महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य

जनाबाईंची संसारकथा

विठ्ठल रामजी शिंदे यांनी भावी आयुष्यात जे उन्नत धर्मप्रसाराचे आणि अस्पृश्यतानिवारणाचे कार्य केले त्या कार्यात त्यांच्या भगिनी जनाबाई यांनी त्यांना समरसून आयुष्यभर साथ केली. वस्तुत: बालपणीच विवाह झालेल्या जनाबाईंचे आयुष्य आसंगी या खेडेगावी आपल्या सासरी विवाहीत स्त्रीचा ठरीव जीवनक्रम कंठण्यात जावयाचे. त्याऐवजी धार्मिक-सामाजिक स्वरूपाचे कार्य करण्याची कर्तबगारी त्यांनी दाखविली. जनाबाईंच्या सामाजिक जीवनाची बाजू उदात्त तर त्यांच्या व्यक्तिगत जीवनाची बाजू तेवढीच करूण. सामाजिक कार्य घडण्याच्या दृष्टीने जनाबाईंच्या व्यक्तिमत्त्वाची घडण त्यांच्या पुण्याच्या वास्तव्यातच झाली. त्यांच्या जीवनाला हे आकस्मिक वळण मिळाले त्याचे मूळ त्यांच्या पूर्वायुष्याच्या कर्मकहाणीमध्ये आहे.

जनाक्काचा जन्म १८७८च्या कार्तिक महिन्यात झाला. त्या विठूअण्णापेक्षा ५ वर्षांनी लहान. लहानपणापासून अंगाने बाळसेदार आणि सगळ्या भावंडांत रंगाने उजळ. जमखंडीपासून १६ मैल अंतरावर असलेल्या आसंगी गावचे गोपाळराव कामते हे रामजीबाबांतचे स्नेही. गोपाळराव आसंगीतले सुखवस्तू शेतकरी. शिवाय त्यांची सावकारीही असायची. त्यांचा असा विचार होता की आपली मुलगी लक्ष्मीबाई विठूअण्णास द्यावी आणि जना ही आपला मुलगा कृष्णराव ह्यास करून घ्यावी. परंतु लक्ष्मीबाईंची पत्रिका विठूअण्णाच्या पत्रिकेस जुळली नाही, म्हणून तो विचार दोन्ही कुटुंबास सोडून द्यावा लागला. मात्र कृष्णराव-जनाची सोयरीक ठरली आणि एकाच मांडवात भाऊअण्णा, विठूअण्णा आणि जना यांची लग्ने झाली.

गोपाळराव कामते यांना शिक्षणाचे महत्त्व फार वाटत असे. विठूअण्णा शिक्षणात हुशार म्हणून त्यांना त्यांचे फार कौतुक वाटे, तर त्यांचा मुलगा-जनाचा नवरा-कृष्णराव ह्याला शिक्षणाची अगदी नावड, म्हणून खंत वाटे. मुलगा शिकत नाही तेव्हा निदान सुनेने तरी शिक्षणात प्रगती करावी अशी त्यांची फार इच्छा होती. म्हणून जनाला शिकवावे असे त्यांनी कळविले. रामजीबाबांच्या पुढाकारानेच आणि संस्थानिक श्रीमंत आप्पासाहेब पटवर्धन यांच्या साहाय्याने जमखंडीला मुलींची शाळा सुरू झाली होती. ह्या शाळेत जनाला घालण्यात आले. विद्यार्थिनींची संख्या फार मोठी होती अशातला भाग नव्हता. जना शाळेत जाऊ लागली तेव्हा पटावर विद्यार्थिनींची संख्या सुमारे सतरा-अठरा एवढीच होती. त्यात ब्राम्हणांच्या मुली सात-आठ, मराठ्यांच्या तीन-चार, मुसलमानांच्या दोन-तीन. रामजीबाबांच्या घरचे वातावरणच असे होते, की लहानग्या जनाला शिक्षणाची आवड निर्माण व्हावी.

जना सात- आठ वर्षांची झाल्यावर तिला सासरी नेले. माहेरच्या मोकळ्या वातावरणात जना वाढलेली. भाऊअण्णा, विठूअण्णा यांच्या संगतीने ती झाडावर चढायलाही शिकली होती. सासरी गेल्यानंतर चिंचा, बोरे, पेरू इत्यादी मेवा खाण्यात ती नणंदाच्याही पुढे असायची. ती झाडावरदेखील चढते हाच एक सासरी कौतुकाचा विषय होऊन राहिला होता. रंगाने उजळ, लिहिण्यावाचण्यास शिकलेली आणि जमखंडीत प्रतिष्ठित समजल्या गेलेल्या रामजीबाबांची मुलगी सून म्हणून आणली याचा जनाच्या सासूबाई इतरांसमोर गौरवाने उल्लेख करीत.

जनाबाईच्या वयाला १२ वर्षे पूर्ण होताच तिची सासरला नांदण्यासाठी म्हणून पाठवणी झाली. त्या वेळी तिचे शिक्षण मराठी चौथ्या इयत्तेपर्यंत झाले होते. शाळेत शिकवलेल्या कविता तिच्या तोंडपाठ असायच्या. घरातील धार्मिक ग्रंथ वाचण्याचे वळण वडिलांनी लावलेले. म्हणून तिचे वाचन चौथीच्या मानाने. पुष्कळ झाले होते. भाषा विषय पुष्कळ सुधारला. वाचनाची एवढी चटक लागली होती, की विठूअण्णाची वरच्या वर्गातली मराठी पुस्तकेही ती सहज वाचायची. सासरी गेल्यावर मात्र आपण परक्या घरी आलो अशी तिला जणीव व्हायला लागली. घरामध्ये कागद म्हणून दृष्टीला पडत नसे. प्रथम प्रथम सासरची पोक्त माणसे कौतुक म्हणून तिच्याकडून कविता पाठ म्हणून घेत असत. मराठी स्पष्ट बोलणारी, टापटिपीने पोशाख करणारी, स्वभावाने चुणचुणीत म्हणून घरातील सर्वजण तिला नावाजीत. सास-याला तर तिचे एवढे कौतुक की तिला कुठे ठेऊ अन् कुठे नको असे होऊन गेले. सासुबाईंचीही तीच गत. एकदा नणंदासह ती पाणी आणायला गेली असता रस्त्यात एक सरकारी अर्जाच्या नकलेचा कागदी तुकडा तिला सापडला व ती तो वाचू लागली. सगळ्या नणंदा तिच्याभोवती गोळा होपऊन ती कसे वाचते ते टक लावून पाहू लागल्या. त्यांच्या पाठीमागे उभे राहून तिचे मामंजी लक्षपूर्वक ऐकत होते. आपली सून सरकारी कागद वाचू शकते हे पाहून त्यांचे मन कौतुकाने उचंबळून आले. तिला पोटाशी धरून ते उद्गारले, “माझी बाळ ती. आता दिवाणजीची कशाला जरूर आहे? माझी पोरच घरचा सारा हिशेबठिशेब पाहील. कागदोपत्रीचा व्यवहार ति-हाईत माणसाला राबवून करून घेण्यापेक्षा घरच्या माणसावर  सोपवलेला काय वाईट?’’१ सास-यानेच एवढे कौतुक केल्यावर इतरही सगळी कौतुक करू लागली. एरवी हेवा करणारी तिच्याच वयाची नणंदही तिला नावाजू लागली. दैवदुर्विलास असा, की जनाबाईंच्या सास-याकडून आणि इतरांकडून होणा-या कौतुकातच तिच्या कौटुंबिक जीवनाच्या शोकात्मिकेचे बीजही पेरले गेले. सासर, सासू, नणंदा आणि शेजारपाजारची माणसे ह्या चुणचुणीत सुनेचे कौतुक न वाटणारी एकच व्यक्ती होती. ती म्हणजे जनाबाईंचे पती कृष्णराव.

जनाबाईंच्या पतीला तिच्याबद्दल मत्सर वाटावा, राग यावा असेच वातावरण निर्माण झाले होते. कृष्णराव हे सुखवस्तू जमीदाराचे एकुलते एक चिरंजीव अगदी लाडात वाढलेले. शाळेचा त्यांना कंटाळा. वडिलांनी धमकावले तर आई मधे पडून मुलाचीच बाजू घेत असे. त्यामुळे कृष्णराव अक्षरशत्रूच राहिले. बाहेर मित्रमंडळी शिकलेल्या बायकोवरून त्यांची चेष्टा करीत असत. त्याने शिक्षण घेतले नाही म्हणून वडील सतत जिव्हारी लागेल अशी भाषा वापरीत. त्यातून जनाबाईंच्या मोडी वाचनावरून तिच्या मामंजीने केलेले कौतुक सगळ्यांच्या कानी गेले होते. मित्रमंडळी त्यांना हिणवू लागली, “आता काय तुझी बायको, ओसरीवर जमाखर्चाच्या वह्या घेऊन दिवाणजीचे काम पहाणार, अन् तू मात्र ठोंब्यासारखा शेतात बैलाच्या शेपट्या पिरगाळीत राहणार.’’२ असल्या टवाळीने त्यांचा पुरुषी अभिमान डिवचला जात असे. बायकोबद्दल त्यांच्या मनात जी अढी निर्माण झाली ती अखेरपर्यंत कायम राहिली. जनाबाईला कोणत्याच प्रकारचे स्वास्थ्य नव्हते. शेतकरी सुखवस्तू असला तरी त्याच्या घरात सगळयाच बायकांना पहाटेपासून रात्रीपर्यंत राबावे लागायचे. जनाबाईंचे सासर तर चाळीस-बेचाळीस माणसांचे मोठे कुटुंब होते. पहाटेपासून रात्रीपर्यंत जनाबाईंना अपरंपार कष्ट करावे लागायचे आणि त्यातून दिलासा मिळावा असे प्रेमाचे वातावरण मात्र तिच्या वाट्याला आले नाही. नव-याचा राग उत्तरोत्तर वाढतच गेला. तिच्या हातचे जेवण तर त्यांना नकोसे झालेच, परंतु आपल्या डोळ्यांसमोरही ती दिसता कामा नये अशी सक्त ताकीद त्यांनी दिली. एक प्रकारे घरातल्या घरत नव-याकडून तिच्यावर बहिष्कार टाकला गेला. सुरूवातीला जनाबाईंचे कौतुक असणारी तिची सासू आपला मुलगा तिच्यामुळे दु:खी झाला आहे हे बघताच तीही जनाबाईंचा राग राग करू लागली.

जनाबाईंचे पती तर जास्तच बहकत गेले. जनाबाई तेरा-चौदा वर्षांची झाली तरी तिला अद्यापि स्त्रीपणा प्राप्त झाला नव्हता. त्या वेळी कृष्णराव ऐन विशीच्या उमेदीतले मातब्बर जमीनदाराचे एकुलते एक चिरंजीव. अंगापिंडाने मजबूत. संगत मात्र अशिक्षित, दुर्व्यसनी लोकांची. या सा-यांचा परिणाम म्हणून त्यांना बाहेरख्यालीपणाचा नाद लागला. बापलेकांची भांडणे होऊ लागली. कृष्णरावांनी आपल्या वडिलांना निक्षून सांगितले मला काही हिला नांदवायची नाही. तुम्ही तिला तिच्या बापाच्या घरी पाठवा. कृष्णरावांच्या बाहेरख्यालीपणामुळे विपरीत स्वरूपाची संकटे घरावर आली. घरंदाज कुटुंबाचा दुर्लौकिक होऊ लागला. त्यावरून धडा न घेता कृष्णराव जास्तच बेफाम झाले. “मला दुसरी बायको आणा” असा धोशा त्यांनी लावला. एवढेच नव्हे तर जनाबाईंचा जीव घेण्याचे कारस्थानही ते रचीत होते, असा संशय येण्याजोगी  परिस्थिती होती. या तणावाच्या परिस्थितीमुळे सासूबाईंच्या मनातही जनाबाईंबद्दल दुरावा निर्माण झाला. त्यांचे वर्तन तुटकपणाचे व्हायला लागले. इतर नणंदाही तिच्याशी तोडून वागू लागल्या. जनाबाईंचे मामंजीदेखील ह्या परिस्थितीमुळे हतबुद्ध झाले. तिच्या सासूसास-यांनी थोड्या दिवसांकरता जनाबाईला माहेरी पाठविण्याचा विचार केला. माहेरी पाठविताना तिचे दगिनेही नव-याने बरोबर नेऊ दिले नाहीत. अशा त-हेने जनाबाई माहेरी आली ती कायमचीच.

जनाबाई माहेरी आल्यानंतर एक-दोन महिन्यांतच कृष्णरावांनी एका गृहस्थास भरपूर पैसे देऊन त्याच्या मुलीशी लग्न लावले. वडिलांचा विरोध त्यांनी जुमानला नाही. विठ्ठलराव या सुमारास इंटरची परीक्षा देऊन पुण्याहून घरी आले होते. जनाबाईंची कर्मकहाणी त्यांच्या मनाला फारच लागली. जनाबाईंच्या नव-याने दुसरे लग्न केले असले तरी तिला सासरी पाठवावे, आपल्या समाजात त्याशिवाय गत्यंतर नाही असे रामजीबाबांचे मत होते. विठ्ठलराव जनाबाईला परत सासरी पाठविण्यास तयार नव्हते. त्यांचे वडील म्हणाले, “अरे बाबा, एक वेळ हत्ती पोसवेल पण लग्न झालेली, नवरा ह्यात असलेली मुलगी घरी ठेवता येणे अशक्य आहे. तू चार बुके शिकून आला आहेस तेव्हा कानात वारे शिरल्यासारखे वागू नकोस! ज्याच्याशी जन्माची गाठ बांधली आहे त्याच्याकडेच तिला पाठवूया.” पण विठ्ठलरावांनी वडिलांचे ऐकले नाही. त्यांचे म्हणणे असे पडले की, “जनाला तिचा नवरा नांदवून घेण्यास तयार नाही. आज जवळ जवळ तीन वर्षे जनाचे सासूसासरे त्याला समजावयाचा प्रयत्न करीत असताही ते  निष्फळ ठरले. शिवाय जनाच्या जिवावर तिचा नवरा उठला आहे. खुद्द जनादेखील या त्रासाला कंटाळून जीव देण्यास चालली होती. आता तर तिच्या नव-याने दुसरे लग्न करून टाकले आहे. अशा स्थितीत मी काही तिला सासरी पाठविणार नाही. तिचा नवरा आपणहून तिला नांदवण्यास घेऊन जाण्यासाठी आला तरच तिला मी पाठवीन. एरव्ही माझ्या जिवात जीव असेपावेतो मी काही तिला अंतर देणार नाही.” विठ्ठलरावांनी आपले म्हणणे कायम ठेवले आणि जनाबाई माहेरी आली ती कायमचीच.

संयुक्त हिंदू कुटुंबामध्ये स्त्रीला कोणत्या हालअपेष्टा सहन कराव्या लागतात हे विठ्ठल रामजी शिंद्यांनी आपल्या आईच्या उदाहरणानेच अनुभवले होते. विवाहीत स्त्रीचा किती परोपरीने छळ होऊ शकतो, दुःसह यातना तिच्या वाट्याला कशा येतात, तिला अवमानित स्वरूपाचे जिणे कसे जगावे लागते हे बहिणीच्या उदाहरणाने त्यांनी अनुभवले. स्त्रीचे दुःख हे त्यांच्या अंतःकरणाला झोंबले होते. विठ्ठल रामजींचा स्त्रीविषयक सहानुभूतीचा, समानतेचा आणि सुसंस्कृतपणाचा जो दृष्टिकोण तयार झाला व भावी आयुष्यात त्यांच्या कार्यातून व विचारातून जो प्रकट झाला त्याला त्यांचे स्वतःचे समाजातले निरीक्षण त्याचप्रमाणे स्वतःच्या कुटुंबातीलच आईबद्दलचा व बहिणीबद्दलचा अनुभव हाही कारणीभूत ठरला.

संदर्भ
१.    जनाबाई शिंदे, स्मृतिचित्रे, साप्ताहिक तरूण महाराष्ट्र, ४.२.१९४९
२.    तत्रैव.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य

   निवेदन
    लेखकाचे मनोगत
    दुस-या व तिस-या आवृत्तीच्या निमित्ताने
    प्रस्तावना 
 -   अंत:प्रेरणेचा निर्णय
 -   आजी-आजोबा आणि आई-वडिल
 -   बालपण 
 -   कॉलेजची पहिली दोन वर्षं
 -   जनाबाईंची संसारकथा
 -   जनाबाईंचे शिक्षण
 -   हुजूरपागा शाळा आणि शांता सुखटणकरची
     करुण कहाणी
-    इंटरमीजिएटचे दुसरे वर्ष
 -    पदवी परीक्षेचा अभ्यास आणि एकोणिसाव्या
      शतकाच्या अखेरचे पुणे
   प्रार्थनासमाजाची दीक्षा 
 -    पदवी परीक्षा
 -   अंत:स्थ भावजीवनातील खळबळ 
 -    एकेश्वरी उदार धर्मपंथ
 -    प्रार्थनासमाज
 -    धर्मशिक्षणासाठी निवड आणि परदेशगमन
 -    मुंबई ते ऑक्सफर्ड
 -     मॅंचेस्टर कॉलेज
 -    ऑक्सफर्डमधील पहिले दोन महिने
 -    नाताळची सुट्टी : मुक्काम लंडन 
 -    पत्रांचा विरंगुळा
 -    दक्षिण किना-यावरील पंधरवडा
 -    प्रोफेसरांच्या कुटुंबात सरोवर प्रांती
 -    एडिंबरो आणि स्कॉच सरोवरे
 -    हिंदू गृहस्थिती आणि समाजस्थिती 
      व्याख्यान व नाट्यप्रयोग 
 -    पारीस येथील एक महिना
 -   लिव्हरपूल येथील त्रैवार्षिक युनिटेरियन परिषद
 -    ऑक्सफर्डमधील शेवटची टर्म
 -    ऍमस्टरडॅम येथील आंतराष्ट्रीय उदार धर्मपरिषद
 -    परतीचा प्रवास
 -    स्वदेशी आगमन, बडोदा भेट आणि
      धर्मप्रचारकार्याला प्रारंभ
 -    मद्रासच्या परिषदा आणि हिंदुस्थानचा दौरा
-    जमखंडी-मुधोळ येथील प्रचारकार्य
 -    काठेवाडचा दौरा 
 -    मुंबईतील बि-हाड आणि प्रार्थनासमाजातील नवचैतन्य
 -    धर्मप्रचाराचे विस्तारित कार्य
 -    कौटुंबिक अडचणी, पुणे प्रार्थनासमाजातील नवचैतन्य
 -    धर्मप्रचारार्थ दौरा
 -    प्रवासातील अनुभव
 -    जनाबाई पनवेलमध्ये शिक्षिका
 -    विविध प्रार्थनासमाजांतील सहभाग
 -    भारतीय एकेश्वरी धर्मपरिषद
 -    ब्राह्मधर्मसूची ग्रंथ
 -    अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीविषयक कार्याचे प्रारंभिक प्रयत्न
 -    मिशनच्या स्थापनेचा संकल्प
 -    मिशनची स्थापना
 -  मिशनची घटना व पुणे येथील अंगभूत शाखा
 -    मिशनमधील दोन समारंभ 
 -    मिशनच्या स्थापनेनंतर वातावरणातील बदल
 -    निधीची योजना
 -    मुंबई प्रार्थनासमाजाशी दुरावा आणि फारकत
 -    पुण्यास स्थलांतर
 -    मिशनची महाराष्ट्र परिषद
 -    तुकोजीराव महाराजांची देणगी व मांगांचे
      शेतकी खेडे वसविण्याचा प्रयत्न
 -   अहल्याश्रमाची पूर्वतयारी 
 -    मराठ्यांची सांस्कृतिक जबाबदारी 
 -    काँग्रेसमध्ये अस्पृश्यतानिवारणाचा ठराव
 -    अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीची दिशा व मार्ग
 -    अस्पृश्यतानिवारक परिषद
 -   राष्ट्रीय प्रवाहात मराठा समाज
 -    अस्पृश्यवर्गाचे कायदेमंडळात प्रतिनिधित्व
 -    गैरसमजाचा ससेमिरा 
 -    १९२० सालातील निवडणूक 
-    शिंदे आणि ब्राह्मणेतर पक्ष
 -    कुटुंबातील मृत्यू
 -    मुलींसाठी सक्तीचे शिक्षण
 -    मद्यपाननिषेधाची चळवळ व अन्य सामाजिक कार्य
 -    मिशनचा कार्यविस्तार : कर्नाटक-मध्यप्रांतातील शाखा 
 -    मिशनसंबंधी आक्षेप व समस्या
 -    मिशनची पुनर्घटना
 -    खटल्याचा दैवदुर्विलास
 -    मिशनमधील सहकारी व सहका-यांच्या
       दृष्टीतून विठ्ठल रामजी शिंदे
 -    मंगलोरमधील कार्य
 -   व्हायकोम सत्याग्रह
 -    मंगलोर ब्राह्मसमाजातील पेचप्रसंग
 -    कौटुंबिक उपासनामंडळ
 -    सत्याग्रहात सहभाग आणि नेतृत्व
 -    अस्पृश्यतानिवारणाचे कार्य व म. गांधीशी संबंध
 -    येरवड्याच्या तुरुंगात
 -    ब्रह्मदेशाची यात्रा 
 -    शेतकरी चळवळ
 -    परिषदा, संमेलने यांमधील सहभाग
 -   कौटुंबिक वातावरण
 -    बहुमान, अवमान आणि निष्ठा
 -    वाई ब्राह्मसमाज आणि ग्रामीण भागातील धर्मकार्य
 -    विचारविश्व
 -    साहित्यसेवा आणि संशोधनकार्य
 -   अपूर्व स्नेहसंमेलन
 -   अखेरचे दिवस
 -   उपसंहार 
 -   परिशिष्टे १/२ आणि ३ 
 -   मनोगते
 -   महर्षी शिंदे यांचे फोटो व काही हस्तलिखिते