महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

बौद्ध कालांतील अस्पृश्यता

प्रकरण तिसरे
हा काळ हिंदुस्थानच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा आहे.  ह्याच काळात ह्या प्रचंड देशात अनेक दृष्टींनी अनेक क्रांत्या झाल्या.  त्या अशा :

१.  येथूनच हिंदुस्थानच्या ऐतिहासिक काळाला सुरुवात झाली.  ह्यापूर्वीच्या प्रागैतिहासिक काळातील घडामोडी बहुतेक निश्चित पुराव्याच्या अभावी अनुमानानेच ठरवाव्या लागतात.

२.  ह्या काळी हिंदुस्थानचे आद्ययुग अथवा युगे संपून, मध्ययुगाला सुरुवात होते.  ह्या मध्ययुगाचा अंमल जवळजवळ दीड हजार वर्षे म्हणजे हिंदुस्थानवर मुसलमानांच्या स्वाऱ्या होऊन त्यांचे अधिराज्य व त्यांच्या संस्कृतीचा परिणाम होऊ लागेपर्यंत चालू होता.  

३.  वैदिक आणि तत्सम इतर बाह्य संस्कृतींचा जो बरा वाईट परिणाम हिंदी समाजस्थितीवर ह्या काळापर्यंत होत होता, त्याला येथून पुढे बौध्दजनांनी चालविलेल्या सुधारणांचा विरोध होऊ लागला.  ह्या कलहात जी कालेवरून तडजोड झाली तिला बौध्द-ब्राह्मणी संमिश्र संस्कृती असे नाव देता येईल.  ह्या मिश्रसंस्कृतीचा काळ म्हणजे हे मध्ययुग होय.

४.  ह्याच युगात संस्कृत वाङमयाच्या जोडीला उत्तरदेशात पाली व प्राकृत, तशीच दक्षिण देशात तामीळ, कानडी इत्यादी तद्देशीय वाङमयाची भर पडली.

५.  ह्या युगापूर्वीच उत्तर हिंदुस्थानात बाहेरून आलेल्या आर्य, शक वगैरे प्रतापी अभिजात मानववंशांची व त्यांच्या संस्कृतीची पूर्ण प्रतिष्ठा झाली होती.  ह्या वंशांचा व संस्कृतींचा ह्या मध्ययुगाच्या आरंभापासून दक्षिण हिंदी द्वीपकल्पात जोराचा शिरकाव होऊन सुमारे ख्रिस्ती शकाच्या आरंभीच म्हणजे अर्धसहस्त्रकातच हे 'दक्षिणापथ' नावाचे द्वीपकल्प भरतखंडात - एकजीव झाले नाही तरी - सामील झाले.

६.  ह्याच मध्ययुगाच्या आरंभी अलेक्झांडरच्या स्वारीमुळे उत्तर हिंदुस्थानाचा पश्चिम आशियाशीच नव्हे तर पूर्व युरोपखंडाशीही संबंध जडला.  इतकेच नव्हे, तर या स्वारीला ज्या मौर्य साम्राज्याने यशस्वी रीतीने मागे हटविले; त्या प्रतापी आणि अस्सल हिंदी साम्राज्याने उत्तर आणि दक्षिण ह्या दोन भिन्न व तुटक हिंदी देशभागांची एका छत्राखाली संयुक्त घटना (फेडरेशन) केली.  इतकेच नव्हे तर पूर्वेकडे ब्रह्मदेश, सयाम, मलाया द्वीपकल्प आणि दक्षिणेकडे सिंहलद्वीप येथपर्यंत आपल्या संस्कृतीचे हात पसरिले.

७.  ह्या मध्ययुगापूर्वी भारतात, निदान आर्यावर्तात, ब्राह्मणी संस्कृतीचाच वरचष्मा होता.  ही संस्कृती बहुशः 'आध्यात्मिक', भावनात्मक, वाङमयविषयक ऊर्फ शाब्दिक होती.  मौय साम्राज्याचा व्यवहारवाद आणि बौध्दजनांचा शुध्द बुध्दिवाद ह्यांचे सहकार्य ह्या मध्ययुगात घडून ह्या नवीन शक्तींशी ब्राह्मणी संस्कृतीला तडजोड करावी लागली.

८.  ह्याच मध्ययुगात हिंदी समाजाची पुर्नघटना वर्णाश्रमधर्म वगैरेसारख्या अल्पसंख्याप्रेरित भावनात्मक पायावरून अर्थशास्त्राच्या आणि बहुजनसत्तेच्या नवीन पायावर झाली.

९.  ह्याच मध्ययुगात हिंदी समाजस्थितीची सुधारणा व लोकस्थितीची ऐहिक भरभराट जशी झाली तशीच भावी दुर्बलतेची आणि परवशतेची बीजेही कायमची पेरली गेली !


येणेप्रमाणे हा काळ चांगलाही आणि तितकाच वाईटही आहे.  कारण ह्या सबंध काळात बौध्द आणि ब्राह्मणी संस्कृतीची सारखी तडजोड चालली होती आणि अशा मिश्रणाचा परिणाम भरतखंडाच्या भवितव्यतेवर पुढील म्हणजे अर्वाचीन युगात अनिष्टच झाला, ह्यात नवल नाही !

असो.  आम्हाला ह्या कालात आमचा प्रस्तुत विषय जी अस्पृश्यता तिचा विकास कसा झाला हे पाहावयाचे आहे.

अस्पृश्यतेचा व्याप आणि घटना कमी-अधिक मानाने सर्व जगभर आहे हे वर सांगितलेच आहे; तरी हिंदुस्थानात ह्या घटनेला विशेष स्थैर्य आणि यश आले आहे ही गोष्ट ध्यानात घेण्यासारखी आहे.  आणि हिच्या कारणांचा शोध व मीमांसा शक्यतोवर करणे जरूर आहे.  हिंदुस्थानातही त्यातल्या त्यात उत्तरेपेक्षा दक्षिण भागात अस्पृश्यतेचा पाया अधिक खोल व दृढ रोविला असून त्याचा परिणाम कितीतरी अधिक तीव्र दिसतो, ह्याचे काहीतरी विशेष कारण असले पाहिजे.  कदचित आर्यांच्या आगमनापूर्वीही ह्या देशात ही संस्था होती किंवा काय अशी शंका मनात येते.  पण ह्या शंकेचे समाधान होण्यासारखा एकही पुरावा मिळण्याचे काही साधन आता उरले नाही.  उत्तर हिंदुस्थानातील अस्पृश्यतेचा जो विकास आम्ही वर पाहिला, आणि त्यासंबंधी आर्यांच्या वाङमयातून बौध्द काळाच्या मागे मागे जाऊन जे मिळालेले उल्लेख वर उध्दृत केले आहेत; त्यावरून एक अनुमान असे निघत आहे की, आर्यांपूर्वी ह्या देशात कायमची वसती करून राहिलेल्या धनसंपन्न मानवजाती होत्या.  त्यांच्या सहवासाने कदाचित अस्पृश्यतेचा शिरकाव आर्यांच्या समाजघटनेत झाला असावा.  हा सहवास जसजसा जास्त काळ व जास्त प्रमाणावर झाला, तसतसा हा शिरकाव जास्त झालेला दिसत आहे.  एरव्ही आर्य ग्रंथांतून शोध घेत जसजसे मागे जावे तसतसे अस्पृश्यतेचे दाखले कमी कमी का आढळावे, ह्या गोष्टीचा उलगडा नीट होत नाही.

मी दक्षिण हिंदुस्थानात तामिळ देशात समाजशास्त्राचे संशोधन करीत असता बऱ्याच मुदलियार, पिल्ले वगैरे द्राविड पंडितांनी मला सांगितले की आर्यांप्रमाणे अत्यंत प्राचीन काळी द्राविड देशातही एक प्रकारचे चातुरर््वण्य होते.  १.  किनाऱ्यावर राहणारे, २. अंतर्देशातील मैदानात राहणारे, ३. जंगलात झाडीतून राहणारे व ४. डोंगरपठारावर राहणारे, असे हे चार भिन्न समाज होते.  सांपत्तिक दृष्टया ह्यांच्यात उच्चनीच भाव होता, पण आर्यांप्रमाणे तो भेद सामाजिक होता की नाही हे तेव्हा मला समजले नाही.  बिशप कॉल्डवेल ह्यांनी 'द्राविड भाषांचे तौलनिक व्याकरण' (Camparative Grammar of Dravidain Languages)  ह्या नावाचा जो एक अत्यंत परिश्रमाने लिहिलेला अमूल्य ग्रंथ आहे, त्यात Depressed Classes म्हणजे दलितवर्गासंबंधी एक निबंध आहे.  त्यात बिशप कॉल्डवेल म्हणतात, ''द्राविड देशात जे लोक आपल्यास शूद्र म्हणवितात, ते स्वतःस शूद्र म्हणजे आर्येतर एवढयाच अर्थाने समजतात; नीच ह्या अर्थाने नव्हे.  मात्र शूद्र म्हणजे द्राविड देशाचे अस्सल रहिवासी असाही एक अर्थ शूद्र म्हणून घेण्यात आहे.  मानवी अस्पृश्य ह्यांना ते शूद्र हे बहुमानाचे नाव देत नसत.  मुदलियार ह्या शब्दाचा यौगिक अर्थच 'मूळचा' असा आहे.  ह्यावरून अस्पृश्य जे पारिया लोक त्यांना परके समजण्यात येत असे, असे दिसते.  ह्यावरून प्राचीन द्राविडांतही अस्पृश्यता स्वतंत्र रूपाने होती अशी शंका येते.  पण ह्या कल्पनेस शिलालेखी अगर वाङमयीन आधार नाहीत.''

अस्पृश्यता रूढ होण्याची दोन स्वाभाविक कारणे उघड आहेत.  पहिले जातिद्वेष अथवा वर्णद्वेष आणि दुसरे वृत्तिमत्सर.  उत्तर हिंदुस्थानात आर्यांचा जम हळूहळू बसू लागल्यावर त्यांनी जेव्हा वर्णांची व्यवस्था लाविली तेव्हा त्या व्यवस्थेत शुभ्र, ताम्र, पीत आणि कृष्ण (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र) अशा भिन्न वंशांचा समावेश यथानुक्रम करून घेतला आहे.  सर्व ब्राह्मण पांढरे, सर्व क्षत्रिय तांबडे अथवा जांभळया वर्णाचे, सर्व वैश्य पिवळे आणि शूद्र तितके एकजात काळेच होते, असे माझे म्हणणे नाही.  कातडीच्या रंगावरून वर्णांची लाविलेली उपपत्ती इतिहासज्ञ कै. राजवाडयांची आहे, माझी नव्हे.  मला ती पसंत नाही.  मात्र हे सगळेच रंग आताच्या ह्या सगळयाच वर्णांत व पोटजातीत आढळतात, त्या अर्थी ते पूर्वीही आढळले असावेत असा माझा तर्क आहे. रामकृष्ण काळे होते.  न जाणे, वसिष्ठ, वाल्मीकी, कश्यप हेही काळे असतील.  तेव्हा शुभ्रकाय ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांच्यामध्ये एतद्देशीय तांबडया, पिवळया, काळया ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्यांचा गुणकर्मानुसार परिस्थितिवशात् शिरकाव झाला असावा; आणि ज्यांच्या गुणकर्मांचा - केवळ बाह्य रंगाचाच नव्हे - तिटकारा आला, अशा घोर जंगली जातींना दूर ठेवण्याची प्रवृत्ती पूर्वीच्या आर्येतरांच्या सहवासाने आर्यांचीही झाली असावी, असे मला वाटते.  पण पुढे अर्थशास्त्राच्या पायावर आर्यांमध्ये निरनिराळया वृत्तींचा ऊर्फ धंद्यांचा विकास झाला तसतशी वर्णद्वेषात वृत्तिमत्सराची भर पडून पूर्वीच दूर ठेवलेल्या जातींमध्ये वृत्तिबहिष्कृत अशा लोकांची भर पडू लागून अस्पृश्यतेचा विस्तार होऊ लागणे संभवते.  पुढे आर्यांच्या वसाहती दक्षिण हिंदुस्थानात जसजशा होऊ लागल्या, तसतसा वर्णद्वेष आणि वृत्तिद्वेष ह्या जोडगोळीमुळे दक्षिणेकडे अगोदरच असलेल्या अस्पृश्यतेचा अधिक ऊत आला असावा हे उघड दिसते.  एरव्ही दक्षिणेकडील व उत्तरेकडील अस्पृश्यतेत इतका तीव्र फरक का असावा, हे कळत नाही.

प्रो. टी. डब्ल्यू. ऱ्हिस डेव्हिड्स या विद्वान शोधकांनी आपल्या Buddhist India  (बौध्दकालीन हिंदुस्थान) ह्या पुस्तकात (प्रकरण ४, पान ५३-५५) आर्यांच्या वर्णव्यवस्थेत बौध्दकाळी आर्थिक वृत्तिव्यवस्थेची भेसळ कशी होऊ लागली हे पाली भाषेतील निरनिराळया जातक ग्रंथांतून मार्मिक उतारे देऊन स्पष्ट केले आहे.  पुढे दिलेल्या भाषांतरित उताऱ्यावरून त्यांचा आशय स्पष्ट होईल.

''भरतखंडावर स्वारी करणाऱ्या ज्या आर्य जमाती त्यांच्या नायकांशी आपला वंशसंबंध जोडणारे 'क्षत्रिय' हे तत्कालीन समाजाचे म्होरके होते.... यज्ञयाग करणाऱ्या पुरोहितांच्या वंशावर हक्क सांगणाऱ्या ब्राह्मणांची पायरी त्यांचयानंतरची होती.  त्यांच्याखाली शेती कसणारा सामान्य जनसमाज म्हणजे वैश्यवर्ग होता.  सर्वांच्या शेवटी अनार्य वंशात जन्मलेल्या शूद्रांची गणना होत होती.  हे लोक मजुरी, हस्तकौशल्याची कामे किंवा सेवाचाकरी करीत.  हे वर्णाने इतरांपेक्षा अधिक काळे होते...

एवढयानेच हे परिगणन संपले असे नाही.  चारही वर्णांच्या तळाशी म्हणजे शूद्रांच्या खालच्या पायरीवर हलक्या जमाती व हलक्या धंद्यांचे लोक ('हीन जातीय' आणि 'हीन शिप्पाणि') असत.  'हीन जाती' मध्ये चटया विणणारे, फासेपारधी व गाडया तयार करणारे यांचा समावेश होत असे.  हे लोक हिंदुस्थानातील मूल वंशांपैकी असून वंशपरंपरेने ही तीन कामे करणारे होते.  'हीन शिल्पी' - बुरूड, न्हावी, कुंभार, कोष्टी, चांभार इ. - जे असत त्यांच्यामध्ये जन्मतः निश्चित झालेला पृथक्पणा नसे.  या 'हीन शिल्पां'पैकी एखादा धंदा सोडून दुसरा धंदा त्यास स्वीकारता येत असे व कित्येक तसे करीतही असत.  उदाहरणार्थ, पाचव्या जातकामध्ये प्रेमसंबंधात निराश झालेला एक क्षत्रिय, बिलकुल मानहानी किंवा दंड सोसावा न लागता, कुंभाराचा, बुरुडाचा, वेतकाम करणाऱ्याचा, माळयाचा आणि स्वयंपाक्याचा - इतके धंदे एकामागून एक करताना दिसतो.  सहाव्या जातकामध्ये एक वैश्य शिंप्याचा व कुंभाराचा धंदा करीत असलेला आढळतो; असे असूनही त्याच्या नातेवाईकांची त्याजविषयीची आदरबुध्दी ढळलेली दिसत नाही.

अखेर, या 'हीन जाती' व 'हीन शिल्पां'पेक्षाही तिरस्कृत असलेल्या चंडाल व पुल्कस या मूलवासीयांच्या जमाती जैन व बौध्द ग्रंथांतून उल्लेखिलेल्या दिसून येतात.''

ह्या उताऱ्यावर दिसून येते की आर्यांच्या चातुवण्यात आपसात वाटेल तशी अदलाबदल झालेली चालत असे; पण चातुर्वण्याबाहेर ज्या बहिष्कृत व तिरस्कृत जाती असत त्यांचा आत शिरकाव होत नसे.

ह्याच भागात प्रो. ऱ्हिस डेव्हिड्स ह्यांनी पान ५६, ५७ वर खालील दहा उदाहरणे जातकांच्या संदर्भासह दिली आहेत.

१.  एका क्षत्रिय राजपुत्राने आपल्या प्रीतिपात्रासाठी कुंभार, बुरूड, मालाकार इत्यादिकांची वृत्ती पत्करली तरी त्याचा सामाजिक दर्जा कमी झाला नाही.

२.  दुसऱ्या राजपुत्राने आपल्या राज्याचा वाटा आपल्या बहिणीला बहाल करून आपण वैश्यवृत्ती स्वीकारली.

३.  तिसऱ्या राजपुत्राने एका व्यापाऱ्याजवळ राहून हाताने काम करून पोट भरले.

४.  एका उमरावाने पोटासाठी तिरंदाजी केली.

५.  एका ब्राह्मणाने वैश्यवृत्तीने पैसे मिळविले.

६.  दुसऱ्या दोन ब्राह्मणांनी तसेच पोट भरले.

७.  दुसरा एक ब्राह्मण एका तिरंदाजाचा मदतनीस झाला.

८, ९.  ब्राह्मणांनी शिकारी आणि फासेपारध्याची वृत्ती चालविली.

१०.  एक ब्राह्मण सुतार झाला.

ब्राह्मण उघडपणे शेतकी करून शेळया मेंढरे राखीत असत.  क्षत्रियाने टाकलेल्या बायकोशी ब्राह्मणाने विवाह केला (जातक ५.२८०).  अनुलोमच नव्हे तर प्रतिलोम विवाहही होत असत.  म्हणजे वरिष्ठ वर्णाच्या बायका कनिष्ठांशी लग्न करून राहात.  वर उदघृत केलेले उम्मग्ग जातकातील श्रीकृष्णाने जांबवतीशी केलेल्या विवाहाचे उदाहरण लक्षात घेण्यासारखे आहे.  तरी शेवटी, सर्वश्रेष्ठ क्षत्रियापासून तो अतितिरस्कृत चंडालापर्यंत जरी भेदभाव डळमळीत होता, तरी भेदाचा खुंटा हालून हालून अधिक बळकटच होत होता अशी प्रो. डेव्हिड्सलाही कबुली द्यावी लागली आहे. (पान ६०).

गौतम बुध्दाच्या वेळची डळमळीत स्थिती मौर्य साम्राज्याच्या वेळी अस्पृश्यांपुरती तरी बळकट झालेली दिसते.  मोठमोठया शहरांत, विशेषतः पाटलीपुत्र (पाटणा) नगराच्या निरनिराळया भागांत, निरनिराळया धंद्यांच्या लोकांची वस्ती वसल्याची वर्णने मेगास्थेनीसच्या लेखांतून आणि कौटिलीय अर्थशास्त्र ह्या ग्रंथांतून आढळतात.  ह्या ग्रंथाचे अधिकरण दुसरे, प्रकरण २२, भाग चौथा, पान ५४ वर स्पष्ट उल्लेख आहे की :

पाषंडचंडालानां स्मशानान्ते वास: ।

हे पाषंड कोण नीटसे समजत नाही.  बौध्द, जैन नसावेत.  ते चार्वाक, लोकायतिक, पाशुपत असावेत; पण ते बहिष्कृत असल्यास मोठे आश्चर्य होय.  पण चंडालांची वस्ती मात्र गावाबाहेरील स्मशानाच्या पलीकडे असल्याचा हा पुरावा महत्त्वाचा आणि स्पष्ट आहे.

आर्यांची भारतीय ग्रामसंस्था फार प्राचीन आहे.  आर्य हे ह्या देशात उपरे असल्यामुळे त्यांचा अभिजात आर्येतरांशीच केवळ नव्हे, तर अनभिजात आर्येतरांशीही व्यवहार फटकून राहण्यापेक्षा मिळते घेऊन राहण्याचाच जास्त होता, व असणे जरूर होते; कारण ते जरी उपरे होते तरी दक्षिण आफ्रिकेतील हल्लीच्या शुभ्रकायांप्रमाणे त्यांच्या वसाहती मूळ देशांशी संबंध ठेवणाऱ्या दीर्घसूत्री व दृढ नव्हत्या.  हिंदी आर्यांना येथील भिन्न भिन्न आर्येतरांशी नमते घेऊन वेळोवेळी समरस झाल्याशिवाय त्यांच्या ग्रामसंस्थांची उभारणी होणे शक्य नव्हते.  ते उपरे असले तरी भारतवर्षात कायम राहण्यास आले होते.  मूळ देशांशी यांचे लागेबांधे नसून त्यांच्यामागे इंग्रज राज्यकर्त्यांप्रमाणे 'होम चार्जेस' (Home charges) चा ऊर्फ घरच्या देण्याचा ससेमिरा नव्हता.  त्यामुळे आद्य आर्यांनी भारतवर्षात आर्येतरांशी जे मुदतबंदी मजुरीचे आणि अलुत्याबलुत्याचे नियम केले ते हल्लीच्या गौरकायांपेक्षा अधिक सढळ हाताने, अधिक संभावितपणाने केलेले आढळतात, हे खालील उताऱ्यावरून दिसते.

नमस्तक्षभ्यो रथकारेभ्यश्च वो नमो, नमः कुलालेभ्यः कर्मारेभ्यश्च वो नमो,
नमो निषादेभ्यः पुज्जिष्ठेभ्यश्च वो नमो, नमः श्वनिभ्यो मृगयुभ्यश्च वो नमः ॥
माध्यन्दिन (शुक्लयजुर्वेद) संहिता, १६.२७.

यज्ञकर्माला निरनिराळी कर्मज, खनिज, प्राणिज सामग्री लागत असे, तिच्यासाठी मोठमोठे ॠत्विज वर सांगितलेल्या सच्छूद्रांच्याच नव्हे, तर निषाद, पुक्कस, श्वनी म्हणजे कुत्रे पाळणारे आणि मृगयु म्हणजे भिल्ल, इत्यादी जंगली लोकांच्याही पाया पडत.  नवरात्रात, 'घटाला वावरी', दिवाळीत 'रँगोळी' असा मोठयाने आवाज काढून रस्त्यातून ओरडत जाणाऱ्या वैदू बायांशी किंबहुना 'शॉन (शेण) घ्या वं शॉन' असे ओरडणाऱ्या भोकरवाडीतील मांगिणीशी देखील सदाशिव पेठेतील ब्राह्मणांचया बायका किती आर्जवाने वागतात, त्याचे वरील यजुर्वेदातल्या नमस्कारांशी फार सादृश्य भासते.  परंतु बौध्द आणि जैन धर्माच्या प्रसारामुळे व सहवासामुळे यज्ञक्रिया संपुष्टात आल्यावर पुढे लवकरच म्हणजे मनुस्मृतीच्या काळात सुतारलोहारादी कुशल पांचाळांची मान्यता जरी वाढलेली दिसते तरी अकुशल श्रम करणाऱ्या व अंगी विशेष क्षात्रतेज नसलेल्या आर्येतरांची गणना अस्पृश्यांत होऊन त्यांना गावाबाहेर डांबून ठेवण्यांत आलेले आढळते.  बौध्द आणि जैन धर्म जरी जातिभेद मानीत नसत, तरी त्यांच्या अमदानीत अनेक नवीन जातिसंघांना पूर्वीपेक्षाही अधिक मान्यता मिळून अशोक मौर्याच्या साम्राज्यानंतर कुशलांची वैश्य वर्गामध्ये विशेष चढती आणि अकुशलांची सामान्य शूद्रांत गणती होऊन जातिभेदाचे पर्याय फार वाढले.  बौध्दांच्या व जैनांच्या उदार विचारांमुळे यज्ञविषयक हत्या व अत्याचार यांना जरी आळा बसला, तरी सामाजिक रचनेची संकीर्णता कमी न होता उलट फार वाढली यात शंका नाही.  विशेषतः ग्रामबाह्य, हीन मानलेल्या जातींचे सारे व्यवहार हत्या व हीन कर्माशीच अधिकाधिक निगडित होत गेल्यामुळे, त्यांची अस्पृश्यता व बहिष्कार उत्तरोत्तर दुणावत व दृढावत जाणेच क्रमप्राप्त होते.  बौध्दांची अहिंसा व जैनांचा कडकडीत शाकाहार ह्यामुळे ह्या दोघांही उदारधींचा ओघ अस्पृश्यतानिवारणापेक्षा दृढीकरणाकडेच होणे स्वाभाविक होते.  उलटपक्षी यज्ञयागादी हत्येच्या अत्याचारात वावरणाऱ्या ब्राह्मणांचा सहवासच ह्या बहिष्कृत वर्गाशी अधिक असण्याचा संभव जास्त आहे, हे शूलगवादी गृह्यसूत्रांतील विधींवरून व हल्लीच्या मरीआईच्या भयंकर जत्रांवरून स्पष्ट दिसते.  मरीआईच्या जत्रेत ज्याप्रमाणे रेडयाचे डोके कापून ते गावाभोवती फिरवून शिवेवर नेऊन पुरतात किंवा वाटून खातात; तशाच प्रकारचा विधी गृह्यसूत्रांत 'शूलवग' नावाचा होता.  असो.  एकपक्षी बौध्द जैनांचा सोवळेपणा, औदासीन्य आणि वैराग्य आणि दुसरेपक्षी ब्राह्मणधर्मीयांचा हत्याप्रिय कर्मठपणा - ज्याला राजवाडयांनी आचरटपणा हे निरुक्तसिध्द समर्पक नाव दिले आहे - ह्या दोन भिन्न प्रवृत्तींचा मिलाफ होऊन बिचाऱ्या अस्पृश्यांचा बुडता पाय बहिष्काराच्या चिखलात कायमचा जो रुतला, तो रुतलाच !

मौर्य साम्राज्याच्या विस्तारामुळे आर्यांचे आणि तत्समांचे सामाजिक वर्चस्व नर्मदेच्या उत्तरेपेक्षा दक्षिणेकडे विशेष आढळते.  त्यामुळे जरी बौध्द आणि जैन ह्या उदार धर्मांचा दक्षिणेकडे प्रसार झाला तरी त्याबरोबरच मायावी आर्य राज्यव्यवस्था, कृत्रिम वर्णव्यवस्था आणि स्वार्थी ग्रामसंस्था आणि ह्या सर्वांची विषारी नांगी जी अस्पृश्यता; तिचा विशेष विकास उत्तरेपेक्षा दक्षिणेकडे अधिक झालेला समाजशास्त्राच्या दृष्टीने पाहणाऱ्यास स्पष्ट दिसत आहे.  ह्या बाबतीत प्रसिध्द समाजशास्त्री हेन्री मेन व सेन्सस रिपोर्टर आर. व्ही. रसेल ह्यांच्या ग्रंथांतील काही उल्लेख फार महत्त्वाचे आहेत, त्यांचे भाषांतर पुढे देतो.

''मद्रासेकडे मिराशी वतनबाबीचा जो कायदा आहे तो प्राचीन ग्रामसंस्थेचा कदाचित अवशेष असावा.  ह्या कायद्यान्वये जमिनीच्या मालकीचा हक्क फक्त काही थोडया वरिष्ठ जातींना देण्यात आला.  पुढे भोवतालच्या पडीक जमिनी वाहण्याचा मक्ता ह्या थोडया आद्य मालकांकडेच राखून ठेवण्यात आला.  ह्यांनीच प्रथम ही नवीन जमीन लागवडीस आणल्याशिवाय इतरांना अशा जमिनी संपादन करण्याचा हक्कच नसे.  पारिया किंवा इतर अस्पृश्यवर्गांना तर जमिनीच्या मालकीचा हक्कच नाही.'' (Russel's Tribes and castes of the Central provinces. पान ४१.) - ह्या आद्यमालकांना हल्ली मुदलियार असे नाव आहे.  मोदल (मुद्दल) हा शब्द तामीळ भाषेतील विशेशण असून त्याचा अर्थ पहिला, अव्वल, पूर्वीचा असा आहे.  मोदलियार हे अनेकवचनी रूप आहे.  ह्यावरून मोदलियार म्हणजे प्रथम वसाहत करणारे शिष्टजन असा अर्थ होतो.  ह्यावरून ही ग्रामसंस्था आर्यांच्याही आधीची द्राविडी दिसते.  मलबारात नंबुद्री ब्राह्मण हे आर्य आहेत.  त्यांनी हीच द्राविडी संस्था अधिक बळकट करून सारी जमीन आपल्याच मुठीत वळून, तद्देशीयांना पशूंप्रमाणे त्याच जमिनीवर राबविण्याची जी अमानुष रूढी पाडली आहे ती अद्यापि जारी आहे.  रसेलने सर हेन्री मेन याच्या प्रसिध्द 'ग्रामसंस्था' (Village Community) ह्या ग्रंथातून पान १२७ वर पुढील निर्णायक उतारा दिला आहे.

''मध्य आणि दक्षिण हिंदुस्थानात अशी कित्येक खेडी (गावे) आहेत की ज्याच्या शिवेला लागूनच काही जातींची वस्ती आहे.  ह्या जातींच्या माणसांचा संबंध ह्या गावातील कोणत्याही स्वाभाविक व सांघिक स्थितीशी येणे शक्य नसते.  हे लोक निसर्गतःच अस्पृश्य समजण्यात येतात.  त्यांना गावात मज्जाव असतो किंवा काही राखीव जागेतच जाण्यास त्यांना परवानगी असते.  तेव्हाही त्यांचा स्पर्श टाळण्यात येतो.  स्वतःच्या शरीरावर आपल्या मूळ जातित्वाची स्पष्ट चिन्हे वाहण्याची त्यांच्यावर सक्ती असते.  त्यांचा गावात जरी शिरकाव नसतो तरी गावाच्या बऱ्यावाईटाशी अभेद्य संबंध असलेला एक चिकटवलेला भाग म्हणून ह्या लोकांची वस्ती असते.  त्यांची वृत्ती (कामे) निश्चित असते.  त्यापैकी गावांच्या परस्पर मर्यादांचा निश्चय करणे हा एक त्यांचा मुख्य अधिकार असतो.  ह्या बाबतीत त्यांचा निकाल शेवटला समजण्यात येतो.  ह्यावरून ह्यांचा वंश भिन्न असून गावात राहणाऱ्या वसाहतवाल्यांनी त्यांच्या जमिनी बळकावल्या आहेत हे उघड दिसते.''

सर हेन्री मेन हे ह्या देशात परके असल्याने वर वर्णिलेला प्रकार 'कित्येक' खेडयांत आहे असे त्यांनी म्हटले आहे.  कारण त्यांना सर्व खेडी पहाणे शक्य नव्हते.  वस्तुतः वरील प्रकार सर्वच खेडयात आहे.  म्हणूनच गाव आहे तेथे महारवाडा आहे अशी मराठीत म्हण पडली आहे.  ह्या प्राचीन ग्रामसंस्थेचे दृश्य जितके अद्यापि महाराष्ट्रातील खेडयात स्पष्ट दिसते त्याहून अधिक स्पष्ट हिंदुस्थानात किंबहुना सर्व जगात कोठे आढळणार नाही.  उत्तरेकडील मौर्यांच्या साम्राज्यपीठाचा अपहार शुंग आणि कण्व ह्या ब्राह्मणी नोकर घराण्यांनी केल्यामुळे व ही दोन्ही घराणी दुर्बळ व राजकारणात गैरवाकब ठरल्यामुळे ती अल्पकाळात नष्ट झाली.  अशोकाच्या मागे लवकर दक्षिणेस शातवाहन नावाचे बादशाही घराणे उदयास आले.  त्याने मगध देशापर्यंत आपल्या राज्याची हद्द उत्तरेकडे नेली व दक्षिणेस त्याच्या शिवेवर तिन्ही बाजूंना समुद्राचे वलय होते.  अशा अर्थाचे किंचित अतिशयोक्तीचे शिलालेख आढळतात.  मौर्याइतके बादशाही सामर्थ्य शुंग व कण्व ह्यांच्यात नव्हते म्हणून दक्षिणेकडील शातवाहनांना बादशाही स्थापण्यास संधी मिळाली.  ती त्यांनी उत्तरेपर्यंत भिडवली.  हे शातवाहन ऊर्फ साळवी मराठी मुलखातून रट्ट अथवा महारट्ट आणि तेलगू व कानडी मुलखांतून रड्डी ह्या नावाने अद्यापि प्रसिध्द आहेत.  जमिनीची बहुतेक सर्व मालकी अथवा मिराशी ह्या अफाट प्रदेशात ह्यांच्याकडेच आहे.  कृष्णा आणि तुंगभद्रा ह्यांच्या मधला, आणि उत्तरेला माळव्यात थेट शोणभद्रेच्या खोऱ्यापर्यंत, सर्व मध्यदेश ह्यांचया निशाणाखाली आला.  ह्याला महाराष्ट्र असे मधून मधून लोक संबोधीत असत.  ह्यएन संग ह्या चिनी प्रवाशाने 'महोलोख' म्हणून जे नाव योजिले ते ह्याच महाराष्ट्र शब्दाचा अपभ्रंश असून त्या प्रवाशाने ज्या राष्ट्राची स्वभावलक्षणे वर्णिली आहेत ती सर्व मराठयांना व रड्डींना तंतोतंत जुळतात.  ह्याच महाराष्ट्रात हेन्री मेनने वर वर्णिलेली ग्रामसंस्था अद्यापि जीव धरून आहे.  ह्यातील कोणत्याही खेडयात जा, तेथे महार (माल), मांग (मादिग), चांभार (समगार) ह्यांचे प्रत्येक गावानजीक वाडे आणि बलुत्याचे वगैरे बावन हक्क आणि कामे अद्यापि कोणाही संशोधकाला तपशीलावर स्पष्ट दिसतील.  खेडयांतील पाटील ऊर्फ गौडा (ग्रामडा) - ग्रामणी असेही वेदकालचे नाव पुष्कळ ठिकाणी आढळते - हा हल्ली मराठी, तेलगू, कानडी, गुजराथी, अथवा हिंदी ह्यांपैकी कोणतीही भाषा बोलत असो, त्याचा धर्मपंथ आज वैष्णव, शैव, नाथपंथी, मानभावी, लिंगायत, जैन, किंबहुना मुसलमानीही असो, परंतु त्याचा वंश रट्टच आढळणार.  ह्या रट्टांचे अथवा रेड्डींचे व त्यांच्या प्रभावळीत गोविलेल्या महार, मांग, चांभार ह्या भिन्न वंशांचे सहवास, सहकार्य व सहवीर्य पुरातन काळापासून आजवर अखंड चालत आलेले आहेत.  सहवीर्य ह्या शब्दावरून रड्डींचा व ह्या बहिष्कृतांचा शरीरसंबंध होत असावा असे सुचविण्याचा माझा इरादा नाही.  तसा पुरावा मिळाल्यास तसेही विधान मी आनंदाने करीन.  महार, मांग व रेड्डींनी शूरत्वाची कृत्ये सहकार्याने केली, एवढाच येथे अभिप्राय आहे.  केवळ आडनावांचाच प्रश्न असता तर रट्टांच्या कुळींची नावे 'अस्पृश्यांनी' आश्रम-आश्रितसंबंधाने घेतली असावीत असे सांगून कोणीही मोकळा होईल. पण देवके, दैवते, सोएर-सुतक, स्मशानविधी, पाचवी, सट, बारसे, लग्नविधी व तत्संबंधी पुरातन चालीरीती, इ. समाजशास्त्राने महत्त्वाची मानलेल्या जाळयांची गुंतागुंती ह्या आश्रय-आश्रितांमध्ये निरखीत जाऊन जर कोणी त्यांचा माग काढीत मुळाकडे धैर्याने मागे मागे जाऊ लागला; तर तो शातवाहनांच्याच काय, पण गौतम बुध्दाच्याही मागे प्रागैतिहासिक काळात जाऊन भिडेल.  सारांश काय, तर महाराष्ट्रातील ग्रामसंस्था वेदांपेक्षाही जुनी असून शकेल, किंबहुना ती आर्यांचीच विशेष आहे की तत्पूर्वीच्या द्राविडांच्या समाजव्यवस्थेतही अंतर्भूत होती, ह्याचा ठाम निर्णय करणे अशक्य होईल.

आर्यांच्या वर्णव्यवस्थेशी भारतीय अस्पृश्यतेच्या उगमाचा व विकासाचा जितका संबंध आहे, त्याहूनही जास्त आर्यांच्या व कदाचित द्राविडांच्याही ह्या सर्वगामी ग्रामसंस्थेशी आहे.  दुसऱ्या भाषेत हीच गोष्ट सांगावयाची झाल्यास, परजातिद्वेष हे राजकीय अथवा सामाजिक कारण जितके ह्या अस्पृश्यतेच्या मुळाशी व वाढीशी संबध्द आहे, त्याहूनही जास्त स्वकीय वृत्तीचा लोभ आणि परकीयांचा मत्सर हे आर्थिक कारण भारतीय अस्पृश्यतेच्या मुळाशी, विशेषतः दक्षिण भारतातील अस्पृश्यतेच्या वाढीशी व दृढतेशी गुंतलेले आहे, असे दिसते.  जेथे जेथे उपऱ्या नेत्यांनी तद्देशीयांच्या जमिनी व राज्ये बळकावली आहेत, तेथे तेथे असल्या ग्रामसंस्था ऊर्फ मालकी व बलुत्यांचे विपरीत संबंध निर्माण झाले आहेत.  आधुनिक मुदतबंदी मजुरीची पध्दत आणि वसाहतीतील आगमनिर्गमाचे सर्व कायदेकानू असल्या ग्रामसंस्थांची म्हणजे स्वकीय वृत्तिलोभाची व परजातिद्वेषाची स्पष्ट घेतके होत, ह्यात काय संशय आहे ?

भारतीय वर्णव्यवस्थेत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे त्रैवर्णिक आर्य समजले जातात; आणि शूद्र हा मागाहून ह्या व्यवस्थेत आर्यांनी आपलासा करून घेतलेला भिन्न वंश, सामान्यतः सर्व भारतात - विशेषतः दक्षिण भारतात - द्राविडवंशी समजला जातो.  हा भेद केवळ मानीव वर्णव्यवस्थेच्या दृष्टीने झाला.  पण ग्रामसंस्थेच्या आर्थिक दृष्टीने पाहता मालकी अथवा मिराशी आणि बलुते ह्यांचा निकष लागला तर आर्य आणि द्राविड ह्यांची सर्वत्र भेसळ झालेली आढळेल.  पुष्कळ ठिकाणी द्राविडवंशी शूद्र समजले जाणारे ग्रामणीचा ऊर्फ मालकीचा किंवा मिराशीचा हक्क भोगणारे संपन्न अवस्थेत आढळतात, तर उलटपक्षी वर्णगुरू म्हणविणारे ब्राह्मण जोशी, वैद्य, देवपूजक, गुरव इत्यादिकांच्या हीन वृत्तीवर किंवा बलुत्याच्या हक्कावर तृत्प असतात.  तसेच काही अर्धवट रजपूत मध्यप्रांतात हाळब, रामोशी, जागले, चौघुले ह्या नात्याने अशांच्या हीनवृत्ती चालवून गुजराण करताना आढळतात.  पण ह्यांपैकी कोणीही अस्पृश्य झाले नाहीत, किंवा अशा हीनवृत्तींना कायमचे चिकटले नाहीत.  हल्लीच्या अस्पृश्य जातीच मात्र ह्या वर्तनावर पाणी सोडून स्वतंत्रपणे कोणी निर्वाह चालवू म्हटल्यास त्याच्यावर वरिष्ठ वर्गांकडून जबरी होते.  बाहेर तर काय, प्रत्यक्ष हिंदुस्थानातील युरोपिअनाने चालविलेल्या चहाच्या व निळीच्या मळयांवर मुदतबंदीने राबणाऱ्या एखाद्या मजुराचा खून झाला तरी त्याची लवकर दाद लागत नाही; त्याचप्रमाणे एखाद्या महाराने मेलेले ढोर ओढण्याचे नाकारले म्हणून त्याचा खून झाल्याच्या आरोपावरून हायकोर्टापर्यंत खटले चालूनही पुराव्याच्या अभावामुळे कोणास शासन न झाल्याची उदाहरणे अद्यापि आढळतात !  एकंदरीत ह्या ग्रामसंस्थेमुळे वरील चार वर्णांपैकी समजले जाणाऱ्या सर्व ग्रामस्थांचा योगक्षेम नीट चालून, ग्रामबाह्यांच्या मात्र उन्नतीच्या सर्वही वाटा बंद झाल्या आहेत.  ''असुनि जन्मभूमी ज्याची होत बंदिशाळा ।  परवशतापाश दैवे ज्यांच्या गळां लागला ॥''  ही चोराची उलटी बोंब पुनः ह्याच वरिष्ठांच्या तोंडून त्यांच्या दुष्कर्मविपाकामुळे हल्ली ऐकू येत आहे !

अस्पृश्यांची बलुती आणि बावन वतने म्हणजे वेदांत वर्णिलेला शुकनलिकान्याय होय.  पिंजऱ्यातला पोपट दार उघडले की पळून जाईल, पण पारध्याची नलिका आपल्याच पायाने घट्ट धरलेला पोपट प्रत्यक्ष पारधी येऊन ओढू लागला तरी ती सोडीत नाही असे जे हरिदास रसभरीत रीतीने सांगत असतात, त्यात मोठे धार्मिक तत्त्व आहे.  ह्या बलुत्यांच्या हक्कापायी भारतीय अस्पृश्य जातींची मानसिक अवनती किती झाली आहे आणि मुदतबंदी मजुरीचा प्रयोग निदान हिंदुस्थानात तरी किती पूर्ण यशस्वी झाला आहे, ह्याची ही क्षुद्र बलुती स्पष्ट द्योतके आहेत.  अलीकडे अस्पृश्यांनी अस्पृश्योध्दारासाठी ज्या परिषदा भरविल्या आहेत व जे प्रयत्न चालविले आहेत, त्यातून चालू असलेली त्यांच्यातील सुधारकउध्दारकांची खेचाखेची म्हणजे वरील शुकनलिकान्यायच होय.  डॉ. आंबेडकर ह्यांचे बिल ह्या वतनी न्यायामुळेच पास होत नाही.  ह्याला कारण स्वतः अस्पृश्यच !

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाड्मय

   संपादकीय
   महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जीवनपट
   प्रस्तावना
   विभाग पहिला - प्रबंध
 -    सामान्य आलोचन 
 -    पुरातन अस्पृश्यतेचे निरुपदर्शन
 -   बौद्ध कालांतील अस्पृश्यता
-    मनुस्मृतिकालीन अस्पृश्यता   
 -   उत्तरयुगीन अथवा अर्वाचीन अस्पृश्यता
-    ब्रह्मदेशांतील बहिष्कृतवर्ग
-    संख्या आणि लक्षणें
-    नांवांची व्युत्पत्ति व इतिहास
-    धर्म 
-    सामाजिक स्थिती
-    राजकारण
   विभाग दुसरा - लेख व व्याख्याने
 -   Elevation of the Depressed Classes
 -   A Mission for the Depressed
     Classes : A Plea
 -   The Depressed Classes Mission Society
      of India
 -   बहिष्कृत भारत
 -   निराश्रित साहाय्यक मंडळी
 -   भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळीची संस्थापना
 -   डिप्रेस्ड क्लासेस मिशनची चवथी जयंती
 -   एकनाथ व अस्पृश्य जाती
 -   अस्पृश्यवर्गाची उन्नती
 -   डी.सी. मिशनचा १७वा वाढदिवस
 -   अस्पृश्यतानिवारणाचा आधुनिक इतिहास
 -   अस्पृश्यता व हिंदूचा संकोच
 -   पूर्व बंगाल्यातील अस्पृश्यवर्गाच्या उच्च शिक्षणाची प्रगती
 -   अस्पृश्यांचे शेतकी परिषद
 -   अस्पृश्यांचे राजकारण
   विभाग तिसरा - परिशिष्टे
 -   १८९८ सालचा रोजनिशीतील उतारा
 -   अस्पृश्यांचा गैरसमज
 -   स्वाशय निवेदन
 -   हेच आमचे उत्तर
 -   अस्पृश्योद्धाराच्या मार्गातील धोंड
 -   अस्पृश्यता घालविण्याचा बिनतोड उपाय
 -   अस्पृश्यतेचा प्रश्न
 -   सांप्रदायिक अस्पृश्यता
 -   महर्षी शिंदे व महात्मा गांधी यांच्यातील पत्रव्यवहार 
   साउथबरो कमिशनपुढील साक्षी
     o    महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
     o    ॉ. बाबासाहेब आंबेडकर
     o   श्री भास्करराव जाधव
     o    श्री गणेश आकाजी गव
 -   Brahm Samaj The Depressed Classes
     & Untouchability &  V. R. Shinde's work
 -   V. R. Shinde : Thakkar Bapa
   विभाग चौथा - अहवाल
 -   The Mission for the Depressed Classes
     (1906-1912) 
 -   The Depressed classes Mission society
     of  India
 -   The Second annual Report (Depressed
     Classes Mission Society of India
 -   APPENDIX A TO -
 -  The Fourth Annual Report Depressed       
    Classes Mission Society of India

-   List of Donors Subscribers  
 -   APPENDIX A TO -
-   The Fifth Annual Report
 -   List of Subscribers
-   The Sixth Annual Report
-   The Fourth Annual Report-Poona Branch
The Depressed Classes Mission
    society of india
The Depressed Classes Scholarships
 -   भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळींची
     महाराष्ट्र परिषद सन १९९२                
 -   भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळींची
     महाराष्ट्र परिषद पहिला
दिवस        
 -   भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळींची
     महाराष्ट्र परिषद दुसरा दिवस
 -   भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळींची
     महाराष्ट्र परिषद तिसरा दिवस
 -   परिषद फंडाकरिता मदत देणा-यांची नावे
 -   पुण्यातील मेहेतर लोकांच्या अडचणी   
 -   भारतीय निराश्रित साह्यकारी व साह्यकारक मंडळी