महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य

मिशनचा कार्यविस्तार : कर्नाटक-मध्यप्रांतातील शाखा

१९१२ साली मुंबई येथे भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीचे काम करीत असतानाच विठ्ठल रामजी शिंदे यांना जाणवत होते की, कर्नाटक प्रांतामध्ये मिशनचे काम वाढविणे आवश्य आहे. कर्नाटक प्रांतामध्ये अस्पृश्योद्धाराचे व अस्पृश्यतानिवारण्याचे कार्य करायचे असेल तर हुबळीसारख्या ठिकाणी मिशनची एक अंगभूत शाखा स्थापन करणे फार उपयुक्त ठरेल असेही त्यांना जाणवले. ह्या कामासाठी सय्यद अब्दुल कादर यांची योजना करणे युक्त राहील असे त्यांना वाटले व हा विचार पक्का केल्यानंतर ते हुबळी येथे अंगभूत शाखा स्थापन करण्याच्या दृष्टीने प्रयत्नाला लागले. ही शाखा स्थापन करावयाची असेल तर निदार दोन वर्षांच्या खर्चाची आधीच तरतूद करणे आवश्यक होते व ह्या कामी कोल्हापूरकडील भागामधून विशेष साहाय्य होईल ह्या कल्पनेने ३ मे १९१२ रोजी शिंदे हे सय्यद यांना घेऊन कोल्हापुरास पोहोचले.


कोल्हापूर येथे मोठमोठ्या धनिक लोकांच्या शिंदे यांनी भेटी घेतल्या व पैसे देण्याचे अभिवचनही ह्या मंडळींकडून मिळविले. अलीकडच्या काळामध्ये अमण्णासाहेब शिंदे यांनी ते कोणत्याही गावी गेले असता महारवाड्याला भेट देणे, तेथे भजन करणे, प्रवचरन करणे असा उपक्रम चालू ठेवला होता. त्याला अनुसरून कोल्हापूर येथील महारवड्या जाऊन त्यांनी भजन केले. एक आठवडा कोल्हापूर येथे हुबळी शाखेसाठी वर्गणी गोळा करण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते कुरुंदवाडला गेले.


११मे रोजी तेथे चीफ मेडिकल ऑफिसल डॉ. यशवंत वामन मोडक यांच्या दिवाणखान्यात स्टेट कारभारी रा. ब. सोवनी यांच्या अध्यक्षतेखाली सभा भरविली. अध्यक्षांनी अस्पृश्यवर्गाला शिक्षण घेता यावे; आपली उन्नती साधता यावी यासाठी त्यांना मदत करणे हे वरच्या वर्गातील लोकंचे कर्तव्य आहे असे सांगितले. काही उच्च वर्णातील व्यक्तींच्या ठिकाणी अस्पृश्यांना शिवून घेण्याची मानसिक तयारी झाली नव्हती. मात्र त्यांची उन्नती व्हायला पाहिजे; त्यासाठी उच्चवर्णीय स्पृश्यांनी मदत केली पाहिजे अशी धारणा झाली होती. सभेचे अध्यक्ष रा. ब. सोवनी हे अशांपैकी एक होते. अस्पृश्यवर्गीयांना शिवावे की नाही हा प्रश्न वेगळा आहे, पण त्यांना मदत करणे हे आपले पवित्र काम आहे असे अध्यक्षांनी प्रतिपादन केले. अण्णासाहेब शिंदे यांनी संस्थेबद्दलची सर्वांगीण माहिती सांगितली. त्यानंतर श्रीमंत चिवटे हे अध्यक्ष व रा. ब. सोवनी, दादोबा चिवटे, रा. घोरपडे व डॉ. मोडक (सेक्रेटरी) एवढ्यांची कमिटी नेमण्यात आली. तेथील थोड्या काळातील वास्तव्यातही रुपये ६५/- एवढी वर्गणी जमली. त्या दिवशी रात्री अण्णासाहेब शिंदे यांनी महारवाड्यात भजन केले. दुस-या दिवशी कुरंदवाडहून अण्णासाहेब शिंदे सय्यदांसमवेत शिरोळ येथे गेले. तेथे प्रतिष्ठित लोकांची सभा भरविली. सध्याच्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये वर्गणी जमणे कठीण आहे असे मामलेदारांनी सांगितले. ह्या गावामध्ये महारमांग लोकांची लोकसंख्या जवळ जवळ एकतृतीयांश इतकी होती, ही बाब शिंदे यांना लक्षणीय वाटली. शिरोळ्याहून मग ही मंडली बेळगावास गेली.१


हुबळी येथे मिशनच्या कर्नाटक शाखेचे काम सय्यद यांनी कल्याणीबाईंच्या सहकार्याने उत्तम प्रकारे चालविले. हुबळी येथील शाखा १९१२ साली स्थापन झाली होती, बेळगाव येथील शाखा १९१५ साली स्थापन झाली होती; तर गोकाक येथे १९१८ साली शाखा स्थापन करण्यात आली. हुबळी शाखेमध्ये दिवसाच्या शाळांच्या जोडीनेच रात्रीच्या शाळा चालविल्या जात. दिवसा भरणा-या शाळेत पुस्तकी शिक्षणाबरोबरच शिवणकाम, सुतारकाम इत्यादी धंद्याचे शिक्षण दिले जात असे. १९१८ सालचा खर्च विचारात घेतला तर सुमारे ३,५०० रुपये एवढा खर्च सुमारे २२५ मुलांवर दरसाल होत असे. हुबळी येथील मिशनच्या वतीन चालविलेले धंदेशिक्षणाचे महत्त्व ध्यानात घेऊन तेथील दक्षिण भागाचे कमिशनर मि. माउंट फोर्ट यांनी डिस्ट्रिक्ट बोर्डाला सूचना केली, की दर जिल्ह्यात खालच्या वर्गातील मुलांना धंदेशिक्षण देण्यासाठी एक शाळा असावी. त्याप्रमाणे धारवाडच्या डिस्ट्रिक्ट बोर्डाच्या सूचनेवरून हुबळी शाखेच्या सुपरिटेंडेंटनी एक योजना तयार करून पाठविली. ह्या शैक्षणिक कामाबरोबरच मिशनची शाखा परोपकाराची कामे करत होती. १९१८च्या नोव्हेंबर महिन्यात हुबळी येथे इन्फ्लुएंझाची मोठी साथ आली त्या वेळेला शाळा बंद कराव्या लागल्या मात्र मिशनच्या शाळेतील शिक्षकांनी गोरगरिबांना औषधे पुरविण्याचे काम ह्या साथीमध्ये केले. गोकाक येथील शाळेत रात्रीची एक शाळाही सुरू करण्यात आली.२


कर्नाटक शाखेने अस्पृश्यवर्गासाठी ह्या प्रकारचे काम सुरू करून एक नवी जागृती इकडील प्रांतामध्ये निर्माण केली. कर्नाटक प्रांतात सुखवस्तू लोक बरेच आहेत मात्र ह्या कामाकडे त्यांचे अद्यापि जावे तसे लक्ष गेलेले नव्हते. या सुखवस्तू लोकांच्या सहानुभूतीचा ओघ अस्पृश्य समजल्या जाणा-या लोकांच्या उन्नतीसाठी वळविण्यात कर्नाटक शाखेला बरेच यश मिळाले असे म्हणता येईल. सय्यद यांनी घालून दिलेली घडी व नंतरच्या काळात श्री. दा. ना. पटवर्धन यांनी शिस्तशीरपणे व कळकळीने केलेले कार्य ह्यामुळे हुबळी शाखा कर्नाटक प्रांतामध्ये उत्तम प्रकारे कार्य करू शकली.


विठ्ठल रामजी शिंदे पुण्यास आल्यानंतर व पुणे शाखेची जबाबदारी त्यांनी घेतल्यानंतर मोठमोठ्या कामाला गती आली. अहल्याश्रमाच्या संकल्पित इमारतीचे आराखडे तर सादर केले होतेच. परंतु युरोपमध्ये युद्ध सुरू झाल्यामुळे नंतर ते काम स्थगित झाले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रमावर मात्र विशेषत्वाने भर देण्यात आला. सेंट्रल प्रायमरी स्कूनमध्ये तीन इंग्रजी इयत्तांपर्यंत शिकविले जात होते. मुलींकडून फी घेण्यात येत नसे. भगिनी जनाबाई शिंदे मुलींसाठी स्वतंत्र वर्ग चालवीत असत. त्याशिवाय बोर्डिंगची देखरेखही त्याच करीत असत. पुढे मुलींची शाळा स्वतंत्र करावयाची असा उद्देश ठेवून त्यांनी मुलींचे वर्ग चालविले होते. या शाळेतील शिस्त व वळण वाखाणण्याजोगे होते. दररोज अभ्यासाला सुरुवात होण्यापूर्वी सर्व मुले हॉलमध्ये जमून धार्मिक स्तोत्रे म्हणत. मुलांच्या चालीरीतींकडे, स्वच्छ राहणीकडे व योग्य भाषा वापरण्याकडे जाणीवपूर्वक लक्ष पुरविले जाते, असा एज्युकेशनल इन्स्पेक्टर पी. बी. बापट यांनीही अभिप्राय नमूद केला. कार्पेंटरी क्लासमध्ये दहा मुले शिक्षण घेत होती व इन्स्पेक्टिंग ऑफिसर मि.एल्.एस्. डॉसन यांनी त्यांच्याबद्दल चांगला अभिप्राय नमूद केला. टेलरिंग क्लासमध्ये मुलगे व मुली दोन्ही असून मिशनमधूनच तयार झालेले शिक्षक शिकविण्याचे काम करतात; विद्यार्थी आपले कपडे शिवू शकतात एवढी त्यांची चांगली तयारी झाली आहे, असा इन्स्पेक्टिंग ऑफिसर आर. एन्. दीक्षित यांनी चांगला अभिप्राय दिला. हॉस्टेलमध्ये आठ जेवण करणारे व सहा राहणारे विद्यार्थी होते. संस्थेच्या वतीने भजनसमाज चालविला जात असे. रविवारी साडेआठ ते साडेदहा साप्ताहिक उपासना होत. महाभारत, गीता व बुद्धचरित्र यांमधून मुलांस समजण्यासारखे भाग समजावून दिले जात.३ विद्यार्थींचे सामान्यज्ञान वाढावे, त्यांना आपला इतिहास व परंपरा नीट माहीत व्हावी या हेतूने अण्णासाहेब शिंदे यांनी मिशनमध्ये व्याख्यानादिकांचे उपक्रम सुरू केले होते. त्याला अनुसरून दत्तो वामन पोतदार यांना मराठ्यांच्या इतिहासावर दर आठवड्याला एक असे व्याख्यान देण्याची विनंती केली होती व त्याप्रमाणे पोतदार यांनी दहा व्याख्याने दिली. ही व्याख्याने सोप्या भाषेत, मुलांना कळतील अशा प्रकारे व्हावीत अशी शिंदे यांची इच्छा होती, असे पोतदार यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे भान शिंदे हे ठेवीत असत हे त्यांच्या या उपक्रमावरून दिसून येते. ही व्याख्याने प्रसिद्ध करण्यासाठी पोतदारांनी लिहून द्यावीत अशी विनंती शिंदे यांनी त्यांना केली होती, असेही पोतदारांनी नमूद केले आहे.४


मुंबई, पुणे, हुबळी येथील मिशन शाखांचे काम चांगल्या प्रकारे सुरू झाल्यानंतर नागपूर येथे मध्यप्रांतासाठी एक अंगभूत शाखा काढावी असा विचार शिंदे यांच्या मनामध्ये बळावला. कोल्हापूचे वकील श्री. कृष्णाजी कदम ह्यीं या कामी स्वतःला वाहून घेण्याची तयारी दाखविली. अमरावती, अकोला, यवतमाळ ह्या मध्यप्रांतातील ठिकाणी संलग्न शाखांची कामे ह्यापूर्वींच चालू होती. नागपूर येथे अंगभूत शाखा उघडून तिच्यावर ह्या संलग्न शाखांची जबाबदारी सोपविणे इष्ट ठरले असते व व-हाड प्रांतामध्ये मिशनच्या कामाचा विस्तार करणे सोयिस्कर झाले असते असे शिंदे यांना वाटले. म्हणून १९१४च्या उन्हाळ्यात ते नागपूरास गेले. रा. ब. वामनराव कोल्हटकर ह्या वृद्ध प्रागतिक पुढा-यांकडे ते उतरले. सुप्रसिद्ध मराठी लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे ते चुलते. मातब्बर लोकांच्या भेटी घडवून आणणे व अन्य प्रकारे साहाय्य करणे ह्या कामी रा. ब. कोल्हटकरांची शिंदे यांना मोठी मदत झाली. या प्रारंभिक तयारीनंतर शिंदे यांनी श्री. कदम यांना बरोबर घेऊन मध्यप्रांतातील हिंदी जिल्ह्यांतून पूर्वतयारीसाठी आणि निधी जमविण्यासाठी एक विस्तृत दौरा काढला. भंडारा, बालाघाट, जबलपूर, रायपूर, बिलासपूर आणि उत्तर हिंदुस्थानात सागर व दमोह वगैरे ठिकाणी शिंदे व कदम यांची व्याख्याने झाली. ह्या दौ-यात त्यांना सुमारे चार हजार रुपयांची मदत मिळाली. यावरून शिंदे यांचे प्रचारकार्य किती प्रभावीपणे चालले होते व किती वेधकपणे ते लोकांचे लक्ष अस्पृश्यतानिवारणाच्या कामाकडे आकृष्ट करून घेऊ शकत होते याचा पडताळा मिळतो. दमोहहून श्री. कदम यांना नागपूरला पाठवून ते स्वतः भोपाळ, देवास, इंदूर आणि धार ह्या संस्थानिकांच्या भेटी घेऊन, त्यांची या कामासाठी सहानुभूती संपादन करून मुंबईला परत आले.


नागपूर येथे पुन्हा जाऊन त्यांनी एम्प्रेस मिलचे मालक सर बेझनजी यांची गाठ घेऊन त्यांच्या मालकीच्या पाचपावली येथील चाळींपैकी एक चाळ मिशनच्या कार्यासाठी घेतली. नागपूर येथील प्रतिष्ठित व्यक्ती सर मोरोपंत जोशी, नामदार मुधोळकर वकील, रा. ब. वामनराव कोल्हटकर, डॉ. ल. वि. परांजपे, न्या. भवानीशंकर नियोगी वगैरेंची एक कमिटी नेमण्यात आली. नागपूर येथील ह्या अंगभूत शाखेच्या कार्यामध्ये अनेक अडचणी आल्या. एक तर प्लेगची मोठी साथ लगेच उदभवली, दुसरे म्हणजे श्री. कदम यांना हे काम योग्य त्या प्रकारे करणे झेपेना. स्थानिक कमिटीच्या त्यांच्याबद्दलच्या तक्रारी येऊ लागल्या. त्यामुळे कदमांना तेथून हलविण्याचा विचार शिंदे यांना करावा लागला. कोणत्याही नवीन ठिकाणी जाऊन मिशनच्या शाखेचे काम उत्तम प्रकारे करण्याचे कौशल्य श्री. सय्यद अब्दुल कादर यांच्या ठिकाणी आहे हे शिंदे प्रारंभापासून पाहत होते. तेव्हा नागपूर शाखेवर सय्यद यांची नेमणूक करण्याचे त्यांनी ठरविले व त्याप्रमाणे ते सहकुटुंब हुबळीहून नागपूरला रवाना झाले. पाचपावली येथील ज्या चाळीमध्ये वसतिगृह होते तेथेच त्यांनी आपले राहण्याचे ठिकाण कायम केले व अमरावती, अकोला, यवतमाळ येथील संस्थांची देखरेखही ते तेथून योग्य प्रकारे करू लागले.


सय्यद यांना हुबळीहून हलविल्यानंतर हुबळी शाखेची जबाबदारी कोणा तज्ज्ञ अधिका-यावर सोपविणे भाग होते. श्री. दा. ना. पटवर्धन हे पुणे शाखेचे काम उत्तम प्रकारे चालवीत होतेच. हुबळी येतील आश्रमात सहकुटुंब जाऊन राहण्याची तयारी श्री. दामोदरपंत पटवर्धन व त्यांच्या सुशील पत्नी सौ. अन्नपूर्णाबाई यांनी दाखविली. केवळ पत्नीलाच नव्हे, तर आपल्या वृद्ध आईलाही बरोबर नेण्याची तयारी दामोदरपंतांनी केली. सय्यद यांना हुबळी शाखेचे काम करताना भाषेची अडचण नव्हती. कारण कानडी भाषा हे ते मातृभाषेप्रमाणेच बोलत. दामोदरपंतांना मात्र भाषएची अडचण होती. परंतु तेथे गेल्यावर तीन-चार महिन्यांतच ते कानडी शिकून सर्व कामे कानडी भाषेतून करू लागले. शाळा, वसतिगृह व दवाखाना अशी तीन प्रकारची कामे हुबळी येथील स्थानिक शाखेत करावी लागत. शिवाय धारवड, बेळगाव, विजापूर येथील शाखांचे कामही पाहावे लागत असे. हुबळी म्युनिसिपालटीकडून ९९ वर्षांच्या कराराने व सवलतीच्या भाड्याने मिशनसाठी सय्यदांनी जागा मिळविली होती. सय्यदांनी योजिलेले दवाखान्याच्या व शाळेच्या इमारतीचे बांधकाम पटवर्धनांनी पूर्ण केले. ह्या मागासलेल्या प्रांतात पटवर्धनांनी कामाच्या तळमळीने व त्यांच्या ठिकाणी असलेल्या कार्यकौशल्यामुले थोड्या अवधीतच उत्तम जम बसविला. त्यांच्याबद्दल लोकमत एवढे चांगले होते की, पुढे झालेल्य हुबळी म्युनिसिपालटीच्या निवडणुकीमध्ये सरकारतर्फे त्यांची नेमणूक झाली. अशा त-हेने हुबळी येथील कर्नाटक प्रांताच्या अंगभूत शाखेचे काम समाधानकारक रीतीने चालू झाले.


संदर्भ
१.    सुबोधपत्रिका, १९ मे १९१२.
२.    सुबोधपत्रिका, २९ मे १९१९.
३.    सुबोधपत्रिका, २ जुलै १९१६.
४.    द. वा. पोतदार, लोकमान्यांचे सांगाती, केसरी प्रकाशन, पुणे १९७५, पृ. १११.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य

   निवेदन
    लेखकाचे मनोगत
    दुस-या व तिस-या आवृत्तीच्या निमित्ताने
    प्रस्तावना 
 -   अंत:प्रेरणेचा निर्णय
 -   आजी-आजोबा आणि आई-वडिल
 -   बालपण 
 -   कॉलेजची पहिली दोन वर्षं
 -   जनाबाईंची संसारकथा
 -   जनाबाईंचे शिक्षण
 -   हुजूरपागा शाळा आणि शांता सुखटणकरची
     करुण कहाणी
-    इंटरमीजिएटचे दुसरे वर्ष
 -    पदवी परीक्षेचा अभ्यास आणि एकोणिसाव्या
      शतकाच्या अखेरचे पुणे
   प्रार्थनासमाजाची दीक्षा 
 -    पदवी परीक्षा
 -   अंत:स्थ भावजीवनातील खळबळ 
 -    एकेश्वरी उदार धर्मपंथ
 -    प्रार्थनासमाज
 -    धर्मशिक्षणासाठी निवड आणि परदेशगमन
 -    मुंबई ते ऑक्सफर्ड
 -     मॅंचेस्टर कॉलेज
 -    ऑक्सफर्डमधील पहिले दोन महिने
 -    नाताळची सुट्टी : मुक्काम लंडन 
 -    पत्रांचा विरंगुळा
 -    दक्षिण किना-यावरील पंधरवडा
 -    प्रोफेसरांच्या कुटुंबात सरोवर प्रांती
 -    एडिंबरो आणि स्कॉच सरोवरे
 -    हिंदू गृहस्थिती आणि समाजस्थिती 
      व्याख्यान व नाट्यप्रयोग 
 -    पारीस येथील एक महिना
 -   लिव्हरपूल येथील त्रैवार्षिक युनिटेरियन परिषद
 -    ऑक्सफर्डमधील शेवटची टर्म
 -    ऍमस्टरडॅम येथील आंतराष्ट्रीय उदार धर्मपरिषद
 -    परतीचा प्रवास
 -    स्वदेशी आगमन, बडोदा भेट आणि
      धर्मप्रचारकार्याला प्रारंभ
 -    मद्रासच्या परिषदा आणि हिंदुस्थानचा दौरा
-    जमखंडी-मुधोळ येथील प्रचारकार्य
 -    काठेवाडचा दौरा 
 -    मुंबईतील बि-हाड आणि प्रार्थनासमाजातील नवचैतन्य
 -    धर्मप्रचाराचे विस्तारित कार्य
 -    कौटुंबिक अडचणी, पुणे प्रार्थनासमाजातील नवचैतन्य
 -    धर्मप्रचारार्थ दौरा
 -    प्रवासातील अनुभव
 -    जनाबाई पनवेलमध्ये शिक्षिका
 -    विविध प्रार्थनासमाजांतील सहभाग
 -    भारतीय एकेश्वरी धर्मपरिषद
 -    ब्राह्मधर्मसूची ग्रंथ
 -    अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीविषयक कार्याचे प्रारंभिक प्रयत्न
 -    मिशनच्या स्थापनेचा संकल्प
 -    मिशनची स्थापना
 -  मिशनची घटना व पुणे येथील अंगभूत शाखा
 -    मिशनमधील दोन समारंभ 
 -    मिशनच्या स्थापनेनंतर वातावरणातील बदल
 -    निधीची योजना
 -    मुंबई प्रार्थनासमाजाशी दुरावा आणि फारकत
 -    पुण्यास स्थलांतर
 -    मिशनची महाराष्ट्र परिषद
 -    तुकोजीराव महाराजांची देणगी व मांगांचे
      शेतकी खेडे वसविण्याचा प्रयत्न
 -   अहल्याश्रमाची पूर्वतयारी 
 -    मराठ्यांची सांस्कृतिक जबाबदारी 
 -    काँग्रेसमध्ये अस्पृश्यतानिवारणाचा ठराव
 -    अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीची दिशा व मार्ग
 -    अस्पृश्यतानिवारक परिषद
 -   राष्ट्रीय प्रवाहात मराठा समाज
 -    अस्पृश्यवर्गाचे कायदेमंडळात प्रतिनिधित्व
 -    गैरसमजाचा ससेमिरा 
 -    १९२० सालातील निवडणूक 
-    शिंदे आणि ब्राह्मणेतर पक्ष
 -    कुटुंबातील मृत्यू
 -    मुलींसाठी सक्तीचे शिक्षण
 -    मद्यपाननिषेधाची चळवळ व अन्य सामाजिक कार्य
 -    मिशनचा कार्यविस्तार : कर्नाटक-मध्यप्रांतातील शाखा 
 -    मिशनसंबंधी आक्षेप व समस्या
 -    मिशनची पुनर्घटना
 -    खटल्याचा दैवदुर्विलास
 -    मिशनमधील सहकारी व सहका-यांच्या
       दृष्टीतून विठ्ठल रामजी शिंदे
 -    मंगलोरमधील कार्य
 -   व्हायकोम सत्याग्रह
 -    मंगलोर ब्राह्मसमाजातील पेचप्रसंग
 -    कौटुंबिक उपासनामंडळ
 -    सत्याग्रहात सहभाग आणि नेतृत्व
 -    अस्पृश्यतानिवारणाचे कार्य व म. गांधीशी संबंध
 -    येरवड्याच्या तुरुंगात
 -    ब्रह्मदेशाची यात्रा 
 -    शेतकरी चळवळ
 -    परिषदा, संमेलने यांमधील सहभाग
 -   कौटुंबिक वातावरण
 -    बहुमान, अवमान आणि निष्ठा
 -    वाई ब्राह्मसमाज आणि ग्रामीण भागातील धर्मकार्य
 -    विचारविश्व
 -    साहित्यसेवा आणि संशोधनकार्य
 -   अपूर्व स्नेहसंमेलन
 -   अखेरचे दिवस
 -   उपसंहार 
 -   परिशिष्टे १/२ आणि ३ 
 -   मनोगते
 -   महर्षी शिंदे यांचे फोटो व काही हस्तलिखिते