महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

संख्या आणि लक्षणे

प्रकरण सातवे

अखिल हिंदुस्थानात म्हणजे ब्रिटिशांच्या व एतद्देशीय संस्थानांच्या अमलाखाली असलेल्या प्रांतांत आणि शिवाय ब्रिटिश साम्राज्याखाली आलेल्या सरहद्दीवरील देशांत अस्पृश्य गणलेल्या मोठया जनसमूहांत किती भिन्न भिन्न जातींचा समावेश होतो आणि त्या प्रत्येकाची संख्या किती आहे, तसेच ह्या अनेक जातींचे किती मुख्य लक्षणांनी पुनः वर्गीकरण होऊ शकते ह्या गोष्टी ह्या प्रकरणात पाहावयाच्या आहेत.

ह्या अफाट देशावर ब्रिटिशांचे अधिराज्य झाल्यावर येथील एकंदर जनतेची पहिली शिरगणती इ.स. १८६७ ते ७२ च्या दरम्यान झाली.  पण त्या वेळी कित्येक मोठया संस्थानांतील जनतेची गणती झाली नाही.  पुढे दोन दशकांनी म्हणजे इ.स. १८८१ आणि १८९१ साली अधिक पूर्णत्वाने खानेसुमाऱ्या झाल्या.  पण आधुनिक समाजशास्त्राच्या दृष्टीने सर्वांगपूर्ण अशी खानेसुमारी इ.स. १९०१ सालच्या मार्च महिन्याच्या पहिल्या तारखेच्या रात्री झाली.  ह्या गणनासत्राचे मुख्य अध्वर्यू एच.एच. रिस्ले आणि त्यांचे साथीदार इ.ए.गेट हे होते.  ह्यांच्या बहुमोल रिपोर्टाची अखिल हिंदी साम्राज्याची आणि प्रांतवार अजस्त्र पुस्तके इ.स. १९०३ साली प्रसिध्द झाली.  ह्याच वर्षी मी माझा विलायतेतील ऑक्सफर्ड विद्यालयातील तौलनिक धर्म आणि समाजशास्त्राचा अभ्यास आटोपून स्वदेशी परत आलो.  ब्राह्मसमाजाचा प्रचारक म्हणून पुढील कित्येक वर्षे हिंदुस्थानातील निरनिराळया प्रांतांत फिरण्याचा मला सुयोग घडला.  तेव्हा अखिल भारतातील मानीव अस्पृश्यांची स्थिती सुधारण्याकरिता सुसंघटित प्रयत्न करणारी एक भारतीय मंडळी स्थापण्याचा मी संकल्प केला.  त्याची तयारी म्हणून प्रथम मला ह्या खंडवजा देशात ह्या मानीव अस्पृश्यांची संख्या किती आहे, हे नक्की ठरविणे अवश्य वाटले.  ह्या रिपोर्टात शोधून पाहता अस्पृश्यांचे जातवार आणि प्रांतवार जे आकडे मिळाले, ते एकत्र करिता म्हणून ५,३२,३६,६३२ हा अवाढव्य आकडा तयार झालेला पाहून मी स्वतःच आश्चर्याने थक्क झालो.  पुनःपुनः तपासून पाहिले तरी हा आकडा बळकटच झाला.  शेवटी तो मी इंग्रजी दैनिकांतून आणि मराठल मासिकांतून, शिवाय स्वतंत्र पुस्तक रूपाने प्रसिध्द केला.  तोवर अस्पृश्यांची संख्या खरोखर एवढी मोठी असेल अशी कोणाची कल्पनाच नव्हती.  आश्चर्य सर्वांनाच वाटले.  पुष्कळांनी कुरकूर केली.  पण सांगोपांग विचार करून हा आकडा कमी आहे असे कोणीच सिध्द करावयाला पुढे आले नाही.  सन १९०१ ह्या वर्षी अखिल भारताची जनसंख्या २९,४३,६१,०५६ होती.  तिच्यापैकी ५ कोटीहूनही जास्त वरील संख्या अस्पृश्यांची ठरली.  त्यामुळे एकषष्ठांश भारत अस्पृश्य हे एक पुढे ब्रीदवाक्यच बनून राहिले !  त्याला अद्यापि बाधा आलेली नाही.

त्यानंतर आजवर तीन दशवार्षिक खानेसुमाऱ्या झाल्या, तरी प्रस्तुत लेखाकरिता मला इ.स. १९०१ सालच्या खानेसुमारीचा हवाला घ्यावा लागत आहे.  ह्याची कारणे अशी :  हिंदी - विशेषतः हिंदू - समाजाचे लौकिकदृष्टया जे दर्जे ठरविण्यात आले आणि त्या दृष्टीने भिन्न वर्गाचे एकूण आकडे प्रसिध्द झाले; ते ह्याच १९०१ साली.  ह्या पध्दतीचा स्वीकार मागील दशकात झाला नव्हताच, पण पुढील दशकातही झाला नाही, हे आश्चर्य !  दुसऱ्या कित्येक दृष्टीने दर्जे ठरविण्याची ही पध्दत अप्रिय, अनिष्ट व काही प्रांती तर अशक्य ठरली होती, तरी, ही योजना (Social Grouping) रिस्ले साहेबांनी इतकी मेहनत घेऊन व विरोध सोसून तयार केली नसती व तिला अनुसरून प्रांतवार आकडे मागवून प्रसिध्द केले नसते तर अस्पृश्यांचा वरील आकडा ठरविण्यास दुसरा मार्गच उरला नसता.  ह्यांचेच साथीदार इ.ए. गेट हे पुढील म्हणजे १९११ सालच्या खानेसुमारीचे प्रमुख होते, तरी त्यांनी ह्या योजनेप्रमाणे आकडे निराळे प्रसिध्द केले नाहीत.  कर्झनशाहीची कारवाई, बंगालची फाळणी, राजकारणी अस्वस्थता, हिंदु-मुसलमानांचे परस्पर संख्याबळ ठरविण्याचे महत्त्व, वगैरे आगंतुक कारणांनी अस्पृश्यांचे संख्यामापन ही अधिक नाजूक बाब होऊ लागली.  तथापि ह्या संख्येत म्हणण्यासारखा मोठा फरक पडला असावा, असे वाटत नाही.  संख्याशास्त्राच्या अनुसारे तीस वर्षांत या संख्येत भरच पडलेली असणार.  उतार होण्याचे कारण नाही.  अस्पृश्यतानिवारकांना प्रयत्नांनी अस्पृश्यतेचा जोर कमी झाला आहे.  पण त्यामुळे अस्पृश्य ठरलेल्यांची संख्या कमी होण्याचे कारण काय ?

वरील कारणांमुळे आणि गेल्या दोन दशकांचे रिपोर्ट मिळविणेही फार त्रासाचे व खर्चाचे झाल्यामुळे मी १९०१ सालचेच आकडे पुनः ह्या लेखासाठी तपासून पुढील याद्या तयार केल्या आहेत.  सत्तावीस वर्षांपूर्वी प्रांतवार अस्पृश्यांच्या काही प्रमुख जातींची संख्या प्रसिध्द केली होती.  आता लहानसान मिळतील तितक्या सर्व जातींची संख्या शोधून ती पुढे दिली आहे.  पूर्वी प्रसिध्द केलेली प्रांतवार संख्येची एकुणात ५,३२,३६,६३२ झाली; तर आता दिलेली सुमारे ३०० भिन्न जातीची एकुणात ५,०७,२९,२२४ झाली आहे.  ही सुमारे २५ लाखांची तूट आलेली आहे; ह्याचे कारण त्या वेळी अस्पृश्य मानलेल्या सर्व जातींचा ह्या नवीन यादीत समावेश केलेला नाही.  उदाहरणार्थ, छोटा नागपूर प्रांतातील ओरावन, सांताळ वगैरेंचा समावेश नवीन यादीत केलेला नाही.  कारण त्या जाती केवळ जंगली आहेत; त्यांपैकी सर्वच अस्पृश्य नाहीत.  मुंबई इलाख्यातील सुमारे २ लाख बेरडांचाही समावेश केला नाही.  कारण ह्या लोकांनी शंकराचार्यांकडे दाद लावून घेऊन स्वतःची स्पृश्यता शाबीत करून घेतली आहे.  नवीन यादीत सर्वच अस्पृश्य जातींचा समावेश झाला आहे, असेही म्हणवत नाही.  खरा आकडा ठरविणे फार कठीण, जवळ जवळ अशक्य काम आहे.  पण तो आकडा पूर्वीच्याच एकुणातीजवळ अधिक आहे असे धरून चालण्यास हरकत नाही.  काही झाले तरी एकषष्ठांश भारत अस्पृश्य ह्या विधानाला काही अद्यापि हरताळ लागत नाही.

पुढील नवीन यादीत ३०० च्या वर निरनिराळया अस्पृश्य मानलेल्या जातींची नावे व त्यांची संख्या दिली आहे.  त्यांच्या अस्पृश्यतेची पाच कारणे पुढीलप्रमाणे निरनिराळी असून शकतात.  ह्या पाच लक्षणांनुसार काही प्रमुख जातींचे येथे प्रथम वर्गीकरण करून दाखविले आहे.

१.  धंद्याच्या हीनपणामुळे

१.  मोची, चांभार, ढोर, खालपा, भांबी, डबगर (कातडयाची कामे करणारे).  
२.  धोबी, रंग्रज (रंगारी).
३.  पाशी, पारधी, बेडर, भिल्ल, बिल्लव, बागरी, किरात, वेट्टुवन.
४.  भंगी, हलालखोर, म्हेतर, डोम.
५.  सुणगार, चुन्नर, सुन्नरी (चुना करणारे).
६.  पान, होलया, भूमीज, भोई, धाशिया, ढाणक (शेतांतले गुलाम).
७.  सिंयाल (ताडीवाले), कल्लार, शानार (दारू गाळणारे).
८.  कोळी, जालीया, कैवर्त (मासे धरणारे).
९.  तुबयाझा, डोम, चंडाळ, महार (मसणवटीत काम करणारे).
१०. बांसफोर, बासोर, बुरूड (वेळूची कामे करणारे).
११. वणकर, ताती, जिनगर (शिवणे अगर विणणे करणारे).
१२.  धनगर, तांबट, तेली, कुंभार (विशिष्ट प्रांतांतच हे अस्पृश्य आहेत).
१३.  मुसाहर (उंदीर धरणारे).
१४.  चक्कलियन, शिकलगार, शक्ली (चाकावर धार लावणारे आणि कातडी कामे करणारे).
१५.  मघ, मेघ, गुरुडा, पंबाडा, दास, नाथ, जोगी, वर्णब्राह्मण, कपाली, दावली (निषिध्दधर्मी व हीन जातींची पौराहित्य करणारे).
१६.  खाटीक, कसाई.
१७.  सनाई, बाजगी, वाजंत्री, परैय्या (ढोल बडविणारे).


२.  प्राचीनकाळी स्वतंत्र, पण पुढे जिंकले गेल्यामुळे

१.  मेघ, म्हेर, म्हेतर, म्हार, मोघिया, मोगेर.
२.  मांग, मादिग, मातंग.
३.  बळहाई, ढाणके, डोम.
४.  नमशूद्र, पोड (पौंड्र), राजबंसी, कोच, मेच्च, गारो.
५.  नाग, नायकडे, नायाडी.
६.  माल, मालो, माळी.
७.  शबर, बाथुरी, बावुरी.
८.  पुलया, चिरुमा, परैया, पळळ, व्हलया.
९.  कोल, गोल्ल, कोरी, कोरवी.
१०.  येझवा, येळवा, तिय्या.
११.  तुबयाझा (अशुभ राजा), फयाचून.
१२.  चंड, मुंड, कंड, खोंड, गंड, गोंड.
१३.  ओरावन, सांताळ, हो.


३.  बौध्द व इतर पाषंड मानलेल्या धर्मांतून हिंदुधर्माच्या अमलाखाली बिनशर्त न आल्यामुळे -

परैय्या, नमशूद्र,पोड, (पौंड्र), बावुरी, सवर, येझवा, येळवा, तिय्या वगैरे.


४.  जंगली अवस्थेत राहिल्यामुळे -

भिल्ल, गोंड, खोंड, फासेपारधी, आडवीचिंची, वगैरे (ह्या जाती क्वचित अस्पृश्य भासतात.  पण त्यांना सर्रास अस्पृश्य कोटीत घालता येणार नाही.)


.  मनुस्मतीत वर्णिलेल्या प्रतिलोमामुळे - (व्यभिचारी अथवा गुन्हेगार)

भामटे, ठग, देवदासी, वाघे, मुरळया, मातंगी वगैरे.


(पण ह्यांपैकी कोणीच अस्पृश्य झालेले दिसत नाहीत.  शेवटची मातंगी अस्पृश्य आहे, पण ती मांग जातीची म्हणून; व्यभिचार करते म्हणून नव्हे.  ह्या गोष्टीवरून, मनुस्मृतीत, जी प्रतिलोम शरीरसंबंधावरून म्हणजे ब्राह्मण स्त्री व शूद्र पुरुष ह्यांच्यापासून निर्माण झालेली संतती, तिला चांडाल हे नाव देऊन तिला अस्पृश्य व बहिष्कृत ठरविले आहे, ते मत कसे निराधार आहे हे उघड होते.)

वरील वर्गीकरणात काही जातींची नावे पुनःपुनः आलेली आढळतील.  विशेषतः पाचही लक्षणांच्या जातींतील सर्वच नसल्या तरी बऱ्याच व्यक्ती आता अगदी हीन धंदे करीत असलेल्या आढळणे साहजिक आहे.  ज्या जाती पूर्वी स्वतंत्र आणि सुसंपन्न होत्या त्या कालवशात जित झाल्याने अस्पृश्य व बहिष्कृत केल्या गेल्यावर त्यांना हीन धंदे करणे प्राप्त झाले.  आधुनिक काळात त्यांना थोडा वाव मिळाल्यामुळे त्या जातींपैकी पुष्कळशा व्यक्ती वरिष्ठ धंदे करू लागल्या आहेत.  बंगाल्यात नमःशूद्र, मद्रासेकडे (मलबारात) येझवा, बिलवा वगैरेंमध्ये पुष्कळ विश्वविद्यालयाचे मोठमोठे पदवीधर, वकील, डॉक्टर, कौन्सिलर्स, पेढीवाले व पुढारी म्हणून आता चमकू लागले आहेत.  तांबट, तेली, धोबी, माळी, आणि कुंभार, धनगर अशा स्वच्छ जातीही, काही कानाकोपऱ्यांतील प्रांतांतून अस्पृश्य असलेल्या खानेसुमारीत पाहून आश्चर्य वाटते.  गुजराथेतील ढाणके व माळव्यातील बळहाई (बलाई) ह्या जाती केवळ कृषिकर्म व मोलमजुरी करणाऱ्या असून व्यवहारात मुळीच अस्पृश्य नाहीत.  आता अशा जातींची अस्पृश्यता व्यवहारात बहुतेक नष्ट झालेली आहे.  पण एकेकाळी अशांनाही हा डाग लागला होता,  ह्यावरून अस्पृश्यतेच्या प्रश्नाची व्यापकता किती मोठी आहे हे दिसते.  म्हणून ह्यांचा उल्लेख करावा लागला आहे.  ह्या जाती स्वच्छ धंदे करणाऱ्या असून आणि पूर्वीपासून ह्या अस्पृश्य होत्याच असापुरावा नसून त्या आता अस्पृश्य मानल्या जाण्याचे कारण ह्या मध्यन्तरीच्या काळात बौध्द झाल्या असल्या पाहिजेत व ह्या लवकरच ब्राह्मणी हिंदू धर्माच्या हुकमतीखाली न आल्यामुळे अस्पृश्य मानल्या गेल्या.  ह्या बाबींचा विचार पहिल्या खंडात झालाच आहे.

संख्येची आणि व्याख्येची ओढाताण

इ.स. १९०७-८ चे सुमारास मी, इ.स. १९०१ च्या खानेसुमारीतून प्रथम हिंदुस्थानातील एकंदर अस्पृश्य मानलेल्या लोकांची वट्ट संख्या पाच कोटी बत्तीस लक्ष छत्तीस हजार सहाशे बत्तीस (५,३२,३६,६३२) ही प्रसिध्द केल्यापासून ह्या प्रचंड संख्येचीच नव्हे तर माझ्या व्याख्येची सारखी ओढाताण चाललेली पाहून केव्हा केव्हा बरीच करमणूक होते !  ह्याच सुमारास बंगाल्यात फाळणीची मोठी चळवळ उडाली.  त्या वेळी हिंदु-मुसलमानांची मोठी तेढ पडली.  अस्पृश्यांना ज्या अर्थी हिंदू इतके वाईट वागवीत आहेत, त्या अर्थी त्यांच्यातील जवळ जवळ एकचतुर्थांश मानीव अस्पृश्य भागाची गणना हिंदू समजून त्यांच्यात न व्हावी अशा मुसलमानांच्या सूचना येऊ लागल्या.  उलट हिंदूंना अस्पृश्य भाग निदान राजकारणापुरता तरी आपल्यातून बाहेर फुटून जाईल की काय ही भीती पडून त्यांनी हा भाग अस्पृश्य असला तरी हिंदूच आहे असा आग्रह धरिला.  पुढे लवकरच १९११ ची खानेसुमारी होणार होती.  सरकारांनी आपले १९०१ सालचे धोरण बदलून, हिंदू समाजाच्या निरनिराळया दर्जांच्या निरनिराळया वट्ट संख्या प्रसिध्द करण्याचे सन १९११ च्या खानेसुमारीत टाळले.  अस्पृश्यवर्ग हे सर्व हिंदू नसून त्यांच्यातील बराच भाग पिशाचपूजक (Animist) असावा असे भासविण्याचा ते विचार करू लागले.  तथापि कोणी म्हणण्यासारखा उद्योग करून वरील वट्ट आकडा आणि व्याख्या परिणामकारक रीतीने बदललेली माझ्या तरी ऐकिवात नाही.  मात्र ही संख्या वरच्याहून लहान ठरेल तर बरे, अशी हिंदू, मुसलमान व सरकार ह्या सर्वांचीच अंतर्गत इच्छा - मग ती कितीही भिन्न हेतूने असो - आहे हे खरे; पण केवळ इच्छेने आकडा कसा बदलावा !

पुढील कोष्टके पाहिल्यास आर्य, द्राविड, सिथियन, मोगल इत्यादी वंशदृष्टीने गणना करून दिलेली अस्पृश्यांची वट्ट संख्या सन १९०१ साली ५,३१,९६,६३२ झाली आणि हल्लीच्या सुमारे ३०० निरनिराळया अस्पृश्य मानलेल्या जातींची प्रांतवार संख्या ५,१७,३८,६७३ च भरली असे दिसून येईल.  (पृ. ८५-८६ पाहा.)  ह्यांत जवळ जवळ १५ लाखांची तफावत येते.  तिची कारणे मी वर दिलेलीच आहे.  ह्यांपैकी मुंबई इलाख्यातच १० लाखांची तूट, तर पंजाब, काश्मीर, राजपुताना ह्या भागांत जवळ जवळ १२ लाखांची वाढ दिसून येते.  ही तफावत काही जातींची गणना एके ठिकाणी अस्पृश्यात झाल्यामुळे व दुसरीकडे त्या जातींची न होता निराळयाच जातींची झाल्यामुळे पडलेली असली पाहिजे.  माझे हे म्हणजे, प्रत्यक्ष खानेसुमारीतील सर्व प्रांतांचे आकडे पुढे ठेवून आकडे मोडण्याची दगदग केल्याशिवाय कोणाच्या लक्षात यावयाची नाही.  ह्या तीस वर्षांत अस्पृश्यतानिवारणाच्या प्रयत्नाने ही संख्या फार थोडी कमी झाली असावी.  उलट अखिल हिंदुस्थानची लोकसंख्या पाच-साडेपाच कोटींनी वाढलेली आहे.  त्या वाढीचा हिस्सा अस्पृश्यांना मिळून त्यांची संख्या ६ कोटींजवळ जाणे संभवनीय आहे.  निदान ५॥ कोटींच्या खाली जाण्याचे काही कारण नाही.

मुंबई इलाख्यात दोन वर्षांपूर्वी स्टाट्र कमिटीने चौकशी केली.  तिने ज्या जातींचा समावेश केला आहे, त्यांची वट्ट संख्या सुमारे १४ लाखच दिली आहे.  पण त्यांचे तपशीलवार आकडे न देता त्यांनी हा वट्ट आकडाच कोठून मिळविला हे कळत नाही.  माझा आकडा २१ लाख आहे, तो ३० वर्षांपूर्वीचा आहे.

ह्या संख्येचा असा गोंधळ आणि ओढाताण होण्याचे दुसरे एक मुख्य कारण असे की, अस्पृश्यांची व्याख्या ठाम करणे आणि ती ठरली तरी तशा व्याख्येबरहुकूम खानेसुमारीतील भाडोत्री गणकांकडून नेमकी गणना होणे ही सोपी गोष्ट नाही.  हिंदुस्थानात मी पहिल्या खंडात ठरविलेल्या व्याख्येप्रमाणे 'अस्पृश्य' ठरणारे वर्गच नुसते आहेत असे नव्हे, तर जंगली जाती, आणि जंगली असोत-नसोत, गुन्हेगार समजले जाणारे इतर वर्ग आहेत.  ह्या दुसऱ्या दोन भिन्न वर्गांची संख्या होता होईल तोवर माझ्या वरील कोष्टकांतून मी येऊ दिलेली नाही.  ह्या तिन्ही, म्हणजे १ अस्पृश्य, २ जंगली आणि ३ गुन्हेगार वर्गांची एकमेकांत गणनेच्या वेळी भेसळ होणे - कितीही खबरदारी घेतली तरी - अगदी सहज आहे.  राजकारणाच्या, राज्यकारभाराच्या, धर्माभिमानाच्या, सामाजिक इज्जतीच्या अगर इतर कोणत्याही अशाच आगंतुक सबबीमुळे वरील खबरदारीत ढिलाई झाली की, अस्पृश्यतेची मुळी व्याख्याच बदलते; आणि ती तशी बदललेली वरील कोणाही बेखबरदार व पक्षाभिमानी माणसांच्या अगर त्यांच्या अडाणी हस्तकांच्या मुळी लक्षातच येत नाही.  त्यामुळे संख्येविषयी हा वाद वेळोवेळी माजतो.  ह्या सर्व गोष्टी पूर्णपणे लक्ष्यात घेऊनच मी वरील कोष्टके जबाबदारीपूर्वक पुनःपुनः तपासून प्रसिध्द करीत आहे.  दहा-पाच लाख संख्या कमी झाली काय किंवा वाढली काय, ही मोठी गोष्ट नाही.  साधारण मानाने हिंदुस्थानाच्या वट्ट लोकसंख्येचा एकषष्ठांश आणि हिंदूंच्या वट्ट लोकसंख्येचा एकचतुर्थांश भाग अस्पृश्य मानला जात आहे, हे खानेसुमारीचे विधान दुर्दैवाने अद्यापि अढळच आहे.

अस्पृश्यांच्या संख्येची व व्याख्येची अशी ओढाताण चालली असता अलीकडे दोन तीन वर्षे हिंदुस्थानची राज्यपध्दती सुधारण्याचा विचार ब्रिटिश पार्लमेंट करू लागली आहे.  त्यामुळे तर सर्व जाती आणि पक्ष ह्यांमधून धुमाकूळ चालला आहे.  अशा परिस्थितीत वरील ओढाताण अधिकच वाढली आहे.  लॉर्ड लोदियनच्या प्रमुखत्वाखाली जी फ्रँचाइझ कमिटी नेमली होती, तिचा रिपोर्ट प्रसिध्द झाला आहे.  त्यात ह्या व्याख्येचा व संख्येचा सर्व बाजूंनी विचार करूनही त्यांना निर्णायक मत देता आले नाही अशी कमिटीने कबुली दिली आहे.  तरी शेवटी जी कामचलावू व्याख्या त्यांनी ठरविली, ती मी वर केलेली आहे तशीच ठरविली.  म्हणजे, धंदा, दर्जा, सांपत्तिक अथवा शैक्षणिक स्थिती कशीही असो, ज्यांना रूढीमुळे वरिष्ठ म्हणविणारे हिंदू अस्पृश्य आणि बहिष्कृत मानतात, ते सर्व अस्पृश्य होत.  ह्या लोदियन रिपोर्टाचे पुस्तक पहिले पान ११९ वर, अखिल हिंदुस्थानातील अस्पृश्यांची संख्या निरनिराळया कमिटयांनी अगर खात्यांनी कशी निरनिराळी ठरविली आहे, ते एका कोष्टकात दिले आहे.  हे कोष्टक खाली उध्दृत केले आहे.  यातील आकडे १० लाखांचे आहेत.  ह्यात संस्थानातील अस्पृश्यांचा समावेश केला नाही.  पण यानंतर येणाऱ्या माझ्या कोष्टकांतील आकडयात संस्थानी आकडे अंतर्भूत आहेत.

लोदियन कमिटीच्या रिपोर्टातील संकलनात्मक कोष्टक (PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा)


अखिल हिंदुस्थानातील (ब्रम्हदेशाशिवाय) अस्पृश्य आणि एकूण हिंदूंची प्रांतनिहाय संख्या 
(PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

 

अखिल हिंदुस्थानातील अस्पृश्यांची प्रांतवार संख्या (PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाड्मय

   संपादकीय
   महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जीवनपट
   प्रस्तावना
   विभाग पहिला - प्रबंध
 -    सामान्य आलोचन 
 -    पुरातन अस्पृश्यतेचे निरुपदर्शन
 -   बौद्ध कालांतील अस्पृश्यता
-    मनुस्मृतिकालीन अस्पृश्यता   
 -   उत्तरयुगीन अथवा अर्वाचीन अस्पृश्यता
-    ब्रह्मदेशांतील बहिष्कृतवर्ग
-    संख्या आणि लक्षणें
-    नांवांची व्युत्पत्ति व इतिहास
-    धर्म 
-    सामाजिक स्थिती
-    राजकारण
   विभाग दुसरा - लेख व व्याख्याने
 -   Elevation of the Depressed Classes
 -   A Mission for the Depressed
     Classes : A Plea
 -   The Depressed Classes Mission Society
      of India
 -   बहिष्कृत भारत
 -   निराश्रित साहाय्यक मंडळी
 -   भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळीची संस्थापना
 -   डिप्रेस्ड क्लासेस मिशनची चवथी जयंती
 -   एकनाथ व अस्पृश्य जाती
 -   अस्पृश्यवर्गाची उन्नती
 -   डी.सी. मिशनचा १७वा वाढदिवस
 -   अस्पृश्यतानिवारणाचा आधुनिक इतिहास
 -   अस्पृश्यता व हिंदूचा संकोच
 -   पूर्व बंगाल्यातील अस्पृश्यवर्गाच्या उच्च शिक्षणाची प्रगती
 -   अस्पृश्यांचे शेतकी परिषद
 -   अस्पृश्यांचे राजकारण
   विभाग तिसरा - परिशिष्टे
 -   १८९८ सालचा रोजनिशीतील उतारा
 -   अस्पृश्यांचा गैरसमज
 -   स्वाशय निवेदन
 -   हेच आमचे उत्तर
 -   अस्पृश्योद्धाराच्या मार्गातील धोंड
 -   अस्पृश्यता घालविण्याचा बिनतोड उपाय
 -   अस्पृश्यतेचा प्रश्न
 -   सांप्रदायिक अस्पृश्यता
 -   महर्षी शिंदे व महात्मा गांधी यांच्यातील पत्रव्यवहार 
   साउथबरो कमिशनपुढील साक्षी
     o    महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
     o    ॉ. बाबासाहेब आंबेडकर
     o   श्री भास्करराव जाधव
     o    श्री गणेश आकाजी गव
 -   Brahm Samaj The Depressed Classes
     & Untouchability &  V. R. Shinde's work
 -   V. R. Shinde : Thakkar Bapa
   विभाग चौथा - अहवाल
 -   The Mission for the Depressed Classes
     (1906-1912) 
 -   The Depressed classes Mission society
     of  India
 -   The Second annual Report (Depressed
     Classes Mission Society of India
 -   APPENDIX A TO -
 -  The Fourth Annual Report Depressed       
    Classes Mission Society of India

-   List of Donors Subscribers  
 -   APPENDIX A TO -
-   The Fifth Annual Report
 -   List of Subscribers
-   The Sixth Annual Report
-   The Fourth Annual Report-Poona Branch
The Depressed Classes Mission
    society of india
The Depressed Classes Scholarships
 -   भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळींची
     महाराष्ट्र परिषद सन १९९२                
 -   भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळींची
     महाराष्ट्र परिषद पहिला
दिवस        
 -   भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळींची
     महाराष्ट्र परिषद दुसरा दिवस
 -   भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळींची
     महाराष्ट्र परिषद तिसरा दिवस
 -   परिषद फंडाकरिता मदत देणा-यांची नावे
 -   पुण्यातील मेहेतर लोकांच्या अडचणी   
 -   भारतीय निराश्रित साह्यकारी व साह्यकारक मंडळी