लेख, व्याख्याने आणि उपदेश

वृत्ति, विश्वास आणि मतें

(ता. १५-७-१९१२ रोजीं केलेल्या उपदेशाचा सारांश)

बहुता छंदांचें बहु वस जन | नये बाटूं मन त्यांच्या संगें ||
करावा जतन आपुला विश्वास | अंगा आला रस आवडीचा ||
सुखाची समाधि हरिकथा माउली | विश्रांती साउली सिणलियांची ||
तुका म्हणे बुडे बांधोनी दगड | तेथे काय कोड धांवायाचें||

धार्मिक जीवनामध्ये मुख्य साधावयाची गोष्ट कोणती आणि ती साधावयासाठी साधने कोणती आणि त्या साधनांची उपसाधने कोणती ह्याचा पृथक् विचार करून ती स्पष्टपणे धर्मसाधकांपुढे ठेवण्याची मुख्य जबाबदारी सर्व धर्मसमाजांवर आहे. म्हणून आपण ह्याविषयी थोडासा विचार करू.

धर्मजीवनामध्ये मुख्य साध्य गोष्ट साधकांची वृत्ती ही होय. कोणाचे लक्ष परंपरागत चालत आलेल्या विधीकडे असते, कोणाचे गुरूकडे, कोणाचे ग्रंथाकडे, कोणाचे धार्मिक मनोविकाराकडे, कोणाचे परोपकाराकडे, कोणाचे तत्त्वज्ञानाकडे दिसते. पण मुख्य गोष्ट साधकाने आपली स्वत:ची वृत्ती उत्तरोत्तर शुद्ध आणि उदात्त होत आहे की नाही, हे पाहाणे ही होय. कामक्रोधादी दुष्ट मळापासून आपले मन दूर आहे की नाही, सात्विक प्रेमाचा उदभव जास्त होत आहे की नाही, सत्प्रयत्नांचा जोर बळावत आहे की नाही आणि एकंदरीत अशा रीतीने आपला आतील भाव शुद्ध आणि भरीव होत आहे की नाही इकडे साधकाचे अगोदर लक्ष असले पाहिजे. सर्व धर्मांचे ध्येय वस्तुत: हेच असते. ह्याला साधने निरनिराळी असतात. त्यांतील पहिले साधन व्यक्तीचा विश्वास हे होय. विश्वास ह्याचा अर्थ माझ्या अल्पमतीने हा आहे की, एकाद्या व्यक्तीने कोणतेही कृत्य करण्यापूर्वी त्या कृत्याला कारणीभूत अशी जी त्या व्यक्तीच्या मनाची स्थिती ती. तहान लागली असता आपण पाणी पितो, कारण पाण्याने तहान जाईल अशी आमची श्रद्धा आहे. अग्नीत हात घालीत नाही, कारण हात जळेलच असा आमचा विश्वास आहे, ह्यावरून विश्वास ही एक मनाची जिवंत आणि कार्यकारी अवस्था होय. एरवी पुष्कळ गोष्टींवर आमचा विश्वास आहे. असे आम्ही तोंडाने म्हणू. पण त्या विश्वासाचे पर्यवसान कृतीत आणि वृत्तीत होत नसेल तर तो विश्वास नव्हेच. अशा विश्वासाचे आमच्या समाजात कितीही महत्त्व असले, तरी ईश्वर त्यास ओळखणार नाही.

वर सांगितलेल्या प्रकारचा जिवंत विश्वास ही प्रत्येक व्यक्तीची बाब आहे. तो त्या व्यक्तीत्चाय वृत्तीचे साधन आहे. त्या विश्वासाचे उपसाधन म्हणून धर्मसमाजातील वडील मंडळींनी आपले विश्वास आणि अनुभव ह्यांवरून धर्मसमाजातील सर्व साधकांसाठी काही विशिष्ट मते प्रणीत करावयाची असतात. त्या मतांच्या साहाय्याने साधारण सभासदाच्या विश्वासाला व तद्वारा त्याच्या वृत्तीला साहाय्य व्हावयाचे असते. ह्याप्रमाणे आम्ही धर्मजीवनातील तीन गोष्टी पाहिल्या. मुख्य वृत्ती, तिला साधनीभूत व्यक्तीचा जिवंत विश्वास, त्याची उत्पत्ती आणि वाढ होण्याकरिता धर्म समाजाची विशिष्ट मते, अशी ही साधनपरंपरा आहे आणि परस्पर ह्यांचा दर्जा आणि महत्त्व कमी कमी असते.

हे समजण्याला आपण अर्थशास्त्रातील दृष्टांत घेऊ या. अर्थशास्त्रात अर्थ म्हणजे संपत्ती अथवा ज्यांच्यामुळे प्रत्यक्ष सुख होते आणि उपजीविका चालते, अशा वस्त्र-धान्यादी उपभोग्य वस्तू. ह्या वस्तूंची देवघेव सुरळीत आणि सुलभ रीतीने व्हावी म्हणून निरनिराळ्या देशी आणि निरनिराळ्या काळी निरनिराळ्या नाण्यांची योजना होत आली आहे. ज्या ज्या मानाने समाज अधिकाधिक सुसंस्कृत होत जातो, त्या त्या मानाने त्या समाजातील नाण्यांचे रूपांतरही अधिकाधिक सुधारणेकडे होत जाते. प्राचीन युगात आणि हल्लीही काही ठिकाणी न सुधारलेल्या समाजामध्ये पासोड्या, कांबळी, काठ्यांची जुडगी, कवड्या, शिंपली, हाडे इत्यादिकांचा नाण्यादाखल उपयोग होतो. सुधारणेमुळे ही नाणी उत्तरोत्तर अधिकाधिक व्यवहारोपयोगी होत जातात. पण पूर्वीपासून त्यांचा हेतू एकच आहे. तो हा की अर्थाची अदलाबदली व्हावी. पण नाणी ही स्वत:च अर्थ नव्हेत. कारण ती प्रत्यक्ष उपभोग्य नसतात. म्हणून ती अर्थाहून कमी दर्जाची. अर्थशास्त्रात अर्थाचा आणि नाण्यांचा जो संबंध आहे तसाच संबंध धर्मशास्त्रात वृत्तीचा आणि विश्वासाचा आहे. म्हणजे एक दुस-याचे साधन आहे, म्हणून एक दुस-याहून कमी महत्त्वाचे आहे.

तसेच धर्मशास्त्रात एकाद्या विशिष्ट समाजाने प्रणीत केलेली जशी मते असतात. तशीच अर्थशास्त्रातही निरनिराळ्या समाजापुरती तिसरी एक योजना करण्यात येत असते. ती नोटांची किंवा हुंड्यांची होय. ह्या नोटा किंवा हुंड्या विशिष्ट समाजातील संकेतावर आणि पतीवर अवलंबून असतात. त्या समाजाच्या बाहेर त्याच चालत नाहीत. नाण्यांच्या हेतूला मदत मिळावी म्हणून नोटांची संकेताने योजना केलेली असते म्हणून नोटांचे वस्तुत: महत्त्व नाण्याहून कमी आणि अर्थाहून तर फारच कमी. तसाच प्रकार मतांचा, विश्वासाचा आणि वृत्तीचा धर्मजीवनात आहे.

हे लक्षात घेऊन, कोणत्याही धर्मसमाजाच्या पुढा-याने अशी खबरदारी राखली पाहिजे की, आपण प्रणीत केलेली मते, साधकांच्या विश्वासास आणि वृत्तीला नेहमी साहाय्यकच व्हावीत, त्यांचा त्यांच्यावर कधीही दाब बसू नये. समाजमतांच्या योगे व्यक्तीच्या विश्वासास आणि वृत्तीस उज्ज्वलपणा येत नाही, असे दृष्टोत्पत्तीस आल्याबरोबर पुढा-यांनी आपल्या मतांची फेरतपासणी आणि मांडणी केली पाहिजे. एकदा केलेल्या जुन्या उल्लेखावरच हवाला ठेवून चालणार नाही, समाजमते ही हल्लीच्या वृत्तीसाठी होत. व्यक्तीची वृत्ती आणि विश्वास समाजाच्या मतासाठी नव्हेत, हे समाजचालकांनी नेहमी ध्यानात वागविले पाहिजे.

तुकारामाने वर म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाने आपला विश्वास जतन करावा एवढेच नव्हे, तर आपली वृत्ती जतन करावी आणि वाढवावी व अशा प्रकारे व्यक्तीची वृत्ती आणि विश्वास ह्यांची वाढ होते की नाही हे समाजचालकांनी पहावे. पण ह्या बाबतीत प्रत्येकाने आपआपल्या वृत्तीकडे आपणच बारकाईने लक्ष देणे बरे. एकाने दुस-याच्या वृत्तीविषयी आक्षेप घेण्याने काही फायदा होत नाही. तशाने आपला धडा टाकून दुस-याच्या दुर्लक्षाकडे लक्ष देणा-या शाळेतील विद्यार्थ्यासारखा प्रकार होणार आहे. प्रत्येकाने आपल्या धड्याकडे पहावे, असे पंतोजीने सांगितले असता एका मुलाने शाबासकी मिळविण्यासाठी दुस-या एका मुलाविषयी पंतोजीकडे कागाळी केली, तेव्हा गूरूजीला कागाळी करणा-या मुलाचेच दुर्लक्ष अगोदर दिसून आले. आम्ही आपल्या वृत्तीकडे नर न देता दुस-याच्या वृत्तीची आणि विश्वासाची पंचाईत करू लागलो आणि त्यास शासन देऊ लागलो तर गुरूंचा गुरू जो परमेश्वर त्याच्या लक्षात आमचा हा उनाडपणा अगोदर येणार नाही काय? म्हणून व्यक्तीच्या वृत्तीच्या बाबतीत प्रत्येकाने आपल्यापुरते खबरदार असले पाहिजे, दुस-याविषयी क्षमा आणि औदासीन्य धारण केले पाहिजे, आणि समाजचालकांनी समाजाच्या मतांची मांडणी जेणेकरून निरनिराळ्या प्रकारे परिणामकारक होईल अशा प्रकारे व्यक्तीच्या विश्वासाची आणि वृत्तीची चाड बाळगळी पाहिजे. व्यक्तिविषयक वृत्तीसंबंधाने प्रत्यक्षपणे खल करून अथवा अप्रत्यक्षपणे उल्लेख करून तिला शासन देण्याच्या भानगडीत पडू नये.

अर्थशास्त्रात खोटी नाणी आणि रद्द केलेल्या नोटा जशा आढळतात, तसा धर्मशास्त्रातही एक प्रकार आढळतो. तो बुद्धिवादास आणि व्यक्तीच्या अनुभवास न पटणारी अशी जुन्या धर्मातील केवळ परंपरेच्या जोरावर चालत आलेली मते ही होत. अशा मतांच्या जोरावर जेव्हा एकाद्या धर्मसमाजामध्ये व्यक्तीचा छळ होऊ लागतो तेव्हा त्या समाजाचे दिवस भरले असे समजावे. अशा वेळी नवीन समाजाचा उदभव होतो, आणि जोपर्यंत जुन्या समाजातल्या चुका नवीन समाजाकडून होत नाहीत तोपर्यंतच तो चालू राहतो. एरवी तोही अस्तास जातो. अशा वेळेस अनुलक्षूनच “तुका म्हणे बुडे बांधोनि दगड | तेथें काय कोड धांवायाचें ||” ही वाणी निघाली आहे.

लेख, व्याख्याने आणि उपदेश

   प्रस्तावना
   शिंदे यांचे त्रोटक चरित्र
 भाग पहिला-लेख
 - जलप्रवास
 -  मार्सेय शहर
 - पॅरीस शहर
 - नॉटर डेम द ला गार्ड देऊळ
 - लंडन शहर.
 - ब्रिटिश म्युझिअम
 - लंडन येथील बालहत्यानिवारक गृह
 -  सोमयागाचे वर्णन वाचून वाटलेला विस्मय व विषाद
 - डेव्हनपोर्ट येथील गुडफ्रायडे येथील उल्हास
 - बोअर युद्धाचा शेवट व ऑक्सफर्ड येथील उल्हास
 - राष्ट्रीय निराशा
 - बर्टन खेड्यातील शाळा कशी दिसली?
 - विभूतीपूजा
 - मॅंचेस्टर कॉलेज
 - युनिटेरिअन् समाज
 - इंग्लडांतील आधुनिक धर्मविषयक चळवळ आणि
    लिव्हरपूल येथील त्रैवार्षिक युनिटेरिअन् परिषद
 - सुशिक्षित धर्मभगिनींस अनावृत पत्र
 - आपला व खालील प्राण्यांचा संबंध
 - पृथ्वीच्या पोटांत ४४० यार्डीखाली
 - जनांतून वनांत आणि परत
 -  जन आणि वन
 -  बॉरोडेलमधील प्रार्थना व भेट
 -  वर्डस्वर्थ भेट आणि डव्ह कॉटेजची यात्रा
 -  स्कॉच सरोवरांत
 -  बेन लोमंड शिखरावरील समाधि
 - बंगळूरच्या रस्त्यांतील एक फेरी
 -  मंगळूर येथील कांही विशेष गोष्टी
 - बंगालची सफर
 -  शांतिनिकेतन बोलपूर
 - रा. गो. भांडारकर यांचे धर्मपर लेख व व्याख्याने
 - प्रार्थनासमजा अप्रिय असल्यास तो का?
 -  मुरळी
 - बहिष्कृत भारत
 - निराश्रित साहाय्यक मंडळ
 - भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळाची संस्थापना
भाग दुसरा - व्याख्याने
 -  डॉ. भांडारकरांस मानपत्र
 -  ब्राह्मसमाज व आर्यसमाज
 - धर्मजागृति
 - निवृत्ति व प्रवृत्ति आणि अवतार बाद व विकासवाद
 - राजा राममोहन राय
 - देशभक्ति आणि देवभक्ति
 - स्वराज्य आणि स्वाराज्य
 - ईश्वर आणि विश्वास
 - बौद्धधर्माचा जीर्णोद्धार
 - समाजसेवेची मूलतत्वे
 - ब्राह्मधर्म व ब्राह्मसमाज
 - एकनाथ व अस्पृश्य जाति
 - निराश्रित साहाय्यकारी मंडळी व आक्षेपनिरसन
 - आत्म्याची यात्रा
 - आत्म्याची वसति
 - हिंदुस्थानांतील उदार धर्म
 भाग तिसरा - उपदेश
 - आवड आणि प्रीति
 -  देवाचा व आपला संबंधविषय
 - स्तुति, निर्मत्सना व निंदा
 - विनोदाचे महत्व
 - प्रेमप्रकाश
 - संग व विषय
 - मरण म्हणजे काय?
 स्त्रीदैवत
 दान आणि ऋण
 - राज्यारोहण
 - नाममंत्राचे सामर्थ्य
 - डिप्रेस्ड क्लासेस मिशनची चवथी जयंति
 - कर्मयोग
 - संतांचा-धर्म आणि राष्ट्राचा उत्कर्ष
 - धर्म समाज आणि परिषद
 - धर्मसंघाची आवश्यकता
 - विनययोग
 - शासनयोग
 - पितृशासन
 - गुरुशासन
 - राजशासन
 -  धर्म आणि व्यवहार
 - प्रेरणा आणि प्रयत्न
 - मानवी आदर आणि दैवि श्रद्धा
 - मानवी स्नेह आणि ईश्वरभक्ति
 - मनुष्यसेवा आणि ईश्वरोपासना
 - मनाची प्रसन्नता आणि मोक्षप्राप्ति
 - परमार्थाची प्रापंचिक साधने
 - आधुनिक युग आणि ब्राह्मसमाज
 -  धर्मसाधन
 - नैराश्यवाद
 - आनंदवाद
 - संसारसुखाची साधने
 - वृत्ति, विश्वास आणि मतें.
 - व्यक्तित्वविकास
 -  मनुष्यजन्माची सार्थकता
 - 'आपुलिया वेळी घालावी हे कास'
 - कालियामर्दन