महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य

उपसंहार

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे समग्र जीवन व कार्य बघितल्यानंतर आपल्या मनावर ठसा उमटतो तो एका धर्मनिष्ठ, ध्येयनिष्ठ, त्यागशील, द्रष्ट्या अशा संपन्न व्यक्तिमत्त्वाचा. त्यांच्या उन्नत आध्यात्मिक मनोवृत्तीचा. विचार, उक्ती व कृती यांमध्ये आयुष्यभर स्वाभाविकपणे सुसंगती राखणा-या सच्च्या व्यक्तिमत्त्वाचा. विविध प्रकारच्या कार्यसिद्धीमध्ये त्यांनी कल्पक सर्जनशीलता दाखविली व अपूर्व कार्यक्षमता प्रकट केली. त्यांच्या ठायी तरल संवेदनशीलता होती आणि मनमोकळी प्रगल्भ सौंदर्यग्राही मनोवृत्ती.


महर्षी शिंदे यांचा समकालीन सुधारकाहून असणारा वेगळेपणा व त्यांची वैशिष्ट्यपूर्णता हीही आपल्या मनावर ठसल्यावाचून राहत नाही. ते कर्ते सुधारक होते. त्यांच्या सर्व कार्याला धर्मभावनेचे अधिष्ठान होते. त्यांचा विचार त्यांची कार्य शहरी लोकांपुरते सीमित नव्हते, तर खेडेगावातील लोकांच्याही सर्वांगीण उन्नतीचा विचार ते सदैव करीत; त्यानुसार कार्य करीत. त्यांचा दृष्टीकोण व्यापक होता. त्यात कुठेही एकांगीपणा, एकदेशीयता नव्हती. एकात्मता पाहण्याची त्यांची दृष्टी होती व एकात्मता निर्माण करण्याचा त्यांना ध्यास होता. त्यांच्या ठायी अपवादात्मक तत्त्वनिष्ठा होती. लोकांच्या अनुनयासाठी त्यांनी समन्वयाची भूमिका घेतली नाही, कधी तडजोड केली नाही. त्यांच्या लेखनाला अधिष्ठान होते तेही आध्यात्मिकतेचे.


महर्षी शिंदे हे कृतिवीर होते. केवळ अमुक सुधारणा करणे योग्य आहे असे सांगत राहून जुन्या मताच्या बहुसंख्य लोकांची समजूत बदलण्याची वाट पाहत राहणे त्यांच्या मनःप्रवृत्तीला मानवण्याजोगे नव्हते. आपल्याला मान्य असेल ती सुधारणा करण्यासाठी झटावे व सुधारणेचा काळ अलीकडे खेचून आणावा असे त्यांना तीव्रपणे वाटत असे आणि आपल्या वाटण्यानुसार तात्काळ कृतीला प्रारंभ करावा अशी त्यांची उत्कट मनःप्रवृत्ती होती. सुधारणेची कृती करण्यामुळे केवळ अप्रियताच नव्हे तर काहींचा रोष वाट्याला आला तरी तो सहन करण्याची त्यांच्या मनाची तयारी असे.


महर्षी शिंदे यांच्या कृतिनिष्ठतेचे उज्ज्वल उदाहरण म्हणजे त्यांनी केलेले अस्पृश्यवर्गाची उन्नती करण्याचे व अस्पृश्यतानिवारणाचे कार्य. त्यांचे हे कार्य ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे असणारे अखिल भारतीय पातळीवरील कार्य होय. या कामाता त्यांचा द्रष्टेपणा दिसतो, तसाच कर्तेपणाही दिसून येतो. त्यांनी केलेला अस्पृश्यतानिवारणाचा प्रयत्न हा न्यायाच्या, मानवतेच्या आणि विवेकाच्या पायावर भारतीय समाजाची पुनर्घटना करण्याचा अभूतपुर्व प्रयत्न होता. आपण पाहिले आहेच, की एकोणिसाव्या शतकाच्या मध्याला महात्मा फुल्यांचा अस्पृश्यवर्गाची उन्नती करण्याचा युगप्रवर्तक प्रयत्न पांढरपेशावर्गाची साथ न मिळाल्यामुळे खंडित झाला होता. विसावे शतक उजाडले तेव्हा भारतीय समाजजीवनात अस्पृश्यतेची म्हणून एक कलंकभूत रूढी आहे याची कुणालाही जाणीव नव्हती, एवढी अस्पृश्यता समाजजीवनातील स्वाभाविक बाब म्हणून अंगवळणी पडलेली होती. सर्व भारतात अस्पृश्य मानल्या गेलेल्या वर्गाची कशी दयनीय, दारुण अवस्था आहे हे शिंदे यांनी भारतभर हिंडून पाहिलेले होते, अनुभवलेले होते. १९०१ सालच्या खानेसुमारीच्या अहवालाचा अभ्यास करून अस्पृश्य मानला जाणारा वर्ग एकंदर भारतीयांच्या सातव्या हिश्श्याने आहे, हे त्यांनी दाखवून दिले. अस्पृश्यता हा एक प्रकारचा बहिष्कार असून अस्पृश्यवर्गाचे वर्णन त्यांनी ‘बहिष्कृत भारत’ या संज्ञेने केले. आपल्यापैकीच असणा-या काहीजणांना अस्पृश्य मानणे हे देशभर चाललेले सैतानी दुष्कर्म (नॅशनल इव्हल) आणि सगळ्या देशाचे पाप (नॅशनल सिन) आहे याची जाणीव त्यांनी १९०५-१९०६ साली आपल्या लेखांच्या व भाषणांच्याद्वरा करून दिली. समाजातील एवढ्या मोठ्या वर्गाला उच्च दर्जाची कामे करून न देणे ही बाब आर्थिकदृष्ट्याही मोठी हानिकारक आहे हेही त्यांनी जाणवून दिले.


विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभरात जी कार्ये केली, त्या प्रत्यक्ष कार्याचे महत्त्व तर असाधारण आहेच; त्याशिवाय या कार्याच्या पाठीमागे असणारी त्यांची वैचारिक भूमिका हीही मौलिक स्वरूपाची असे व लोकांची मानसिकता घडविण्याच्या दृष्टीने तिचेही महत्त्व फार मोठे होते. अस्पृश्यवर्गासंबंधी करावयाच्या कामाचे त्यांचे आकलन दुहेरी होते. एक, शतकानुशतके अस्पृश्यता लादल्यामुळे निर्माण झालेला ह्या वर्गाचा निकृष्टपणा नाहीसा करण्यासाठी त्यांना शिक्षण देणे, नोकरी-उद्योगाला लायक बनविणे, त्यांचा आत्माभिमान जागृत करणे, स्वतःची स्थिती सुधारण्यासंबंधी तळमळ निर्माण करणे हा त्यांनी आपल्या कार्याचा एक भाग मानला. तर स्पृश्य लोकांच्या मनात काही जातीत जन्मलेल्यांना अस्पृश्य मानण्याची जी भ्रामक कल्पना असे ती दूर करणे, म्हणजेच सामाजिक पातळीवरील अस्पृश्यता नाहीशी करणे हा त्यांनी आपल्या कामाचा दुसरा भाग मानला. अस्पृश्यवर्गाची उन्नती ध्यानात घेऊन आपल्या सामाजिक परंपरेला अपरिचित असणारी मिशनची कल्पना त्यांनी अवलंबिली. एखाद्या कामाला सर्वस्वी वाहून घेऊन समर्पणाच्या भावनेने संस्थेच्याद्वारा काम करणे ही मिशनची कल्पना होय. १९०६ साली त्यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली व पश्चिम आणि दक्षिण भारतातील सात प्रांतांमध्ये मिशनच्या शाखा स्थापन करून शाळा व उद्योगशाळा चालवून अस्पृश्यवर्गाची उन्नती करण्याचा प्रयत्न केला. सामाजिक पातळीवर अस्पृश्यता नाहीशी करण्यासाठी व्याख्याने, परिषदा यांचे आयोजन केले. ‘प्यरिटी सर्व्हंट’ सारखे मुखपत्र व आईवडिलांच्या निराशेला कारणीभूत होऊ नये यासाठी हाताला व डोक्याला उद्योगाचे वळण मिळावे यासाठी उद्योगशाळा चालविण्याबाबत त्यांचा कटाक्ष होता.


अस्पृश्यांसंबंधीचे कार्य असो, की धर्मविषयक अथवा शेतक-यांसंबंधीचे काम असो, शिंदे यांच्या असाधारण संघटनाकौशल्याचा प्रत्ययही ह्या विविध कामांत दिसून येतो. अस्पृश्यता समूळ नाहीशी करण्याची गरज सगळ्या राष्ट्राला जाणवून द्यावी ह्यासाठी त्यांनी १९०६ पासून राष्ट्रसभेच्या वार्षिक अधिवेशनाला जोडून अस्पृश्यतानिवारक परिषदा आयोजित केल्या. त्यासाठी सत्येंद्रनाथ टागोर, लाला लजपतराय, गोपाळ कृष्ण गोखले, सयाजीराव गायकवाड, म. गांधी यांच्यासारखे अध्यक्ष मिळविले. महाराष्ट्राच्या पातळीवर १९१२ साली पुण्यात मिशनची महाराष्ट्र परिषद आयोजित केली. १९१८ साली मुंबईस सयाजीराव गायकवाडांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी भरवलेली अस्पृश्यतानिवारक परिषद देशाच्या पातळीवर महत्त्वपूर्ण ठरली. आपण व्यक्तिगत जीवनात अस्पृश्यता पाळणार नाही अशा प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर देशातील तीनशे पुढा-यांच्या सह्या त्यांनी मिळविल्या. अस्पृश्यतानिवारण कार्याची जाणीव सर्वसामान्य नागरिकांना व गृहिणींना व्हावी यासाठी त्यांनी रुपी फंड, तांदूळ फंड अशा प्रकारचे उपक्रम सुरू केले. देशातील समाजाच्या सर्व स्तरांमधून सहकार्य मिळविले. हिंदुस्थानातील मान्यवर संस्थानिक, गर्व्हनर, कलेक्टर यांसारखे मुलकी इंग्रज अधिकारी, जहाल-मवाळ राजकीय पुढारी, सामाजिक क्षेत्रात काम करणारे सवर्णातील त्याचप्रमाणे अस्पृश्यवर्गातील पुढारी इत्यादिकांचे सहकार्य मिळविणे यात महर्षी शिंदे यांचे अपूर्व संघटनकौशल्य दिसून येते. पश्चिम आणि दक्षिण हिंदुस्थानात केलेल्या प्रचारदौ-यात ते विविध शहरांतील शाळा-कॉलेजमधील तरुण विद्यार्थ्यांसमोर व्याख्याने देऊन त्यांच्यामध्ये या प्रश्नाबद्दल जागृती करीत असत. फर्ग्युसन महाविद्यालयातील त्यांचे शिक्षकही त्यांच्या कामात सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे तेथील विद्यार्थीवर्गाला अस्पृश्यतानिवारण कार्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सभा घेऊन ह्या कामात भाग घेण्यासाठी शिंदे त्यांना प्रवृत्त करीत होते. अस्पृश्यतानिवारणासंबंधी अशा प्रकारच्या झटून केलेल्या प्रयत्नामुळे काँग्रेसच्या अधिवेशनात अस्पृश्यतानिवारणाचा ठराव मंजूर करून घेण्यात त्यांना १९१७ साली यश मिळाले.


मिशनच्या स्थापनेनंतर अस्पृश्यतेच्या प्रश्नासंबंधी देशभर जागृती करण्यात, ह्या प्रश्नाच्या बाबतीत व्यापक सहानुभूती मिळविण्यात विठ्ठल रामजी शिंदे ह्यांना फार मोठ्या प्रमाणात यश आले. ना. गोखले ह्यांनी शिंदे यांच्या आणि मिशनच्या ह्या कामाचा निर्देश करून त्यांच्या ह्या कामामुळे समाजाच्या विवेकबुद्धीस खरोखरीच चालना मिळाली अशा प्रकारचे विधान जाहीर सभेत केले. अस्पृश्यतानिवारणाचे काम हे शिंदे ह्यांचे काम होय, अशा प्रकारचे समीकरण लो. टिळकांच्याही बोलण्यातून प्रकट झाले. ठक्करबाप्पांनी शिंदे ह्यांच्या कामाचे वर्णन करताना पंजाब व उत्तर प्रदेश सोडला तर सर्व भारतात या प्रकारच्या कार्याचा प्रारंभ करणारे ते पहिले पुरुष व या कार्याचे अग्रदूत होत असे म्हटले आहे.


अस्पृश्यतेच्या प्रश्नाबद्दल जागृती करून समाजमन मोठ्या प्रमाणात अनुकूल करण्याचे काम शिंदे करू शकले याचे कारण त्यांच्या मनाला अस्पृश्यतेचा प्रश्न झोंबलेला होता. ह्या वर्गाबद्दल त्यांच्यामनात अपरंपार कळकळ होती, प्रेम होते. म्हणून त्यांच्या उन्नतीसाठी व अस्पृश्यतेचा प्रश्न सोडविण्यासाठी अमुक अमुक करावे असे त्यांना स्फुरले असणार.


समाजपरिवर्तन घडवून सामाजिक पुनर्घटना करण्याच्या बाबतीत आपण जेव्हा अस्पृश्यतानिवारणाचा अथवा जातीयता नष्ट करण्याच्या प्रश्नाचा विचार करतो तेव्हा परिपूर्ण आकलनासाठी समग्रतेचे भान ठेवावे लागते. आणि ही समग्रता महात्मा फुले, महर्षी शिंदे, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे वाढत्या व्यापकतेच्या क्रमाचे ऐतिहासिक टप्पे विचारात घेतले तर यथार्थपणे ध्यानात येऊ शकते. अस्पृश्यतानिवारणाच्या कामाला अग्रक्रम देऊन त्या प्रश्नाची सोडवणूक केल्याशिवाय समाजक्रांतीचे आणि सामाजिक पुनर्घटनेचे काम पूर्ण होऊ शकणार नाही याचे सा-या राष्ट्राला भान शिंदे यांनी प्रथमतः आणून दिले.


महर्षी शिंदे यांनी १९२६ साली ब्राह्मणेतर पक्षाच्या मानपत्राला उत्तर देताना सांगितले, की आयुष्यात आपण कोणत्याही एका जातीसाठी काम केलेले नाही. त्याला अपवाद फक्त अस्पृश्य जातीचा आहे, व त्याचे कारण अस्पृश्यतेच्या प्रश्नाची प्रचंड व्याप्ती आणि तो सोडविण्याची निकड. त्यांनी म्हटले, “मला आणखी शंभर जन्म मिळाले तरी नरबळी घेणा-या अस्पृश्यतेच्या वेदीवर अर्पण करण्यासाठी मी मागेपुढे पाहणार नाही.” पुढे त्यांनी असेही म्हटले आहे की, “अस्पृश्यतानिवारण करणे हा माझा कायमचा ध्यास राहिला आहे. अस्पृश्यतेचे निवारण अद्यापि झाले नाही याची मला अन्य कोणापेक्षाही तीव्र अशी जाणीव आहे. ह्या वास्तवापेक्षा माझी श्रद्धा माझ्या कानात गुणगुणत आहे, की अस्पृश्यता निश्चित नष्ट होणार आणि केवळ ह्या श्रद्धेवरच माझ्या मनाची शांती टिकून आहे.”


शिंदे यांच्या जीवनातील दैवदुर्विलास असा, की ज्या अस्पृश्यवर्गासाठी अशा प्रकारची कळकळ अंतःकरणात बाळगून सर्वस्व होमून त्यांनी अपरंपार कष्ट केले त्या वर्गाचीच नाराजी त्यांच्यावर ओढवली. स्वकीयांनी केलेली उपेक्षा आणि अस्पृश्यवर्गाने केलेली अवहेलना पचवून शिंदे हे अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीचा आणि अस्पृश्यता समूळ नाहीशी करण्याचा ध्यास आयुष्यभर कसा घेऊ शकले? याचे उत्तर म्हणजे त्यांच्या ठायी असलेली नितांत धर्मनिष्ठा. अस्पृश्यतानिवारणाचे कार्य त्यांनी एक फुटकळ सामाजिक सुधारणा म्हणून निवडलेले नव्हते, तर ते धर्मकार्य म्हणून आंतरिक प्रेरणेच्या ऊर्मीमुळे पत्करलेले होते. त्यांनी ज्या ब्राह्मधर्माची अंतःकरणपूर्वक दीक्षा घेतली होती, त्याचे एक तत्त्व असे होते-सर्व मनुष्ये एका परमेश्वराची लेकरे आहेत, म्हणून भेद न राखिता परस्परांशी बंधुभावाने वागावे. खरे म्हणजे केवळ अस्पृश्यवर्गाची सुधारणाच नव्हे तर सुधारणेची इतर कामेही त्यांनी धर्मभावनेने केल्याचे जाणवते.


महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि अन्य सुधारक यांच्यामध्ये कर्तेपणावरून जसा फरक पडतो त्याचप्रमाणे धर्मद्धेबाबत त्यांच्यामध्ये असलेला भेद जाणवतो. आपल्याकडे सामाजिक सुधारणेच्या म्हणविल्या जाणा-या कार्याची उभारणी बुद्धिवाद, उपयुक्ततावाद असा तत्त्वावर केली जाते; धार्मिक मनोवृत्तीच्या पायावर मात्र उभारण्याची अगदी तयारी नसते. शिंदे यांनी जे प्रचंड काम केले ते पाहताही ही गोष्ट आपल्या मनाला पटू शकते.


प्रत्यक्ष जीवनातील सामाजिक सुधारणेच्या ऐहिक कार्याला विठ्ठल रामजी शिंदे यांनी धार्मिक पायाचाच आधार दिला होता. त्यांच्या सर्व कार्याला आधारभूत असणारी त्यांची धर्मकल्पना ही रूढ धर्मकल्पनेपासून वेगळी होती हेही आपण लक्षात घ्यावयास पाहिजे.


विठ्ठल रामजी शिंदे यांचे आयुष्य अनेक नाट्यात्म घटनांनी भरलेले आहे. त्यांपैकी त्यांच्या जीवनीतील पहिली प्रमुख घटना म्हणजे आपले आयुष्य उदार धर्मकार्याला वाहून घेण्याचा निर्णय त्यांनी अंतःप्रेरणेने घेतला व लगेच तो गुरुवर्य डॉ. भांडारकरांना सांगितला. आचारविचाराच्या दृष्टीने सामान्यतः परंपरानिष्ठ मानल्या गेलेल्या मराठा समाजातील एका पदवीधर तरुणाने शंभर वर्षांमागे अशा प्रकारचा निर्णय घेऊन तो अमलात आणणे ही अपूर्व गोष्ट होती. घरी अठराविश्वे दारिद्र्य असताना व ते निवारण्यासाठी आणि सुखाचे जीवन जगण्यासाठी मोठ्या पागाराची संस्थानामधील नोकरी मिळण्याची शक्यता दृष्टीच्या टप्प्यात असता विठ्ठल रामजींनी अशा प्रकारचा निर्णय घेतला. एकांतात तपश्चर्या करून व्यक्तिगत पातळीवर पारमार्थिक श्रेयस मिळविण्याचा त्यांचा हेतू नव्हता तर उन्नत धर्माचा प्रचार करून सर्वसामान्य माणसाचे जीवन सर्व अंगांनी उंचावण्याची कळकळ त्यांच्या ठिकाणी होती. हा निर्णय त्यांनी अंधश्रद्धेच्या अधीन होऊन घेतलेला नव्हता. तर मोठ्या विवेकशीलतेने विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता.


विठ्ठल रामजींनी हा निर्णय आत्यंतिक धर्मनिष्ठेने घेतला होता हे तर उघडच आहे. घरातील वारकरी संप्रदायाच्या उदार संस्कारामुळे त्यांची धर्मनिष्ठा प्रबळ झालेली होती आणि प्रार्थनासमाजाच्या द्वारा त्यांना उन्नत एकेश्वरी मताचा परिचय झालेला होता. धर्म ही बाब सगळ्या माणसांच्या जीवनावर सत्ता गाजविणारी आहे हे वास्तव त्यांना दिसत होते. मात्र हा खराखुरा उन्नत धर्म नसून धर्माचे ते भ्रष्ट स्वरूप होते. त्यातून निर्माण झालेल्या रूढी होत्या, अंधश्रद्धा होत्या व त्यातून सर्वसामान्य माणसाचे जीवन हीन दशेला पोहचलेले त्यांनी पाहिलेले होते. अस्पृश्यता पाळणे, मुरळी सोडणे, देवतांना बळी देणे, भोंदू बुवांच्या मागे लागणे अशा अत्यंत अनिष्ट स्वरूपाच्या रूढी धर्माच्या नावाखाली प्रचलित होत्या. त्यामुळे माणसांच्या स्वाभाविक सत्प्रवृत्तीवरही पटल येऊन ही माणसे अवनत अवस्थेतील जीवन जगत होती. शिंदे यांनी वारकरी धर्माचे उज्ज्वल स्वरूप जाणले होते. ब्राह्मसमाज आणि प्रार्थनासमाज ह्या विवेकशील धर्माची तत्त्वे त्यांच्या मनाला भावली होती. पाश्चात्त्य जगात ख्रिश्चन धर्मातून विकसित झालेल्या युनेटिरिअन ह्या उन्नत धर्ममताचाही त्यांना उत्तम परिचय झाला होता. युनेटिरिअन अथवा एकेश्वरी धर्ममत हे सुधारलेल्या जगाचे ‘अंतर्याम’ (कॉन्शन्स) होय, अशी त्यांची खात्री पटलेली होती. त्यांनी पत्करलेला धर्म हा बुद्धीला अविरोधी असणारा विवेकशील धर्म होता. तेव्हा रूढीलाच धर्म समजून वागणा-या लोकांना या उन्नत धर्माकडे वळविणे म्हणजे त्यांची भ्रांत धर्मकल्पना, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी यांच्यापासून सोडवणूक करून त्यांच्या जीवनाचा स्तर उंचावणे अशी त्यांची खात्री पटलेली होती. त्यांच्या मते धर्मसुधारणा ही सुधारणेची एक स्वतंत्र बाब नव्हती, तर जीवनाच्या सर्वच अंगांची सुधारणा करणे होते. महर्षी शिंदे यांची धर्मभावना जीवनव्यापी व इहनिष्ठ होती. जीवनाच्या प्रत्येक बाबीला, प्रत्येक कार्याला उन्नत धर्मभावनेचे अधिष्ठान असावे लागते अशी त्यांची धारणा होती. त्यांच्या धर्मकल्पनेत निवृत्ती नसून प्रवृत्ती आहे. ते श्रद्धेच्या जोडीनेच निर्लोभ प्रेमाचा समावेश धर्मकल्पनेत करतात. प्रेमाचे स्वरूप सांगताना ते म्हणतात, “प्रेम म्हणजे उत्साह, उदासीनता नव्हे; प्रेम म्हणजे जीवन; जीवनाचा कंटाळा नव्हे.” समाजसेवेलाही प्रेमाचे अधिष्ठान असल्याचे ते सांगतात. त्यांच्या दृष्टीने प्रपंचातील प्रत्येक व्यवहार जागृतपणे आणि प्रेमाने करणे म्हणजे धर्मसाधन होय. द्वा. गो. वैद्य यांच्या लेखसंग्रहाला संपादकांनी दिलेल्या संसार आणि धर्मसाधना या नावाला आक्षेप घेताना ते म्हणतात, “धर्मसाधन म्हणजे काय? पोथी वाचणे, प्रार्थना करणे, स्तब्ध बसणे, तप करणे म्हणजे धर्मसाधन काय? मुळीच नव्हे. ब्राह्मसमाज म्हणतो प्रपंचातील प्रत्येक व्यवहार जागृतपणे आणि प्रेमाने करणे म्हणजेच धर्मसाधन होय. एखादा प्रामाणिक सुतार, हुशार न्हावी विशेषतः प्रेमळ भंगीदेखील पोटभरू पुरोहितापेक्षा शतपटीने धार्मिक म्हणता येणार नाही काय? असे जर आहे तर संसार म्हणजे धर्मसाधन ठरते.”


महर्षी शिंदे यांच्या भूमिकेवरून हे स्पष्टच दिसते, की ते कर्मकांड त्याज्य मानतात, मात्र समाजाला उपयोगी पडणा-या, समाजाला पुढे नेणा-या उद्यमी कृतिशीलतेला ते धर्म मानतात. महर्षी शिंदे यांची धर्मकल्पना अशा प्रकारची असल्यामुळे अस्पृश्यता नष्ट करण्याचे काम असो, मुरळी प्रथा बंद करण्याचा प्रयत्न असो, की राजकारणात घ्यावयाचा भाग असो, ही सारी कार्ये विठ्ठल रामजी शिंदे यांनी धर्मबुद्धीने केली. या कार्याच्या पाठीमागे धर्मभावनेची उत्कटता असल्यामुळे शिंदे ही काम आत्यंतिक श्रद्धेने, मन ओतून, कळकळीने करू शकले असेच आपल्याला त्यांच्या चरित्राचे अवलोकन केले असता दिसून येते.


महात्मा फुल्यांच्यानंतर व्यापक सामाजिक सुधारणेचा भाग म्हणून खेडेगावातील लोकांच्याही सर्वांगीण उन्नतीची जाणीव असणारे, त्यांच्यासाठी झटणारे समाजसुधारक महर्षी शिंदे हेच होत. स्वतः शिंदे यांनी ग्रामीण जीवनातील सर्व प्रकारची अनिष्टे, तेथील लोकांचे दारिद्र्य, रूढी व अंधश्रद्धा यांचा त्यांच्या मनावर असलेला दांडगा प्रभाव व एकंदरीतच जीवनाचा सगळ्या बाबतीत खालावलेला स्तर पाहिलेला होता. ह्या लोकांची सर्वांगीण उन्नती होणे आवश्यक आहे, अशी खुणगाठ त्यांनी मनाशी बांधली होती. म्हणूनच अगदी विद्यार्थिदशेपासून त्यांच्या मनात खेडेगावातील लोकांचा विचार सदैव असे. सुधारणेचे काम करण्यासाठी एखादी मंडळी अथवा संस्था मित्रांच्या समवेत स्थापन करावी असा विचार ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असल्यापासूनच करीत होते हे त्यांच्या रोजनिशीतील २७ मार्च १८९८च्या नोंदीवरून दिसून येते. उन्नत धर्माचा विचार हा ग्रामीण लोकांपर्यंत पोहोचविणेही त्यांना विशेष अगत्याचे वाटत होते.


महात्मा फुले यांची योग्यता शिंदे यांना अनेक कारणांनी जाणवली असणार. त्यांपैकीच खेडेगावातील लोकांच्या उन्नतीबद्दल असणारी कळकळ हेही एक कारण असणार. ह्या समानधर्मित्वामुळेही शिंदे यांना महात्मा फुले यांच्याबद्दल आदराची भावना वाटत असणार. महात्मा फुल्यांची थोरवी आणि कर्तबगारी ओळखणारे आणि प्रसंगपरत्वे ठासून सांगणारे विठ्ठल रामजी शिंदे हे स्वातंत्र्यपूर्व काळातील बहुधा एकमेव विचारवंत म्हणावे लागतील. महात्मा फुल्यांच्यानंतर सामाजिक प्रबोधनाचा विचार हा एकदेशी राहिलेला होता. तो विचार बहुदेशीय अथवा सार्वदेशीय करणारे शिंदे हे पहिले क्रियाशील विचारवंत होत.


खेडेगावातील बहुसंख्य तसेच महत्त्वाचा घटक म्हणजे शेतकरी वर्ग. १९२०च्या निवडणुकीत भाग घेताना विठ्ठल रामजींनी बहुजनपक्ष या नावाने जो आपल्या पक्षाचा जाहीरनामा काढला होता त्यामध्ये त्यांनी सगळ्याच दुर्बल, शोषित, पीडितांचा कैवार घेऊन त्यांच्यासाठी कार्य करण्याची भूमिका मांडली. त्यात स्वाभाविकपणेच शेतकरीवर्गाच्या हिताला प्राधान्य देणारा त्यांचा विचार दिसून येतो.


पुढच्या सहा-आठ वर्षांच्या काळानंतर विठ्ठल रामजींनी शेतक-यांच्या परिषदांमध्ये जे मार्गदर्शन केले, त्यामध्ये त्यांची शेतकरीवर्गाबद्दल असणारी आत्यंतिक कळकळ दिसून येते. तो काळ स्वातंत्र्याच्या प्रेरणेने भारलेला होता. स्वतः शिंदे हेही कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेऊन तुरुंगात जाऊन आले होते. असे असले तरी त्यांनी निक्षून सांगितले, की सध्याची काँग्रेस भावी पार्लेमेंट असली तरी कोणतेही सरकार भांडवलदाराचे मिंधे असते. म्हणून स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात काँग्रेस शेतक-यांचे हित बघेल याची खात्री नाही. म्हणून त्यांनी शेतक-यांना तालुकानिहाय संघ स्थापन करण्याचा तसेच कामगारांच्या समवेत संयुक्त संघटना स्थापन करून आपले सामर्थ्य वाढविण्याचा व शेतमालाच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्याचा मौलिक उपदेश केला. शेतीचे अर्थशास्त्र समजून घेऊन त्याची मांडणी करणारे व कार्याची दिशा दाखविणारे शिंदे हे आपल्या आधुनिक इतिहासातील पहिले विचारवंत म्हणावे लागतील.


कायदेभंगाच्या चळवळीत नेतृत्व करीत असताना व भाग घेताना शिंदे यांनी दौरे काढले ते पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात. त्यांचे हे दौरे म्हणजे एक प्रकारची धार्मिक दिंडीच असे. या दौ-यात ते महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानाचे, सत्य-अहिंसा या तत्त्वांचे शेतक-यांना कळेल अशा भाषेत विवरण करीत असत. अस्पृश्यतानिर्मूलनाचाहि संदेश देत असत. दौ-याच्या समाप्तीनंतर पुण्यातील श्रोत्यांसमोर आपले अनुभव सांगताना खेडेगावात चहालादेखील दूध मिळणे कठीण जाते, कारण हे सगळे दूध शहरात येत असते असे त्यांनी सांगितले. ग्रामीण जनतेची काय स्थिती आहे व त्यांचे कशा प्रकारे शोषण चालले आहे, याचे चित्र डोळ्यात अंजन घालावे त्याप्रमाणे शिंदे श्रोत्यांना दाखवीत होते.


खेडेगावातील लोकांना उन्नत धर्माची जाणीव करून द्यावी ही कळकळ विठ्ठल रामजी शिंदे ह्यांच्या ठायी विद्यार्थिदशेपासूनच होती. १९२६ साली पुण्यामध्ये त्यांनी कौटुंबिक उपासना मंडळाची स्थापना केली. त्यामध्ये शहरातील ब्राह्मण कुटुंबाच्या जोडीनेच खेडेगावात पुण्यात वास्तव्यास आलेली बहुजन समाजातील कुटुंबे सहभागी होतील याची त्यांनी दक्षता घेतलेली दिसते. प्रामुख्याने बहुजन समाजाची वस्ती असलेल्या शुक्रवार पेठेतील शिवाजी हायस्कूलमध्ये ते कौटुंबिक उपासनामंडळाची व्याख्याने व इतर कार्यक्रम घेत असत. त्यांच्याच प्रेरणेने ग्रामीण परिसरातील वाई येथे ब्राह्मसमाजाची स्थापना झाली ही गोष्ट त्यांच्या मनाला विशेष आनंद देणारी होती. फारसे प्रकृतिस्वास्थ्य नसतानाही ते वाई ब्राह्मसमाजाच्या धर्मकार्यात अगत्यपूर्वक भाग घेत असत. गावातून तसेच गावच्या महारवाड्यातून, मांगवाड्यातून प्रभातफे-या काढीत असेत. तेथे व्याख्याने देत, प्रवचने करीत. अस्पृश्यतानिवारणाचे कार्य हा धर्मकार्याचाच भाग समजून वाई प्रांतात ते आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळामध्ये काम करीत असत. ग्रामीण परिसरात धर्मप्रचाराचे व अस्पृश्यतानिवारणाचे कार्य करण्यात त्यांना मनोविश्रांती लाभत असे. ग्रामीण परिसरात सर्वांगीण सुधारणेचे कार्य करणे हा महर्षी शिंदे यांच्या कार्याचा वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणावा लागेल.


विठ्ठल रामजी शिंदे यांनी जे राजकारण केले त्यातही त्यांच्या मनोवृत्तीचा वेगळेपणा आणि वैशिष्ट्यपूर्णता दिसून येते. अभेदाची दृष्टी, सर्व उपेक्षितवर्गाच्या उन्नतीची कळकळ, व या कार्याला त्यांनी दिलेले धर्मनिष्ठेचे अधिष्ठान ही त्यांच्या राजकीय कार्यामधून दिसून येणारी स्वाभाविक वैशिष्ट्ये होत. संपूर्ण जीवनाचा विचार करतानाच त्यांची अभेदाची दृष्टी व एकात्मतेची ओढ ही कार्यरत असल्याचे आपल्या प्रत्ययाला येते. स्वातंत्र्य चळवळीच्या मुख्य प्रवाहापासून मराठावर्ग अलिप्त राहू नये या भूमिकेतून केशवराव जेधे यांच्यासारख्या मराठावर्गातील कर्तबगार व्यक्तीला व त्यांच्या सहका-यांना त्यांनी राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीच्या मुख्य प्रवाहात आणले; व ब्राह्मणेतरवादाने एकांगी बनू पाहणा-या महाराष्ट्राच्या राजकीय जीवनाला उन्नत स्वरूप प्राप्त करून दिले. सर्व उपेक्षितवर्गाचा कैवार घेणारा बहुजनपक्ष त्यांनी स्थापन केला. शेतकरी, स्त्रिया, कष्टकरी अशा जनसामान्यांच्या कल्याणाला केंद्रस्थान देणारा त्यांचा बहुजनपक्षाचा जाहीरनामा आजही राजकीय पक्षांना आदर्शभूत वाटावा, अशा प्रकारची उन्नत मनोवृत्ती व राजकीय प्रगल्भता प्रकट करणारा आहे. सर्व प्रकारच्या एकांगीपणापासून मुक्त असणारी त्यांची विचारप्रणाली व प्रेमपूर्णतेचे अधिष्ठान असणारी व्यापक भूमिका यांमधून महात्मा गांधींशी असणारे त्यांचे समानधर्मित्व दिसून येते. म्हणूनच महात्मा गांधींनी सुरू केलेल्या कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी समरसून भाग घेतला. त्यासाठी तुरुंगवासही भोगला.


संशोधन करणे, लेखन करणे हाही महर्षी शिंदे यांच्या जीवनकार्याचा महत्त्वाचा भाग आहे. संशोधक, विचारवंत व लेखक म्हणूनही विठ्ठल रामजी शिंदे यांची वैशिष्ट्यपूर्णता दिसून येते. अस्पृश्यवर्गाची उन्नती करणे हा जसा शिंदे यांच्या जीवनातील कर्तृत्वकालापासूनचा ध्यास होता त्याचप्रमाणे अस्पृश्यतेसंबंधी सामाजिकतेच्या अंगांनी विचार करणे, तसेच संशोधन करणे हाही त्यांच्या जीवनातील कर्तृत्वकालाच्या प्रारंभापासूनचा ध्यास होता. अस्पृश्यताविषयक लेखन करणारे तसेच संशोधन करणारे ते पहिले विचारवंत, संशोधक होत. १९०५ पासून त्यांच्या अस्पृश्यताविषयक लेखनाला आणि संशोधनाला प्रारभ झाला. संशोधनाच्या सर्व शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करून अस्पृश्यतेसंबंधी समाजशास्त्रीय दृष्टिकोणातून १९३३ साली लिहिलेला त्यांचा भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा या विषयावरील भारतामधील पहिला प्रबंध होय. अस्पृश्यतेच्या उगमासंबंधी समाजशास्त्रीय भूमिकेतून त्यांनी सिद्धान्त मांडले आहेत. मलबार, ओरिसा येथे व अन्य ठिकाणीही अस्पृश्यवर्गाचे प्रत्यक्ष निरीक्षण करून, तसेच लोकवाङमयातील पुराव्यांचा आधार घेऊन अस्पृश्य मानले गेलेले लोक एकेकाळचे राज्यकर्ते असावेत असे मत त्यांनी मांडले. त्याचप्रमाणे आजचे अस्पृश्य हे एकेकाळचे बौद्ध होते, हे मत उपलब्ध पुराव्यांच्या आधारे मांडले. अस्पृश्यता निर्माण कशी होते याबद्दल त्यांनी स्वतः ब्रह्मदेशात केलेल्या निरीक्षणाचा आधारही घेतला. त्यांची ही मते पाहता स्वतःला स्पृश्य मानणारा वर्ग व अस्पृश्य मानला गेलेला वर्ग यांच्यामधील एकात्मताच त्यांना जाणवली आहे हे स्पष्ट दिसते. शिंदे यांचे अस्पृश्यतेसंबंधीचे हे निष्कर्ष अत्यंत साधार, मूलभूत व पटण्याजोगे आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढील काळात शिंदे यांच्या अस्पृश्यताविषयक काही मतांचा विकास केला असल्याचे दिसून येते.


विठ्ठल रामजी शिंदे यांच्या संशोधनात काळाचा आणि प्रदेशाचा फार मोठा टप्पा नेहमीच विचारात घेतल्याचे आढळते. ‘भागवतधर्माचा विकास’ या त्यांच्या लेखमालेत भक्ती या तत्त्वाचा विकास वेदपूर्व काळापासून तो वर्तमानकाळापर्यंत कसकसा होत गेला याचे साधार मूलग्राही विवेचन केले आहे. त्यांच्या काळात संशोधकांची व म्हणून सर्वसामान्यांची जी धारणा दिसून येत होती ती म्हणजे भारतीय संस्कृती ही आर्यांची संस्कृती; येथील आर्यपूर्व संस्कृती म्हणजे मागासलेली संस्कृती आणि आर्यसंस्कृती ही श्रेष्ठ संस्कृती होय. ही धारमा भ्रामक आहे व आर्यपूर्व संस्कृतीचा प्रभाव भारतीय संस्कृतीत कसा दिसतो हे त्यांनी दाखवून दिले.


शिंदे यांच्या समाजशास्त्रीय स्वरूपाच्या संशोधनाप्रमाणेच त्यांचे तौलनिक भाषाविषयक संशोधनही महत्त्वाचे आहे. १९२३ सली कानडी आणि मराठी यांचा परस्परसंबंध दाखविणारा लेख त्यांनी लिहिला व कानडी ह्या अधिक जुन्या भाषेचा मराठीवर झालेला परिणाम केवळ शब्दांच्या उसनवारीपुरता मर्यादित नसून व्याकरणाच्या दृष्टीनेही तिचा मराठीवर दांडगा प्रभाव पडल्याचे त्यांनी सोदाहरण दाखवून दिले आहे. कोकणी आणि मराठीचा तुलनात्मक विचार करणारा लेख लिहून कोकणी ही मराठीची पोटभाषा असल्याची भूमिका त्यांनी साधार मांडली.


त्यांचे अस्पृश्यताविषयक संशोधन, धर्मविषयक संशोधन तसेच भाषावियक संशोधन यांतून एकात्मता पाहणारी त्यांची दृष्टी आपल्या प्रत्ययाला येते. हे सगळे विषय त्यांच्या आस्थेचे असले तरी ते आपल्या भावनिकतेचे पटल संशोधनाविषयाच्या आकलनाच्या आड कधी येऊन देत नाहीत. आकलनाची वस्तुनिष्ठ दृष्टी ढळू देत नाहीत. वा संशोधनाची शिस्त बिघ़डू देत नाहीत.


महर्षी शिंदे यांचे समग्र जीवनकार्य आपल्या डोळ्यांसमोर आणले असता त्यामध्ये एक अंतःसूत्र असल्याचे दिसते. त्यांचे समाजकारण असो, की राजकारण, त्यांची सारी धडपड जुटीसाठी-एकात्मतेसाठी होती. फुटीचे सोपे, तात्कालिक यश देणारे पण अंतिमतः हानिकारक असणारे समाजकारण, राजकारण त्यांनी केले नाही, की सहजी लोकप्रियता देणारा फुटीचा एकदेशी विचार कधी मांडला नाही. तथाकथित अस्पृश्य आणि स्पृश्य असे दोन्ही वर्ग एकमेकांत अगदी मिसळून जावेत या प्रेरणेने त्यांनी आयुष्यभर कार्य केले. मराठा वर्गाने राष्ट्रीय प्रवाहापासून अलग राहू नये असा त्यांनी प्रयत्न केला ब्राह्मणेतर पक्षातील भेदवाचक भाव जसा त्यांना मान्य नव्हता तसाच मराठा-मराठेतर असा नवा भेद करणेही त्यांना पसंत नव्हते. स्त्रिया ह्या पुरुषांच्या बरोबरीने यायला पाहिजेत अशी त्यांची तळमळ होती. एकत्वाचे हेच अंतःसूत्र त्यांच्या संशोधनपर आणि वैचारिक लेखनातही दिसून येते. दोन संस्कृती असोत की जाती असो, दोन प्रांत असोत की दोन पंथ असोत दोन भाषा असोत, भेदापेक्षा त्यांच्यातील एकात्मता शिंदे यांच्या दृष्टीला दिसते, ती त्यांना महत्त्वाची वाटते. म्हणूनच आयुष्यभर सर्व प्रकारच्या एकात्मतेचा ध्यास घेऊन समाजजीवनाचा स्तर उंचावणारे मौलिक स्वरूपाचे काम त्यांनी अखंडपणे केले.


अशा प्रकारचे निष्ठापूर्वक काम समर्पणाच्या भावनेने करणा-या विठ्ठल रामजी शिंदे यांच्या वाट्याला शोकात्म स्वरूपाचे दुर्धर अशा प्रकारचे काही प्रसंग आले.

 

अस्पृश्यतानिवारणाच्या कामात मिशन स्थापन करून शिंदे हे झटून लक्ष घालू लागले. त्यामुळे त्यांच्यावर नाराज झालेल्या प्रार्थनासमाजाच्या धुरीणांनी १९१० साली त्यांना प्रचारकपदावरून दूर केले. ज्या अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीसाठी मिशन स्थापन करून त्यांनी जिवाचे रान केले, कुटुंबासकट त्यांच्यामध्ये राहिले, अविश्रांत असे कष्ट घेतले त्या अस्पृश्यवर्गातील पुढा-यांच्या विरोधामुळे १९२३ साली मिशन सोडण्याचाही निर्णय त्यांना घ्यावा लागला.


या कठीण प्रसंगातून ते स्वतःला कसे सावरू शकले असतील? असे वाटते, त्यांची धर्मावर व सत्यावर अविचल निष्ठा होती त्या बळावर, महर्षी शिंदे यांची ईश्वरावरची तसेच सत्यावरची श्रद्धा किती बळकट होती हे १९०८ साली दिलेल्या ‘ईश्वर आणि विश्वास’ या व्याख्यानातील त्यांच्या प्रतिपादनावरून कळून येते. त्यांनी म्हटले आहे, “ईश्वर सत्त्वप्रवर्तक आहे असे नुसते मत असून चालत नाही तर तो सत्त्वाचा आणि शुभाचा प्रवर्तक आहे, म्हणून मी सत्याचा आग्रह धरून राहिलो तर माझे कितीही हाल झाले तरी, माझी किंवा कुणाचीही हानी मुळीच होणार नाही असा विश्वास पाहिजे आहे.” महर्षी शिंदे यांची सत्यावरची आणि धर्मावरची निष्ठा होती ती या प्रकारची. अशा दुर्धर प्रसंगी मनाचा तोल सावरण्यासाठी एवढेच नव्हे तर जीवनभर अविचल श्रद्धेने काम करण्यासाठी त्यांना त्यांच्या धर्मनिष्ठेचा भाग असलेली ही सत्यनिष्ठा उपयोगी पडलेली असणार. एकंदरीत साकल्याने धर्माचा बळकट आधार मिळालेला असणार. बालपणीच वारकरी संप्रदायाच्या संस्काराने त्यांच्या मनाची घडण झालेली होती. तुरणपणाच्या विद्यार्थिदशेत विवेकशील ब्राह्मधर्माचे संस्कार त्यांच्या मनावर झालेले होते, व नंतरच्या काळात बौद्ध धर्माची शिकवण त्यांनी आत्मसात केली होती. जीवनातील अशा प्रकारच्या कठीण प्रसंगी त्यांच्या एकंदर धर्मनिष्ठेत बौद्धधर्ममताचा, बौद्ध धरमचिंतनाचाही फार मोठा आधार त्यांना मिळालेला असणार.


विठ्ठल रामजी शिंदे यांनी ऑक्सफर्ड येथे बौद्धधर्माचा आणि पाली भाषेचा अभ्यास त्यांचे विशेष गुरू प्रो. कार्पेंटर यांच्याजवळ केला होता. बौद्धधर्माची थोरवी त्यांना नुस्ती भावलीच होती असे नव्हे तर ती इतरांना पटवून देणे आवश्क आहे असे त्यांना वाटत असे. १९१० साली त्यांनी दिलेल्या ‘बौद्धधर्माचा जीर्णोद्धार’ या व्याख्यानात बौद्धधर्म हा आमचा बिनमोल वारसा असून त्यावर आपण आपला हक्क अभिमानाने शाबीत करून आम्ही त्याचा लाभ घ्यायला पाहिजे असे प्रतिपादन केले. त्यांच्याच प्रयत्नाने प्रो. धर्मानंद कोसंबी यांची पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये पाली भाषेचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली व तेथे पाली भाषेच्या व बौद्धधर्माच्या अभ्यासाला प्रारंभ झाला व चालना मिळाली.

 

दुःखनिरोधाची वाट दाखविणारी ‘मध्यमा प्रतिपदा’ अथवा मध्यममार्गाचे तत्त्व, त्याचप्रमाणे मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा या मनाचा समतोल साधणा-या उन्नत तत्त्वांचा ‘ब्रह्मविहार’ यांचा त्यांच्या कार्यामागील मनोधारणा घडविण्यात मोठाच वाटा असणार. धम्मपदाचे वाचन मनाला शांती मिळविण्यासाठी उपयोगी पडते, असा त्यांचा अनुभव होता. बौद्ध तत्त्वज्ञानाने प्रभावित झाल्यामुळे शिंदे खरे तर मनाने बौद्धच झालेले होते. १९२७ साली कलकत्त्याला ब्राह्मसमाजाच्या विर्षिकोत्सवात ‘मी बौद्ध आहे’ असे विधान त्यांनी केले. त्याच वर्षी, ब्रह्मदेशातील बौद्धधर्माचे अवलोकन करावे, तेथील बुद्धविहारामध्ये वास्तव्य करून उपासना करावी असा हेतू ठेवून ते ब्रह्मदेशातील गेले. कुणाही प्रापंचिक गृहस्थास बौद्ध भिक्षूची काही काळासाठी दीक्षा घेता येते या वहिवाटीनुसार त्यांनी तेथील ऊ कोडन्ना या बौद्ध उपदेशकास आपल्याला बौद्धधर्माची उपसंपदा देण्याची विनंतीही केलेली होती. बौद्धधर्मातील उन्नत तत्त्वांचा महर्षी शिंदे यांच्यावर अशा प्रकारचा प्रभाव पडलेला होता. या धर्माची थोरवी त्यांना पटलेली होती. त्यांच्या मनाचे पोषण या धर्मतत्त्वांनीही केले होते. महर्षी शिंदे यांची धार्मिक मनोवृत्ती घडण्यात, आयुष्यभर तिला अनुसरून कार्य करण्यात व आयुष्यातील दुर्धर प्रसंगी मनाची समधातता अथवा समतोल टिकविण्यात बौद्धधर्माचा मोठाच भाग असणार असे म्हणावेसे वाटते. याचे त्यांच्या आयुष्यातील एक उज्ज्वल उदाहरण नमूद करता येईल. अस्पृश्यवर्गाकरिता स्वतंत्र मिशन स्थापन करून ते वाढविण्यात, ह्या वर्गाची सुधारणा करण्याचे आणि अस्पृश्यतेच्या प्रश्नाबाबत राष्ट्रभर जागृती करण्याचे ऐतिहासिक कार्य करण्यात महर्षी शिंदे यांची जशी थोरवी आहे, त्याचप्रमामे आपण वाढविलेले हे मिशन नव्याने जागृत होऊ लागलेल्या अस्पृश्य पुढा-यांतील अस्वस्थता आणि अपेक्षा ध्यानात घेऊन अत्यंत निरिच्छपणे व मोठ्या भारदस्तपणे अस्पृश्यवर्गाच्या स्वाधीन करण्यातही महर्षीची थोरवी दिसून येते.


महर्षी शिदे यांच्य बाबतीत दोन प्रश्न निव्हाळ्याने अलीकडेच्या काळात काही विचारवंत उपस्थित करतात. त्यांपैकी पहिला प्रश्न, महर्षी शिंदे यांनी केलेल्या कामात त्यांना कितपत यश लाभले? आणि दुसरा प्रश्न, महर्षी शिंदे यांची उपेक्षा अद्यापही का होत आहे?


महर्षी शिंदे यांच्या जीवनकार्याचा गाभा उन्नत स्वरूपाचे धर्मकार्य हा असला तरी धर्मभावनेतूनच त्यांनी केलेले अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीचे आणि अस्पृश्यतानिवारणाचे कार्य हा त्यांच् कामाचा ऐतिहासिकदृष्ट्याही अत्यंत मौलिक स्वरूपाचा भाग होय. अस्पृश्यताविषयक कामाच्या संदर्भात आपण निःसंदिग्ध स्वरूपाचे विधान करू शकतो, की ह्या कामी त्यांनी फार मोठे यश मिळाले. आपण पाहिले आहे, की विसाव्या शतकाच्या प्रारंभकाळी राष्ट्रकार्य करायला प्रवृत्त झालेल्या धुरीणांनादेखील अस्पृश्यतेचा म्हणून काही प्रश्न आहे याची जाणीव नव्हती. अस्पृश्यतापालन इतके स्वाभाविकपणे लोकांनी स्वीकारले होते. अशा काळात अस्पृश्यतेच्या ह्या गंभीर प्रश्नाची जाणीव संपूर्ण राष्ट्राला करून देण्याचा जो प्रयत्न महर्षी शिंदे यांनी केला व याबाबत त्यांनी देशभर कशी अपूर्व जागृती केली हे आपण विस्ताराने पाहिले आहेच. या ग्रंथाच्या प्रारंभी निर्देश केल्याप्रमाणे अस्पृश्यतानिवारण कार्याची दोन महान पर्वे आहेत. पहिले पर्व जागृतीचे; त्याचे धुरीण महर्षी शिंदे होत. दुसरे पर्व संघर्षाचे; त्याचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबडेकर होत. महर्षी शिंदे यांच्या कार्यामुळे पुढच्या संघर्षपर्वाची स्वाभाविकपणेच पूर्वतयारी झाली. अस्पृश्यतानिवारणाचे काम हाती घेण्यासाठी, स्पृश्यवर्गातीलच कुणीतरी कर्तबगार व्यक्ती पुढे येणे आवश्क होते. हे ऐतिहासिक कार्य महर्षी शिंदे यांनी पार पाडले. ह्या प्रश्नाबाबत जागृती करण्याच्या कामी महर्षी शिंदे यांना यश मिळाले असे आपण निर्विवादपणे म्हणू शकतो.


उन्नत धर्मप्रचाराचे कार्य व सुधारणेची इतर कामे महर्षी शिंदे यांनी कशी निष्ठापूर्वक केली ते आपण पाहिले आहेच. अशी कामे करीत असताना विशिष्ट टप्प्यावर आपल्याला यश मिळाले असे निश्चित स्वरूपाचे विधान करणे कठीण असते. काही कामे विशिष्ट प्रश्नापुरती विशिष्ट वेळीच करणे भाग असते. मुलांबरोबर मुलींचे शिक्षण, शेतक-यांच्या हिताच्या विरोधी असणारे कायदे अशा तात्कालिक प्रश्नांची तड लावण्यात महर्षी शिंदे हे यशस्वीही ठरले.


खरे पाहिले असता महर्षी शिंदे यांचे धर्मकार्य असो, अस्पृश्यतानिवारणाचे कार्य असो, की स्त्रियांबाबत पुरुषांचा दृष्टिकोण बदलविणे असो, ही सारी त्यांनी हाती घेतलेली कामे अत्यंत बिकट स्वरूपाची होती. कारण ह्या सगळ्या कार्याच्या मुळाशी प्रमुख काम होते,ते म्हणजे लोकांची मने पालटणे, शील पालटणे. महर्षी शिंदे यांनी ह्या अत्यंत अवघड अशा कामाला हात घातला, चालना दिली. यात त्यांचे मोठेपण आहे. त्यांची यशस्विताही आहे.


महर्षी शिंदे यांनी विविध कामे हाती घेऊन असाधारण कर्तृत्व दाखविले. त्यांच्या ठायी अपवादात्मक स्वरूपाची गुणवत्ता होती. असे असताना आजच्या काळात फार मोठ्या प्रमाणात त्यांचे विस्मरण झालेले दिसते. असे का व्हावे? आपल्या कार्यकाळात, विशेषतः १९०६ पासून १९२३ पर्यंत शिंदे यांनी अस्पृश्यतानिवारण कार्याचा अभूतपूर्व उठाव केलेला होता, व ह्या प्रश्नासंबंधी भारतभर जागृती केली; ती लोकांच्या नजरेसमोर होती. मिशनच्या स्थापनेनंतर पाचदहा वर्षांच्या अवधीतच अस्पृश्यतेच्या प्रश्नासंबंधी महाराष्ट्रात आणि भारतात अनुकूल असा बदल झपाट्याने होऊ लागला. भारतभरचे जहाल-मवाळ पुढारी, इंग्रजी अधिकारी, महात्मा गांधी यांच्यासारखे लोकनेते शिंद्यानी केलेल्या या कामाचे महत्त्व ओळखून होते. काँग्रेससारख्या राष्ट्रीय संस्थेने अस्पृश्यतानिवारणाच्या कामाला आपल्या कार्यक्रमामध्ये स्थान दिले. असे असले तरी पुढील पंधरा-वीस वर्षांतच शिंदे यांच्या या कार्याचे राष्ट्राला जणूकाय विस्मरण झाले. शिंदे यांचे एक सहकारी सदाशिव सोहोनी यांनी १९४० साली केलेल्या आत्मनिवेदनात म्हटले आहे, “मला राहून राहून एका गोष्टीविषयी दुःख होते. अस्पृश्यांच्या प्रश्नाच्या सोडवणुकीला हात घातला रा. विठ्ठलरावांनी. त्या कामी कमालीचा स्वार्थत्याग करून त्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी देशभर जागृती घडवून आणली. ह्या प्रश्नाला राष्ट्राची मान्यता मिळण्याचे श्रमही त्यांचेच. पण अलीकडे अस्पृश्यांच्या उन्नतीच्या प्रश्नाचा जेव्हा जेव्हा उल्लेख करण्याचा प्रसंग येतो तेव्हा तेव्हा ज्यांनी ह्याबाबतीत केवळ वाचिक कार्य केले आहे अशांनाच जागृतीचे श्रेय अर्पण करण्यात येते; व भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळी व विठ्ठल रामजी शिंदे ह्यांच्यावर पद्धतशीर बहिष्करा घालून त्यांचा चुकूनही नामनिर्देश केला जात नाही. असा संघटित बहिष्काराने सत्याचा अपलाप होतो.”


महर्षी शिंदे ह्या विभूतीचे विस्मरण का झाले आहे याबद्दल विचारवंतांनी वेगवेगळी मते मांडली ती वाचकांच्या पुढे आहेतच. विठ्ठल रामजी शिंदे यांनी भारताच्या आणि महाराष्ट्राच्या विस्मरणशीलतेबद्दल जे विश्लेषण केले आहे ते अत्यंत भेदक तसेच उदबोधक आहे व आपल्या सामाजिकस, सांस्कृतिक उणिवांवर मार्मिकपणे बोट ठेवणारे आहे, आणि खुद्द महर्षी शिंदे यांची महाराष्ट्रात अजूनही उपेक्षा का चालू आहे, त्यांचे विस्मरण का झाले आहे याचा उलगडा करणारेही आहे.


महर्षी शिंदे यांनी १९३०-३५च्या दरम्यान ‘महाराष्ट्र नाना शंकरशेटला का विसरला?’ या शीर्षकाचा लेख लिहिला. त्या लेखात अव्वल इंग्रजी अमदानीत जगन्नाथ नाना शंकरशेटनी लोकशिक्षण, नागरी कर्तव्ये, राजकारण, अर्थकारण, विद्याभिवृद्धी इत्यादीविषयक कामांना हात घालून केवळ नव्या मुंबईचीच नव्हे तर महाराष्ट्राच्या जीवनाची नव्या मनूनुसार घी बसविण्याचे अलौकिक कार्य केले असे प्रतिपादन केले आहे. अशा कर्तृत्ववान नाना शंकरशेटला महाराष्ट्र का विसरला असावा याविषयी ह्या लेखाच्या उत्तरार्धाच्या टिपणामध्ये त्यांनी काही कारणे नमूद केली आहेत. भारत हा ऐहिक निष्ठेपेक्षा परलोकखुळा जास्त आहे. दुसरे कारण म्हणून वाङमयाचे वेड त्यांनी नमूद केले आहे. शिंदे यांनी आणखी दोन कारणे नमूद केली आहेत. आमच्या सा-या इतिहासात राष्ट्रनिष्ठा दिसून येण्याऐवजी जातिनिष्ठाच दिसून येते, आणि चौथे कारण म्हणून राजकारणाचा त्यांनी निर्देश केला आहे. शिवाजीसारख्यांची पूजा होते ती त्यांच्या ख-याखु-या गुणवत्तेसाठी नव्हे, तर राजकीय उपयुक्ततेसाठी असेही त्यांनी नमूद केले आहे. महर्षी शिंदे यांनी नाना शंकरशेट यांच्या कर्तृत्वाचा महाराष्ट्राला का विसर पडला यासंबंधी केलेले विश्लेषण हे खुद्द महर्षी शिंदे यांना लागू पडणारे आहे.


थोर पुरुषांची आजच्या काळात आठवण जागी ठेवणारी, त्यांच्या कार्याचे स्मरण करून देणारी प्रभावी यंत्रणा म्हणजे राजकीय पक्ष होत. आजच्या लोकशाहीच्या काळात सत्तास्थानापर्यंत पोहोचण्यासाठी पक्षाला स्वाभाविकपणे जास्तीतजास्त मते मिळविण्याकरिता प्रयत्न करावा लागतो. त्यासाठी अन्य मार्गाबरोबरच विविध जातघटकांचा अनुनय केला जातो. हा अनुनय करण्याचे एक साधन म्हणजे विशिष्ट जातघटकांवर प्रभाव पाडील, त्यांचे आदरस्थान असेल अशा विभूतींचा घोष करणे. ह्या कामी महर्षी शिंदे यांच्या नावाचा घोष करणे कोणत्याच पक्षाला उपयोगी नाही. स्वतः शिंदे विश्वधर्माचे पाईक होते. आपल्या कार्यकालाच्या प्रारंभापासूनच ते जातिभेदातीत होते. एवढेच नव्हे, तर जातिभेद नष्ट करणे हा त्यांच्या कार्याचा एक प्रमुख भाग होता. ते स्वतः जेव्हा निवणुकीस उभे राहिले तेव्हा स्वतःच्या जातीचा पाठिंबा ह्या तत्त्वनिष्ठेमुळे त्यांनी नाकारला. त्यांनी कोणतेही जातिविशिष्ट काम केले नाही. अपवाद केला तो अस्पृश्य गणल्या गेलेल्या जातीचा. त्यांची अत्यंत हलाखीची स्थिती पालटण्यासाठी. परंतु पुढच्या काळात बदललेल्या राजकारणामुळेच, त्या वर्गाला स्वतःच्या जातीचे पुढारी लाभल्यामुळे महर्षी शिंदे यांची त्या वर्गाचे उपेक्षा केली. एवढेच नव्हे, तर दैवदुर्विलास असा की गुंतागुंतीच्या अंतःस्थ राजकारणामुळे त्यांना आपले विरोधक मानले. तेव्हा या वर्गाचा अनुनय करावयाचा असेल तर महर्षी शिंदे यांचे नाव वर्ज्य मानणे मताच्या व्यावहारिक राजकारणासाठी सोयीचे ठरते असे सध्याचे चित्र दिसते. महर्षी शिंदे यांनी महाराष्ट्राच्या विस्मरणशीलतेची मीमांसा करताना जातिनिष्ठा व राजकारणी पक्षपात ह्या कारणांचा जो निर्देश केला आहे तो खुद्द शिंदे यांच्या बाबतीत एकत्रित स्वरूपात खरा दिसतो.


विठ्ठल रामजी शिंदे हे त्यांच्या मूल्यनिष्ठ भूमिकेमुळे तत्कालीन कोणत्याच राजकीय पक्षाबद्दल सर्वस्वी समाधानी नव्हते. राजकी पक्षांच्या एकांगी ध्येयधोरणामुळे ते कोणत्याच राजकीय पक्षाशी समरस होऊ शकले नाहीत. राजकाणाकडे ते कर्मयोग म्हणून पाहत होते. तेव्हा तत्कालीन राजकीय पक्षांशी त्यांचे जुळणे कठीण होते. स्वतःची भूमिका विशद करताना त्यांनी म्हटले आहे, “मी माझ्या मुख्य अथवा आनुषंगिक कार्यामध्ये कोणत्याही एका पक्षाच्या अथवा पंथाच्या अधीन झालो नाही. माझा पक्ष केवळ परमेश्वराचा आणि माझी सदसदविवेकबुद्धी माझा प्रतोद.” पुढे त्यांनी म्हटले आहे, “मला माहीत आहे, की अशा प्रकारचा मनुष्य कोणालाही खूष ठेवू शकत नाही.” अशा प्रकारची मनोधारणा आणि तत्त्वनिष्ठा असणारे शिंदे त्यांच्या काळीतील पक्षांना परवडणारे नव्हते. आणि आजच्या काळात तर राजकीय हितसंबंधाच्या बाबतीत अधिकाधिक घटकांची भर पडून गुंतागुंत वाढलेलीच आहे. तेव्हा महर्षी शिंदे यांच्यासारख्या तत्त्वनिष्ठाचे नाव घेणे कोणत्याच राजकीय पक्षाला फायद्याचे नाही, एवढेच नव्हे तर प्रसंगपरत्वे नुकसानीचेच ठरण्याची जास्त शक्यता दिसते. तेव्हा महर्षी शिंदे यांचे स्मरण राजकीय पक्षाकडून कसे केले जाणार?


दुसरी बाब अशी. विठ्ठल रामजी शिंदे यांच्या वैचारिकतेतील सामाजिक आशय ओळखून कार्यरत होणारे प्रभावी नेतृत्व निर्माण झाले असते तर कदाचित शिंदे यांचा विसर पडला नसता आमि आजही समकालीन वाटणारा त्यांचा बहुजनपक्षाचा जाहीरनामा महत्त्वाचा राष्ट्रीय दस्तऐवज ठरला असता.


श्री. म. माटे यांनी आपल्या आधुनिक सुधारक (१९५३) या पुस्तिकेत लोकहितवादी, विष्णुबुवा ब्रह्मचारी, महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे व कर्मवीर शिंदे या विभूतींचा परिचय करून दिला आहे. त्यांचे आचार व विचारपरत्वे स्थान ठरविताना माटे यांनी म्हटले आहे, “क्रांतिकारक कृतीकडे लक्ष दिले तर महात्मा फुले यांच्याकडे पहिला मान जातो. त्यांच्या खालोखाल कर्मवीर शिंदे हे येतात.” तर त्यांच्या वाङमयीन कर्तृत्वाबद्दल “न्यायमूर्ती रानडे व कर्मवीर शिंदे यांची वाङमये अत्यंत श्रेष्ठ दर्जाची आहेत,” असे त्यांनी विधान केले आहे.


महर्षी शिंदे यांची महाराष्ट्राने त्यांच्या कार्याच्या बाबतीत उपेक्षा केली हे आपण पाहिलेच. परंतु प्रज्ञेचा स्वतंत्रपणा दाखविणा-या महर्षी शिंद्यांची महाराष्ट्राने संशोधक, विचारवंत व लेखक म्हणून तरी बूज राखली काय? त्यांच्या लेखनकर्तृत्वाच्या बाबतीतही त्यांच्या जीवितकालात तसेच उत्तरकाळातही त्यांची उपेक्षाच केलेली दिसते.


विठ्ठल रामजी शिंदे यांचे सर्व प्रकारचे लेखन हे उन्नत धर्मावर नितांत श्रद्धा असणा-या धर्मनिष्ठाचे लेखन आहे. त्यांचे स्वतःचे जगणे, प्रत्यक्ष कार्य आणि त्यांच्या साहित्यातून प्रकट होणारी वैचारिकता आणि संवेदनशीलता यांच्यामध्ये एकवाक्यता आहे. स्वाभाविकपणेच सच्चेपणातून निर्माण झालेल्या या लेखनाला वरच्या दर्जाची गुणवत्ता प्राप्त झाली आहे. मराठी साहित्यक्षेत्रातील आणि विचारक्षेत्रातील अभिनिवेशरहित जाणकार समीक्षक-विचारवंतांचा जो वर्ग आज आहे त्यांना शिंदे हे प्रबोधनयुगातील आदर्श विचारवंत, लेखक वाटतात. मात्र हा वर्ग अद्यापही अत्यल्प आहे. महर्षी शिंदे यांनी आपल्या संशोधनपर लेखनात अत्यंत मौलिक स्वरूपाचे नवे सिद्धान्त साधार मांडले. त्यांच्या वैचारिक लेखनातील विचाराचा स्वतंत्रपणा, प्रगल्भता वेधक आहे. त्यांच्या आत्मपर स्वरूपाच्या लेखनातून त्यंची तरल संवेदनशीलता प्रत्ययाला येते.


वाचणा-यांच्या मनाला उन्नत करण्याचे सामर्थ्य त्याच्यात आहे. त्यांच्या संवेदनशीलतेला आध्यात्मिक बैठक कशी आहे याचे एक उदाहरण नमूद करावेसे वाटते. पॅरिसमधील वास्तव्यात कुमारी दुगार या प्राध्यापिकेची त्यांनी दोन दिवस भेट घेतली व फ्रान्स मधील स्त्रीशिक्षण, विवाहपद्धती इत्यादीबाबत त्यांच्यासमवेत मनमोकळी चर्चा केली.

दुगारबाईचा पोशाखातला व वागणुकीतला साधेपणा, माहिती देण्याची उत्कंठा, तिचा सुस्वभावीपणा व निरागसपणा शिंद्यांना फारच भावला. दुस-या दिवशी रात्री तिचा निरोप घेऊन निघाल्यानंतरच्या मनःस्थितीचे त्यांनी वर्णन केले आहे. “अकरा वाजता रात्री ट्राममधून सेन नदीच्या काठाने येताना तो रात्रीचा देखावा पाहत, नुकत्याचं घडलेल्या शुद्ध सहवासाविषयी माझ्या मनात अनेक गोड विचारतरंग येऊ लागले. आत्मा आत्म्यावर लुब्ध झाला होता. म्हणून वियोग झाल्यावरही सुखच होत होते. शरीराची सर्वच सुखे दुःखपर्यवसायी आहेत. आत्म्याला पर्यवसानच नाही. कारण आत्मा अनंत आहे. म्हणून त्याची वृत्ती अखंडित राहते.”


महर्षी शिंदे यांचे बाङमय एवढे गुणवत्तापूर्ण असूनही सर्वसामान्य पांढरपेशा सुशिक्षित वाचकवर्गात त्यांच्या काळात त्यांना लेखक म्हणून मोठी लोकप्रियता वा मान्यता मिळाली असे दिसत नाही. १९१२ साली विठ्ठल रामजी शिंदे यांचे लेख, व्याख्याने व उपदेश या पुस्तकात त्यांचे प्रवासवर्णनपर व धर्मपर विषयावरील वैचारिक व संशोधनपर लेखनही प्रसिद्ध होत होते. १९३३ साली भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा संशोधनपर प्रबंध प्रसिद्ध झाला होता. त्यांच्या व्याख्यानांचे वृत्तान्त ज्ञानप्रकाश, विजयी मराठा, सुबोधपत्रिका, राष्ट्रवीर इत्यादी वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होत होते. असे दिसते, की शिंदे यांच्या विचारातील स्वतंत्रपणा तत्कालीन वाचकवर्गाला पेलवणारा नव्हता. आर्य संस्कृतीबद्दल अनुकूल तर बौद्धमताबद्दल प्रतिकूल पूर्वग्रह असणा-या सुशिक्षित मराठी वाचकवर्गाला शिंदे यांच्या संशोधनपर लेखनातील मूलगामीपणा आणि वैचारिक लेखनातील स्वतंत्रपणा भावणारी नव्हता. शिंदे यांचे सर्वच लेखन कोणत्याही प्रकारचा पक्षपात न बाळगता एका व्यापक व उन्नत भूमिकेवरून केलेले आहे.


शिंदे धर्मनिष्ठ. प्रार्थनासमाजाचे प्रचारक. त्यांच्या लेखनाला बैठक आध्यात्मिक. तर सुशिक्षित महाराष्ट्र अज्ञेयवादी वा नास्तिक्यवादी विचाराच्या मिल, स्पेन्सर, आगरकर यांच्या दडपणाखाली पुढची पन्नासेक वर्षे तरी राहिला आणि आजही त्याची त्यातून पूर्णतः सुटका झाली आहे असे वाटत नाही. प्रार्थनासमाजाचे खरेखुरे अंतरंग न ओळखता ख्रिस्तीधर्माची नक्कल करणारा पंथ म्हणून त्याकडे तुच्छतागर्भ दूरत्वाने शिक्षित मराठी समाज बघत आला. त्यामुळे न्यामूर्ती रानडे, डॉ. भांडारकर यांच्या धर्मविषयक प्रगल्भ लेखनाची दखल महाराष्ट्राने घेतली नाही. तीच गत महर्षी शिंदे यांच्या लेखनाची झाली. महात्मा गांधींचा राजकारणात उदय होण्याच्या आधीपासून शिंदे तत्सदृशय भूमिकेतून वैचारिक स्वरूपाचे लेखन करीत होते. पुढील काळात तर ते समानधर्मित्वामुळे महात्मा गांधींच्या चळवळीतही सामील झाले. सुशिक्षित महाराष्ट्राला गांधी जवळचे वाटले नाहीत. त्यांच्यासारखी असलेली शिंद्यांची भूमिकाही त्याला आपली वाटली नाही. बहुजन समाजाचा आणि शोषित-पीडीतांचा कैवार घेऊन त्यांनी केलेले सामाजिक प्रश्नावरचे लेखन हेही दुर्लक्षित राहिले. आपल्या वर्तुळाच्या बाहेरचे पाहण्याची क्षमता नसणा-या पांढरपेशांच्या मनाला ते फारसे रुचणे शक्य नव्हते. जीवनसंबंद्धतेपेक्षा पोकळ वाग्विलासाला महत्त्व देणा-या तत्कालीन मराठी अभिरुचीला महर्षी शिंदे यांचे वाङमय मोलाचे वाटले नसणार. या अनेकविध कारणांमुळे महर्षी शिंदे यांना लेखक म्हणून ज्या योग्यतेची मान्यता मिळावयास पाहिजे होती ती त्यांच्या काळात मिळालेली दिसत नाही. अजूनही लेखक म्हणूनही त्यांची उपेक्षाच चालू आहे.


अन्य बाबी काहीही असोत. विसाव्या शतकाच्या प्रारंभी, लोक काय म्हणतील याची क्षिती न बाळगता अस्पृश्यवर्गाच्या सुधारणेच्या आणि अस्पृश्यतानिवारणाच्या प्रत्यक्ष कार्याला विठ्ठल रामजी शिंदे यांनी हात घातला आणि दीड तपाच्या अवधीत अविश्रांतपणे कष्ट करून हिंदुस्थानभर जागृती केली, या कार्याला तोड नाही. महर्षी शिंदे यांचे हे काम ऐतिहासिक मोलाचे आहे.


आपल्याला पडलेल्या सुधारणा आचरणात कधी व कशा आणाव्यात यासंबंधी १८८१ मध्ये पुण्याच्या प्रार्थनासमाजाच्या संगत सभेत विचार झाला. त्या वृत्तान्ताचे सार असे :

 

जोपर्यंत आपल्या वडीलधा-यांची आणि पुष्कळांची समजूत आपल्या समजुतीहून निराळी आहे, तोपर्यंत आपल्या समजुतीप्रमाणे एकदम आचरण न करता ते विचार बोलत राहावेत, पुष्कळांची समजूत बदलण्याची वाट पहावी, असे आपले मत न्यामूर्ती रानडे यांनी मांडले. त्यानंतर प्रश्न उपस्थित केला गेला, की अशी वाट पाहत राहिल्याने सुधारणेचे पाऊल कधीच पुढे पडावयाचे नाही. तेव्हा अमुक गोष्ट जनसमूहाच्या हितास आवश्यक आहे असे आपल्याला दिसल्यावर व ती न करणे ईश्वराच्या आज्ञेच्या विरुद्ध आहे असे वाटल्यावर ती जर पुष्कळ लोकांच्या समजुतीविरुद्ध किंवा रूढीविरुद्ध असेल तर ती आपण करावी की नाही ? या प्रश्नावर न्यायमूर्ती रानडे म्हणाले, ‘ती करतील ते धन्य.’


विठ्ठल रामजी शिंदे हे असे धन्य पुरुष होते !

 

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य

   निवेदन
    लेखकाचे मनोगत
    दुस-या व तिस-या आवृत्तीच्या निमित्ताने
    प्रस्तावना 
 -   अंत:प्रेरणेचा निर्णय
 -   आजी-आजोबा आणि आई-वडिल
 -   बालपण 
 -   कॉलेजची पहिली दोन वर्षं
 -   जनाबाईंची संसारकथा
 -   जनाबाईंचे शिक्षण
 -   हुजूरपागा शाळा आणि शांता सुखटणकरची
     करुण कहाणी
-    इंटरमीजिएटचे दुसरे वर्ष
 -    पदवी परीक्षेचा अभ्यास आणि एकोणिसाव्या
      शतकाच्या अखेरचे पुणे
   प्रार्थनासमाजाची दीक्षा 
 -    पदवी परीक्षा
 -   अंत:स्थ भावजीवनातील खळबळ 
 -    एकेश्वरी उदार धर्मपंथ
 -    प्रार्थनासमाज
 -    धर्मशिक्षणासाठी निवड आणि परदेशगमन
 -    मुंबई ते ऑक्सफर्ड
 -     मॅंचेस्टर कॉलेज
 -    ऑक्सफर्डमधील पहिले दोन महिने
 -    नाताळची सुट्टी : मुक्काम लंडन 
 -    पत्रांचा विरंगुळा
 -    दक्षिण किना-यावरील पंधरवडा
 -    प्रोफेसरांच्या कुटुंबात सरोवर प्रांती
 -    एडिंबरो आणि स्कॉच सरोवरे
 -    हिंदू गृहस्थिती आणि समाजस्थिती 
      व्याख्यान व नाट्यप्रयोग 
 -    पारीस येथील एक महिना
 -   लिव्हरपूल येथील त्रैवार्षिक युनिटेरियन परिषद
 -    ऑक्सफर्डमधील शेवटची टर्म
 -    ऍमस्टरडॅम येथील आंतराष्ट्रीय उदार धर्मपरिषद
 -    परतीचा प्रवास
 -    स्वदेशी आगमन, बडोदा भेट आणि
      धर्मप्रचारकार्याला प्रारंभ
 -    मद्रासच्या परिषदा आणि हिंदुस्थानचा दौरा
-    जमखंडी-मुधोळ येथील प्रचारकार्य
 -    काठेवाडचा दौरा 
 -    मुंबईतील बि-हाड आणि प्रार्थनासमाजातील नवचैतन्य
 -    धर्मप्रचाराचे विस्तारित कार्य
 -    कौटुंबिक अडचणी, पुणे प्रार्थनासमाजातील नवचैतन्य
 -    धर्मप्रचारार्थ दौरा
 -    प्रवासातील अनुभव
 -    जनाबाई पनवेलमध्ये शिक्षिका
 -    विविध प्रार्थनासमाजांतील सहभाग
 -    भारतीय एकेश्वरी धर्मपरिषद
 -    ब्राह्मधर्मसूची ग्रंथ
 -    अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीविषयक कार्याचे प्रारंभिक प्रयत्न
 -    मिशनच्या स्थापनेचा संकल्प
 -    मिशनची स्थापना
 -  मिशनची घटना व पुणे येथील अंगभूत शाखा
 -    मिशनमधील दोन समारंभ 
 -    मिशनच्या स्थापनेनंतर वातावरणातील बदल
 -    निधीची योजना
 -    मुंबई प्रार्थनासमाजाशी दुरावा आणि फारकत
 -    पुण्यास स्थलांतर
 -    मिशनची महाराष्ट्र परिषद
 -    तुकोजीराव महाराजांची देणगी व मांगांचे
      शेतकी खेडे वसविण्याचा प्रयत्न
 -   अहल्याश्रमाची पूर्वतयारी 
 -    मराठ्यांची सांस्कृतिक जबाबदारी 
 -    काँग्रेसमध्ये अस्पृश्यतानिवारणाचा ठराव
 -    अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीची दिशा व मार्ग
 -    अस्पृश्यतानिवारक परिषद
 -   राष्ट्रीय प्रवाहात मराठा समाज
 -    अस्पृश्यवर्गाचे कायदेमंडळात प्रतिनिधित्व
 -    गैरसमजाचा ससेमिरा 
 -    १९२० सालातील निवडणूक 
-    शिंदे आणि ब्राह्मणेतर पक्ष
 -    कुटुंबातील मृत्यू
 -    मुलींसाठी सक्तीचे शिक्षण
 -    मद्यपाननिषेधाची चळवळ व अन्य सामाजिक कार्य
 -    मिशनचा कार्यविस्तार : कर्नाटक-मध्यप्रांतातील शाखा 
 -    मिशनसंबंधी आक्षेप व समस्या
 -    मिशनची पुनर्घटना
 -    खटल्याचा दैवदुर्विलास
 -    मिशनमधील सहकारी व सहका-यांच्या
       दृष्टीतून विठ्ठल रामजी शिंदे
 -    मंगलोरमधील कार्य
 -   व्हायकोम सत्याग्रह
 -    मंगलोर ब्राह्मसमाजातील पेचप्रसंग
 -    कौटुंबिक उपासनामंडळ
 -    सत्याग्रहात सहभाग आणि नेतृत्व
 -    अस्पृश्यतानिवारणाचे कार्य व म. गांधीशी संबंध
 -    येरवड्याच्या तुरुंगात
 -    ब्रह्मदेशाची यात्रा 
 -    शेतकरी चळवळ
 -    परिषदा, संमेलने यांमधील सहभाग
 -   कौटुंबिक वातावरण
 -    बहुमान, अवमान आणि निष्ठा
 -    वाई ब्राह्मसमाज आणि ग्रामीण भागातील धर्मकार्य
 -    विचारविश्व
 -    साहित्यसेवा आणि संशोधनकार्य
 -   अपूर्व स्नेहसंमेलन
 -   अखेरचे दिवस
 -   उपसंहार 
 -   परिशिष्टे १/२ आणि ३ 
 -   मनोगते
 -   महर्षी शिंदे यांचे फोटो व काही हस्तलिखिते