महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य

जमखंडी-मुधोळ येथील प्रचारकार्य

कलकत्त्याहून परतल्यावर शिंदे हे मुंबईतील कामाचा कार्यक्रम निश्चित करू लागले. धर्मकार्याची दोन मुख्य अंगे. एक आचार्यकार्य व दुसरे प्रचारकार्य. ज्यांनी धर्माचा स्वीकार करून दीक्षा घेतलेली असते अशांकडून धर्माचरण योग्य त-हेने होईल असे पाहावे लागते. ह्या कामाचा प्रमुख भाग म्हणजे दर आठवड्याला साप्ताहिक उपासना चालविणे; सभासदांच्या घरी भेटी देऊन त्यांचे कौटुंबिक धर्माचरण नीट चालले ना ते पाहणे व त्यासाठी साह्य करणे; नामकरण, उपनयन, विवाह, अंत्येष्टी इत्यादी गृहविधी चालविणे; सभासदांचा परस्परपरिचय वाढून समाज दृढ व्हावा म्हणून वेळोवेळी स्नेहसंमेलने करणे इत्यादी. स्त्रियांसाठी दर शनिवारी आर्य महिलासमाज; मुलांसाठी रविवारचे धर्म व नीती शिकविण्याचे वर्ग; तरुणांसाठी ब्राह्ममंडळ; वृद्धांसाठी संगतसभा आणि बाहेरच्यांसाठी व्याख्याने असा कार्यक्रम आठवडाभर चाले. ह्या कार्यक्रमांना चालना देऊन ते अधिक नेटकेपणाने व जोरदारपणाने चालविणे हे काम त्यांना करावयाचे होते. ह्या कामाच्या जोडीनेच शिंदे यांनी पुढील तीन संस्थांची नव्याने भर घातली.

पोस्टल मिशन
शिंदे विलायतेत असताना त्यांनी मिस् टॅगर्ट व मिस् हिल् या स्त्रियांनी चालविलेले युनिटेरियन पोस्टल मिशनचे कार्य जवळून पाहिले होते. त्या वेळी त्यांचे मित्र श्री. वासुदेव सुखटणर हे पुण्यास होते.

अशा पद्धतीची ब्राह्म पोस्ट मिशन ही संस्था त्यांच्या साह्याने स्थापन करून शिंदे यांनी हिंदुस्थानात येण्याआधीच या प्रकराच्या कामाल प्रारंभ केला होता. ब्राह्मधर्माच्या तत्त्वावर आणि उपासनापद्धतीवर लहान लहान पुस्तके तयार करून ती टपालाद्वारे लोकांना पाठवून त्यावर वाचकांकडून ज्या शंका अथवा प्रश्न येतील त्याबाबत पत्रव्यवहार करून आणि सवडीप्रमाणे त्यांना भेटीस बोलावून धर्मप्रसार करण्याच्या पद्धताली पोस्टल मिशन हे नाव पडले. ह्या कामी युनिटेरियन लोकांकडून त्यांनी पुस्तकांचे व द्रव्याचे साह्य मिळविले. शिंदे स्वदेशी आल्यानंतर सुखटणकर हे मँचेस्टर कॉलेजात धर्मशिक्षणासाठी गेले तेव्हा शिंदे यांनी हे कार्य मुंबईला आणून वाढविले. ह्या कामी त्यांचे मित्र आणि समाजाचे सभासद सय्यद अब्दुल कादर यांचे मोठे साह्य झाले. सात-आठ वर्षांच्या अवधीत एकंदर ३,४३८ ब्राह्मधर्मावरील पुस्तके, १२, ७०० लहानसहान पत्रके, ६३३ युनिटेरियन पुस्तके व ५,००० युनिटेरियन पत्रकांचा प्रसार करण्यात आला. ह्या कामासाठी शिंदे यांनी मुंबई प्रांतात दोन वेळेला प्रवासदौरा करून व्याख्याने दिली.

उदार धर्मग्रंथ वाचनवर्ग (लिबरल रिलिजस रीडिंग क्लास)
कॉलेजातील व हायस्कुलातील तरुण विद्यार्थ्यांना मूलभूत धर्मग्रंथांचे वाचन करण्याची सवय लागावी म्हणून हा वर्ग शिंदे यांनी सुरू केला. ह्या वर्गात महाराष्ट्रीय, गुजराथी, ख्रिश्चन आणि मुसलमान अशा भिन्नभाषी विद्यार्थ्यांचा समावेश असल्याने हा वर्ग इंग्रजीत चालविला जात असे. दर बुधवारी सायंकाळी प्रार्थनामंदिरात वर्ग भरत असे. डॉ. आर्मस्ट्राँगचे ‘गॉड अँड सोल’, इमर्सनची पुस्तके, डॉयसनचे ‘फिलॉसॉफी ऑफ उपनिषद’ अशा पुस्तकांचे तेथे अध्ययन चालत असे. समाजाच्या डॉ. भांडारकर फ्री लायब्ररीमधूनही ह्या वाचनाला पूरक अशी अन्य इंग्रजी पुस्तके विद्यार्थ्यांना देण्यात येत असत.

तरुण ब्राह्मसंघ (यंग थीइस्ट्स युनियन)
ब्राह्मधर्माच्या तत्त्वाप्रमाणे गृह्यसंस्कार व विधी चालविण्याला अनुष्ठान हे नाव आहे. मुंबईत झालेल्या ब्राह्मधर्म प्रसाराच्या तुलनेने अनुष्ठान तितक्या प्रमाणात घडत नसे. तरुणांमध्ये अनुष्टानाची आवड निर्माण व्हावी व त्यांना आनुष्ठानिक कार्ये करता यावीत या हेतूने १९०५ सालच्या दस-याच्या दिवशी शिंदे यांनी ही महत्त्वाची संस्था स्थापन केली. त्यांच्या या उपक्रमाला ब-याच प्रमाणात यस आले.

वरील धर्मप्रसाराच्या कामाशिवाय प्रार्थनासमाजाच्या वतीने लोकशिक्षण आणि परोपकाराची कृत्ये करण्यासाठी काही संस्था चालविल्या जात होत्या. मुंबई शहरात मजुरांसाठी रात्रीच्या दहा-बारा शाळा होत्या. त्यांपैकी दोन शाळा अस्पृश्यांसाठी होत्या. त्यांची देखरेख करण्याचे काम शिंदे यांना करावे लागे. पंढरपुरात बालहत्त्या प्रतिबंधक गृह ही नमुनेदार संस्थाही चालविली जात असे. समाजाचे सुबोधपत्रिका हे मराठी-इंग्रजी अशा दोन बाजू असलेले साप्ताहिकही चालविले जाई. त्यामध्ये लेखन करणे हेही शिंदे यांच्याकडून अपेक्षित होते. त्याप्रमाणे ते करीतही असत. मुंबई शहरातील ही स्थानिक कामे चालवून मुंबईबाहेरही धर्मकार्याच्या निमित्ताने त्यांना जावे लागत असे.

ह्याप्रमाणे शिंदे यांच्या कामाचा आराखडा होता व त्याप्रमाणे त्यांनी कामाला आरंभही केला. तथापि त्यांच्या घरची व्यवस्था अद्याप झाली नव्हती. त्यांचे वृद्ध आईबाप आणि पत्नी रुक्मिणीबाई जमखंडीस होते. जनाक्का, तान्याक्का आणि चंद्राक्का या तीन बहिणी पुण्यास हुजूरपागेत शिकत होत्या. लहान भाऊ एकनाथ कोल्हापूरात गोविंदराव सासने यांच्याकडे शिकत होता. तर गोविंदरावांची मुलगी सुशीला आणि शिंदे यांच्या आलगूरच्या मामांची मुलगी मथुरा ह्या दोघी जमखंडीस त्यांच्या घरी राहून शिकत होत्या. मुलगा प्रताप तीनचार वर्षांचा. ह्या विखुरलेल्या कुटुंबाच्या पोषणाची जबाबदारी शिंदे यांच्यावर होती आणि त्यांचे काम तर देशभर पसरलेले, तेव्हा कुटुंबाची एकत्र राहण्याची सोय करावी; याबाबतीत आईवडिलांचा विचारविनिमय घ्यावा असे त्यांना वाटू लागले. ह्या सुमारास म्हणजे १९०४ च्या फेब्रुवारीमध्ये मुंबईस प्लेगचा प्रादुर्भाव झाला. तूर्त काही दिवस मुंबईतील वास्तव्य कामाच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारे नव्हते. तेव्हा त्यांनी जमखंडी, मुधोळकडे दौरा करावयाचे ठरविले. पुण्यास राहणारे समाजाचे वृद्ध प्रचारक श्री. शिवरामपंत गोखले यांनाही बरोबर न्यावयाचे योजिले. त्यांचा वडीलधारेपणा, त्यांची भजन करण्याची असलेली तयारी प्रचारदौ-यात उपयोगी पडेल असेही त्यांना वाटले.१ त्यानुसार ते फेब्रुवारीच्या चौथ्या आठवड्यात जमखंडीस जावयास निघाले.

ब्राह्मधर्माचा प्रचार जमखंडीस अगदी नवा होता असे नव्हे. शिंदे विलायतेला जाण्यापूर्वी त्यांच्या घरी ब्राह्मोपासना होत होत्या. ते विलायतेस गेल्यावरही त्यांच्या आईबाबांनी त्या चालू ठेवल्या होत्या. ह्या वेळी मात्र जमखंडीस दोन आठवडे राहून प्रार्थनासमाजाच्या सहा मूळ तत्त्वांची छाननी करण्यासाठी सहा स्वतंत्र जाहीर व्याख्याने त्यांनी दिली. व्याख्यानाचे ठिकाण म्युनिसिपालटीच्या दुस-या दिवाणखान्यात होते. नावीन्यामुळे बरीच गर्दी जमत असे. त्यांच्याबरोबर असलेले वृद्ध शिवरामपंत ब्राह्मण असूनही त्यांच्याकडे जेवतात याचा गवगवा गावभर झाला होता. जमखंडी हा गाव आगगाडीपासून दूर, विचारात मागासलेला आणि आचारात अत्यंत सोवळा असल्यामुळे शिंदे यांच्या व्याख्यानमालेमुळे त्यांच्यावर मोठे संकट कोसळल्यासारखे झाले. ह्यापूर्वी शिंदे हे गावचे लाडके असले तरी त्यांची आत्यंतिक सुधारकी तत्त्वे आणि ती मांडण्याची सडेतोड पद्धती कुणाच्याही गळी सहजासहजी उतरण्यासारखी नव्हती. लोकमत हळूहळू प्रक्षुब्ध होऊ लागले. आगीत तेल ओतण्याचे काम हायस्कूलमधील एका उपद्व्यापी शिक्षकाने केले. मुलांच्या वानरसेनेने गोंधळ करावा अशी व्यवस्था करून ते व्याख्यान ऐकण्यास साळसूदपणे पुढे येऊन बसत व मान डोलवीत व्याख्यान ऐकत असत. ‘जातिभेद’ या विषयावर शेवटचे व्याख्यान ज्या वेळी सुरू झाले तेव्हा रस्त्यावरील वानरसेनेने गोंगाट करून तृप्त न राहता कच-यांचा आणि दगडांचा वर्षा केला. शिंदे यांनी म्हटले आहे, “अशा प्रकारे शेवटची आरती होऊन ही सभा संपली.” नव्या धर्मसुधारकी विचारांना कर्मठ जमखंडीकरांचा प्रतिसाद मिळाला तो असा.

परंतु गोष्टी एवढ्यावरच थांबल्या नाहीत. वृद्ध शिवरामपंतांचा छळ करण्याची एक घटना घडली. माधवराव गाडगीळ नावाचे एक सरकारी अधिकारी होते. त्यांना समाजाची तत्त्वे पटली व त्यांनी आपल्या घरी ब्रह्मोपासनेसाठी शिवरामपंतांना बोलावून घेतले. घरापासून दूर अंतरावर असलेल्या शौचकूपामध्ये शिवरामपंत गेले असताना बाहेरून कडी लावून त्यांना बराच वेळ कोडूंन ठेवण्याचा प्रकार त्या शिक्षकाच्या चिथावणीवरून व्रात्य मुलांनी केला. ते दिवसही शिमग्याचे होते. शिमग्यातल्या रात्रीच्या दंगलीचा मोर्चा विठ्ठलरावांच्या राहत्या घरावर येऊ लागला. धुळवडीच्या आदल्या रात्री तर ह्या मंडळींनी एवढा कहर केला की, त्यांच्या वडिलांना पोलिसांची मदत घ्यावी लागली. प्रकरण येथपर्यंत आल्याने आपल्या घरच्या मंडळींनी कोठे राहावे हा त्यांचा प्रश्न एक प्रकारे सुटला. जमखंडी गाव सोडून सगळ्यांना आपल्याबरोबर मुंबईस घेऊन जावे असा निश्चय विठ्ठलरावांनी केला.
हा सामाजिक प्रकोप एवढ्या तीव्रपणे होण्याचे दुसरे एक कारण म्हणजे जमखंडीच्या शाळेतील एका दहा वर्षांच्या लहान मुलीला मुरळी सोडण्यात आली असे विठ्ठलरावांना समजल्यानंतर त्यांनी तिला घरी बोलावून घेतले आणि तिच्या पुढील शिक्षणाची चांगली व्यवस्था ठेवण्याबद्दल तिच्या आईबाबांना बजावले. निदान मुरळीचा धंदा तिने चालवू नये अशी त्यांना ताकीद दिली. आता विठ्ठलराव शिंदे यांची सुधारणेची मजल व्याख्यानातूनच न आटपता प्रत्यक्ष कृतीत उतरू लागली हे पाहून जीर्णमतवादी समाजाचा रोष त्यांच्या घरावर ओढवला. ज्या रामजीबाबा शिंदे यांनी जातपंचायतीचे पुढारपण मोठ्या सन्मानाने केले होते त्यांच्यावर अशी पाळी आल्याने जमखंडी गाव सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आपल्या लहानशा नोकरीची पेन्शन घेऊन चंबुगबाळे घेऊन मुंबईस येण्याचे ठरविले. मानी स्वभावाच्या रामजीबाबांना आपली पिढीजात जन्मभूमी सोडून प्रेमळ मित्रांची व नातलगांची अखेरची रजा घेऊन तडकाफडकी मुंबईची वाट धरताना किती यातना झाल्या असतील याची कल्पनाच करणे बरे.

उदार धर्मप्रचारासाठी आपले सर्वस्व वाहून टाकण्याचा एकदा निर्णय घेतल्यानंतर विठ्ठल रामजी शिंदे यांची येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याची मानसिक तयारी झाली होती. कोणत्याही परिस्थितीत मनाची शांती ढळू द्यायची नाही असा त्यांच्या मनाचा निर्धार झाला होता. जमखंडीचा हा अनुभव घेतल्यानंतर प्रचारकार्यासाठी मुधोळला जावयाचे त्यांनी शांतपणे ठरविले.

जमखंडीपासून बारा मैलावर श्रीमंत घोरपडे यांचे हे छोटेसे संस्थानी गाव. शिंदे यांचे कॉलेजमधील सहाध्यायी मित्र जनुभाऊ करंदीकर हे मुधोळास इंग्रजी शाळेचे हेडमास्तर होते. ते व दत्तोपंत मिरजकर यांनी तेथील लायब्ररीत ५ मार्च रोजी सायंकाळी शिंदे यांचे व्याख्यान ठरविले होते. अध्यक्षस्थानी रामदुर्गचे मुन्सफ रावसाहेब चिप्पलकट्टी हे होते. शिंदे यांनी आपल्या दीड तासाच्या भाषणात पूर्वार्धात युरोपमधील प्रवासाची साधारण हकिकत सांगितली व उत्तरार्धात इंग्लंडातील व युरोपातील धार्मिक चळवळीचे वर्णन केले. हिंदुस्थानात ज्याप्रमाणे ब्राह्म, आर्य हे समाज हिंदू धर्माचे स्वरूप शुद्ध करून सार्वत्रिक धर्माची संस्थापना करण्याचे प्रयत्न करीत आहेत त्याचप्रमाणे इंग्लंड, युरोपमधील युनिटेरियन लोक ख्रिस्ती धर्माची सुधारणा करून उदार धर्माची स्थापना करण्याचे प्रयत्न कसे करीत आहेत ह्याबद्दल सुबोधपणे माहिती सांगितली. मुधोळास व्याख्यानाची फारशी प्रथा नसली तरी ५०-६० मंडळी उपस्थित होती.

दुस-या दिवशी म्हणजे ६ मार्च रोजी रात्री साडेआठ ते दहा लायब्ररीमध्ये मंडळी जमली. प्रथम भजन, प्रार्थना झाल्यावर शिंदे यांनी प्रार्थनासमाजाच्या साधारण तत्त्वाविषयी विवेचन केले. विवेचन सुरू करण्याच्या आधी मूर्तिपूजा व जातिभेद याविषयी शांतपणे चर्चा झाली. ७ तारखेस रात्री ९ वाजल्यापासून ११ वाजेपर्यंत शिंदे यांचे भाषण झाले. त्यात आस्तिक व नास्तिक मताविषयी विशेष विवेचन केल्यानंतर ग्रंथप्रामाण्य व अवतारवाद याविषयी त्यांनी आपले विचार सांगितले. शिंदे यांच्या भाषणानंतर दत्तोपंत मिरजकर यांनी छोटेस भाषण करून विचारले की, विचाराअंती समाजाची तत्त्वे मान्य होण्यासारखी आहेत पण ज्यांना अद्यापि मूर्तिपूजेपासून काहीएक प्रकारचे सुख होत आहे अशांना मूर्तिपूजा सोडल्याशिवाय समाजाच्या धर्माचा फायदा मिळू नये असा समाजाचा आग्रह आहे काय? का असावा? उदाहरणादाखल ते म्हणाले की, रामाची मूर्ती पाहून रामाची पितृभक्ती, एकपत्नीव्रत व समाजवात्सल्य इत्यादी गुण मनात चांगले ठसतात. शिंदे यांनी उत्तरादाखल सांगितले की, समाजाचा फायदा पाहिजे त्यांनी घ्यावा, समाजाच्या उपासना सर्वांसाठी होत असतात. मूर्तिपूजा पाप आहे असे समाजास वाटत नाही आणि ज्यास खरोखर तिच्यामुळे उच्च सुख होत असेल त्यांनी ती सोडावी असा आग्रहही नाही. पण ज्यांना धर्माचे खरे स्वरूप समजले आहे त्यांची मूर्तिपूजा आपोआप सुटते.

शिंदे यांच्या व्याख्यानांना दोन्ही दिवशी रात्री सुमारे तीस-पस्तीसजण हजर होते. संस्थानचे कारभारी, मामलेदार, वकील वगैरे मंडळींनी शिंदे यांचे विवेचन लक्षपूर्वक ऐकले व शांतपणे प्रश्न विचारले. विठ्ठलराव वाळिंबे वकील यांनी पोस्टल मिशनमार्फत समाजाची पुस्तके मागवून माहिती वाढविण्याचा उत्साह दाखविला.२ जमखंडीपेक्षा मुधोळ येथील श्रोतृवर्गाने समंजसपणा व आस्था दाखविली. एक महिन्याचा हा दौरा आटोपून आईवडिलांना मुंबईला घेऊन जाण्याचा विचार त्यांनी पक्का केला. जनाक्का व चंद्राक्का ह्या दोघींना पुण्यातील शाळेत जावयाचे होते म्हणून शिंदे यांनी त्यांनाही आपल्याबरोबर घेतले व अन्यत्र कोठेही दौरा न करता पुण्याहून ते मुंबईस मार्चच्या दुस-या आठवड्यात परतले.

संदर्भ
१.    सुबोधपत्रिका, २८ फेब्रुवारी १९०४, इंग्रजी बाजूकडील शिंदे यांचा अहवाल.
२.    सुबोधपत्रिका, १० एप्रिल १९०४.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य

   निवेदन
    लेखकाचे मनोगत
    दुस-या व तिस-या आवृत्तीच्या निमित्ताने
    प्रस्तावना 
 -   अंत:प्रेरणेचा निर्णय
 -   आजी-आजोबा आणि आई-वडिल
 -   बालपण 
 -   कॉलेजची पहिली दोन वर्षं
 -   जनाबाईंची संसारकथा
 -   जनाबाईंचे शिक्षण
 -   हुजूरपागा शाळा आणि शांता सुखटणकरची
     करुण कहाणी
-    इंटरमीजिएटचे दुसरे वर्ष
 -    पदवी परीक्षेचा अभ्यास आणि एकोणिसाव्या
      शतकाच्या अखेरचे पुणे
   प्रार्थनासमाजाची दीक्षा 
 -    पदवी परीक्षा
 -   अंत:स्थ भावजीवनातील खळबळ 
 -    एकेश्वरी उदार धर्मपंथ
 -    प्रार्थनासमाज
 -    धर्मशिक्षणासाठी निवड आणि परदेशगमन
 -    मुंबई ते ऑक्सफर्ड
 -     मॅंचेस्टर कॉलेज
 -    ऑक्सफर्डमधील पहिले दोन महिने
 -    नाताळची सुट्टी : मुक्काम लंडन 
 -    पत्रांचा विरंगुळा
 -    दक्षिण किना-यावरील पंधरवडा
 -    प्रोफेसरांच्या कुटुंबात सरोवर प्रांती
 -    एडिंबरो आणि स्कॉच सरोवरे
 -    हिंदू गृहस्थिती आणि समाजस्थिती 
      व्याख्यान व नाट्यप्रयोग 
 -    पारीस येथील एक महिना
 -   लिव्हरपूल येथील त्रैवार्षिक युनिटेरियन परिषद
 -    ऑक्सफर्डमधील शेवटची टर्म
 -    ऍमस्टरडॅम येथील आंतराष्ट्रीय उदार धर्मपरिषद
 -    परतीचा प्रवास
 -    स्वदेशी आगमन, बडोदा भेट आणि
      धर्मप्रचारकार्याला प्रारंभ
 -    मद्रासच्या परिषदा आणि हिंदुस्थानचा दौरा
-    जमखंडी-मुधोळ येथील प्रचारकार्य
 -    काठेवाडचा दौरा 
 -    मुंबईतील बि-हाड आणि प्रार्थनासमाजातील नवचैतन्य
 -    धर्मप्रचाराचे विस्तारित कार्य
 -    कौटुंबिक अडचणी, पुणे प्रार्थनासमाजातील नवचैतन्य
 -    धर्मप्रचारार्थ दौरा
 -    प्रवासातील अनुभव
 -    जनाबाई पनवेलमध्ये शिक्षिका
 -    विविध प्रार्थनासमाजांतील सहभाग
 -    भारतीय एकेश्वरी धर्मपरिषद
 -    ब्राह्मधर्मसूची ग्रंथ
 -    अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीविषयक कार्याचे प्रारंभिक प्रयत्न
 -    मिशनच्या स्थापनेचा संकल्प
 -    मिशनची स्थापना
 -  मिशनची घटना व पुणे येथील अंगभूत शाखा
 -    मिशनमधील दोन समारंभ 
 -    मिशनच्या स्थापनेनंतर वातावरणातील बदल
 -    निधीची योजना
 -    मुंबई प्रार्थनासमाजाशी दुरावा आणि फारकत
 -    पुण्यास स्थलांतर
 -    मिशनची महाराष्ट्र परिषद
 -    तुकोजीराव महाराजांची देणगी व मांगांचे
      शेतकी खेडे वसविण्याचा प्रयत्न
 -   अहल्याश्रमाची पूर्वतयारी 
 -    मराठ्यांची सांस्कृतिक जबाबदारी 
 -    काँग्रेसमध्ये अस्पृश्यतानिवारणाचा ठराव
 -    अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीची दिशा व मार्ग
 -    अस्पृश्यतानिवारक परिषद
 -   राष्ट्रीय प्रवाहात मराठा समाज
 -    अस्पृश्यवर्गाचे कायदेमंडळात प्रतिनिधित्व
 -    गैरसमजाचा ससेमिरा 
 -    १९२० सालातील निवडणूक 
-    शिंदे आणि ब्राह्मणेतर पक्ष
 -    कुटुंबातील मृत्यू
 -    मुलींसाठी सक्तीचे शिक्षण
 -    मद्यपाननिषेधाची चळवळ व अन्य सामाजिक कार्य
 -    मिशनचा कार्यविस्तार : कर्नाटक-मध्यप्रांतातील शाखा 
 -    मिशनसंबंधी आक्षेप व समस्या
 -    मिशनची पुनर्घटना
 -    खटल्याचा दैवदुर्विलास
 -    मिशनमधील सहकारी व सहका-यांच्या
       दृष्टीतून विठ्ठल रामजी शिंदे
 -    मंगलोरमधील कार्य
 -   व्हायकोम सत्याग्रह
 -    मंगलोर ब्राह्मसमाजातील पेचप्रसंग
 -    कौटुंबिक उपासनामंडळ
 -    सत्याग्रहात सहभाग आणि नेतृत्व
 -    अस्पृश्यतानिवारणाचे कार्य व म. गांधीशी संबंध
 -    येरवड्याच्या तुरुंगात
 -    ब्रह्मदेशाची यात्रा 
 -    शेतकरी चळवळ
 -    परिषदा, संमेलने यांमधील सहभाग
 -   कौटुंबिक वातावरण
 -    बहुमान, अवमान आणि निष्ठा
 -    वाई ब्राह्मसमाज आणि ग्रामीण भागातील धर्मकार्य
 -    विचारविश्व
 -    साहित्यसेवा आणि संशोधनकार्य
 -   अपूर्व स्नेहसंमेलन
 -   अखेरचे दिवस
 -   उपसंहार 
 -   परिशिष्टे १/२ आणि ३ 
 -   मनोगते
 -   महर्षी शिंदे यांचे फोटो व काही हस्तलिखिते