महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

मनुस्मृतिकालीन अस्पृश्यता

प्रकरण चौथे

मनुस्मृतीचा काळ अद्यापि नक्की ठरत नाही.  पण मनुस्मृती हल्ली ज्या स्थितीत आढळते ती गुप्त साम्राज्याच्या वेळची असावी असा तर्क करण्यास पुष्कळ जागा आहे.  ह्या वेळी बौध्द संस्कृतीचा पूर्ण नायनाट झाला नसला तरी ती घसरणीला खास लागली होती आणि त्याच मानाने ब्राह्मणी संस्कृतीची मेढही प्रतिष्ठित झाली होती.  इतर गोष्टी कशाही असोत, आमच्या पूर्वोक्त व्याख्येबरहुकूम असलेली अस्पृश्यता उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम म्हणजे सर्वच भारतखंडात रूढ झाली होती.  मानवधर्मशास्त्राच्या ऊर्फ मनुस्मृतीच्या १० व्या अध्यायात चंडाल, पुक्कस, निषाद वगैरे मानववंशांची जी ऐतिहासिक मीमांसा केलेली आहे, ती शुध्द इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत निराधार आहे.  ह्या काळी वर्णव्यवस्था बौध्द संस्कृतीच्या शेगडीतून जळूनपोळून वर्णत्वाचा तिचा आत्मा नाहीसा होऊन हल्लीच्या जातिभेदाच्या स्वरूपाला येऊन पोहोचली होती.  चंडालादी स्वतंत्र मानववंश असून त्यांची उपपत्ती ब्राह्मण स्त्रिया आणि शूद्र पुरुष ह्यांची संकरजात अशी कारणे म्हणजे केवळ वर्णद्वेषाचे खूळ होय.  हे खूळ गुप्तकाळापासून पुढे आतापर्यंत सारखे वाढतच आहे.  वर्णसंकर झाला नाही असे कोणाचेही म्हणणे नाही.  पण हल्लीच्या सर्व जाती केवळ वर्णसंकरामुळेच झाल्या आणि ब्राह्मण शिवायकरून सर्व जाती वर्णसंकरजन्यच आहेत, आणि त्यातल्या त्यात अस्पृश्य वंश म्हटले की, केवळ वर्णसंकरापलीकडे त्याला अस्तित्वच नाही, ही उपपत्ती खास ऐतिहासिक नाही.  मनुस्मृतीच्या १० व्या अध्यायातला चौथा श्लोक खालीलप्रमाणे आहे :

ब्राह्मणः क्षत्रियो वैश्यस्त्रयो वर्णां द्विजातयः ।
चतुर्थ एकजातिस्तु शूद्रो नास्ति तु पंचमः ॥

अर्थ  :   ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे तीन वर्ण दोनदा जन्मतात; म्हणजे एकदा सृष्टिक्रमाने व मागून उपनयन संस्काराने.  शूद्र सृष्टिक्रमाप्रमाणे एकदाच जन्मतो.  ह्या चारांपेक्षा पाचवा असा वर्णच नाही.

पाचवा वर्ण नाही, आणि अस्पृश्य जातीची लोकसंख्या तर भारतात चोहोकडे पसरली आहे, हे पाहून त्यांच्या उपपत्तीची काळजी ह्या स्मृतिकाराला पडली.  आणि त्यांच्या हीनत्वाचा नगारा मोठयाने वाजविण्यासाठी वर्णसंकराशिवाय दुसरा तोडगा त्याला कोणता मिळणार ?  तो तोडगा त्याच अध्यायात श्लोक १२ मध्ये, येणेप्रमाणे वर्णिला आहे :

शूद्रादायोगवः क्षत्ता चंडालश्चाधमो नृणाम् ।
वैश्यराजन्यविप्रासु जायन्ते वर्णसंकराः ॥

अर्थ  :  शूद्र पुरुष आणि त्याहून श्रेष्ठ अनुक्रमे वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण जातींतील स्त्री ह्यांच्यामध्ये प्रतिलोम म्हणजे उलटया शरीरसंबंधामुळे जी प्रजा होते तिला अनुक्रमे आयोगव, क्षत्ता आणि चांडाल अशी नावे आहेत; त्यांत शूद्र पुरुष आणि ब्राह्मण स्त्री यांची जी संतती तिलाच मात्र चांडाल समजून अत्यंत नीच आणि अस्पृश्य मानण्यात आले आहे.  मनूने वर्णसंकराचा जो निषेध केला आहे तो प्रतिलोमाचाच, म्हणजे खालच्या जातीचा पुरुष आणि वरच्या जातीची स्त्री ह्यांच्या संबंधाचाच केला आहे.  ह्याच्या उलट जो अनुलोम संकर त्याचा निषेध केला नाही, इतकेच नव्हे तर उलट गौरवच केला आहे.  त्याच १० व्या अध्यायात खालील दोन श्लोक ध्यानात घेण्यासारखे आहेत.

शूद्रायां ब्राह्मणाज्जातः श्रेयसा चेत्प्रजायते ।
अश्रेयान्श्रेयसीं जातिं गच्छत्यासप्तमाद्युगात् ॥६४॥
शूद्रो ब्राह्मणतामेति ब्राह्मणश्चैति शूद्रताम् ।
क्षत्रियाज्जातमेवं तु विद्याद्वैश्यात्तथैव च ॥६५॥

अर्थ  :  शूद्र कन्येला ब्राह्मणापासूनच कन्या झाली, त्या कन्येला पुनः ब्राह्मणापासूनच कन्या झाली, आणि अशा सात पिढया झाल्यावर ती अगदी ब्राह्मणच उपजली असे होते.  ह्याप्रमाणे शूद्राचा ब्राह्मण व ब्राह्मणाचा शूद्र बनतो आणि ह्याचप्रमाणे क्षत्रिय आणि वैश्यही समजावे.

ह्यावरून त्या काळच्या वर्णव्यवस्थेच्या कल्पना किती अनैतिहासिक, अस्वाभाविक, एकांगी आणि डोईजड झाल्या होत्या हे उघड होते.  अशा व्यवस्थेमुळे चोहोकडेच सर्वांचाच वर्णसंकर होऊन वर्णबाह्य अस्पृश्य जातींशिवाय शुध्द जात कोठेच उरली नव्हती; असा ह्या भयंकर तोडग्याचा खरा अर्थ होतो, हे त्या स्मृतिकाराच्या लक्षात आलेले दिसत नाही.  ह्यांत चार वर्णांतील पुरुशांचाच अपमान होतो असे नसून स्त्रीजातीलाही हीन मानल्यामुळे तिचाही भयंकर अपमान केला गेला आहे.  पुरुष म्हणजे बीज, स्त्री म्हणजे क्षेत्र, बीजालाच सर्व महत्त्व आणि क्षेत्राला काहीच नाही, अशी ही एकांगी उपपत्ती आहे.  दुसऱ्या भाषेत सांगावयाचे म्हटले तर दुसऱ्याच्या बायका बळकावायच्या आणि आपल्या बायकांना पडद्यात व सोवळयात डांबावयाचे ही हल्लीची मुसलमानांची नीती मनुस्मृतीत चांगली वर्णिलेली आहे.  'स्त्रीषु दुष्टासु जायते वर्णसंकरः' हा भगवद्गीतेचाही भावार्थ आहे.  तोही ह्याच काळाला शोभतो.  अस्सल बौध्द काळात असले अनुलोम-प्रतिलोम दोन्ही शरीरसंबंध होत होते, पण वरील कल्पनांचा गधा-गोंधळ मात्र नव्हता.  बौध्द संस्कृती किंबहुना तत्पूर्वीची खरी आर्यसंस्कृती निर्वीर्य झाल्यावरच असल्या एककल्ली विचारांना मान्यता मिळणे शक्य आहे.  सामान्य वर्णव्यवस्थेचे कसेही असो.  अस्पृश्य मानिलेल्यांच्या दुःखावर हा जो नवीनच विषारी डाग दिला गेला आहे तोच आमचा प्रस्तुत मुद्दा आहे.  वर्णद्वेष आणि वृत्तिलोभ ह्या जोडगोळीने मानीव अस्पृश्यांना हतवीर्य करून त्यांना कायमचे शारीरिक आणि बौध्दिक गुलाम बनवून, पुनः त्यांच्या वंशाची उपपत्ती अशी लावणे, म्हणजे अविवेकाचाच नव्हे तर अन्यायाचा कळस होय !

नुसती उपपत्ती लावूनच स्मृतिकार तृप्त झाले नाहीत.  ह्या मानीव वर्णसंकराच्या गुन्ह्याला खरी, कायमची आणि कडेलोटीची पुढील शिक्षा ह्याच १० व्या अध्यायात फर्माविण्यात आली आहे.

चंडालश्वपचानां तु बहिर्ग्रामात्प्रतिश्रयः ।
अपपात्राश्च कर्तव्या धनमेषां श्वगर्दभम् ॥५१॥
वासांसि मृतचेलानि भिन्नभांडेषु भोजनम् ।
कार्ष्णायसमलंकारः परिव्रज्या च नित्यशः ॥५२॥
न तैः समयमन्विच्छेत्पुरुषो धर्ममाचरन् ।
व्यवहारो मिथस्तेषां विवाहः सदृशैः सह ॥५२॥
अन्नमेषां पराधीनं देयं स्याध्दिन्नभाजने ।
रात्रौ न विचरेयुस्ते ग्रामेषु नगरेषु च ॥५४॥
दिवा चरेयुः कार्यार्थ चिह्निता राजशासनैः ।
अबांधवं शवं चैव निर्हरेयुरिति स्थितीः ॥५५॥
वध्यांश्च हनुः सततं यथाशास्त्रं नृपाज्ञया ।
वध्यवासांसि गृह्णीयुः शय्याश्चारभरणानि च ॥५६॥

अर्थ  :   चांडाल, श्वपच इत्यादी जातींनी गावाबाहेर राहावे; त्यांच्याजवळ फुटकी भांडीच असावीत; कुत्री आणि गाढवे हेच त्याचे धन; प्रेतावरील कपडे हीच त्यांची वस्त्रे; त्यांनी फुटक्या मडक्यांतच खावे; काळया लोखंडाचे दागिने ल्यावेत; नित्य भटकत असावे; इतरांनी त्याच्याशी कसलाही व्यवहार (सामोपचाराचाही) करू नये; त्यांचे विवाह त्यांच्यातच व्हावेत; त्यांना अन्न द्यावयाचे असल्यास दुसऱ्याकडून खापरांतून द्यावे; शहरांत किंवा खेडयात त्यांनी रात्री येऊ नये; दिवसा कामासाइी कायद्याने ठरविलेली चिन्हे धारण करूनच यावे; ते काम म्हणजे बेवारशी प्रेते नेणे, देहान्त शिक्षा झालेल्यांचा राजाज्ञेने वध करणे व त्यांचे कपडे, दागिने वगैरे घेणे, हे होय.

वर छंदोग्य उपनिषदाच्या ५ व्या अध्यायाच्या २४ व्या खंडातील ४ था श्लोक (पान २३ पहा) उध्दृत केलाच आहे.  त्यात स्पष्ट म्हटले आहे की चांडाळाच्या उष्टे दिले तरी वैश्वानर आत्म्यामध्ये आहुती दिल्याप्रमाणे पुण्य आहे.  हे छांदोग्याचे औदार्य कोणीकडे आणि ज्या मनुस्मृतीच्या ४ थ्या अध्यायातील खालील श्लोकांत शूद्रालाही उच्छिष्ट देऊ नये आणि चांडाल-पुक्कसांच्या तर वाऱ्यालाही उभे राहू नये असे फर्माविले आहे, तिचा कडकडीत तुसडेपणा कोठे !  बुध्दपूर्व आणि बुध्दोत्तर काळात केवढा हा फरक !

न शुद्राय मतिं दद्यात् नोच्छिष्टं व हविष्कृतम् ।
न चास्योपदिशेध्दर्म न चास्य व्रतमादिशेत् ॥८०॥

अर्थ  :  शूद्राला सल्ला देऊ नये; उच्छिष्ट किंवा हवन होऊन शिल्लक उरलेले अन्न देऊ नये; प्रत्यक्ष धर्मोपदेश किंवा प्रायश्चित्तोपदेशही देऊ नये.

साध्या शूद्रावर जर असा बहिष्कार, तर अतिशूद्राविषयी खालील श्लोकात वर्णिल्याप्रमाणे कट्टा द्वेष असावा ह्यात काय नवल !

न संवसेच्च पतितैर्न चांडालैर्न पुल्कसैः ।
न मुखैर्नावलिप्तैश्च नान्त्यैर्नान्त्यावसायिभिः ॥७९॥

अर्थ  :  पतित, चांडाल, पुल्कस, मूर्ख, गर्विष्ठ, अंत्य व अंत्यावसायी ह्यांच्याबरोबर (एका वृक्षाच्या ठिकाणी) एकत्र बसू नये.  ह्या श्लोकावर भाष्यकारांनी खालील अर्थाची पुरवणी जोडली आहे; - शूद्रजातीय स्त्रीचे ठिकाणी निषादापासून झालेला जातीने पुल्कस होत असतो; अंत्य म्हणजे परीट, चांभार, बुरुड वगैरे; चांडालापासून निषाद स्त्रीच्या ठिकाणी झालेले अंत्यावसायी होत.

मनुस्मृतीनंतर हल्लीच्या स्वरूपात आढळणाऱ्या अठरा महापुराणाचे व अनेक उपपुराणांचे विशाल मध्ययुगीन संस्कृत वाङमय लिहिले जात होते.  ह्याचा बौध्द जैन संस्कृतीशी उघड हेवादावा आणि विरोध चालत होता.  ह्या (सुमारे ५०० वर्षांच्या) काळात ब्राह्मणी संस्कृतीची बौध्दादिकांच्या विरोधाने विस्कटलेली घडी पुनः बसून अर्वाचीन समाजस्थितीचा पाया घातला जात होता.  ह्या वाङमयातून उतारे देऊ गेल्यास ग्रंथविस्तार मर्यादेपलीकडे जाईल.  अस्पृश्यतेची जी घडी वरील स्मृतीने बसविली, ती अगदी आजतागायत जशीच्या तशीच शाबूत दिसत असल्यामुळे त्या पुराणवाङमयातून नवीन ऐतिहासिक माहिती मिळण्याचीही काही आशा नाही.  म्हणून जी मिळते, ती देऊन जागा अडविणे इष्ट दिसत नाही.  वर्णसंकराची उपपत्ती जुळवून क्षत्ता, आयोगव इत्यादी ज्या अनेक संकरजन्य उपजातींचा उल्लेख मनुस्मृतिकार करतात त्यांचा आता, किंबहुना पूर्वीही, प्रत्यक्ष मागमूस आढळत नाही.  चांडाल, पुल्कस, निषाद वगैरे थोडया नावांपलीकडे आजच्या समाजस्थितीत महार, मातंग, ढोर, धेड, पारिया, चिरुमा, नामशूद्र, मेघवाल, बळहई वगैरे अनेक मानीव अस्पृश्य जातींची नावे आढळतात त्यांचा उल्लेख मनु अथवा इतर स्मृतींत किंवा पुराणांतूनही आढळत नाही आणि ह्या जाती तर ह्या विशाल देशाच्या सर्व अंगातून व कानाकोपऱ्यातून राजरोस आढळतात.  ह्यावरून एवढेच सिध्द होत आहे की आजकालच्या मानीव अस्पृश्यांची उपपत्ती केवळ वर्णव्यवस्थेच्या काल्पनिक धोरणावरून लावण्याचा आम्ही जो वर प्रयत्न केलेला आहे त्याच दिशेने पुढील शोधकांनी चालविणे अधिक शास्त्रीय ठरेल.

वर निर्दिष्ट केल्याप्रमाणे स्मृती व पुराणे हल्ली प्रचलित असलेल्या अनेक जातींची अथवा त्यांच्या नावांची मीमांसा करण्याची योग्य साधने नव्हेत, ह्यात काही मोठेसे आश्चर्य आहे असे मुळीच नव्हे.  हे ग्रंथ म्हणजे आताच्या 'सेन्सस रिपोर्ट' अथवा 'एन्थोग्राफिक सर्व्हे' ह्याप्रमाणे आधुनिक शास्त्रीय पध्दतीनुसार लिहिलेले ग्रंथ नव्हते.  बोलून चालून हे पक्षाभिनिविष्ट ग्रंथ होत.  अनुलोम-प्रतिलोम शरीरसंबंध बंद पाडून काही विशिष्ट मानीव वर्णांचा टेंभा मिरविण्याचा त्यांचा उघड उद्देश होता.  हा उद्देश साध्य करण्यास त्यांना कृत्रिम इतिहास प्रतिष्ठित करावयाचा होता.  आजदेखील डोईजड जाती अथवा वर्ग, असले बनावट इतिहास तयार करून जगाला झुलवीत आहेतच, मग आमच्या स्मृतिपुराणांनी तर मानवी स्वभावाविरुध्द काय केले आहे म्हणून आश्चर्य मानावयाचे ?  अगोदर वर्णसंकराची उपपत्ती बसवावयाची, मग त्या संकराला निषिध्द मानावयाचे आणि मग क्षत्ता, आयोगव इत्यादी संस्कृत ऊर्फ कृत्रिम नावे द्यावयाची हा सर्व प्रकार केवळ अहंमन्यतेचा विलास होय.  महार, ढोर, पारिया, चिरुमा, नामशूद्र, बळहई इत्यादी आजकालच्या 'अस्पृश्यांची' नावे निरनिराळया प्रांतांतून आढळतात, ती ह्या पुराणग्रंथांतून का आढळत नाहीत, हाही प्रश्न उद्भवतच नाही.  भिन्न धंदे, भिन्न परिस्थिती वगैरेवरून ही नावे ह्या ग्रंथानंतरच्या अलीकडच्या काळात पडलेली असावीत.  ह्या बाबींचा विचार दुसऱ्या खंडातील 'नावांच्या व्युत्पत्ती' ह्या प्रकरणात करण्यात आला आहे.  ह्यांतील काही नावे पुराण-स्मृतिग्रंथांच्या पूर्वीही होती.  उदाहरणार्थ, चांडाल, पुल्कस (पुलय), मेघ (मघ) वगैरे.  पण त्या जमातींचीही पूर्वपीठिका समाजशास्त्रान्वये ठरविताना स्मृतीचा पुरावा घेणे अगदीच अप्रयोजक आहे, हे वाचकांनी ध्यानात घ्यावे.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाड्मय

   संपादकीय
   महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जीवनपट
   प्रस्तावना
   विभाग पहिला - प्रबंध
 -    सामान्य आलोचन 
 -    पुरातन अस्पृश्यतेचे निरुपदर्शन
 -   बौद्ध कालांतील अस्पृश्यता
-    मनुस्मृतिकालीन अस्पृश्यता   
 -   उत्तरयुगीन अथवा अर्वाचीन अस्पृश्यता
-    ब्रह्मदेशांतील बहिष्कृतवर्ग
-    संख्या आणि लक्षणें
-    नांवांची व्युत्पत्ति व इतिहास
-    धर्म 
-    सामाजिक स्थिती
-    राजकारण
   विभाग दुसरा - लेख व व्याख्याने
 -   Elevation of the Depressed Classes
 -   A Mission for the Depressed
     Classes : A Plea
 -   The Depressed Classes Mission Society
      of India
 -   बहिष्कृत भारत
 -   निराश्रित साहाय्यक मंडळी
 -   भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळीची संस्थापना
 -   डिप्रेस्ड क्लासेस मिशनची चवथी जयंती
 -   एकनाथ व अस्पृश्य जाती
 -   अस्पृश्यवर्गाची उन्नती
 -   डी.सी. मिशनचा १७वा वाढदिवस
 -   अस्पृश्यतानिवारणाचा आधुनिक इतिहास
 -   अस्पृश्यता व हिंदूचा संकोच
 -   पूर्व बंगाल्यातील अस्पृश्यवर्गाच्या उच्च शिक्षणाची प्रगती
 -   अस्पृश्यांचे शेतकी परिषद
 -   अस्पृश्यांचे राजकारण
   विभाग तिसरा - परिशिष्टे
 -   १८९८ सालचा रोजनिशीतील उतारा
 -   अस्पृश्यांचा गैरसमज
 -   स्वाशय निवेदन
 -   हेच आमचे उत्तर
 -   अस्पृश्योद्धाराच्या मार्गातील धोंड
 -   अस्पृश्यता घालविण्याचा बिनतोड उपाय
 -   अस्पृश्यतेचा प्रश्न
 -   सांप्रदायिक अस्पृश्यता
 -   महर्षी शिंदे व महात्मा गांधी यांच्यातील पत्रव्यवहार 
   साउथबरो कमिशनपुढील साक्षी
     o    महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
     o    ॉ. बाबासाहेब आंबेडकर
     o   श्री भास्करराव जाधव
     o    श्री गणेश आकाजी गव
 -   Brahm Samaj The Depressed Classes
     & Untouchability &  V. R. Shinde's work
 -   V. R. Shinde : Thakkar Bapa
   विभाग चौथा - अहवाल
 -   The Mission for the Depressed Classes
     (1906-1912) 
 -   The Depressed classes Mission society
     of  India
 -   The Second annual Report (Depressed
     Classes Mission Society of India
 -   APPENDIX A TO -
 -  The Fourth Annual Report Depressed       
    Classes Mission Society of India

-   List of Donors Subscribers  
 -   APPENDIX A TO -
-   The Fifth Annual Report
 -   List of Subscribers
-   The Sixth Annual Report
-   The Fourth Annual Report-Poona Branch
The Depressed Classes Mission
    society of india
The Depressed Classes Scholarships
 -   भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळींची
     महाराष्ट्र परिषद सन १९९२                
 -   भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळींची
     महाराष्ट्र परिषद पहिला
दिवस        
 -   भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळींची
     महाराष्ट्र परिषद दुसरा दिवस
 -   भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळींची
     महाराष्ट्र परिषद तिसरा दिवस
 -   परिषद फंडाकरिता मदत देणा-यांची नावे
 -   पुण्यातील मेहेतर लोकांच्या अडचणी   
 -   भारतीय निराश्रित साह्यकारी व साह्यकारक मंडळी