महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

डिप्रेस्ड क्लासेस मिशनची चवथी जयंती

घ्यारे भाई घ्यारे भाई ।  कोणी काही थोडे बहू ॥ - तुकाराम

(डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था मुंबई येथे स्थापन होऊन चार वर्षे झाली व बलिप्रतिपदेच्या दिवशी तिला पाचवे वर्ष लागले, म्हणून मिशनच्या परळ येथील इंग्रजी शाळेत ता. २ नोव्हेंबर सन १९१० रोजी पाडव्याच्या दिवशी सकाळी आठ वाजता ईश्वरोपासना झाली.  ती रा. विठ्ठलराव शिंदे यांनी चालविली.  त्या वेळी प्रार्थनासमाजातील आणि बाहेरील मिशनचे हितचिंतक मंडळींनी आणि अस्पृश्यवर्गातील स्त्रीपुरुष मंडळींनी शाळेचा हॉल भरला होता.  शाळेतील पुष्कळशी मुले स्वच्छ स्नान करून आणि नीटनेटका पोशाख करून बसली होती.  त्यांना दिवाळीचा खाऊ वाटल्यानंतर थोडीशी प्रार्थना करून त्यांना पाठविण्यात आले.  नंतर उपासनेस आरंभ झाला.  उपदेशाच्या वेळी रा. शिंदे यांनी 'अभय दान मज देई गा उदारा' आणि - 'घ्यारे भाई घ्यारे भाई ।  कोणी काही थोडे बहू' ॥  हे दोन अभंग घेतले होते.)

डिप्रेस्ड क्लासेस मिशन काढून काल चार वर्षे संपली.  आज नूतन वर्षारंभी 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी' या नावाचा खोल अर्थ काय आहे आणि त्या अर्थाची खरी सिध्दी कशी होणार या दोन गोष्टींचा विचार करणे अवश्य आहे.  मिशन हा शब्द आमच्याकडे अद्यापि नवीन आहे.  तो आमच्या अंगवळणी न पडल्यामुळे त्यामुळे काही न रुचणारी अशी परकीयता भासते.  पौरस्त्य धर्मातील मोक्षाचा मार्ग हा व्यक्तिविषयक आहे.  प्रथम प्रथम तर ज्ञान आणि समाधी यांमध्ये त्यांचा नीरस लय होऊन पुढे त्यांत भक्तीची जोड मिळाली तरी प्रत्येकाने एकाकी ईश्वराकडे जावे हेच धोरण बराच काळ होते. पुढे भक्तिमार्गाचा विकास होत जाऊन रामानुजादी यांनी त्याला सामाजिक स्वरूप दिले.  तथापि या भागवत धर्मास साधेभोळे प्राकृत रूप देऊन अभयाची सुवार्ता सर्व मनुष्यप्राण्यास पोहचविण्याचे श्रेय तुकारामसारख्यांनी ''यारे यारे लहान थोर ।  याति भलते नारी नर ॥'' , ''आम्ही वैकुंठवासी'', ''पिटू भक्तीचा डांगोरा'' इत्यादी प्रकारे दवंडी पिटून संपादन केले.  तथापि मिशन, गास्पेल, इव्हांजेल इत्यादी शब्दांस अन्वर्थक शब्द आमच्या भाषेत न मिळण्याइतका त्यातील अर्थांचा आमच्यातील सामाजिक आणि धार्मिक चळवळींमध्ये कमी प्रचार झाला आहे.  इतकेच नव्हे, तर अजूनही हे शब्द आमच्या कानांना कडू लागतात.  मिशन स्थापन झाल्यावर दोनतीन वर्षे वरील नावातील 'मिशन' हा शब्द काढून टाकण्याविषयी कित्येक हितचिंतकांकडून कळकळीच्या सूचना वेळोवेळी आल्या.  याचे कारण या संस्थेचे खरे स्वरूप कळले नाही एवढेच.  मनुष्याचा कोणताही वर्ग किंबहुना कोणीही व्यक्ती कायमची पतित नाही, अस्पृश्य नाही, निराश्रित नाही, स्वर्गीय आशेचा तंतू कोणीही तोडण्यास समर्थ नाही.  तात्पुरत्या निराशेने खिन्न झालेल्यांना, दुःख, दैन्य आणि दारिद्रय यांच्या सवयीने जड झालेल्यांना अभयाची सुवार्ता पोहचविणे हे मिशनचे काम आहे.  मिशन म्हणजे प्रेषित संस्था; केवळ ऐहिक कल्याणासाठी झटणारी मंडळी नव्हे; यशापयशाकडे न पाहता प्रेरणेचया प्रवाहावर यत्न करणारी मंडळी होय.  पण ही सर्व भाषा आमच्या देशबंधूंस परकीय वाटते.  हिच्या योजनेत नुसते पोकळ अनुकरण दिसते.  खाणे, पिणे, पेहराव आणि बोलणे चालणे या वरवरच्या क्षुल्लक गोष्टींमध्ये पाश्चात्त्यांचे अनुकरण राजरोस सर्वच करीत आहेत.  परंतु आध्यात्मिक अनुभवाच्या भरीवपणाने समाजसेवा घडत असतानाही तद्दर्शक शब्द ऐकल्यावर मात्र कित्येक लोक कानांवर हात ठेवतात.  असो. मिशनचा खरा अर्थ हा आहे.  एवढा थोर अर्थ आमच्या नावामध्ये आहे म्हणून तशी लायकी आम्हांमध्ये आहे, असे आम्हा कोणांसही वाटत नाही.  या कामास स्वतःस कायमची वाहून घेतलेली जी चार-दोन माणसे असतील ती जवळ जवळ पूर्णपणे कामास नालायक आहेत, हे उघड करून दाखविण्याची आवश्यकता नाही.  काहींना तर आपल्या नालायकीचीही जाणीव नाही, इतकी ती साधीभोळी आहेत.  मिशन सुरू झाल्यानंतर एकदोन वर्षांनीच मिशनची कान्स्टिटयूशन (सनद) तयार झाली.  त्या वेळी 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया' असा नावाचा विस्तार होऊन उद्देशामध्ये असे म्हटले आहे की, शिक्षण, कामधंदा, समतेची आणि ममतेची वागणूक, धर्मनीती आणि नागरिकता इत्यादी संबंधी उपदेश ह्यांच्या द्वारा हिंदुस्थानातील अस्पृश्यवर्गांना साह्य करण्याचा हे मिशन यत्न करील आणि ह्या मिशनचा योगक्षेम ही सोसायटी चालवील.  ह्यावरून प्रतयक्ष यत्न करण्याचे काम मिशनचे आहे, आणि द्रव्यबळ व व्यावहारिक अनुभव, नियंत्रण, सल्लामसलत, शिफारस इत्यादी ऐहिक सर्व अनुसंधानाच्या योगे हे मिशन जिवंत राखणे हे सोसायटीचे काम.  मिशनरी आपल्या कामाला जसे नालायक आहेत, तशीच सोसायटीही नालायकच आहे.  कारण जबाबदारीच इतकी कठीण आणि जड आहे.  तुकारामासारख्यांनाही सेवाभक्तिभावाच्या आदर्शाकडे नजर गेल्याबरोबर आपण पतित आहो असे वाटते तर तेथे आमच्या मिशनचा आणि सोसायटीचा पाड काय ?  आम्ही वरपासून खालपर्यंत नालायक आहो, हे उघडच दिसते.  पण नावाचा अर्थ आणि पुढील आदर्शही फार खोल असल्यामुळे आपल्या स्वतःची व सर्वांची नालायकी उघड आणि स्पष्ट केल्याशिवाय राहिल्यास पदरी अहंपणाचा आरोप येणार म्हणूनच केवळ स्वतःची नालायकी आम्ही सर्वांनी स्वतः सांगण्याची जरुरी आहे.

मिशन आणि सोसायटी याशिवाय एकत्र सामाइ्रक काम करण्याची तिसरी एक योजना आहे.  अशा मंडळीस कंपनी असे नाव असते.  तिचा उद्देश परार्थास बाधक न होईल अशा सर्व कायदेशीर बाजूंनी आपला समाईक स्वार्थ साधावा असा असतो.  या तिसऱ्या अर्थांचा नुसता स्पर्शही आमच्या मिशन सोसायटीस आज चार वर्षे झालेला नाही आणि पुढे होणार नाही असा विश्वास आहे.  कोणत्याही एका मताचा स्वीकार करून त्या मताचा प्रसार करण्यासाठी म्हणजे त्या मतानुयायांची संख्या वाढविण्यासाठी मिशनची स्थापना होत असते.  असा निरनिराळया मिशनांना कंपनी हे नाव दिल्यास वावगे होणार नाही.  मुंबईच्या किंवा कोणत्याही प्रार्थना अथवा ब्राह्मसमाजाच्या कमिटीने केवळ आपल्या अनुयायांची संख्या वाढविण्याच्या हेतूने ही मिशन सोसायटी आपल्या हस्तगत करून घेतलेली नाही.  यद्यापि ह्या मिशनची प्रेरणा वरील समाजाच्या उदार तत्वामुळे झाली आहे, इतकेच नव्हे, तर मिशनच्या काया्रतही समाजाच्या सभासदांचाच पुढाकार आहे, तथापि हे मिशन आपल्या हस्तगत करून घेऊन आपली संख्या वाढविण्याचा स्वार्थ - मग तो कितीही उदात्त असो - या सभासदांच्या मनांत वागत नाही.  समाजाच्या बाहेरील मंडळीकडून मात्र वेळोवेळी अनेक प्रकारच्या सूचना येतात.  मिशनच्या कार्यातून धर्मतत्त्वाला अजिबात फाटा द्यावा किंवा त्यास एकदेशीयत्वाचे वळण द्यावे, असा या सूचनांना भिन्नभिन्न दिशांनी रोख असतो व या दोन्हीही परस्पर भिन्न सूचनांचा शांतपणे विचार करून मिशनच्या चालकांवर सर्वदेशीय सनातन धर्मतत्त्वाची व स्वतःस झालेली प्रेरणा सांभाळून आपले तारू सुरक्षितपणे हाकारावयाची जबाबदारी आहे आणि ती त्यांनी आजपर्यंत राखिली आहे.

याप्रमाणे डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी या नावाचा अर्थ आहे.  त्याची सिध्दी होण्यासाठी त्याला चिकटून राहणे आवश्यक आहे.  प्रत्यक्ष सेवा करणारी मिशनरी मंडळी आणि त्यांचा योगक्षेम चालविणारे सोसायटीचे सभासद यांनी या नावाचा खरा अर्थ आपल्या डोळयांपुढे ठेवून, परस्परांतील संबंध शुध्द आणि प्रेमाचा राखून नंतर आपल्यापुढे असलेल्या असंख्य निराश्रित वर्गांना 'घ्यारे भाई घ्यारे भाई' अशी हाक मारावयास पाहिजे.  हाकेचा स्वीकार होण्यापूर्वी तिला जोम येण्यास मिशनरींचे स्वतःचे धर्मसाधन आणि सभासदांचे परस्परांतील आणि सर्वांचे इतर देशबंधूंशी जे वर्तन व्हावयास पाहिजे, त्यावर अवलंबून आहे.  ईश्वरापासून प्रथम अभयदान मिळवून त्याच्या जोरावरच ही हाक मारावयाची आहे.  ज्या मानाने तो जोर कमी होईल त्या मानाने ऐहिक अडचणींचा जोर वाढणार आहे, म्हणून सेवकांनी आपले ईश्वराशी अनुसंधान कायम राखिले पाहिजे; आणि मग आपल्या निराश्रित बंधूंस ''भरणी आली मुक्त पेठा ।  करा लाठा व्यापार ॥  उधार घ्यारे उधार घ्यारे ।  अवघे थोर जातीचे ॥  येथे पंक्तिभेद नाही ।  मोठे मोठे काही लहान ॥  तुका म्हणे लाभ घ्यावा ।  मुद्दल भावा जत ॥''  असे सांगितल्यास त्यास त्याचा अर्थ आणि जोर कळून ईश्वरी नावाचा जयजयकार होईल.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाड्मय

   संपादकीय
   महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जीवनपट
   प्रस्तावना
   विभाग पहिला - प्रबंध
 -    सामान्य आलोचन 
 -    पुरातन अस्पृश्यतेचे निरुपदर्शन
 -   बौद्ध कालांतील अस्पृश्यता
-    मनुस्मृतिकालीन अस्पृश्यता   
 -   उत्तरयुगीन अथवा अर्वाचीन अस्पृश्यता
-    ब्रह्मदेशांतील बहिष्कृतवर्ग
-    संख्या आणि लक्षणें
-    नांवांची व्युत्पत्ति व इतिहास
-    धर्म 
-    सामाजिक स्थिती
-    राजकारण
   विभाग दुसरा - लेख व व्याख्याने
 -   Elevation of the Depressed Classes
 -   A Mission for the Depressed
     Classes : A Plea
 -   The Depressed Classes Mission Society
      of India
 -   बहिष्कृत भारत
 -   निराश्रित साहाय्यक मंडळी
 -   भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळीची संस्थापना
 -   डिप्रेस्ड क्लासेस मिशनची चवथी जयंती
 -   एकनाथ व अस्पृश्य जाती
 -   अस्पृश्यवर्गाची उन्नती
 -   डी.सी. मिशनचा १७वा वाढदिवस
 -   अस्पृश्यतानिवारणाचा आधुनिक इतिहास
 -   अस्पृश्यता व हिंदूचा संकोच
 -   पूर्व बंगाल्यातील अस्पृश्यवर्गाच्या उच्च शिक्षणाची प्रगती
 -   अस्पृश्यांचे शेतकी परिषद
 -   अस्पृश्यांचे राजकारण
   विभाग तिसरा - परिशिष्टे
 -   १८९८ सालचा रोजनिशीतील उतारा
 -   अस्पृश्यांचा गैरसमज
 -   स्वाशय निवेदन
 -   हेच आमचे उत्तर
 -   अस्पृश्योद्धाराच्या मार्गातील धोंड
 -   अस्पृश्यता घालविण्याचा बिनतोड उपाय
 -   अस्पृश्यतेचा प्रश्न
 -   सांप्रदायिक अस्पृश्यता
 -   महर्षी शिंदे व महात्मा गांधी यांच्यातील पत्रव्यवहार 
   साउथबरो कमिशनपुढील साक्षी
     o    महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
     o    ॉ. बाबासाहेब आंबेडकर
     o   श्री भास्करराव जाधव
     o    श्री गणेश आकाजी गव
 -   Brahm Samaj The Depressed Classes
     & Untouchability &  V. R. Shinde's work
 -   V. R. Shinde : Thakkar Bapa
   विभाग चौथा - अहवाल
 -   The Mission for the Depressed Classes
     (1906-1912) 
 -   The Depressed classes Mission society
     of  India
 -   The Second annual Report (Depressed
     Classes Mission Society of India
 -   APPENDIX A TO -
 -  The Fourth Annual Report Depressed       
    Classes Mission Society of India

-   List of Donors Subscribers  
 -   APPENDIX A TO -
-   The Fifth Annual Report
 -   List of Subscribers
-   The Sixth Annual Report
-   The Fourth Annual Report-Poona Branch
The Depressed Classes Mission
    society of india
The Depressed Classes Scholarships
 -   भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळींची
     महाराष्ट्र परिषद सन १९९२                
 -   भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळींची
     महाराष्ट्र परिषद पहिला
दिवस        
 -   भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळींची
     महाराष्ट्र परिषद दुसरा दिवस
 -   भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळींची
     महाराष्ट्र परिषद तिसरा दिवस
 -   परिषद फंडाकरिता मदत देणा-यांची नावे
 -   पुण्यातील मेहेतर लोकांच्या अडचणी   
 -   भारतीय निराश्रित साह्यकारी व साह्यकारक मंडळी