महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य

अस्पृश्यतानिवारक परिषद

अस्पृश्यतानिवारणाच्या कार्याला राष्ट्रीय पातळीवर चालना देणा-या दोन प्रमुख घटना विठ्ठल रामजी शिंदे यांच्या प्रेरणेने १९१७-१८ साली घडल्या. १९१७ सालच्या अखेरीस कलकत्ता येथे भरलेल्या काँगेसच्या अधिवेशनात अस्पृश्यतानिवारणाचा ठराव मंजूर करण्यात आला ही एक घटना व त्या पाठोपाठच १९१८ सालच्या मार्चमध्ये मुंबईस राष्ट्रीय पातळीवर आयोजित केलेली अस्पृश्यतानिवारक परिषद ही या बाबतीतील दुसरी महत्त्वाची घटना होय.


अण्णासाहेब शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन स्थापून अस्पृश्यतानिवारणाच्या कामाला आरंभ केल्यास एक तपाचा अवधी संपत आलेला होता. ह्या दहा-बारा वर्षांच्या अवधीमध्ये शिंदे यांच्या अविश्रांत प्रयत्नामुळे देशाच्या पातळीवर ह्या प्रश्नाच्या बाबतीत किती मोठ्या प्रमाणामध्ये जागृती झाली होती याचे प्रत्यंतर ह्या दोन प्रमुख घटनांमुळे येते. सगळ्या देशातील विविध प्रकारच्या पुढा-यांना सहभागी करून घेणारी आणि मुंबईतील तीन-चार हजार अस्पृश्यवर्गातील व्यक्तींनी उपस्थित राहण्याची इच्छा उत्पन्न करणारी ही परिषद म्हणजे अस्पृश्यतानिवारणकार्यातील एक प्रमुख टप्पा म्हणावा लागेल.


सवर्णांच्या मनामध्ये पालट घडवून त्यांच्या मनातील अस्पृश्यतेची जाणीव कमी करण्याच्या दृष्टीने अस्पृश्यतानिवारक परिषदा अत्यंत उपयोगी पडू शकतात, अशी शिंदे यांची धारणा होती. त्या दृष्टीने लहान-मोठे प्रयत्न ते मिशनची स्थापना झाल्यापासून करीतच होते. महाराष्ट्राच्या पातळीवर अशी परिषद मोठ्या प्रमाणात पुण्यास १९१२ साली त्यांनी यशस्वीपणे भरविली होती. राष्ट्रसभेने अस्पृश्यतानिवारणाची ठराव केल्याने ह्या प्रश्नाला राष्ट्रीय पातळीवर महत्त्व आले होतेच. तेव्हा अशा प्रकारची परिषद देशाच्या पातळीवर ओयोजित करणे कामाचा प्रसार होण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल असे त्यांना स्वाभाविकपणे वाटले असणार. देशपातळीवर अशी अस्पृश्यतानिवारक परिषद भरविण्याचा निर्णय शिंदे यांनी घेतला त्याला दुसरे एक तात्कालिक निमित्तही घडले.


करवीरपीठाचे शंकराचार्य असलेले डॉ. कुर्तकोटी हे पूर्वाश्रमीचे अण्णासाहेब शिंदे यांचे मित्र होते. अण्णासाहेबांचे जिवलग मित्र विष्णुपंत देशपांडे तेरदाळकर यांनी डॉ. कुर्तकोटींची धाकटी बहीण शारदा हिला सून म्हणून पसंत केले होते व विष्णुपंताचे मोठे चिरंजीव गणपतराव यांच्याशी शारदेचा विवाह झाला होता. या व्यहीपणाच्या संबंधामुले डॉ. कुर्तकोटी यांच्याशी शिंदे यांचा स्नेहसंबंध जुळून आला होता व त्यांच्या पुरोगामी विचारामुळे ते शंकराचार्य झाले असताही हा स्नेहसंबंध वाढीस लागला होता.


डॉ. कुर्तकोटी हे मुंबईस आले असता एकदा आपल्या लवाजम्यासह मुंबई येथे छत्रपीत शाहूमहाराज यांच्या पन्हाळा लॉज ह्या निवासस्थानी उतरले होते. त्या वेळी मित्र या नात्याने डॉ. कुर्तकोटींनी अण्णासाहेब शिंदे यांना भेटीस बोलाविले. अवांतर गोष्टी झाल्यानंतर डॉ. कुर्तकोटी यांनी शिंदे यांना सूचना केली की, त्यांनी एक अस्पृश्यतानिवारण परिषद मोठ्या प्रमाणावर भरवावी व हिंदुस्थानातील लोकमत अजमावून पाहावे व अमनुकूलता दिसल्यास आपण शंकराचार्य या नात्याने हिंदूंनी अस्पृश्यता पाळू नये अशा अर्थाचे आज्ञापत्र काढू असे आश्वासन दिले. मात्र या कामी लो. टिळकांचे सहकार्य शिंदे यांनी संपादित करावे, असाही सल्ला त्यांनी दिला. खरे तर शंकराचार्यांच्या आज्ञापत्राची देशस्थ व कोकणस्थ ब्राह्मणांमधील बेटीव्यवहाराच्या बाबतीत कशी वासलात लागली याची शिंदे यांना पूर्ण कल्पना होती. म्हणून त्यांना अशा आज्ञापत्राचे महत्त्व वाटत होते अशातला भाग नव्हता. लोकमान्यांचे सहकार्य मिळेल याबद्दल त्यांना शंका नव्हती. ह्या निमित्ताने सनातनी हिंदूंच्या हृदयामध्ये अस्पृश्यतानिवारणाच्या विचाराल जागा मिळाली तर बरेच होईल, असा मात्र विचार शिंदे यांच्या मनात आला. एक मोठी अस्पृश्यतानिवारक परिषद भरवावी व देशातील प्रांतोप्रांतीच्या सर्व जातींच्या वेचक प्रमुख गृहस्थांच्या सह्या एका स्पष्ट अखिल भारतीय जाहीरनाम्यावर घ्याव्या असे शिंदे यांना बरेच दिवसांपासून वाटत होते. ह्या निमित्ताने अशा प्रकारची परिषद भरविण्याचे निश्चित करून शिंदे कामाला लागले.


लो. टिळकांचे शिंदे यांना एक वेगळेच दर्शन याप्रसंगी झाले. त्या वेळी ते इंग्लंडला जाण्याच्या गडबडीत होते. तरी ते वेळात वेळ काढून शिंदे यांच्याबरोबर पन्हाळा लॉजमध्ये श्रींच्या दर्शनासाठी गेले. श्रींपुढे सुमारे दोन-तीन डझन नारळांनी भरलेली ताटे ठेवून लोकमान्य आदराने बसलेले पाहून शिंदेय यांना फार कौतुक वाटले. तिघांच्या विचारांनी पिरषद आयोजित करावी असे ठरले. प्रत्यक्ष परिषदेत सहभागी होण्यासाठी शंकराचार्यांना येणे जमले नाही. अण्णासाहेब शिंदे यांनी परिषदेची जय्यत तयारी केली.१


अखिल भारतीय डिप्रेस्ड क्लासेस मिशनतर्फे भरविलेल्या अस्पृश्यतानिवारक परिषदेच्या अधिवेशनास शनिवार दिनांक २३ मार्च १९१८ रोजी दुपारी फ्रेंच पुलाजवळ उभारलेल्या मडपात सुरुवात झाली. अधिवेशनास हजर राहून परिषदेच्या कार्यास सहानुभूती दाखविणा-या लोकांत परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष श्रीमंत सयाजीराव महाराज यांच्या व्यतिरिक्त स्वागत मंडळाचे अध्यक्ष सर नारायण चंदावरकर, नामदार सी. व्ही. मेहता, ना. व्ही. जे. पटेल, ना. बेळवी, बाबू बिपिनचंद्र पाल, एस्. आर. बम्मनजी, जमनादास द्वारकादास, पी. के. तेलंग, आर. जी. प्रधान, लक्ष्मीदास तेरसी, बॅ. मुकुंदराव जयकर, बॅ. भुलाभाई देसाई, डॉ. साठे इत्यादी बडी बडी मंडळी प्रामुख्याने झळकत होती. सभेस सुमारे पाच हजारांवर एवढा स्त्री-पुरुष मिश्र प्रेक्षकवर्ग जमला होता. महाराजांची स्वारी बरोबर तीन वाजता मंडपाच्या दाराशी येऊन पोहोचली. तेथे त्यांचे स्वागत सर नारायण, ना. पटेल व अण्णासाहेब शिंदे यांनी केले. श्रोतुवर्गाची विशेष गोष्ट म्हणजे अस्पृश्य समजल्या जाणा-या वर्गापैकी बरेचसे लोक आपल्या परिवारास हजर होते. एका उच्चासनावर मिशनच्या उद्योगशाळेतील विद्यार्थांनी तयार केले सुतारकाम, शिवणकाम व इतर कलाकुसरीचे नमुने मांडले होते. ते मिशने सरचिटणीस विठ्ठल रामजी शिंदे यांनी महाराजांस दाखविले व त्यानंतर महाराजांची स्वारी मुख्य उच्चासनावर स्थानापन्न झाली. परिषदेच्या कार्यास आरंभ होण्यापूर्वी डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या काही मुलांनी अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्यावर स्वागतपर पद्ये गायिली.


परिषदेचे स्वागताध्य सर नारायण चंदावरकर यांनी फार कळकळीचे भाषण केले. ते म्हणाले, “ज्या परिस्थितीत आज आपण येथे जमलो आहोत, त्या परिस्थितीवरून अस्पृश्यवर्गाचा भविष्यकाळ बराच उज्ज्वल वाटू लागला आहे, पणे तो भविषकाळ खरोखर उज्ज्वल व्हावयाचा किंवा नाही ही गोष्ट आज येथे जमलेले लोक ज्या जोराने या चळवळीस चालना देतील त्या जोरावर सर्वस्वी अवलंबून आहे.” अस्पृश्यवर्गाच्या सुधारणेच्या कार्याचे श्रेय देताना डी. सी. मिशनच्या कार्यकर्त्यांना व प्रामुख्याने विठ्ठल रामजी शिंदे यांना जणू काय मनोमन डोळ्यांसमोर ठेवून सर नारायण चंदावरकर पुढे म्हणाले, “इतिहास आपणास असे सांगतो की, ज्यापासून राष्ट्राचा विकास होतो अशा सर्व प्रकारच्या प्रगतिकारक चळवळींचा उगम थोड्याशा व्यक्तींच्या कार्यातच सापडतो. प्रस्तुतच्या बाबतीत त्या व्यक्ती म्हणजे ज्यांची प्रथम प्रथम हेटाळणी झाली ते डिप्रेस्ड क्लासेस मिशनचे गृहस्थ होते. त्यांच्या कार्याने प्रचंड अशा हिंदू समाजाची सदसदविवेकबुद्धी जागृत झाली. अस्पृश्य लोकांना खाली ढकलल्याने अखिल समाजाचा एकषष्ठांश भाग समाजाला पारखा होतो ही जाणीव लोकांच्या हृदयात उत्पन्न होऊ लागली.” सर नारायणराव पुढे म्हणाले की, “जोपर्यंत तुम्ही त्यांना अवनत स्थितीतच ठेवाल तोपर्यंत देवही तुम्हाला (वरच्या वर्गाला) अवनत अवस्थेतच राखील. या निकृष्ट समजल्या जाणा-या वर्गात तीन प्रकारचे भेद आहेत. एक अस्पृश्यवर्ग, दुसरा जवळ जाण्यासही अयोग्य व तिसरा वर्ग म्हणजे निर्देश करण्यासही अयोग्य हा होय. हा हिंदुस्थानला शतकानुशतके लागलेला काळिमा आहे आणि तो आता आपण अखिल हिंदुस्थानला निर्वाणीची प्रार्थना करून साफ धुवून टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण हे नीट लक्षात ठेवले पाहिजे की, प्रस्तुतचे हे लोकसत्तेचे युग म्हणजे सामान्य व्यक्तींचे होय.” आपले भाषण संपविताना त्यांनी निरनिराळ्या संस्थानिकांचा, विशेषतः गायकवाड सरकारांचा, त्यांनी आपआपल्या संस्थानात अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीबद्दल केलेल्या प्रयत्नासाठी व कळकळीबद्दल आभारपूर्वक निर्देश केला.


यानंतर सर नारायणरावीं परिषदेच्या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान श्रीमंत सयाजीरावमहाराज यांनी सुशोभित करावे अशी विनंती केली. या सूचनेस श्री. जमनालाल द्वारकादास यांनी गुजरातीत अनुमोदन दिल्यानंतर टाळ्यांच्या गजरात ती सर्वानुते संमत झाली.


यानंतर मिशनचे सेक्रेटरी या नात्याने विठ्ठल रामजी शिंदे यांनी सभेच्या कार्याबद्दल सर्व हिंदुस्थानातून शुभेच्यादर्शक तारा व पत्रे आल्याचे सांगितले. त्यामध्ये म. गांधी यांची ‘अस्पृश्यतेचा समूळ नाश झालाच पाहिजे’ अशा आशयाची, नंतर डॉ. रवींद्रनाथ यांची परिषदेच्या कामाला सुयश चिंतणारी तार होती. तसेच करवीरपीठाचे शंकराचार्य, सातारचे दादासाहेब करंदीकर व पुण्याचे डॉ. मॅन यांचे प्रमुख संदेश होते.


संदेशवाचन झाल्यानंतर अधिवेशनाचे अध्यक्ष श्रीमत सयाजीरावमहाराज यांनी टाळ्यांच्या प्रचंड गजरात आपल्या अध्यक्षीय भाषणाला प्रारंभ केला. ते म्हणाले, “अस्पृश्यतानिवारण हा माझा जिव्हाळ्याचा व आस्थेचा विषय अगदी प्रारंभापासून राहिलेला आहे व याबाबतीत बडोदा संस्थानात अनेक उपाय योजण्याचे प्रयोग आम्ही केले आहेत ह्या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून माझी निवड करण्यात आली हा मी माझा बहुमान समजतो. आपण मोठ्या धाडसीपणाने हा जो उपक्रम सुरू केलेला आहे त्याबाबत आस्था प्रकट करण्यासाठी माझे विचार मी प्रकट करीत आहे.” भारतामध्ये अस्पृश्यतेचा प्रश्न किती जटिल आहे, हे श्रीमंत सयाजीरावांनी प्रारंभी विशद केले. ते म्हणाले, “पाच कोटी लोकांच्या बिकट अवस्थेचा हा प्रश्न आपल्या सामाजिक तत्त्वज्ञानाशी निगडित आहे, म्हणून लोकांची अंतःकरणे बदलल्याशिवाय हा प्रश्न सुटू शकणार नाही. वैज्ञानिक विचार व सामाजिक पुनर्घटनेची बळकट प्रेरणा ही आपली जीवनदृष्टी व मनोवृत्ती बदलून टाकीत आहे. त्यापुढे अडाणी पूर्वग्रह आणि वर्णाचा दुरभिमान कालांतराने टिकून राहणार नाही. मात्र एक वैशिष्ट्यपूर्ण परिस्थिती हिंदुस्थानच्या संदर्भात लक्षात घेतली पाहिजे. राजकीय आणि धार्मिककदृष्ट्या हिंदुस्थानमध्ये एकजिनसीपणा नसल्यामुळे जपानसारख्या देशात सम्राटाच्या एका हुकमाने जी सुधारणा करणे शक्य झाले तसे आपल्या येथे होऊ शकत नाही. जपानमध्ये १८६८ ते १८७१ ह्या काळात नवी राज्याघटना अवतरली. सामुराई ह्या क्षत्रियवर्गाला आपले सर्व वंशपरंपरा, हक्क आणि अधिकार सोडावे लागले व त्यांना शेतकरी, कारागीर, दुकानदार यांसारख्या व्यावसायिकांचे जीवन जगणे प्राप्त झाले. जपानमधील हिनइन आणि हिंदुस्थानातील अतिशूद्र यांच्यामध्ये साधर्म्य आहे. हे दोन्ही वर्ग अस्पृश्य मानले जात असत. जपानमधील समंजस पुढा-यांच्या सूचनेवरून तेथील पोरगेल्या सम्राटाने १८७१ मध्ये फर्मान काढून तेथील अस्पृश्यता एका क्षणात नष्ट केली. हे फर्मान असे, इटा आणि हिनइन ह्या संज्ञा नष्ट करण्यात आल्या आहेत ह्या नावाखाली जन्मलेल्या लोकांचा समावेश आता सर्वसाधारण लोकसंख्येमध्ये केला जाईल व त्यांच्या सामाजिक दर्जा, उपजीविकेची साधने ही इतर लोकांप्रमाणे राहतील.


“अशा प्रकारची घटना हिंदुस्थानात मात्र शक्य नाही. शिक्षण आणि लोकजागृती यांद्वाना लोकमानसाला सावकाशपणे आवाहन करूनच हा प्रश्न सोडवावा लागणार आहे. अंत्यज समजल्या जाणा-या जाती ह्या बौद्धिक व मानसिकदृष्ट्या अजिबात कमकुवत नाहीत. भारताच्या सर्वच प्रांतांमध्ये अंत्यजवर्गातून देशव्यापी ख्यातीचे संतपुरुष निर्माण झाले आहेत व ब्राह्मणासारख्या जातीकडूनही ते आदरणीय मानले जात आहेत. उदाहरणार्थ, दक्षिण हिंदुस्थानातील नाणंद, उत्तरप्रदेशातील रोहिदास, महाराष्ट्रातील चोखामेळा, बंगालमधील रोहिदास ठाकूर. सध्याच्या काळातही विद्यापीठातून चमकणारी बहिष्कृतवर्गातील मुलांची कितीतरी उदाहरणे आढळतात.”


यानंतर श्रीमंत सयाजीरावांनी भारतामध्ये अस्पृश्यवर्गावर किती विविध त-हांनी अन्याय होतो याबद्दलची उदाहरणे सांगितली. भगवदगीतेसारख्या तत्त्वज्ञानात्मक ग्रंथामध्ये भगवंतांनी सर्व प्राणिमात्र आपल्याला सारखे आहेत व मजकडे येण्याचा सर्वांना सारखाच अधिकरा आहे, ह जे मत मांडले त्याचाही उल्लेख केला. खुद्द त्यांनी आपल्या संस्थानामध्ये अंत्यजवर्गातील मुलांसाठी शाळा चालविताना ज्या अनेकविध अडचणी आल्या त्यांचे वर्णन करून त्यावरही कशी मात करता येते हे सांगितले. अस्पृश्यता नष्ट करण्याने सबगोलांकार होणार आहे ही भीती अनाठायी असल्याचे सांगून अस्पृश्यता नष्ट केल्याने ह्या वर्गातील लोकांना आपण केवळ स्वाभाविक असे माणूस म्हणून जगण्याचे अधिकार देत आहोत. आतापर्यंतच्या काळात ह्या वर्गाबाबत आपण वस्तुतः जे करावयास पाहिजे होते ते केलेले नाही. यापुढे मात्र शब्दांत आणि कृतीत त्यांच्याशी योग्य त्या प्रकारे वर्तन करूया, त्यांना माणुसकीची योग्य अशी वर्तणूक देऊया, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.


श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर अस्पृश्यता नष्ट करण्याच्या बाबतीत व ह्या वर्गाच्या उन्नतीसंबंधात विविध ठराव मांडले गेले व चर्चा झाली.
पहिला ठराव बॅ. मुकुंदराव जयकर यांनी मांडलाः


“निकृष्टवर्गावर लादलेली अस्पृश्यता यापुढे ताबडतोब काढून टाकण्यात यावी आणि या कार्यासाठी प्रत्येक प्रांतातील वजनदार व विचारी कार्यकर्त्या पुढा-यांनी एक अस्पृश्यतानिवारक जाहीरनामा काढून निकृष्टवर्गास शाळा, दवाखाने, न्याय कचे-या, सार्वजनिक खर्चाने चालविलेल्या सार्वजनिक संस्था तसेच विहिरी, तळी, सार्वजनिक पाणवठे, व्यवहाराची व करमणुकीची ठिकाणे व देवालयासारखी सार्वजनिक ठिकाणे इत्यादी ठिकाणी कोणत्याही प्रकारे प्रतिबंध न राहता पूर्ण मोकळीक करून द्यावी असे ह्या परिषदेचे मत आहे.” प्रथम श्री. विठ्ठल रामजी शिंदे व त्यांच्याबरोबर काम करणारे गृहस्थ यांचे अशा त-हेची विशिष्ट परिषद भरविण्यापर्यंत मजल येईपर्यंत त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल अभिनंदन करून बॅ. जयकर पुढे म्हणाले, “आपणांस राजकीय, सामाजिक व धार्मिक अशा सर्व प्रकारच्या विचारांच्या पुढा-यांकडून सहानुभूती प्राप्त झाली आहे हा एक प्रस्तुतच्या कार्यास शुभशकुनच समजला पाहिजे. स्वातंत्र्याची पहिली पायरी आत्मयज्ञ हीच होय.” या ठरावास आर्य समाजाच्या मुंबई शाखेचे पं. बाळकृष्ण शर्मा यांनी हिंदीत दुजोरा दिला व ह्या ठरावास लक्ष्मीदास तेरसी यांनी गुजराथीत अनुमोदन दिले. ते म्हणाले, “मी ज्या ठरावावर बोलावयास उठलो आहे तो अत्यंत साधा व कोणीही कसलाही आक्षेप घेणान नाही अशा स्वरूपाचा आहे. या ठरावास अनुमोदन देणा-याच्या हृदयाची उदारता फक्त प्रकट होते अशातला मुळीच भाग नाही. कारण त्या योगाने आपण निकृष्टवर्गाला (मी अस्पृश्य हा शब्द वापरत नाही) त्यांच्या जन्मसिद्ध हक्काव्यतिरिक्त काहीही अधिक देत नाही. निकृष्टवर्ग हा अखिल जनतेचा एक भाग आहे आणि म्हणूनच त्याला सर्व प्रकारच्या सार्वजनिक संस्थांत वाव मिळण्याचा दुस-या कोणत्याही वर्गाइतका अथवा व्यक्तीइतकाच हक्क आहे. कारण असा त-हेच्या संस्था सार्वजनिक पैशानेच चालविल्या जातात व त्यांनी जर आपले न्याय्य हक्क बाजावयाचा आग्रह धरला तर कोणालाही कायदेशीर उपाययोजनेने त्याचे निवारण करता येणार नाही. परंतु रूढी ही केव्हाही प्रबळच असते.” अशा प्रकारचे प्रतिपादन करून श्री. लक्ष्मीदास तेरसी यांनी बॅ. जयकर यांनी मांडलेल्या ठरावाला अनुमोदन दिले. बडोद्याचे पं. बाळकृष्ण शर्मा व पुण्याचे प्रो. गोविंद चिमणाजी भाटे यांचीही अनुमोदनपर भाषणे झाली.


या ठरावानंतर ठरावातील आशयाला अनुसरून जाहीरनाम्याचा मसुदा करून त्यावर राष्ट्रातील पुढा-यांच्या सह्या घेण्याचा अधिकार मिशनच्या सेक्रेटरीला देण्यात आला. मसुद्याच्या शेवटी ठरावात सांगितल्याप्रमाणे अस्पृश्यतानिवारणाच्या कामी जाहीरनाम्याच्या खाली सही करणा-यांनी व्यक्तिशः जबाबदारी घेण्याचे कलम मुख्य व महत्त्वाचे होते. परिषदेच्या फलश्रुतीचा हा एक प्रकारे कार्यरूप भाग होता.


हा ठराव अनुमोदनाच्या भाषणानंतर महाराजांनी सभेपुढे विचाराकरिता मांडला व तो सर्वानुमते टाळ्यांच्या गजरात मान्य झाला. यावेळी महाराजांनी प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुले घरी जाण्यास परवानगी मागितली. सर नारायणराव चंदावरकर यांनी महाराजांना पुष्पहारांनी मंडित केले. एस्. आर. बम्मनजी यांनी आभारदर्शक ठरावाला अनुमती दाखवून महाराजांचे आभार मानले. महाराज निघून गेल्यानंतर सर नारायणराव चंदावरकर यांची सभेच्या अध्यक्षस्थानी नेमणूक करण्यात आली व सभेचे काम पुढे चालू करण्यात आले.


श्री. जमनादास द्वारकादास यांनी दुसरा ठराव पुढीलप्रमाणे मांडलाः “निकृष्टवर्गावर लादलेले धार्मिक निर्बंध ज्या वेळी नाहीसे होतील, त्याचवेळी त्याच्या उन्नतीचे कार्य अत्यंत झपाट्याने व यशस्वी रीतीने पार पाडले जाईल असे या सभेचे मत आहे व याकरिता त्याच्या उन्नतीचे कार्य अत्यंत झपाट्याने व यशस्वी रीतीने पार पाडले जाईल असे या सभेचे मत आहे व याकरिता ही सभा हिंदू धर्म संस्थांच्या अधिपतीस आग्रहाने विनंती करीत आहेः
१)    अस्पृश्यता नाहीशी करण्याकरिता धार्मिक आज्ञापत्रे काढणे.
२)    हिंदू धर्मावरील त्यांची श्रद्धा दृढ करण्याकरिता धर्मशिक्षक नेमून त्यांच्यात हिंदू धर्माच्या तत्त्वांचा फैलाव करणे.
३)    हिंदू लोकांकडून पाळल्या जाणा-या सर्वसाधारण धार्मिक समारंभात भाग घेण्याची त्यांना परवानगी देणे.


हा ठराव मांडताना श्री. जमनादास द्वारकादास गुजराथीत म्हणाले, “अस्पृश्यतेचा धर्माशी काही संबंध असणे शक्य नाही. निकृष्टवर्गातील व्यक्तीला शिवल्याने आपणास अपवित्रता येत नाही. अस्पृश्यवर्ग हा निसर्गतः अपवित्र नाही. तेव्हा या लोकांना त्यांच्या आजच्या अवनत स्थितीतून वर काढणे आपले कर्तव्य आहे.” श्री. जमनादास द्वारकादास यांनी मांडलेल्या ठरावाल अनुमोदन देण्यासाठी कलकत्त्याचे श्री. बिपिनचंद्र पाल हे टाळ्यांच्या प्रचंड जयघोषात उभे राहिले. ते म्हणाले, “राष्ट्रीय उन्नतीबद्दलचे आपले उपाय, भावी उज्ज्वल मनोरथ व त्याबद्दलची आपली उत्कट मनीषा यांचे जर वस्तुस्थितीत रूपांतर करावयाचे असेल तर अस्पृश्यवर्गाचा प्रश्न आपण अगदी विलंब न लावता सोडविला पाहिजे. सर्व सुशिक्षित व उच्च दर्जाच्या वर्गाला माझा असा सवाल आहे की, आपण निकृष्टवर्गाला आपणाशी निकट संबंध ठेवण्यास पूर्ण प्रतिबंध करून आपण राष्ट्रीय आणि औद्योगिक आत्महत्या करायला तयार आहात काय? हा प्रश्न सामाजिक तसेच अर्थविषयकही आहे. एवढेच नव्हे तर मी असे म्हणजो की, हा प्रश्न अर्थशास्त्र-समाज-राजकार असा सामुच्चयिक आहे. आत्मा हा कधीही कलंकित किंवा अस्वच्छ नसतो.”


यानंतर गुजराती धेड जातीचे धर्मगुरू महंत मोहनदास यांनी या ठरावावर गुजरातीत भाषण केले. ते म्हणाले, “माझ्या जातीच्या अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीकरता व हिताकरता आजच्या सभेत अशा प्रकारचा महनीय समाज एकत्र झालेला पाहून माझे हृदय आनंदाने भरून आले आहे. आज अशा अस्पृश्य जातीच्या लोकांना ज्या अडचणी सोसाव्या लागत आहेत त्यांची दोन कारणे आहेत. एक वरच्या जातीची स्वार्थपरायणत व त्यांच्या अंतःकरणात असलेला आम्हाविषयीचा द्वेष व दुसरे धार्मिक संस्थांच्या अधिपतींची अज्ञानावस्था. ही दोन प्रकारची कारणे सिद्ध करण्यासारखे आजपर्यंत पुष्कळ प्रसंग घडले आहेत. याच्या उटल शास्त्रवचनाच्या आधारे असे स्पष्ट दाखविण्यात येईल की, निकृष्टवर्गातील कोणत्याही माणसाला जर तो उच्च प्रकाराने व पवित्र प्रकारे आपला जीवनक्रम चालवीत असेल किंवा जर तो भारदस्त व पुण्यशील वातावरणात वाढला असेल तर त्याला द्विज होता येते.” महंतांनी सत्यकाम जाबाल व कवष ऐलूष ह्या दोन उपनिषत्कालीन पुरुषांची उदाहरणे नमूद केली. तसेच इतिहासकाळातील अवनत समजलेल्या समाजातील स्वामी रामानंद तसेच वैष्णव संप्रदायातील कबीर, सेनभक्त रोहिदास, नाभाजी हे निकष्ट जातीत जन्मले असूनही त्यांनी गौरवपर पदवी प्राप्त केली हे दाखले सांगितले व शेवटी ते म्हणाले, “या सर्व गोष्टींचा विचार केला असता असे स्पष्ट दिसून येते की, ही अस्पृश्यतेची रूढी धर्मबाह्म, गर्ह्य व अनर्थपरंपरा उत्पन्न करणारी आहे. म्हणू आपल्यातील धार्मिक, विचारी कार्यकर्त्यांनी व पुढा-यांनी पूर्वीच्या महात्म्यांचा अनुकार करून निकृष्ट व अस्पृश्य जातीचा उद्धार करावा हे अत्यंत आवश्यक आहे.”


महंतांच्या या भाषणानंतर ठराव परिषदेपुढे मांडण्यात आला व त्याला सर्वांची संमती मिळाली.


परिषदेची कल्पना ज्या वेळी निघाली त्या वेळी ह्या परिषदेस उपस्थित राहण्याचा मनोदय करवीरपीठाचे शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांनी प्रकट केला होता. परंतु खुद्द शंकराचार्यांना प्रत्यक्ष परिषदेस उपस्थित राहणे शक्य झाले नाही. तरी त्यांच्या सूचनेनुसार ठराव मात्र मांडण्यात आला. हिंदू धर्मसंस्थांच्या अधिपतींना अस्पृश्यता नाहीशी करण्याकरिता धार्मिक आज्ञापत्रे काढण्याची विनंती एका ठरावानुसार करण्यात आली.


इतर कामाची गर्दी असल्यामुळे लो. टिळकही या परिषदेस पुण्याहून मुद्दाम मुंबईस येण्यासाठी का-कू करू लागेल, परंतु विठ्ठल रामजी शिंदे हे देणेक-याप्रमाणे धरणेच धरून बसल्यामुळे लोकमान्यांचा नाइलाज झाला व अखेरीस ते परिषदे येण्यास कबूल झाले व त्याप्रमाणे ते आलेही. मात्र “केसरीकर्ता म्हणून नव्हे, तर केवळ टिळक म्हणूनच मी परिषदेस येतो” असे बजावून सांगण्यास लोकमान्य विसरले नाहीत.२


परिषदेच्या दुस-या दिवशी म्हणजे २४ मार्च १९१८ रोजी सकाळच्या बैठकीत लो. टिळकांनी पुढील अर्थाचा ठराव मांडला. काँग्रेसने अस्पृश्यवर्गाचे प्रतिनिधी घेऊन आपल्या कार्यास त्यांचा पाठिंबा मिळवावा.


लोकमान्य टिळक आपल्या भाषणात म्हणाले, “अस्पृश्यता वेदात नव्हती, होती असे झाल्यास मी वेदप्रामाण्य मानणार नाही. मनुष्याने अस्पृश्यता पाळली हे ईश्वरासही मान्य नाही. मान्य असल्यास अशा ईश्वरासही मी मानणार नाही... नीच मानलेल्या जातीचा स्पर्श झाल्यास पाप लागते, हा स्पर्श सदोष आहे ही समजूत साफ चुकीची आहे. ही जितकी लवकर नष्ट होईल तितके चांगले हे सांगावयास मी येथे आलो आहे. अमक्याला शिवले असता पाप लागते; अमक्याची सावली पडली असता विटाळ होतो ही बुद्धी अजिबात नष्ट झाली पाहिजे. एक मनुष्य इतक्या कमी दर्जाचा आहे का की, त्याला शिवले असता पाप लागते? हे भेद काढून लावणे हे धर्मसुधारणेचे रहस्य आहे... मग या बाबतीत तुम्ही काय करता असे पुष्कळांकडून विचारण्यात येते. मी किती म्हणून गोष्टी कराव्यात? सगळ्याच गोष्टींचा पुढाकार घ्यायला माझे डोके समर्थ नाही. या कार्याला माझी पूर्ण सहानुभूती आहे. १८९४ मध्ये पुण्यात गणपती उत्सवाच्या वेळी एका चांभाराने गणपती केला होता. त्या काळी चांभाराचा गणपती कोणी आपल्याबरोबर घेईना. मी त्या चांभाराला सांगून त्याचा गणपती माझ्या गाडीत आणून ठेवला. (टाळ्यांचा गजर)


“मी स्वतः कसे वागतो हे आपणाला सांगितले. माझ्या घरी मी अस्पृश्यतेचा भेद मानीत नाही. (टाळ्यांचा गजर). चोखामेळा संप्रदायाचे लोक काही कामानिमित्त माझ्या घरी आले होते. त्यांना मला काही विचारायचे होते. मी त्या लोकांना घराबाहेर न ठेवता माझ्याबरोबर घरात बसू दिले... मी अस्पृश्यांच्या विरुद्ध नाही हे स्पष्टपणे सांगतो. अस्पृश्याता गेली पाहिजे असेच माझे मत आहे. ही रूढी आहे, ही नष्ट झाली पाहिजे.” लो. टिळकांचे भाषण हा सदर परिषदेमधील आकर्षणाचा व कुतूहलाचा मोठाच भाग होता. एकतर लो. टिळकांची सामाजिक सुधारणेबद्दलची मते सनातनी स्वरूपाची आहेत अशी कल्पना प्रसृत असल्यामुळे टिळक कोणती भूमिका मांडतात हे समजून घेण्याचे कुतूहल श्रोत्यांच्या ठिकाणी होते. त्यामुळे ह्याप्रसंगी सात हजारापेक्षाही जास्त एवढा प्रचंड लोकसमुदाय जमला होता. मंडपाच्या बाहेरही सारखी रेटारेटी चालू होती. लोकमान्यांसही आवेश चढून त्यांच्या गर्जना मंडपाबाहेर रस्त्यातच नव्हे, तर पलीकडे चाळीत राहणा-या लोकांच्या कानावर आदळत होत्या.  “पेशव्यांच्या वेळीही अस्पृश्यांनी भरलेल्या पखालीतील पाणी ब्राह्मण प्याले”, वगैरे विधाने त्यांनी केली. “अस्पृश्यता देवास मान्य असेल तर मी त्याला देवच म्हणणार नाही,” हे उदगार ऐकून टाळ्यांचा जो गजर झाला त्यामुळे मंडप कोसळून पडतो की काय असे वाटू लागले. “मी येथे जरी आज शरीराने प्रथमच आलो आहे तरी मनाने या चळवळीत नेहमीच आहे... जुन्या काळी ब्राह्मणांच्या जुलमाने ही चाल पडली, हे मी नाकारीत नाही. पण या रोगाचे आता निर्मूलन झालेच पाहिजे.” या प्रकारच्या त्यांच्या विधानांनी श्रोत्यांच्या मनावर विलक्षण प्रभाव पडून लोकमान्यांनी त्यांचा कब्जा घेतला.४ लो. टिळकांचे प्रस्तुत परिषदेतील भाषण ऐतिहासिक महत्त्वाचे ठरले.


बक्षीस समारंभ हा परिषदेचा शेवटचा कार्यक्रम होता. मंडप इतका गच्च भरून गेला होता की, पुष्कळांना जागेच्या अभावी बाहेर रहावे लागले. लक्षात घेण्याजोगी महत्त्वाची बाब म्हणजे जमलेल्या प्रचंड समुदायांपैकी तीनचतुर्थांश लोक अस्पृश्यवर्गातील होते. बक्षीस समारंभाचे अध्यस्थान लेडी लक्ष्मीबाई चंदावरकर यांनी भूषविले. त्यांनी थोडक्यात प्रोत्साहनपर अशा प्रकराचे भाषण केले. जनरल सेक्रेटरी या नात्याने विठ्ठल रामजी शिंदे यांनी त्यांचे आभार मानले व परिषदेच्या तीन दिवसांच्या ह्या अपूर्व सोहळ्याची सांगता झाली.


अस्पृश्यतानिवारण्याच्या कार्यासाठी लोकांची, पुढा-यांची मोठीच अनुकूलता निर्माण झालेली आहे, हे दृश्य ह्या परिषदेच्या रूपाने पाहावयास मिळाले ह्यावरून या परिषदेची यशस्विता दिसून येते. अनेक इंग्रजी, मराठी वृत्तपत्रांनी परिषदेचे वृत्तान्त प्रसिद्ध केले व ह्या कार्याचे अभिनंदनही केले. मात्र जागरूककार वालचंद कोठारी ह्यांनी वेगळा सूर लावला. ह्या परिषदेचे ‘रा. वि. रा. शिंद्याची सर्कस’ ह्या नावाखाली एक व्यंगचित्र देऊन निरनिराळ्या पक्षांच्या पुढा-यांनी निरनिराळ्या प्राण्यांची रूपे धारण करून परिषदेत वेगवेगळी कामे केली असे दाखविले.५


या परिषदेच्या संदर्भात राज्यात विसंवादी गोष्ट दिसून आली, लोकमान्य टिळकांच्या बाबतीत. अस्पृश्यतानिवारणासंबंधी पहिला प्रमुख ठराव मांडण्यात आला होता व परिषदेत ठरविल्याप्रमाणे एक जाहीरनामा तयार करून त्यावर प्रांतोप्रांतीच्या पुढा-यांच्या सह्या मिळविण्याची जबाबदारी जनरल सेक्रेटरी या नात्याने विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावर सोपविण्यात आली होती. (ठरावाचा मजकूर याआधी दिलेलाच आहे.) त्यामध्ये शाळा, दवाखाने, न्यायाच्या कचे-या वगैरे सर्व सार्वजनिक संस्थांत तसेच विहिरी, झरे, हौद, स्नानाचे व स्मशानाचे घाट आणि व्यवहाराची व करमणुकीची स्थळे व देवस्थाने अशा सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करण्यास निकृष्टवर्गांना कोणताही अटकाव राहू न देता मोकळीक द्यावी, ह्या सभेच्या मताचा त्यामध्ये निर्देश केलेला होता.


 ह्या ठरावानंतर देशातील प्रांतोप्रांतीच्या पुढा-यांनी सह्या करून ह्या बाबतची व्यक्तिगत जबाबदारी आपण कशी उचणार आहोत, ह्याचा निर्देश करणारा खालील मजकूर जोडण्यात आला होता.


‘वरील ठराव प्रत्यक्षपणे अमलात आणण्यासाठी आम्ही खाली सह्या करणारे जाहीर करतो की, संयुक्त हिंदी राष्ट्राच्य उच्चत्तम हितासाठी व तसेच हिंदू धर्माच्या श्रेष्ठ आणि उत्कृष्ट तत्त्वाच्या संरक्षणासाठीच अस्पृश्यतेचा अटकाव ताबडतोब दूर करणे अगदी जरूर आहे. म्हणून आम्ही अशी मागणी करतो की, हिंद मातेच्या प्रत्येक पुत्राने व कन्येने तसेच हिंदू धर्माभिमानी म्हणविणा-या प्रत्येक स्वाभिमानी मनुष्याने हा अस्पृश्यतेचा निर्बंध दूर करून त्याला बळी पडलेल्या कोट्यवधी लोकांनी सुस्थितीत आणण्यासाठी शक्य तितकी शिकस्तीची मदत करणे हे त्याचे जरूर कर्तव्य आहे.


‘तसेच आम्ही खाली सह्या करणारे असे जाहीर करतो की, आमच्या स्वतःच्या बाबतही प्रसंग येईल तेव्हा वरील ठराव अमलात आणणे हे आमचे व्यक्तीविषयक कर्तव्य आहे.६
या जाहीरनाम्यावर सह्या केलेल्या काही प्रमुख व्यक्तींचा येथे निर्देश करतो. सर रामकृष्णपंत भांडारकर, नरसोपंत केळकर, श्री. काशिबाई कानिटकर, नाशिकचे रा. पाटणकर, गणपुले, बेळगावचे रा. ब. परुळकर, ना. बेळवी, नागपूरचे रा. मोरेपंत जोशी, ना. व्ही. एस. घोष, डॉ. गौर, डॉ. मुंजे, उमरावतीचे नाम. खापर्डे, सर रवींद्रनाथ ठाकूर, मिसेस अँनी बेझंट, डॉ. काशिबाई नवरंगे, डॉ. नागूताई जोशी, सौ. अवंतीकाबाई गोखले, बाबू बिपिनचंद्र पाल, कानजी द्वारकादास धरमसी, लक्ष्मीदास तेरसी, जमनादास द्वारकादास, मनु सुभेदार इत्यादी सुमारे शंभर व्यक्तींच्या सह्या प्राप्त झाल्या होत्या.७


लोकमान्य टिळकांची सही जाहीरनाम्यावर घेण्यासाठी स्वतः विठ्ठल रामजी शिंदे सरदारगृहात लोकमान्यांकडे गेले. ते गेले असता भोवताली त्यांची प्रभावळ त्यांना बसलेली दिसली. तात्यासाहेब केळकर, दादासाहेब खापर्डे ह्यांनी तात्काळ सह्या केल्या पण लोकमान्य कचरू लागले. एक वेळ सही करण्यासाठी म्हणून ते पुढेही आले पण दादासाहेब करंदीकर त्यांना आडवे गेले. शेवटी लोकमान्य टिळक अगदी काकुळतीला येऊन शिंदे यांच्या खांद्यावर दोन्ही हात ठेवून आर्जवू लागले की, इंग्लंडहून परत येईपर्यंत शिंदे यांनी आपली सही घेण्याचा आग्रह सोडावा. परंतु शिंदे यांनीही याबाबतीत निर्धार दाखविला. त्यांनी लोकमान्यांना स्पष्ट बजावले की, सही न देण्याने त्यांना स्वतःलाच नव्हे तर त्यांच्या पक्षालाही खाली पाहावे लागणार आहे. लोकमान्यांच्या मनाची स्थिती द्वीधा झाली होती. अण्णासाहेब शिंदे यांची समजूत काढण्यासाठी त्यांना एकट्यांनाच एका दालनात नेऊन सामाजिक सुधारणेशी आपला कसा संबंधी आहे; नागपूरपासून सुधारकांच्या कंपूतून आपण का व कसे फुटलो आणि तरीही आपण सुधारकच असे आहोत वगैरे वृत्तान्त कळकळीने निवेदन केला. पण अखेर त्यांनी सहा दिलीच नाही. प्रत्यक्ष भेटीत सही घेण्याचा शिंदे यांचा प्रयत्न निष्फळ झाला.८


ऐतिहासिक महत्त्वाच्या ह्या भारतीय पातळीवरील अस्पृश्यतानिवारक परिषदेचा एका ओळीचाही एका ओळीचाही वृत्तान्त टिळकांच्या केसरी पत्रात प्रसिद्ध झाला नाही. निमंत्रण कबूल करताना आपण केसरीकर्ता म्हणून नव्हे तर केवळ टिळक म्हणून परिषदेस येऊ असे शिंदे यांना त्यांनी बजावून सांगितले होते. याचा अर्थ टिळकांची भूमिका तेव्हापासूनच द्विधा होती असे दिसते. या घटनेवर भाष्य करताना जागृतीकार पाळेकरांनी लिहिले आहे, “कदाचित मुंबईच्या परिषदेस रा. टिळकांनी जे विचार भाषणाद्वारे प्रदर्शित केले ते वाचून केसरीच्या वाचकांची त्यांच्या विषयाची पूज्यबुद्धी कमी होईल अशी त्या पत्राच्या संपादकांना भीती वाटत असल्यास न जाणे! आम्हास तरी यात सुसंगतपणा व सरळपणा दिसत नाही. पण कदाचित हा मुत्सद्दीपणा असेल.”९


परंतु शिंदे यांनी लोकमान्यांचा पिच्छा सोडला नाही. त्यांनी २ जून १९१८ रोजी लोकमान्यांना जाहीरनाम्यावर सह करण्यासंबंधी लेखी पत्र पाठविले.
लोकमान्यांचे उत्तर लवकर आले नाही म्हणून त्यांनी पुन्हा एका वेगळ्या कामानिमित्त लिहिलेल्या चिठ्ठीत याचा उल्लेख केला होता. अखेर लोकमान्यांचे उत्तर आले. त्यांच्या इंग्रजी पत्राचा मराठी अनुवाद पुढीलप्रमाणेः१०


पूना सिटी
२-८-१८
प्रिय रा. शिंदे
तुमचे आजचे पत्र मिळाले. मॅनिफेस्टोच्या अखेरच्या परिच्छेदामध्ये माझ्यावर व्यक्तिगत जबाबदारी टाकण्यात येत आहे, म्हणून सध्याच्या माझ्या परिस्थितीत ती मी पार पाडू शकणार नाही. म्हणून मी मॅनिफेस्टोवर सही करून शकत नाही. याबद्दल क्षमा असावी. (ह्या पत्राच्या दुस-या परिच्छेदात लोकमान्य टिळकांनी म्हटले आहे, तुम्हाला माँटेग्यूचा अहवाल पाठवीत आहे. परिच्छेद २३२ चा शेवटचा भाग कृपया वाचावा व उद्या परत करावा.)
तुमचा
बी. जी. टिळक


लो. टिळकांचा अपवाद वगळला तर प्रांतोप्रांतीच्या विविध पुढा-यांकडून अस्पृश्यतानिवारणाच्य कामासंबंधी अनुरकूल प्रतिसाद मिळण्याच्या दृष्टीने शिंदे यांनी भरविलेली ही परिषद यशस्वी झाली. जवळ जवळ ३००च्या वर सर्व प्रांतांच्या महत्त्वाच्या पुढा-यांच्या स्वाक्ष-या मिळाल्या. कलकत्ता येथील अधिवेशनात काँग्रेसने अस्पृश्यतानिवारणाचा ठराव करून अस्पृश्यतानिवारणाचे कार्य देशाच्या पातळीवर नेले होते. अस्पृश्यतानिवारणाचा हा ठराव केवळ शाब्दि पातळीवरच राहू नये; तो प्रत्यक्ष अमलात आणावा ह्या दृष्टीने जाहीरनामा काढून प्रमुख पुढा-यांचा पाठिंबा मिळविण्याचे कार्य परिषदेने साधले व अस्पृश्यतानिवारणाच्या कार्याला प्रत्यक्ष आचरणात आणून फार मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय पातळीवर चालना देण्याचे काम साधले.


कलकत्ता काँग्रेसमधील ठराव व मुंबई येथील अस्पृश्यतानिवारक परिषद ह्या दोन घटनांमुळे अस्पृश्यतानिवारणाच्या कामात सार्वत्रिक स्वरूपात नवी जागृती दिसून येऊ लागली. याचा अनुभव लोणावळा येथील परिषदेमध्ये लवकरच आला. लोणावला येथे पुणे जिल्हा राजकीय परिषद भरली होती. विठ्ठल रामजी शिंदे यांनाही निमंत्रण असल्याने ते तेथे गेले होते. ह्या सभेत स्वराज्याचा मुख्य ठराव अण्णासाहेब शिंदे यांनी मांडावा अशी परिषदेची इच्छा होती. अण्णासाहेब शिंदे यांनी अस्पश्यतानिवारणकार्याचा ध्यासच घेतला होता. स्वराज्य मिळविण्याइतके अस्पृश्यतानिवारणकार्य ते मोलाचे मानीत होते. शिंदे यांनी परिषदेच्या चालकांना स्पष्ट सांगितले की, “अस्पृश्यतानिवारणाचा ठराव या परिषदेने एकमताने पास करून घ्यावा म्हणजे मीही स्वराज्याचा ठराव आनंदाने पुढे मांडीन.” प्रसिद्ध मद्यपाननिषेधक श्री. शंकरराव लवाटे यांनी शिंदे यांच्या म्हणण्याला विरोध केला. त्या वेळी केसरी पक्षातील सगळे तरुण पुढारी शिंद्याच्या बाजूचे होते. त्यांनी शिंदे यांना सांगितले की, लवाटे यांच्याशिवाय सगळी मंडळी ठरावाला अनुकूल दिसतात तेव्हा स्वराज्याचा ठराव त्यांनी मांडावा. शिंदे मात्र आपल्या भूमिकेवर पक्के राहिले. त्यांनी नम्रपणे पण निर्धाराने सांगितले, “अस्पृश्यतानिवारणाचा ठराव एकमताने पास होण्यातच विशेष आहे. असा महत्त्वाचा ठराव काँग्रेसच्या मुख्य अधिवेशनात एकमताने पास झाला असता, जिल्हापरिषदेत नुसत्या बहुमताने पास होणे म्हणजे राष्ट्राने माघार घेण्यासारखे आहे. शिवाय त्यात राष्ट्रीय सभेची शिस्तही मोडते.” या प्रश्नावर बरीच भवतिनभवती झाली. श्री. लवाटे यांना टिळकांकडे नेण्यात आले. त्यांनी सल्ला दिला की, “धर्माची सबब काढून अस्पृश्यतानिवारण करण्याच्या कामी कुचराई करण्याचा काळ गेला. रा. शिंदे यांना अनुकूल करून घेऊन स्वराज्याचा ठराव एकमताने पास करून घ्यावयाचा असेल तर त्यांचा अस्पृश्यतानिवारणाचा ठरावही एकमतानेच पास झाला पाहिजे. हे जर लवाटे यांना पटत नसेल तर त्यांनी अस्पृश्यतानिवारणाच्या ठरावावर मते घेताना मंडप सोडून जावे हे इष्ट.” याप्रमाणे लवाट्यांनी मान्य केल्यावर वरील दोन्ही ठराव सभेत एकमताने पास झाले.११ लो. टिळकांच्या मताची ही दुसरी बाजू लोणावळा येथील परिषदेत दिसून आली. बदललेल्या राजकीय वातावरणाचा जो रेटा निर्माण झालेला होता त्याचा अनुकूल स्वरूपाचा परिणाम अस्पृश्यतानिवारणाच्या कार्यावरही दिसून येऊ लागला.


अस्पृश्यतानिवारणकार्यासाठी शिंदे यांनी आपली व्यक्तिगत मते बाजूला ठेवली होती व अस्पृश्यतानिवारणाकार्यासाठी सर्वांचे सहकार्य मिळविण्याचा सतत यशस्वी प्रयत्न केला. लो. टिळकांच्या नेतृत्वाखाली असलेला त्या वेळचा राष्ट्रीय पक्ष सामान्यतः सामाजिक सुधारणांच्या विरोधी होता. शिंदे यांनी लो. टिळकांशी व राष्ट्रीय पक्षातील अन्य नेत्यांशी चांगले संबंध प्रस्थापित केले होते. त्या पक्षातील लोकांचेही सहकार्य अस्पृश्यता निर्मूलनासाठी मिळविणे अत्यंत उपयुक्त होते. एकतर महाराष्ट्रातील शिकलेल्या लोकांमध्ये हा वर्ग प्रभावी होता, बहुसंख्य होता. समाजातील सगळ्याच थरांतील लोकांची मने पालटल्याने अस्पृश्यतानिर्मूलनाचे कार्य साध्य होण्यासारखे होते. राष्ट्रीय विचारप्रणालीचे लोक सामाजिक सुधारणेच्या विरोधातच आहेत म्हणून त्यांच्यापर्यंत जाण्यात अर्थ काय, असे न समजता त्यांना ह्या सुधारणेला अनुकूल करून घेणे महत्त्वाचे होते. स्वतः शिंदे राष्ट्रीय वृत्तीचे होते. लोकमान्य टिळकांशी त्यांचे सौहार्दपूर्ण संबंध होते. त्यामुळे राष्ट्रीय पक्षाच्या लोकांना अस्पृश्यतानिवारणाच्या कार्याकडे वळविणे त्यांना शक्य झाले. अस्पृश्यतानिवारणकार्याच्या संदर्भात हे अत्यंत कठीण असे काम शिंदे यांनी केले असेच म्हणावे लागेल.


ह्या परिषदेच्या संदर्भात ब्राह्मणेतर पक्षाचे पुढारी श्री. वालचंद कोठारी यांनी काहीशी अनपेक्षित वाटावी अशी भूमिका घेतल्याचे दिसते. कोठारी यांनी १९ जुलै १९१७ रोजी जागरूक हे साप्ताहिक सुरू केले होते. विद्येत मागासलेल्या लोकांच्या उन्नतीसाठी त्याचप्रमाणे अस्पृश्यावर्गाच्या सुधारणेसाठी आपण ह्या कार्याला आरंभ केला अशी कोठारी यांची भूमिका होती. आपल्या सार्वजनिक जीवनाच्या कार्यारंभापासून अस्पृश्यतेच्या प्रश्नासंबंधी आपल्याला कळकळ होती असे वा. रा. कोठारी हे स्वतः लिहिलेल्या जुन्या आठवणीमधून वारंवार सांगतात. असे असताना मुंबईस एवढ्या मोठ्या भव्य प्रमाणात विठ्ठल रामजी शिंदे यांनी अखिल भारतीय पातळीवर महत्त्वाची ठरावी अशी अस्पृश्यतानिवारक परिषद भरवली असता व मी आपल्या व्यक्तिगत जीवनात अस्पृश्यता पाळणार नाही अशा प्रकारच्या प्रतिज्ञापत्रकावर सही सरण्याचा विधायक कार्यक्रम परिषदेने अमलात आणला असता वा. रा. कोठारी यांना ह्या परिषदेबद्दल वस्तुतः जिव्हाळा वाटावयास पाहिजे होता. ह्या परिषदेचे महत्त्व ओळखून त्यांनी ह्या परिषदेस पाठिंबा देणे युक्त ठरले असेत. परंतु असे तर झाले नाहीच. उलट विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यतानिवारणाच्या कार्याबद्दल त्यांच्या ठिकाणी असणा-या आत्यांतिक तळमळीमुळे सर्व जहाल, मवाळ, राजकी पुढारी, संस्थानिक व सांस्कृतिक क्षेत्रातल्या मान्यवर व्यक्तींचा पाठिंबा मिळविला होता. विविध राजकीय पक्षांची मंडळी ह्या परिषदेमध्ये सहभागी करून घेण्यात शिंदे यांनी अपूर्व संघटनाकौशल्य दाखविले होते. ह्या बाबीचे कोठारी यांनी कौतुक तर केले नाहीच उलट या प्रयत्नाचा उपहास करण्यासाठी व्यंगचित्र प्रसिद्ध केले. विठ्ठल रामजी शिंदे हे पुढच्या काळात कोठारींना म्हणत असत की, “तुम्ही अस्पृश्यांचा कैवार घेता खरे, पण तुम्ही मुख्यतः राजकारणी आहात. अस्पृश्यांबद्दलची तुमची आत्मीयता खरी नाही.”१२ अण्णासाहेब शिंदे हे ब्राह्मणेतर पक्षाच्या बाजूचे नव्हते म्हणून कोठारी यांनी ह्या परिषदेबाबत टीकाकाराची भूमिका घेतली असणे शक्य आहे. पुढच्या काळातही ब्राह्मणेतर पक्षाची भूमिका अस्पृश्यतानिवारणाच्या कामी संदिग्धच राहिल्याचे दिसते.


संदर्भ
१.    वि. रा. शिंदे, ‘सही नाही; सहानुभूती!’ लोकमान्य टिळक यांच्या आठवणी व आख्यायिका, खंड २, संपा. स. वि. बापट, पृ. २००-२०६.
२.    तत्रैव, पृ. २००-२०६.
३.    सुबोधपत्रिका, ३१ मार्च १९१८ आणि संदेश ३१ मे १९१८.
४.    वि. रा. शिंदे , ‘सही नाही; सहानुभूती’, पूर्वोक्त, पृ. २०४.
५.    वि. रा. शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. २९४.
६.    वि. रा. शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. २९४.
७.    सुबोधपत्रिका, ६ ऑक्टोबर १९१८.
८.    वि. रा. शिंदे, ‘सही नाही; सहानुभूती’, पूर्वोक्त, पृ. २००-२०६.
९.    जागृती, बडोदे, ६ एप्रिल १९१८.
१०.    शिंदे कागदपत्रे.
११.    वि. रा. शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. २९५.
१२.    वा. रा. कोठारी, जुन्या आठवणी, संकल्प प्रकारशन, पुणे, १९७३, पृ. ५३.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य

   निवेदन
    लेखकाचे मनोगत
    दुस-या व तिस-या आवृत्तीच्या निमित्ताने
    प्रस्तावना 
 -   अंत:प्रेरणेचा निर्णय
 -   आजी-आजोबा आणि आई-वडिल
 -   बालपण 
 -   कॉलेजची पहिली दोन वर्षं
 -   जनाबाईंची संसारकथा
 -   जनाबाईंचे शिक्षण
 -   हुजूरपागा शाळा आणि शांता सुखटणकरची
     करुण कहाणी
-    इंटरमीजिएटचे दुसरे वर्ष
 -    पदवी परीक्षेचा अभ्यास आणि एकोणिसाव्या
      शतकाच्या अखेरचे पुणे
   प्रार्थनासमाजाची दीक्षा 
 -    पदवी परीक्षा
 -   अंत:स्थ भावजीवनातील खळबळ 
 -    एकेश्वरी उदार धर्मपंथ
 -    प्रार्थनासमाज
 -    धर्मशिक्षणासाठी निवड आणि परदेशगमन
 -    मुंबई ते ऑक्सफर्ड
 -     मॅंचेस्टर कॉलेज
 -    ऑक्सफर्डमधील पहिले दोन महिने
 -    नाताळची सुट्टी : मुक्काम लंडन 
 -    पत्रांचा विरंगुळा
 -    दक्षिण किना-यावरील पंधरवडा
 -    प्रोफेसरांच्या कुटुंबात सरोवर प्रांती
 -    एडिंबरो आणि स्कॉच सरोवरे
 -    हिंदू गृहस्थिती आणि समाजस्थिती 
      व्याख्यान व नाट्यप्रयोग 
 -    पारीस येथील एक महिना
 -   लिव्हरपूल येथील त्रैवार्षिक युनिटेरियन परिषद
 -    ऑक्सफर्डमधील शेवटची टर्म
 -    ऍमस्टरडॅम येथील आंतराष्ट्रीय उदार धर्मपरिषद
 -    परतीचा प्रवास
 -    स्वदेशी आगमन, बडोदा भेट आणि
      धर्मप्रचारकार्याला प्रारंभ
 -    मद्रासच्या परिषदा आणि हिंदुस्थानचा दौरा
-    जमखंडी-मुधोळ येथील प्रचारकार्य
 -    काठेवाडचा दौरा 
 -    मुंबईतील बि-हाड आणि प्रार्थनासमाजातील नवचैतन्य
 -    धर्मप्रचाराचे विस्तारित कार्य
 -    कौटुंबिक अडचणी, पुणे प्रार्थनासमाजातील नवचैतन्य
 -    धर्मप्रचारार्थ दौरा
 -    प्रवासातील अनुभव
 -    जनाबाई पनवेलमध्ये शिक्षिका
 -    विविध प्रार्थनासमाजांतील सहभाग
 -    भारतीय एकेश्वरी धर्मपरिषद
 -    ब्राह्मधर्मसूची ग्रंथ
 -    अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीविषयक कार्याचे प्रारंभिक प्रयत्न
 -    मिशनच्या स्थापनेचा संकल्प
 -    मिशनची स्थापना
 -  मिशनची घटना व पुणे येथील अंगभूत शाखा
 -    मिशनमधील दोन समारंभ 
 -    मिशनच्या स्थापनेनंतर वातावरणातील बदल
 -    निधीची योजना
 -    मुंबई प्रार्थनासमाजाशी दुरावा आणि फारकत
 -    पुण्यास स्थलांतर
 -    मिशनची महाराष्ट्र परिषद
 -    तुकोजीराव महाराजांची देणगी व मांगांचे
      शेतकी खेडे वसविण्याचा प्रयत्न
 -   अहल्याश्रमाची पूर्वतयारी 
 -    मराठ्यांची सांस्कृतिक जबाबदारी 
 -    काँग्रेसमध्ये अस्पृश्यतानिवारणाचा ठराव
 -    अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीची दिशा व मार्ग
 -    अस्पृश्यतानिवारक परिषद
 -   राष्ट्रीय प्रवाहात मराठा समाज
 -    अस्पृश्यवर्गाचे कायदेमंडळात प्रतिनिधित्व
 -    गैरसमजाचा ससेमिरा 
 -    १९२० सालातील निवडणूक 
-    शिंदे आणि ब्राह्मणेतर पक्ष
 -    कुटुंबातील मृत्यू
 -    मुलींसाठी सक्तीचे शिक्षण
 -    मद्यपाननिषेधाची चळवळ व अन्य सामाजिक कार्य
 -    मिशनचा कार्यविस्तार : कर्नाटक-मध्यप्रांतातील शाखा 
 -    मिशनसंबंधी आक्षेप व समस्या
 -    मिशनची पुनर्घटना
 -    खटल्याचा दैवदुर्विलास
 -    मिशनमधील सहकारी व सहका-यांच्या
       दृष्टीतून विठ्ठल रामजी शिंदे
 -    मंगलोरमधील कार्य
 -   व्हायकोम सत्याग्रह
 -    मंगलोर ब्राह्मसमाजातील पेचप्रसंग
 -    कौटुंबिक उपासनामंडळ
 -    सत्याग्रहात सहभाग आणि नेतृत्व
 -    अस्पृश्यतानिवारणाचे कार्य व म. गांधीशी संबंध
 -    येरवड्याच्या तुरुंगात
 -    ब्रह्मदेशाची यात्रा 
 -    शेतकरी चळवळ
 -    परिषदा, संमेलने यांमधील सहभाग
 -   कौटुंबिक वातावरण
 -    बहुमान, अवमान आणि निष्ठा
 -    वाई ब्राह्मसमाज आणि ग्रामीण भागातील धर्मकार्य
 -    विचारविश्व
 -    साहित्यसेवा आणि संशोधनकार्य
 -   अपूर्व स्नेहसंमेलन
 -   अखेरचे दिवस
 -   उपसंहार 
 -   परिशिष्टे १/२ आणि ३ 
 -   मनोगते
 -   महर्षी शिंदे यांचे फोटो व काही हस्तलिखिते