शिंदे लेखसंग्रह

पूर्व बंगाल्यांतील अस्पृश्य वर्गाच्या उच्च शिक्षणाची प्रगति

भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळाची स्थापना झाल्यावर मला आपल्या ब्राह्म समाजाच्या सफरीवर बंगाल्यांत सन १९०८ चे सुमारास एकदां जावें लागलें. अर्थात मला तेथें ठिकठिकाणीं “अस्पृश्यांच्या” आपत्तीबद्दल व्याख्यानें द्यावीं लागलीं. तेथील ब्राह्म समाजांतील कांहीं सभासदांनीं लगेच इकडील आपल्या मिशनच्या धर्तीवर तिकडे शाळा काढल्या. प्रथम प्रथम ह्या कामाचा आमच्या मिशनचा संबंध होता. पण तिकडील कार्याचा अंतर्भाव लवकरच ब्राह्म समाजाच्या इतर सामाजिक कामांत करावा लागला; त्यामुळें आमच्या ह्या अखिल भारतीय मंडळाशीं त्या कामाचा दप्तरी संबंध आम्हांला तोडावा लागला. तरी पण मी जेव्हां जेव्हां बंगाल्यांत जाई तेव्हां तेव्हां तें काम मुद्दाम पाहून येई. इ. स. १९२३ सालीं मी बंगाल्यांत गेल्यावेळीं जेसोर आणि खुलना जिल्ह्यांतील आमच्या कांहीं हायस्कुलांत राहून तीं नीट तपासून आलों होतों. गेल्या वर्षीं ऑगस्ट महिन्यांत साधारण ब्राह्म समाजानें ‘ब्राह्म समाज हिदुस्थानांत स्थापन होऊन १०० वर्षें पूर्ण झालीं’ म्हणून बंगाल्यांत विशेषतः कलकत्त्यांत एक अपूर्व महोत्सव केला. त्या निमित्तानें पूर्व आणि उत्तर बंगाल्यांत एक मोठें प्रचारक दळ काढण्यांत आलें होतें. तें काम मजकडे आलें म्हणून मी विशेषतः ज्या खेड्यांतून “नामशूद्र” नांवाच्या अस्पृश्य वर्गाच्या शाळा व इतर प्रागतिक कामें चाललीं होतीं तेथें हें दळ नेलें. त्या वेळीं आज सुमारें २० वर्षें चाललेल्या ह्या शिक्षणविषयक कामाची प्रगति झाली आहे, हें मला प्रत्यक्ष पाहावयास मिळालें.
मुंबईकडील आणि बंगालकडील कामांत हा एक विशेष फरक आहे कीं, मुंबईकडे आमचीं सर्व कामें ह्या मिशनकडूनच प्रत्यक्ष होतात. पुणें शाखेंतच मात्र कमिटींत व प्रत्यक्ष काम करणारांत “अस्पृश्य” वर्गाच्या सभासदांची बहुसंख्या आहे. अलीकडे तर त्यांचीच सत्ताहि चालू आहे. तरी अद्यापि इकडील मिशनमध्यें प्रत्यक्ष “अस्पृश्य” वर्गाच्या होतकरू पुढा-यांनीं म्हणण्यासारखें लक्ष पोंचविलेलें किंवा अंग मोडून काम करीत असल्याचें दिसत नाहीं. बंगाल्यांत उलटा प्रकार आढळतो. पूर्वींपासूनच तिकडील सर्व शाळा आणि इतर कामें “अस्पृश्य” वर्गांनींच काढल्या व चालविलेल्या आणि ब्राह्म समाजानें त्यांना तसें करण्यास प्रेरणा व साह्य केलें. ह्या फरकाचें कारण हेंच कीं, तिकडील नामशूद्रांची स्थिति इकडील मांगांहून पुष्कळच उच्च दर्जाची पूर्वींपासूनच होती. डोम, पोड, होरी वगैरे इतर खरोखरीच अवनत वर्गांची स्थिति नामशूद्रांपेक्षांच नव्हे तर आमच्या महारमांगांहून अद्यापि किती तरी अधिक खालावलेली आहे. दक्षिण हिंदुस्थानांत बिल्लव, तिय्या, एजवा नांवांच्या अस्पृश्यांची स्थिति ज्याप्रमाणें इतर ‘अस्पृश्यांहून’ पुष्कळ सुधारलेली आहे, त्याचप्रमाणें बंगालच्या नामशूद्रांचा प्रकार आहे. दक्षिणेंत बिल्लव, तिय्या वगैरे परय्या, चिरुमा वगैरेंना जसें अद्यापि शिवून घेत नाहींत व इतर वरिष्ठ वर्गांप्रमाणेंच ह्या गरिबांना निर्दयपणानेंच वागवितात, त्याचप्रमाणें नामशूद्रहि हा भेद पाळतात. फार काय आम्हीं मुंबई इलाख्यांत जेव्हां प्रथम कामाला सुरुवात केली, तेव्हां चांभार, ढोर, वगैरेंनीं स्वतः वरिष्ठ समजून आमच्या मिशनचा फायदा घेण्यास बरेच आढेवेढे घेतले. बहुतेक महारच शाळांतून व बोर्डिंगांतून येत. आणि तेहि मांग, भंगी ह्यांच्याशीं समानतेनें वागण्यास कां कूं करीत. अजून तरी मिशनकडे सर्व ‘अस्पृश्यांचें’ पूर्ण लक्ष न लागण्याच्या अनेक कारणांपैकीं, ह्या अस्पृश्य वर्गांतील आपसांतील जातिभेदच एक मुख्य कारण आहे, हें मिशनबाहेर राहून नीट ध्यानांत धरणें शक्य नाहीं. असो.
हा प्रांतिक जातिभेदाचा फरक कसाहि असो, बंगाल्यांत विशेषतः पूर्व बंगाल्यांत आज नामशूद्रांच्या उच्च शिक्षणाची जी झपाट्यानें प्रगति चालली आहे, त्याचीं दुसरीं कारणें म्हणजे बंगाल प्रांताचें शिक्षण खातें व कलकत्ता युनिव्हर्सिंटीचें लोकसत्तावादी धोरण हीं दोन मुख्य होत. शिक्षणाचे दृष्टीनें, मग तें प्राथमिक असो वा उच्च असो, बंगाल आणि मद्रास हे दोन्ही प्रांत मुंबईच्या किती तरी पुढें आहेत. त्यांतल्या त्यांत मुंबई युनिव्हर्सिटी ही स्त्री शूद्रांच्या बाबतींत तरी फार ओढग्रस्त आणि मागासलेली आहे. उच्च शिक्षण महाग आणि दुर्मिळ करण्यांत तिचा हातखंडा ! अस्पृश्यांना व स्त्रियांनाच काय पण जंगली जाती, गुन्हेगार जाती, किंबहुना आंधळे, बहिरे, मुके ह्यांनाहि ब्राह्मणादिक कुशाग्र बुद्धीच्या पुरुषाबरोबर एकाच जात्यांत भरडण्याची ह्या युनिव्हर्सिटीला खोड लागली आहे. ती जाईपर्यंत “अस्पृश्यांचीं” निराळीं हायस्कुलें इकडे निघणें शक्य नाहीं.
मद्रासमध्यें स्त्रियांकरितां वेगळीं कॉलेजें आहेत. कांहीं तर स्त्रियांनींच चालविलीं आहेत. मद्रासेकडे पडदा नाहीं, तसेंच बंगल्यांत जातिभेद तीव्र नाहीं. पूर्वीं बौद्ध धर्म आणि आतां वैष्णव, व अलीकडे ब्राह्म समाजाचा जोराचा परिणाम तेथें झाला असल्यामुळें दक्षिणेकडील भयानक अस्पृश्यतेच्या गोष्टी बंगाल्यांतील नामशूद्रांनाहि अरेबिअन नाइटसप्रमाणेंच सहज विश्वासार्ह वाटत नाहींत. अशा अनेक कारणांमुळें, विशेषतः पूर्व बंगाल्यांतील नामशूद्रांनीं, आतां शिक्षणांतच नव्हे तर इतर बाबतींतहि आपलें पाऊल सारखें पुढें चालविलें आहे. तशांत नामशूद्र हाच तिकडील कुणबी वर्ग मुसलमानांच्या पूर्वीं आणि मुसलमान रिआसतींतहि त्यांची लष्करांत फार भरती होत असे. आतांहि हिंदु-मुसलमानांच्या मारामारींत नेभळे आणि चळवळे हे दोन्ही प्रकारचे बंगाली नामशूद्रांनाच शरण येतात. मुसलमान तर ह्यांच्या कधींच वाटेला जात नाहींत. हे नामशूद्र थोड्याच शतकांपूर्वीं बौद्ध क्षत्रिय होते. ही सर्व पूर्वपीठिका आठविल्यास खालील कोष्टकांतील आंकडे पाहून आश्चर्य वाटण्याचें कारण उरणार नाहीं.

पूर्व बंगाल्यांतील नामशूद्रांचें उच्च शिक्षण [हायस्कूल]
( PDF साठी येथे क्लिक करा)

 

ह्या आंकड्यांत मुलींची संख्या दिलेली नाहीं. शिवाय सचिदाहा शाळेंत फ्री बोर्डिंग ४० मुलांचें आहे, तसें सर्वत्र नसलें तरी ह्या सर्व खेड्यांतून जेवण व राहण्याची सोय जवळच असते. ह्या तेरा हायस्कुलांची माहिती केवळ पूर्व बंगाल्यांतील चार जिल्ह्यांतील आहे. ह्याहून अधिक शाळा व मिडल स्कूल्स किती तरी आहेत. हीं सर्व निव्वळ नामशूद्रांनीं आपल्या हिमतीवरच चालविलीं आहेत ! पैकीं चार ठिकाणीं तर मी स्वतः जाऊन राहिलों आहे. अर्थात् यांना आमच्याकडे ‘हाय स्कूलें’ म्हणजे उंच शाळा कोणीच म्हणणार नाही. पत्र्यांची वावरांतून एक पडळ बांधली आणि सुमारें शंभर मुलें जमविलीं कीं झाली हायस्कूलची तयारी ! ३० पासून ६०-७० पर्यंत पगारावर ८-१० मास्तर स्वजातीयांतून सहज मिळतात. त्यांत तीन चार तरी ग्रॅज्युएट असतातच. एलएल. बी. चा अभ्यास करणारा एखादा पोक्त अनुभवी हेडमास्तर होतो. आसपासचीं ५-१० खेड्यांतून अर्धवट इंग्रजी शिकलेलीं मुलें जमतात. कोणी जागा, कोणी पत्रा, कोणी लांकडें, कोणी ढेकळें देऊन कमिटीचे सभासद होतात. सल्लामसलत, पैशाची जुजबी मदत आणि देखरेख करण्यास ब्राह्म समाज तयार आहेच. मॅट्रिकची परीक्षा पास झाली कां, त्याला प्रवेश द्यावा; ह्यापेक्षां युनिव्हर्सिटी अगर विद्याखातें उगीच त्यांच्या मागें कांहीं भगभग लावीत नाहीं. आमचेकडे हायस्कूल म्हटलें कीं, निदान एक लाखाची काळ्या दगडांची उंच इमारत पाहिजेच. अर्थात हेडमास्तरनें क्लासांत तरी बूट, पाटलोण, आणि झिळीमिळ्यांची कोकींचें प्रदर्शन केलेंच पाहिजे. ह्या बहिरंगप्रमाणेंच शिक्षणाचा आंतील साज सजवावा लागतो. अलीकडे तर अमुक एवढी लॅबॉरेटरी आणि तमुक तेवढी लायब्ररी दाखविल्याशिवाय युनिव्हर्सिटीकडून हायस्कूललाच प्रवेश मिळत नाहीं. मग विद्यार्थ्यांना कोण पुसतो ? विद्यार्थ्यांसाठी विद्यालय नसून विद्यालयासाठींच जेथें विद्यार्थी जमतात, तेथें विद्यालयांची इज्जत आणि विद्यार्थ्यांच्या पालकांची ऐपत ह्यांमध्यें ऐहिक कोणताच संबंध नसल्यास काय नवल !
निव्वळ शिक्षणाच्या खोल दृष्टीनेंच पाहूं गेल्यास बंगाल्यांतील अशा हायस्कुलांतील शिक्षण फार कमी दर्जाचें दिसतें हें मला कबूल केलें पाहिजे. पण एक लाखाच्या उंच इमारतींतलें शिक्षण ह्या एक हजार रुपयांच्या झोपडीपेक्षां शंभर पटीनें अधिक असेंहि खास नाहीं. शिक्षणाचा उपकरणांशीं संबंध कमी आणि शिक्षकांच्या दर्जाशीं आणि त्यांच्यांत व शिष्यांत जी सहानुभूती असणार तिच्याशीं अलबत जास्त. ही दुसरी मिळकत म्हणजे सहानुभूति मला ह्या शाळांतून विपुल दिसली. आमच्या इकडच्या हायस्कूलच्या राजमहालांत एखादें भोकरवाडींतले पोरगें गेलें तर पहिल्या दिवशीं तें भेदरून जातें. टिकून राहिलेंच तर सहामाही परिक्षेच्या को-या कागदांचाहि खर्च त्याला न झेपल्यामुळें त्याला हा नाद सोडावा लागतो व शिष्य-शिक्षक नातें कमी सांगावें तितकें अधिक बरें.
वीस वर्षांतील ही प्रगति पाहून मला सर्व बाजूंनीं समाधानच झालें, असें म्हणवत नाहीं. तरी संख्येच्या व इतर दर्शनी बाजूंनीं नामशूद्र ग्रॅज्युएट सामान्य बंगाली ग्रॅज्युएटसारखाच दिसतो, हें खरें. असे शेंदोनशें तरी ग्रॅज्युएट आमच्या इकडे मराठ्यांत आढळतात. तसेंच तिकडे नामशूद्रांत आढळतात. पण आमच्या इकडे शिवाजी मराठा हायस्कूल हें एकच एक सा-या इलाख्यांत मराठ्यांनीं चालविलेलें तर तिकडे चारच जिल्ह्यांत १३ हायस्कूलें मला दिसलीं. आमच्या ह्या हायस्कुलांत सर्व शिक्षक मराठे नाहींत. ते कधीं मिळतील तें सांगवत नाहीं. पण तिकडील शाळेंत बहुतेक सर्व नामशूद्र ! एकंदरींत इकडील मराठ्यांपेक्षां उच्च शिक्षणांत तिकडील नामशूद्रांची स्थिति बरी म्हणविते आणि हि सर्व धांव गेल्या वीस वर्षांत त्यांनीं मारली हें विशेष !

शिंदे लेखसंग्रह

  पुरस्कार
  प्रस्तावना
  ती. अण्णांच्या लेखसंग्रहाबाबत
  ती. अण्णांच्या लेखसंग्रहाबाबत
  कर्मवीर वि.रा.शिंदे यांचा जीवनक्रम
विभाग पहिला
 - भागवत धर्माचा विकास
 - वैदिक धर्म
 - भागवत धर्म
 - भागवत धर्माचा पाया
 - "भागवत" शब्दाचा इतिहास
 - निराळे भागवत पंथ
 - शक्ति अथवा देवी भागवत
 - शिव-भागवत
 - श्वेताश्वेतरोपनिषद ऊर्फ शिवगीता
 - जैन आणि बौद्ध भागवत
 - बौद्धांचा इतर भागवतांशी संबंध
 - विष्णु-भागवत
 - वासुदेव आणि एकान्तिक धर्म
 - अशोक आणि वैष्णव धर्म
 - शैव, बौध आणि वैण्णवांची परंपरा
 - भगवद्गीता
 - राष्ट्रधर्म आणि सार्वत्रिक धर्म
 - मंदिरे आणि मूर्ति
 - कुशान-काळ
 - गुप्तांचा काळ
 -हर्ष आणि चालुक्य
 - मात्रिकांची दुकानदारी
 - मूर्तिकार ब्राह्मणच !
 - तांत्रिक वाममार्ग
 - वेदोक्त आणि पुरागोक्त
 - पुराणांचा विपर्यास
 - पुराणिक आणि हरिदास
 -विचित्र मायपोट!
 - ओढिया जगन्नाथ
 - नामदेव तुकाराम
 - भागवत पुराण
 - तामीळ भक्त
 महाराष्ट्र भागवत धर्म
 - संस्थापक कोण?
 - दोन ज्ञानदेव व तीन नामदेव
 - वारकरी पंथाची लोकसत्तात्मकता
 - तुकाराम
 - लिंगायत धर्म
 - महानुभाव पंथ
 - रामानंद
 - कबीर
 - चैतन्य पंथाची भूमिका
 - चैतन्यचरित्र
 -  पंथाचा प्रचार व अवनति
 - इतर पंथ
 - शीख धर्म मुसलमान-संस्कृतीचा प्रवेश
 -  पंजाब प्रांत
 -  नानक चरित्र
 -  पंथभेद
 -  गुरु गोविंदसिंग
विभाग दुसरा
 - मराठ्यांची पूर्वपीठिका/रट्टवंशोत्पत्तीदिषयी शास्त्रीय विचार 
 - मराठ्यांतील प्रसिध्द राजघराणीं
 -  समाजशास्त्रीय विंचार
 - लिखित इतिहासाचे पुरावे
 -  अस्सल राजपुतांची मूळ छत्तीस कुळें
विभाग तिसरा
 -  अस्पृश्यांचे राजकारण (प्रस्तावना)
विभाग चवथा
 -  महाराष्ट्राच्या उत्कर्षाचा एकमेव मार्ग !
 - मराठे हिशेबी नाहीत
विभाग पाचवा
 -  तत्त्वज्ञान आणि समाजशास्त्र (भाष्य-भारुड)
 - साक्षात्कारी वाड्मय
 - आधुनिक रुपान्तरे
 समाजशास्त्र
 उपसंहार
विभाग सहावा
 -  महाराष्ट्र नाना शंकरशेटला कां विसरला !
विभाग सातवा
 -  दारुचा व्यापार, सरकार आणि बहुजनसमाज
 - राजकीय स्वरुप
 - मुख्य मुद्दा
 -  व्यापाराचा इतिहास
 -  ह्या व्यापाराचें पिलूं
 -  दारुची बंदि कीं शिक्षणाची सक्ति?
 -  विषारी जाळें
 -  व्यभिचाराचा सांवळा गोंधळ
विभाग अठवा
 - कोकणी व मराठी परस्पर संबंध
 - ऐतिहासिक विवेचन
 - कोंकण ह्या नांवाची व्युत्पत्ति
 - ही कोणत्या राष्ट्राची भाषा?
 - व-हाडी आणि इतर शाखा
 - शब्दकोश
 - व्याकरण
 - साधित शब्द
 - स्वरवैशिष्टय
 - संप्रदाय
विभाग नववा
 - कानडी आणि मराठी तुलनात्मक अध्य़यन
 - पूर्वपीठिका
 - कानडी लिपी
 - शब्दकोश
 - मराठींत कानडी शब्दांचा भरणा
 - कानडी क्रियापदे
 - व्याकरण
 - नामांच्या विभक्ति
 - क्रियापदांच्या विभक्ति
 - लकबा
 - वाड्मय
 - उपसंहार
विभाग दहावा
 -  मराठीचा प्रवास
 -  कानडी विरुद्ध मराठी
 -  चौदावें शतक
 - पुण्यातील जाहीर सभा
 - कर्नाटकांची दुर्दशा
विभाग अकरावा
 -  राधामाधव-विलास-चंपू आणि रा. राजवाडे
 - मराठ्यांविरुद्ध आगळीक
 - जैन लिंगायतांशी भांडकुदळपणा 
   व महाराष्ट्राची बदनामी
 - केवळ ब्राह्मणेतर द्वेष
विभाग बारावा
 - पुणेरी पेशव्यांची राष्ट्रीय कामगिरी(!)
 - श्री शाहू व नाना
 - मराठे व पेशवे
विभाग तेरावा
 - मराठेतर कोण?
विभाग चौदावा
 - वेदोक्त कीं पुराणोक्त
विभाग पंधरावा
 - चातुर्मास्य, तुकोबा व त्यांची टवाळी
विभाग सोळावा
 - कौलिकता हाच आत्मयी शिक्षणाचा पाया
विभाग सतरावा
 -  पूर्व बंगाल्यांतील अस्पृश्य वर्गाच्या उच्च
    शिक्षणाची प्रगति
विभाग अठरावा
 - महाराज शिवाजी आणि महात्मा गांधीजी
विभाग ऐकोणीसावा
 - महात्मा फुले व केशवचंद्र सेन (साम्य)
 - महात्मा फुले व केशवचंद्र सेन (भेद)
विभाग विसावा

 - ब्रह्मानंद केशवचंद्र सेन:त्यांचे
   विश्वधर्म 
विकासांतील स्थान

 - सिंहलद्वीपांतील डच मिशनच्या
   प्रचारपद्धतीचा मासला
विभाग एकविसावा
 - अस्पृश्यांची शेतकी परिषद
विभाग बावीसावा
 - मुंबई इलाखा शेतकरी परिषद, पुणें
 - मध्यभाग
विभाग तेवीसावा
 - प्रांतिक सामाजिक परिषद सातारा
 - समाजसुधारणा यशस्वी कां होत नाही?
 - सामाजिक सुधारणेचा व्यापक अर्थ
 - ध्येयात्मक प्रयत्नांतील ऐक्य
 - तपशिलाचें वर्गीकरण
 - सांप्रदायिक अस्पृश्यता
विभाग चोवीसावा
 - संस्थांनी शेतकरी परिषद, तेरदळ
 - जागतिक मंदी
 - चळवळीचा कोंडमारा
 - परिषदेचें सहकार्य
 - बोल्शेव्हिझमचा बागुलबोवा
 - संघटना
विभाग पंचविसावा
 - अखिल भोर संस्थान प्रजापरिषद
 - इतिहास
 - चालू स्थिती
 - भावी सुधारणा
विभाग सव्वीसावा
 - वाळवें तालुका शेतकी, परिषद, बोरगांव
 - मालकी हक्क
 - अवर्षण, कीड मुंगी, भिकार-बुणगे
 - मग महारामांगांचे काय हाल वर्णावेत !
 - सौम्य उपाय
 - भविष्य
विभाग सत्ताविसावा
 - चांदवड तालुका शेतकरी परिषद, वडनेर
 - शेतकरी व सरकार
 - शेतकरी आणि भांडवलदार
 - शेतकरी आणि कॉग्रेस
 - विधायक घटना
 - जमीनदार वर्ग
 - कुणब्यांची जूट
 - अमेरिकेंतले शेतकरी
 - महाराष्ट्राचा गांवगाडा
 - सामाजिक व धार्मिक बाबी
 - शेतक-यांचा स्वयंनिर्णय
विभाग अठ्ठाविसावा
 - ब्रह्मदेशांतील बहिष्कृत वर्ग
 - फ्याचून
 - तुबायाझा
 - सगाईन
 - न्याँऊ
विभाग एकोणतीसावा (परिशिष्ट पहिलें.)
 - भागवतधर्म व महाराष्ट्रधर्म (व्याख्यान पहिलें)
  -भागवतधर्म व महाराष्ट्रधर्म (व्याख्यान दुसरे)
 - ब्राह्म समाज आणि बौद्धधर्म: व्याख्यान तिसरे
विभाग तिसावा (परिशिष्ट दुसरे.)
 - INDIAN CIVILIZATION
 - टीपा
 - परिशिष्ट चौथें