महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य

ऑक्सफर्डमधील शेवटची टर्म

ऑक्सफर्ड विद्यापीठातील शेवटची तिसरी टर्म १ मे ते ३० जून अशी दोन महिन्यांची असे. १९०३ मधील मे आणि जून हे दोन महिने म्हणजे शिंदे यांच्या मँचेस्टर कॉलेजमधील अध्ययनाची अखेरची टर्म होती. या टर्मच्या अखेरीबरोबर त्यांचे ऑक्सफर्ड येथील वास्तव्यही संपणार होते. कॉलेजमधील प्रोफेसरांचा व मित्रांचा तसेच विश्वविद्यालयाचा निरोप घेण्याचे दिवस जवळ येत चालले तसतशी शिंदे यांना फार हुरहूर वाटू लागली.

पुण्यामध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना हर्बर्ट स्पेन्सर, मॅक्समुल्लर, डॉ. मार्टिनो वगैरे अत्यंत नामांकित मंडळींचे ग्रंथ वाचून त्यांच्यावर शिंदे यांची श्रद्धा बसली होती. ते इंग्लंडात गेले तेव्हा त्यांच्यापैकी कोणी हयात नव्हते. प्रो. मॅक्समुलर यांचे घर युनिव्हर्सिटी पार्कजवळच होते. तेथे ते मिसेस् मॅक्समुल्लर यांना भेटण्यास गेले. आपल्या नव-याचा एक हिंदी चाहता आणि अनुयायी आपल्याला भेटावयाला आला याचा त्यांना फार संतोष वाटला. शिंदे लवकरच इंग्लंड सोडणार असल्यामुळे त्यांचा स्वदेशातील पत्ता विचारून घेतला. ते स्वदेशी आल्यानंतर ह्या बाईंनी प्रो. मॅक्समुल्लरची सर्व प्रसिद्ध लेक्चर्स, तुलनात्मक धर्मावरील पुस्तके आणि हिंदू षड्दर्शने अशी पुस्तके त्यांना भेट म्हणून पाठविली.

ऑक्सफर्डपासून दीड-दोन मैलांवर बेंझी नावाचे एक अगदी लहान खेडे होते. तेथे एक जुने, ओसाड उपासना मंदिर होते. शिंदे केव्हा केव्हा विश्रांतीसाठी तेथे जात. शेवटचा एकांतवास करण्यासाठी ते तेथे गेले व दोन वर्षांचे सिंहावलोकन केले. ऑक्सफर्ड सोडण्याच्या कल्पनेने त्यांना उदासीन वाटत होते. मात्र याच काळात ऑक्सफर्ड शहरात आनंदाचा मोठा गलबला माजला होता. टर्मच्या या आठवड्यात दोन महत्त्वाच्या गोष्टी ऑक्सफर्डला घडत. त्यांपैकी एक बोटींच्या शर्यती आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा वार्षिक पदवीदान समारंभ.

टर्मच्या शेवटच्या आठवड्यास ‘एट्स वीक’ म्हणत असत. ह्या आठवड्यात निरनिराळ्या कॉलेजच्या आठ बोटींची टेम्स नदीवर चुरशीची शर्यत (म्हणजे Regatta) होत असे. ऑक्सफर्डजवळील टेम्स नदीच्या भागाला आयसीस हे नाव आहे. आठही कॉलेजचे प्रत्येकी आठ आठ विद्यार्थी एकेका बोटीत बसलेले असत. कॉलेजातील बहुतेक विद्यार्थी आपापल्या बोटींच्या बाजूने किना-याने उभे असत. बोटी वेगाने धावू लागल्या म्हणजे किना-यावरील मंडळी बेहोष होऊन ओरडत, कर्णे फुंकत, हातवारे करीत धावत असत. ह्यात केव्हा केव्हा कॉलेजातील शिक्षकही भाग घेत. हा गदारोळ आठवडाभर चालत असे.

विठ्ठल रामजी शिंदे हे ज्या काळी ऑक्सफर्ड येथे शिक्षण घेत होते त्या काळी स्त्रियांना पदवी देण्याची तयारी ह्या कर्मठ विद्यापीठाने दाखविली नव्हती. तेव्हा स्त्रियांची कॉलेजेस ऊर्फ हॉल्स होते. तेथे स्त्रियांना शिक्षण घेण्याची मुभा होती. मात्र परीक्षेत पास होणा-या विद्यार्थिनींना विद्यापीठातून पदवी दिली जात नसे. पास झालेल्या स्त्रियांना पदव्या मिळाव्यात असा विचार ह्या सुमारास पुढे आला तेव्हा पुरुष विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला आणि दंगा केला. कॉलेजच्या खिडक्यांची तावदाने फोडून काढली. शिंदे यांना खिडक्यांची फुटलेली तावदाने पाहताना आपण जणू काय विद्यार्थिनींच्या भग्न आशाच पाहत आहोत असे वाटले.

पदवी देण्याच्या बाबत कर्मठ असणारे हे विद्यापीठ स्त्रियांचा शिक्षणातील सहभाग मात्र चालू ठेवीत होते व स्त्रियांना सामाजिक जीवनात प्रतिष्ठाही देत होते. ह्या विद्यापीठाची प्रतिष्ठा दांडगी होती. श्रीमंतांची, अमीर-उमरावांची मुले या विद्यालयात सामाजिक व संभावित वळण मिळावे यासाठी येत असत. शिंदे यांच्या काळात ऑक्सफर्डमधील सतरा-अठरा कॉलेजांतून चार-पाच हजार विद्यार्थी शिकत असत. ह्या आठवड्यात होणा-या बोटींच्या शर्यती, इतर संमेलने आणि पदवीदान समारंभ यासाठी विद्यार्थी आपल्या स्त्री-नातलगांना बोलावून घेत असत. सभा, संमेलने, पार्ट्या, भोजने इत्यादी प्रसंगांची यावेळी गर्दी उडत असे. इंग्रजी विवाह स्वयंवर पद्धतीचा असल्यामुळे परस्पर परिचयाला हा काळ फार अनुकूल ठरतो. इंग्रज समाजाचा ध्येयवाद व्यवहाराल नेहमी समांतर असतो असे आपले निरीक्षणही शिंदे यांनी नमूद केले आहे.१

२४ जून १९०३ रोजी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा मोठा वार्षिक पदवीदान समारंभ झाला. समारंभाचे स्थळ शेल्डोनियन थिएटर दोन हजार लोकसमुदायाने गच्च भरले होते. त्यात तीनचतुर्थांशावर स्त्रियाच होत्या. बोटीच्या शर्यतीच्या आधीच्या आठवड्याप्रमाणेच हा आठवडाही मोठा चैनीचा असे. परीक्षा आटोपल्यामुळे विद्यार्थी मोकळे असतात. चोहीकडे नाच, मेजवान्या व खेळ चालतात. विद्यार्थी मुद्दाम बोलावून आणलेल्या बहिणी व मेहुण्या यांचा आदरसत्कार करण्यास उत्सुक असतात.

बारा वाजता सिनेटची मिरवणूक आत आली. सन्मानाच्या पदव्या देण्यासाठी बोअर युद्धातील यशस्वी वीर सर जॉर्ज व्हाईट होते. समारंभातील सर्व भाषणे लॅटिनमध्ये झाली. ही पुराणप्रियता शिंदे यांना त्या वेळीही हास्यास्पद वाटली. अंडरग्रॅज्युएट विद्यार्थी गोंधळ करतात म्हणून त्यांच्या प्रवेशावर मर्यादा घालण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते आत प्रवेश मिळवीत असत. ह्या पदवीदानाच्या गंभीर प्रसंगी एकाने बायकांसारखा आवाज काढला, तर दुस-याने मांजराच्या आवाजाची नक्कल केली. व्हाईटसाहेबांनी काहीतरी बोलावे म्हणून तीन-चार मिनिटे टाळ्या वाजवून थिएटर दणाणून टाकले. मग त्यांचे भाषण सुरू असताना ते लवकर संपेना म्हणून गोंगाट व आरडाओरडा सुरू केला. पदवीदानासारख्या गंभीर प्रसंगी दंगा घालण्याचा आपला हक्क दंगेखोर विद्यार्थी जो जगभर बजावितात, त्याला निदान ऑक्सफर्डसारख्या नामांकित विद्यापीठाची शंभर वर्षांची तरी जुनी परंपरा आहे, असे नक्कीच म्हणता येते. ते काही असो, वर्षभर गंभीरपणे अध्ययन-अध्यापन ज्या विद्यापीठात चालू असते तिथला हा प्रसंग म्हणजे काही क्षणांचा केवळ करमणुकीचा भाग वाटावा एवढा नगण्य म्हणावा लागतो.

शिंदे यांचे विलायतेहून परत येण्याचे दिवस जवळ येत चालले. त्यांच्या प्रवासखर्चाबाबत एक विघ्न अनपेक्षितपणे उपस्थि झाले. विलायतेला येताना शिंदे यांना बोटीच्या प्रवासाचा खर्च श्रीमंत सयाजीराव महाराजांनी दिला होता व स्वदेशी परत जाण्याचा खर्चही देण्याचे त्या वेळीच मान्य केले होते. त्याप्रमाणे त्यांच्या कॉलेजातील अभ्यासाबद्दल कॉलेज अधिका-याकडून रिपोर्ट मागविण्यासंबंधी महाराजांकडून हुकूम झाला होता. त्याप्रमाणे मँचेस्टर कॉलेजचे प्रिन्सिपॉल डॉ. जेम्स ड्रमंड व शिंदे यांचे विशेष गुरू डॉ. जे. एस्लिन कार्पेंटर यांचे त्यांच्या अभ्यासाबद्दल रिपोर्ट महाराजांकडे पाठविण्यात आले. दोघांचे रिपोर्ट अत्यंत समाधानकारक होते.

प्रिन्सिपॉल ड्रमंड यांनी ४ मार्च १९०३ रोजी लिहिलेल्या प्रमाणपत्रामध्ये कॉलेज कमिटीला जून १९०२ मध्ये शिंदे यांच्याबद्दल सादर केलेल्या रिपोर्ट उद्धृत केला आहे. त्यात असे म्हटले आहे की, त्यांनी ‘सेल्फ रियलायझेशन’, ‘जेनेसिस ऑफ फ्री वुइल’ असे दोन तत्त्वज्ञानात्मक स्वरूपाचे निबंध लिहिले असून त्यामध्ये त्यांनी विचारांचा स्वतंत्रपणा दाखविला आहे. हिंदुस्थानातील धर्माचा इतिहास या विषयावर त्यांनी पंधरवड्याला लिहावयाचे निबंध उत्तम लिहिले आहेत उन्हाळी टर्ममध्ये प्रो. कार्पेंटर यांच्यासमवेत पालीचा अभ्यास त्यांनी केला असून त्यांच्या संस्कृतच्या पूर्वतयारीमुळे उत्तम प्रगती केली आहे. शैव आणि बौद्ध धर्मातील अवतारकल्पनेबद्दल त्यांनी विचारप्रवर्तक निबंध लिहिलेला आहे. प्रो. जे. एस्लिन कार्पेंटर यांनी १ मार्च रोजी लिहिलेल्या प्रमाणपत्रात दोन्ही वर्षांमध्ये शिंदे यांनी धर्माचा इतिहास या विषयावर लिहिलेल्या निबंधामध्ये त्यांची उद्यमशीलता, दक्षता व आकलनाची आंतरिक दृष्टी दिसून येते असे म्हटले आहे. दुस-या वर्षी त्यांच्याकडून करून घेतलेले काम हे स्वाभाविकपणेच प्रगत स्वरूपाचे असून त्यांनी ते अत्यंत समाधानकारक रीतीने केलेले आहे. त्यांनी केलेल्या अभ्यासामध्ये हिंदू धर्म, इस्लाम, झरतुष्ट्राचा धर्म आणि चीनचा धर्म एवढ्यांचा समावेश होतो.

दर आठवड्याला त्यांनी पाली भाषेतील बौद्ध ग्रंथ माझ्यासमवेत वाचले असून त्यांना असलेल्या संस्कृत ज्ञानाच्या आधारे ते उत्तम प्रगती करू शकतात हे दाखवून दिल आहे.२

मँचेस्टर कॉलेजकडून महाराजांकडे हे रिपोर्ट गेल्यानंतर शिंदे यांनी प्रवासखर्चाबद्दल त्यांच्याकडे अर्ज केला असता सेक्रेटरीकडून पत्र ले की, ते स्वदेशी परत गेल्यावर बडोदे संस्थानात नोकरी करण्याबद्दलचा करार लिहून दिला तर हा खर्च मिळेल. शिंदे यांनी १ मे १९०३ रोजी महाराजांना स्वतंत्र खुलाशाचे पत्र लिहिले. त्यात त्यांनी म्हटले, “मला जी युनिटेरियन स्कॉलरशिप मिळाली होती तिची एक शर्त अशी होती की, मी आजन्म स्वतःला धर्मप्रचारासाठीच वाहून घेईन. यदाकदाचित माझ्या योगक्षेमाची कोणी जबाबदारी घेतली नाही तर या प्रचाराला प्रतिकूल होणार नाही असेच एखादे काम करून उदरनिर्वाह करीन; पण प्रचार सोडणार नाही. महाराजांनी हे सर्व पसंत केले होते. म्हणून आता कोणतीही हरकत न घेता स्वदेशी परत जाण्याला मला ते मदतच करतील”३ शिंदे यांनी पाठविलेल्या ह्या पत्रामुळे हा अनपेक्षित अडथळा दूर झाला. तसेच त्यांची प्रवासखर्चाची काळजीही मिटली. श्रीमंत सयाजीराव महाराजांकडे हे पत्र पोहोचताच त्यांनी टॉमस कुक कंपनीकडे तारेने तिकीट देण्याबद्दल हुकू केल्याचे त्यांच्या प्रायव्हेट सेक्रेटरीने शिंदे यांना कळविले.

शिंदे हे प्रवासखर्चाच्या अडचणीमुळे व्यस्त असताना त्यांना कलकत्ता येथील साधारण ब्राह्मसमाजाचे सेक्रेटरी श्री. हेमचंद्र यांनी एक महत्त्वाची वार्ता कळविली. ऍमस्टरडॅम येथे १ ते ४ सप्टेंबर १९०३ ह्या दिवशी भरणा-या आंतरराष्ट्रीय उदार धर्मपरिषदेसाठी त्यांना ब्राह्मसमाजाने हिंदुस्थानचा प्रतिनिधी म्हणून निवडले आहे. एरव्ही कॉलेजची उन्हाळी टर्म जून अखेरीस संपताच विठ्ठल रामजी शिंदे हे हिंदुस्थानला परत येऊ शकले असते. आता ऍमस्टरडॅम येथील परिषदेस त्यांना हजर राहावयाचे असल्यामुळे व ती परिषद सप्टेंबरला भरणार असल्याकारणाने दरम्यानचा तीन महिन्यांचा खर्च आणि जादा प्रवासखर्च यांची त्यांना फिकीर पडली. ह्या जादा होणा-या खर्चाची तरतूद करण्यासाठी मुंबई प्रार्थनासमाजातील त्यांचे मित्र श्री. बाबण बापू कोरगावकर यांनी वर्गणी गोळा करण्याचे परिश्रम घेऊन २५ जुलै १९०३ रोजी पत्राने १३ पौंड, ६ शिलिंग, ८ पेन्स म्हणजे दोनशे रुपयांचा चेक पाठविला. कलकत्त्याहून तेवढीच रक्कम मिळेल असे श्री. हेमचंद्र सरकार यांनी शिंदे यांना कळवले. त्यामुळे त्यांची जादा खर्चाची अढचण दूर झाली.

कॉलेजची उन्हाळी टर्म संपत आली आणि विठ्ठल रामजी शिंदे यांना आपल्याला ऑक्सफर्ड लवकरच सोडावे लागणार या जाणिवेने वाईट वाटू लागले. तसे म्हटले तर ऑक्सफर्ड येथील वास्तव्याचा काळ म्हणजे काही सुखासीन ऐश्वर्याच काळ नव्हता. त्यांना मिळणारी सालिना १०० पौडांची स्कॉलरशिप खर्चाची तोंडमिळवणी करण्याच्या दृष्टीने तशी तुटपुंजीच होती. सुटीच्या काळात अन्य ठिकाणांहून येणारी उपासनेची निमंत्रणे ते स्वीकारीत. त्याचा मोबदला म्हणून मिळणारी रक्कम खर्चाची तोंडमिळवणी करण्याच्या दृष्टीने उपयोगी पडत असे. काटकसरी राहणीमुळे त्यांना आर्थिक अडचण अशी जाणवली नाही. ऑक्सफर्ड येथील वास्तव्यात अध्ययनाच्या स्वरूपात त्यांना जे मिळाले ते कितीतरी नवीन आणि मौल्यवान होते. प्रोफेसरांचा आणि इतर विद्वानांचा त्यांना जो सहवास मिळाला त्यातून ते कितीतरी शिकले होते. एक प्रकारच्या आंतरिक धर्मप्रेरणेने त्यांनी आपले आयुष्य धर्मकार्यासाठी वेचण्याचे ठरविले होते. हे धर्मकार्य भावी आयुष्यामध्ये आपण समाधानकारकपणे पार पाडू शकू एवढा आत्मविश्वास त्यांना येथील वास्तव्यामधून आणि इंग्लंडभर त्यांनी केलेल्या निरीक्षणातून आला होता. त्यांची मुळातच व्यापक असलेली धर्मदृष्टी स्वच्छ झाली होती. त्यांच्या धर्मबुद्धीला येथील वास्तव्यात अनेक पैलू पडले आणि त्यांची धर्मजाणीव समृद्ध झाली. जीवनातील सर्व कार्याचे अधिष्ठान धार्मिकच असावयास पाहिजे अशी स्पष्टता त्यांच्या धर्मविचाराला आली. हे सारे येथे केलेल्या अध्ययनातून, गुरुजनांच्या उपदेशातून, अन्य विद्वानांच्या व धर्मनिष्ठांच्या सहवासातून, परोपकारी कार्य करणा-या संस्थांच्या निरीक्षणातून त्यांना प्राप्त झाले होते. ह्या सा-यांबद्दल त्यांच्या मनामध्ये कृतज्ञतेची जाणीव निर्माण झाली. त्यांच्या आयुष्यातील दोन वर्षांचे हे सुखस्वप्न अखेर संपले. टर्म संपताच जुलैच्या प्रारंभी उन्हाळ्यातील सुटी सुरू झाल्याबरोबर त्यांनी दुःखद अंतःकरणाने ऑक्सफर्ड कायमचे सोडले.
संदर्भ
१.    विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. १४०-१४१.
२.    तत्रैव, पृ. १४६.
३.    तत्रैव, पृ. १४२. शिंदे यांनी श्री. सयाजीराव महाराजांना पाठविलेले मूळ पत्र इंग्रजीत आहे. शिंदे यांची कागदपत्रे.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य

   निवेदन
    लेखकाचे मनोगत
    दुस-या व तिस-या आवृत्तीच्या निमित्ताने
    प्रस्तावना 
 -   अंत:प्रेरणेचा निर्णय
 -   आजी-आजोबा आणि आई-वडिल
 -   बालपण 
 -   कॉलेजची पहिली दोन वर्षं
 -   जनाबाईंची संसारकथा
 -   जनाबाईंचे शिक्षण
 -   हुजूरपागा शाळा आणि शांता सुखटणकरची
     करुण कहाणी
-    इंटरमीजिएटचे दुसरे वर्ष
 -    पदवी परीक्षेचा अभ्यास आणि एकोणिसाव्या
      शतकाच्या अखेरचे पुणे
   प्रार्थनासमाजाची दीक्षा 
 -    पदवी परीक्षा
 -   अंत:स्थ भावजीवनातील खळबळ 
 -    एकेश्वरी उदार धर्मपंथ
 -    प्रार्थनासमाज
 -    धर्मशिक्षणासाठी निवड आणि परदेशगमन
 -    मुंबई ते ऑक्सफर्ड
 -     मॅंचेस्टर कॉलेज
 -    ऑक्सफर्डमधील पहिले दोन महिने
 -    नाताळची सुट्टी : मुक्काम लंडन 
 -    पत्रांचा विरंगुळा
 -    दक्षिण किना-यावरील पंधरवडा
 -    प्रोफेसरांच्या कुटुंबात सरोवर प्रांती
 -    एडिंबरो आणि स्कॉच सरोवरे
 -    हिंदू गृहस्थिती आणि समाजस्थिती 
      व्याख्यान व नाट्यप्रयोग 
 -    पारीस येथील एक महिना
 -   लिव्हरपूल येथील त्रैवार्षिक युनिटेरियन परिषद
 -    ऑक्सफर्डमधील शेवटची टर्म
 -    ऍमस्टरडॅम येथील आंतराष्ट्रीय उदार धर्मपरिषद
 -    परतीचा प्रवास
 -    स्वदेशी आगमन, बडोदा भेट आणि
      धर्मप्रचारकार्याला प्रारंभ
 -    मद्रासच्या परिषदा आणि हिंदुस्थानचा दौरा
-    जमखंडी-मुधोळ येथील प्रचारकार्य
 -    काठेवाडचा दौरा 
 -    मुंबईतील बि-हाड आणि प्रार्थनासमाजातील नवचैतन्य
 -    धर्मप्रचाराचे विस्तारित कार्य
 -    कौटुंबिक अडचणी, पुणे प्रार्थनासमाजातील नवचैतन्य
 -    धर्मप्रचारार्थ दौरा
 -    प्रवासातील अनुभव
 -    जनाबाई पनवेलमध्ये शिक्षिका
 -    विविध प्रार्थनासमाजांतील सहभाग
 -    भारतीय एकेश्वरी धर्मपरिषद
 -    ब्राह्मधर्मसूची ग्रंथ
 -    अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीविषयक कार्याचे प्रारंभिक प्रयत्न
 -    मिशनच्या स्थापनेचा संकल्प
 -    मिशनची स्थापना
 -  मिशनची घटना व पुणे येथील अंगभूत शाखा
 -    मिशनमधील दोन समारंभ 
 -    मिशनच्या स्थापनेनंतर वातावरणातील बदल
 -    निधीची योजना
 -    मुंबई प्रार्थनासमाजाशी दुरावा आणि फारकत
 -    पुण्यास स्थलांतर
 -    मिशनची महाराष्ट्र परिषद
 -    तुकोजीराव महाराजांची देणगी व मांगांचे
      शेतकी खेडे वसविण्याचा प्रयत्न
 -   अहल्याश्रमाची पूर्वतयारी 
 -    मराठ्यांची सांस्कृतिक जबाबदारी 
 -    काँग्रेसमध्ये अस्पृश्यतानिवारणाचा ठराव
 -    अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीची दिशा व मार्ग
 -    अस्पृश्यतानिवारक परिषद
 -   राष्ट्रीय प्रवाहात मराठा समाज
 -    अस्पृश्यवर्गाचे कायदेमंडळात प्रतिनिधित्व
 -    गैरसमजाचा ससेमिरा 
 -    १९२० सालातील निवडणूक 
-    शिंदे आणि ब्राह्मणेतर पक्ष
 -    कुटुंबातील मृत्यू
 -    मुलींसाठी सक्तीचे शिक्षण
 -    मद्यपाननिषेधाची चळवळ व अन्य सामाजिक कार्य
 -    मिशनचा कार्यविस्तार : कर्नाटक-मध्यप्रांतातील शाखा 
 -    मिशनसंबंधी आक्षेप व समस्या
 -    मिशनची पुनर्घटना
 -    खटल्याचा दैवदुर्विलास
 -    मिशनमधील सहकारी व सहका-यांच्या
       दृष्टीतून विठ्ठल रामजी शिंदे
 -    मंगलोरमधील कार्य
 -   व्हायकोम सत्याग्रह
 -    मंगलोर ब्राह्मसमाजातील पेचप्रसंग
 -    कौटुंबिक उपासनामंडळ
 -    सत्याग्रहात सहभाग आणि नेतृत्व
 -    अस्पृश्यतानिवारणाचे कार्य व म. गांधीशी संबंध
 -    येरवड्याच्या तुरुंगात
 -    ब्रह्मदेशाची यात्रा 
 -    शेतकरी चळवळ
 -    परिषदा, संमेलने यांमधील सहभाग
 -   कौटुंबिक वातावरण
 -    बहुमान, अवमान आणि निष्ठा
 -    वाई ब्राह्मसमाज आणि ग्रामीण भागातील धर्मकार्य
 -    विचारविश्व
 -    साहित्यसेवा आणि संशोधनकार्य
 -   अपूर्व स्नेहसंमेलन
 -   अखेरचे दिवस
 -   उपसंहार 
 -   परिशिष्टे १/२ आणि ३ 
 -   मनोगते
 -   महर्षी शिंदे यांचे फोटो व काही हस्तलिखिते