महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य

एकेश्वरी उदार धर्मपंथ

विठ्ठल रामजी शिंदे यांनी प्रार्थनासमाजाची दीक्षा घेतली ती मोठ्या गांभीर्याने. १८९८ मध्ये त्यांनी रोजनिशीत लिहिलेल्या काही नोंदींवरून ते धर्माकडे किती गंभीरपणाने पाहत होते हे ध्यानात येतेच. ह्या दीक्षेच्या वेळेपासून ब्राह्मधर्माचा आणि त्यांचा आयुष्यभरचा अतूट संबंध जडला. ब्राह्मधर्माचे आपण केवळ एक अनुयायी होऊन आयुष्य घालविणे ह्यात त्यांच्या मनाचे समाधान होणार नव्हते. धर्मप्रचारक या नात्याने आपले आयुष्यच ह्या उन्नत धर्मकार्यासाठी वाहावे अशी त्यांच्या मनाची धारणा होत चालली होती असे त्यांचे मित्र जनुभाऊ करंदीकर यांच्या अभिप्रायावरून दिसून येते.१ विठ्ठलराव १८९९ मध्ये मुंबईस कायद्याचा अभ्यास करण्यासाठी गेले  असताना पुणे प्रार्थनासमाजाच्या तसेच मुंबई प्रार्थनासमाजाच्या पीठावरून उपासना चालवू लागले होते. त्यांचे मन ज्या उन्नत स्वरूपाच्या एकेश्वरी उदारमतवादी धर्मपंथाकडे आकृष्ट झाले, त्या विश्वधर्माचे हिंदुस्थानाबाहेर व हिंदुस्थानात काय स्वरूप होते हे ऐतिहासिक व तात्त्विकदृष्ट्या ध्यानात घेऊ.

हिंदुस्थानमधे ब्राह्मसमाज व प्रार्थनासमाज हे एकेश्वरी धर्मपंथ हिंदू धर्मातून विकास पावून एकोणिसाव्या शतकापासून कार्य करू लागले, तर इंग्लंड व अमेरिका ह्या देशांमध्ये सार्वत्रिक स्वरूपाच्या धर्माचे कार्य करणारा, ख्रिस्ती धर्मामधून विकास पावलेला युनिटेरियन या नावाने ओळखला जाणारा धर्मपंथ युरोपमध्ये सोळाव्या शतकामध्ये उद्याला आला. आधुनिक शास्त्र, तत्त्वज्ञान व विचारपद्धती यांच्याशी विरोध येऊ न देता, किंबहुना आधुनिकता आत्मसात करून धर्मकार्य करीत राहणे हे या धर्मपंथांचे वैशिष्ट्य आहे.

युनिटेरियन धर्मपंथ
सोळाव्या शतकात ख्रिस्ती धर्मात मोठी सुधारणा झाल्यानंतर युनिटेरियन हे नाव प्रचारात आले. युनिटेरियन ह्या इंग्रजी पदाचा अर्थ एकवादी असा आहे. ख्रिस्ती धर्मातील त्रयवादाच्या संदर्भात ह्या संज्ञेचा अर्थ समजून घ्यावा लागतो. पारंपरिक ख्रिस्ती धर्मसिद्धान्तानुसार देव एकच आहे, पण त्याचे स्वरूप त्रिविध आहे. पिता असलेला देव, पुत्र असलेला देव (प्रभू येशू ख्रिस्त) आणि पवित्र चैतन्य. पण देव म्हणजे ह्या तीन भिन्न व्यक्ती असल्या तरी देव म्हणजे ह्या तीन भिन्न व्यक्तींचे त्रिकूट नाही, समुदाय नाही. ह्या तीन्ही व्यक्तींचे सत्त्व एकच आहे. हा सिद्धान्त म्हणजे देवाच्या त्रित्वाचा (Trinity) सिद्धान्त२ अथवा त्रयवाद होय. ह्या सिद्धान्तानुसार पित्याच्या स्वरूपातील देव हा आपला निर्माणकर्ता आहे, पुत्राच्या स्वरूपातील देव म्हणजेच येशू ख्रिस्त हा आपला तारणकर्ता आहे व पवित्र आत्माच्या स्वरूपातील देव ऊर्फ चैतन्य ही आपली शक्ती आहे.३

ह्या त्रयवादावर (Trinity) विश्वास असणे म्हणजे ख्रिस्ती असणे असे कडव्या ख्रिस्ती लोकांचे मत असते. ह्या मताच्या उलट युनिटेरियन लोक परमेश्वर सर्वतोपरी एकच आहे व ख्रिस्त हा केवळ अति पवित्र साधुपुरुष पण इतरांसारखा मनुष्य होता असे समजतात. त्रयवादाचा सिद्धान्त ख्रिस्तानंतर तीनशे वर्षांनी निर्माण झाला. सेंट पॉलने ख्रिस्ताची शिकवण यथार्थ स्वरूपात प्रसृत करण्याचा जोरदार प्रयत्न केला. तरीही ख्रिस्तानंतरच्या तीन शतकांमध्ये ख्रिस्त आणि त्याची शिकवण ह्याबद्दल अनेक परस्परविरोधी मते व पंथ निर्माण होऊन मतमतांचा गलबला निर्माण झाला.

कॉन्स्टॅन्टाइनच्या युरोपियन बादशहाने इ. स. ३२५ मध्ये नायसिया येथे मोठी धर्मपरिषद बोलावली. तीमध्ये धर्माधिका-यांनी अर्धा वाद व अर्धी जबरी करून त्रयवाद स्थापन केला. तदनंतर रोमच्या मठाचा अधिकार वाढून धर्माचे अधिकार व युरोपच्या राज्यसत्तेवरचे नियंत्रण पोपच्या हाती आले. पुढील एक हजार वर्षांच्या युरोपच्या इतिहासातील या अंधारी युगामध्ये तीच ती धर्ममते, सामाजिक कृत्रिम बंधने व व्यक्तींचे आचार अव्याहत चालू राहिले.

सोळाव्या शतकात मार्टिन लूथर (१४८३-१५४६) आणि जॉन कॅलव्हिन (१५०९-१५६४) ह्या कर्तबगार धर्मसुधारकांचा उदय झाला. त्यांनी पोपचे प्रामाण्य, त्यांच्या हस्तकांचा जुलूम, प्रायश्चित्तांचा बाजार वगैरे अनेक अधार्मिक बाबींविरुद्ध धर्मयुद्ध करून युरोपचा उद्धार करण्याचा प्रयत्न केला. मात्र लूथर अथवा कॅलव्हिन हे पूर्ण सुधारक नव्हते. चौथ्या-पाचव्या शतकातील कॅथॉलिक धर्ममताचे नमुने त्यांनी जसेच्या तसे पत्करले होते. मात्र धर्माच्या बाबतीत स्वतंत्र विचारांची जी लाट त्यांच्यामुळे सुरू झाली ती तशीच पुढे पुढे सरकत गेली. त्यांनी साधुसंतांच्या मूर्तीची पूजा बंद केली. प्रायश्चत्ते विकण्याची चाल बंद केली. बायबलचीसुद्धा नवीन आवृत्ती काढली. ह्यानंतरही काही विचारी माणसे प्रश्न करीत राहिली, ख्रिस्त हा मनुष्य की देव? केवळ त्याच्या विश्वास ठेवल्याने मोक्ष मिळतो की सत्कर्म केल्याने मिळतो? मनुष्यप्राणि जन्मतःच पापी आहे काय? काही आत्म्यांस गती व काहींस अधोगती ही निवडानिवड देवाने आधीच केली आहे हे खरे काय? इत्यादी प्रश्नांसंबंधी पुन्हा विचार सुरू झाला. लूथर आणि कॅलव्हिन हे या बाबतीत जुन्या मताचे दुराग्रही होते. सर्व्हिट्स नावाच्या एका स्पॅनिश डॉक्टरला ‘ख्रिस्ती धर्माचा उद्धार’ ह्या नावाचा स्वतंत्र विचाराचा ग्रंथ लिहिल्याबद्दल पाखंडी ठरवून कॅलव्हिन ह्याने इ.स. १५५३ मध्ये जिवंत जाळायला लावले. सर्व्हिट्स हा नाव घेण्याजोगा पहिला युनिटेरियन होय.

पोलंडमध्ये सेजिस्मंड हा उदार मताचा राजा असल्यामुळे व त्याने धर्माबाबतीत स्वातंत्र्य दिल्यामुळे ब्लँडॉटा या इटालियन वैद्याने इ. स. १५६५ मध्ये पहिला युनिटेरियन समाज स्थापन केला पोलंडच्या शेजारच्या ट्रान्सिस्ल्व्हानिया, हंगेरी ह्या देशांतही ह्या मताचा झपाट्याने प्रसार सुरू होऊन सुमारे साडेचारशे समाज स्थापिले गेले. उदारमतवादी सेजिस्मंड राजाच्या कारकिर्दीनंतर कॅथॉलिकांची सत्ता सुरू झाली व लूथर व कॅलव्हिन यांच्या अनुयायांनी तसेच कॅथॉलिक राज्यकर्त्याने युनिटेरियनांचा छळ चालविला. इंग्लंडातील युनिटेरियनांच्या मदतीने ते तग धरून राहिले व नंतर हळूहळू वाढत गेले. सोळाव्या व सतराव्या शतकात इंग्लंमध्ये सनातन ख्रिश्चन धर्ममतातील कल्पनांना विरोध केल्याबद्दल दोन-तीन जणांना जिवंत जाळले गेले. परंतु युनिटेरियन मताचा प्रभाव वाढत राहिला. पोलंडातील युनिटेरियन पुस्तके आणून इंग्लंडात छापून त्याचा प्रसार करण्यात येत होता. रीतसर समाजाची स्थापना झाली नव्हती तरी त्या काळातील मिल्टन, लॉक, न्यूटन ह्यांसारखे कवी, विचारवंत व शास्त्रज्ञ युनिटेरियन मताचे बनले होते.

सोळाव्या शतकात इंग्लंडात प्रॉटेस्टंट धर्माची स्थापना झाली तरी स्वतंत्र रीतीने विचार व उपासना करण्याची सोय नव्हती. राष्ट्रात प्रचलित असणा-या धर्माचे आचरण न करता त्याच्या विरोधात जाणा-यांना नॉनकन्फॉर्मिस्ट किंवा डिसेंटर्स म्हणण्यात येऊ लागले. १६८८ मध्ये इंग्लंडचा स्ट्युअर्ट राजा दुसरा जेम्स याला काढून विल्यम ऑरेंजला सिंहासनावर बसविले. ह्या राज्यक्रांतीमुळे राज्यसत्ता ईश्वरदत्त असते या कल्पनेला तडा गेला. पार्लमेंट सार्वभौम झाले. इंग्लंड हे लोकशाहीनिष्ठ राष्ट्र झाले. ह्याचा स्वाभाविक परिणाम धर्मक्षेत्रावरही झाला. सर्व लोकांना उपासनास्वातंत्र्य मिळाले. प्रेस्बिटर शाखेच्या लोकांनी आपली स्वतंत्र मंदिरे बांधली व त्यांमध्ये उपदेश करणा-या लोकांवर कोणत्याच धर्ममताचे बंधन ठेवले नाही. त्यामधून युनिटेरियन मताचा स्वतंत्र विचार झपाट्याने होऊ लागला. सुप्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ जोसेफ प्रिस्टले याने युनिटेरियन मताचा राजरोसपणे पुरस्कार सुरू केला. यार्कशायरमधील एक धर्मप्रचारक थिओफिल्स लिंडसे याने आपले मिळकतीचे आचार्यपद सोडले आणि लंडन येथील एसेक्स स्ट्रीटमध्ये उपदेश करण्यासाठी एक जुनी लिलाव करण्याची जागा स्वतःच्या खर्चाने भाड्याने घेतली व अशा प्रकारे सन १७७३ मध्ये इंग्लंडात प्रथम युनिटेरियन समाजाची उघडपणे स्थापन झाली. (ह्या जागेवरच अद्यापि युनिटेरियन पंथाचे कार्य चालू आहे.) इ.स. १७८६ मध्ये कोणतीही मतासंबंधी अट न घालता धर्माचे स्वतंत्र शिक्षण देण्यासाठी व उपदेशक आणि प्रचारक तयार करण्यासाठी मॅंचेस्टर कॉलेजची स्थापना झाली. चोहीकडे देशात युनिटेरियन समाज निघू लागले. इ. स. १८२५ मध्ये इंग्लंडात व बाहेर युनिटेरियन मतांचा प्रसार करण्यासाठी ‘ब्रिटिश अँड फॉरेन असोसिएशन’ नावाची मंडळी स्थापन करण्यात आली.

अमेरिकेत त्या मानाने मोकळे वातावरण होते. १७८५ मध्ये बॉस्टन येथील एका समाजाने उघडपणे युनि़टेरियन मत स्वीकारले. इकडे इंग्लंडात डॉ. प्रिस्टले यांचा पारंपरिक ख्रिस्ती मताच्या लोकांनी फार छळ सुरू केला होता. बर्मिंगहॅम येथील त्यांचे घर जाळले. लंडन येथेही त्यांना सुखाने राहू दिले नाही म्हणून या त्रासाला कंटाळून ते अमेरिकेत गेले. तेथील लोकांनी त्यांचा बहुमान केला व त्यांच्यामुळे युनिटेरियन मताचा प्रसार होण्याला मोठी मदत झाली. पुढे लाँगफेलो, लोवेल वगैरे कवी; इमर्सनसारखे लेखक व थि़ऑडर पार्करसारखे उपदेशक ह्यांनी युनिटेरियन मत देशभर पसरविले.

प्रारंभीच्या काळातील डॉ. प्रिस्टले व लिंडसेप्रभृती युनिटेरियन व नंतरच्या काळातील डॉ. मार्टिनो, रे. आर्मस्ट्राँग यांच्यासारखे युनिटेरियन यांच्यासारख्यांच्या विचारात महदंत पडले आहे. प्रिस्टले इत्यादिकांना ख्रिस्ताचे देवत्व व धर्मातील अन्य दुराग्रही मते मान्य नव्हती. मात्र ख्रिस्ती धर्म म्हणजे एक अप्रतिम ईश्वरी सत्य आहे असे त्यांना वाटत होते. हल्लीच्या काळात कोणताही युनिटेरियन बायबलचा अनादर करीत नसला तरी बायबलवर शंभर टक्के  विश्वास ठेवीत नाही. बायबलची तो चिकित्सा करतो. धर्म ही बाब शाब्द चिकित्सेची नव्हे. केवळ मानसिक विश्वासाचीही नव्हे. तर ती अंतःकरणाच्या उच्च भावनांची आहे अशी त्यांची दृढ समजूत होऊ लागली आहे. हल्लीचा युनिटेरियन समाज म्हणजे सुधारलेल्या पाश्चात्य जगाचे ‘प्रबुद्ध अंतर्याम’ (Enlightened Conscience) होय.४

युरोपात एकोणिसाव्या शतकात मानवी विचाराची व शोधाची ज्ञानमार्गामध्ये जी अभूतपूर्व प्रगती झाली तिचे फळ म्हणून युनिटेरियन धर्मपंथाला विसाव्या शतकाच्या आरंभी उदार व प्रगत रूप प्राप्त झाले. ही विचाराची गती चार निरनिराळ्या दिशांनी प्राप्त झाली, असे ह्या प्रक्रियेचे विठ्ठल रामजी शिंदे विवरण करतात. १) अनुभवजन्य शास्त्राच्या विकासाला प्रारंभ एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वी झाला असला तरी एकोणिसाव्या शतकात या शास्त्रांनी तात्त्विक दिशा घेतली आणि डार्विन व स्पेन्सर यांनी उत्क्रांती तत्त्वाची पटावी अशी मांडणी केली. २) अनुभवजन्य ज्ञानाबरोबरच जर्मनीत तत्त्वज्ञानाच्या पातळीवर विकास साधला गेला. कांट, हेगेल व त्यांच्या अनुयायांनी असा सिद्धान्त स्थापन केला की, विश्वातील भौतिक, मानसिक व नैतिक चमत्काराच्या मुळाशी एकाच स्वयंसिद्ध शक्तीचे कार्य अबाधितपणे चालू आहे. ३) शास्त्र व तत्त्वज्ञान यांच्या अभ्युद्यामुळे धर्माच्या ईश्वरप्रणीत त्त्वावर आघात. बायबलच्या जुन्या व नव्या कराराची निरनिराळी प्रकरणे कोणी, कधी, कशा स्थितीत लिहिली, त्यात ऐतिहासिक भाग किती व निव्वळ कल्पित भाग किती वगैरे गोष्टींची स्ट्रॉस, बॉवर, प्लीडरर इत्यादिकांनी निःपक्षपातीपणे चिकित्सा सुरू केली. ४) आणखी महत्त्वाचा प्रयत्न म्हणजे तुलनात्मक धर्मशास्त्राचा. युरोपमध्ये संस्कृतवरून अनेक नव्या व जुन्या भाषांचा तुलनात्मक अभ्यास सुरू झाल्यापासून जगातील प्रमुख धर्मग्रमथांचे मूळ भाषेतून अध्ययन, संशोधन होऊ लागले. त्याचप्रमाणे धर्माचा तुलनात्मक अभ्यास सुरू झाला. एवढेच नव्हे तर ख्रिस्त शतकापूर्वी तीन-चार हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या असीरियन, बाबिलोनियन, इजिप्शिअन संस्कृतीमधील धार्मिक शिलालेख उपलब्ध करून त्यांची मीमांसा सुरू झाली.

इतक्या विस्तृत प्रमाणावरून धर्मशास्त्राच्या नविन इमारतीचा पाया घातला गेला. ह्या प्रकारे शास्त्र, तत्त्वज्ञान, मीमांसा व इतिहास ह्या चारी बाजूंनी विचार करता हाच सिद्धान्त स्थापन झाला की, रानटी अवस्थेतील मानवी आत्म्यात प्रथम जागृती झाल्यापासून आतापर्यंत धर्मबुद्धीचा सारखा विकास होत आहे. ह्या चारही प्रकारे झालेल्या वैचारिक मंथनातून युनिटेरियन धर्मविचाराला सध्याचे विवेकशील स्वरूप प्राप्त झाले आहे. युनिटेरियनांमध्ये बुद्धिवाद जास्त व भक्ती कमी असा जो आक्षेप घेतला जातो तो रास्त नाही. बुद्धिवादाच्या संदर्भात असे म्हणता येईल की, बुद्धीला अग्राह्य वाटणा-या व आत्म्याच्या बुद्धीला केवळ अनावश्यक अशा गोष्टींत जिथे जुन लोक आग्रह धरतात तेथे युनिटेरियन उदासीन असतात. म्हणून युनिटेरियन सामान्यः नकारात्मक भूमिकेवरून बुद्धिवादाचा जितका उपयोग करतो तितका भावरूपत्वाने करीत नाही. म्हणून ईश्वराचे गुण, त्याचे व्यापार, त्याचे केवल स्वरूप, मानवी आत्म्याची मागील व पुढील स्थिती इत्यादी अनाकलनीय गोष्टीसंबंधाने युनिटेरियन आपले ठाम मत बनविण्याच्या भानगडीत पडत नाहीत. युनिटेरियनांचा बुद्धिवाद हा विचाराचा हटवाद, कृतीचे ढोंग आणि अंध परंपरा ह्यांचा निषेध करतो आणि विचाराची अश्रद्धता, मताचे औदासीन्य व कृतीचा निरूत्साह ह्यावर आपले विधिरूप अस्त्र सोडतो. विचाराचे पूर्ण स्वातंत्र्य आणि उपासनेचा सोहळा युनिटेरियन देवळात नित्य घडत असतो. त्यांच्या ठायी उत्कट भक्ती वसत असते. युनिटेरियन धर्मपंथाचे आजचे स्वरूप आहे ते या प्रकारचे.

ब्राह्मसमाज
पाश्चात्त्य जगात ज्याप्रमाणे ख्रिश्चन धर्मातून युनिटेरियन धर्मपंथ उत्क्रांत झाला त्याप्रमाणे हिंदुस्थानात पारंपरिक हिंदू धर्मातून ब्राह्मसमाज, प्रार्थनासमाज, आर्यसमाज हे एकेश्वरवादी धर्मपंथ उत्क्रांत स्वरूपामध्ये निर्माण झाले. पाश्चात्त्य जगातील ख्रिश्चन धर्म व हिंदू धर्म यांच्या स्वरूपामध्ये मात्र मोठा फरक आहे. हिंदुस्थानामध्ये पूर्वीच्या काळात व सध्याच्या काळातही विशिष्ट आणि ठरावीक मताविषयी फारसा आग्रह आढळून येत नाही. काही धर्मग्रंथ पूज्य मानण्यात येत असले तरी बायबल किंवा कुराणासारखा एकच एक धर्मग्रंथ निखालस प्रमाण मानला जात नाही. ज्याला हिंदू धर्माची प्रस्थानत्रयी मानण्यात येते ते ग्रंथ संस्कृतात असल्यामुळे धर्मवेत्ते त्याचे वेगवेगळेच नव्हे तर परस्परविरोधी अर्थ काढताना दिसतात. त्यामुळे सामान्य माणसाच्या धर्ममार्गात धर्मग्रंथाचा फारसा अडथळा येत नाही. उपासनेचा प्रकार हा सगळ्या हिंदूंत येथून तेथून सारखाच आढळत नाही. ती सामान्यतः स्थानिक बाब असते. एवढेच नव्हे तर प्रत्येक घरात पूजनीय देवांच्या प्रतिमांताचा देव्हारा सजविलेला असतो. त्यामुळे हिंदू धर्माची संघसंस्था ऊर्फ चर्च कधीच बनले नाही. हिंदू धर्म म्हणजे प्राचीन काळापासून चालत आलेली एक परंपरा आहे व हल्ली त्याचे शासन आणि नियमन असंख्य जातींचा एक मोठा व्यूह बनलेला आहे त्याच्याव्दारा होत आहे आणि त्याचा पाया आध्यात्मिक तत्त्वावर रचलेला नसून सामाजिक आणि कौटुंबिक हितसंबंधावर आधारलेला आहे. आठव्या शतकाच्या सुमारास येथे पहिले मोठे आचार्यपद स्थापण्यात आले. परंतु त्याची कामगिरीही लोकांच्या आध्यात्मिक गरजा समजून घेऊन भागविण्याची नसून केवळ जातिबंधनाच्या व्दारा हिंदू धर्माच्या जुन्या समजुती आणि विधी ह्यांची परंपरा शाबूत ठेवणे एवढीच आहे. हिंदुस्थानात खरे जुलमी साम्राज्य चालते ते आचार्य, उपाध्याय किंवा धर्मग्रंथ ह्यांच्यापैकी कुणाचेही नसून ते फक्त चालू वहिवाटीचे चालते. बाहेरून आलेल्या ख्रिस्ती आणि इस्लाम या धर्माचा रूढ हिंदू धर्मावर फारसा परिणाम झाला नाही.५

आधुनिक काळात भारतामध्ये घडलेला धर्मसुधारणेचा एक महत्त्वाचा प्रयत्न म्हणजे राजा राममोहन रॉय यांनी १८२८ मध्ये स्थापन केलेला ‘ब्राम्ह्यसमाज’ हा होय. आधुनिक भारताची घडण करणा-या श्रेष्ठ आद्य पुरुषांपैकी राजा राममोहन रॉय हे होत. सतीची चाल बंद करणे हे राजा राममोहन रॉय यांचे भारतीय पातळीवरील सामाजिक स्वरूपाचे महत्त्वाचे कार्य होय. त्याशिवाय  इंग्रजी शिक्षण, संस्कृत शिक्षण, स्त्रियांची सुधारणा, जातिनिर्मूलनाचे प्रयत्न इत्यादी सुधारणांना त्यांनी हात घातला. इंग्रज सरकारशी विरोध आणि सहकार्य अशी दुहेरी भूमिका ठेवू्न भारतीय जनतेचे अनेक अंगांनी कल्याण साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सामाजिक, शैक्षणिक सुधारणाविषयक कार्य त्यांनी केले असले तरी त्या सगळ्यांचा पाया धर्म हा होता. विठ्ठल रामजी शिंदे यांनी म्हटल्याप्रमाणे, “त्याचा धर्म म्हणजे केवळ एक मत किंवा मनोवृत्ती नसे तर साक्षात जीवन होता व ते जीवन ही सर्व बाजूंचे असे. राजकारण आणि आर्थिक अभ्युदय, धर्मसुधारणा आणि समाजसुधारणा ह्या सर्वांसाठी त्याचे जिणे, त्याचा प्रयत्न व त्याचे मरण ही घडली.”६

राजा राममोहन रॉय यांनी अरेबिक भाषेचा अभ्यास केला व कुराण मुळातून वाचले. त्यांनी संस्कृत भाषेचाही चांगला अभ्यास केला. चोविसाव्या वर्षी इंग्रजी भाषा शिकायला सुरुवात करून तीमध्ये पारंगतता मिळविली. जगातील महत्त्वाच्या धर्मग्रंथांचा मूळ ग्रंथांच्या आधारे त्यांनी अभ्यास केल्यामुळे त्यांची धर्मकल्पना व्यापक, उदार व पूर्वग्रहरहित अशी झाली. राजा राममोहन रॉय हा तुलनात्मक धर्मशास्त्राचा जगातला पहिला संशोधक होय, असे सर मॉनियर वुइल्यम्स यांनी म्हटले आहे. मूर्तिपूजेमुळे प्रचलित हिंदू धर्मामध्ये किती अनर्थ होत आहेत याची त्यांना जाणीव झाली. रूढ हिंदू धर्माच्या नावाखाली कित्येक अनाचार माजले होते. दुर्गापूजेच्या निमित्ताने किळसवाणा हिंसाचार चालू होता. अघोरी पंथाचे भयंकर प्रकार धर्माच्या नावाखाली चालू होते. नीतिबंधने ढिली झाली होती. व्यसनासक्ती वाढली होती. एकंदरीत समाजाची नैतिक पातळी खालावली होती. अशा कळात राजा राममोहन रायांनी मुळातील हिंदू धर्माचे उज्ज्वल रूप ध्यानात घेऊन ब्राम्ह्यमताची मांडणी केली व १८२८ मध्ये ब्राह्मसमाजाची स्थापना केली. परमेश्वर एक आहे; आम्ही सर्व त्याची बालके आहोत; आम्हामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव राखण्याची आवश्यकता नाही; परमेश्वराचे मानसिक भजन, पूजन करणे हाच त्याच्या भक्तीचा योग्य मार्ग आहे, ही ब्राम्ह्यसमाजाची तत्त्वे म्हणून त्यांनी उद्घोषित केली. राजा राममोहन रॉय यांनी ब्राम्ह्य मंदिराच्या ट्रस्टडीडमध्ये भेद न करण्याच्या तत्त्वाला प्राधान्य दिले आहे. त्यात म्हटले आहे, “सनातन ईश्वराच्या उपासनेकरिता कोणताही भेद न राखता सर्वांनी जमण्याची जागा.” तसेच “परमेश्वर अचिन्त्य, विश्वाचा कर्ता आणि भर्ता व कोणत्याही विशिष्ट नावाने न ओळखला जाणारा” असे वर्णन केले आहे. सत्य, न्याय आणि सहिष्णुता यांची बूज राजा राममोहन रॉय यांनी ट्रस्टडीडमध्ये राखलेली आढळते. अन्य कुणाचेही उपास्य दैवत झालेल्या जिवंत अथवा जड वस्तूची ब्राह्मोपासनेत कोणत्याही प्रकारे निंदा अथवा थट्टा करू नये, असे नमूद केले आहे. राजा राममोहन रॉय यांना ब्राह्मसमाजाच्या कार्याचा विस्तार करावयाला अवधी मिळाला नाही. समाजाची स्थापना केल्यावर दोन वर्षांनी म्हणजे १८३० मध्ये ते विलायतेस गेले व तिकडेच वारले. राजा राममोहन रॉय यांच्या नंतरचे प्रमुख आचार्य पंडित विद्यावागीश यांचा देवेंद्रनाथ ठाकूरांना परिचय झाला. देवेंद्रनाथ ठाकूर यांचा धर्मचिंतनाकडे ओढा सुरू झालेला होता. प्रतिमापूजनावरील त्यांचा विश्वास पूर्णपणे उडाला होता. उपनिषदातील धर्मविचाराकडे ते आकृष्ट झाले होते. उपनिषदामधील तत्त्वांची चर्चा करण्याच्या व बोध करण्याच्या हेतूने १८३९ मध्ये ‘तत्त्वबोधिनी सभा’ नावात एक संस्था त्यांनी स्थापन केली व संस्कृत भाषेतील उपनिषदामधील विचार सर्वसामान्य लोकांना बंगाली भाषेतून कळावा यासाठी तत्त्वबोधिनी पत्रिकाही काढली.

१८४१-४२ च्या सुमारास महर्षी देवेंद्रनाथ ठाकूर ब्राह्मसमाजात दाखल झाले व वृद्ध पंडित विद्यावागीश यांनी ब्राह्मसमाजाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली. देवेंद्रनाथांनी उपनिषदांतील तत्त्वविचारांच्या आधारे ब्राह्ममताची मांडणी केली. देवेंद्रप्रणीत ब्राह्मसमाजाला ‘आदि ब्राह्मसमाज’ असे अभिधान मिळाले. ‘आदि ब्राह्मसमाजा’ची तत्त्वे पुढीलप्रमाणे मांडण्यात आली :

१. प्रथम फक्त एक परब्रह्म परमेश्वर होता दुसरे काही नव्हते. त्यानेच सर्व सृष्टी उत्पन्न केली आहे.
२. तो ज्ञानस्वरूप, अनंतस्वरूप, मंगलस्वरूप, नित्य, नियंता, सर्वज्ञ, सर्वव्यापी, सर्वाश्रय, निरवयव, निर्विकार, एकमेवाद्वितीय, सर्वशक्तिमान, स्वतंत्र आणि परिपूर्ण आहे. त्याच्याशी कुणाचीही तुलना करता येत नाही.

३. फक्त त्याचीच उपासना केल्याच्या योगे इहपरलोकी सुख प्राप्त होते.

४. त्याच्यावर प्रीती करणे व त्याला प्रिय अशी कार्ये करणे हीच त्याची खरी उपासना.

१८५७ मध्ये केशवचंद्र सेन यांनी ब्राह्मसमाजामध्ये प्रवेश केला. केशवचंद्र सेन यांची आध्यात्मिक तळमळ व ब्राह्मसमाजाला नेतृत्व देण्याची क्षमता ध्यानात घेऊन महर्षी देवेंद्रनाथ ठाकूर यांनी १८६२ मध्ये त्यांची आचार्यपदी स्थापना केली. हे आचार्यपद त्यांनी १८७८ पर्यंत सांभाळले. ह्या अवधीत ब्राह्मसमाजाच्या कार्याचा त्यांनी अपूर्व विस्तार केला. बारा ठिकाणी ब्राह्मसमाजाच्या शाखा होत्या. केशवचंद्रांनी पुढील पंधरा वर्षांत हिंदुस्थानच्या निरनिराळ्या प्रांतांत व भाषांमध्ये शाखा स्थापन केल्या. थोड्या सुशिक्षित लोकांपुरत्या मर्यादित असलेल्या ब्राह्मसमाजाचा केशवचंद्रांनी आबाल-वृद्ध, स्त्री-पुरुष व स्वकीय-परकीय यांमध्ये प्रसार केला. केशवचंद्र सेन यांनी आपल्या अमोघ वक्तृत्वाने केवळ भारतातच नव्हे तर इंग्लंडमधील विद्वान राज्यकर्ते व सामान्य लोक यांच्यावरही दांडगा प्रभाव पाडला. १८७१ मध्ये विलायतेहून परत आल्यानंतर ब्राह्म धर्मप्रचाराच्या जोडीनेच समाजसुधारणेचे कार्यही त्यांनी धडाडीने सुरू केले. स्वस्त वाङ्मय, स्त्रीविमोचन, लौकिकशिक्षण, मद्यपानबंदी व अपंगांची सेवा ह्या पंचसूत्रीच्या अनुरोधाने त्यांनी समाजसुधारणेचे हे काम सुरू केले. धर्मविषयाची ही दुसरी बाजू तितकीच महत्त्वाची होती. केशवचंद्रांचे हे कार्य जोमदारपणे चालले असता १८७८ मध्ये केशवचंद्रांच्या विरोधात साधारण ब्राह्मसमाज नावाची, अधिक विकसित स्वरूपाची आवृत्ती निर्माण झाली. ब्राह्मसमाजाच्या स्थापनेपासून राजा राममोहन रॉय, देवेंद्र  अथवा केशवचंद्र ह्या एकेका प्रभावी व्यक्तीची सत्ता चालत होती. पण  ब्राह्मसमाज ही स्वतंत्रतावादी संस्था होती, साधारण ब्राह्मसमाजाच्या निर्मितीला निमित्त केशवचंद्रांच्या चौदा वर्षांहून कमी वय असलेल्या मुलीच्या लग्नाचे झाले. ब्राह्म वधूचे वय किमान चौदा वर्षाचे असावे असा सरकारी कायदा केशवचंद्रांनी पास करून घेतला होता व त्यांच्या स्वत:च्या मुलीचे वय चौदाहून थोडेसे कमी असता कुचबिहारच्या राजकुमाराशी तिचा विवाह त्यांनी केला होता. व्यक्ती कितीही मोठी असो, समाजाच्या मताप्रमाणे तिची वागणूक घडली पाहिजे ह्या तात्त्विक भूमिकेनरून व अनुष्ठानाच्या मुद्द्यावरून केशवचंद्रांच्या प्रिय शिष्यांनीही त्यांचे नेतृत्व झुगारून दिले व ‘साधारण ब्राह्मसमाजाची’ची स्थापना केली. ह्यानंतर ब्राह्मसमाजात स्त्रिया, तरुण, लहान मुले, वृद्ध, विद्वान गृहस्थ आणि कामकरीवर्ग ह्या सर्वांचा समान दर्जाने समावेश होऊ लागला व साधारण ब्राह्मधर्माच्या शाखा भारतभर जोमाने सुरू झाल्या.

पाश्चात्यांचा युनिटेरियन समाज असो, की हिंदुस्थानातील ब्राह्मसमाज असो ह्या एकेश्वरी पंथाच्या उभारणीमध्ये काही समान तत्त्वांचा आढळ होतो. ह्या समान तत्त्वांचे विवरण विठ्ठल रामजी शिंदे यांनी ब्राम्ह्य तत्त्वांच्या अनुरोधाने उत्तम प्रकारे केले आहे. पहिले तत्व म्हणजे मोकळा विश्वास हे आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक मनुष्यामध्ये बुद्धी अथवा विवेक म्हणून एक शक्ती असते त्याप्रमाणे त्याच्यामध्ये श्रद्धा अथवा विश्वास अशी असते. ब्राह्मधर्माचे तत्त्व असे आहे की, ह्या विश्वासाला कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध अथवा दडपण असू नये. स्वाभाविक कारणांनी विश्वास कमी होत असेल किंवा नष्ट होत असेल तर तो होऊ द्यावा. अन्य कारणांनी नवा विश्वास उत्पन्न होत असेल अथवा जुना दृढ होत असेल तरी तो होऊ दिला पाहिजे हे मोकळ्या विश्वासाचे लक्षण होय. ब्राह्मचे दुसरे तत्त्व म्हणजे आपले ज्ञान सतत वाढते राहील ह्या गोष्टीला दिलेले महत्त्व. अद्वैतवाद्यांचा अद्वैत सिद्धान्त हे वाढते ज्ञान नव्हे. प्रत्येक व्यक्तीस जे नवे नवे अनुभव येतात, आजूबाजूच्या वातावरणात जे नाना प्रकारचे शोध लागतात त्या सर्वांचा सुसंस्कार होऊन व्यक्तीची जी प्रज्ञा तयार होते ती प्रगमनशीलच असणार. असे नवे ज्ञान सतत आत्मसात करणा-या वृत्तीचे ब्राह्मधर्मास महत्त्व वाटते. शुद्ध प्रीती हे ब्राह्माचे तिसरे तत्त्व. ही प्रीती कोणत्याही लाभाच्या अपेक्षेशिवाच असावी लागते. निरंतर आणि निर्लोभ प्रेम हे ब्राह्मधर्माचे तिसरे आवश्यक लक्षण आहे. ब्राह्मधर्माचे चौथे लक्षण सात्त्विक सेवा हे होय. अपेक्षारहित प्रमभावनेने सेवा केली म्हणजे निराशा आणि शीण येण्याचा संभव नसतो उलट ही सात्त्विक सेवा करीत असता प्रतिक्षण आनंदच होत असतो.७

संदर्भ
१. केसरी, १२ नोव्हेंबर १९४०
२. टो. ना. (आर.) ख्रिश्चन धर्म आणि आधुनिक विवेकवादाचा उद्य, नवभारत, डिसेंबर १९७८-जानेवारी १९७९
३. जे. डब्ल्यू. आयरन, ख्रिस्ती धर्म, मराठी विश्वकोश, खंड ४, पृ. ७५३.
४. विठ्ठल रामजी शिंदे, ‘युनिटेरियन  समाज लेख, व्याख्याने व उपदेश, पृ. ४१, ४७.
५. विठ्ठल रामजी शिंदे, यांचे अँमस्टरडॅम येथे १९०३ सप्टेंबरमध्ये भरलेल्या उदार धर्माच्या
   सभेपुढील भाषण, लेख, व्याख्याने व उपदेश, पृ. १५६.
६. तत्रैव, पृ. १५७.
७. विठ्ठल रामजी शिंदे, ‘ब्राम्ह्यधर्म व ब्राम्ह्यसमाज’, तत्रैव, पृ. १४३-४५.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य

   निवेदन
    लेखकाचे मनोगत
    दुस-या व तिस-या आवृत्तीच्या निमित्ताने
    प्रस्तावना 
 -   अंत:प्रेरणेचा निर्णय
 -   आजी-आजोबा आणि आई-वडिल
 -   बालपण 
 -   कॉलेजची पहिली दोन वर्षं
 -   जनाबाईंची संसारकथा
 -   जनाबाईंचे शिक्षण
 -   हुजूरपागा शाळा आणि शांता सुखटणकरची
     करुण कहाणी
-    इंटरमीजिएटचे दुसरे वर्ष
 -    पदवी परीक्षेचा अभ्यास आणि एकोणिसाव्या
      शतकाच्या अखेरचे पुणे
   प्रार्थनासमाजाची दीक्षा 
 -    पदवी परीक्षा
 -   अंत:स्थ भावजीवनातील खळबळ 
 -    एकेश्वरी उदार धर्मपंथ
 -    प्रार्थनासमाज
 -    धर्मशिक्षणासाठी निवड आणि परदेशगमन
 -    मुंबई ते ऑक्सफर्ड
 -     मॅंचेस्टर कॉलेज
 -    ऑक्सफर्डमधील पहिले दोन महिने
 -    नाताळची सुट्टी : मुक्काम लंडन 
 -    पत्रांचा विरंगुळा
 -    दक्षिण किना-यावरील पंधरवडा
 -    प्रोफेसरांच्या कुटुंबात सरोवर प्रांती
 -    एडिंबरो आणि स्कॉच सरोवरे
 -    हिंदू गृहस्थिती आणि समाजस्थिती 
      व्याख्यान व नाट्यप्रयोग 
 -    पारीस येथील एक महिना
 -   लिव्हरपूल येथील त्रैवार्षिक युनिटेरियन परिषद
 -    ऑक्सफर्डमधील शेवटची टर्म
 -    ऍमस्टरडॅम येथील आंतराष्ट्रीय उदार धर्मपरिषद
 -    परतीचा प्रवास
 -    स्वदेशी आगमन, बडोदा भेट आणि
      धर्मप्रचारकार्याला प्रारंभ
 -    मद्रासच्या परिषदा आणि हिंदुस्थानचा दौरा
-    जमखंडी-मुधोळ येथील प्रचारकार्य
 -    काठेवाडचा दौरा 
 -    मुंबईतील बि-हाड आणि प्रार्थनासमाजातील नवचैतन्य
 -    धर्मप्रचाराचे विस्तारित कार्य
 -    कौटुंबिक अडचणी, पुणे प्रार्थनासमाजातील नवचैतन्य
 -    धर्मप्रचारार्थ दौरा
 -    प्रवासातील अनुभव
 -    जनाबाई पनवेलमध्ये शिक्षिका
 -    विविध प्रार्थनासमाजांतील सहभाग
 -    भारतीय एकेश्वरी धर्मपरिषद
 -    ब्राह्मधर्मसूची ग्रंथ
 -    अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीविषयक कार्याचे प्रारंभिक प्रयत्न
 -    मिशनच्या स्थापनेचा संकल्प
 -    मिशनची स्थापना
 -  मिशनची घटना व पुणे येथील अंगभूत शाखा
 -    मिशनमधील दोन समारंभ 
 -    मिशनच्या स्थापनेनंतर वातावरणातील बदल
 -    निधीची योजना
 -    मुंबई प्रार्थनासमाजाशी दुरावा आणि फारकत
 -    पुण्यास स्थलांतर
 -    मिशनची महाराष्ट्र परिषद
 -    तुकोजीराव महाराजांची देणगी व मांगांचे
      शेतकी खेडे वसविण्याचा प्रयत्न
 -   अहल्याश्रमाची पूर्वतयारी 
 -    मराठ्यांची सांस्कृतिक जबाबदारी 
 -    काँग्रेसमध्ये अस्पृश्यतानिवारणाचा ठराव
 -    अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीची दिशा व मार्ग
 -    अस्पृश्यतानिवारक परिषद
 -   राष्ट्रीय प्रवाहात मराठा समाज
 -    अस्पृश्यवर्गाचे कायदेमंडळात प्रतिनिधित्व
 -    गैरसमजाचा ससेमिरा 
 -    १९२० सालातील निवडणूक 
-    शिंदे आणि ब्राह्मणेतर पक्ष
 -    कुटुंबातील मृत्यू
 -    मुलींसाठी सक्तीचे शिक्षण
 -    मद्यपाननिषेधाची चळवळ व अन्य सामाजिक कार्य
 -    मिशनचा कार्यविस्तार : कर्नाटक-मध्यप्रांतातील शाखा 
 -    मिशनसंबंधी आक्षेप व समस्या
 -    मिशनची पुनर्घटना
 -    खटल्याचा दैवदुर्विलास
 -    मिशनमधील सहकारी व सहका-यांच्या
       दृष्टीतून विठ्ठल रामजी शिंदे
 -    मंगलोरमधील कार्य
 -   व्हायकोम सत्याग्रह
 -    मंगलोर ब्राह्मसमाजातील पेचप्रसंग
 -    कौटुंबिक उपासनामंडळ
 -    सत्याग्रहात सहभाग आणि नेतृत्व
 -    अस्पृश्यतानिवारणाचे कार्य व म. गांधीशी संबंध
 -    येरवड्याच्या तुरुंगात
 -    ब्रह्मदेशाची यात्रा 
 -    शेतकरी चळवळ
 -    परिषदा, संमेलने यांमधील सहभाग
 -   कौटुंबिक वातावरण
 -    बहुमान, अवमान आणि निष्ठा
 -    वाई ब्राह्मसमाज आणि ग्रामीण भागातील धर्मकार्य
 -    विचारविश्व
 -    साहित्यसेवा आणि संशोधनकार्य
 -   अपूर्व स्नेहसंमेलन
 -   अखेरचे दिवस
 -   उपसंहार 
 -   परिशिष्टे १/२ आणि ३ 
 -   मनोगते
 -   महर्षी शिंदे यांचे फोटो व काही हस्तलिखिते