महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य

निधीची योजना

मिशनच्या वाढत्या कामाला सदैव पैशाची चणचण भासत असे. दयारामजी गिडुमल ह्यांनी मिशनला दरमहा १००/-रु. ची जी देणगी दिली होती ती ३ वर्षांसाठी होती. १९१०च्या जून अखेर ही वर्गणी बंद व्हावयाची होती. म्हणजे मिशनचे काम तर वाढले परंतु पैसा मात्र नाही, अशी पाळी मिशनवर आली होती. ह्या परिस्थितीचे विनोदात्म वर्णन शिंदे ह्यांनी केले आहे. त्यांनी म्हटले आहे, “गरिबांची लग्ने करण्यात लोक मोठा परोपकार समजतात; पण लग्नामुळे संसाराच पसारा होऊन गरिबांचे फार हाल होतात. तसाच ह्या मिशनचा प्रकार झाला.”१

निराश्रित सेवासदन मदतीच्या अभावी बंद करून कार्यकर्त्यांची इतर कामांकडे त्यांना वाटणी करावी लागली. सय्यद अब्दुल कादर आणि इतर कार्यकर्ते ह्यांचे वेतन बंद करणे शक्य नव्हते. मात्र पनवेलची नोकरी सोडून आलेल्या जनाबाईंचे अल्पवेतन मात्र त्यांना थांबवावे लागले. गव्हर्नर सर जॉर्ज क्लार्क ह्यांच्या कन्येने जलसा केल्यामुले जी मदत मिळाली होती तीत भर घालून ५ हजार रुपयांची रक्कम मुंबईतील ट्रस्टीकडे कायम निधी म्हणून ठेवण्यात आली. तिचा चालू खर्चासाठी उपयोग नव्हता. त्यामुले रुपी फंड, तांदूळ फंड, कपडे फंड, पेटी फंड अशा युक्त्या-प्रयुक्त्या शिंदे ह्यांनी योजिल्या. त्यामुळे मिशनच्या कामाचा प्रचार होऊन खर्चाची तोंडमिळवणी करणे संस्थेला काहीसे शक्य झाले.

१८ ऑक्टोबर १९०९ रोजी मिशनच्या संस्थापनेचा दिवस साजरी करण्यासाठी आणि शाळांतील मुलाचा बक्षीस समारंभ करण्याकरित मुंबईच्या टाऊन हॉलमध्ये टोलेजंग जाहीर सभा भरविण्यात आली. तिचे अध्यक्षस्थान श्रीमंत सयाजीरावमहाराज गायकवाड ह्यांनी सुशोभित केले. मिशनचे अध्यक्ष नामदार चंदावरकर, नामदार गोपळ कृष्ण गोखले, मि. विमा दलाल, बडोद्याचे पंडित आत्माराम ह्यांची भाषणे झाली. गावातील प्रमुख स्त्री-पुरुषांनी प्रशस्त टाऊन हॉल गच्च भरला होता. श्रीमंत सयाजीरावमहाराजांनी दोन हजार रुपयाची रक्कम शिष्यवृत्ती देण्यासाठी जाहीर केली. मिशनचे उपाध्यक्ष शेठ दामोदरदास सुखडवाला ह्यांनी पाच हजार रुपयांची देणगी दिली. ह्या मोठ्या रकमा कायम निधीकडेच वळविण्यात येणार असल्यामुळे दैनंदिन खर्चाची चिंता तशीच राहिली.

मिशनला आर्थिक साहाय्य व्हावे ह्या हेतूने सौ. लक्ष्मीबाई रानडे व इतर दोन-तीन सहकारी स्त्रियांनी ह्या प्रसंगी एक वेगलीच युक्ती अवलंबिली. टाऊन हॉलचे पुढचे तीन दरवाजे त्यांनी रोखले व एकेका दरवाजात दोघीदोघी भगिनी आपली शाल पसरून त्या प्रचंड समुदायातील बाहेर जाणा-या प्रत्येकास काहीतरी देणगी टाकण्याचा आग्रह करू लागल्या. सारा जमाव जणू काय कैद झाल्यासारखा देखावा दिसू लागला. पण कोणीही तक्रार न करता उलट ह्या स्त्रियांचे कौतुक करून श्रोतेमंडळी आपखुशीने शालीत देणग्या टाकू लागली. ह्म कैदेत मुंबईचे पोलीस कमिशनर सापडले. खिसे चाचपल्यानंतर खिशात काही न सापडल्यामुळे कमिशनरसाहेब गयावया करू लागले. लक्ष्मीबाईंनी एक शिसपेन्सिल आणि कागदाचा तुकडा त्यांच्या हाती देऊन “झोळीत आकडा टाका म्हणजे सुटका होईल, एरव्ही नाही.” असे सांगितले. कमिशनरसाहेबांनी दुस-या दिवशी देणगीची रोकड शिंदे ह्यांच्याकडे पाठविली. “ही माझी खंडणी घेऊन माझी मुक्तता करा.” अशी त्यांनी विनंती केली होती. देणगीचा आकडा अशा प्रकारे बराच मोठा झाला होता.
मिशनच्या कामाचा बराच बोलबाला झाला होता. त्यामुळे अनपेक्षितपणे कधी कधी देणगी मिळत असे. हिंदुस्थानचे व्हाईसरॉय हार्डिंज व त्यांची पत्नी लेडी हार्डींज ह्यांच्या कानी मिशनचे काम गेले. म्हणून न मागता लेडी हार्डिंज ह्यांनी मोठ्या उदारपणे रोख दोन हजार रुपये पाठवले. मिशनच्या कामाचा चांगलाच बोलबाला झाला होता व मिशनने चालविलेल्या कामाचे महत्त्व समाजातील सगळ्या थराला जाणवू लागले होते. त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या इंग्रजी अधिका-यांनाही जाणवू लागले होते.

अस्पृश्यतानिवारणाचे कार्यक्षेत्र वाढवावे, ह्या कार्याची महती लोकांनी पटकून द्यावी, शक्य असेल तिथे मिशनच्या शाखा नव्याने सुरू कराव्यात वा मिशनच्या कार्यामध्ये सामील करून घ्याव्यात, त्याचप्रमाणे मिशनच्य ह्या वाढणा-या कामासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करावा ह्या हेतूने विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनी विस्तृत दौ-याची योजना आखली.
१९११च्या एप्रिलच्या ९ तारखेपासून त्यांनी व-हाड, काठेवाड, कर्नाटक आणि कोकणातील पश्चिम किनारा ह्या भागाचा दौरा सुरू केला. दौ-यामध्ये व्याख्यानाच्या द्वारा अस्पृश्यतानिवारण्याच्या कार्याचे महत्त्व पटवून देणे; ह्या कामाबद्दल सहानुभूती असणा-या गावांतील प्रतिष्ठित वजनदार मंडलींना सहभागी करून सभा घेणे; ह्या कामासाठी स्थानिक वजनदार पुढा-यांची कमिटी नेमणे; अस्पृश्यवर्गीयांच्या वस्तीची पाहणी करून तेथील लोकांशी संपर्क स्थापन करणे; डिप्रेस्ड क्लासेस मिशनचे ज कार्य चालले आहे त्या कामाची माहिती सांगून त्याचे महत्त्व पटवून देऊन मिशनसाठी निधी गोळा करणे ही अण्णासाहेब शिंदे ह्यांनी दौ-याची उद्दिष्टे व कार्यपद्धती ठेवली होती.

शिंदे ह्यांनी ९ एप्रिल रोजी अकोल्यापासून दौ-याला प्रारंभ केला. अकोला, अमरावती, थगाव येथे सुमारे दोन आठवड्यांचा त्यांनी दौरा केला. अकोल्यातील थिएटरात व्याख्यान दिले. जानोजी डिप्रेस्ड क्लास बोर्डिंगमध्ये उपासना चालविली. महारवाड्यातील रात्रीच्या शाळेत अस्पृश्य स्त्रियांकरिता व्याख्यान दिले व महारवाड्यात कीर्तन केले. अकोला येथील जानोजी फ्री बोर्डींग हे मिशनच्या वतीने चालविले जात होते. स्थानिक कमिटीच्या सदस्यांच्या गाठी घेऊन कामाविषयी त्यांनी चर्चा केली व बोर्डींगची कार्यक्षमता कशा प्रकारे वाढेल ह्यासंबंधी विचारविनिमय केला. अमरावतीला एक दिवस राहून थुगाव येथे गेले. चार दिवस तेथे राहिले. अण्णासाहेबांच्या प्रेरणेने गणेश आकाजी गवई ह्यांनी तेथे प्रार्थनासमाज स्थापन केला होता. अण्णासाहेबांच्या तेथील मुक्कामात अस्पृश्यांची मोठी परिषद भरली. ह्या परिषदेत आजूबाजूच्या ८० खेड्यांतून सुमारे चार हजार लोकांचा समुदाय लोटला होता. ही परिषद दोन दिवस चालली. थुगाव येथील प्रार्थनासमाजात अण्णासाहेब शिंदे ह्यांनी उपासना चालविली. तेथील भजनसमाज उत्तम प्रकारे काम करतो हे त्यांच्या ध्यानात आले. समाजातील सुमारे २० महार सदस्यांची सामाजिक व धार्मिकबाबतीत प्रागतिक स्वरूपाची मते असल्याचे त्यांच्या ध्यानात आले. ह्यामुळे मुंबई शाखेने येथील भजनसमाजाकडे अधिक लक्ष पुरविणे आवश्यक असल्याचे त्यांनी ध्यानात घेतले. थुगाव येथील कामगिरी आटोपून ते अमरावतीस परत गेले.

अमरावती येथील कार्याला प्रारंभ विठ्ठल रामजी शिंदे प्रेरणेनेच झाला होता. १९११ साली प्रसिद्ध झालेल्या मिशनच्या १९०८ ते १९१०च्या त्रैवार्षिक अहवालात अमरावती शाखेचा अहवाल समाविष्ट केला आहे. त्यामध्ये श्री. जी. एन्. काणे व श्री. एन्. एस्. भांगले ह्या सेक्रेटरींनी अमरावती शाखेचा पूर्वेतिहास देताना म्हटले आहे, “मे १९०७ मध्ये ज्या वेळेला डी. सी. मिशन सोसायटीचे जनरल सेक्रेटरी हे अमरावतीला भेट देण्यासाठी आले होते व त्यांनी अस्पृश्य मानलेल्या वर्गाच्या उन्नतीसंबंधी नगरवाचनालयात डिस्ट्रिक्ट जज्ज मि. प्रिदॉ (Pridaux) ह्यांच्या अध्यक्षतेखाली व्याख्यान दिले, त्या वेळेला त्या शहरामध्ये अस्पृश्यवर्गीयांचा प्रश्न पहिल्यांदा चर्चिला गेला.”२ ह्या भेटीमध्ये रावबहादून आर. एन्. मुधोळकर व मिशनचे स्थानिक सेक्रेटरी जी. एन. काणे ह्यांनी मिशनशी सहकार्य करण्याचे वचन दिल्यामुळे ह्या भागात पुन्हा एकदा मुद्दाम भेट द्यावी असे त्यांच्याच विचाराने ठरविले. स्थानिक मंडळींच्या मोठ्या उत्साहामुळे व-हाडातील डी. सी. एम्. शाखांची ही प्रमुख मध्यवर्ती शाखा होण्यास योग्य आहे असे त्यांना वाटले. हा दौरा आटोपून मुंबईस ते २३ एप्रिलला परत आले.

विठ्ठल रामजी शिंदे मुंबईस आल्यानंतर त्याच दिवसी म्हणजे २३ एप्रिल रोजी काठेवाडच्या दौ-यावर निघाले. ह्या दौ-यात ते राजकोट, गोंडल, भावनगर, मांगरोल, जुनागड, वादिया ह्या ठिकाणी गेले व पुन्हा राजकोटला येऊन मुंबईस १८मे रोजी परतले. राजकोट येथील राजे ठाकोरसाहेब ह्यांची धेड लोकांच्या सुधारणेबद्दल सहानुभूती होती व त्यांच्या प्रेरणेने ह्या लोकांसाठी तेथे एक शाळा चालली होती. ठाकोरसाहेबांच्या अध्यक्षतेखाली अण्णासाहेब शिंदे ह्यांचे कॅनॉट हॉलमध्ये व्याख्यान झाले. राजकोट येथील स्थानिक कमिटी मिशनशी संलग्न नसतानाही तिच्या सभासदांनी शिंदे ह्यांच्याशी सर्वतोपरी सहकार्य करून मिशनसाठी २९९ रुपयांची रक्कम जमा केली. ह्यापैकी अर्धी रक्कम शिंदे ह्यांनी कमिटीच्या स्थानिक उपयोगासाठी परत केली. दोन दिवस राजकोटला राहिल्यानंतर शिंदे गोंडल येथे गेले. तेथील दिवाणांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक कॉलेजमध्ये त्यांनी एक व्याख्यान दिले. गोंडलचे ठाकोरसाहेब सर भगवंतसिंगजी व त्यांचे चिरंजीव यांच्याशी मुलाखत झाली. श्रीमंत ठाकोरसाहेब इंग्लंडला जाण्याच्या गडबडीत असल्यामुळे विशेष काम होऊ शकले नाही. गोंडल येथून शिंदे भावनगर येथे गेले. दिवाणसाहेब प्रभाशंकर पट्टणी ह्यांच्या अध्यक्षतेखाली सामळदास कॉलेजमध्ये त्यांचे व्याख्यान झाले. धेड लोकांच्या तेथील वस्तीचे त्यांनी निरीक्षण केले. भावनगर येथील पाच दिवसांच्या वास्तव्याचे फलित म्हणून शिंदे ह्यांना तेथे मिशनची स्थानिक कमिटी स्थापन करता आली. डॉ. देव ह्यांना अध्यक्ष व एल्. बी. वैद्य ह्यांना सेक्रेटरी नेमण्यात आले. ह्या कमिटीने एका शाळा स्थापना करण्याचा निर्णय घेऊन पुढे त्याप्रमाणे शाला स्थापनही केली. दिवाण प्रभाशंकर पट्टणी ह्यांनी शिंदे ह्यांना अरंभिलेल्या कार्याबद्दल आर्थि साहनुभूती दाखविली व त्यांचा संस्थांच्या वतीने उचित गौरव केला. येथे मिशनसाठी रु. ४०५/- एवढा फंड जमला.

मांगरोल हे मुसलमानी संस्थान होते. तेथे चीफसाहेब हिज हायनेस शेखसाहेब व दिवाण बॅ. अलिमहंमद देहवली ह्या दोघांनीही मिशनच्या कार्याला योग्य ते साहाय्य देण्याचे अभिवचन दिले. तेथील मुक्कामात चीफसाहेब त्याचप्रमाणे पोलिटिकल एजंट मि. ई. मॅकनॉच ह्यांच्य भेटी घेतल्या. तेथील धेड लोकांची वस्ती पाहिली. डॉ. रविशंकर अंजारी ह्यांना सन्मान्य सेक्रेटरी करून एक नवीन कमिटी स्थापन केली व ह्या कमिटीच्या वतीने एक दिवसाची शाळा उघडली.

जुनागड येथे अण्णासाहेब शिंदे ह्यांनी १२ व १३ मे असे दोन दिवस वास्तव्य केले. जुनागडचे अँडमिनिस्ट्रेटर मि. रेंडॉल ह्यांची शिंदे ह्यांनी भेट घेऊन त्यांची सहानुभूती संपादन केली. तेथील स्थानिक हायस्कुलात जुनागडचे शिक्षणाधिकारी मि. तर्खड ह्यांच्या अध्यक्षतेखाली व्याख्यान दिले. तेथे स्थानिक कमिटीची स्थापना करून तर्खड ह्यांना अध्यक्ष व मि. पी. नानावटी ह्यांना सेक्रेटरी करून अस्पृश्यांसाठी शाळा स्थापन केली. मि. रेंडॉल ह्यांनी व्यक्तिशः आर्थिक मदत तर केलीच पण त्याशिवाय अस्पृश्यांच्या शाळेचा सगळा खर्च संस्थानाकडून चालविण्याचे वचन दिले. जुनागड येथे मिशनसाठी साडेतीनशे रुपयांचा निधी जमला. शिंदे यांनी वादिया येथे १४ मे रोजी तेथील चीफसाहेबांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक शाळेत जाहीर व्याख्यान दिले. तेथून ते राजकोटला परत आले. लिमडीच्या महाराजांकडून २५०/- रुपये व पोरबंदरच्या अँडमिनिस्ट्रेटरकडून निधीसाठी १००/- रुपयांची देणगी मिळाली. व-हाडच्या दौ-यामध्ये अण्णासाहेब शिंदे ह्यांना २७५/- रुपयांचा निधी मिळाला होता तर काठेवाडच्या दौ-यात रु. १४२९/- एवढा निधी जमला. कामाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने शिंदे ह्यांचा काठेवाडीतील हा दौरा यशस्वी झाला असे आढळून येते.

ह्यानंतर अण्णासाहेब शिंदे १२ ऑगस्ट रोजी कर्नाटक प्रांतातील व पश्चिम
किना-यावरील दौ-यावर निघाले. सतत साडेतीन महिने ते त्या दौ-यावर होते. १२ ऑगस्ट रोजी ते पुण्यास गेले. पुणे येथे मिशनची अंगभूत शाखा उत्तम प्रकारे काम करीत होतीच. मिशनच्या शाळेची त्यांनी पाहणी केली. सुतारकामाच्या वर्गामध्ये पुष्कळशी सुधारणा घडत असून ही शाखा उत्तम प्रकारे काम करीत राहील असा विश्वास त्यांच्या मनात उभा राहिला. फर्ग्युसन कॉलेजचे प्रो. लिमये ह्यांच्या अध्यक्षतेखाली जॉन स्मॉल हॉलमध्ये त्यांनी जाहीर व्याख्यान दिले. त्यांचे फर्ग्युसन कॉलेजमधील एक बालमित्र प्रो. के. रा. कानिटकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली फर्ग्युसन कॉलेजात व्याख्यान देऊन विद्यार्थ्यांसमवेत रुपी फंडासंबंधी चर्चा केली.

१५ ऑगस्ट रोजी साता-यास येऊन तेथे त्यांनी सात दिवस मुक्काम केला. डिस्ट्रिक्ट जज्जांच्या अध्यक्षतेखाली ऑर्थर हॉलमध्ये जाहीर व्याख्यान दिल. सातारा येथील एक प्रार्थनासमाज सर्वस्वी अस्पृश्यवर्गाच्या वतीने चालविण्यात येत असे. त्या समाजामध्ये अण्णासाहेब शिंदे ह्यांनी उपासना चालविली. रावबहादूर व्ही. एन्. पाठक ह्यांच्या घरी वरिष्ठवर्गाच्या स्त्रियांची बैठक बोलाविली. रा. ब. रा. रा. काळे यांच्या अध्यक्षतेखाली सातारा येथील स्थानिक कमिटीची पुनर्घटना केली. मिशनच्या फंडासाठी तेथे ५९४/- रुपये एवढी रक्कम जमली. सातारा येथे शिंदे ह्यांना एक विशेष गोष्ट दिसून आली. तेथील स्थानिक भजनसमाजाचे महार मांग लोकांशी उघडपणे रोटी व्यवहार करीत होते. असा प्रकार इतरत्र कोठेही आढळून येत नव्हता. महार सदस्यांना मिशनच्या कामाबद्दल सहानुभूतीपूर्वक आदर होता.

साता-याहून विठ्ठल रामजी शिंदे सांगली, मिरज, बुधगाव अशा संस्थानाच्या गावी गेले. सांगली येथील राजेसाहेबांची त्यांनी भेट घेतली. हायस्कूलमध्ये व्याख्यान दिले व तेथील महारवाडा पाहिला. सांगलीला मिळालेल्या निधीची रक्कम रु. १० एवढी होती. मिरजेला चीफसाहेबांशी मुलाखत झाली. बुधगावला २४ ऑगस्टला चीफसाहेबांशी मुलाखत झाली. तेथील अस्पृश्यांची शाळा त्यांनी पाहिली. मिरज आणि बुधगाव येथे मिशनला निधी मिळाल्याचा उल्लेख मात्र आढळत नाही.

२७ ऑगस्ट रोजी शिंदे बेळगावास परतले व पाच दिवस तेथे वास्तव्य केले. तेथे कलेक्टरांची मिशनच्या कामाबद्दल सहानुभूती होती. शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. म्युनिसिपल ऑफिसमध्ये एक व्याख्यान झाले. तसेच महारवाड्यातही व्याख्यान झाले. तेथे स्थानिक कमिटी स्थापन करून गोविंद रामचंद्र ओक ह्यांना सेक्रेटरी नेमले. मिशनला २१०/- रुपये एवढा निधी मिळाला.

शिंदे हे बेळगावहून धारवाडला गेले व १ ते ५ सप्टेंबर असे पाच दिवस धारवडमध्ये राहिले. मि. रोद्द यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी सोशल व्याख्यान दिले. अस्पृश्यवर्गाच्या दोन शाळा तपासल्या. मुलींच्या शाळेत अस्पृश्यतानिवारण्याच्या बाबतीत वरिष्ठवर्गीय स्त्रियांशी चर्चा केली. पुरुषांच्या व स्त्रियांच्या ट्रेनिंग कॉलेजास भेट देऊन तेथील प्रिन्सिपॉल व लेडी सुपरिटेंडेंट ह्यांच्याशी अस्पृश्य समाजाबाबत चर्चा केली. तसेच शिंदे धेडवाड्यात गेले व तेथील अस्पृश्यांबरोबर त्यांची स्थिती, त्यांच्या अडचणी व त्या निवारण्यासंबंधी करावयाचे उपाय ह्याबद्दल चर्चा केली. मि. रोद्द हे सामाजिक सुधारणांबाबत प्रयत्न करणारे धारवाडमधील वजनदार गृहस्थ होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली तेथे एक नवी कमिटी स्थापन करून श्री. एन्. आर. देशपांडे वकील यांना सेक्रेटरी नेमले. धारवाड येथील अस्पृश्यवर्गाच्या शाळेत मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्त आढळली. पण बहुतेक मुली यलम्मादेवीच्या जोगतिणी होत्या. ही बाब शिंदे ह्यांनी डॉ. मॅन ह्यांना कळविली. मुरळी सोडण्याच्या प्रथेविरुद्ध काम करणा-या बालसंरक्षण मंडळींचे डॉ. मॅन हे अध्यक्ष होते.

शिंदे ह्यांनी पुढचा आठवडा हुबळी येथे मुक्काम केला. म्युनिसिपालटीचे अध्यक्ष मि. कुदन ह्यांच्या अध्यक्षतेखाली म्युनिसिपल हॉलमध्ये व्याख्यान दिले. त्याचप्रमाणे लिंगायत महिलांसमवेत विचारविनिमय केला. अंत्यजवर्गासाठी असलेल्या दोन शाळा तपासल्या. कर्नाटक प्रांतासाठी एक जोरदार अंगभूत शाखा उघडण्यासाठी हुबळी हे चांगले स्थल आहे असे शिंदे ह्यांच्या लक्षात आले. कारण ते रेल्वेजंक्शन असून व्यापाराचे मुख्य केंद्र होते. अस्पृश्यवर्गीय गिरणीकामगारांची संख्याही मोठी होती व त्यांपैकी ब-याचजणांना शिक्षणाबद्दल कळकळ आहे असे अण्णासाहेबांच्या लक्षात आले. म्हणून येथे रा. कृष्णराव वाळवेकर ह्यांच्या अध्यतेखाली एक नवीन कमिटी नेमली. मि. वागळे वकील आणि तिम्माप्पा मुदरड्डी ह्यांना सेक्रेटरी नेमण्यात आले. मिशनच्या निधीसाठी रुपये ४५७/- एवढी रोख रक्कम मिळाली. शिंदे यांनी योजल्याप्रमाणे हुबळी येथे लवकरच मि. सय्यद ह्यांच्या मार्गदर्शनाखाली अंगभूत शाखा कार्यरत झाली. हुबळीहून अण्णासाहेब शिंदे स्वतःच्या जन्मगावी जमखंडीस गेले. १४ व १५ सप्टेंबर असे दोन दिवस तेथे राहिले. अंत्यजांसाठी असलेली शाळा पाहिली. संस्थानाधिपतींची भेट घेतली व ते ज्या हायस्कूलमध्ये शिकले होते तेथे संस्थानचे कारभारी बापट ह्यांच्या अध्यक्षतेखाली ‘अस्पृश्यतानिवारण’ ह्या विषयावर व्याख्यान दिले. कार्यासाठी निधी रु. २९-८-०० एवढाच मिळाला.

जमखंडीस दोन दिवस राहिल्यानंतर शिंदे जवळ असलेल्या मुधोळ ह्या संस्थानाच्या गावी गेले व दोन दिवस तेथे मुक्काम केला. हायस्कूलच्या हेडमास्तरांच्या अध्यक्षतेखाली वाचनालयामध्ये व्याख्यान दिले. अंत्यजांसाठी असलेली शाळा तपासली . मुधोळच्या अधिपतींची भेट घेतली. श्री. परांजपे यांच्या घरी वरिष्ठवर्गीय महिलांची सभा घेतली. मुधोळ हे काही सुधारलेले ठिकाण नव्हते. तरीही कामाची गरज लक्षात घेता श्री. दत्तोपंत मिरजकर ह्यांना सेक्रेटरी करून नवीन कमिटीची स्थापना केली.

मुधोळहून अण्णासाहेब शिंद तेरदाळला गेले. त्यांचे अत्यंज जिवलग बालमित्र श्री. विष्णुपंत देशपांडे मिशनचे सभासदही होते व गावात त्यांचा पुढाकार असे. तालुक्याच्या मामलेदाराच्या अध्यक्षतेखाली अण्णासाहेब शिंदे ह्यांनी तेथील बाजारात व्याख्यान दिले. अंत्यजवर्गाची शाळा तपासली व महारवाड्यास भेट दिली. रा. दुर्वास वकील ह्यांना सेक्रेटरी करून तेथे नवीन कमिटीची स्थापना केली. तेरदाळ येथे दोन दिवस राहून कर्नाटक प्रांतातील दौर आटोपता घेऊन २२ सप्टेंबर रोजी अण्णासाहेब शिंदे मुंबईला परतले. कर्नाटक प्रांतातील त्यांचा दौरा सलग ४० दिवसांचा झाला. मिशन फंडासाठी एकंदर १, ४३५/- रुपयांचा निधी ह्या दौ-यामध्ये जमा झाला.

मुंबईला १० दिवस वास्तव्य केल्यानंतर शिंदे ह्यांनी पश्चिम किना-यावरील
दौ-यास प्रारंभ केला. प्रथमतः ते मंगळूर येथे गेले. २ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर असे ८-९ दिवसांचे वास्तव्य तेथे केले. रा. के रंगराव ह्यांनी तेथे सुरू केलेली शाळा व उद्योगशाळा चालविणारी संस्था मिशनशी ४ वर्षांपूर्वीच संलग्न करण्यात आली होती. ह्या मुक्कामामध्ये त्यांनी तेथील शाळा, उद्योगशाळा व अस्पृश्यांची वसाहत यांची पाहणी केली. तेथील अस्पृश्यवसाहत हे कामाचे महत्त्वाचे अंग होते.

मंगळूरहून १४ ऑक्टोबर रोजी ते वेंगुर्ल्यास आले. तेथील वाचनालयामध्ये सामंत वकिलांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी व्याख्यान दिले. महारवाड्यास भेट देऊन तेथील लोकांशी बोलले. अंत्यजवर्गासाठी असलेल्या शाळेची तपासणी केली. आर. व्ही. रांगणेकर ह्यांनी सेक्रेटरी नेमून स्थानिक कमिटीची स्थापना केली.

सावंतवाडी ह्या संस्थानाच्या गावी हायस्कूलमध्ये एक व्याख्यान दिले. अंत्यज शाळेची पाहणी केली. तेथील पोलिटिकल एजंट मि. ए. एस. पॉटिंजर ह्यांची भेट घेतली. अस्पृश्यांच्या औद्योगिक उन्नतीसाठी एखादी योजना पाठविल्यास संस्थानी मदत करण्याचे आश्वासन मि. पॉटिंजर ह्यांनी दिले. शिंदे ह्यांनी त्यांची आंबोली येथे १७ ऑक्टोबर रोजी भेट घेऊन चर्चा केली. सावंतवाडीच्या मुक्कामानंतर शिंदे मालवण येथे गेले. रावबहादूर एम. एस. मोरे ह्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी भंडारी हायस्कुलात व्याख्यान दिले. त्याचप्रमाणे दत्तमंदिरात आणखी एक व्याख्यान दिले व कीर्तन केले. मालवण येते मिशनचे काम सुरू करण्याच्या उद्देशाने एक नवीन कमिटी स्थापन केली. रा. एस्. जी. केणी आर. डी. पै ह्यांना सेक्रेटरी केले. इतिहासाचा गोडी असणा-या अण्णासाहेब शिंदे ह्यांनी स्वाभाविकपणे मालवण येथील जंजिरा किल्ला पाहिला. आतमध्ये असलेला शिवाजीचा पुतळा पाहिला. वेंगुर्ला, सावंतवाडी, मालवण येथे मिशनसाठी काहीही निधी मिळालेला दिसतनाही. आंबोलीच्या घाटातील रम्य देखावा मात्र त्यांना पाहावयास मिळाला. निसर्गावर स्वाभाविक प्रेम असणा-या अण्णासाहेबांना हा देखावाही मोलाच वाटला असणार. ‘घाटातील देखावा पाहिला’ अशी नोंद त्यांनी केली आहे.

मालवणहून शिंदे रत्नागिरीला गेले. तेथील महारवाडा व उद्योगशाळा पाहिली. तेथे असणा-या उद्योगशाळेत अस्पृश्यांस प्रवेश नाही व अस्पृश्यांसाठी म्युनिसिपालिटीने कोणतीही उद्योगशाला सुरू केली नाही हे अण्णासाहेबांच्या ध्यानात आले. त्यांनी कलेक्टर मि. क्लेटन ह्यांची भेट घेतली व ही बाब त्यांच्या निदर्शनासा आणली. ह्या बाबतीत ताबडतोब लेखी उत्तर पाठविण्याचे आश्वासन त्यांनी शिंदे ह्यांना दिले.

पश्चिम किना-यावरील ह्या दौ-याचा शेवटचा टप्पा दापोली हा होता. दापोली येथे मिशनची शाखा काम करीत होती. तेथे एक दिवसाची शाळा व तीत सुमारे ४० विद्यार्थि होते. मुलांना विद्यार्थिवेतने मिळत असत. दापोली येथील स्थानिक कमिटीच्या सदस्यांची त्यांनी भेट घेतली. काद्री व्हिला येथे व्याख्यान दिले व महारवाड्यात कीर्तन केले. येथील चांभार मंडळींकडून लष्करी पेन्शनरांच्या मुलांसाठी प्रयत्न होत होते. स्थानिक कमिटीचे अध्यक्ष मि. काद्री हे मुसलमान गृहस्थ कळकळीने काम करीत असत. सुमारे ४ आठवड्यांचा पश्चिम किना-यावरील दौरा आटोपून विठ्ठल रामजी शिंदे हे २९ ऑक्टोबर रोजी मुंबईस परत आले.

व-हाड काठेवाड, कर्नाटक आणि पश्चिम किनारा ह्या प्रदेशामध्ये अण्णासाहेब शिंदे ह्यांनी १९१०च्या एप्रिलपासून जवळ जवळ ४ महिन्यांचा दौर केला. ह्या प्रदीर्घ दौ-यामध्ये त्यांनी आपली उद्दिष्टे ब-याच प्रमाणात साध्या केली असे दिसून येते. तो काळच असा होता की, अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीसाठी आणि अस्पृश्यता नाहीशी करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक होते. शिंदे ह्यांची काम करण्याची दृष्टी दुहेरी होती. अस्पृश्यवर्गाची उन्नती करण्यासाठी त्या वर्गासाठी शाळा, उद्योगशाळा स्थापन करून त्यांना सुशिक्षित बनविणे व नोकरीधंद्यासाठी लायक बनवून त्यांना स्वावलंबी करणे;  त्यांचा आत्माभिमान जागृत करणे; उच्च धार्मिक व नैतिक विचारांच्या द्वारा त्यांच्यामध्ये जागृती करून त्यांची सर्वांगीण स्थिती सुधारणे हा शिंदे ह्यांनी आपल्या कामाचा एक भाग मानला होता. त्यांचाच शब्दप्रयोग करावयाचा झाला तर हे काम सुवर्णकार पद्धतीचे होते. कामाचे दुसरे अंग हेही अतिशय महत्त्वाचे होते. ते म्हणजे स्वतःला उच्च समजणा-या वर्गाने काही वर्गांना अस्पृश्य मानले होते. अंत्यजवर्गाची अस्पृश्यता ही स्वतःला उच्चवर्णीय समजणा-यांनी आपल्या कल्पनेने लादलेली एक भ्रामक अशी गोष्ट होती. ख-या धर्माचा ह्या मानीव अस्पृश्यतेशी कोणत्याही प्रकारचा संबंध नव्हता. अस्पृश्यता नष्ट करावयचा असेल तर स्पृश्यांच्या मनातील हा भ्रम दूर करणे आवश्यक होते. आपल्यासारख्याच काही माणसांना बहिष्कृत समजणे ही गोष्ट माणुसकीला व हिंदू समाजालाही कलंकभूत ठरावी अशी आहे, ह्याची स्पृश्यवर्गाला जाणीव करून देणे ही आवश्यक गोष्ट होती. स्पृश्यवर्गाने शतकानुशतके ही अस्पृश्यता व हीनत्व ह्या वर्गावर लादलेले असल्यामुळे ते निकृष्ट अवस्थेली पोहोचले होते. त्यांची ही निकृष्ट अवस्था नाहीशी करून त्यांच्यात सुधारणा करणे हीही स्पृश्यवर्गाची नैतिक जबाबदारी व त्यांचे कर्तव्य आहे, अशा प्रकारची जाणीव वरिष्ठ समजल्या जाणा-या वर्गामध्ये निर्माण करणे हा शिंदे ह्यांनी आपल्या कामाचा दुसरा भाग मानला होता. ह्या प्रकारच्या कामाला ही दोन्ही प्रकारची कामे दौ-यामध्ये करण्याचा शिंदे यांचा सातत्याने प्रयत्न असावयाचा. स्थानिक, इंग्रज अधिकारी व समाजातील प्रतिष्ठित पुढारी ह्यांचे एकंदरीत वजन जास्त पडत असल्यामुळे त्यांच्या सहकार्याने ह्या कामाचा उठाव होणे जास्त शक्य होते. म्हणून शिंदे ह्या दृष्टीने ह्या वर्गातील वजनदार मंडळींचे सहकार्य ह्या कामाचा उठाव होणे जास्त शक्य होते. म्हणून शिंदे ह्या दृष्टीने ह्या वर्गातील वजनदार मंडळींचे सहकार्य सातत्याने घेत होते. कोणत्याही सामाजिक सुधारणांमध्ये स्त्रियांनी सहभागी होणे आवश्यक आहे; त्यांच्या सहभागामुळे सामाजिक, धार्मिक कार्य वेगाने व परिणामकारक रीतीने होऊ शकते अशी अण्णासाहेब शिंदे ह्यांची पहिल्यापासून धारणा होती. त्यामुळे ह्या प्रचारदौ-यात शक्य होईल तिथे ते समाजातील प्रतिष्ठित स्त्रियांची सभा घेत असत व सुधारणेचे हे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवीत असत. गावोगावी ते त्याप्रमाणे प्रतिष्ठितवर्गाशी संपर्क साधीत असत. त्याचप्रमाणे ज्यांच्यासाठी हे काम करावयाचे त्यांच्या भेटी ते स्वाभाविकपणेच आवर्जून घेत असत. म्हणून प्रत्येक गावच्या महारवाड्यात ते जात असत. त्यांच्याशी बोलून त्यांची परिस्थिती, त्यांच्या अडीअडचणी समजून घेत असत. त्यांच्यात स्वोद्धाराची प्रेरणा जागृत होणेही त्यांना आवश्यक वाटत होते.

अस्पृश्यवर्गासाठी ज्या म्हणून शाला व संस्था चाललेल्या आहेत त्यांची ते तपासणी करीत असत. कोणत्या गावी नव्याने कार्य सुरू होऊ शकेल ह्याचा अंदाज घेऊन तेथे लायक माणसे हेरून नव्याने कार्याला आरंभ करीत असत.

ह्या कामासाठी विठ्ठल रामजी शिंदे महिनोनमहिने सातत्याने प्रवास करून किती परिश्रम घेत असत ह्याची कल्पना त्यांच्या त्या दौ-यावरून येऊ शकते. प्रवासामध्ये सर्व प्रकारची दगदग ते सहन करीत स्वतःवर खर्च असा करीतच नसत. जो काही खर्च होत असे तो केवळ प्रवासभाड्याचा असे. सुमारे चार महिने केलेल्या ह्या चार प्रांतांतील दौ-यामध्ये त्यांनी अस्पृश्यतानिवारणकार्याबद्दल जागृती करण्याचे काम मोठ्या प्रमाणात केले. अनेक नवीन शाखा स्थापन करून काठेवाडातील भावनगरपासून ते केरळातील मंगळूरपर्यंत कामाचा विस्तार केला. ह्या चारही दौ-यांमध्ये मिशनसाठी त्यांनी ३ हजार २१० रुपये एवढा निधी मिळविला. एवढ्या प्रदीर्घ काळातील प्रवासीदौ-यात ते २७ गावी गेले आणि त्यांच्या प्रवासाचा खर्च मात्र १९८ रुपये ८ आणे ३ पैसे एवढाच झाला. ह्यावरून ते अस्पृश्यतानिवारण्याच्या कार्यासाठी किती अपरंपार कष्ट घेत असत हे असे दिसून येते त्याचप्रमाणे स्वतः अत्यंत काटकसरीने राहून संस्थेचा पैसा कसा वाटवीत असत हे दिसून येते.

मिशनच्या कामाचा व्याप वाढतच होता त्याबरोबर खर्चही वाढत होता. खर्चाची आणि जमेची तोंडमिळवणी कशी करावी याची शिदे यांना सतत चिंता असे. दौरा काढून काही निधी त्यांनी मिळविला तरी पैशाची गरज तशीच होती. तेव्हा मिशनसाठी निधी उभा करण्यासाठी काही अन्य उपक्रम कल्पकपणे सुरू करण्यात आले. अशा उपक्रमांपैकी डी. सी. एम्. रुपी फंड नावाची एक नवीन योजना १९११च्या जुलै महिन्यात आखण्यात आली. त्या फंडाच्या उभारणीसाठी सुमारे १० स्वयंसेवक व त्यावर एक कॅप्टन व असे १० कॅप्टनांचे गट करण्याची योजना करण्यात आली होती. प्रत्येक स्वयंसेवकाने एक रुपया वर्गणी गोळा करून वर्षाअखेर १०० रुपये जमवावे अशी अपेक्षा होती. ही योजना करण्याच्या पाठीमागे मिशनने निधीसाठी केवळ मोठ्या देणगीदारांवर अवलंबून राहू नये. सर्वसाधारण मिळकतीच्या लोकांकडूनही अल्पस्वल्प प्रमाणात देणगी मिळवून निधीची रक्कम वाढवावी असा उद्देश होता. ह्या उपक्रमामुळे साधारण मिळकतीच्या लोकांनाही मिशनला मदत करमे शक्य व्हावे, असाही एक हेतू होता. त्याचप्रमाणे एकच रुपया मागण्याच्या उद्देशात ती रक्कम कमी असली तरी ती देणा-या व्यक्तीचे हृदय त्यामध्ये असते ही भावना फंड जमविण्याच्या पाठीमागे ठेवण्यात आली. ह्या उपक्रमामुळे मिशनच्या कामाची जास्तीतजास्त लोकांना माहिती पुरवून त्यांची सहानुभूती ह्या कार्याकडे वळवावी असेही धोरण होते. स्वयंसेवकांनी हे काम कॅप्टनच्या मार्गदर्शनाखालीच करावे असे ठरविण्यात आले. दर महिनाअखेरीला स्वयंसेवकांनी आपल्या कॅप्टनकडे जमलेली रक्कम व हिशोब द्यावा वगैरे काटेकोर नियम ह्या फंडाबाबत तयार करण्यात आले होते.

फंडाच्या बोर्डावर खालील ६ कॅप्टन नेमले.
१)    सौ. लक्ष्मीबाई रानडे ह्यांच्या हाताखाली १५ स्वयंसेवक,
२)    पी. बी. गोठोस्कर ह्यांच्या हाताखाली १६ स्वयंसेवक,
३)    अमृतलाल व्ही. ठक्कर ह्यांच्या हाताखाली ११ स्वयंसेवक,
४)    वि. रा. शिंदे ह्यांच्या हाताखाली ११ स्वयंसेवक,
५)    सय्यद अब्दुल कादर ह्यांच्या हाताखाली ११ स्वयंसेव,
६)    एल. बी. नायक ह्यांच्या हाताखाली १० स्वयंसेवक.
श्री. एल. बी नायक ह्यांना कॅप्टन जनरल नेमण्यात आले.

ह्याप्रमाणे ८० स्वयंसेवकांनी २१ डिसेंबर १९११ रोजी संपणा-या सहामाहीच्या आत प्रत्येकी १०० रुपये जमविण्याचे ठरविले. परंतु ऑगस्ट १२ पासून ३१ डिसेंबर १९११ अखेर सगळे स्वयंसेवक एकूण फक्त रुपये १४७१ जमवू शकले. अपेक्षित ४ हजारांच्या मानाने हा आकडा फारच कमी होता. बोर्डाच्या बैठकी डॉ. एच. जी. रानडे ह्यांच्या ठाकूरद्वार येथील दवाखान्यात भरत असत. बोर्डाची एक साधारण सभा आणि दोन सामाजिक मेळावे पहिल्या सहामाहीत भरविण्यात आले. स्वयंसेवकांचा परस्पर परिचय होऊन स्नेहभाव वाढण्याच्या कामी त्या मेळाव्याचा व सभांचा फार उपयोग झाली. १९११ साली मिशनला रुपये १, ३१६ची तूट झाली असे मिशनचे जनरल सेक्रेटरी ह्या नात्याने १९११च्या वार्षिक अहवालात शिंदे ह्यांनी नमूद केले आहे. पुढील वर्षी म्हणजे १९१२ सालच्या अखेरीस १२ महिन्यांमध्ये एकंदर १०१६ रुपये रुपीफंड म्हणून जमा झाले. अपेक्षित ५ हजार ह्या रकमेपेक्षा जमलेली रक्कम फारच कमी होती. ह्या वर्षी अण्णासाहेब शिंदे ह्यांच्या पत्नी सौ. रुक्मिणीबाई ह्यांनी स्वयंसेविका म्हणून काम केले व एकंदर ५६० रुपये जमविले. त्यांना ह्या कामी भगिनी जनाबाई ह्यांची मोठी मदत झाली.३

रुपीफंड ह्या उपक्रमाचा निधी जमविण्याच्या दृष्टीने अपेक्षित यश मिळाले नसले तरी सहानुभूतीचे वलय विस्तारण्यात ह्या उपक्रमाचा मोठाच उपयोग झाला.

तांदूळ फंड : “निराश्रित सेवासदन या संस्थेतून परळ येथे विद्यार्थी वसतिगृह निघाले होते. १९१२ साली जेवून राहणा-या विद्यार्थ्यांची संख्या ४० होती. मुंबईसारख्या शहरामध्ये ह्या संस्थेचा बराच खर्च येऊ लागला. रोखीने निधी जमविण्याचे काम पुरे पडेना. त्यामुळे तांदुळ फंड म्हणून एक युक्ती काढली. ह्या योजनेनुसार भगिनीने रोज मठभर तांदूळ टाकण्यासाठी घरोघरी तांदूळ व इतर धान्याच्या पिशव्या ठेवण्यात आल्या होत्या. दर आठवड्याला स्वयंसेवकांमार्फत विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन हे धान्य वसतिगृहामध्ये आणण्यात येई. १९१२ साली ३४ फरे(सुमारे ३८ क्विंटल) तांदूळ, अडीच फरे (सुमारे ३ क्विंटल) गहू आणि ८ फरे (सुमारे ९ क्विंटल) डाळ गोळा करण्यात आली. किमतीच्या दृष्टीने ही मदत फार नसली तरी प्रत्येक मूठभर तांदळाच्यामागे एकेक स्त्रीचे मानवी हृदय होते. ह्या दृष्टीने पाहता रुपी फंडापेक्षाही ह्या फंडाने सहानुभूतीचे वलय कितीतरी वाढविले. अस्पृश्यतानिवारणाचे कामी लोकमत तयार करण्याचे सर्वात मुख्य काम अशा युक्त्या-प्रयुक्त्यांनी बिनबोभाट चालले होते.”४

कापड फंड व पेटी फंड : जेवणाशिवाय विद्यार्थ्यांना नवे-जुने कपडे, बिछाने, भांडी, साबण, औषधे, पुस्तके वगैरे अनेक घरगुती वस्तूंची गरज लागत असे. ही गरज भागविण्यासाठी कापड फंड व पेटी फंड ह्या फंडांची योजना केली होती. ह्या योजनेनुसार सीलबंद केलेल्या लहान लहान लाकडी पेट्या, मुख्य मुख्य कचे-या, खाजगी दवाखाने, वकिलांची घरे आणि इतर माणसांची जा-ये पुष्कळ आहे अशा ठिकाणी ठेवण्यात आल्या. विठ्ठल रामजी शिंदे हे विलायतेस असताना अशा प्रकारच्या पेट्या पाहिल्या असा त्यांनी उल्लेख केला आहे.५
मिशनच्य वतीने ठेवण्यात आलेल्या अशा पेट्यांची जबाबदारी नेहमी त्या ठिकाणी असणा-या हितचिंतकावर सोपविण्यात आली. दर महिन्याच्या शेवटी स्वयंसेवक हितचिंतकांसमोर ती उघडून आतील रकमेची पावती देऊन मिशनच्या खजिनदाराकडे हिशेब देत असत. रुपी फंड जमविण्याच्या कामी स्वयंसेवक म्हणून सौ. रुक्मिणीबाई शिंदे ह्यांनी भाग घेतला होता. त्याचप्रमाणे तांदूळ आणि कापड फंड जमविण्याच्य कामातही त्यांनी भाग घेतला होता व मोठ्या प्रमाणात हाही फंड जमा करण्याच्या बाबतीत यश मिळविले.
विद्यार्थ्यांचे वसतिगृह आणि उद्योगशाळा चालविणे ही कामे दगदगीची त्याचप्रमाणे मोठ्या खर्चाचीही होती. मात्र मिशनचे विद्यार्थ्यांचे वसतिगृह ज्याप्रमाणे सहेतुकपणे चालविले होते त्याप्रमाणे उद्योगशाळाही चालविली होती. औद्योगिक शिक्षण ह्या वर्गातील मुलांना देण्याच्या पाठीमागे मुख्य कल्पना अशी होती की, “विद्यार्थ्यांच्या हातांना आणि डोळ्यांना व्यावहारिक वळण लागावे आणि तदद्वरा विद्यार्थ्याला भावी आयुष्यामध्ये कोणता तरी हस्तकौशल्याचा धंदा करता यावा... म्हणून अशा धंद्याची तयारी लहानपणापासून केली नाही तर ते पुढे पोकळ पंडित बनून आईबापांच्या आणि स्वतःच्या निराशेला कारणीभूत होतील.”६

मुंबईतील परळ शाळेत बुकबाइंडिंग व शिवण्याचे काम, मंगळूर येथे हातमागावर विणण्याचे काम, महाबळेश्वर येथे काथ्याचे दोरखंड आणि वेताच्या टोपल्या वगैरे करण्याचे काम अशी ओद्योगिक कामे प्रथमपासून शिंदे ह्यांनी सुरू केली. १९१२ साली परळ येथील शाळेला स्वतंत्र उद्योगशाळा जोडण्याची त्यांना आवश्यकता भासू लागली. उद्योगशाळेचे काम त्यांनी फार दूरदृष्टीने सुरू केले होते असे आजची परिस्थिती पाहता म्हणावेसे वाटते.
उद्योगशाळा चालविण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध व्हावा ह्या हेतूने मुंबईच्या एन्. एम्. वाडिया ह्यांना मिशनची परळ येथील माध्यमिक शाळा समक्ष दाखविण्यात आली. शाळेतील सर्व कामे बारकाईने पाहिल्यावर मिशन औद्योगिक शाळा चालविण्यास पात्र आहे अशी ह्या ट्रस्टींची खात्री झाली आणि दरसाल ६ हजार रुपयांची देणगी याप्रमाणे तीन वर्षांपर्यत १८ हजार रुपये देण्याचे त्यांनी कबूल केले. त्याप्रमाणे नवीन उद्योगशाळा निघाली. ह्या शालेत सुतारकाम, चित्रकला रंगकाम व पुस्तके बांधण्याचे काम असे ४ निरनिराळे वर्ग पाच शिक्षकांच्या देखरेखीखाली उघडण्यात आले. शाळेतील सर्व मुलांनी व विशेषतः वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यींनी कोणत्या ना कोणत्य तरी वर्गातून दिवसातील २ तास हे औद्योगिक शिक्षण अवश्य घ्यावे अशी योजना करण्यात आली. पुणे शाखेतही विद्यार्थिवसतिगृहाची पूर्वतयारी १९१२ अखेर करण्यात आल्यानंतर तेतेही अशा शिक्षणाची तरतूद करण्यात आली.

संदर्भ
१.    विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अ   नुभव, पृ. २४१.
२.    दि फोर्थ अँन्युअल रिपोर्ट ऑफ दि डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया, बॉम्बे, १९११, पृ. ३७.
३.    फिफ्थ अँन्युअल रिपोर्ट ऑफ दि डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया, बॉम्बे, ३१ डिसेंबर १९१.
४.    विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. २५६-५७.
५.    विठ्ठल रामजी शिंदे, रोजनिशी, पृ. ९९.
६.    विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. २५७-२५८.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य

   निवेदन
    लेखकाचे मनोगत
    दुस-या व तिस-या आवृत्तीच्या निमित्ताने
    प्रस्तावना 
 -   अंत:प्रेरणेचा निर्णय
 -   आजी-आजोबा आणि आई-वडिल
 -   बालपण 
 -   कॉलेजची पहिली दोन वर्षं
 -   जनाबाईंची संसारकथा
 -   जनाबाईंचे शिक्षण
 -   हुजूरपागा शाळा आणि शांता सुखटणकरची
     करुण कहाणी
-    इंटरमीजिएटचे दुसरे वर्ष
 -    पदवी परीक्षेचा अभ्यास आणि एकोणिसाव्या
      शतकाच्या अखेरचे पुणे
   प्रार्थनासमाजाची दीक्षा 
 -    पदवी परीक्षा
 -   अंत:स्थ भावजीवनातील खळबळ 
 -    एकेश्वरी उदार धर्मपंथ
 -    प्रार्थनासमाज
 -    धर्मशिक्षणासाठी निवड आणि परदेशगमन
 -    मुंबई ते ऑक्सफर्ड
 -     मॅंचेस्टर कॉलेज
 -    ऑक्सफर्डमधील पहिले दोन महिने
 -    नाताळची सुट्टी : मुक्काम लंडन 
 -    पत्रांचा विरंगुळा
 -    दक्षिण किना-यावरील पंधरवडा
 -    प्रोफेसरांच्या कुटुंबात सरोवर प्रांती
 -    एडिंबरो आणि स्कॉच सरोवरे
 -    हिंदू गृहस्थिती आणि समाजस्थिती 
      व्याख्यान व नाट्यप्रयोग 
 -    पारीस येथील एक महिना
 -   लिव्हरपूल येथील त्रैवार्षिक युनिटेरियन परिषद
 -    ऑक्सफर्डमधील शेवटची टर्म
 -    ऍमस्टरडॅम येथील आंतराष्ट्रीय उदार धर्मपरिषद
 -    परतीचा प्रवास
 -    स्वदेशी आगमन, बडोदा भेट आणि
      धर्मप्रचारकार्याला प्रारंभ
 -    मद्रासच्या परिषदा आणि हिंदुस्थानचा दौरा
-    जमखंडी-मुधोळ येथील प्रचारकार्य
 -    काठेवाडचा दौरा 
 -    मुंबईतील बि-हाड आणि प्रार्थनासमाजातील नवचैतन्य
 -    धर्मप्रचाराचे विस्तारित कार्य
 -    कौटुंबिक अडचणी, पुणे प्रार्थनासमाजातील नवचैतन्य
 -    धर्मप्रचारार्थ दौरा
 -    प्रवासातील अनुभव
 -    जनाबाई पनवेलमध्ये शिक्षिका
 -    विविध प्रार्थनासमाजांतील सहभाग
 -    भारतीय एकेश्वरी धर्मपरिषद
 -    ब्राह्मधर्मसूची ग्रंथ
 -    अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीविषयक कार्याचे प्रारंभिक प्रयत्न
 -    मिशनच्या स्थापनेचा संकल्प
 -    मिशनची स्थापना
 -  मिशनची घटना व पुणे येथील अंगभूत शाखा
 -    मिशनमधील दोन समारंभ 
 -    मिशनच्या स्थापनेनंतर वातावरणातील बदल
 -    निधीची योजना
 -    मुंबई प्रार्थनासमाजाशी दुरावा आणि फारकत
 -    पुण्यास स्थलांतर
 -    मिशनची महाराष्ट्र परिषद
 -    तुकोजीराव महाराजांची देणगी व मांगांचे
      शेतकी खेडे वसविण्याचा प्रयत्न
 -   अहल्याश्रमाची पूर्वतयारी 
 -    मराठ्यांची सांस्कृतिक जबाबदारी 
 -    काँग्रेसमध्ये अस्पृश्यतानिवारणाचा ठराव
 -    अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीची दिशा व मार्ग
 -    अस्पृश्यतानिवारक परिषद
 -   राष्ट्रीय प्रवाहात मराठा समाज
 -    अस्पृश्यवर्गाचे कायदेमंडळात प्रतिनिधित्व
 -    गैरसमजाचा ससेमिरा 
 -    १९२० सालातील निवडणूक 
-    शिंदे आणि ब्राह्मणेतर पक्ष
 -    कुटुंबातील मृत्यू
 -    मुलींसाठी सक्तीचे शिक्षण
 -    मद्यपाननिषेधाची चळवळ व अन्य सामाजिक कार्य
 -    मिशनचा कार्यविस्तार : कर्नाटक-मध्यप्रांतातील शाखा 
 -    मिशनसंबंधी आक्षेप व समस्या
 -    मिशनची पुनर्घटना
 -    खटल्याचा दैवदुर्विलास
 -    मिशनमधील सहकारी व सहका-यांच्या
       दृष्टीतून विठ्ठल रामजी शिंदे
 -    मंगलोरमधील कार्य
 -   व्हायकोम सत्याग्रह
 -    मंगलोर ब्राह्मसमाजातील पेचप्रसंग
 -    कौटुंबिक उपासनामंडळ
 -    सत्याग्रहात सहभाग आणि नेतृत्व
 -    अस्पृश्यतानिवारणाचे कार्य व म. गांधीशी संबंध
 -    येरवड्याच्या तुरुंगात
 -    ब्रह्मदेशाची यात्रा 
 -    शेतकरी चळवळ
 -    परिषदा, संमेलने यांमधील सहभाग
 -   कौटुंबिक वातावरण
 -    बहुमान, अवमान आणि निष्ठा
 -    वाई ब्राह्मसमाज आणि ग्रामीण भागातील धर्मकार्य
 -    विचारविश्व
 -    साहित्यसेवा आणि संशोधनकार्य
 -   अपूर्व स्नेहसंमेलन
 -   अखेरचे दिवस
 -   उपसंहार 
 -   परिशिष्टे १/२ आणि ३ 
 -   मनोगते
 -   महर्षी शिंदे यांचे फोटो व काही हस्तलिखिते