महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य

वाई ब्राह्मसमाज आणि ग्रामीण भागातील धर्मकार्य

मूळ खेडेगावातून आलेल्या व पुण्यासारख्या शहरात स्थायिक झालेल्या बहुजन समाजातील कुटुंबांत, विशेषत: त्यांमधील बायकामुलांमध्ये, ब्राह्मसमाजाच्या उदार व उन्नत धर्माची शिकवण प्रसृत करुन त्यांची मने संस्कारित करणे हे एक विठ्ठल रामजी शिंदे यांनी वेगळ्या दिशेने केलेले महत्त्वाचे कार्य होय. पुण्यामध्ये कौटुंबिक उपासना मंडळाची स्थापना करुन हे काम चिकाटीने करण्याचा प्रयत्न त्यांनी केला व काही एका प्रमाणात त्यांना या बाबतीत यश मिळाले. परंतु एवढ्याने त्यांच्या मनाचे समाधान होण्याजोगे नव्हते. प्रत्यक्ष खेडेगावांत, खेडवळ लोकांमध्ये धर्माची उज्ज्वल कल्नपा प्रसृत करणे त्यांना फर महत्त्वाचे वाटत होते. कारण खेडेगावातील समाजावर धर्मविषयक अंधश्रद्धांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर पडलेला असतो. खेडेगावांमध्ये धर्मप्रचाराचे कार्य मुंबई, पुणे येथील समाजाकडून होणार नाही, ही जाणीव त्यांच्या मनामध्ये मुंबई ते पुणे येथील प्रार्थनासमाजाचा १८९८ मध्ये प्रारंभित परिचय झाल्याबरोबरच निर्माण झाली होती. १९०३ सालापासून प्रत्यक्ष धर्मप्रचाराचे कार्य त्यांनी सुरु केल्यानंतर महाराष्ट्रातील, तसेच भारतातील ब्राह्मधर्मविषयक कार्याचे अवलोकन केल्यानंतर हे प्रार्थनासमाजाचे धर्मकार्य केवळ शहरांत व सुशिक्षित लोकांपुरते मर्यादित आहे याची त्यांना खात्री पटली होती.

त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात वाईमध्ये तसेच आजूबाजूच्या ग्रामीण परिसरामध्ये ब्राह्मधर्मप्रसाराचे कार्य करण्याची प्रेरणा त्यांना उत्पन्न करता आली; हे कार्य संघटित करण्यासाठी ते मार्गदर्शन करु शकले व ह्या कामात ते सहभागी होऊ शकले. हा काळ १९३३ ते १९४३ ह्या दशकाचा होय. ज्या कामाची त्यांना अगदी तरुणपणापासून आस्था होती ते काम आयुष्याच्या अखेरच्या काळात ते करु शकले व ह्या कामात त्यांना मनोविश्रांती लाभली.


वाई येथे ब्राह्मसमाज स्थापन होण्यास विठ्ठल रामजी शिंदे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव कारणीभूत झाला, तो अशा प्रकारे : सातारा जिल्ह्यातील एक नामवंत शिक्षक श्री. कृष्णाराव उर्फ आबासाहेब बाबर हे निवृत्त झाल्यावर श्री. बा. ग. जगताप यांनी पुणे येथील आपल्या श्री शिवाजी हायस्कूलमध्ये मराठी व गणित शिकविण्यासाठी त्यांची नेमणूक केली. विठ्ठल रामजी शिंदे यांनी चालविलेल्या कौटुंबिक उपासना मंडळाच्या उपासनांसाठी ते आपल्या पत्नीसह उपस्थित राहत होते. कृष्णराव बाबर हे सुधारकी विचाराचे होते. पुणे येथील ट्रेनिंग कॉलेजात शिकत असताना ते महात्मा फुले यांना भेटावयास जात असत. सत्यशोधक समाजाबद्दल महात्मा फुल्यांची मते ते ऐकत असत व त्यांच्याशी चर्चा करीत.

सातारा जिल्ह्यातील मसूर येथे ते शिक्षक असता १९१६ साली विठ्ठल रामजी शिंदे यांच्यासमवेत अस्पृश्यतानिवारण्याच्या कामी ते पायी हिंडले होते. सर्वच बाबतीत त्यांचा कल असा सुधारकी मताचा असल्यामुळे शिंदे यांनी चालविलेल्या कौटुंबिक उपासनेच्या कार्यामुळे ते व त्यांच्या पत्नी ताईसाहेब हे प्रभावित झाले. त्यांचे चिरंजीव रामराव हेही कौटुंबिक उपासना मंडळाच्या कार्यक्रमांना आवडीने उपस्थित राहत असत. रामरावांच्या मातोश्री ह्या वाईत राहावयास आल्यानंतर पुण्याप्रमाणे तेथेही उपासना मंडळ चालवावे असे त्यांना वाटू लागले. रामराव बाबर यांचाही कल अशा प्रकारच्या धर्मकार्याकडे झालेला होता. एका प्रसंगाने ह्या विचाराला चालना मिळाली.


२५ जानेवारी १९३३ रोजी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वाई तालुका अस्पृश्यतानिवारण परिषद भरण्याचे ठरले होते. वाई तालुका अस्पृश्यतानिवारण संघाचे अध्यक्ष श्री. बाबुराव पाडळे व सेक्रेटरी श्री. सीताराम नलावडे होते. परिषदेसाठी पुण्याहून अण्णासाहेब शिंदे हे अकरा वाजता आले. त्यांचे आगमन होताच पुष्पहार घालून टाळ्यांच्या गजरात तेथे जमलेल्या मंडळींनी त्यांचे स्वागत केले. सभेत कोणते ठराव संमत करावयाचे याविषयी चर्चा केली.


कृष्णराव थिएटरमध्ये दुपारी तीन वाजता सभेला सुरुवात झाली. सेक्रेटरीने कार्याचा अहवाल वाचून दाखविला. वाईसारख्या कर्मठ नगरीतील काही सनातनी मंडळींना अस्पृश्यतानिवारणाचे चाललेले कार्य मंजूर नव्हते. श्री. महादेव नीळकंठ साठे वगैरे मंडळींनी विरोध करण्याचा बेत आखला होता. विठ्ठल रामजी शिंदे यांचे भाषण चालू झाल्यावर सभेत गोंधळाला सुरुवात झाली. सभा उधळण्याचा रंग दिसू लागला. अण्णासाहेब शिंदे यांनी समयसूचकपणे सर्व सभेला उभे राहण्याची आज्ञा केली. सर्व सभा उभी राहिली व अण्णासाहेब शिंदे यांनी धीरगंभीर आवाजात गायत्री मंत्र म्हणून प्रार्थना केली. त्याबरोबर सभेचे रुप पालटले. सर्व वातावरण शांत व गंभीर झाले. त्यानंर शिंदे यांनी सभेचे काम उत्तम रीतीने पार पाडले. गणपती आळीच्या देवळात हरिजनांसह प्रवेश केला. शिंदे आपल्या बरोबरीच्या मंडळींसह पुण्याला जाण्यासाठी सहा वाजता निघाले.


ह्या प्रसंगाचा आणि शिंदे यांच्या व्यक्तिमत्तवाचा प्रभाव पुंडलिक हैबती ठाकूर नावाच्या एका व्यक्तीवर विलक्षण पडला. हे मूळचे खानदेशातील रहिवासी होते. वाई येथील शेतकरी असोसिएशनमध्ये कारकून म्हणून काम करीत होते. रामराव बाबर यांचे ते स्नेही होते. सभेच्या दुस-या दिवशी ते रामराव बाबरांना भेटावयास गेले व विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबद्दल माहिती विचारु लागले. रामराव बाबर यांनी त्यांच्याजवळ पूर्वीच पुण्याच्या कोटुंबिक उपासना मंडळासंबंधी माहिती सांगितली होती. अण्णासाहेब शिंदे यांच्या सभेतील प्रार्थनेमुळे ते विलक्षण प्रभावित झाले होते. रामराव बाबर यांना ते म्हणाले की , तुम्ही म्हणत होता तशा प्रकारचे कौटुंबिक उपासना मंडळी येथेही काढण्याचा प्रयत्न करावा. मी तुम्हाबरोबर काम करण्यास तयार आहे. ठाकूर यांच्या ह्या सूचनेमुळे रामराव बाबर यांच्या तसेच त्यांच्या मातोश्रींच्या मनात असलेल्या विचाराला चालना मिळाली.


रामराव बाबर व पुंडलिक ठाकूर यांनी अनेकांच्या घरी जाऊन आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी आठ वाजता झोरे यांच्या माडीवर जमून सर्वांनी सांघिक प्रार्थना करावयाची आहे तरी आपण प्रार्थनेस यावे अशी विनंती केली. त्याप्रमाणे ४ जुलै १९३३ आषाढ शुद्ध एकादशीच्या दिवशी श्रीयुत नारायणराव चव्हाण, महादेवराव नलावडे, सखाराम पाटणे, रामचंद्र सिंदकर गुरुजी वगैरे तेराजण उपस्थित राहिले. सिंदकर गुरुजींनी तुकारामांचा एक अभंग गायिला व प्रार्थना केली. रा. ना. चव्हाण यांनी स्वामी विवेकानंदांचे चरित्र कथन केले.


प्रार्थनेनंतर पुण्याप्रमाणे कौटुंबिक उपासना मडळ स्थापन करावे या विषयावर चर्चा करण्यात आली. आपल्या घरची बायकामंडळी प्रार्थनेस येणे तूर्त शक्य वाटत नाही असे ब-याच जणांचे मत पडले. तरीही दर रविवारी चित्तशुद्धीसाठी आपण सर्वांनी एकत्र जमून प्रार्थना करावी. मडळास प्रार्थनासंघ असे नाव द्यावे असे ठरविले. अशी रीतीने त्या दिवशीच प्रार्थनासंघाची स्थापना झाली. पुढील उपासना रामराव बाबर यांच्या घरी व नंतर वाचनालयात झाल्या. सर्वानुमते नारायणराव चव्हाण यांना अध्यक्ष व रामराव बाबर यांना सेक्रेटरी म्हणून निवडण्यात आले. प्रतिज्ञापूर्वक सभासदांचे फॉर्म भरुन घेण्यात आले. सर्व सभासद आळीपाळीने उपासना चालवू लागले. हरिजन वस्तीजवळच्या मारुतीच्या देवळात उपासना होऊ लागल्या. आसपासची भाविक अस्पृश्य मंडळी देवळात उपस्थित राहू लागली. अस्पृश्य मंडळीचे देवळात येणे बाहेरील मंडळींना पसंत पडले नाही. म्हणून त्यापुढील उपासना नारायणराव चव्हाण यांच्या घरी नियमितपणे होऊ लागल्या.


वाईतील धर्मजिज्ञासू मंडळी अण्णासाहेब शिंदे यांच्याकडे अतीव आदराने पाहत असत. त्यांच्यापासून मार्गदर्शनाची अपेक्षा बाळगीत असत व अण्णासाहेब शिंदे हेही व्यावहारिक तपशिलाच्या अत्यंत बारीकसारीक बाबीपासून ते धार्मिक व नैतिक आचरण शुद्ध कसे राखता येईल अशा आध्यात्मिक बाबींपर्यंत त्यांना सूचना देत असत. मार्गदर्शन करीत असत. हे मार्गदर्शन करीत असताना वाईसारख्या ग्रामीण भागातील ह्या धार्मिक समाजाचे कार्य उत्तम प्रकारे चालावे ही कळकळ त्यांच्या मनात होती व तीन तपे त्यांनी प्रार्थनासमाज व ब्राह्मसमाज यांचे जे निरीक्षण केले होते; प्रत्यक्ष धर्मप्रचाराचे जे कार्य केले होते त्याचा अनुभव त्यांच्याजवळ होता. वाई ब्राह्मसमाजाचे सेक्रेटरी रामराव बाबर यांना त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शनपर जी पत्रे लिहिली त्यांमधून वाई ब्राह्मसमाजाबद्दल त्यांना असलेली कळकळ दिसून येते. सर्व बाबतीत वाईचा समाज हा नमुनेदार ठरावा. इतरत्र दिसणा-या उणिवा त्यामध्ये राहू नयेत याबद्दलची दक्षता त्यांच्या ह्या अनेकविध पत्रांतून प्रकट होताना दिसते.


रा. कृ. बाबर यांना ३ ऑगस्ट १९३३ रोजी लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, "मुंबईतील प्रार्थनासमाज व कलकत्त्यातील ब्राह्मसमाज ह्या दोन्ही समाजाची मूलतत्त्वे एकच आहेत; पण तत्त्वाप्रमाणे आचरण बंगाल्यात फार होते, तसे महाराष्ट्रात होत नाही. मूर्तिपूजा व्यवहारात कधीच न करणे व जातिभेद न पाळणे ह्या गोष्टी मुंबईकडे सांगण्यात येतात तितक्या आचरणात येत नाहीत. तुम्ही आपल्या समाजास ब्राह्मसमाज हे मोठे नाव दिले आणि लग्नकार्यात मूर्तिपूजा केली किंवा जातिभेद पाळला तर हसे होईल. तसेच प्रार्थनासमाज नाव ठेवूनही मताप्रमाणे आचरण केले नाही, तर जनाची नसली तरी मनाची लाज वाटेलच... नव्या समाजात एकाच जातीचे लोक असून चालणार नाही. सर्व जातींचे व सर्व दर्जाचे लोक असावेत. तसे झाले म्हणजे टीका होऊ लागते. समाजात आपसातही वाद माजतो. ह्या सर्वांस तोंड देण्याचे सामर्थ्य तुम्हांमध्ये येईल तेव्हाच तुम्ही टिकाल, नाही तर पोरखेळ होईल."


ह्या वाईकर मंडळींना सुलभ संगीताची पुस्तके पाठविण्याबद्दल अण्णासाहेब शिंदे यांनी द्वा.गो.वैद्य यांना सूचना केली व त्याप्रमाणे ही पुस्तके वाईला मिळाली. कलकत्ता ब्राह्मसमाजाशी जर पत्रव्यवहार करावा लागला तर इंग्रजीत करावा लागतो. मुंबई प्रार्थनासमाजाशी मात्र मराठीत पत्रव्यवहार करता येईल हे सांगून गिरगावचा पत्ता त्यांनी दिला. वाई येथील समाजाने प्रार्थनासमाज हे नाव धारण करावे ही ब्राह्मसमाज असा त्यांच्यापुढे प्रश्न होता. महत्त्व नावात नाही, आचरणात आणि दीर्घ प्रयत्नात आहे असे त्यांना सांगून 'मताप्रमाणे आचरण ठेवून आपल्या समाजास ब्राह्मसमाज हेच नाव द्यावे' अशी त्यांनी सूचना केली. ३ ऑगस्ट ३३ च्या प्रारंभीच्या पत्रामध्ये त्यांनी 'उपासना दर आठवड्यातून कितीदा, कोठे  केव्हा करितात; समाजाचे नियम काय केले आहेत; घरातील बायकामुले उपासनातून हजर राहतात काय, घरच्या राहणीत काय फरक झाला आहे वगैरे माहिती वेळोवेळी कळवाल तर आभारी होईन' असे लिहिले आहे. ह्या सा-यावरुन वाई येथील समाजाबद्दल त्यांना किती आस्था होती याची कल्पना येऊ शकेल.


१४ नोव्हेंबर १९३३ रोजी अण्णासाहेब शिंदे हे बी.बी.केसकर, गणपतराव शिंदे, भगिनी जनाबाई शिंदे यांच्यासमवेत रा. कृ. बाबर यांच्या घरी पोहोचले. राज राममोहन रॉय सांवत्सरिक पुण्यतिथीनिमित्त त्यांनी दौरा काढला होता व या दौ-यास वाईपासून सुरुवात करावी असे त्यांनी ठरविले. वाईत स्थापन झालेल्या प्रार्थनासंघाचे काम पाहावे. सभासदांच्या भेटी घ्याव्या व पुढील कार्याचे मार्गदर्शन करावे. असा मुख्य हेतू होता. रात्री मारुतीच्या देवळात प्रार्थनासंघाचे सभासद व इतर मंडळी जमली. तेथे अण्णासाहेबांनी उपासना केली. दुस-या दिवशी सायंकाळी गणपती घाटावर 'राममोहन रॉय व धर्मसुधारणा' या विषयावर जाहीर व्याख्यान दिले. १६ तारखेस दुपारी बाबरांच्या घरी प्रार्थनासंघाची बैठक झाली. तीमध्ये त्यांनी प्रार्थनासंघाच्या सभासदांचे अभिनंदन केले व संघाने कशी वाटचाल करावी; कोणती सामाजिक कामे हाती घ्यावी मार्गदर्शन केले. पाच सभासदांनी प्रतिज्ञापूर्वक नावे द्यावीत असे त्यांनी सांगितले. त्या वेळी रामराव बाबर, पुंडलिक ठाकूर, गणपतराव हगीर व अण्णा खामकर या चार व्यक्ती प्रतिज्ञापूर्वक सभासद झाल्या. ब्राह्मसमाज हे नाव धारण करण्याची घाई न करता संघाने किमान पाच आनुष्ठानिक (मताप्रमाणे धर्माचरण व वर्तन करणारे) मिळवावे व काही वर्षे सातत्याने धार्मिक उपक्रम चालू ठेवल्यावरच ब्राह्मसमाज हे नाव धारण करावे अशी त्यांची सूचना होती. अण्णासाहेबांच्या ह्या भेटीमुळे वाई प्रार्थनासंघामध्ये चैतन्य संचारले.


अण्णासाहेबांचा वाई प्रार्थनासंघाबद्दलचा ओढा दिवसेंदिवस वाढत होता. नैमित्तिक भेटीने व चार-दोन दिवसांच्या वास्तव्याने धर्माचे काम होणार नाही तर काही दिवस वाईतच राहून धर्मकार्य करावे अशी त्यांच्या ठिकाणी प्रबळ इच्छा निर्माण झाली. आपल्यासाठी तेथे स्वतंत्र घर पाहावे असे त्यांनी वाईकर मंडळींना कळविले व त्याप्रमाणे सोय होताच १९३४ साली सर्व कुटुंबीयांसमवेत येऊन चार महिने राहिले. या काळात ते साप्ताहिक उपासना करीत. दर मंगळवारी संगतसभा भरत असे. तीमध्ये धर्मतत्त्वे, धर्माचे अनुष्ठान इत्यादी गोष्टीचे ते विवरण करीत. त्याचप्रमाणे उत्सव म्हणजे काय; तो कसा साजरा करावा; त्यात कोणत्या प्रधान गोष्टी असाव्यात हे सांगत तर कधी स्त्रियांबद्दल आदर, अंधश्रद्धा, जातिभेद, बंधुभाव इत्यादी विषयांचा ऊहापोह करीत. अनेकविध विषयांची माहिती सांगत व सभासदांच्या शंकांचे निरसन करीत. अण्णासाहेबांनी सुरु केलेल्या ह्या संगतसभेमुळे प्रार्थनासंघाच्या रभासदांचे विचार विशाल झाले. कामाला गती मिळाली. अण्णासाहेबांच्या विचारामुळे प्रार्थनासंघाच्या रोपट्यात संजीवनी मिळाल्यासारखे होऊन ते मूळ धरु लागले. त्यांना भेटण्यासाठी व चर्चा करण्यासाठी केवळ प्रार्थनासंघाचीच मंडळी येत असत असे नव्हे, तर इतर मडळीही येत. अण्णासाहेबांच्या वास्तव्याने वाईत धर्मविषयक कार्यामध्ये आस्था निर्माण झाली.


अण्णासाहेब शिंदे यांनी ब्राह्मसमाजाचे सगळे उपक्रम वाई येथील मडळीनी सुरु करावेत, त्यांचा अनुभव घ्यावा असा हेतू मनात ठेवला होता. वनोपासना हा एक अण्णासाहेबांना आवडणारा उपक्रम. ब्राह्मसमाजातील अनेक कुटुंबाचे जणू काय एक मोठे कुटुंब आहे अशा कौटुंबिक प्रेमाचा अनुभव वनोपासनेच्या निमित्ताने येतो. कुटुंबाकुटुंबामध्ये प्रेम वृद्धिंगत होते असा त्यांचा अनुभव होता. वनोपासनेचा उपक्रम वाईतही करावयाचा असे त्यांनी ठरविले. ६ जून १९३४ ही तारीख व वाईपासून दोन मैल दूर असलेल्या सुलतानपूर जवळचे कोठावळे बाग हे ठिकाण निश्चित केले. शिंदे यांच्या निवासस्थानी आठ-दहा कुटुंबांतील स्त्रिया, पुरुष, मुले असा मोठा समुदाय दुपारी चार वाजता उपस्थित झाला. रात्रीच्या भोजनाचे डबे त्यांनी बरोबर आणले होते व वाईच्या रस्त्यातून भजन करीत ही दिंडी कोठावळे बागेकडे निघाली. ह्या वनोपासनेचा विशेष असा होता की, त्या रात्री बागेतच मुक्काम करण्याचे योजिले होते व ही मंडळी दुस-या दिवशी तेथे राहून संध्याकाळी परतणार होती. वनपासनेत कसे वागावयाचे हा नमुना शिंदे ह्यांना ह्या मंडळींसमोर ठेवावयाचा होता.


भजन करीत रस्त्यावरुन दिंडी नेणे हा खास देश उपक्रम अण्णासाहेब शिंदे यांनीच सुरु केला. अशा प्रकारची दिंडी त्यांनी १९३० च्या कायदेभंगाच्या चळवळीत सुरु केली होती.

बागेत पोहोचल्यावर वावरण्याची जागा प्रथमत: स्वच्छ केली. ठिकाण रम्य व ऐतिहासिक महत्त्वाचे होते. जवळ वाहणारा शुद्ध पाण्याचा झरा. महाभारताचा संदर्भ देणारी कीचक टेकडी व खालच्या बाजूस बुद्ध भिक्षूंनी निवास केलेला पालकेश्वर डोंगर होता. उतरलेल्या भागात नारळाची, फणसाची आणि आंब्याची विपुल झाडे होती. सायंकाळच्या वेळेत अण्णासाहेब शिंदे यांनी उपासना चालवली व देवेद्रनाथांनी शांतिनिकेतनाची स्थापना कशी केली ह्याची माहिती दिली. त्यानंतर सर्वांनी आणलेले भोजनाचे साहित्य एकत्र करुन जातीपातीचा विचार न करता वर्तुळाकार पंक्तीत स्त्री-पुरुषांनी एकत्र बसून भोजन केले. बागेच्या चौफेर गॅसच्या बत्त्या झाडावर लटकत होत्या. सर्वांनी भजन केले. स्त्रियांनी भक्तिपर गाणी गायिली व नंतर सगळी मंडळी झोपी गेली. अण्णासाहेब शिंदे मात्र हातात काठी घेऊन रात्री दोन वाजेपर्यंत इतर सोबत्यांसोबत पहारा करीत होते.


दुस-या दिवशी सकाळी अण्णासाहेबांनी ईश्वरोपासना केली. जवळच्या लोहरे गावची स्त्री-पुरुष मंडळी ह्या उपासनेसाठी आली होती. अण्णासाहेबांनी उपासनेत आपलेपणा व अहंकार सोडा; त्याशिवाय खरी शांतता मिळणार नाही व चित्तशुद्धी होणार नाही असे सांगून खरा देव दुसरीकडे कोठे नसून आपल्या हृदयातच आहे; एकमेकांना साहाय्य करणे, प्रेमभाव वाढविणे, सत्याने वागणे इत्यादी चांगल्या गोष्टींतच खरा धर्म आहे असे सांगितले. सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेत सुमारे दीड तास अण्णासाहेबांनी चटकदार उदाहरणे देत ही उपासना चालविली.


दुपारच्या जेवणासाठी स्वयंपाक तेथेच केला. निसर्गाच्या सान्निध्याचा आनंद मंडळी लुटीत होती. काही पालक मुलांना वेली, फुले व झाडे यांबद्दल माहिती देत होते. मुख्य म्हणजे  स्त्रियांना ह्या मोकळ्या व अभिनव वातावरणाचा अनुभव मिळाला. सायंकाळी पाच वाजता मोठ्या आनंदाने सगळ्या मंडळींची दिंडी तेथून निघाली. वाईत चौकात आल्यानंतर अण्णासाहेबांना आदरपूर्वक नमस्कार करुन सर्वजण आपापल्या घरी गेले.


पुढील वर्षी म्हणजे १९३५ च्या मे महिन्यात विठ्ठल रामजी शिंदे हे भगिनी जनाक्का, यज्ञेश्वरपंत भांडारकर यांच्यासमवेत वाईस आले. बुद्धपौर्णिमेच्या दिवशी त्यांनी गणपती घाटावर बुद्धचरित्रावर व्याख्यान दिले. या मुक्कामात त्यांनी सभासदांच्या घरी भेटी दिल्या. संगतसभा घेतल्या. सभासदांच्या घरी कौटुंबिक उपासना घेतल्या. महिलांच्या सभा व भजने झाली. वाईकर मंडळींचा धर्माच्या बाबतीत उत्तम प्रतिसाद पाहून महर्षी शिंदे यांचा उत्साहही वाढत होता. प्रार्थनासंघाचे काम वाढत होते. त्यामुळे स्वतंत्र इमारतीची निकड वाटत होती. एखादा जुना प्रशस्त वाडा प्रार्थनासंघासाठी मिळवावा असे स्थानिक मंडळींना तसेच अण्णासाहेब शिंदे व यज्ञेश्वरपंत भांडारकर यांनाही वाटू लागले. यज्ञेश्वर भांडारकरांनी या बाबतीत पुढाकार घेतला व वाई येथील बाबुराव पंडित यांचा वाडा पसंत केला.


वाई येथे प्रार्थनासंघाची स्थापना झाल्यानंतर अन्य ठिकाणच्या प्रार्थनासमाजाप्रमाणे वाई येथेही नित्य स्वरुपाचे वार्षिक उत्सवासारखे उपक्रम व नैमित्तिक स्वरुपाची व्याख्याने वगैरे अन्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले. प्रार्थनासमाजाच्या कार्यक्रमाला अण्णासाहेब शिंदे यांना आपल्या मनासारखे रुप देता आले. त्यांच्या धर्मप्रचाराच्या कल्पनेमध्ये ग्रामीण भागात ह्या धर्मविचाराचा व धर्मविषयक श्रद्धेचा प्रसार व्हावा; अस्पृश्यवस्तीतही हे धर्मप्रचाराचे कार्य करावे; स्त्रियांना ह्या धर्मप्रचाराच्या कार्यामध्ये सक्रियपणे सहभागी करुन घ्यावे ह्या प्रमुख बाबी होत्या. शहरामधून धर्मपर भजने गात दिंडी काढावी असेही त्यांना वाटत होते. आपल्या समाजातील पारंपारिक स्वरुपाच्या कीर्तन ह्या प्रकाराचा उपयोग ब्राह्मधर्म प्रसारकार्यासाठी करुन घ्यावा असेही त्यांना वाटत होते. ह्या गोष्टी त्यांच्या प्रेरणेने वाई प्रार्थनासंघांच्या कार्यामध्ये अमलात आलेल्या दिसतात. अण्णासाहेब शिंदे यांच्यामुळेच सातारचे रा. ब. काळे, मुंबईचे यज्ञेश्वरपंत भांडारकर, द्वा.गो. वैद्य, बी. बी. केसकर, डॉ. खांडवाला; पुण्याचे बा.ग.जगताप, र.वि. बापट, वि. के. जोग, ल. म. सत्तूर ही निष्ठावंत मंडळी वार्षिक उत्सवामध्ये भाग घेण्यासाठी मुद्दाम हजर राहत असत. वार्षिकोत्सवात आणि अन्य प्रसंगी बाहेरगावाहून आलेली थोर मंडळी तसेच स्वत: विठ्ठल रामजी शिंदे यांची व्याख्याने आयोजित केली जात असत.


१ नोव्हेंबर ते ४ नोव्हेंबर १९३४ ह्या दिवशी प्रार्थनासंघाचा पहिला उत्सव साजरा झाला. पहिल्या दिवशी अण्णासाहेब शिंदे यांनी टिळक स्मारक मंदिरात 'लोकस्वातंत्र्य आणि सनातन धर्म' ह्या विषयावर भाषण दिले. सध्या सनातन ह्या नावाने रुढ असलेल्या धर्म लोकांस स्वातंत्र्य कसे उपभोगू देत नाही, ते त्यांनी विशद केले. २ नोव्हेंबर रोजी सकाळी गंगापुरीच्या महारवाड्यात पुणे प्रार्थनासमाजाचे सेक्रेटरी र. वि. बापट यांनी उपासना चालविली. तर त्याच दिवशी सायंकाळी अण्णासाहेब शिंदे यांनी टिळक स्मारक मंदिरात हरिकीर्तन केले. 'अवलाईची नवलाई' हे आख्यान त्यांनी लावले व स्त्रीच्या ठिकाणी असणा-या नैतिक गुणांची थोरवी उत्तम रीतीने विशद केली. तारीख ३ या प्रमुख दिवशी सकाळी ६ वाजता नगरसंकीर्तन निघाले. सुमारे १५० स्त्री-पुरुषांनी त्यामध्ये भाग घेतला. बाबुराव जगताप यांनी उपासना चालविली. दुपारी ३वाजता सौ. बापट यांच्या अध्यक्षतेखाली स्त्रियांसाठी सभा झाली. या सभेलाही सुमारे २०० स्त्रिया उपस्थित होत्या.


सायंकाळी श्री. बाबुराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली 'सर्वधर्मसमन्वय' या विषयावर व्याख्याने झाली. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, सय्यद अब्दुल कादर, यज्ञेश्वर भांडारकर, गणपतराव शिंदे, गोडसे, दिवेकर ह्या विद्वानांनी ह्या विषयावर भाषणे दिली. सर्व धर्म एकाच तत्त्वावर अधिष्ठित असून सगळ्याच धर्मांत चांगली तत्त्वे आहेत; त्यांचे ग्रहण करणे उपयुक्त ठरणारे आहे, असा एकंदर व्याखअयात्यांच्या प्रतिपादनाचा रोख होता. सभेस हिंदू, मुसलमान, खिश्चन अशी विविध धर्मीय मंडळीची गर्दी होती. तारीख ४ रोजी सायंकाळी सहा वाजता गुजर आळीच्या महारवाड्यात यज्ञेश्वर भांडारकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. अण्णासाहेब शिंदे यांच्या समारोपाने ह्या वार्षिक उत्सवाची समाप्ती झाली.


सामान्यतः प्रार्थनासंघाच्या वार्षिक उत्सवाचे स्वरुप या प्रकारचे राहिले. १९३५ च्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दुसरा वार्षिकोत्सव साजरा झाला. ह्या वर्षीच्या उत्सवात स्वतः अण्णासाहेब शिंदे उपस्थित राहू शकले नाहीत तरी उत्सवाचे संयोजन करण्याच्या कामी त्यांनी मार्गदर्शन केले. मुंबई-पुण्याकडील श्री. न. र. फाटक, वसंतराव नाईक ही मंडळी व्याख्यान देण्याच्या व उत्सवात सहभागी होण्याच्या हेतूने आली होती. स्थानिक विद्वानांपैकी लक्ष्मणशास्त्री जोशी हे नेहमी भाग घेत असत.


नोव्हेंबर १९३६च्या तिस-या आठवड्यात वाई प्रार्थनासंघाचा तिसरा वार्षिक उत्सव साजरा झाला. उपासना, व्याख्याने हे नित्य स्वरुपाचे कार्यक्रम तर या उत्सवत झालेच, याशिवाय श्री. ल. म. सत्तूर यांनी केंजळ या गावी जाऊन रात्री ९ वाजता तेथे सभा घेतली व दोनशे लोकसमुदायासमोर प्रार्थनासमाजाविषयी माहिती दिली. दुस-या दिवशी म्हणजे २१ नोव्हेंबर १९३६ रोजी ल. म. सत्तूर यांनी महारवाड्यात उपासना चालविली. विविध धर्मांचे ऐक्य श्रोत्यांच्या मनावर ठसविणे हा प्रार्थनासमाजाच्या तत्त्वप्रतिपादनाचा भाग वाईच्या वार्षिक उत्सवात विशेषत्वाने ठसविण्यात येत असे. उत्सवाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी संतचरित्रकथन या विषयावर अण्णासाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. तीमध्ये संत मीराबाई, महंमद पैगंबर. येशू ख्रिस्त, सेंट पॉल यांच्याविषयी अनुक्रमे बी. बी. केसकर, ल. म. सत्तूर,रेव्हरंड प्रामाणिकराव गायकवाड, डॉ. खांडवाला यांची भाषणे झाली.


उत्सव काळात काही मंडळींनी आठ सभासंदांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची आस्थेवाईकपणे व प्रेमपूर्वक विचारपूस केली. या कुटुंबावर मृत्यूसारख्या आपत्तीचे आघात झाले होते. सभासदांमध्ये प्रेमभाव वृद्धिगंत करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम उपयुक्त ठरणारा असा असतो.


अशा प्रकारे तीन वर्षांच्या विविध उपक्रमांमुळे व वार्षिकोत्सवामुळे ब्राह्मधर्माचे स्वरुप काय, ह्या धर्माची उन्नत तत्त्वे कोणती व ती प्रत्यक्षात कशी आचरिता येतात, याची कल्पना वाई प्रार्थनासंघाच्या सभासदांना व आस्थेवाईक मंडळींना चांगली आली. वाई प्रांतामध्ये धर्मविषयक जागृती होण्याचे काम चांगल्या प्रकारे सुरु झाले होते. अण्णासाहेब शिंदे यांच्या हेतूप्रमाणे पाच आनुष्ठानिक तयार झाले होते. वाई ब्राह्मसमाज हे नाव धारण करण्यास वाई प्रार्थनासंघ आता पात्र झालेला होता.


१९३७च्या मेच्या अखेरच्या आठवड्यात वाई ब्राह्मसमाजाच्या दृष्टीने महत्त्वाच्या घटना घडल्या. ब्राह्मसमाजाच्या मालकीची इमारत असावी या दृष्टीने अण्णासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानक मंडळींनी जे प्रयत्न केले ते फलद्रूप झाले. २४ मे ते २७ मे १९३७ हे वाई ब्राह्मसमाजाचे वार्षिक उत्सवाचे दिवस ठरले होते. २४ मे रोजी बाबुराव पंडितांच्या वाड्याचे खरेदीखत तिघा ट्रस्टींच्या नावाने करण्यात आले. विठ्ठल रामजी शिंदे हे एक ट्रस्टी होते. त्यांच्याशिवाय यज्ञेश्वर वासुदेव भांडारकर व नारायणराव कृष्णाजी चव्हाण हे अन्य दोघे ट्रस्टी होते. समाजाच्या इमारतीचे रीतसर उद्घाटन अण्णासाहेब शिंदे यांच्या हस्ते दुस-या दिवशी करावयाचे ठरले.


मंगळवार तारीख २५ मे रोजी सकाळी ६ वाजता नगरसंकीर्तनाची मिरवणूक निघाली. तीमध्ये स्थानिक भजनी मंडळे सामील झाली. वसतिगृहातील विद्यार्थी हातात पताका घेऊन रांगेत पुढे निघाले. भजनी मंडळीचा ताफा टाळमृदुंगासह रांगेत चालू लागला. प्रार्थनासमाजाची भक्तिगीते म्हणत पाठीमागून महिला चालल्या. मध्यभागी विठ्ठल रामजी शिंदे चालले होते. त्यांच्या पाठीमागे पाहुणे मंडळी, सभासद व ग्रामस्थ यांचा जमाव उभा होता. अशा त-हेचा नगरसंकीर्तनाचा रम्य देखावा वाईच्या रस्त्यावर दिसू लागला. रस्त्याच्या चौकात मिरवणूक थांबत असे त्यावेळी श्री. बा. ग. जगताप हे अभंगाचा अर्थ सोप्या शब्दांत समजावून सांगत असत. ग्रामस्थ मंडळी चौकाचौकात तसेच प्रमुख ठिकाणी दिंडी आल्यानंतर अण्णासाहेबांच्या गळ्यामध्ये हार घालून त्यांना आदरपूर्वक वंदन करीत असत. शहराच्या प्रमुख रस्त्यावर फिरुन दिंडी ब्राह्मसमाजाच्या मंदिरासमोर आली. भगिनी जनाक्का शिंदे यांनी 'मन एक बार हरि बोल' हे बंगाली पद्य मंजूळ आवाजात म्हटले. अशा त-हेने नगरसंकीर्तनाच्या सोहळ्याची समाप्ती झाली.


वाई ब्राह्मसमाज मंदिरप्रवेशाचा समारंभ सायंकाळी ५ वाजता अण्णासाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सुरु झाला. प्रारंभीच्या सभेत ब्राह्मसमाजाचे सेक्रेटरी रा. कृ. बाबर यांनी इमारत फंडाचा अहवाल वाचून दाखविला. सभेनंतर अण्णासाहेब शिंदे यांच्यासमवेत सर्वांनी मंदिरात प्रवेश केला. 'प. वा. वासुदेव बाबाजी नवरंगे उपासनामंदिर' ह्या शिलालेखाच्या पाटीने उद्घाटन अण्णासाहेबांनी करुन प्रार्थना सभागृहाला हे नाव दिल्याचे जाहीर केले. हा दिवस वैशाख शुद्ध पौर्णिमेचा, भगवान बुद्धांच्या जयंतीचा दिवस होता. मंदिरप्रवेशाच्या समारंभाच्या वेळी अण्णासाहेब शिंदे यांनी स्फूर्तिप्रद भाषण केले.


प्रारंभी त्यांनी मराठी कुणब्याच्या बाणेदारपणाचे व स्वतंत्र वृत्तीचे वर्णन करुन तो आपल्या घरगुती व्यवहारात आणि धर्मात भूपतीला किंवा वर्णगुरुला ओळखीत नसे असे सांगून ते म्हणाले. "महाराष्ट्रात ३०० वर्षांपूर्वी जो भागवत धर्माचा प्रसार झाला त्याचे श्रेय अठऱापगड जातींतील संतांनी उचलले आहे आणि याची ग्वाही महिपती स्वामींनी आपल्या भक्तिविजय ग्रंथात पुरेपुर दिली आहे. गेल्या शतकाच्या शेवटी उत्तरार्धात महाराष्ट्रात धर्मसुधारणेची जी लाट उसळली, तीतही जनतेने आपला प्रतिनीधी उभा केलाच. रानडे, भांडारकर, मोडक आणि चंदावरकर या विद्वानांप्रमाणेच किंबहुना त्यांच्या आधी स्वतंत्रपणाने धर्मस्वातंत्र्याचा दिवा महात्मा जोतीराव फुले यांनी लावला आणि आपले नाव व आडनाव सार्थ केले. त्या जोतीबा फुल्यांच्या शिकविण्याचा ठसा प्रस्तुत प्रार्थनासंघात स्पष्ट आहे. तेली, माळी, मराठा, कुणबी, महार, ढोर या सर्व बहुजनांतील पुढारी समाजाने या संघाची तळी आज उचलली आहे. आजच दोन तासांपूर्वी ढोर गृहस्थाचे घरी कौटुंबिक उपासना होऊन त्या समस्त घराण्याने ब्राह्मधर्माची दीक्षा घेतली. हाच जोतीबाचा जयजयकार होय.


"या संघाच्या चालू इतिहासामध्ये तीन टप्पे पडतात.ते असे : (१) वर सांगितल्याप्रमाणे सत्यशोधक समाजाच्या शिकवणुकीने सातारा जिल्ह्यातील खडकाळ जमीन नांगरली गेली; रुढीचे तण उपटले; भेदाचे खडक फोडले; नवीन पिकाची तयारी झाली. (२) अशा वेळी रिपोर्टात सांगितल्याप्रमाणे पुण्याकडील उपासनामंडळाने बी पेरले आणि त्याचे अंकुर फुटल्यानंतर (३) मुंबई ते पुणे प्रार्थनासमाजाचे पुढा-यांनी योग्य वेळी पाणि शिंपले. या तीन टप्प्यांचे महत्त्व सारखे आहे आणि ज्यात आम्ही आज प्रवेश करीत आहोत ते मंदिर या तीन टप्प्यांचे गोड फळ आहे. आपण इथे जमलेले वाईचे रहिवासी आणि बाहेर गावचे पाहुणे या सर्वांचा या सर्वांवर आशीर्वाद असावा.


"हे मंदिर केवळ वाई शहरापुरते नाही. संबंध तालुक्यातील खेड्यापाड्यांतून ब्राह्मधर्माचा संदेश गाजवावा हा हेतू प्रथमपासूनच आहे. या तालुक्यातील पंचक्रोशीचे हे केंद्र आहे. एका पिढीपूर्वी सातारा शहरामध्ये एक प्रार्थनासमाज कार्य करीत होता. माझे मित्र प. वा. सीतारामपंत जव्हेरी व प. वा. रा. ब. काळे यांची आठवण आज केल्याशिवाय राहवत नाही. त्यांच्याप्रमाणे त्यांनी काढलेला समाजही आज स्मृतिवश झालेला आहे. जिल्ह्याचे ठाणे हे आधुनिक संस्कृतीची पहिली पायरी. तेथून आधुनिक सुधारणेची इमारत वर सुरु होते. तालुक्याचे ठिकाण ही बहुजन समाजाच्या रहाटीची शेवटची पायरी होय. येथून खाली जनतेची रहाटी खेड्यापर्यंत पोहोचते. आमची महत्त्वाकांक्षा तूर्त तालुक्यापुरतीच आहे. या आमच्या कार्यावर आपला आशीर्वाद असावा.


"केंजळ खेड्यापासून मुंबई शहरापर्यंत, बेळगाव-कोल्हापूरपासून इंदूर, अहमदाबाद, बडोदा शहरापर्यंत बृहन्महाराष्ट्राची सहानुभूती आम्हांस मिळाली आहे. उच्च-नीच सर्व जातींनी आम्हांशी सहकार्य केले आहे. नाव ठेवण्यास कोठेच जागा नाही. हे मंदिर झाले नव्हते, तेव्हा टिळक मंदिरात भजन-व्याख्याने झाली. प्राज्ञपाठशाळेच्या पवित्र जागेत सहभोजने झाली. अस्पृश्यतानिवारण परिषदेच्या वेळी मंदिर प्रवेश झाला. मांगवाड्यात मुख्य कार्यक्रम झाले नाहीत असा आमचा एकही उत्सव झाला नाही. मग आम्हाला काय उणे पडले? आज आपल्या येण्याने तर कळसच झाला आहे."


आपल्या या भाषणात अण्णासाहेब शिंदे यांनी महाराष्ट्रातील धर्मसुधारणेचा थोडक्यात पण मार्मिकपणे आलेख काढून वाई ब्राह्मसमाजाचे महत्त्व निदर्शनास आणून दिले. ग्रामीण भाग हेच उन्नत धर्मप्रचाराचे अथवा धर्मसुधारणेचे आपले कार्यक्षेत्र आहे, याचाही त्यानी निर्देश केला. त्यांनी ह्या ब्राह्मसमाजास मिळालेल्या सहकार्याचा उल्लेख केला त्याचप्रमाणे टिळक मंदिर, प्राज्ञपाठशाळा ह्या स्थानिक संस्थांनी उदारमनस्कपणे केलेल्या सहकार्याचा उल्लेख केला. उन्नत धर्मप्रचार आणि अस्पृश्यतानिवारणासारखे कार्य हे एकरुप आहे त्यांनी प्राज्ञपाठशाळेत सहभोजने व मांगवाड्यात उपासनेसारखे मुख्य कार्यक्रम घडले व घडतात, याचा निर्देश करुन ही जाणीव प्रकट केली. भाषणाच्या अखेरीस वाई ब्राह्मसमाजाच्या उभारणीस साह्म करणा-या बाहेरच्या प्रदेशातील मंडळींचा आभारपूर्वक उल्लेख केला व स्थानिक निष्ठावंत मंडळींचा उल्लेख करुन त्यांचे यथायोग्य कौतुक केले व भक्तिभावनेने प्रभावित झालेल्या वातावरणात मंदिरामध्ये प्रवेश करु या असे अण्णासाहेब शिंदे यांनी सर्वांना आवाहन केले.


अण्णासाहेबांच्या इच्छेप्रमाणे ब्राह्मधर्माचे किमान पाच आनुष्ठानिक तेथे निर्माण झाले होते. ब्राह्मसमाजाच्या उन्नत शिकवणुकीची माहिती वाई प्रांतातील मंडळींना झाली व ब्राह्मसमाजाबद्दलची निष्ठा अनेक मंडळींच्या मनात निर्माण झाली. अस्पृश्यतानिवारणाचे कार्य हे धर्मकार्य म्हणून येथे अवलंबिता व चालविता आले याचेही समाधान अण्णासाहेबांना वाटत होते. वाईसारख्या कर्मठ मानल्या गेलेल्या शहराचे हृदयकपाट उघडले जात आहे, याचा आल्हाददायक अनुभव अण्णासाहेब शिंदे यांना येत होता. एकंदरीत वाई येथील प्रार्थनासमाजाची स्थापना ही त्यांच्या मनाला समाधान देणारी घटना होती.


वाई येथे ब्राहमसमाज स्थापन करण्यासाठी अण्णासाहेब शिंदे यांनाजो उत्साह वाटत होता त्याचे महत्त्वाचे एक कारण म्हणजे वाईच्या आसपास असलेल्या खेडेगावांमध्ये धर्मप्रचाराचे कार्य करत येईल ही बळकट आशा. वाईस जेव्हा जाण्याचा प्रसंग येई त्या प्रत्येक वेळी ते ब्राह्मसमाजाचे चिटणीस रा. कृ. बाबर यांना आवर्जून कळवत असत की आपल्या दौ-यात आजूबाजूच्या खेडेगावांत जाण्याचाही कार्यक्रम निश्चित करावा. अशा प्रकारचा दौरा आखल्यानंतर तेते ते ठराविक प्रकारे कार्यक्रमाची योजना करीत असत.


दौ-याच्या गावी रात्री जाहीर सभा, दुस-या दिवशी सकाळी उपासना, दुपारच्या जेवणानंतर गावक-यांची बैठक आणि हरिजनवस्तीत भेट आणि सांयकाळी पुढील गावास प्रयाण. अण्णासाहेबांच्या बरोबर अशा दौ-यात त्यांच्या भगिनी जनाबाई, बाबर कुटुंबीय, नारायणराव चव्हाणांचे कुटुंब, मुंबईहून आलेले भांडारकर व वैद्य ही मंडळी सामान्यतः असत.


१९३६ च्या मेमध्ये त्यांनी पहिली दौरा केंजळ या गावापासून सुरु केला. त्यानंतर गुळुंब, ओझडें या गावी ही सगळी मंडळी गेली. गुळुंब येथील सभेत अण्णासाहेबांनी ब्राह्मधर्माची तत्त्वे सोप्या भाषेत सांगितली. मुलामुलींना शिक्षण दिले पाहिजे; अंधश्रद्धा नाहीशी केली पाहिजे अशा प्रकारचे प्रतिपादन केले. ओझर्डे गावच्या सभेचे अध्यक्ष बाबासाहेब आखाडकर, शिंदे हे होते ते जिल्हा बोर्डाचेही अध्यक्ष होते. अण्णासाहेबांनी धर्मविषयक विचार मांडले. अध्यक्षांना उद्देशून ते म्हणाले, लोकशाहीमध्ये पुढा-यांनी जनतेची चांगली कामे केली पाहिजेत; त्यांची दुःखे समजावून घेतली पाहिजेत; त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी मदत केली पाहिजे. दुस-या दिवशी तेथील शाळेत उपासना झाली. त्यानंतर सर्वांनी हरिजनवस्तीत भेट दिली.


पुढील वर्षी म्हणजे १९३७ साली ७ मे ते १२ मे असा दौरा आखण्यात आला. नेहमीच्या मंडळीशिवाय कलकत्त्याचे हृदयचंद्र दास, सातारहून भाऊराव पाटील, इस्लामपूरहून कृ. भा. बाबर, केंजळचे मुल्लामास्तर, डॉ. टी.सी. खांडवाला इत्यादी मंडळींनी ह्या तीन दिवसांच्या दौ-यात भाग घतला. पहिल्या दिवशी सुरुर या गावचा दौरा केला. तेथील ग्रामस्थांचा निरोप घेऊन पायी प्रवास करीत कवठे या गावी सर्व मंडळी आली. श्री. किसनवीर हे या गावचे प्रमुख कार्यकर्ते. अण्णासाहेब शिंदे यांचे व इतरांचे त्यांनी मनःपूर्वक स्वागत केले. रात्रीच्या भाषणामध्ये अण्णासाहेबांनी अस्पृश्यतानिवारण चळवळीच्या कार्याची माहिती सांगितली. दुस-या दिवशी भुइंज येथील दौ-यात श्री. कृ. भा. बाबर यांनी सामाजिक सुधारणा या विषयावर उद्बोधक भाषण केले. समाजातील अंधश्रद्धा नष्ट करावी; लग्नकार्यात गौरवाजवी खर्च करु नये असा अत्यंत उपयुक्त उपदेश गावक-यांना केला. दुस-या दिवशी उपासनादी कार्यक्रम झाल्यानंतर अस्पृश्यांच्या वस्तीत भेट दिली. तेथे अण्णासाहेबांनी आपल्या मुलामुलींना शिक्षण द्या; राहणी सुधारा; आपल्या पायावर उभे राहा; लाचारी पत्करु नका असा उपदेश केला.


त्यानंतर पसरणी या गावी दौरा व पसरणी येथील सर्व कार्यक्रम पार पाडल्यानंतर दुस-या दिवशी धोम या गावी प्रयाण केले. महर्षी शिंदे व कर्मवीर भाऊराव पाटील हे आपल्या गावी येणार आहेत अशी दवंडी स्थानिक कार्यकर्यांनी दिल्यामुळे या दोघांना पाहण्याची, त्यांचे भाषण ऐकण्याची ग्रामस्थांना उत्सुकता लागून राहिली होती. सभेचे ठिकाण गॅसच्या बत्त्यांनी उजळून निघाले होते. अण्णासाहेब शिंदे व भाऊराव पाटील सभास्थानी येताच लोकांनी टाळ्याच्या कडकडाटांनी त्यांचे स्वागत केले. प्रास्ताविक भाषणात श्री. पोळ यांनी असे सांगितले की, "धोम हे ऋषीचे गाव आणि अर्वाचीन काळातील हे दोन ऋषीच येथे अवतरले आहेत. ऐहिक सुखाकडे पाठ फिरवून लोकांच्या उ्न्नतीसाठी अविरत श्रम करणारे आजच्या काळातील हे दोन महान ऋषी होत." या शब्दांत त्यांचा गौरव केला.


भाऊराव पाटील आपल्या भाषणात म्हणाले,"मी पूर्वी सत्यशोधक चळवळीत होतो. विचारांती मला वाटले, कोणाची निंदा करुन किवा द्वेष करुन आपली प्रगती होणार नाही. बहुजन समाजाची सर्वांगीण सुधारणा व्हावी असे वाटत असेल तर प्रथम सर्वांनी शिक्षण घेतले पाहिजे. आर्थिक परिस्थितीने बहुजन समाजातील गरीब व होतकरु मुले शिक्षणापासून वंचित झाली आहेत; त्यांना शिक्षण मिळाले पाहिजे या हेतूने रयत शिक्षण संस्था सुरु केली व त्याद्वारे स्वावलंबी शिक्षणाची सोय केली. हा वटवृक्ष लावला. त्या सावलीखाली खेडेगावातील मुलांना शिक्षण मिळू लागले. शिक्षणासाठी माझे दार उघडे आहे. आपल्या गावात ज्या मुलांना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही अशा मुलांच्या पालकांनी माझ्याकडे मुले आणून द्यावीत. मी आपल्या बोर्डिंगमध्ये त्यांच्या शिक्षणाची सोय करीन."


अध्यक्षीय भाषणात अण्णासाहेब शिंदें म्हणाले,"आपण सर्वजण देवाची लेकरे आहोत. आपल्यामध्ये बंधुभाव दिसला पाहिजे. स्पृश्य-अस्पृश्य हा भेद प्रथम दूर झाला पाहिजे. आज जिकडे तिकडे जातीच्या उत्कर्षाचे प्रकार चालू आहेत. त्यास आळा घातला पाहिजे. मानव एक आहे अशी वृत्ती मनात निर्माण झाला पाहिजे. हा श्रेष्ठ, हा कनिष्ठ असा भेद नाहीसा झाला पाहिजे. स्त्रियांना शिक्षण देऊन आपल्याबरोबर वागण्याची संधी दिली पाहिजे. महात्मा फुले यांनी आपल्या पाण्याचा हौद सर्वांसाठी प्रथम मोकळा केला. धर्मपत्नी सावित्रीबाईंना शिक्षिका करुन स्त्रियांच्या शिक्षणासाठी शाळा काढली. त्यांनी निंदा-अपमान सोसून धैर्याने, कृतीने समाजाची सुधारणा घडवून आणली. नुसती व्याख्याने देऊन किवा जाडे ग्रंथ लिहून, त्यात विचार मांडून खरी सुधारणा होत असे नाही. प्रत्यक्ष विचाराप्रमाणे कृती हवी तरच सुधारणा घडून येते. आज धर्माच्या नावाखाली कितीतरी जनता अंधश्रद्धेत गुरफटली आहे. त्यांना ख-या धर्माचा व भक्तीचा मार्ग दाखविण्याची जबाबदारी पुढा-यांना टाळता येणार नाही. सामान्य माणसांशी समरस होऊनच त्यांच्या विचार-आचारात बदल घडवून आणला पाहिजे. पण हे करतो कोण? तुम्हाला खरा मार्ग दाखविण्यासाठी मी व माझे भाऊराव पाटील तुमच्याकडे आलो आहोत. शिक्षणाचे दार त्यांनी मोकळे केले आहे. मुलामुलींना शिक्षण देण्याचा जरुर फायदा द्या. माझी तर व्याख्यानबाजीवरुन श्रद्धा कमी होत चालली आहे. काही व्यावहारिक प्रसंगी ती करावी लागते. सत्य व निर्भयवृत्ती अंगी आली पाहिजे. कार्यावर श्रद्धा मनःपूर्वक असली पाहिजे. दैवी गुण अंगी आणण्याचे प्रयत्न करा. शांत चित्ताने त्याचे स्मरण करा." सभेत श्रोते व व्याख्याते तल्लीन झाले होते. अण्णासाहेब शिंदे व भाऊराव पाटील ह्या दोन अलौकिक व्यक्तींची भाषणे ऐकण्याचा अपूर्व योग श्रोत्यांना लाभला होता. रात्री दीड वाजता ही सभा संपली.


अण्णासाहेब शिंदे व भाऊराव पाटील तसेच कृ. भा. बाबर यांच्या संक्षिप्त भाषणावरुन कोणत्या प्रकारची जागृती ह्या प्रचारदौ-यात केली जात असे, याची कल्पना येऊ शकते.

खेडेगावांमध्ये लोकांत मिसळून त्यांच्याशी बोलण्यात, त्यांना योग्य मार्ग दाखविण्यात अण्णासाहेब शिंदे यांना अत्यंत आस्था वाटत होती व म्हणूनच अशा प्रकारच्या दौ-याचा ते आग्रह धरीत होते. या प्रकारची जागृती करणे हे त्यांच्या दृष्टीने धर्मकार्यच होते.


वाई येथील मंडळी प्रसंगपरत्वे पुण्यास गेली असता अण्णासाहेब शिंदे यांना जाऊन भेटत व धर्मविषयक कामासाठी मार्गदर्शन घेत. त्याचप्रमाणे त्यांना पत्रे पाठवूनही त्यांचा सल्ला विचारीत असत. स्वतः अण्णासाहेबही आपण होऊन काही गोष्टी, काही कार्यक्रम वाई येथील धर्मनिष्ठ मंडळींना कळवीत असत.या कारणाने अण्णासाहेबांनी वेळोवेळी समाजाचे सेक्रेटरी श्री. रामराव कृष्णराव बाबर यांना पत्रे लिहिली. ह्या पत्रांवरुन अण्णासाहेबांची धर्मविषयक प्रचार करण्याची दृष्टी, धर्मप्रचाराचे क्षेत्र, त्यांची कार्यपद्धती, स्त्रिया व अस्पृश्य यांच्यापर्यंत धर्मविचार पोहोचविण्याची कळकळ ह्या विशेषांबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची प्रगल्भता, व्क्तीशीरपणा वगैरे व्यावहारिक गोष्टीबद्दल असणार कटाक्ष, व्यक्तिमत्त्वाचा असणारा प्रसन्नपणा व त्यांची विनोदबद्धी हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेषही प्रत्ययाला येतात त्यांची काही पत्रे उद्धत केली आहेत.


अहल्याश्रम, नानापेठ,

पुणे शहर,

ता. ३ ऑगस्ट १९३३


श्रीयुत रामराव कृष्णराव बाबर ह्यास

कृ. न. वि. वि.
आपले ता. १६-६-३३ चे पत्र व २/८/३३ चे कार्ड दोन्ही पोहचले. मुंबई प्रार्थनासमाजाचे सुबोधपत्रिकेचे संपादक रा. द्वा. गो. वैद्य यांना मीच सुलभ संगीताची पुस्तके पाठविण्यास सांगितले होते. आपण प्रार्थनासमाज वाईस काढला, असे ज्ञानप्रकाशात वाचले. आनंद झाला. मुंबईकडील प्रार्थनासमाज व कलकत्त्याकडील ब्राह्मसमाज ह्या दोन्ही समाजाची मूलतत्त्वे एकच आहेत. पण तत्त्वाप्रमाणे आचरण बंगाल्यात फार होते, तसे महाराष्ट्रात होत नाही. मूर्तिपूजा व्यवहारात कधीच न करणे व जातिभेद न पाळणे ह्या गोष्टी मुंबईकडे सांगण्यात येतात. तितक्या आचरण्यात येत नाहीत. तुम्ही आपल्या समाजास नुसते ब्राह्मसमाज हे मोठे नाव दिले आणि लग्नकार्यात मूर्तिपूजा केली किंवा जातिभेद पाळला तर हसे होईल. तसेच प्रार्थनासमाजा नाव ठेवूनही मताप्रमाणे आचरण केले नाही तर जनाची नसली तर मनाजी लाज वाटेलच.


प्रार्थनासमाजाशी पत्रव्यवहार मराठीत होऊ शकेल. पण ब्राह्मसमाजाशी सर्व व्यवहार इंग्रजीत करावा लागेल. त्यांना मराठी किंवा हिंदी भाषा येत नाहीत. 'इंडियन मेसेंजर' हे त्यांचे इंग्रजी वर्तमानपत्र व सर्व पुस्तके इंग्रजीत व बंगालीत आहेत. मुंबई प्रार्थनासमाजाकडून माहितीची सर्व पुस्तके सेक्रेटरीशी पत्रव्यवहार करुन मागवून घ्या. पत्ता गिरगाव, मुंबई असा आहे. महत्त्व नावात नाही, आचरणात आणि दिर्घ प्रयत्नात आहे. कोणती गोष्ट नवीन असेतोपर्यंत करावी असे वाटते. पण ती दीर्घकाळ टिकविण्याचा कंटाळा येतो. धर्माचा प्रयत्न फारच श्रद्धापूर्वक ऐहिक मतलब टाकून करायचा असतो. ईश्वर कृपा करो व तुम्हाला सर्वांना दीर्घ प्रयत्न करण्याचे सामर्थ्य प्राप्त होवो. मताप्रमाणे आचरण ठेवून आपल्या समाजास ब्राह्मसमाज हेच नाव द्यावे अशी माझी विनंती आहे.


विद्या आणि भक्ती दोन्ही एकत्र नेहमीच नांदतात असे नाही. कोणीतरी विद्वान तितकाच श्रद्धाभक्तिवान धर्मोपदेशक ठिकाणावर राहात असला तरच अशा संस्था चालतात, एरव्ही शक्य नाही. आपल्या सभासदांनी आपसात वर्गणी करुन धार्मिक वर्तमानपत्रे व पुस्तके आणावीत; ती वाचावीत; घरी बायकामुलांना ती द्यावीत आणि हे नेहमी करीत असावे. हा खटाटोप कोण करील? इतके करुनही एकदा समाज स्थापण्यात येऊन त्याचे काम चालू लागले म्हणजे ते गावातील आळशी व कुटिल लोकांच्या डोळ्यांवर येते. मग ते टिका किंबहुना निंदाही करु लागतात.


नव्या समाजात एकाच जातीचे लोक असून चालणार नाहीत. सर्व जातींचे व सर्व दर्जाचे लोक असावेत. तसे झाले म्हणजे टीका होऊ लागते. समाजात आपसातही वाद माजू लागतो. ह्या सर्वांस तोंड देण्याचे सामर्थ्य तुम्हांमध्ये येईल तेव्हाच तुम्ही टिकाल. नाहीतर पोरखेळ होईल. तथापि मी तुम्हांस नाउमेद करीत नाही. तुम्ही सुरुवात केली याबद्दल मी मनःपूर्वक अभिनंदन करितो. आमच्या मंडळाला तुमचा निरोप कळवितो. तुमच्यासाठी मी सदैव प्रार्थना करीन. थोडे दिवस टिकाल तर मी कलकत्याला ब्राह्मसमाजालाही कळवीन. पण आपल्या नवीन समाजाची खरी स्थिती काय आहे; समाजातील सभासदांनी सुधारलेले वर्तन स्वतःचे व घरातील मंडळींचे किती ठेवले आहे; धर्मसाधन निश्चयाने किती करीत आहेत हे समक्ष पाहिल्याशिवाय मी उगाच बोभाटा करणे बरे होणार नाही. आमच्या घरची मंडळी बरी आहेत. प्लेगमुळे वेताळपेठेतून आमच्या मिशनच्या अहल्याश्रमात राहावयास आली आहे. आपल्या मातापित्यास आमच्या सर्वांचे नमस्कार कळवावेत.


उपासना दर आठवड्यातून कितीदा, कोठे व केव्हा करता? समाजाचे नियम काय केले आहेत? घरातील बायकामुले उपासनातून हजर राहतात काय? घरच्या राहणीत काय फरक झाला आहे? वगैरे माहिती वेळोवेळी कळवाल तर आभारी होईन.


(२) ता. ६ मे १९३५
समाजमताप्रमाणे नलावडेसाहेब मुलीचे लग्न करणार असल्यास तिचे वय १४ वर्षांवर पाहिजे. होमहवन वगैरे काही बंड चालावयाचे नाही. मी अद्याप दुबळाच आहे. लग्नाच्या भानगडीत कधीच पडत नाही. ता. १२ पासून २० मे पर्यंत य. वा. भांडारकर वाई प्रांतात राहणार म्हणतात. जमल्यास मी व जनाक्का सार्वजनिक कामासाठी येऊ. खात्री नाही. वाईस राहण्यास आम्हाला स्वतंत्र जागा नाही. बरेच दिवस दुस-यास त्रास देणे बरे नव्हे. गुळुंब येथे २-३ दिवस काम करण्याची तयारी केली की नाही यासंबंधी उत्तर नाही. आम्ही नेहमी निराश्रित, अस्पृश्य आणि बेवारशी. तुम्ही नेहमी खाजगी लग्ने व मेजवान्या, पाहुणे-सरकार-दरबार यांत गुतलेले. आम्हा दीनांची दाद कोण घेणार? गुळुंबची तयारी करुनच लवकर मला व मुंबई प्रार्थनासमाजाजवळ भांडारकरास कळवा.


(३) १९ ऑक्टोबर १९३५
जाहीर व्याख्यान गुरुवारचे श्री. रघुनाथ फाटक, बी.ए. नवाकाळचे संपादक देतील. विषय 'भागवत धर्माचे विश्वरुप' हा आहे. हरिजनाची उपासना प्रो. वसंतराव नाईक एम. ए. चालवितील. संतचरित्रकथनाचे दिवशी द्वा.गो. वैद्य हे अध्यक्षस्थान स्वीकारतील. ही तीन मंडळी गुरुवारी पाच वाजता वाईस पोहचतील... माझा कीर्तनाचे आख्यान जोतीबा फुले आहेत. मी समक्ष गळ घालून वक्ते जमा करीत आहे. काही काळजी नसावी. कसून तयारी ठेवावी... जनार्दन गद्रे शनिवारी उपासना चालवितील. माधवराव केळकर कीर्तनाची साथ करतील... सर्व बेत साधा ठेवा.


(४) रामविहार, भांबुर्डा, पुणे ४ ता. १६ ऑक्टबर १९३६
आपण व्यवस्था करीत असाल तर ती व केसकर चार दिवस आधी येऊन खेड्यांत फिरु, नाही तर २-३ दिवस नुसते लाडू खाण्यास व प्रार्थना करण्यास मला येणे होत नाही, हे सर्व मला अपथ्य आहे.


मंदिराचे कामाकरिता तुम्ही कोणीच काही करीत नाही. तीन हजार रुपये घा म्हटल्याने कोणी घ्यावे व ते तरी का म्हणून ? त्यासाठी केसकर व श्री. शंकरराव जेजुरीकर महाराष्ट्र, बंगाल व मद्रास येथे फिरावयास जात असतील तर काहीतरी होईल. एरव्ही मुंबईचे मिळालेले ५५१/- रु. परत करावे लागतील. ह्या उत्सवात ह्या मंदिराची व खेड्याची कामे होत असल्यास मला ताबडतोब पक्के कळवावे. समाधानकारक पत्र आल्याशिवाय मला येण्याची तयारी करण्याचै धैर्य होणार नाही.


(५) ५ नोव्हेंबर १९३६
आम्ही ता. २०-११-१९३६ शुक्रवारीच वाईस येऊ. चि. जनाक्कांना बरोबर आणणार नाही. कोणी भगिनी स्त्रियांकरिता उपासना चालविण्यासाठी मिळाली नाही, तर मी स्वत: चालवीन. त्या वेळी मी लुगडे नेसेन म्हणजे वाद मिटला. यंदा वनोपासनेत जेवणखर्च कमी करण्याचा म्हणून ज्याने त्याने आपले जेवण आणावे.


(६) १५ फेब्रुवारी १९३८
काम करणारा मूर्ख व अकर्ता नेहमीच शहाणा, हीच जगाची रहाटी आहे. ता. १२,१३, १४ मे हा र उत्सवाचा वेळ ठरला तर त्या आधी २-४ आठवडे वाई-सातारा-क-हाडपर्यंत तरी दौरा काढावा व उत्सवाकरिता वाईस परत यावे अशी सूचना मी वैद्य, भांडारकर आणि केसकर यांना सविस्तर पत्राने केली आहे. भांडारकरांचे उत्तर आले की, त्यांची दृष्टी मंद होऊन ते केवळ पराधीन झाले. बाहेर जाववत नाही. इतरांची उत्तरे यावयाची आहेत. दौ-यावर वैद्य येणार नाहीत. पण केसकर कदाचित येतील. पण वाईकरांची तयारी आहे काय? ती तयारी म्हणजे वाईहून जनाक्काबरोबर एक-दोन तरी भगिनी आल्या पाहिजेत. कसलीही सबब सांगणे म्हणजे जनाक्काला येऊ नका म्हणणेच आहे. जनाक्काचे डोळ्यांत मोतीबिंदू वाढत आहे. त्यांना सबबी सांगण्यात फार आहेत. वाईहून २ भगिनी येत असल्यास जनाक्काच्या सबबी ऐकण्यात येणार नाहीत.


मी स्वतः खंगत चाललो आहे. मला मुंबईकर आपल्या उत्सवात ( मार्च १९ ते मार्च २७ अखेर ) मुंबईस येण्यास आग्रह करीत आहेत. मला एकट्याला पंधरा-वीस रुपये तरी खर्च येईल. कारण माझ्या पाहुणचाराचा खर्च व दगदग कोणावरही पडू नये. ती मुंबई नगरी आहे. वाई नव्हे. तोच खर्च मी खेड्यातील दौ-यावर प्रकृती कशीही असो करीन. मात्र वाईकरांनी दगा देऊ नये. त्यांच्या साह्याशिवाय मी काय करणार?....


(७) अण्णासाहेब शिंदे यांचे आयुष्यातील अखेरचे स्वाक्षरीचे पत्र
११ मार्च १९४३
माझी प्रकृती माझ्या हातून काहीच होणे शक्य नाही. म्हणून या पत्राद्वारे मी आपल्या ट्रस्टीपणाचा राजीनामा देत आहे. ट्रस्टी बोर्ड व समाजाची साधारण सभा बोलावून त्यांनी हा राजीनामा स्वीकारला आहे आणि माझ्या जागी दुसरा ट्रस्टी कोण नेमला आहे हे लवकर कळविण्याची मेहरबानी करावी. यापुढे माझ्या हातून पत्रव्यवहार होणार नाही,ही विनंती.

 

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य

   निवेदन
    लेखकाचे मनोगत
    दुस-या व तिस-या आवृत्तीच्या निमित्ताने
    प्रस्तावना 
 -   अंत:प्रेरणेचा निर्णय
 -   आजी-आजोबा आणि आई-वडिल
 -   बालपण 
 -   कॉलेजची पहिली दोन वर्षं
 -   जनाबाईंची संसारकथा
 -   जनाबाईंचे शिक्षण
 -   हुजूरपागा शाळा आणि शांता सुखटणकरची
     करुण कहाणी
-    इंटरमीजिएटचे दुसरे वर्ष
 -    पदवी परीक्षेचा अभ्यास आणि एकोणिसाव्या
      शतकाच्या अखेरचे पुणे
   प्रार्थनासमाजाची दीक्षा 
 -    पदवी परीक्षा
 -   अंत:स्थ भावजीवनातील खळबळ 
 -    एकेश्वरी उदार धर्मपंथ
 -    प्रार्थनासमाज
 -    धर्मशिक्षणासाठी निवड आणि परदेशगमन
 -    मुंबई ते ऑक्सफर्ड
 -     मॅंचेस्टर कॉलेज
 -    ऑक्सफर्डमधील पहिले दोन महिने
 -    नाताळची सुट्टी : मुक्काम लंडन 
 -    पत्रांचा विरंगुळा
 -    दक्षिण किना-यावरील पंधरवडा
 -    प्रोफेसरांच्या कुटुंबात सरोवर प्रांती
 -    एडिंबरो आणि स्कॉच सरोवरे
 -    हिंदू गृहस्थिती आणि समाजस्थिती 
      व्याख्यान व नाट्यप्रयोग 
 -    पारीस येथील एक महिना
 -   लिव्हरपूल येथील त्रैवार्षिक युनिटेरियन परिषद
 -    ऑक्सफर्डमधील शेवटची टर्म
 -    ऍमस्टरडॅम येथील आंतराष्ट्रीय उदार धर्मपरिषद
 -    परतीचा प्रवास
 -    स्वदेशी आगमन, बडोदा भेट आणि
      धर्मप्रचारकार्याला प्रारंभ
 -    मद्रासच्या परिषदा आणि हिंदुस्थानचा दौरा
-    जमखंडी-मुधोळ येथील प्रचारकार्य
 -    काठेवाडचा दौरा 
 -    मुंबईतील बि-हाड आणि प्रार्थनासमाजातील नवचैतन्य
 -    धर्मप्रचाराचे विस्तारित कार्य
 -    कौटुंबिक अडचणी, पुणे प्रार्थनासमाजातील नवचैतन्य
 -    धर्मप्रचारार्थ दौरा
 -    प्रवासातील अनुभव
 -    जनाबाई पनवेलमध्ये शिक्षिका
 -    विविध प्रार्थनासमाजांतील सहभाग
 -    भारतीय एकेश्वरी धर्मपरिषद
 -    ब्राह्मधर्मसूची ग्रंथ
 -    अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीविषयक कार्याचे प्रारंभिक प्रयत्न
 -    मिशनच्या स्थापनेचा संकल्प
 -    मिशनची स्थापना
 -  मिशनची घटना व पुणे येथील अंगभूत शाखा
 -    मिशनमधील दोन समारंभ 
 -    मिशनच्या स्थापनेनंतर वातावरणातील बदल
 -    निधीची योजना
 -    मुंबई प्रार्थनासमाजाशी दुरावा आणि फारकत
 -    पुण्यास स्थलांतर
 -    मिशनची महाराष्ट्र परिषद
 -    तुकोजीराव महाराजांची देणगी व मांगांचे
      शेतकी खेडे वसविण्याचा प्रयत्न
 -   अहल्याश्रमाची पूर्वतयारी 
 -    मराठ्यांची सांस्कृतिक जबाबदारी 
 -    काँग्रेसमध्ये अस्पृश्यतानिवारणाचा ठराव
 -    अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीची दिशा व मार्ग
 -    अस्पृश्यतानिवारक परिषद
 -   राष्ट्रीय प्रवाहात मराठा समाज
 -    अस्पृश्यवर्गाचे कायदेमंडळात प्रतिनिधित्व
 -    गैरसमजाचा ससेमिरा 
 -    १९२० सालातील निवडणूक 
-    शिंदे आणि ब्राह्मणेतर पक्ष
 -    कुटुंबातील मृत्यू
 -    मुलींसाठी सक्तीचे शिक्षण
 -    मद्यपाननिषेधाची चळवळ व अन्य सामाजिक कार्य
 -    मिशनचा कार्यविस्तार : कर्नाटक-मध्यप्रांतातील शाखा 
 -    मिशनसंबंधी आक्षेप व समस्या
 -    मिशनची पुनर्घटना
 -    खटल्याचा दैवदुर्विलास
 -    मिशनमधील सहकारी व सहका-यांच्या
       दृष्टीतून विठ्ठल रामजी शिंदे
 -    मंगलोरमधील कार्य
 -   व्हायकोम सत्याग्रह
 -    मंगलोर ब्राह्मसमाजातील पेचप्रसंग
 -    कौटुंबिक उपासनामंडळ
 -    सत्याग्रहात सहभाग आणि नेतृत्व
 -    अस्पृश्यतानिवारणाचे कार्य व म. गांधीशी संबंध
 -    येरवड्याच्या तुरुंगात
 -    ब्रह्मदेशाची यात्रा 
 -    शेतकरी चळवळ
 -    परिषदा, संमेलने यांमधील सहभाग
 -   कौटुंबिक वातावरण
 -    बहुमान, अवमान आणि निष्ठा
 -    वाई ब्राह्मसमाज आणि ग्रामीण भागातील धर्मकार्य
 -    विचारविश्व
 -    साहित्यसेवा आणि संशोधनकार्य
 -   अपूर्व स्नेहसंमेलन
 -   अखेरचे दिवस
 -   उपसंहार 
 -   परिशिष्टे १/२ आणि ३ 
 -   मनोगते
 -   महर्षी शिंदे यांचे फोटो व काही हस्तलिखिते