शिंदे लेखसंग्रह

शिव-भागवत

शक्ति आणि शिव ह्या दैवतांचा पूर्वापार निकट संबंध आहे. सूर्य, तुफानी वारे (मरुत), वीज आणि अग्नि ह्या भौतिक शक्तींशीं शिवाचा संबंध आहे. वेदांतील रुद्र आणि मरुत् ह्या देवतांशीं जरी शिवाचा संबंध पोंचतो तरी ही देवता अस्सल द्राविडांचीच असावी. संसर्गामुळें ती आर्यांनीं द्राविडांपासून स्वीकारली असावी. आर्यांचा द्राविडांशीं समान दर्जाचा तह होऊन त्यांच्यामध्यें परस्पर शरीरसंबंध झाल्याचे पुष्कळ दाखले जुन्या पुराणांत आहेत. ऐल ऊर्फ सोमवंशी राजा ययाति ह्याच्या दोघी बायका असुर अथवा दैत्य ऊर्फ द्राविड कुळांतल्या होत्या. पहिली शर्मिष्ठा, ही असुरांचा राजा वृषपर्वन् ह्याची मुलगी. दुसरी देवयानी ही तर दैत्यांचा गुरु उशनासशुक्राचार्य ह्याची मुलगी. पहिलीच्या पोटीं द्रह्य, अनु, पुरु आणि दुसरीच्या पोटीं यदु, तुर्वसु असे मिळून पुढील सोमवंश कुळाचे पांच मूळ पुरुष जन्मले. हिडिंब नांवाच्या राक्षस राजाची मुलगी भीमानें लढाईच्या शेवटीं तह करतांना वरिली. श्रीकृष्णांनीं तर जांबवती ह्या अस्पृश्य कुळांतील तरुणीशीं तिच्या बापाचा पराजय केल्यावर विवाह लाविला. तिला मुलगा होईना म्हणून कांहीं वर्षे हिमालयांत महादेवाजवळ तप करून त्याच्या प्रसादानें सांब ह्या मुलाला मिळविलें, वगैरे माहिती महाभारतांत आहे. पण बौद्धांच्या जातक कथेंत जांबवतीची माहिती थोडी वेगळी आहे ती अशी :- वासुदेव राजा एके दिवशीं शिकारीला निघाला असतां वेशीपाशीं त्याला एक अस्पृश्य वर्गाची तरुणी दिसली, तिला त्यांनी वरिलें. पुराणांतील विषयांचें अगदीं शास्त्रीय पुद्धतीनें अध्ययन करून कलकत्त्याचे माजी जस्टिस् पार्जीटर ह्यांनीं आपल्या Ancient Indian Historical Tradition ह्या ग्रंथांत जे नवीन आश्चर्यकारक सिद्धान्त स्थापिले आहेत, त्यांतील एक असा आहे कीं, प्राचीन काळचे ब्राह्मण हे अनार्य होते. वसिष्ठ, कश्यप, भार्गव इ. प्रसिद्ध ब्राह्मण कुळें हिरण्यकशिपु ह्या दैत्य राजाचे पुरोहित होतीं (पान ३०७). इतकेंच नव्हे तर इक्ष्वाकु वगैरे सूर्यवंशी क्षत्रियहि द्राविड वंशाचे राजे होते (पान २९५). तें कसेंहि असो; ह्या क्षत्रियांचें आणि इतर द्राविडांचें उपास्य दैवत शिव हेंच होतें, हें निर्विवाद आहे. दाशरथि रामचंद्रानें शतकोटी लिंगांची स्थापना आपल्या दक्षिणेकडील मोहिमेंत केली. भारतीय युद्धांत जय मिळविण्यासाठीं कृष्णानें जसें अर्जुनास दुर्गेची प्राथना करावयास लाविलें, तसेंच रावणावर जय मिळविण्यासाठीं त्वरजा ऊर्फ तुळाजांबिका ह्या देवीची आराधना ह्या रामचंद्राला करावी लागली. राम आणि कृष्ण पुढें विष्णूचे अवतार बनले; पण स्वतः त्यांचें उपास्य दैवत विष्णु असणें शक्य नव्हतें, तें त्यांचें दैवत शिवच होतें. तहानंतर स्नेहसंबंध दृढ व्हावा म्हणून पूर्वी जसे राजे लोकांमध्यें परस्पर शरीरसंबंध ऊर्फ बायकांची देवघेव होत असे ( अकबराची हीच राजनीति होती ) तशीच देवांचीहि देवघेव होणें साहजिक आहे. ह्या न्यायानें शक्ति आणि शिव ह्या दोन देवता आर्यांनीं मोंगलां-द्राविडांपासून घेतल्या असाव्यात. द्राविड क्षत्रियांनीं विष्णु हें दैवत घेतलें असावें.

आर्यांनीं शिव ह्य देवताचा स्वीकार करण्यापूर्वी हा आर्येतरांचा होता, व ह्यांचा आर्य लोक तिटकारा करीत असत, असा पुरावा वेदांत आहे. शिश्नदेव म्हणजे ज्या निषाद आदिकरून लोकांचा देव शिश्न (लिंग) होता, त्यांचा इंद्रानें पराभव करून त्यांचीं मोठमोठीं शहरें लुटून संपत्ति आणिली, अशी इंद्राची स्तुति केलेली वेदांत आढळते. (ॠक मंडळ ७ स्तोत्र २१-५) ह्यावरून हे लोक केवळ जंगली नसून ते आर्यांपेक्षां अधिक मातबर संस्कृतीचे व संपत्तिपूर्ण शहरांत राहणारे होते असें दिसतें. आकाश हा पिता आणि भूमि ही माता आणि ह्या दोघांचा संयोगदर्शक लिंग आणि योनीची पूजा ही अतिप्राचीन कालापासून चालत आलेली गोष्ट आहे. गेल्या ५।६ वर्षांत सिंध आणि पंजाबांत जे सरकारी संशोधन खात्यानें सुमारें ५००० वर्षांपूर्वीच्या सुमिरिअन् ऊर्फ समेरु लोकांच्या वैभवशाली संस्कृतीचे अवशेष उकरून काढले आहेत, त्यांतील शिश्नाच्या आकृति हुबेहूब प्रदर्शनासाठीं ठेविल्या आहेत. तेव्हां ही शिवशक्तीची उपासना ह्या देशांत मुळापासूनच असणें संभवतें. ह्या पूजेचा ईजिप्‍त देशाशीं मूळ संबंध कित्येक दाखवितात तो येणेंप्रमाणें :- पिंडीवर घातलेलें पाणी वाहून जाण्यासाठीं पन्हाळ असतें. आकाशांतून भूमीवर जो पर्जन्य पडतो तें आकाश देवाचें रेत आणि तें भूमीवर पडल्यावर वाहून नेणारी पन्हाळ म्हणजे ईजिप्‍त देशांतील जी नाईल नदी, ती उत्तरवाहिनी आहे. चमत्कार हा कीं, जेथें जेथें हिंदुस्थानांत अगदीं जुनीं व नवीं शिवालयें जीं आजवर मीं पाहिलीं आहेत, त्यांतील पिंडीच्या पन्हाळी बहुतकरून उत्तराभिमुखच आहेत. मला दोनच ठिकाणीं एक अपवाद आढळले. म्हैसूर संस्थानांतील शिमोगा येथील व्यंकटरमणाच्या देवळाच्या ओवरींतील एक पिंडी पूर्वाभिमुख दिसली तेवढाच. पण पुजार्‍याजवळ शोध करतांना सांगितलें कीं, ही पिंडी नवीन असून ती म्हैसूर सरकारच्या एका अडाणी अधिकार्‍यानें परंपरा लक्षांत न आणतां देवळाच्या नवीन दुरुस्तीचे वेळीं अशी चुकीनें मांडली आहे. दुसरा अपवाद उज्जनी येथील प्रसिद्ध महांकाळेश्वर ज्योतिर्लिंगाचा. ह्याची पन्हाळ पूर्वाभिमुखी आहे ! तरी पण ह्या भव्य देवळाच्या आवारांतील पुष्करणीभोंवतील ओटयावरून जीं अनेक लिंगें आहेत त्या सर्वांच्या पन्हाळी निरपवाद, उत्तराभिमुखीय दिसल्या ! कैलास पर्वत उत्तरेकडे आहे म्हणून पिंडीचा प्रवाह उत्तरेकडेच असावा, असें कांहीं नाहीं. नाईल नदीच्या उत्तरवाहिनीत्वाकडेच हा संबंध अधिक चांगला जमतो. ह्या व इतर अनेक उदाहरणांवरून शिव ही देवता आणि विशेषेंकरून तत्प्रीत्यर्थ लिंगपूजा ही पश्चिमेकडील ईजिप्‍त, बाबिलोनिया इत्यादि देशांतून आली असावी, असा तर्क करण्यास जागा आहे, असें कांहीं विद्वान् समजतात. पण ज्या अर्थी ही लिंगपूजा महाभारत काळापासून अगदीं आतांपर्यंत ह्या देशांत चालू आहे व लिंगायतांचा तर एक विशिष्ट पंथच आपल्या देशांत आहे, त्या अर्थी ही पूजा व हा देव हीं दोन्हीं मुळांत एथलींच असावींत, किंबहुना ह्या विक्षिप्‍त पूजापद्धतीचें मूळ अनेक देशांत असावें असें समजणें तूर्त अधिक सुरक्षित आहे.

शिव-भागवताचा उल्लेख पतंजलीच्या सूत्रांत आहे. शांतिपर्वांतील नारायणीय उपाख्यानांत (भाग ३४९ श्लोक ६४) शिव-श्रीकंठानें ह्या मताचा प्रथम उपदेश केला, असा उल्लेख आहे. वायुपुराण (भा. २३), लिंगपुराण (भा. २४) ह्यांत उल्लेख आहे कीं, प्रत्यक्ष महेश्वरानें ब्रह्मदेवाला सांगितलें कीं, वासुदेवाच्या जन्मकाळीं आपणहि लकुलिन् नांवाच्या एका ब्रह्मचार्‍याच्या रूपानें अवतार घेऊं व तो कुशिक, गर्ग, मित्र आणि कौरूश्य ह्या चार शिष्यांना पाशुपतशास्त्राचा उपदेश करील. हा ह्या शिवभागवतांचा मूळ आचार्य भट्टारक लुकलीश नांवानें गुजराथ (लाट) देशांतील भडोच जिल्ह्यांत उदयास आला, व तो शिवाचा अवतार होता वगैरे गोष्टींना १० व्या आणि १३ व्या शतकांतल्या कांहीं शिलालेखांतहि आधार आहे [सर भांडारकर Vaishnavism and Shaivism पान ११६]. ख्रिस्ती शकापूर्वी दुसर्‍या अथवा तिसर्‍या शतकांतील सांची येथील शिलालेखांत देणगी देणार्‍यांचीं जीं नांवें आढळतात, त्यावरून भूलर ह्यांनीं असें अनुमान काढिलें कीं, विष्णु आणि शिव-भागवंतांचा संप्रदाय बौद्धांच्या व जैनांच्याहि पूर्वीचा असावा, पण या म्हणण्यांत पूर्ण सत्य नाहीं. सर भांडारकर म्हणतात कीं, विष्णूची सांप्रदायिक पूजा शिवपूजेनंतर सुरू झाली. ह्याला त्यांनीं गृहसूत्रांत रुद्राची पूजा कशी करावी, ह्याविषयीं नियम आहेत ह्या गोष्टीचा पुरावा दिला आहे. (Vaishnavism and Shaivism पान ११५). ह्यावरून आणि इतर बर्‍याच पुराव्यावरून शिव-पूजा ही बुद्धाच्या पूर्वीची होती, पण विष्णु-कृष्ण पूजा मात्र बुद्धानंतरची असावी असें होतें. पाली ग्रंथांमध्यें वासुदेवोपासकांचा उल्लेख आहे, तथापि पांचरात्र आणि सात्वत (भागवतांचा) संप्रदाय बौद्धानंतरचाच असावा इतकेंच नव्हे तर श्वेताश्वेतर उपनिषदांतील शिव-भक्तीचा नमुना आणि पाशुपत सांप्रदायदेखील बुद्धानंतरचेच असावेत.

रुद्र शिव हें दैवत वेदाहूनहि बर्‍याच प्राचीन काळापासून चालत आल्यामुळें त्याच्या स्वरूपांत ज्याप्रमाणें अनेक परिवर्तनें झालीं, त्याचप्रमाणें त्यांच्या पूजेच्या प्रकारांतहि होणें साहजिकच आहे. वेदांच्या व त्यापूर्वीच्या आर्ष काळीं आर्यांमध्यें मूर्तिपूजेचा संभवच नव्हता. तेव्हां शिव (आकाशपिता) आणि शक्ति (भूमाता) ह्यांची पूजा लिंग आणि योनि (स्त्रीपुरुषांची जननेंद्रियें) ह्या चिन्हांच्या द्वारेंच होत असावी. हें वेदांतील शिश्नदेवाच्या उल्लेखावरून दिसतें. बाबिलोनिया, ईजिप्‍त वगैरे प्राचीन राष्ट्रांत अशा प्रतीकांची पूजा होती. पुढें ती ह्या पुरातन महादेवाचा बर्‍याच कालानंतर रुद्र (भयंकर) स्वरूपांतून शिव (सौम्य) स्वरूपांत विकास झाल्यावर त्याच्या उपासनेसाठीं मनुष्याच्या आकाराच्या मूर्ति करण्यांत आल्या असाव्यात. इ.स. पूर्वी २०० वर्षांच्या सुमारास शिवाच्या लहान लहान मूर्ति करून बाजारांत विकण्यास ठेवण्यांत येत, असा पतंजलीच्या भाष्यांत उल्लेख आहे. तथापि लिंग-योनि पूजेचा त्या वेळीं अगदीं लोप झाला असावा, अशी जी सूचना गुरुवर्य भांडारकरांनीं केली आहे, ती मात्र पटत नाहीं. कारण महाभारतांत उपमन्यूनें आणि कृष्णानें शिवाची आराधना केल्याची जी गोष्ट आहे तिच्यांत उपमन्यूनें अशा पूजेचा लोकांत प्रचार असल्याचा उल्लेख केला आहे. ख्रिस्ती शकाच्या पहिल्या एकदोन शतकांतील कनिष्क, हविष्क वगैरे कुशान राजांचीं जीं नाणीं सांपडलीं आहेत, त्यांवर शिवाचीं दोन हातांची किंवा चार हातांचीं, त्रिशुल, पाशुपत (कुर्‍हाड) इ. आयुधें असलेलीं मनुष्यरूपीं चित्रें छापलेलीं आहेत. त्यांच्याहि बर्‍याच अगोदरच्या गोंडोफेरस नांवाच्या इराणांतील पार्थीयन (पल्लव) राजाच्या नाण्यांवरून शिवाच्या त्रिशूलधारी मनुष्याकृति मुद्रा आढळतात. ह्यावरून शिवाच्या ह्या मूर्ति, किंबहुना शिवाचें सौम्य आणि कल्याणकारी ध्यानहि पश्चिमेकडील ईजिप्‍त बाबिलोनियादि देशांतून आलें असण्याचा जितका संभव दिसतो, तितकाच संभव रुद्र-शिवाच्या स्वरूपांतील आणि उपासनेंतील घडून आलेला विकास पुरातनकाळापासून ह्याच देशांतहि घडून येण्याचा दिसतो. मात्र पुढें पुढें हिंदुस्थानांत शिवाचें हें सौम्य स्वरूप कायम राहून रौद्ररूप जसें मागें पडलें, तसेंच त्यांचा पूजेतील मूर्तिपूजा मागें पडून लिंगपूजाच चिन्हरूपानें कायम राहिली; ह्यावरून शैव भागवत पूर्वीपासूनच विशेषतः ज्ञान आणि वैराग्य मार्गाचें अभिमानी असल्यामुळें त्यांना मनुष्याकृति मूर्तिपूजेपेक्षां जगदुत्पत्तीचें एक पुरातन परंपरेचें केवळ चिन्ह अथवा द्योतक म्हणून लिंगपूजाच अधिक पसंत झाली असावी असें दिसतें. असो.

शिंदे लेखसंग्रह

  पुरस्कार
  प्रस्तावना
  ती. अण्णांच्या लेखसंग्रहाबाबत
  ती. अण्णांच्या लेखसंग्रहाबाबत
  कर्मवीर वि.रा.शिंदे यांचा जीवनक्रम
विभाग पहिला
 - भागवत धर्माचा विकास
 - वैदिक धर्म
 - भागवत धर्म
 - भागवत धर्माचा पाया
 - "भागवत" शब्दाचा इतिहास
 - निराळे भागवत पंथ
 - शक्ति अथवा देवी भागवत
 - शिव-भागवत
 - श्वेताश्वेतरोपनिषद ऊर्फ शिवगीता
 - जैन आणि बौद्ध भागवत
 - बौद्धांचा इतर भागवतांशी संबंध
 - विष्णु-भागवत
 - वासुदेव आणि एकान्तिक धर्म
 - अशोक आणि वैष्णव धर्म
 - शैव, बौध आणि वैण्णवांची परंपरा
 - भगवद्गीता
 - राष्ट्रधर्म आणि सार्वत्रिक धर्म
 - मंदिरे आणि मूर्ति
 - कुशान-काळ
 - गुप्तांचा काळ
 -हर्ष आणि चालुक्य
 - मात्रिकांची दुकानदारी
 - मूर्तिकार ब्राह्मणच !
 - तांत्रिक वाममार्ग
 - वेदोक्त आणि पुरागोक्त
 - पुराणांचा विपर्यास
 - पुराणिक आणि हरिदास
 -विचित्र मायपोट!
 - ओढिया जगन्नाथ
 - नामदेव तुकाराम
 - भागवत पुराण
 - तामीळ भक्त
 महाराष्ट्र भागवत धर्म
 - संस्थापक कोण?
 - दोन ज्ञानदेव व तीन नामदेव
 - वारकरी पंथाची लोकसत्तात्मकता
 - तुकाराम
 - लिंगायत धर्म
 - महानुभाव पंथ
 - रामानंद
 - कबीर
 - चैतन्य पंथाची भूमिका
 - चैतन्यचरित्र
 -  पंथाचा प्रचार व अवनति
 - इतर पंथ
 - शीख धर्म मुसलमान-संस्कृतीचा प्रवेश
 -  पंजाब प्रांत
 -  नानक चरित्र
 -  पंथभेद
 -  गुरु गोविंदसिंग
विभाग दुसरा
 - मराठ्यांची पूर्वपीठिका/रट्टवंशोत्पत्तीदिषयी शास्त्रीय विचार 
 - मराठ्यांतील प्रसिध्द राजघराणीं
 -  समाजशास्त्रीय विंचार
 - लिखित इतिहासाचे पुरावे
 -  अस्सल राजपुतांची मूळ छत्तीस कुळें
विभाग तिसरा
 -  अस्पृश्यांचे राजकारण (प्रस्तावना)
विभाग चवथा
 -  महाराष्ट्राच्या उत्कर्षाचा एकमेव मार्ग !
 - मराठे हिशेबी नाहीत
विभाग पाचवा
 -  तत्त्वज्ञान आणि समाजशास्त्र (भाष्य-भारुड)
 - साक्षात्कारी वाड्मय
 - आधुनिक रुपान्तरे
 समाजशास्त्र
 उपसंहार
विभाग सहावा
 -  महाराष्ट्र नाना शंकरशेटला कां विसरला !
विभाग सातवा
 -  दारुचा व्यापार, सरकार आणि बहुजनसमाज
 - राजकीय स्वरुप
 - मुख्य मुद्दा
 -  व्यापाराचा इतिहास
 -  ह्या व्यापाराचें पिलूं
 -  दारुची बंदि कीं शिक्षणाची सक्ति?
 -  विषारी जाळें
 -  व्यभिचाराचा सांवळा गोंधळ
विभाग अठवा
 - कोकणी व मराठी परस्पर संबंध
 - ऐतिहासिक विवेचन
 - कोंकण ह्या नांवाची व्युत्पत्ति
 - ही कोणत्या राष्ट्राची भाषा?
 - व-हाडी आणि इतर शाखा
 - शब्दकोश
 - व्याकरण
 - साधित शब्द
 - स्वरवैशिष्टय
 - संप्रदाय
विभाग नववा
 - कानडी आणि मराठी तुलनात्मक अध्य़यन
 - पूर्वपीठिका
 - कानडी लिपी
 - शब्दकोश
 - मराठींत कानडी शब्दांचा भरणा
 - कानडी क्रियापदे
 - व्याकरण
 - नामांच्या विभक्ति
 - क्रियापदांच्या विभक्ति
 - लकबा
 - वाड्मय
 - उपसंहार
विभाग दहावा
 -  मराठीचा प्रवास
 -  कानडी विरुद्ध मराठी
 -  चौदावें शतक
 - पुण्यातील जाहीर सभा
 - कर्नाटकांची दुर्दशा
विभाग अकरावा
 -  राधामाधव-विलास-चंपू आणि रा. राजवाडे
 - मराठ्यांविरुद्ध आगळीक
 - जैन लिंगायतांशी भांडकुदळपणा 
   व महाराष्ट्राची बदनामी
 - केवळ ब्राह्मणेतर द्वेष
विभाग बारावा
 - पुणेरी पेशव्यांची राष्ट्रीय कामगिरी(!)
 - श्री शाहू व नाना
 - मराठे व पेशवे
विभाग तेरावा
 - मराठेतर कोण?
विभाग चौदावा
 - वेदोक्त कीं पुराणोक्त
विभाग पंधरावा
 - चातुर्मास्य, तुकोबा व त्यांची टवाळी
विभाग सोळावा
 - कौलिकता हाच आत्मयी शिक्षणाचा पाया
विभाग सतरावा
 -  पूर्व बंगाल्यांतील अस्पृश्य वर्गाच्या उच्च
    शिक्षणाची प्रगति
विभाग अठरावा
 - महाराज शिवाजी आणि महात्मा गांधीजी
विभाग ऐकोणीसावा
 - महात्मा फुले व केशवचंद्र सेन (साम्य)
 - महात्मा फुले व केशवचंद्र सेन (भेद)
विभाग विसावा

 - ब्रह्मानंद केशवचंद्र सेन:त्यांचे
   विश्वधर्म 
विकासांतील स्थान

 - सिंहलद्वीपांतील डच मिशनच्या
   प्रचारपद्धतीचा मासला
विभाग एकविसावा
 - अस्पृश्यांची शेतकी परिषद
विभाग बावीसावा
 - मुंबई इलाखा शेतकरी परिषद, पुणें
 - मध्यभाग
विभाग तेवीसावा
 - प्रांतिक सामाजिक परिषद सातारा
 - समाजसुधारणा यशस्वी कां होत नाही?
 - सामाजिक सुधारणेचा व्यापक अर्थ
 - ध्येयात्मक प्रयत्नांतील ऐक्य
 - तपशिलाचें वर्गीकरण
 - सांप्रदायिक अस्पृश्यता
विभाग चोवीसावा
 - संस्थांनी शेतकरी परिषद, तेरदळ
 - जागतिक मंदी
 - चळवळीचा कोंडमारा
 - परिषदेचें सहकार्य
 - बोल्शेव्हिझमचा बागुलबोवा
 - संघटना
विभाग पंचविसावा
 - अखिल भोर संस्थान प्रजापरिषद
 - इतिहास
 - चालू स्थिती
 - भावी सुधारणा
विभाग सव्वीसावा
 - वाळवें तालुका शेतकी, परिषद, बोरगांव
 - मालकी हक्क
 - अवर्षण, कीड मुंगी, भिकार-बुणगे
 - मग महारामांगांचे काय हाल वर्णावेत !
 - सौम्य उपाय
 - भविष्य
विभाग सत्ताविसावा
 - चांदवड तालुका शेतकरी परिषद, वडनेर
 - शेतकरी व सरकार
 - शेतकरी आणि भांडवलदार
 - शेतकरी आणि कॉग्रेस
 - विधायक घटना
 - जमीनदार वर्ग
 - कुणब्यांची जूट
 - अमेरिकेंतले शेतकरी
 - महाराष्ट्राचा गांवगाडा
 - सामाजिक व धार्मिक बाबी
 - शेतक-यांचा स्वयंनिर्णय
विभाग अठ्ठाविसावा
 - ब्रह्मदेशांतील बहिष्कृत वर्ग
 - फ्याचून
 - तुबायाझा
 - सगाईन
 - न्याँऊ
विभाग एकोणतीसावा (परिशिष्ट पहिलें.)
 - भागवतधर्म व महाराष्ट्रधर्म (व्याख्यान पहिलें)
  -भागवतधर्म व महाराष्ट्रधर्म (व्याख्यान दुसरे)
 - ब्राह्म समाज आणि बौद्धधर्म: व्याख्यान तिसरे
विभाग तिसावा (परिशिष्ट दुसरे.)
 - INDIAN CIVILIZATION
 - टीपा
 - परिशिष्ट चौथें