महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य

परतीचा प्रवास

हॉलंडमधील खेडी वैशिष्ट्यपूर्ण आणि नमुनेदार असतात असे ऐकिवात आल्याने परिषदेसाठी आलेल्या पाहुणेमंडळींनी एखादे खेडे पाहावे असे योजिले होते व त्याप्रमाणे व्यवस्थापक मंडळींनी सोय केली होती. ऍमस्टरडॅमपासून जवळच असलेले व्होलंदाम नावाचे एक जुने खेडे बघण्यासाठी निरनिराळ्या राष्ट्राची सुमारे दोनशे मंडळी तेथे ४ सप्टेंबरच्या दुपारी पोहोचली. समुद्रसपाटीपेक्षा या खेड्याची सपाटी चार फूट खाली असावी. एवढी पाहुणेमंडळी आलेली दिसताच कुतूहलाने त्यांना बघण्यासाठी खेड्यांतील माणसे दारासमोर उभी होती. डच लोकांची स्वच्छतेसंबंधी मोठी ख्याती आहे. त्यांच्या घरातील साधेपणा, स्वच्छ व टापटीप पाहून आपल्याला मोठा आनंद झाला असे शिंदे यांनी नमूद केले आहे. ह्या आनंददायक कार्यक्रमाने जणू परिषदेचा शेवट झाला.

ऍमस्टरडॅम शहराचा निरोप घेऊन दुस-या दिवशी म्हणजे ५ सप्टेंबर १९०३ रोजी सकाळी शिंदे जर्मनी येथील कलोन या शहरी पोहोचले. तेथील हॉटेल एविग् लँपमध्ये उतरले. कलोन येथील कॅथीड्रल हे जगातील एक आश्चर्य मानले जाते. सकाळची न्याहारी करून लगोलग ते कॅथीड्रल पाहण्यास गेले. एवढी सुंदर इतिहासप्रसिद्ध इमारत असूनही बाजारातील गर्दीच्या भागात ती कोंडल्यासारखी झाली आहे असे शिंदे यांना वाटले. कॅथीड्रलच्या भव्यतेने ते स्तिमित झाले आणि चौकातून तिच्याकडे पाहत राहिले. आपल्या मनःस्थितीचे वर्णन त्यांनी विनोदात्म पद्धतीने केले आहे. “हातात कॅमेरा होता, पण चित्रासारखा कितीतरी वेळ आ वासून पाहात राहिलो असता मलाच कितीतरी लोक पाहून गेले असावेत.” आश्चर्याचा आवेग ओसरल्यावर इमारतीत शिरून त्यांनी निरीक्षण केले. बांधकाम गॉथिक थाटाचे होते. काळ्या कुरुंदाचा दगड वापरला होता. उंच निमुळत्या कमानी एकावर एक लावलेल्या होत्या. हे कॅथीड्रल म्हणजे त्यांना गॉथिक शोभेची परमावधी वाटली.

शिंदे ७ तारखेस सोमवारी स्वित्झर्लंड आणि जर्मनीच्या हद्दीवरील बाझल (बाल) या शहरी रात्री आठच्या सुमारास पोहोचले. तेथे थोडावेळ थांबून ते निघाले व रात्री ११च्या सुमारास आल्प्स पर्वतातील ल्यूसर्न ह्या अत्यंत रमणीय गावी पोहोचले. हे गाव ल्यूसर्न नावाच्याच सरोवराच्य काठी आहे. ह्या रम्य ठिकाणी त्यांनी चार दिवस विश्रांतीत आणि एकांतवासात घालविले. येथील गरीब मजून कोणत्या स्थितीत राहतात ह्या कुतूहलापोटी एका स्विस् गरीब मजुराचे घर पाहून माहिती घेतली. चार दिवसानंतर ११ सप्टेंबर रोजी ल्यूसर्न सोडून ते इटली येथील जिनोव्हा या शहरी गेले. दुस-या दिवशी तेथील कॅम्पो सँटो नावाची अत्यंत सुंदर स्मशानभूमी पाहिली.

मुंबई विश्वविद्यालयात असताना रोमचा प्राचीन इतिहास हा शिंदे यांच्या आवडीचा विषय होता. परतीच्या प्रवासात रोम काळजीपूर्वक पाहावयाचे असे त्यांनी ठरविले होते. म्हणून ल्यूसर्नहून निघून ते रोमला पोहोचले. रोममधील प्रसिद्ध स्थळे, पुतळे व चित्रे आस्थापूर्वक पाहण्यात त्यांनी पाच दिवस घालविले. हे पाच दिवस त्यांना मोठे बोधाचे वाटले. तिस-या दिवशी पोप पायसचे त्यांनी इतरांसमवेत दर्शन घेतले.

ज्यांची वर्णनेच केवळ ऐकली होती अशी जगप्रसिद्ध शिल्पे व वास्तू त्यांना पाहावयास मिळाल्या. मायकेल अँजेलो ह्या अद्वितीय प्रतिभावंत शिल्पकाराने चाळीस वर्षे मेहनत घेऊन आपल्या प्रतिभेने कोरलेला सेंट मोझेसचा पुतळा सिस्टाईन चॅपेल येथे पाहिला. इटालियन लोकांची शिल्पकला आणि चित्रकला यांतील वैभवाला या शहरात नुसता पूर आला आहे असे त्यांना वाटले. दोन हजार वर्षांपूर्वीच्या अँफी थिएटरसारख्या प्राचीन इमारतींचे अवशेष त्यांनी मोठ्या आतुरतेने पाहिले. प्रेक्षणीय स्थळांची चित्रे विकत घेतली. पाच दिवस रोममध्ये त्यांनी मोठ्या आनंदात घालविले.

१८ सप्टेंबरला ते नेपल्स या अत्यंत सुंदर अशा शहरी आले. समुद्रकाठावरील टेकडीवरून उंच उंच जाणारा रस्ता पाहून त्यांना मुंबईच्या मलबार हिलची आठवण झाली. आतापर्यंत केवळ भूगोलाच्या पुस्तकात ज्याचे वर्णन वाचलेले असते त्या व्हेसुव्हियस ज्वालामुखीचा धुमसणारा भीषण देखावा त्यांनी आपल्या हॉटेलच्या खिडकीतून पाहिला.

दोन हजार वर्षांपूर्वी भूकंपामुळे व ज्वालामुखी पर्वताच्या तप्त रसामुळे गाडल्या गेलेल्या पाँपी शहराचे उत्खनन १८८५च्या सुमाराला झाले व त्याला आता प्रेक्षणीय स्थळाचे रूप प्राप्त झाले होते. नेपल्सपासून चार-पाच मैलांवर असलेले हे शहर पाहण्यासाठी शिंदे १९ तारखेस तेथे गेले. फर्ग्युसन कॉलेजमधले रोमच्या इतिहासाचे सर्व अध्ययन या ठिकाणी आठवून त्यांच्या अंगावर आनंदाचे शहारे आले. शिंदे हे एखाद्या गोष्टीचे अवलोकन करीत असताना इतिहास, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, धर्म, नीती यांच्या अंगाने करीत असत आणि या सर्वाहून अधिक म्हणजे त्यांची दृष्टी ही विविध प्रकारच्या सौंदर्याचा आस्वाद घेणा-या रसिकाचीही असे. त्यांच्या निरीक्षणाचे अनेकविध पैलून पाँपीमध्ये त्यांनी केलेल्या निरीक्षणातून प्रकट होताना दिसतात. “उत्खनन केलेल्या या पाँपी शहरातील रस्ते बळकट फरसबंदीचे होते. त्यावर खटा-याची चाकोरी दिसली... एका चार चौरस फूट दगडावर उठावदार कोरलेले एक चित्र पाहिले. त्यात वर्तुळाकार आकाराभोवती एका सापाने विळखा दिला आहे असे हे कोरीव चित्र होते. ह्यावरून तेथे सर्पपूजा होती का? दारूची दुकाने व दारू ठेवण्याच्या रांजणावर शिंपा लावून नक्षी केली होती. लोक मेण्यात बसून जात होते असे देखावे दिसले. कोंबड्यांची झुंज, नरमेध वगैरे चित्रांवरून दिसतात. एका घराच्या दिवाणखान्याचा तांबडा राखेचा रंग अगदी ताजा दिसला. शेवटी रोमन लोकांची नीती फार बिघडली असे इतिहास सांगतो. मी तर ह्या घराच्या भिंतीवर अंतर्गृहात फार बीभत्स चित्रे स्पष्ट पाहिली... सृष्टीविरुद्ध मैथुनकर्म केल्याची स्पष्ट चित्रे आहेत. येथील संग्रहालयात उकरून काढलेल्या १५ मानवी सांगाड्यांच्या प्रतिकृती हुबेहुब प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या ठेवल्या आहेत.” व्हेसुव्हियसच्या राखेत हे शहर जेव्हा दडपले गेले तेव्हा जी माणसे, ज्या स्थिती दडपली गेली त्याचा स्पष्ट देखावा कसा दिसतो हे त्यांनी तपशीलवार बघितले. रांजण, हौद, वगैरे दगडामातीच्या घरगुती वस्तू पाहून तसेच विस्तीर्ण बाजाराचा चौक, अर्धवर्तुळाकार मंडई, सार्वजनिक व्याख्यानाच्या जागा, भव्य जोती वगैरे पाहून तत्कालीन कौटुंबिक व सामाजिक स्थिती अजमावण्याची ही साधने होत या भूमिकेतून त्यांनी निरीक्षण केले.१

ह्या दोन वर्षांच्या अवधीमध्ये शिंदे यांनी केलेल्या प्रवासाचा नेपल्स व पाँपी हा शेवटचा टप्पा. नेपल्सहूनच ते हिंदुस्थानच्या परतीच्या प्रवासाला निघणार होते. ते इंग्लंडमध्ये केवळ धर्माचे पुस्तकी शिक्षण घेण्यासाठी गेले नव्हते. “मुख्यतः तुलनात्मक पद्धतीने जगातील सर्व धर्माच्या इतिहासाचे, त्यांच्या विकासाचे अध्ययन करून स्वतःची धर्मबुद्धी विशद करून धर्मप्रचाराची तयारी करणे हा तर मुख्य उद्देश होताच. त्याशिवाय युरोपातील काही प्रमुख देशांतील चालीरीती पाहाव्या, वाङ्मय वाचावे, पंडित आणि सज्जनांच्या भेटी घ्याव्यात, नव्या-जुन्या संस्थांची वाढ पाहावी, निरनिराळ्य वर्गांची-विशेषतः खालच्या व चिरडलेल्या वर्गाची-अंतस्थ स्थिती निरखावी, त्यांच्यात राहावे, सुंदर आणि प्रेक्षणीय स्थळे पाहावीत इत्यादी दुसरेही हेतू होते.”२ त्यांच्या मनातील हेतू ब-याच प्रमाणात सफल झाले होते.

शिंदे यांनी दोन वर्षांच्या प्रवासात इंग्लंड, स्कॉटलंड, फ्रान्स, हॉलंड, जर्मनी, स्वित्झर्लंड आणि इटली हे सात देश थोडेबहुत पाहिले. शिंदे स्वतः या दोन वर्षांच्या अवधीत इंग्लंडात आणि अन्यत्र मोकळेपणाने, स्वाभाविकपणाने वावरले. त्यांच्या ठिकाणी न्यूनगंडाची जाणीव यत्किंचितही प्रकट होताना आढळत नाही की, आपल्या परंपरेच्या दुराभिमानाचा स्पर्श त्यांच्या वागण्याबोलण्याला होताना आढळून येत नाही. म्हणून ते इतर राष्ट्रांतील लोकांकडेही स्वाभाविक वस्तुनिष्ठपणे पाहून शकत होते. ह्या दोन वर्षांच्या इंग्लंडातील वास्तव्यानंतर आणि इतर देशातील केलेल्या प्रवासानंतर त्यांची काही मते बनली होती. एकंदरीत त्यांना इंग्लिश लोक बरे दिसले. फ्रेंच अधिक उल्हसित आणि इटालियन मात्र मनातून उतरावे असे. आल्प्स पर्वत व –हाईन नदी प्रशस्त व रमणीय दिसली. मात्र इंग्लंडमध्ये विशाल असा देखावाच नाही. सर्व लहान प्रमाणावर साधे व नयनमनोहर वाटले. इंग्रज लोक घुमे पण व्यावहारिकदृष्ट्या शहाणे वाटले. श्रीमंत व दारिद्र्य हे तेथे सारखेच मिसळले असले तरी ह्या चिमुकल्या बेटात संतोष व शांती आहे असे त्यांना जाणवले. दारूचे व्यसन आणि लैंग्य व्यभिचार शहरामध्ये बोकाळला आहे, पण खेडी व राने शुद्ध आहेत. शेती खालावत आहे. भावी नाशाची चिन्हे अद्याप स्पष्ट दिसत नसली तरी साम्राज्याच्या पापाचा परिणाम भोगल्याविना त्यांची सुटका नाही असेही त्यांना जाणवले. आधुनिक सुधारणेची आणि यंत्राच्या आक्रमणाची काळी बाजू हीही त्यांना विशेषत्वाने जाणवून गेली. मात्र हिंदुस्थानला शिकण्यासारखे युरोपत अद्यापि पुष्कळ आहे हेही त्यांना मनोमन जाणवत होते. स्वतः शिंदे मात्र खूप काही शिकून हिंदुस्थानच्या परतीच्या प्रवासाला सिद्ध झाले.

त्यांना हिंदुस्थानला परत घेऊन येणारी रुबातिनो ही इटालियन बोट नेपल्सहून २१ सप्टेंबर १९०३ रोजी निघाली.

बरोबर दोन वर्षांपूर्वी म्हणजे २१ सप्टेंबरलाच मुंबईहून ते इंग्लंडला येण्यासाठी बोटीने निघाले होते. त्या वेळी नवीन जग बघण्याची, नवे अनुभव घेण्याची उत्सुकता त्यांच्या मनात होती. परत जाताना ती उत्सुकता व ते कुतूहल शमले होते. वृत्ती शांत, अधिक प्रगल्भ झाल्या होत्या. बोटीच्या प्रवासाचे आता काही नावीन्य राहिले नव्हते. बाहेरचे बघण्याऐवजी त्यांची दृष्टी जास्त आत वळलेली होती. मनाच्या अशा अवस्थेत असताना त्यांना आलेला एक उच्च आध्यात्मिक अनुभव त्यांनी नमूद करून ठेवला आहे. या प्रकारचा अनुभव त्यांना इंग्लंडमध्ये बॉरोडेल दरीत रात्रीच्या चंद्रप्रकाशात शतपावली करीत असता, तसेच स्कॉटलंडमध्ये बेन लोमंडच्या शिखरावर आलेला होता. या प्रकारच्या अनुभवाला शिंदे हे गूढतेचे वलय देत नाहीत. अशा प्रकारचा आध्यात्मिक अनुभव ही आत्म्याची नैसर्गिक अवस्था आहे अशीच त्यांची धारणा दिसून येते. देव दिसतो काय? ह्या चार ओळींच्या एका टिपणामध्ये त्यांनी तो पाहण्याची साधने नमूद केली आहेत. तो कारणरूपाने, सौंदर्य अथवा प्रेमरूपाने व नीतिरूपाने प्रकट होतो. दुस-या एका ठिकाणी सौंदर्य, सत्त्व यांतून साक्षात्कार घडतो व हा साक्षात्कार म्हणजे अनंताचे भान असे त्यांनी नमूद केले आहे.३

रुबातिनो ही बोट नेपल्सहून निघून पाच दिवस झाले होते. ह्या अवधीत शिंदे यांनी आपल्या जवळच्या डायरीत काहीही नमूद केलेले नाही. २६ सप्टेंबरला मात्र त्यांनी ‘तांबड्या समुद्रावरील संध्यावंदन’ या शीर्षकाखाली एक नोंद करून आपल्याला आलेला आध्यात्मिक अनुभव व अनुषंगाने केलेले चिंतन नमूद केले आहे. शिंदे यांनी लिहिले आहे.

“७ वाजता जेवण झाल्यावर डेकवरच्या एका कोप-यात बसलो. मंडळी आरामखुर्च्यांवरून पडली. भोवती मुले खेळत होती. खलाशी खुशालीत होते. अधिकारी स्वस्थ. धूम्रभक्त-धूम्रसेवन. समुद्र अगदी शांत. चतुर्थी चंद्रकोर क्षितिजावर लोंबत होती. महंमदाची ही निशाणी. ख्रिस्ताच्या राज्यातून महंमदाच्या राज्यात आम्ही आलो. चांदणे विरळ. समुद्र सौम्य. परवाच इतका कोपला होता की, आमची क्षुद्र बोट खालवर होत होती, आम्ही हालत होतो तरी बाजूस पाहिल्यावर माझ्याशिवाय सारे जग हालत आहे असा भास. लाटा, क्षितिज, चंद्र, आकाश यांची तत्त्वे हालत. स्वयंजन्य माणसाला असाच भ्रम नेहमी होतो. तोच मी जेव्हा बोटीकडे पाहिले तेव्हा कळले आम्हीच हालत आहोत. बाकी सर्व स्थिर आहेत.

“ह्याप्रमाणे दृष्टी आत वळल्यावर विचाराला गांभीर्य आले. लहान गोष्टीवरून थोर गोष्टीकडे वळले. भोवतालचा गलबला कमी ऐकू येऊन लागला. चंद्रकिरणातून क्षितिजात खोल नजर लागली. गार वारे. मंद गती. नावेचे नियमित गीत. समुद्राची साद. आकाशाची मिश्र छबी. अशा गूढ सौंदर्यात मन गार झाले. अवर्णनीय सुखाचा अनुभव आला. प्लेटोचे Bealife Viasu  अथवा कुराणात ‘दे सी द फेस ऑफ गॉड’ अथवा आमची दुसरी मुक्ती ‘समीपता’ ही घडली.

आयुष्याचा तो अतिदुःखी क्षण-जेव्हा आम्ही बळाने मरण ओढून घेतो; पण तो अतिसुखी क्षण की जेव्हा आम्ही मरण्यास अगदी खुशी असतो. दृष्टं दृष्टव्यः श्रुतं श्रोतव्यः असे झाले असता असे क्षण येतात. तोच क्षण हा होता. अशा वेळी मरण म्हणजे कालिदासाने म्हटल्याप्रमाणे प्रकृती होय. गूढ सौंदर्य उघड सौंदर्याहून अगदी जास्त सुंदर. Heard melodies are sweet but unheard are sweeter – Keats. तसा माझा प्रकार झाला. मजपुढे दृश्य चमत्कार थोडेच होते. आल्प्सचे शिखर, ल्यूसर्न सरोवर,
-हाईन नदीचा काठ, कॅथॉलिक धर्माची भव्य व सुंदर देवळे, इटालियन चित्रे इत्यादी अनेक सुंदर कृती पाहिल्या. पण हल्ली (या क्षणी) मजपुढे थोडा प्रकाश आणि पुष्कळ अंधार ह्यामध्ये आनंदधाम सुंदरतेची जी झाक दिसली तिने क्षणात सामीप्य मुक्ती मिळाली. कारण आताचे अनंत रूप वाच्य थोडे; व्यंग्य फार. कारण मी बहिर्मुख नव्हतो. मला दिसत होते ते वर काळ्या आकाशाचे घुमटाचे विरल तारे टिकटिकलवत. चंद्रकोर पाण्याला टेकलेली. तिच्या भोवतालचा थोडाच प्रदेश दिसतो. तिच्या अंधुक प्रकाशात थोड्या लाटा दिसत. एवढ्या दृश्यावरूनच आप, तेज, आकाशादी पाची तत्त्वे, त्या सर्वांमागचे सर्वाधार महातत्व, हे विराट तत्त्व आता दिसू लागले. इतके, की दोन प्रहरी सर्व उघडे होते तेव्हा हे दर्शन झाले नाही. म्हणून मी वंदनही केले नाही. आता ह्या सायंकाळी लहान गोष्टी जेव्हा अस्तास गेल्या, दूरचे गहन सूर्यही जे अंधुक तारांच्या क्षुद्र रूपाने दिसू लागले तेव्हा अणोरणियान् महतो महियान् महाभूत ते पुढे दिसले. दूर ते जवळ झाले. मी त्यास वंदन, पुन्हा वंदन, शतशः वंदन, असंख्य वंदन करू लागलो. सत्यं ज्ञानं अनंतम्”।४

इंग्लंडहून परत येत असताना एक प्रकारची सफलतेची जाणीव ते अनुभवीत होते. वृत्ती शांत, अधिक प्रगल्भ झाल्या होत्या. मन व्यासंगाने, चिंतनाने, अनुभवाने अधिक अध्यात्मप्रवण बनले होते. म्हणून यासारखा उच्च दर्जाचा आध्यात्मिक अनुभव ते सहजतेने घेऊ शकत होते.

इंग्लंडमधील दोन वर्षांच्या वास्तव्यात सुबोधपत्रिकेला त्यांनी विविध प्रकारचे लेख पाठविले होते. त्यामधून त्यांनी प्रवासाची, आपल्या अनुभवाची, तेथील परोपकारी संस्थांच्या कार्यपद्धतीची वेधक चित्रे रेखाटणारी आणि चिंतनगर्भ विचारप्रवर्तक अशी पत्रे पाठविली होती. त्यामधून त्यांची धर्मनिष्ठा, धर्मप्रचाराची कळकळ, संघटनेची दृष्टी ही तर प्रकट होत होतीच; शिवाय त्याच्या जोडीने, श्रेष्ठ दर्जाचा वाङमयीन आनंद देण्याची क्षमता असलेली उत्तम मराठी गद्यशैली प्रकट होत होती. या कारणांनी विठ्ठल रामजी शिंदे यांची योग्यता आणि गुणवत्ता प्रार्थनासमाजातील बंधूंना अधिक प्रत्ययाला आली होती. शिंदे यांचे आगमन मुंबई प्रार्थनासमाजाल प्रेरणादायी ठरेल असा विश्वास समाजबांधवांना वाटू लागला होता. त्यांचे त्या वेळचे समाजबंधू श्री. वामनराव सदाशिव सोहोनी यांनी लिहिले आहे, “रा. विठ्ठलरावांचा व माझा परिचय ते विलायतेस धर्माचा तुलनात्मक अभ्यास करण्यास जाण्यापूर्वीच्या त्यांच्या मुंबईच्या वास्तव्यात झाला. विलायतेहून परत आल्यावर ते प्रा. समाजाचे काम करणार अशी आमची खात्री असल्यामुळे आम्ही त्यांच्या विलायतेहून परत येण्याची चातकाप्रमाणे वाट पाहात होतो. त्यांनी सुबोधपत्रिकेसाठी धाडलेली अनेक पत्रे त्यांच्याविषयीचा आदरभाव वृद्धिंगत करण्यास कारणीभूत झाली.”५ म्हणून सर्व समाजबंधू विठ्ठल रामजी शिंदे यांचे स्वागत करायला उत्सुक होते.

शिंदे यांना घेऊन येणारी रुबातिनो ही इटालियन बोट ६ ऑक्टोबर १९०३ रोजी मुंबई बंदराला पोहोचली.

संदर्भ
१.    विठ्ठल रामजी शिंदे, रोजनिशी, पृ. १५३-१५४.
२.    तत्रैव, पृ. १५४.
३.    शिंदे यांची १९०१ ते १९०३ ह्या प्रवासातील छोटी रोजनिशी, शिंदे यांचे कागदपत्र.
४.    तत्रैव.
५.    विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. २३४.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य

   निवेदन
    लेखकाचे मनोगत
    दुस-या व तिस-या आवृत्तीच्या निमित्ताने
    प्रस्तावना 
 -   अंत:प्रेरणेचा निर्णय
 -   आजी-आजोबा आणि आई-वडिल
 -   बालपण 
 -   कॉलेजची पहिली दोन वर्षं
 -   जनाबाईंची संसारकथा
 -   जनाबाईंचे शिक्षण
 -   हुजूरपागा शाळा आणि शांता सुखटणकरची
     करुण कहाणी
-    इंटरमीजिएटचे दुसरे वर्ष
 -    पदवी परीक्षेचा अभ्यास आणि एकोणिसाव्या
      शतकाच्या अखेरचे पुणे
   प्रार्थनासमाजाची दीक्षा 
 -    पदवी परीक्षा
 -   अंत:स्थ भावजीवनातील खळबळ 
 -    एकेश्वरी उदार धर्मपंथ
 -    प्रार्थनासमाज
 -    धर्मशिक्षणासाठी निवड आणि परदेशगमन
 -    मुंबई ते ऑक्सफर्ड
 -     मॅंचेस्टर कॉलेज
 -    ऑक्सफर्डमधील पहिले दोन महिने
 -    नाताळची सुट्टी : मुक्काम लंडन 
 -    पत्रांचा विरंगुळा
 -    दक्षिण किना-यावरील पंधरवडा
 -    प्रोफेसरांच्या कुटुंबात सरोवर प्रांती
 -    एडिंबरो आणि स्कॉच सरोवरे
 -    हिंदू गृहस्थिती आणि समाजस्थिती 
      व्याख्यान व नाट्यप्रयोग 
 -    पारीस येथील एक महिना
 -   लिव्हरपूल येथील त्रैवार्षिक युनिटेरियन परिषद
 -    ऑक्सफर्डमधील शेवटची टर्म
 -    ऍमस्टरडॅम येथील आंतराष्ट्रीय उदार धर्मपरिषद
 -    परतीचा प्रवास
 -    स्वदेशी आगमन, बडोदा भेट आणि
      धर्मप्रचारकार्याला प्रारंभ
 -    मद्रासच्या परिषदा आणि हिंदुस्थानचा दौरा
-    जमखंडी-मुधोळ येथील प्रचारकार्य
 -    काठेवाडचा दौरा 
 -    मुंबईतील बि-हाड आणि प्रार्थनासमाजातील नवचैतन्य
 -    धर्मप्रचाराचे विस्तारित कार्य
 -    कौटुंबिक अडचणी, पुणे प्रार्थनासमाजातील नवचैतन्य
 -    धर्मप्रचारार्थ दौरा
 -    प्रवासातील अनुभव
 -    जनाबाई पनवेलमध्ये शिक्षिका
 -    विविध प्रार्थनासमाजांतील सहभाग
 -    भारतीय एकेश्वरी धर्मपरिषद
 -    ब्राह्मधर्मसूची ग्रंथ
 -    अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीविषयक कार्याचे प्रारंभिक प्रयत्न
 -    मिशनच्या स्थापनेचा संकल्प
 -    मिशनची स्थापना
 -  मिशनची घटना व पुणे येथील अंगभूत शाखा
 -    मिशनमधील दोन समारंभ 
 -    मिशनच्या स्थापनेनंतर वातावरणातील बदल
 -    निधीची योजना
 -    मुंबई प्रार्थनासमाजाशी दुरावा आणि फारकत
 -    पुण्यास स्थलांतर
 -    मिशनची महाराष्ट्र परिषद
 -    तुकोजीराव महाराजांची देणगी व मांगांचे
      शेतकी खेडे वसविण्याचा प्रयत्न
 -   अहल्याश्रमाची पूर्वतयारी 
 -    मराठ्यांची सांस्कृतिक जबाबदारी 
 -    काँग्रेसमध्ये अस्पृश्यतानिवारणाचा ठराव
 -    अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीची दिशा व मार्ग
 -    अस्पृश्यतानिवारक परिषद
 -   राष्ट्रीय प्रवाहात मराठा समाज
 -    अस्पृश्यवर्गाचे कायदेमंडळात प्रतिनिधित्व
 -    गैरसमजाचा ससेमिरा 
 -    १९२० सालातील निवडणूक 
-    शिंदे आणि ब्राह्मणेतर पक्ष
 -    कुटुंबातील मृत्यू
 -    मुलींसाठी सक्तीचे शिक्षण
 -    मद्यपाननिषेधाची चळवळ व अन्य सामाजिक कार्य
 -    मिशनचा कार्यविस्तार : कर्नाटक-मध्यप्रांतातील शाखा 
 -    मिशनसंबंधी आक्षेप व समस्या
 -    मिशनची पुनर्घटना
 -    खटल्याचा दैवदुर्विलास
 -    मिशनमधील सहकारी व सहका-यांच्या
       दृष्टीतून विठ्ठल रामजी शिंदे
 -    मंगलोरमधील कार्य
 -   व्हायकोम सत्याग्रह
 -    मंगलोर ब्राह्मसमाजातील पेचप्रसंग
 -    कौटुंबिक उपासनामंडळ
 -    सत्याग्रहात सहभाग आणि नेतृत्व
 -    अस्पृश्यतानिवारणाचे कार्य व म. गांधीशी संबंध
 -    येरवड्याच्या तुरुंगात
 -    ब्रह्मदेशाची यात्रा 
 -    शेतकरी चळवळ
 -    परिषदा, संमेलने यांमधील सहभाग
 -   कौटुंबिक वातावरण
 -    बहुमान, अवमान आणि निष्ठा
 -    वाई ब्राह्मसमाज आणि ग्रामीण भागातील धर्मकार्य
 -    विचारविश्व
 -    साहित्यसेवा आणि संशोधनकार्य
 -   अपूर्व स्नेहसंमेलन
 -   अखेरचे दिवस
 -   उपसंहार 
 -   परिशिष्टे १/२ आणि ३ 
 -   मनोगते
 -   महर्षी शिंदे यांचे फोटो व काही हस्तलिखिते