळे त्यांच्यात निर्माण झालेला सुसंस्कृतपणा यांमुळे त्यांच्या ठिकाणी उच्चतर आकांक्षा निर्माण होणे स्वाभाविक होते. सरकारची सूचना त्यांना अर्थातच पसंत पडली नाही. त्यांनी उत्तर दिले की, “मला जनावरांचा डॉक्टर व्हावयाचे नाही. आर्टस् कॉलेजमध्ये स्कॉलरशिप दिल्यास जावयास तयार आहे.” विठ्ठल रामजींच्या उत्तरामुळे जमखंडीकर सरकारांना राग येऊन त्यांना ताबडतोब नोकरीवरून काढुन टाकले आणी दिपवाळीचा पगारही दिला नाही.२ हायस्कुलातील शिक्षकी पेशाची अशा त-हेने समाप्ती झाली.

पुढे काय करावे अशा विवंचनेत ते असतानाच त्यांच्या शिक्षणाला पुढची दिशा मिळाली. त्यांचे सहाव्या इयत्तेतील शिक्षक श्री. वासुदेवराव चिरमुले ह्यांनी त्यांना सांगितले की, पुणे येथे गरीब मराठा विद्यार्थ्याला उच्च शिक्षणाच्या बाबतीत मदत करणारी एक संस्था आहे. विठ्ठल रामजी शिंदे यांच्या ठिकाणी नवे निर्णय घेणे व निर्धाराने अमलात आणणे ह्याची क्षमता दांडगी होती. ह्याचा पडताळा त्यांच्या पुढील आयुष्यक्रमात दिसून येतोच. यावेळी त्यांनी धाडशी निर्णय घेतला. घरची अत्यंत गरिबी. कुणाच्या ओळखीपाळखीचा आधार नाही. अशा स्थितीत ते पुण्यासारख्या विस्तीर्ण शहरात येऊन पोहोचले. फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश मिळविण्याचा त्यांचा इरादा होता. मात्र पैशाची सोय अगदीच नव्हती. पुण्यात आल्यानंतर १८९३ मध्येच कोल्हापुरचे श्री. गोविंदराव सासने यांची व विठ्ठलरावांची ओळख झाली. त्यांच्या खोलीतच प्रारंभी पहिल्या टर्ममध्ये विठ्ठलराव राहीले. मात्र कॉलेजची फी आणि खानावळीचा खर्च कसा भागवावा ही काळजी होती. श्री. खांडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन’ ह्या संस्थेचे संस्थापक व सेक्रेटरी श्री. गंगाराम भाऊ म्हस्के यांची भेट घेण्याचे त्यांनी ठरवले.

श्री. गंगाराम भाऊ म्हस्के हे मराठा जातीचे सुधारकी बाण्याचे पुढारी व हुशार वकील अशी त्यांची त्या काळी प्रसिद्धी होती. रानडे, भांडारकर यांच्याप्रमाणे त्या काळच्या सुधारक पक्षात त्यांना चांगली मान्यता होती. मराठा संस्थानिक, राजे व इतर जातींचे प्रागतिक शिक्षणप्रेमी श्रीमंत गृहस्थ त्यांना मानीत होते. ह्या धनिकांकडून मदत घेऊन त्यांनी व राजन्ना लिंगो नावाच्या वकिलांनी गरीब मराठा होतकरू विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या हेतूने ‘डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन’ ही संस्था काढली होती.

पुणे लष्करात मेन स्ट्रीटवर असलेल्या त्यांच्या टोलेजंग घरामध्ये विठ्ठलराव त्यांना भेटण्यासाठी गेले. पाश्चात्त्य धर्तीवर सजवलेल्या त्यांच्या घरातील वातावरण सुधारकी थाटाचे होते व म्हस्के साहेबांची राहणी व वर्तन पाश्चात्त्य धर्तीचे व सुधारकी वळणाचे होते. विठ्ठलरावांना त्यांनी खुर्चीवर जवळ बसावयास सांगून सर्व भाषण इंग्रजीत केले. दहा रुपयांची स्कॉलरशिप देणे शक्य आहे असे त्यांनी सांगितले. कॉलेजात जाण्याची कशीबशी सोय होईल अशी आशा उत्पन्न झाली. पण ह्या पलीकडे राहण्याची कींवा अभ्यासाची दुसरी कसलीही सोय म्हस्केसाहेबांनी केली नाही. किंवा कळकळ दाखविली नाही. एखाद्या युरोपियन सभ्य गृहस्थाचे वर्तन ज्याप्रमाणे एकाद्या नेटिव्ह माणसाशी बेताचेच असते तशी त्यांची वागण्याची ढब विठ्ठलरावांना जाणवली. एकंदरीत म्हस्केसाहेबांनी आपल्याला बरे वागविले व साहाय्य केले याबद्दल विठ्ठलरावांना त्यांच्याबद्दल कृतज्ञता वाटली.

म्हस्केसाहेबांनी देऊ केलेल्या स्कॉलरशिपमुळे विठ्ठलराव फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ शकले. फर्ग्युसन कॉलेज त्या वेळी पुणे शहरात शनिवार पेठेतील गद्रे ह्यांच्या विस्तीर्ण जुन्या वाड्यात होते. डेक्कन कॉलेजसारख्या भारी खर्चाच्या संस्थेत तुटपुंज्या स्कॉलरशिपच्या आधारावर जाण्याचा विचारही करणे त्यांना शक्य नव्हते. १८८५ मध्ये फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाल्यामुळे त्यांच्यासारख्या गरीब विद्यार्थ्यांची सोय होत होती. फर्ग्युसन कॉलेजचे प्रिन्सिपॉल, संस्कृत कोशकार वामन शिवराम आपटे हे नुकतेच वारल्याने त्यांच्या जागी प्रसिद्ध सुधारक श्री.गोपाळ गणेश आगरकर  यांची नेमणूक झाली होती. ते गावात न राहता हल्ली असलेल्या कॉलेजच्या इमारतीच्या जागेवर एक झोपडी बांधून राहत होते. आजूबाजूला अगदी वस्ती नव्हती. ‘डेक्कन मराठा असोसिएशन’च्या दरमहा दहा रुपयांच्या स्कॉलरशिपमध्ये एकंदर खर्च भागणे कठीण होते. कारण कॉलेजची फीच दरमहा पाच होती. म्हणून कॉलेजची फी माफ करण्याबद्दल विठ्ठलराव एक अर्ज घेऊन प्रिन्सिपॉल आगरकर यांना भेटावयास गेले.

श्री. गंगाराम भाऊ म्हस्के यांना भेटल्यानंतर पुणेरी सुधारक कसा असतो ह्याचे जे चित्र त्यांच्या मनावर उमटले होते त्याच्याशी आगरकरांचे दर्शन मात्र जुळणारे नव्हते. हिवाळयाच्या दिवसांतील सकाळी नऊची वेळ. आगरकर कायमचे दमेकरी. ते झोपडीच्या बाहेर अंगणात उभे होते. अंगामध्ये बराचसा फाटलेला काळा मळकट कोट, चित्पावनी थाटाचे नेसलेले धोतर, लहानशा शेंडीचे थोडेसे विखुरलेले केस, भिवयांचे केस दाट व डोळे किंचित खोल व भेदक असे त्यांचे प्रथम दर्शन घडले. त्यांचा अर्ज पाहून व त्यांना ‘डेक्कन मराठा असोसिएशन’ ची स्कॉलरशिप मिळत आहे हे ऐकल्यावर, फी माफ व्हावयाची नाही असे निर्भीडपणे सांगून टाकले. उगाच नादाला लावण्यापेक्षा त्यांचे हे तडकाफडकी उत्तर योग्यच असले तरी त्या वेळी आगरकरांबद्दलचा विठ्ठलरावांचा ग्रह अनुकूल झाला नाही. त्यांची पैशाची अडचन तशीच राहिली. गोविंदराव सासने ह्यांचा थोडाफार आधार मिळत राहिला. अशा परिस्थितीतच त्यांचा प्रीव्हियसचा अभ्यासक्रम सुरू झाला.

विठ्ठल रामजी हे जमखंडीस प्राथमिक शाळेतून हायस्कुलमध्ये ज्या वेळी गेले त्या वेळेस त्यांना नवा अभ्यासक्रम, आस्थेवाईकपणे व प्रेमळपणे शिकविणारा शिक्षकवर्ग यांमुळे त्यांच्यात अभ्यासाबद्दल उत्साह संचारला होता व एक नवे जग खुले झाल्यासारखे त्यांना वाटत होते. परंतु कॉलेजमध्ये आल्यानंतर व येथील शिक्षणपद्धती बघितल्यावर त्यांचा अनुकूल ग्रह तर झाला नाहीच, उलट त्यांच्या मनावर प्रतिकूल स्वरूपाचा परिणाम झाला. त्या वेळी प्रीव्हियस वर्गाच्या दोन तुकड्या असल्या तरी प्रत्येक वर्गाच्या दोन तुकड्या असल्या तरी प्रत्येक वर्गात पाऊणशेपर्यंत विद्यार्थी असत. त्यांचा वर्ग गद्रेवाड्याच्या समोरच्या मोठ्या दिवाणखान्यात भरत असे. शिक्षणपद्धतीत स्थित्यंतर झालेले होते. कॉलेजशिक्षणाचे वेगळे लक्षण म्हणजे व्याख्यानपद्धती. शे-पन्नास मुलांनी उंच व्यासपीठावरील शिक्षकाचे निरूपण ऐकत बसणे म्हणजे त्यांच्या दृष्टीने हायस्कूलमधल्या वैयक्तिक शिक्षणपद्धतीला मुकणे होते. ह्या व्याख्यानपद्धतीमुळे व विद्यार्थ्यांच्या भरमसाठ संख्येमुळे शिक्षकाचा शिष्याशी व्यक्तिगत संबंध तुटतो आणि विद्यार्थी धागा तुटलेल्या पतंगाप्रमाणे शिक्षकांपासून कितीतरी लांब जातो, अशा प्रकारची प्रतीती विठ्ठलरावांना येत होती. हायस्कूलच्या काळातील शिक्षकांबद्दल त्यांनी जसे आत्मीयतेने व आदराने लिहिले आहे तसे कॉलेजमधील कुणाही प्राध्यापकांबद्दल त्यांनी आपल्या आठवणींमध्ये लिहिलेले नाही. त्यांच्या आर्थिक अडचणीमुळेही कॉलेजमधील वातावरणाशी ते समरसून गेले नसावेत हे अधिक कारण संभवते. कॉलेजात गेल्यानंतर व्याख्यान ऐकणारे आपण सभ्य गृहस्थ झालो आहोत अशी एक प्रकारची आढ्यतेची जाणीव बहुतेक विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत असे, हे त्यांनी नमूद केले आहे. विठ्ठलरावांच्या ठिकाणी मात्र अशा प्रकारची स्वयंमन्यता निर्माण झाली नाही. उलट एक प्रकारचा लाजाळूपणा, संकोचीपणा व धीटपणाचा अभाव त्यांच्या ठिकाणी होता. वर्गात सर्वात मागच्या बाकावर ते बसत असत. कॉलेजमध्ये ते निःसंकोचपणे वावरू शकत नव्हते असे दिसते. कॉलेजमध्ये प्रवेश मिळविला. तेथील अभ्यासक्रम सुरू झाला. परंतु पैशाची अडचण दूर झालेली नव्हती. स्कॉलरशिप अवघी दरमहा दहा रुपयाची. फी माफीचा अर्ज प्रिन्सिपॉलसाहेबांनी धुडकावून लावलेला. दरमहा पाचप्रमाणे कॉलेज फी. सगळ्या टर्मची तीस रूपये आगाऊ भरावयाची होती. कॉलेजची पुस्तके व उपकरणे घ्यावयाची होतीच. मग खोलीभाड्याला व खानावळीला काय उरणार? ह्या प्रश्नाचे उत्तर शिंदे देतात, “त्या वेळची स्वस्ताई आणि त्यापेक्षा निखालस उत्तर म्हणजे गरजा आणि उणिवा सहन करण्याची माझी अपार तयारी. माझ्या आईबाबांनी विशेषतः ही माझी तयारी सगळ्या आयुष्यभर पुरून मागे मुलाबाळांस लागल्यास उरेल इतकी केली होती.”

१८९३च्या प्रारंभी कोल्हापूरचे श्री. गोविंदराव सासने यांचा विठ्ठलरावांशी परिचय झाला. त्या वेळी गोविंदराव हे पुणे नेटिव्ह इन्स्टिट्युशन नावाच्या हायस्कुलात सातव्या इयत्तेचे विद्यार्थी होते. वयाने ते विठ्ठलरावांपेक्षा चार सहा महिन्यांनी मोठे होते. दिलदार स्वभावाच्या गोविंदरावांशी विठ्ठलरावांचा स्नेहसंबंध जुळला व ते घरातल्या माणसासारखे जवळचे भासू लागले. गोविंदरावांची घरगुती स्थिती चांगली होती. त्यांचे कोल्हापुरात फौजदार होते. खाऊन-पिऊन सुखी असे ते कुटुंब होते. विठ्ठलरावांची उदार मते व मोकळा स्वभाव गोविंदरावांना फारच आवडला. ते दोघे जरी भिन्न वर्गात शिकत होते तरी एकमेकांचा चांगुलपणा ओळखून मित्रत्वाच्या जवळकीच्या नात्याने वागत होते. गोविंदरावांचे वडील १८९३च्या मार्चमध्ये वारले. त्यामुळे त्यांना कोल्हापूरला निघून जावे लागले. म्हणून प्रीव्हियसच्या दुस-या टर्ममध्ये विठ्ठलराव हे मुधोळचे श्री. जनार्दन सखाराम करंदीकर व जमखंडीचे विश्वनाथ पोंक्षे यांच्यासमवेत राहावयास फुकट मिळाली. ह्या खोलीत केव्हा केव्हा अभ्यास करायला व विशेषतः अभ्यासक्रमात लावलेली जेन ऑस्टेनची प्राइड अँण्ड प्रेज्युडिस ही कादंबरी मिळून वाचण्यासाठी वाईचे केशव रामचंद्र कानिटकर हेही येत असत. (हेच पुढे फर्ग्युसन कॉलेजचे प्रिन्सिपॉल झाले.) ह्या जमखंडीकर मित्रांना पुण्यात लाभलेला, मात्र पुण्याचा नव्हे, तर बाहेरगावचा एकमेव सोबती आणि मित्र. विठ्ठलरावांची आणि त्यांची मैत्री अखेरपर्यंत टिकली. खुद्द पुण्याचा म्हणता येईल अशा एकाही विद्यार्थ्याने अंगाशी लावून घेतले नाही.

राहण्याची सोय अशी झाली. खाणावळीला साडेचार-पाच रुपये पडायचे. पुण्याच्या तेव्हाच्या हौदात गल्लोगल्ली आंघोळीला थंडगार पाणी मुबलक मिळे. किरकोळ खर्च तिघेजण गोडीगुलाबीने वाटून घेत असत. ही स्वस्ताई म्हणून पुण्यास राहून शिक्षण घेणे शक्य झाले. पण पैशापैशाला दांडगे मोल होते हे विठ्ठलरावांना अनुभवाने पटले होते. म्हणून पैसा वाचविण्यासाठी वाटेल तितके शारीरिक हाल करून घेऊन काटकसर करण्याचा त्यांचा प्रयत्न असे. कॉलेजात दरवर्षी दोन मोठ्या सुट्ट्या असत. त्या वेळी खानावळीचा जो खर्च वाचे त्यातून ते गावी जाण्यासाठी आगगाडीचा खर्च करीत. जमखंडी गावी जाण्यासाठी सदर्न रेल्वेच्या कुडची स्टेशनवर उतरावे लागे. कुडची स्टेशनवरून जमखंडीस जावयाला तेहतीस मैलांचा रस्ता होता. बैलगाडीस एका स्वारीला चार आण्यापासून फार तर आठ आण्यापर्यंत खर्च येई. परंतु बैलगाडीच्या प्रवासखर्चाचे चारआठ आणे वाचविण्यासाठी कित्येक वेळा सगळा बोजा अंगावर घेऊन विठ्ठलराव सर्व प्रवास पायी करीत असत. त्यांच्या ह्या काटकसरी स्वभावाचे आणि विचारीपणाचे त्यांच्या वडिलांना फार कौतुक वाटत असे व इतरांसमोर ह्या बाबीचा ते उल्लेखही करीत. अशा काटकसरीतच त्यांनी कॉलेजची पहिली तीन वर्षे म्हणजे इंटरमिजिएटची परीक्षा दुस-यांदा बसून पास होईपर्यंतचे दिवस मोठ्या कष्टाने काढले.

प्रीव्हियसच्या वर्षात अखेरच्या काळात पैशाची मोठी नड निर्माण झाली. कॉलेजातील प्रीव्हियसची प्रिलिमिनरी अथवा चाचणी परीक्षा ते पास झाले. मुंबई विश्वविद्यालयाच्या प्रीव्हियसच्या परीक्षेला त्यांना बसावयाचे तर परीक्षा फी वीस रुपये भरणे आवश्यक होते. परीक्षेचा फॉर्म भरण्याचे दिवस जवळ येत चालले. वीस रूपये कोठून मिळवायचे हा बिकट प्रश्न त्यांना पडला. कठीण वेळ आली होती. प्रीव्हियसच्याही पूर्वीची एक अधिकचीच परीक्षा देण्याचा हा प्रसंग त्यांच्यावर गुदरला होता. ते चिंतेत असताना ताडपत्रीकराच्या वाड्यात भटकीसाठी येणारे ब्राह्मण गृहस्थ नरहरपंत यांनी विठ्ठलरावांना एक मार्ग दाखविला. नरहरपंतांनी त्यांना रावबहादूर नवलकर या गृहस्थाकडे नेले. त्यांनी विठ्ठलरावांना परीक्षेच्या फीसाठी दोन रुपये दिले व त्यांची फार निकडीची गरज आहे म्हणून ताबडतोब मदत करवी अशा अर्थाची चिठ्ठी देऊन आपल्या काही मित्रांची नावे कळविली. अशा प्रकारे याचना करणे त्यांच्या अत्यंत जीवावर आले, परंतु नरहरपंतांनीच बळेबळे त्यांना रावबहादूर महादेव गोविंद रानडे, डॉ. रामकुष्ण गोपाळ भांडारकर, सरदार कुप्पुस्वामी मुदलियार, वकील राजन्ना लिंगो वगैरे मोठमोठ्या माणसांकडे पाठविले. ह्या इतक्या मोठ्या माणसांकडे जाऊन उभे राहणे त्यांना अत्यंत वेदनादायक झाले होते. तरी काही लोकांकडे जाऊन सारे चौदाच रूपये जमले. फी भरण्याची तारीख तर जवळ आली होती. नरहरपंतांनी अखेर शुक्रवार पेठेतील डॉ. शेळके यांच्याकडे पाठवले. नवलकरांची चिठ्ठी त्यांच्यासमोर ठेवल्याबरोबर विठ्ठलरावांना त्यांनी आयुष्यभर लक्षात राहावे असे तासडले. “मराठ्याच्या कुळात जन्मून असे भिक्षापात्र मिरविण्याची तुला लाज वाटत नाही? जवळ पैसे नसल्यास गुरे राखावीत. कशास शिकावे?’’ वगैरे वगैरे. डॉ. शेळके यांचे बोलणे ऐकून त्यांच्या अंगाला घाम आला. ह्या मराठा जमदग्नीपुढून चिठ्ठी आणि पैसे तसेच ठेवून निसटावे असे त्यांना वाटले. डॉ. शेळक्यांच्या संदर्भात शिंदे यांनी लिहिले आहे, “ह्या पुढे मी स्वतःसाठी कुणापुढे भीक अशी कधीच मागितली नाही तरी आतापर्यंत माझा व माझ्यावर अवलंबून असणा-यांचा योगक्षेम चालला याचे श्रेय डॉ. शेळके यांना देणे बरे वाटते! परोपकारासाठी पुढे लाखो रुपये जमविण्याची पात्रता व इच्छा मला आली ह्यातही कदाचित डॉ. शेळके ह्यांचाच हा विरोधी आशीर्वाद कारण झाला असेल, नसेल कशावरून?’’

अखेरीस पैशाचा हा बिकट प्रसंग अनपेक्षितपणे व हृदयस्पर्शी त-हेने सुटला. तेरदाळचे विष्णुपंत देशपांडे हे विठ्ठलरावांचे जमखंडीपासूनचे अत्यंत जिवलग मित्र. विठ्ठलरावांची अडचण त्यांना जाणवली होती. ते घरचे श्रीमंत असले तरी कारभाराचे त्यांचे वय झाले नसल्यामुळे त्यांच्या हातात पैसा खेळत नव्हता. विठ्ठलरावांची अडचण जाणवून त्यांना तळमळ लागून राहिली. त्यांची प्रेमळ पत्नी सौ. बहिणाबाई यांना ही तळमळ पाहवेना. त्यांनी आपल्या माहेराकडून भाऊबीजेच्या ओवाळणीत मिळालेले वीस रुपये विष्णुपंतांमार्फत विठ्ठलरावांना पोहोचवले. जुन्या वळणातील ही साध्वी बाई विठ्ठलरावांना आपल्या नव-याचा मोठा भाऊ समजून पुढील आयुष्यात कधीही त्यांच्यासमोर उभी राहिली नाही. बहिणाबांईंनी दाखविलेल्या कळकळीचा हा मासला जेवढा अपूर्व तेवढा अंतःकरणाला भिडणारा. उरलेला फीच्या पैशाचा आणि परीक्षेसाठी मुंबईच्या खर्चाचा विठ्ठलरावांचा प्रश्न अशा त-हेने सुटला.

प्रीव्हियसच्या परीक्षेच्या निमित्ताने विठ्ठलरावांना मुंबईचे प्रथम दर्शन घडले. त्यांनी कांदेवाडीत खत्रे यांच्या चाळीत एका खोलीत जागा  घेऊन परीक्षेसाठी मुंबईत वास्तव्य केले. जागेपणीचा लगळा वेळ परीक्षेचे पेपर लिहिण्यात आणि अभ्यास करण्यात जात असल्यामुळे मुंबई बघणे असे त्यांच्याकडून झाले नाही. पण मुंबईची कोंडलेली गर्दीची वस्ती, समुद्रकाठची घामट हवा आणि मुंबईच्या लोकांचा आत्माशून्य वरपांगी स्वभाव जाणवून मुंबईच्या ह्या पहिल्या भेटीचा परिणाम त्यांच्या मनावर अनुकूल स्वरूपाचा झाला नाही.

इंटरमीजिएटचे वर्ष
प्रीव्हियसची परीक्षा देऊन आल्यानंतर विठ्ठलराव जमखंडी येथे असताना ते परीक्षा पास झाल्याचे कळले. कॉलेजची परीक्षा पास झालेला पहिलाच विद्यार्थी म्हणून जमखंडी गावात त्यांची अधिकच ख्याती पसरली. पुण्यात परत आल्यानंतर मुंबई इलाख्यातील प्रीव्हियसला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांत आपला नंबर कितवा आहे हे जेव्हा त्यांना कळले तेव्हा त्यांची मोठी निराशा झाली. त्यांचा नंबर पहिल्या किंवा दुर-या वर्गात तर आला नव्हताच, पण तिस-या वर्गातही फारसा वरती नव्हता. ह्यामुळे ते अंतर्मुख झाले. कॉलेजशिक्षणात निस्तेज होण्याचे एक कारण म्हणजे, घरच्या गरीबीची जाणीव ते हायस्कूलमध्ये असताना होत नव्हती ती आईबापांपासून दूर पुण्यात एकटे राहू लागल्यामुळे तीव्रपणे होत होती. अनेक कारणांमुळे कॉलेजच्या शिक्षणात त्यांचे चित्त लागत नव्हते. हायस्कुलातील मनाची तरतरी व हौस झपाट्याने मावळू लागली. पैशाच्या अडचणीत आणखी भर म्हणजे जमखंडीचे यजमान श्रीमंत अप्पासाहेब रामचंद्रराव यांनी त्यांच्या वडीलांना याच सुमारास नोकरीवरून कमी केले. विठ्ठलरावांनी श्रीमंतांनी देऊ केलेली स्कॉलरशिप घेऊन व्हेटर्नरी कॉलेजात जावयास नकार दिला होता व आपल्या कल्पनेनुसार आर्टस् चे शिक्षण सुरू करून ते कॉलेजची पहिल्या वर्षाची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. त्यामुळे श्रीमंतांना राग येऊन त्याचे पर्यवसान वड्याचे तेल वांग्यावर या न्यायाने त्यांच्या वडिलांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले असावे.

प्रीव्हियसची परीक्षा पास होऊन विठ्ठलराव परत पुण्यास आले. गोविंदराव सासने हे वडिलांच्या मृत्यूनंतर घरची व्यवस्था लावून परत पुण्यास शिकण्यास आले. नारायण पेठेत मुंजाबाच्या बोळासमोरील केळकरांच्या वाड्यात त्यांनी खोली घेतली. विठ्ठलरावांची एक खोली व गोविंदरावांची एक खोली असे जोडखोलीचे हे एक दालन होते. दुस-या जोडखोलीच्या दालनामध्ये विजापुरचे गोविंदराव कलकेरी आणि कोल्हापूरचे तळाशीकर राहत होते. ह्या कळात पुण्यात शिक्षणाच्या निमित्ताने तेरदाळचे विष्णुपंत देशपांडे व मुधोळचे जनार्दनपंत करंदीकर हे त्यांचे जमखंडीचे बालमित्र पुन्हा एकत्र आले. प्रीव्हियसच्या प्रारंभी गोविंदराव सासने यांची मैत्री झाली आणि वाईचे केशव रामचंद्र कानिटकर हे वर्गमित्र झाले. या चौघाजणांची विठ्ठलरावांनी असलेली मैत्री अखेरपर्यंत टिकून राहिली.

खर्चात काटकसर करण्याचा एक भाग म्हणून खानावळीत न जाता घरीच स्वयंपाक करावा असे विठ्ठलरावांनी ठरवले व केवळ त्यांच्यासाठी म्हणून गोविंदरावांनीही तसेच ठरविले.  दुस-या टर्ममधे परीक्षेचे दिवस जवळ आल्यावर व अभ्यासाला जास्तीतजास्त वेळ देण्याची निकड भासू लागल्यानंतर त्यांना हे स्वयंपाकव्रत सोडून द्यावे लागले. दुसरी गोष्ट म्हणजे एक भात सोडला तर दुसरा कोणताही पदार्थ तयार करण्याचे कौशल्य ह्या दोघांमध्येही निर्माण होणे शक्य नव्हते. आर्थिक दुःस्थितीमुळे व आईबापांपासून दूर राहावे लागल्यामुळे विठ्ठलरावांच्या स्वभावातील आनंदीपणा कमी झाला. अकाली पोक्तपणा व विचारीपणा आला. खेळकरपणा मावळला आणि इतरांशी मैत्री करण्याची हौसही नाहीशी होऊ लागली. एवढेच नव्हे तर कॉलेजच्या वर्गातील ठरीव अभ्यासावरून मनही उडू लागले. एकंदरीत तत्कालीन विश्वविद्यालये व तेथील चैतन्यरहित शिक्षणपद्धती यासंबंधी एक प्रकारची विरक्ती त्यांच्या मनामध्ये वाढू लागली. मनाच्या ह्या अवस्थेत अभ्यासाची त्यांच्याकडून हयगय होऊ लागली.

ठरीव अभ्यासावरून विठ्ठलरावांचे मन उडाले असले तरी त्यांच्या मनाचा व बुद्धीचा विकास थांबला अशातला मात्र भाग नव्हता. चैतन्ययुक्त अभ्यासक्रमाची उणीव ते अभ्यासक्रमाबाहेरचे वाचन करून जणू काय भरून काढीत होते. त्यांचे वाचन त्या काळाच्या मानाने बरे चालले होते. फर्ग्युसन कॉलेजात पुस्तके मिळण्यास अडचण नव्हती. प्रीव्हियसच्या वर्गात असतानाच जॉन स्टु्अर्ट मिलसारख्या तत्त्वज्ञानाचा आणि मेकॉलेसारख्या निबंधकराचा परिचय घडला होता. मिलचे लिबर्टी(स्वातंत्र्य), युटिलिटेरिऍनिझम(उपयोगवाद, बहुजनहितवाद), सब्जेक्शन ऑफ वुइमेन(स्त्रियांची गुलामगिरी) हे ग्रंथ मुळातून त्यांनी वाचले. त्यांमधील विचारांच्या नवेपणामुळे विठ्ठलराव अगदी प्रभावित झाले होते. इंटरमीजिएटमध्ये आल्यावर हर्बर्ट स्पेन्सरच्या एज्युकेशन(शिक्षण), इंट्रॉडक्शन ऑफ द स्टडी ऑफ सोशॉलॉजी ह्या मूळ ग्रंथांचे वाचन त्यांनी मनापासून केले. त्या काळी स्पेन्सरची चलती युरोप अमेरिकेतच नव्हे तर हिंदुस्थान व जपानसारख्या पौर्वात्य देशांतही मोठ्या प्रमाणात होती. त्या काळचे कॉलेजातील बहुतेक शिक्षक स्पेन्सरच्या अज्ञेयवादाने जवळ जवळ झपाटल्यासारखे झाले. होते. दाभोळकर नावाच्या गृहस्थांनी सुरू केलेल्या स्पेन्सरचा ग्रंथांच्या भाषांतरमालेतील पुस्तकेही विठ्ठलराव अधाशाप्रमाणे वाचीत होते. मिलस्पेन्सरचा तत्कालीन वातावरणावर कसा प्रभाव होता आणि खुद्द विठ्ठलरावांवर पडलेल्या प्रभावाची परीणती नास्तिकपणा कशी झाली हे सांगताना ते लिहितात, “जेथे आमचे गुरूच त्या नवीन विचाराने असे हैराण झालेले, मग माझ्यासारख्या उतावळ्या विदयार्थ्याची अत्यवस्था झाली, असे म्हणावयाला काय हरकत आहे? पुस्तके जरी मी म्हणण्यासारखी पुष्कळशी वाचली नसली तरी जी तात्विक महत्त्वाची त्यांचा माझ्यामध्ये फार जोराचा अभिनिवेश घडला. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे जमखंडीतल्या आमच्या वाडयातल्या अंधे-या देवघरात बसून श्री शिवलीलामृताचे पारायण करीत शिवलिंगावर श्रावणी सोमवारी सहस्त्रदळे वाहिल्याशिवाय तोंडात पाणी न घेणारा मी पुण्यात आल्यावर आगरकरांचे लेख आणि मिल्-स्पेन्सरचे प्रत्यक्ष ग्रंथ वाचून पुण्यातल्या विद्यार्थ्यांत एक पठ्ठ्या नास्तिक बनलो!’’३

विठ्ठलराव हे वाचून स्वस्थ बसणा-यांपैकी तरुण नव्हते. जे आपल्या मनात आले ते
दुस-याजवळ बोलून त्यावर चर्चा करण्याची प्रबळ ऊर्मी त्यांच्या ठिकाणी होती. “पोटात घटकाभर विष आवरेल पण नविन विचार अगर सुंदर अनुभव मनाला घडला की कुणातरी सहानुभूतीच्या मित्राजवळ किंवा आप्ताजवळ ओकून टाकल्याशिवाय मला चैनच पडत नसे.’’ नव्या विचारअनुभवाबद्दल विठ्ठलरावांच्या ठिकाणी अशा प्रकारचा उत्साह असल्यामुळे केळकरांच्या वाड्यात त्यांनी एक छोटेखानी चर्चामंडळ स्थापन केले. मॅट्रिकची परीक्षा दिल्यानंतर जमखंडीतील वसंत व्याख्यानमालेतही विचारस्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्य, स्त्री-दाक्षिण्य यांसारख्या भारदस्त विषयांवर भाषणे त्यांच्या अंगवळणी पडले होते. त्यातून पुण्यसारख्या ‘वाचाळ’ आणि मुंबईसारख्या ‘चवचाल’ शहरांचा संपर्क घडल्यावर त्यांच्यासारख्याच्या उत्साहाला भरते येणे स्वाभाविक होते. मंडळातील सभांतूनच नव्हे तर विद्यार्थ्यांत होणा-या खासगी संभाषणातही ते त्यांना आपला ‘नविन तुटपुंजा नास्तिकपणा’ शिकवू लागले. त्या वेळी लिहिलेल्या एका छोटेखानी इंग्रजी निबंधात “देवाने माणसाला निर्माण केले नसून उलट माणसानेच देवाला निर्माण केले,’’ अशी भूमिका जोरदारपणे मांडली होती.४


अनेकविध कारणांमुळे परीक्षेसाठी नेमलेल्या अभ्यासक्रमावर विठ्ठलरावांचे चित्त बसले नाही हे वर आलेच आहे. त्यातून त्यांचा ओढा वरील प्रकारच्या अभ्यासक्रमाबाहेरच्या वाचनाकडे लागून राहिला. त्यातच भर म्हणजे चर्चामंडळातील वादविवादाची. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून विठ्ठलरावांना इंटरमीजिएट परीक्षेत अपयश आले. त्यातून विशेष बाब अशी की, तर्कशास्त्र या त्यांच्या आवडत्या विषयातच ते नापास झाले होते. परीक्षेत नापास होण्याचा त्यांना आयुष्यात जो अनुभव नव्हता तो आला. मात्र विश्वविद्यालयीन परीक्षेबद्दलची त्यांची आदरबुद्धी कमी होऊ लागली. त्यांच्या़ ठिकाणी स्वत:बद्दलचा एक खोलवरचा आत्मविश्वास होता. त्यामुळे परीक्षेत नापास होण्याचा सगळा दोष स्वत:कडे घ्यायला त्यांचे मन होत नसावे. काही एका प्रमाणात ते नाउमेद झाले असले तरी, १८९५च्या जानेवारीत जमखंडीहून कॉलेजच्या अभ्यासक्रमासाठी पुन्हा पुण्याला निघाले.

पहिली टर्म संपल्यानंतर मे महिन्याच्या सुटीत विठ्ठलराव जमखंडीला गेले. ह्यावेळी विठ्ठलराव व गोविंदराव हे दोघे आपल्या कुटुंबातील कुणाला तरी आणून पुण्यास बि-हाड करावे असा विचार करत होते. त्यांना खाणावळीच्या जेवणाचा दरमहा पाच रूपये हा दरही जास्त वाटत होता. मात्र पुण्यात बि-हाड करण्या स्वत:च्या घरचे जेवण व त्यामुळे होणारी काटकसर हे केवळ कारण नसून घरातील स्त्रीनातलगांना स्त्रीशिक्षण व प्रवासाचा लाभ देण्याचा सुधारकी हेतूही त्यांच्या मनात निर्माण झाला होता. हा प्रत्यक्ष परिणाम “हरी नारायण आपटे यांच्या कादंब-यांचा.’’५ ह्या सुमारास विठ्ठलरावांची बहीण जनाक्का हिच्यावर दुर्धर प्रसंग कोसळला होता. जनाक्काच्या सासरी तिचा छळ सुरू झालेला होता. अशा परिस्थितीत जनाक्काला माहेरी परत आणण्याचा आग्रह विठ्ठलरावांनी धरला होता. १८९५च्या दुस-या टर्ममध्ये विठ्ठलराव पुण्यास आले ते त्यांची मातोश्री आणि बहीण जनाबाई यांना बरोबर घेऊनच. जनाक्काला सासर सोडणे व परत माहेरी जमखंडीस येणे का भाग पडले ते तिच्या दु:खद संसारकथेवरून कळण्याजोगे आहे.

संदर्भ
१.    रा.द. रानडे इ.(संपा.),परशुरामभाऊ हायस्कूल सुवर्ण-महोत्सव स्मासकग्रंथ, जमखंडी, १९३८ परिशिष्ट १,पृ. २.
२.    विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. ८६.
३.    तत्रैव, पृ. ९९.
४.    तत्रैव, पृ. १००.
५.    तत्रैव, पृ. १०३.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य

   निवेदन
    लेखकाचे मनोगत
    दुस-या व तिस-या आवृत्तीच्या निमित्ताने
    प्रस्तावना 
 -   अंत:प्रेरणेचा निर्णय
 -   आजी-आजोबा आणि आई-वडिल
 -   बालपण 
 -   कॉलेजची पहिली दोन वर्षं
 -   जनाबाईंची संसारकथा
 -   जनाबाईंचे शिक्षण
 -   हुजूरपागा शाळा आणि शांता सुखटणकरची
     करुण कहाणी
-    इंटरमीजिएटचे दुसरे वर्ष
 -    पदवी परीक्षेचा अभ्यास आणि एकोणिसाव्या
      शतकाच्या अखेरचे पुणे
   प्रार्थनासमाजाची दीक्षा 
 -    पदवी परीक्षा
 -   अंत:स्थ भावजीवनातील खळबळ 
 -    एकेश्वरी उदार धर्मपंथ
 -    प्रार्थनासमाज
 -    धर्मशिक्षणासाठी निवड आणि परदेशगमन
 -    मुंबई ते ऑक्सफर्ड
 -     मॅंचेस्टर कॉलेज
 -    ऑक्सफर्डमधील पहिले दोन महिने
 -    नाताळची सुट्टी : मुक्काम लंडन 
 -    पत्रांचा विरंगुळा
 -    दक्षिण किना-यावरील पंधरवडा
 -    प्रोफेसरांच्या कुटुंबात सरोवर प्रांती
 -    एडिंबरो आणि स्कॉच सरोवरे
 -    हिंदू गृहस्थिती आणि समाजस्थिती 
      व्याख्यान व नाट्यप्रयोग 
 -    पारीस येथील एक महिना
 -   लिव्हरपूल येथील त्रैवार्षिक युनिटेरियन परिषद
 -    ऑक्सफर्डमधील शेवटची टर्म
 -    ऍमस्टरडॅम येथील आंतराष्ट्रीय उदार धर्मपरिषद
 -    परतीचा प्रवास
 -    स्वदेशी आगमन, बडोदा भेट आणि
      धर्मप्रचारकार्याला प्रारंभ
 -    मद्रासच्या परिषदा आणि हिंदुस्थानचा दौरा
-    जमखंडी-मुधोळ येथील प्रचारकार्य
 -    काठेवाडचा दौरा 
 -    मुंबईतील बि-हाड आणि प्रार्थनासमाजातील नवचैतन्य
 -    धर्मप्रचाराचे विस्तारित कार्य
 -    कौटुंबिक अडचणी, पुणे प्रार्थनासमाजातील नवचैतन्य
 -    धर्मप्रचारार्थ दौरा
 -    प्रवासातील अनुभव
 -    जनाबाई पनवेलमध्ये शिक्षिका
 -    विविध प्रार्थनासमाजांतील सहभाग
 -    भारतीय एकेश्वरी धर्मपरिषद
 -    ब्राह्मधर्मसूची ग्रंथ
 -    अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीविषयक कार्याचे प्रारंभिक प्रयत्न
 -    मिशनच्या स्थापनेचा संकल्प
 -    मिशनची स्थापना
 -  मिशनची घटना व पुणे येथील अंगभूत शाखा
 -    मिशनमधील दोन समारंभ 
 -    मिशनच्या स्थापनेनंतर वातावरणातील बदल
 -    निधीची योजना
 -    मुंबई प्रार्थनासमाजाशी दुरावा आणि फारकत
 -    पुण्यास स्थलांतर
 -    मिशनची महाराष्ट्र परिषद
 -    तुकोजीराव महाराजांची देणगी व मांगांचे
      शेतकी खेडे वसविण्याचा प्रयत्न
 -   अहल्याश्रमाची पूर्वतयारी 
 -    मराठ्यांची सांस्कृतिक जबाबदारी 
 -    काँग्रेसमध्ये अस्पृश्यतानिवारणाचा ठराव
 -    अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीची दिशा व मार्ग
 -    अस्पृश्यतानिवारक परिषद
 -   राष्ट्रीय प्रवाहात मराठा समाज
 -    अस्पृश्यवर्गाचे कायदेमंडळात प्रतिनिधित्व
 -    गैरसमजाचा ससेमिरा 
 -    १९२० सालातील निवडणूक 
-    शिंदे आणि ब्राह्मणेतर पक्ष
 -    कुटुंबातील मृत्यू
 -    मुलींसाठी सक्तीचे शिक्षण
 -    मद्यपाननिषेधाची चळवळ व अन्य सामाजिक कार्य
 -    मिशनचा कार्यविस्तार : कर्नाटक-मध्यप्रांतातील शाखा 
 -    मिशनसंबंधी आक्षेप व समस्या
 -    मिशनची पुनर्घटना
 -    खटल्याचा दैवदुर्विलास
 -    मिशनमधील सहकारी व सहका-यांच्या
       दृष्टीतून विठ्ठल रामजी शिंदे
 -    मंगलोरमधील कार्य
 -   व्हायकोम सत्याग्रह
 -    मंगलोर ब्राह्मसमाजातील पेचप्रसंग
 -    कौटुंबिक उपासनामंडळ
 -    सत्याग्रहात सहभाग आणि नेतृत्व
 -    अस्पृश्यतानिवारणाचे कार्य व म. गांधीशी संबंध
 -    येरवड्याच्या तुरुंगात
 -    ब्रह्मदेशाची यात्रा 
 -    शेतकरी चळवळ
 -    परिषदा, संमेलने यांमधील सहभाग
 -   कौटुंबिक वातावरण
 -    बहुमान, अवमान आणि निष्ठा
 -    वाई ब्राह्मसमाज आणि ग्रामीण भागातील धर्मकार्य
 -    विचारविश्व
 -    साहित्यसेवा आणि संशोधनकार्य
 -   अपूर्व स्नेहसंमेलन
 -   अखेरचे दिवस
 -   उपसंहार 
 -   परिशिष्टे १/२ आणि ३ 
 -   मनोगते
 -   महर्षी शिंदे यांचे फोटो व काही हस्तलिखिते