लेख, व्याख्याने आणि उपदेश

निवृत्ती व प्रवृत्ति आणि अवतारवाद व विकासवाद

(साता-यास झालेलें व्याख्यान. सु. प. ता. २१-५-१९०५.)

त्याग तरी ऐसा करा | अहंकारा दवडावे ||१||
आपुले मरण पाहिले म्यां डोळां | तो झाला सोहळा अनुपम्य ||१||
सकल चिंतामणी शरीर |

आमच्या मंडळीच्या सुधारणेची दोन अंगे आहेत. एक धार्मिक व दुसरे सामाजिक. कोणी आमच्यातीलच म्हणतो की, धार्मिक अंग नुसते राखावे. आमच्या भजनाला, उपासनेला, कोणी फारसे किंवा मुळीच आड येत नाहीत व यायचेही नाहीत, पण तुम्ही सामाजिक खटाटोपी करू लागाल, तर मात्र पदोपदी अडथळे आणून घ्याल. पण माझे म्हणणे असे की, धार्मिक सुधारणा करू की सामाजिक करू किंवा कोणती आधी करू, हा जो प्रश्न आहे तो आपल्यामधील अहंकार गेला नाही म्हणूनच पुढे येतो असे म्हटले पाहिजे. धर्मविभूती, आध्यात्मिक सुधारक, ज्याला पुढे लोकांत अवतार किंवा मग देवच म्हणतात, अशांचे एक तरी उदाहरण डोळ्यापुढे आणा की, हा प्रश्न त्यांच्यापुढे होता-धार्मिक साधने, सुधारणा करू व सामाजिक सोडून देऊ का? त्यांना कधी ह्याबद्दल संशय नव्हताच, कारण, त्यांची रहाटी अगदी कडेलोटपणाची होती. आजकालच्या लोकांनी अहंकार समूळ सोडला पाहिजे. इंग्रजीत म्हणतात,

If you want to gain, you must loose yourself first; die to live…..

म्हणजे जर मिळवावयाचे आहे तर हरवून घ्या आधी. खरोखरीच विरोधाभास दिसतो आहे हा. नाही तर काय? म्हणे भरा. कशासाठी? तर जिवंत राहण्यासाठी, पण ह्यातील तत्त्वाकडे दृष्टी दिल्यास ह्या वचनाची सत्यता लक्षात आल्यावाचून राहणार नाही.

तुमच्यापुढे हे द्वैत वा-यासही उभे न राहता तुमचे आचरण सर्वकाळ ईश्वरास स्मरून व अहंता, अहंकार, अहंभाव ह्यांस विसरून होत राहिले, म्हणजे मग तुम्हांला वाराणसीसारख्या तीर्थस्थानी जाण्यास नको. ती वाराणसी, आणखी तिच्या पलीकडे काही दुसरी काशी असली तरी ती तुमच्याजवळ येते आहे. कारण हे पहा, तीर्थाला तीर्थपम आले कोठून? तर साधूशी त्याचा पूर्वसमागम घडला होता म्हणून. मोठी जाडी विभूती आध्यात्मिक व कर्ती सुधारक अशी मुळाशी असल्यामुळेच तर तीर्थाचे माहात्म्य. असा हा तुमचा अधिकार वाढेल. तुकोबांनी म्हटले आहे की, “आपुले मरण मी पाहिले” अहम, अहंकारवृत्ती त्यांच्यामधून समूळ निघून गेली, तो सोहळा काय अनुपम| ह्याबरोबर सहज हेही दिसते की, साधूंची वचने बहुतकरून विरोधाची असतात किंवा वाटतात. इतका नेटाचा विचार त्यांच्या अंत:करणात येतो की, ‘वाचमर्थोSनुधावति’ असे मग होते. पण याहून जास्त विचार करून पाहू की मीपणाचा काय सर्वस्वी नायनाट होतो किंवा करावयाचा की काय? तर तसे नसून मीपणाचा विस्तारच करून सर्वात्मकपणे भोग झाला हा अनुभव घ्यावयाचा. आत्मवृत्ती संकोचित न करता तिचा परिघ एकसारखा पसरतच रहावयाचा. हे जर आपणांस कर्तव्य नसेल, हा प्रवृत्तीमार्ग न आवडून निवृत्तिमार्ग श्रेष्ठ वाटत असेल तर निवृत्ती, निवृत्ती म्हणजे कोठवर खरोखर गेली पाहिजे हे लक्षात घ्यावे. म्हणजे हे तुम्ही कबूल कराल की, शेवटी दोरीने गळ्याला फास लावून घेतला पाहिजे. तेव्हा सुटला एकदा मानवप्राणी! ह्या सांसारिक आत्मयातनेतून, मिळाला त्याला मोक्ष! पण ह्याला मोक्ष म्हणायचे नाहीच. पशूला वाटते की वर शिंगे, खाली पाय, ह्यामधला जो तो मी. परंतु मनुष्याला स्वाभाविकच स्वत:पुरते पाहून समाधान नाही. त्याचा मी हा मध्यबिंदु सर्व स्थितीत खरा, पण त्याचा जवळचा परिघ घेतला तर त्याचे स्वत:चे कुटुंब होय. बहुतेक सुधारलेल्या मनुष्याची मजल म्हणजे त्याचा परिघ आजकाल पाहिले असता स्वत:च्या राष्ट्रापर्यंत जातो. हिंदुस्थानाची सीमा काय बुवा, तर उत्तरेस हिमालय पर्वत वगैरे सुरूवात करून इतक्याच प्रदेशाशी फक्त आपला निकटचा किंवा तात्त्विकतेचा ही संबंध, तितक्यापुरताच काय तो अभिमान. पण मी खरोखरी उत्तम झालो केव्हा समजायाचे किंवा याचा अर्थ काय, तर माझ्या सहानुभूतीचा, नव्हे, आत्मप्रचीतीचा परिघ अनंत वाढलेला आहे व मध्यबिंदूशी मी आहे. अहंभावाचा ताठा मिरविणा-याने डोळे उघडून विचार करून पाहिले पाहिजे की, अरे मी आपणांस म्हणतो, पण मी म्हणजे कोण? कोठेसा आहे? ह्या अफाट विश्वाच्या एका कोप-यात, कोठला तो कोपरा, कोप-यातल्या कोप-यात कोणता अंश म्हणावा, अंशाचा कोणता अंश म्हणावा, काहीच नाही, इतकी क्षुल्लक जागा व्यापणारा प्राणी मी, माझी मातब्बरी काय की, मी गर्वाने फुगून नेहमी कु-र्यातच असावे? ह्याचा त्याग झाला असता नारायम म्हणजे नराचे अयन ज्याच्यामध्ये त्याने समर्याद, क्षुद्र, आकुंचित जगातून उमटून आपल्याला आपल्या अंगाशी लावून घेतले असा अनुभव येतो.

तेव्हा तात्त्विकदृष्ट्या विचार केला असता मी म्हणतो की, निवृत्तीचा मार्ग न पत्करता जाज्वल्य प्रवृत्ती करावयाची. ह्याने किती लोकांचा भरिभार आपल्यावर घेतला पाहिजे ह्याचा विचार करा. प्रेसिडेंट रूझव्हेल्टचे उद्दिष्ट असे आहे की, नेहमी सात्त्विक युद्ध करीत राहिले पाहिजे. आपल्याकडे तुकारामबुवाही म्हणतात की ‘रात्रंदिवस आम्हांला युद्धाचा प्रसंग’. मी तरी समजतो निवृत्ती म्हणजे नाशच, मेल्यापेक्षा अहंकार तरी असू द्या. चालता चालता कधी तरी ठेच लागेल व मन ताळ्यावर येईल म्हणायाला जागा राहते. कृष्णाने अर्जुनाला अखेरचा निरोप अट्टाहासाने प्रवृत्तीविषयकच सांगितला आहे. तो त्याला म्हणतो, अरे ह्यापेक्षा तुला काय सांगू, मी जर अव्यक्तातून व्यक्त होतो आहे, मी प्रवृत्त आहे, तोपर्यंत तू निवृत्तीची कथा सांगू नकोस.

आता तुम्ही विचाराल, कायहो, ज्याला परिघ अनंत, त्याचा मध्यबिंदू कोठे आहे? तर गणितशास्त्राच्या नेहमीच्या रीतीने पाहिले, तर तो बिंदू पाहिजे तेथे असू शकेल. संकुचित अहंकार सोडायला पाहिजे व जी विश्वाची संपत्ती त्याचा अभिमान, त्याविषयी आनंद, काळजी, कर्तबगारी दाखविली पाहिजे. मनुष्य एकसारखा प्रवृत्त, कार्यकारी, कर्मी, कर्मप्रचुर आहे, निवृत्त कधी नाही-अशा प्रकारे ज्यांचा दुराभिमान गेला आहे, त्यांच्यानेच काही काम झालेले आहे. ज्यांच्या ठिकाणी एकतानता, प्रामाणिकपणा, निष्कामता, धैर्य, जे व्रतस्थ, ज्यास अपेक्षा नाही, त्यांचेच हातून सुधारणेची कामे होतात. जे पाऊल टाकायचे, ते निश्चयाने, धैर्याने टाकावयाचे आहे.

आपण म्हणाल “ अहंकाराचा परिघ अमर्याद करा असे सांगता पण ह्या सांगण्या-बोलण्याच्याच गोष्टी आहेत. असे ज्याचे हातून होईल तो पुरूष अवतारच म्हटला पाहिजे, तो हजारो वर्षांनी येतो. कोणी तरी आम्हांला असा चांगला नायक, सेनापती, प्रमुख, म्होरक्या, अशी एक विभूती प्रखर तेजाची पाहिजे.” पण ह्याला माझे उत्तर असे आहे की, खरोखरी प्रत्येक व्यक्तीचा विकास झाला पाहिजे. अवतार मी अनिष्ट म्हणत नाही, इष्टच आहे, पण त्याने होते काय, तर काही काळपावेतो त्याच्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष उदाहरण तेजस्वितेने परिणाम होतो, आपण एकदम खालून वर उचलले जातो. पण तो स्वाभाविक क्रमिक विकास म्हणावयाचा नाही. तर प्रत्येक आत्म्याचे मरण मरून प्रत्येकास स्वत:च्या श्रमाच्या मोबदल्यात आनंद झाला पाहिजे. ‘आत्मैव आत्मनो बंधु:’ या तत्त्वाचा स्वीकार करून आपण आपल्याच पायावर उभे राहण्यास शिकले पाहिजे व राहिले पाहिजे. मला इतकेही वाटते की आज जी काय आमच्यात आत्मकला अंशभूत आहे, इच्छाशक्ती, बाहुबल, एक-एक पाऊल स्वत: पुढे टाकण्याची शक्ती आहे, ती जाऊन, अवतारी व्यक्तीच्या विद्युदाकर्षणाने एकदम कामे फार होणार असतील, तर तो अवतार नको, व ती कामेही पण नकोत! विकास, विकासच झाला पाहिजे हेच मी धरून बसेन. अवतारवादाने प्रदर्शित केलेला एक फार उंच व इतर सर्व अत्यंत नीच, खालावलेले असा विषमभाव मला पसंत पडत नाही. तर सर्वांची सर्व बाजूंनी व तीही स्वत:चे प्रयत्नांनी उन्नती होत जावी, हेच श्रेयस्कर. अवतारांची गरज भासू लागल्यास समजावे येथे रोग आहे, स्वाभाविक स्थिती ही नव्हे, स्वत:चा दम संपला, स्वयंशक्ती हरपली, स्वत:चा जोर नाहीसा किंवा कमी तरी झाला. पण चांगल्या सुदृढ राष्ट्रात स्वयंस्फूर्ती हा एक गुण असतो, म्हणजे कोणतेही कृत्य स्वत: आपल्यास कळलेल्या दिशेने करण्यास अंगावर घ्यावयाचे. त्या राष्ट्राच्या विभूतींच्या व सामान्य लोकांच्यामध्येही मग इतके अवाढव्य अंतर नसते, हेही लक्षात ठेवले पाहिजे.

तेव्हा मी म्हणतो की आमचा परिघ वाढविण्याची आमची योग्यता असताना, ईश्वराजवळ का होईना, पण ही काय याचना करावयाची की आम्हांला अवतार द्या, आपला अवतार होऊ द्या, नाहीतर आम्ही मागे मागे जाऊ. अवतारमत खरे असले तरी मी तर म्हणेन की, परमात्मन् तुमचे आजपर्यंत पुष्कळ अवतार झाले असतील, पण आता तुमचा तो क्षीरसागर, ते स्वर्गनिधान वगैरे सोडून खाली मनुष्यलोकात येण्याची तसदी घेऊ नका. तर आमचा विकास तुम्हीस करा. तरच तुमच्या एकंदर विश्वयोजनेस आमच्याकडून साह्य होईल !

लेख, व्याख्याने आणि उपदेश

   प्रस्तावना
   शिंदे यांचे त्रोटक चरित्र
 भाग पहिला-लेख
 - जलप्रवास
 -  मार्सेय शहर
 - पॅरीस शहर
 - नॉटर डेम द ला गार्ड देऊळ
 - लंडन शहर.
 - ब्रिटिश म्युझिअम
 - लंडन येथील बालहत्यानिवारक गृह
 -  सोमयागाचे वर्णन वाचून वाटलेला विस्मय व विषाद
 - डेव्हनपोर्ट येथील गुडफ्रायडे येथील उल्हास
 - बोअर युद्धाचा शेवट व ऑक्सफर्ड येथील उल्हास
 - राष्ट्रीय निराशा
 - बर्टन खेड्यातील शाळा कशी दिसली?
 - विभूतीपूजा
 - मॅंचेस्टर कॉलेज
 - युनिटेरिअन् समाज
 - इंग्लडांतील आधुनिक धर्मविषयक चळवळ आणि
    लिव्हरपूल येथील त्रैवार्षिक युनिटेरिअन् परिषद
 - सुशिक्षित धर्मभगिनींस अनावृत पत्र
 - आपला व खालील प्राण्यांचा संबंध
 - पृथ्वीच्या पोटांत ४४० यार्डीखाली
 - जनांतून वनांत आणि परत
 -  जन आणि वन
 -  बॉरोडेलमधील प्रार्थना व भेट
 -  वर्डस्वर्थ भेट आणि डव्ह कॉटेजची यात्रा
 -  स्कॉच सरोवरांत
 -  बेन लोमंड शिखरावरील समाधि
 - बंगळूरच्या रस्त्यांतील एक फेरी
 -  मंगळूर येथील कांही विशेष गोष्टी
 - बंगालची सफर
 -  शांतिनिकेतन बोलपूर
 - रा. गो. भांडारकर यांचे धर्मपर लेख व व्याख्याने
 - प्रार्थनासमजा अप्रिय असल्यास तो का?
 -  मुरळी
 - बहिष्कृत भारत
 - निराश्रित साहाय्यक मंडळ
 - भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळाची संस्थापना
भाग दुसरा - व्याख्याने
 -  डॉ. भांडारकरांस मानपत्र
 -  ब्राह्मसमाज व आर्यसमाज
 - धर्मजागृति
 - निवृत्ति व प्रवृत्ति आणि अवतार बाद व विकासवाद
 - राजा राममोहन राय
 - देशभक्ति आणि देवभक्ति
 - स्वराज्य आणि स्वाराज्य
 - ईश्वर आणि विश्वास
 - बौद्धधर्माचा जीर्णोद्धार
 - समाजसेवेची मूलतत्वे
 - ब्राह्मधर्म व ब्राह्मसमाज
 - एकनाथ व अस्पृश्य जाति
 - निराश्रित साहाय्यकारी मंडळी व आक्षेपनिरसन
 - आत्म्याची यात्रा
 - आत्म्याची वसति
 - हिंदुस्थानांतील उदार धर्म
 भाग तिसरा - उपदेश
 - आवड आणि प्रीति
 -  देवाचा व आपला संबंधविषय
 - स्तुति, निर्मत्सना व निंदा
 - विनोदाचे महत्व
 - प्रेमप्रकाश
 - संग व विषय
 - मरण म्हणजे काय?
 स्त्रीदैवत
 दान आणि ऋण
 - राज्यारोहण
 - नाममंत्राचे सामर्थ्य
 - डिप्रेस्ड क्लासेस मिशनची चवथी जयंति
 - कर्मयोग
 - संतांचा-धर्म आणि राष्ट्राचा उत्कर्ष
 - धर्म समाज आणि परिषद
 - धर्मसंघाची आवश्यकता
 - विनययोग
 - शासनयोग
 - पितृशासन
 - गुरुशासन
 - राजशासन
 -  धर्म आणि व्यवहार
 - प्रेरणा आणि प्रयत्न
 - मानवी आदर आणि दैवि श्रद्धा
 - मानवी स्नेह आणि ईश्वरभक्ति
 - मनुष्यसेवा आणि ईश्वरोपासना
 - मनाची प्रसन्नता आणि मोक्षप्राप्ति
 - परमार्थाची प्रापंचिक साधने
 - आधुनिक युग आणि ब्राह्मसमाज
 -  धर्मसाधन
 - नैराश्यवाद
 - आनंदवाद
 - संसारसुखाची साधने
 - वृत्ति, विश्वास आणि मतें.
 - व्यक्तित्वविकास
 -  मनुष्यजन्माची सार्थकता
 - 'आपुलिया वेळी घालावी हे कास'
 - कालियामर्दन