महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य

काँग्रेसमध्ये अस्पृश्यतानिवारणाचा ठराव

१९१६ पासून हिंदुस्थानच्या राजकारणाचे वारे स्वराज्याच्या दिशेने जोरात वाहू लागले. डॉ. अँनी बेझंट यांनी होमरूल चळवळीला जोरदार प्रारंभ केला. इकडे महाराष्ट्रातही लो. टिळकांनी होमरूलची चळवळ उत्साहाने सुरू केली. ह्या चळवळीला समाजातील सगळ्या जातींचा व धर्मांचा पाठिंबा मिळणे आवश्यक होते. हा पाठिंबा मिळण्यासाठी विविध जातिधर्माच्या लोकांमध्ये असणारा भेदभाव नाहीसा होऊन त्याच्यात एकजूट निर्माण होण्याची आवश्यकता होती. स्वराज्याचे हे भलेमोठे ध्येय राजकीय पुढा-यांनी आपल्या डोळ्यांसमोर ठेवल्याने समाजामध्ये असणा-या विविध भेदांना आपोआपच गौणत्व येऊ लागले होते. तसेच एकजूट निर्माण करण्याचे जाणीवपूर्व प्रयत्नही सुरू झाले होते. आम्ही आमचे राज्य करणार आहोत ही गोष्ट ब्रिटिश सरकारच्या गळी उतरवायची असेल तर ह्या स्वदेशी अमलाबाबत एकमत दिसून येणे आवश्यक होते. राजकीय चळवळीच्या ह्या रेट्याला लाभ अस्पृश्यतानिवारणाच्या कार्यालाही होऊ शकला.


डिप्रेस्ड क्लासेस मिशनची १९०६साली स्थापना केल्यापासून हा प्रश्न राष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी राष्ट्रसभेपुढे येणे आवश्यक आहे, असे विठ्ठल रामजी शिंदे यांना वाटत होते. प्रत्येक राष्ट्रसभेच्या अधिवेशनच्या वेळेल्या होणा-या सामाजिक परिषदेच्या निमित्ताने तर ते उपस्थित राहत होतेच; शिवाय राष्ट्रसेभेच्या अधिवेशनाच्या जोडीनेच ते सेक्रेटरी ह्या नात्याने ब्राह्म धर्मपरिषद आयोजित करण्याची जबाबदारीही सांभाळीत होते. राष्ट्रसभेचेच पुढारी सामाजिक परिषदेच्या अधिवेशनास उपस्थित असत व तेथे ह्या प्रश्नाचा ऊहापोह चालत असल्यामुळे डी. सी. मिशनच्या कार्याची व शिंदे यांच्या प्रयत्नांची राजकीय पुढा-यांना चांगली माहिती झाली होती. बिपिनचंद्र पाल लाला लजपतराय, पं. मदनमोहन मालवीय, लो. टिळक, डॉ. अँनी बेझंट हे नेते विठ्ठल रामजी शिंदे यांच्या चांगल्या परिचयाचे झाले होते. १९१७च्या अखेरीस कलकत्ता येथे होणा-या राष्ट्रसभेच्या अधिवेशनच्या अध्यक्ष डॉ. अँनी बेझंट ह्या होत्या. डॉ. अँनी बेझंट यांना मिशनच्या कामाची जवळून महिती होती. मुंबई व पुणे येथे मिशनने चालविलेले काम त्यांनी स्वतः बघितले होते व अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीबद्दल त्यांना स्वतःला तळमळही वाटत होती. १९०७ पासून जवळ जवळ आठ-नऊ वर्षे विठ्ठल रामजी शिंदे हे राष्ट्रसभेने अस्पृश्यतानिवारणाचा ठराव मांडावा म्हणून दरवर्षी राष्ट्रसभेला मिशनच्या वतीने विनंती करीत आले होते. परंतु ह्या प्रश्नाकडे राष्ट्रसभेचे आतापर्यंत लक्ष गेले नव्हते. कलकत्त्याच्या अधिवेशनाच्या वेळचे चित्र मात्र बदलले होते. वर म्हटल्याप्रमाणे होमरूलची चळवळ भरात आली होती. ह्या चळवळीचे प्रवर्तन करणा-या डॉ. अँनी बेझंट ह्याच काँग्रेसच्या अध्यक्षही होत्या व सुदैवाने मिशनच्या कामाची त्यांना चांगली माहिती होती. ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित आल्यामुळे शिंदे यांच्या आठ-नऊ वर्षांच्यातपश्चर्येला फळ आले. शिंदे यांच्या आग्रहावरून मिसेस बेझंटना राष्ट्रसभेच्या अधिवेशनात अस्पृश्यतानिवारणाचा ठराव काँग्रेसच्या कार्यक्रमाता घेऊन मंजूर करता आला.१


राष्ट्रसभेचे ३२वे अधिवेशन अँनी बेझंट यांच्या अध्यक्षतेखाली २६ डिसेंबर १९१७ रोजी कलकत्ता येथे सुरू झाले. अस्पृश्यतानिवारणासंबंधीचा ठराव पंधराव्या क्रमांकाचा होता व तो मद्रासकडील सुप्रसिद्ध पुढारी जी. ए. नटेशन ह्यांनी मांडला. ठराव असा होताः “ही राष्ट्रीय सभा हिंदुस्थानातील सर्व लोकांस अशी जाहीर विनंती करते की, अस्पृश्यवर्गावर आजपर्यंत जो अनन्वित जुलूम होत आहे व ज्यामुळे ह्या वर्गाला विविध प्रकारच्या छळाला व गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे, अशी अस्पृश्यतेची रूढी न्याय, चांगुलपणा ह्यांना अनुसरून ताबडतोब बंद करण्यात यावी.”


या ठरावावर भाषण करताना जी. ए. नटेशन म्हणाले, “आजर्यंत हा प्रश्न अन्य व्यासपीठावर मांडला गेला. राष्ट्रसभेची वैशिष्ट्यपूर्णता लक्षात घेऊन हा प्रश्न येथेही मांडण्याची आवश्यकता ध्यानात घेतली आहे. आम्ही स्वदेशाची योजना आखली आहे. आपण आपल्यावर राज्य करावे ही योजना पूर्ण करण्यासाठी ही बाब आवश्यक आहे. आपले पहिले कर्तव्य हे आहे की, सर्व प्रकारची विषमता आणि अन्याय दूर करणे. ह्या ठरावाचा मुख्य रोख ह्या वर्गावर लादलेली दुर्धर स्वरूपाची जी निकृष्टता आहे, ती दूर करण्यावर. आपण ब्रिटिश नागरिकत्वाचे सर्व हक्क एकीकडे मागत असताना आपल्याच लोकंपैकी काहींना साधे माणुसकीचे हक्क कसे बरे नाकारू शकतो? लोकांच्या धार्मिक भावना न दुखविता, आपल्या धार्मिक परंपरेत जे चांगले आहे ते न गमवता, काँग्रेसही विश्चितपणे ह्या वर्गावर जे चमत्कारिक निर्बंध घातले आहेत ते काढून टाकण्यासाठी सांगू शकते. ह्या देशाच्या काही भागांत ह्या लोकांना इतर गावक-यांबरोबर विहिरीतून पाणी काढण्याचासुद्धा अधिकार नाही. या प्रकारचा निर्बंध नाहीसा झाला पाहिजे. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, ह्याच सहा कोटी लोकांच्या समाजामधून नंद, चोखामेळा, रोहिदास यांसारखे संत उदयाला आले. अशा प्रकारचे सुप्त मला खात्री वाटते की हा ठराव तुम्ही मान्य करून त्याप्रमाणे निश्चितच त्याची अंमलबजावणी करायला लागाल. या लोकांची उन्नती करण्याच्या रूपाने खरे म्हणजे आपण हिंदुस्थानातल्या माणुसकीचीच उन्नती करीत आहोत आणि ज्या वेळेला आम्हाला जबाबदार स्वयंशासन प्राप्त होणार आहे. त्या वेळेला आपण निर्धाराने म्हणू शकू की, हे स्वयंशासन हिंदुस्थानातील सर्व वर्गांसाठी, सर्व जातींसाठी आहे व सर्वांना सारखेच सामाजिक अधिकार आहेत.”


ठरावाला अनुमोदन देताना बँ. भुलाभाई देसाई म्हणाले, “मी गुजराथेतील ब्राह्मण आहे व या ठरावाला पाठिंबा देण्यात मला अभिमान वाटतो. आपल्या बांधवांपैकी काहीजणांना आपण जी वागणूक देतो ती आपण बंधुत्वाची जी शिकवण देतो, तिच्या नेमकी विरुद्ध आहे. आपण आपल्या ह्या बांधवांची जर उन्नती करू शकत नसू तर आपण आज सकाळी होमरूलचा जो ठराव पास केला त्याबाबत ब्रिटिश लोकशाहीकडे मागणी करण्यास आपल्याला कोण अधिकार आहे? ते म्हणतील, तुमच्याच लोकांना सामाजिक अधःपातापासून वाचविणे तुमच्या हातात असताना तुम्ही ते का करीत नाही? ह्या वर्गाची उन्नती करणे केवळ आपल्या हातात आहे, त्यासाठी अन्य कोणा सत्तेकडे जाण्याची गरज नाही. म्हणून या प्रकारचा ठराव पुढे आणण्यात काँग्रेसने एक पाऊन पुढे टाकले आहे. लॉईड जॉर्जने काही दिवसांपूर्वी इंग्लंडच्या जनतेला असे सांगितले होते की, इंग्लंडातील मजूरवर्ग हे महायुद्ध जिंकू शकेल. मीही असेच म्हणतो की, आपण समाजिक न्यायाचा अवलंब केला तर आपल्याला अभिप्रेत असलेले स्वराज्य मिळवू शकू. आणखी वरच्या पातळीवर बोलावयाचे झाले तर मी असे म्हणेन की, श्रीकृष्णाने असे म्हटले नव्हते काय की, मी प्रत्येक माणसाच्या अंतःकरणाता वास करीत असलेला दिसेन. असे जर आहे तर सहा कोटी लोकांना सामान्य माणुसकीच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा आपल्याला काय अधिकार आहे बरे? ही घातुक चाल म्हणजे हिंदुत्वाचा अवमान आहे. म्हणून आवश्यकता, न्याय व त्यातप्रमाणे चांगुलपणा ह्यांना अनुसरून या ठरावामध्ये जी मागणी केली आहे तिला मान्यता देणे हे योग्य आहे आणि ते जर आपण मान्य केले नाही तर आपल्याला स्वराज्य मागायास तोंड आहे काय?”  बँ. भुलाभाई देसाईंच्या या भाषणाचे श्रोतृसमुदायाने टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. त्यानंतर श्री. राम अय्यर आपल्या भाषणात म्हणाले, “वंदिस्त केलेल्या व निकृष्ट समजल्या जाणा-या ह्या समाजाच्या शृंखला तोडून त्यांची सामाजिक स्वातंत्र्याची आकांक्षा ह्या ठरावाच्या द्वारा प्रकट होत असल्यामुळे माझा त्यास पाठिंबा आहे.” राम अय्यर यांनी ‘आपल्याला जर स्वराज्य मिळवायचे असेल तर निकृष्ट समजल्या जाणा-या वर्गावरची बंधने आपण नष्ट केली पाहिजेत’ ह्या मुद्दयाचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले, “आपण राजकीयदृष्ट्या उदार व सामाजिक बाबतीत मात्र परंपरानिष्ठ हुकुमशाहीवादी होऊ शकत नाही. जो मनुष्य सामाजिकदृष्ट्या गुलाम असतो तो राजकीयदृष्ट्या कधीही स्वतंत्र असू शकत नाही हे लक्षात ठेवा. आपण येथे जे जमलो आहोत ते ख-याखु-या एकात्म भारताचे स्वप्न पाहण्यासाठी. केवळ राजकीयदृष्ट्या एक होऊ पाहणा-या भारताचे दृश्य पाहण्यासाठी नव्हे.... आपल्या अध्यक्षांपासून आपण स्फूर्ती घेतली पाहिजे. त्या तुम्हाला आणि मला स्वतंत्र करण्यासाठी स्वकीयांबरोबर लढा देत आहेत. म्हणून मी सर्व ब्राह्मणवर्गाला व वरच्या जातींच्या लोकांना आवाहन करतो की, आपआपल्या गावी जाऊन हलक्या समजल्या जाणा-या लोकांवर लादलेली बंधने दूर करा.” श्री राम अय्यर यांचे भाषण संपल्याबरोबर डॉ. अँनी बेझंट श्रोत्यांना उद्देशून म्हणाल्या, “श्री. राम अय्यर मलबारी ब्राह्मण असून ते आता जे बोललो त्याबरहुकूम ते वागतही असतात.” त्यावर श्रोत्यांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. त्यानंतर श्री. असफअली यांनी ठरावास पाठिंबा दिला. ते म्हणाले, “अस्पृश्यांना निष्ठुरपणे वागवणा-या उच्चवर्गीयांप्रमाणे तेही याच मातृभूमीची लेकरे आहेत त्यांच्याप्रमाणेच अस्पृश्यवर्गाच्या शरीरातूनसुद्धा लाल रक्तच वाहते. माणूस म्हणून जगण्याचा जो मूलभूत हक्क आहे त्यापासून त्यांना वंचित करता येणार नाही. अस्पृश्यता अस्तित्वात असणे हा खरे म्हणजे भारतीयांवर असलेला कलंक आहे व तो ताबडतोब नाहीस करणे आवश्यक आहे.” या भाषणाबरोबरच कलकत्त्याचे एस्. आर. बम्मनजी, पुण्याचे एस्. के. दामले यांनी अनुमोदन दिल्यानंतर हा ठराव सर्वानुमते मंजूर झाला.२


ह्या ठरावाच्या अनुरोधाने जी भाषणे झाली त्यांमध्ये तत्कालीन स्वदेशीच्या चळवळीची तीव्र जाणीव जशी प्रकट होते त्याचप्रमाणे अस्पृश्यतानिवारण करण्याच्या कामाबद्दल ह्या मंडळींना खरोखरीची तळमळ वाटत होती असेही दिसून येते. हा ठराव राष्ट्रसभेने मंजूर कराव हे शिंदे यांना उत्कटत्वाने वाटत होते याचे कारण असे की, काँग्रेसने हा ठराव मंजूर केल्यानंतर काँग्रेसच्या प्रांतिक परिषदा, जिल्हा पातळीवरच्या सभा अशा सर्वच ठिकाणी हा ठराव मंजूर होईल व अस्पृश्यतानिवारणाचे कार्य करण्यासंबंधी देशभर पातळीवरच्या सभा अशा सर्वच ठिकाणी हा ठराव मंजूर होईल व अस्पृश्यतानिवारणाचे कार्य करण्यासंबंधी देशभर एक सार्वत्रिक स्वरूपाची जाणीव निर्माण होईल. शिंदे यांच्या अटकळीप्रमाणे ह्या प्रक्रियेला महाराष्ट्रात सुरुवातही झाली. लोणावळा येथे प्रांतिक पातळीवर हा ठराव एकमताने मंजूर झाला. लो. टिळकांसारख्या परंपरानिष्ठ समजल्या जाणा-या पुढा-याचाही पाठिंबा ह्या ठरावाला प्राप्त झाला. अस्पृश्यतानिवारणाचे कार्य आणि ह्या कामाच्या आवश्यकतेबद्दलची जाणीव देशव्यापी पातळीवर नेण्याचा यांचा हेतू सफळ व्हावयास राष्ट्रसभेच्या या ठरावाच मोठाच हातभार लागला.


संदर्भ
१.    श्री. व्यं. केतकर(संपा.) महाराष्ट्रीय ज्ञानकोश, विभाग ७, महाराष्ट्रीय ज्ञानकोशमंडळ, पुणे, १९२४, पृ. (अ)३४७.
२.    जितेंद्रलाल बँनर्जी, रिपोर्ट ऑफ दि थर्टी सेकंड सेशन दि इंडियन काँग्रेस, कलकत्ता १९१८.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य

   निवेदन
    लेखकाचे मनोगत
    दुस-या व तिस-या आवृत्तीच्या निमित्ताने
    प्रस्तावना 
 -   अंत:प्रेरणेचा निर्णय
 -   आजी-आजोबा आणि आई-वडिल
 -   बालपण 
 -   कॉलेजची पहिली दोन वर्षं
 -   जनाबाईंची संसारकथा
 -   जनाबाईंचे शिक्षण
 -   हुजूरपागा शाळा आणि शांता सुखटणकरची
     करुण कहाणी
-    इंटरमीजिएटचे दुसरे वर्ष
 -    पदवी परीक्षेचा अभ्यास आणि एकोणिसाव्या
      शतकाच्या अखेरचे पुणे
   प्रार्थनासमाजाची दीक्षा 
 -    पदवी परीक्षा
 -   अंत:स्थ भावजीवनातील खळबळ 
 -    एकेश्वरी उदार धर्मपंथ
 -    प्रार्थनासमाज
 -    धर्मशिक्षणासाठी निवड आणि परदेशगमन
 -    मुंबई ते ऑक्सफर्ड
 -     मॅंचेस्टर कॉलेज
 -    ऑक्सफर्डमधील पहिले दोन महिने
 -    नाताळची सुट्टी : मुक्काम लंडन 
 -    पत्रांचा विरंगुळा
 -    दक्षिण किना-यावरील पंधरवडा
 -    प्रोफेसरांच्या कुटुंबात सरोवर प्रांती
 -    एडिंबरो आणि स्कॉच सरोवरे
 -    हिंदू गृहस्थिती आणि समाजस्थिती 
      व्याख्यान व नाट्यप्रयोग 
 -    पारीस येथील एक महिना
 -   लिव्हरपूल येथील त्रैवार्षिक युनिटेरियन परिषद
 -    ऑक्सफर्डमधील शेवटची टर्म
 -    ऍमस्टरडॅम येथील आंतराष्ट्रीय उदार धर्मपरिषद
 -    परतीचा प्रवास
 -    स्वदेशी आगमन, बडोदा भेट आणि
      धर्मप्रचारकार्याला प्रारंभ
 -    मद्रासच्या परिषदा आणि हिंदुस्थानचा दौरा
-    जमखंडी-मुधोळ येथील प्रचारकार्य
 -    काठेवाडचा दौरा 
 -    मुंबईतील बि-हाड आणि प्रार्थनासमाजातील नवचैतन्य
 -    धर्मप्रचाराचे विस्तारित कार्य
 -    कौटुंबिक अडचणी, पुणे प्रार्थनासमाजातील नवचैतन्य
 -    धर्मप्रचारार्थ दौरा
 -    प्रवासातील अनुभव
 -    जनाबाई पनवेलमध्ये शिक्षिका
 -    विविध प्रार्थनासमाजांतील सहभाग
 -    भारतीय एकेश्वरी धर्मपरिषद
 -    ब्राह्मधर्मसूची ग्रंथ
 -    अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीविषयक कार्याचे प्रारंभिक प्रयत्न
 -    मिशनच्या स्थापनेचा संकल्प
 -    मिशनची स्थापना
 -  मिशनची घटना व पुणे येथील अंगभूत शाखा
 -    मिशनमधील दोन समारंभ 
 -    मिशनच्या स्थापनेनंतर वातावरणातील बदल
 -    निधीची योजना
 -    मुंबई प्रार्थनासमाजाशी दुरावा आणि फारकत
 -    पुण्यास स्थलांतर
 -    मिशनची महाराष्ट्र परिषद
 -    तुकोजीराव महाराजांची देणगी व मांगांचे
      शेतकी खेडे वसविण्याचा प्रयत्न
 -   अहल्याश्रमाची पूर्वतयारी 
 -    मराठ्यांची सांस्कृतिक जबाबदारी 
 -    काँग्रेसमध्ये अस्पृश्यतानिवारणाचा ठराव
 -    अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीची दिशा व मार्ग
 -    अस्पृश्यतानिवारक परिषद
 -   राष्ट्रीय प्रवाहात मराठा समाज
 -    अस्पृश्यवर्गाचे कायदेमंडळात प्रतिनिधित्व
 -    गैरसमजाचा ससेमिरा 
 -    १९२० सालातील निवडणूक 
-    शिंदे आणि ब्राह्मणेतर पक्ष
 -    कुटुंबातील मृत्यू
 -    मुलींसाठी सक्तीचे शिक्षण
 -    मद्यपाननिषेधाची चळवळ व अन्य सामाजिक कार्य
 -    मिशनचा कार्यविस्तार : कर्नाटक-मध्यप्रांतातील शाखा 
 -    मिशनसंबंधी आक्षेप व समस्या
 -    मिशनची पुनर्घटना
 -    खटल्याचा दैवदुर्विलास
 -    मिशनमधील सहकारी व सहका-यांच्या
       दृष्टीतून विठ्ठल रामजी शिंदे
 -    मंगलोरमधील कार्य
 -   व्हायकोम सत्याग्रह
 -    मंगलोर ब्राह्मसमाजातील पेचप्रसंग
 -    कौटुंबिक उपासनामंडळ
 -    सत्याग्रहात सहभाग आणि नेतृत्व
 -    अस्पृश्यतानिवारणाचे कार्य व म. गांधीशी संबंध
 -    येरवड्याच्या तुरुंगात
 -    ब्रह्मदेशाची यात्रा 
 -    शेतकरी चळवळ
 -    परिषदा, संमेलने यांमधील सहभाग
 -   कौटुंबिक वातावरण
 -    बहुमान, अवमान आणि निष्ठा
 -    वाई ब्राह्मसमाज आणि ग्रामीण भागातील धर्मकार्य
 -    विचारविश्व
 -    साहित्यसेवा आणि संशोधनकार्य
 -   अपूर्व स्नेहसंमेलन
 -   अखेरचे दिवस
 -   उपसंहार 
 -   परिशिष्टे १/२ आणि ३ 
 -   मनोगते
 -   महर्षी शिंदे यांचे फोटो व काही हस्तलिखिते