महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळीची संस्थापना

तारीख १८ ऑक्टोबर १९०६ रोजी कार्तिकी वर्षप्रतिपदेचा शुभ दिवस आला.  दोनच दिवसांपूर्वी मुंबईतील प्रार्थनासमाजाच्या उदार उपाध्यक्षांनी अशा मंडळीची स्थापना होऊन काम सुरू व्हावे म्हणून एक हजार रुपये दिले होते.  पाडव्याच्या शुभ दिवशी सकाळी नऊ वाजता (१८ ऑक्टोबर १९०६) एल्फिन्स्टन रोड स्टेशनलगतच्या मुरारजी वालजीच्या बंगल्यात मंडळीची पहिली शाळा उघडण्याकरिता गावातील चार शिष्ट मंडळी जमली.  मंडळीचे अध्यक्ष नामदार न्यायमूर्ती चंदावरकर ह्यांनी जमलेल्या मुलांना पहिला धडा घालून देऊन मंडळीचे काम सुरू करण्यापूर्वी आपल्या भाषणात खालील अर्थांचे सूत्रवाक्य सांगितले की, ''ह्या नीच मानिलेल्या लोकांना वर आणण्याचा प्रयत्न करण्याने आम्ही स्वतःलाच वर आणीत आहो.  हे पवित्र कार्य करीत असता ह्या लोकांचा आम्ही उध्दार करणार, हा घमेंडीचा विचार आमच्या अंतःकरणात न शिरो आणि आम्हा सर्वांना ह्या घोर अन्यायामुळे जी अधोगती मिळाली आहे, ती टळून सर्वांचा सारखाच उध्दार होणार आहे.  असा साधा आणि सात्त्विभाव आम्हांमध्ये निरंतर जागृत राहो.''  आणि ह्या भावाला अनुसरूनच आज दोन वर्षे मंडळीचे काम चालले आहे.

हेतू

हिंदुस्थानातील महार, मांग, चांभार, धेड, पारिया वगैरे (विशेषेकरून पश्चिम हिंदुस्थानातील) निकृष्ट वर्गांना व इतर अशाच रीतीने निराश्रित झालेल्या लोकांना (१) शिक्षण, (२) कामधंदा, (३) ममतेची आणि समतेची वागणूक, (४) धर्म, नीती, आरोग्य आणि नागरिकता इत्यादीविषयक उदार तत्त्वांचा उपदेश व अशा इतर साधनांच्या द्वारे आत्मोन्नती करण्याचे कामी साहाय्य करणे, हा ह्या मंडळीचा हेतू असून हिच्या विद्यमाने सध्या खालील संस्था काम करीत आहेत.


शाळा

जी. आ. पी. परळ स्टेशनजवळीत नंबर १ ची इंग्रजी-मराठी शाळा आहे.  येथे हल्ली मराठी मूळाक्षरांपासून तो इंग्रजी चार इयत्तांपर्यंत शिक्षणाची उत्तम सोय केली आहे.  मुलगे १९० आणि मुली ३० शिकत आहेत.  कर्ुल्याजवळ देवनार येथील कचरापट्टीत नंबर २ ची प्राथमिक शाळा आहे.  तीमध्ये ४१ मुले आणि १ शिक्षक आहे.  भायखळा येथे नंबर ३ ची प्राथमिक शाळा आहे.  तीमध्ये १०१ मुले आणि ३ शिक्षक आहेत.  एकंदर मुलांची संख्या सरासरीने ५०० असते.  

जे. जे. हॉस्पिटलसमोर भंगी लोकांकरिता १ व महालक्ष्मी स्टेशनाजवळील कचरापट्टीत १ अशा दोन दिवसाच्या व एक रात्रीची अशा तीन गुजराथी शाळा चालू आहेत.  त्यांत १२५ मुले आहेत.

पुस्तक बांधण्याचे काम

मुलांना ५ तास सारखे शिकण्याचा कंटाळा येऊ नये म्हणून व काहीतरी हातकाम यावे म्हणून दररोज दोन तास मोठया मुलांना परळच्या शाळेत पुस्तके बांधण्याचे व लहानमोठया वह्या, ब्लॉटिंग पॅड्स वगैरे तयार करण्याचे काम शिकवण्यिात येते.


उद्योगशाळा

सन १९१२ एप्रिलपासून परलोकवासी शेठ एन. एम.वाडिया ह्यांचया इस्टेटीतून दरमहा ५०० रु. तीन वर्षेपर्यंत मिळणार असल्यामुळे मंडळीने एक उद्योगशाळा उघडली आहे.  त्यात सुतारी व शिवणकाम शिकविले जाते.


शिवणकाम

मुलींना व गिरण्यांतून काम करू न इच्छिणाऱ्या निकृष्ट वर्गातल्या, पण अब्रुदार बायकांना घर बसल्या आपले व मुलांचे कपडे शिवता यावे म्हणून त्यांना साधे शिवणकाम शिकविण्याची व्यवस्था परळच्या शाळेत केली आहे.  सध्या एक चांभाराची बाई शिकून तयार झाली आहे.


पुस्तकालय

शेठ तुकाराम जावयी, मेसर्स बाबजी सखाराम आणि कंपनी व मनोरंजक ग्रंथप्रसारक मंडळी वगैरेंच्या साहाय्याने ३०४ पुस्तके जमविली आहेत.  गेल्या वर्षी ह्यांपैकी २५८ पुस्तके वाचण्याकरिता देण्यात आली.  वाचनालयात २ देनिके, ५ साप्ताहिक पत्रे आणि ४ मासिक पुस्तके ठेवण्यात येत असतात.


मैदान क्लब

तरुण मुलांनी वाईट नादाला लागू नये म्हणून त्यांचा एक क्रिकेट फुटबॉल क्लब आहे.  विशेषेकरून शिमग्यासारख्या सणात चांदण्यारात्री शिक्षक लोकांच्या नजरेखाली आटयापाटया वगैरे खेळ खेळण्यात येतात.  सन १९०७ सालच्या होळीच्या दिवशी खेळांत हुशार ठरलेल्या गडयांस, सर भालचंद्र कृष्ण ह्यांचया हस्ते बक्षिसे वाटण्यात आली व वरील क्लब उघडण्यात आला.  हल्ली ४० मेंबर व क्रिकेटच्या तीन टोळया आहेत.  व्यायामाशिवाय ह्या क्लबमार्फत मधूनमधून व्याख्याने, संमेलने, वनभोजने इत्यादी ज्ञानवृध्दी, स्नेहवृध्दी आणि करमणूक करण्याचेही प्रकार होत असतात.


देवनार कचरापट्टी

येथे सुमारे ५०० म्युनिसिपल कामकरी अंत्यज मानिलेल्या लोकांची वसाहत आहे.  ही मुंबई म्युनिसिपालिटीच्या मालकीची जागा असून म्युनिसिपालिटीच्या हद्दीबाहेर म्हणजे ठाणे जिल्ह्यात असल्याने मंडळीने पुष्कळ प्रयत्न करूनही ह्या लोकांच्या शिक्षणाची सोय करण्याचा म्युनिसिपालिटीस अधिकारच नाही, असे शेवटी ठरले; आणि मालकी मुंबई म्युनिसिपालिटीची आहे म्हणून ठाणे जिल्ह्यातूनही शिक्षणाची व्यवस्था अद्यापि झाली नाही !  मिळून आज कित्येक वर्षे इतक्या लोकांची उणीव भरून निघाली नाही.  शेवटी तेथे वरील शाळा आपल्याच खर्चाने उघडून मंडळीने गरज भागविली.  हल्ली शेठ हाजी युसफ हाजी इस्मायल ह्यांच्या उदार मदतीने एक झोपडी बांधून तिच्यात एक दिवसा आणि एक रात्री अशा शाळा चालू आहेत.  शिवाय मंडळीकडून मधून मधून व्याख्याने, कीर्तने, बक्षीस-समारंभ वगैरे होत असतात.  


वाङमय

अस्पृश्य मानिलेल्या लोकांची कठीण स्थिती वरिष्ठ लोकांच्या नजरेस यावी व त्यांची सहानुभूती मिळावी, म्हणून इंग्रजीत तीन लहान पुस्तके छापून त्यांच्या पुष्कळ प्रती फुकट वाटण्यात येत आहेत.  शिवाय प्रमुख इंग्रजी, मराठी आणि गुजराथी पत्रांतून वेळोवेळी ह्या लोकांच्या स्थितीसंबंधी व कामासंबंधी लेख येत असतात.


निराश्रित सेवासदन

केवळ शाळा आणि दवाखाने स्थापिल्याने आणि मधूनमधून व्याख्याने दिल्याने ह्या लोकांची गृहस्थिती आणि सामाजिक स्थिती सुधारावयाची हा मंडळीचा जो मुख्य हेतू; तो अंशतःही पूर्ण व्हावयाचा नाही.  ह्या कामी काही स्वार्थत्यागी आणि श्रध्दाळू माणसांनी आपल्याला वाहूनच घेतले पाहिजे; त्यांनी ह्या लोकांच्या वस्तीत राहून, त्यांचया घरी वरचेवर जाऊन त्यांच्या बायाबापडयांना कामकाज, करमणूक, भजन, प्रार्थना इत्यादिकांच्या निमित्ताने आपल्या घरी बोलावून व एकंदरीत अशा रीतीने त्यांच्याशी मिळून मिसळून राहिले पाहिजे व मंडळीच्या ज्या निरनिराळया संस्था चालू आहेत त्याकडे त्या लोकांचे लक्ष वेधले पाहिजे; अशा प्रकारच्या एका आश्रमाची अत्यंत उणीव भासू लागली.  मंडळीच्या चालकांच्या मनात हे विचार येण्याच्या संधीस ईश्वरकृपेने त्यांची व एका उदार अंतःकरणाच्या सत्पुरुषाची अवचित गाठ पडून असा आश्रम निघत असेल तर आपण त्याच्या खर्चासाठी दरमहा शंकर रुपयांची नेमणूक करून देऊ, असे वचन देऊन १९०७ च्या फेब्रुवारी महिन्यापासून त्यांनी ही नेमणूक चालू केली !  व ता. २१ मे रोजी 'निराश्रित सेवासदन' ह्या नावाने हा आश्रम सुरू झाला.

हल्ली प्रार्थनासमाजातील दोन पुरुष व दोन स्त्रिया यांनी मंडळीचे काम अंगमेहनतीने करण्याचे पत्करिले आहे.


मंगळूर

दक्षिण कानडा जिल्ह्यात पारिया लोकांची स्थिती फारच दुःसह आहे.  मंगळूर ब्राह्मसमाजाचे सेक्रेटरी श्रीयुत के. रंगराव हे एकटेच ह्या गरीब लोकांसाठी गेली दहा वर्षे खपत आहेत.  सरकारापासून एक प्रशस्त जागा घेऊन त्यांनी आता येथे एक ऐसपैस पक्की इमारत बांधली आहे.  त्यांची अलीकडे बंद पडलेली शाळा फिरून तारीख ३ नोव्हेंबर १९०७ रोजी ह्या इमारतीत उघडण्यात आली.  हल्ली येथे पारियांची ५१ मुले शिकत आहेत.  पैकी ४ मुलांना दोन्ही वेळ जेवण घालून शाळेतच ठेवण्यात येते आणि २६ मुलांना दोन प्रहरी एक वेळ जेवण घालून रात्री घरी पाठविण्यात येते.  अशा व्यवस्थेशिवाय शाळा चालणेच शक्य नाही.  येथील ब्राह्मसमाजातील सुमारे बारा तरुणांनी एकत्र जमून एक 'तांदूळ फंड' स्थापन केला आहे.  दर रविवारी उपासनेनंतर ते घरोघर जाऊन एक एक मुष्ठीभर तांदूळ जमवितात.  तारीख २७ नोव्हेंबर १९०७ रोजी उद्योगशाळा उघडण्यात आली.  हल्ली तीत सहा माग चालू आहेत.  त्यांवर मुलांना विणकाम शिकविण्यात येते.  ह्या शाळेकरिता सध्या दोन हजार रुपयांची फार जरुरी आहे.  त्यासाठी पन्नास रुपयांचा एक असे चाळीस माग काढले आहेत, उदार गृहस्थांनी या कामी मदत करणे हे त्यांचे कर्तव्य आहे.


मंडळीच्या शाखा व संस्था

१.  मुंबई - ४ दिवसाच्या शाळा, विद्यार्थी ५००. १ वसतिगृह, विद्यार्थी २६. २ भजन समाज. १ उद्योगशाळा (सुतारी, शिवणकाम व बांधकामाचे शिक्षण )
२.  पुणे -  १ दिवसाची शाळा, विद्यार्थी २००.  १ भजनसमाज.  सुतारीचे व शिवणाचे वर्ग.  १ लायब्ररी इ.
३.  सातारा -  १ रात्रीची शाळा.  १ भजनसमाज.
४.  महाबळेश्वर - १ उद्योगशाळा (दोरखंड व नवार करणे)
५.  दापोली, ६. ठाणे व ७. मालवण - येथे गरीब विद्यार्थ्यांस मदत करणाऱ्या कमिटया.
८.  मंगळूर - १ दिवसाची व १ रात्रीची शाळा.  १ विणण्याचा कारखाना.  १ वसतिगृह.  १ साहत.
९.  मद्रास - २ दिवसाच्या व २ रात्रीच्या शाळा, विद्यार्थी १३०.
१०. हुबळी - १ दिवसाची, १ रात्रीची शाळा. १ वसतिगृह.
११. अकोला - ३ रात्रीच्या शाळा.  १ वसतिगृह.
१२.  अमरावती - २ रात्रीच्या शाळा.
१३.  भावनगर - १ दिवसाची शाळा.  १ दवाखाना.
१४.  इंदूर - १ रात्रीची शाळा.


एकूण १४ शाखांच्या २४ शाळा व ५ वसतिगृहे आहेत.  १२ इतर संस्था.  त्यांत ५५ शिक्षक व ११०० विद्यार्थी आहेत.  दरसाल मंडळीचा खर्च वीस हजार (२०,०००) रुपयांवर आहे.

येणेप्रमाणे आपल्या प्रांती ह्या हतभागी वर्गाच्या उन्नतीसंबंधाच्या प्रयत्नांची थोडक्यात हकीकत आहे.  ह्या वर्गाच्या अफाट संख्येच्या मानाने हे प्रयत्न सिंधूत बिंदूप्रमाणे फारच अल्प आहेत हे जरी खरे आहे, तथापि, ज्या महात्म्यांच्या उदार अंतःकरणात शुभ प्रेरणा होऊन ह्या अल्प प्रयत्नास सुरुवात झालेली आहे, त्यांच्या मंगल कामनेप्रमाणे त्यांनी आरंभिलेल्या प्रयत्नास काही कालाने विशाल स्वरूप प्राप्त होईल, अशी आम्ही आशा बाळगितो.

हल्ली मंडळीच्या कामाकरिता मुंबई आणि पुणे मुक्कामी इमारतीची फार नड भासत आहे.  निदान पश्चिम हिंदुस्थानातील निकृष्ट वर्गाच्या हिताकरिता मंडळीच्या मनात जे काही करावयाचे आहे, त्याच्या खर्चासाठी पैशाची फारच मोठी गरज आहे.

'ह्या नीच मानिलेल्या लोकांना वर आणण्याचा प्रयत्न करण्याने आम्ही स्वतःलाच वर आणीत आहो...' ह्या, ह्या संस्थेच्या संस्थापनेच्या वेळी संस्थेचे अध्यक्ष न्यायमूर्ती सर चंदावरकर ह्यांनी सांगितलेल्या मंत्रवाक्याचा सतत जप करून प्रत्येक महाराष्ट्रीय धनी, निर्धन, स्त्री, पुरुष, सुशिक्षित, अशिक्षित, ब्राह्मण व शूद्र शक्तयनुसार ह्या हीनदीन लोकांच्या हितासाठी तनमनधनाने प्रयत्न करील, अशी आम्ही उमेद बाळगितो.

तो सत्य संकल्पाचा दाता भगवान आमची ही मंगल कामना पूर्ण करो !

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाड्मय

   संपादकीय
   महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जीवनपट
   प्रस्तावना
   विभाग पहिला - प्रबंध
 -    सामान्य आलोचन 
 -    पुरातन अस्पृश्यतेचे निरुपदर्शन
 -   बौद्ध कालांतील अस्पृश्यता
-    मनुस्मृतिकालीन अस्पृश्यता   
 -   उत्तरयुगीन अथवा अर्वाचीन अस्पृश्यता
-    ब्रह्मदेशांतील बहिष्कृतवर्ग
-    संख्या आणि लक्षणें
-    नांवांची व्युत्पत्ति व इतिहास
-    धर्म 
-    सामाजिक स्थिती
-    राजकारण
   विभाग दुसरा - लेख व व्याख्याने
 -   Elevation of the Depressed Classes
 -   A Mission for the Depressed
     Classes : A Plea
 -   The Depressed Classes Mission Society
      of India
 -   बहिष्कृत भारत
 -   निराश्रित साहाय्यक मंडळी
 -   भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळीची संस्थापना
 -   डिप्रेस्ड क्लासेस मिशनची चवथी जयंती
 -   एकनाथ व अस्पृश्य जाती
 -   अस्पृश्यवर्गाची उन्नती
 -   डी.सी. मिशनचा १७वा वाढदिवस
 -   अस्पृश्यतानिवारणाचा आधुनिक इतिहास
 -   अस्पृश्यता व हिंदूचा संकोच
 -   पूर्व बंगाल्यातील अस्पृश्यवर्गाच्या उच्च शिक्षणाची प्रगती
 -   अस्पृश्यांचे शेतकी परिषद
 -   अस्पृश्यांचे राजकारण
   विभाग तिसरा - परिशिष्टे
 -   १८९८ सालचा रोजनिशीतील उतारा
 -   अस्पृश्यांचा गैरसमज
 -   स्वाशय निवेदन
 -   हेच आमचे उत्तर
 -   अस्पृश्योद्धाराच्या मार्गातील धोंड
 -   अस्पृश्यता घालविण्याचा बिनतोड उपाय
 -   अस्पृश्यतेचा प्रश्न
 -   सांप्रदायिक अस्पृश्यता
 -   महर्षी शिंदे व महात्मा गांधी यांच्यातील पत्रव्यवहार 
   साउथबरो कमिशनपुढील साक्षी
     o    महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
     o    ॉ. बाबासाहेब आंबेडकर
     o   श्री भास्करराव जाधव
     o    श्री गणेश आकाजी गव
 -   Brahm Samaj The Depressed Classes
     & Untouchability &  V. R. Shinde's work
 -   V. R. Shinde : Thakkar Bapa
   विभाग चौथा - अहवाल
 -   The Mission for the Depressed Classes
     (1906-1912) 
 -   The Depressed classes Mission society
     of  India
 -   The Second annual Report (Depressed
     Classes Mission Society of India
 -   APPENDIX A TO -
 -  The Fourth Annual Report Depressed       
    Classes Mission Society of India

-   List of Donors Subscribers  
 -   APPENDIX A TO -
-   The Fifth Annual Report
 -   List of Subscribers
-   The Sixth Annual Report
-   The Fourth Annual Report-Poona Branch
The Depressed Classes Mission
    society of india
The Depressed Classes Scholarships
 -   भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळींची
     महाराष्ट्र परिषद सन १९९२                
 -   भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळींची
     महाराष्ट्र परिषद पहिला
दिवस        
 -   भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळींची
     महाराष्ट्र परिषद दुसरा दिवस
 -   भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळींची
     महाराष्ट्र परिषद तिसरा दिवस
 -   परिषद फंडाकरिता मदत देणा-यांची नावे
 -   पुण्यातील मेहेतर लोकांच्या अडचणी   
 -   भारतीय निराश्रित साह्यकारी व साह्यकारक मंडळी