सत्याग्रह व तुरुंगवास

स्थलांतर  :  एकदां पंडित नेहरूना उत्तर हिंदुस्थानांतून येरवड्यांत आणण्यांत आलें.  त्यांच्यासाठीं अंधारीचा वॉर्ड खालीं करून पाठीमागें सर्कल म्हणून एक मोठें दालन आहे त्यांत आम्हां चौदा जणांस एकत्र ठेवण्यांत आलें.  हरिभाऊ तुळपुळे, बाळुकाका कानिटकर, नगरचे देवचाके, स्वामी सदानंद, इतकेच काय ते महाराष्ट्रियन होते.  बाकी सगळे गुजराथी होते, ज्या दालनांत आम्ही चौदा जण होतों त्यांत आम्ही येण्यापूर्वी 'सी' क्लासेस ८६ कैदी धरून ठेवण्यांत आले होते.  दररोज शेंकडों राजबंदींचे थवेच्या थवे येत.  येतांना त्यांच्या जयजयकाराच्या आरोळ्या ऐकून ते आल्याची आम्हांस वर्दी कळे.  तुरुंगाच्या नेहमींच्या सगळ्या जागा गच्च भरल्यामुळें बाहेर तंबूंतून नवीन तुरुंग निर्माण करण्यांत आला होता.  रोज नित्य नित्य नव्या बातम्या कर्णोपकर्णी कळत.  चित्ताची चलबिचल होई.  सर्कलमध्यें आल्यापासून आम्ही रोज भजन-उपासना एकत्र करीत असूं.  माझें एक भाशाशास्त्रावर व्याख्यान झालें.  आमच्या बोलण्यांत राजकारण नसल्यामुळें आमच्या उपासनांकडे व व्याख्यानांकडे जेलर कानाडोळा करूं लागले.  

ऍडव्हायझरी कमिटी  :   प्रत्येक तीन महिन्यांनीं एक ऍडव्हायझरी कमिटी तुरुंग पाहण्यास येत असे.  जून व सप्टेंबर महिन्यांत ही कमिटी आली.  मि. मॅकी, कमिशनर व त्यांच्यासह सात-आठ युरोपियन व हिंदी गृहस्थ आले होते.  हीं माणसें आम्ही जणुं काय प्राणिसंग्रहालयांतील प्राणची आहोंत, अशा समजुतीनें पाहून जात.  कोणी कांहीं व कसलीही विचारपूस करीत नाहींत.  मग ह्या कमिटीचा उपयोग काय ?  दुसर्‍या कोणाजवळ न थांबतां मजसमोर सर्वांना आणलें.  जणुं काय संग्रहालयांतील मी म्हणजे अतिशय प्रेक्षणीय प्राणी.  हिस्ट्री तिकिट नांवाचें लहानसें पुस्तक प्रत्येक कैद्याच्या नांवें असतें.  त्यांत त्याचें वर्तन, वजन, दिनचर्या नमूद केलेलीं असतात.  माझें तिकिट कमिटीच्या मुख्य साहेबानें पाहिलें.  मंडळी मुक्याचें व्रत पाळून आली तशी गेली.

मीं येथें ता. १२ मे रोजीं आल्यापासून तुरुंगाधिकार्‍यांकडे लेखनसाहित्याची मागणी केली.  एक महिन्यानें मागणी सफल झाली.  टाक असला तर दौत नाहीं, दौत असली तर शाई नाहीं, आणि हें सर्व असलें तर दिवा नाहीं असा प्रकार नेहमीं चालू असे.  ता. २४ जुलै रोजीं माझ्या खोलींत दिव्याची व्यवस्था करण्यांत आली.  अडीच महिन्यांनंतर मिळणार्‍या दिव्याच्या प्रकाशाकडे पाहून मला आनंद झाला.  तो इतका कीं लिहण्याचें सोडून मी दिव्याकडेच पाहात बसलों.  त्या दिवसापासूनच मी माझी रोजनिशि व बाळपणींच्या आठवणी लिहूं लागलों.

मुक्तता  :   ता. १३ ऑक्टोबर १९३० ला मी व बाळूकाका अंगणांत शत पावली करीत असतां आमचा वॉर्डर सखाराम तुकाराम धाकटे (एक मराठा जातीचा खुनी कैदी) एकदम मजकडे येऊन माझ्या पायां पडून रडूं लागला.  आपण वॉर्डर या नात्यानें थोडेंसें कडक वागवल्याबद्दल पश्चात्ताप झाला एवढेंच तो म्हणत होता.  मला मागाहून कळलें कीं, माझी सुटका ता. १४ रोजीं होणार होती हें त्याला, आधीं कळलें होतें.  पण तें त्याला मला कळविण्याचा अधिकार नव्हता.  ह्या शिस्तीमुळें मी त्यास पुन्हां भेटणार नाहीं म्हणून त्याचें हें रडें होतें.  

ता. १४ ऑक्टोबर १९३० रोजीं सकाळीं उठल्याबरोबर जमादारांनीं येऊन मी सुटलों, म्हणून सामानाची तयारी करून लवकर ऑफिसांत येण्याची वर्दी दिली.  पुणें शहर काँग्रेस कमिटीचे चिटणीस श्री. जोशी हेही मजबरोबरच सुटले.  माझी डायरी व लेख तपासून कांहीं आक्षेप निघतील कीं काय अशी मला भीति होती; पण तसें कांहीं झालें नाहीं.  ८ वाजण्याचे सुमारास आम्ही बाहेर पडलों.

एकंदरींत सर्व अधिकार्‍यांनीं माझ्या तुरुंगवासांत मला बरें वागवलें.  मध्यंतरीं एका तरुण युरोपियन जेलरनें तुरुंगाच्या नियमांची सबब सांगून माझी दाढी व डोकीवरचे केस काढण्याचा घाट घातला होता.  ''पण ती कधीं निघावयाची नाहीं'' असा मीं त्यास निक्षून जबाब दिला म्हणून तें प्रकरण कसेंबसें निपटलें.

मी सकाळीं ९।१० च्या सुमारास घरीं पोंचलों.  दुसरे दिवशीं रेमार्केटांत जाहीर सभा भरवून माझें अभिनंदन करण्यांत आलें.  शेवटीं माझ्या गळ्यांत हार घालतांना मीं म्हटलें, ''आतां कायदेभंग करून तुरुंगांत जाणें ही इतकी सामान्य गोष्ट झाली आहे कीं, अशा माळा तुरुंगांतून परत आलेल्यांच्या गळ्यांत न घालतां त्या अद्यापि तुरुंगांत न गेलेल्यांच्या गळ्यांत घातलेल्या बर्‍या.''  सभेंत हंशा पिकला.

बडोद्याच्या सफरी  :   १९२९ च्या हिंवाळ्यांत बडोदा येथील सहविचारिणी सभेनें मीं बडोद्यास येऊन व्याख्यान द्यावें अशी विनंती केली.  त्या वेळीं माझ्या सुनेच्या बडोदा राज्यांतील मिळकतीविषयीं कांहीं खाजगी काम होतें.  म्हणून मी माझ्या सुनेला व तिच्या ट्रस्टींना बडोद्यास घेऊन गेलों.  जयसिंगराव स्टेट लायब्ररीमध्यें माझें व्याख्यान झालें.  'तौलनिक भाषाशास्त्र' हा विषय होता.  श्रीमंत संपतराव गायकवाड अध्यक्षस्थानीं होते.  व्याख्यानाची हकीकत वर्तमानपत्रांतून वाचून श्रीमंत मासाहेब महाराणी चिमणाबाईसाहेब यांनीं मला भेटीस बोलावलें.  रशियांतील कम्युनिझम वगैरे विषयावर बरेंच भाषण झालें.  
मांसाहेबांच्या भेटीचा माझा पहिलाच प्रसंग होता.  त्यांच्याही मनांत मला बरेच दिवस भेटावयाचें होतें.

जानेवारी महिन्यांत महाराज युरोपहून परत आले.  भेटीनंतर थोडे दिवस बडोद्यास राहून दोन तीन व्याख्यानें देण्यास त्यांनीं फर्मावलें.  ता.२२ जाने. रोजीं ''लक्ष्मीविलास'' पॅलेसमधील दरबारहॉलमध्यें Study of Universal Religion (विश्वधर्माचें अध्ययन) ह्या विषयावर माझें व्याख्यान झालें.  आमंत्रणावरून सर्व दरबारचे लहानमोठे अधिकारी हजर होते.  ऑक्सफर्डच्या मँचेस्टर कॉलेजच्या ह्या विश्वधर्माच्या अध्ययनाप्रीत्यर्थ बडोदा संस्थानांत एक विद्यालय असावें असा महाराजांचा फारा दिवसांचा मनोदय होता.  मागें जेव्हां जेव्हां ते मुंबई-पुण्यास येऊन मला भेटण्यास बोलावीत तेव्हां तेव्हां हा विषय काढून महाराज माझ्याशीं विचारविनिमय करीत आणि ह्या कामासाठीं मीं बडोद्याला येऊन रहावें अशी इच्छा प्रदर्शित करीत.  पण माझ्या इतर कार्यबाहुल्यामुळें आजवर तें शक्य झालें नव्हतें.  आतां पुन्हां तोच विषय काढून, ह्याविषयीं एखादी निश्चित योजना तयार करून देण्याचें महाराजांनीं मला सांगितलें.  मीं त्यांना कांहीं टिपणें लिहून दिलीं.  तेवढ्यानें त्यांचें समाधान झालें नाहीं.  त्यांनीं तीन व्यवस्थित योजना मागितल्या.  एक साधी आणि कमी खर्चाची; दुसरी त्याहून अधिक खर्चाची, पण अधिक तपशिलाची; तिसरी पद्धतशीर मँचेस्टर कॉलजसारख्या एखाद्याच कॉलेजची.

ह्या बडोदें संस्थानांतील जुन्या शिक्षणपद्धतीचें धर्मशिक्षण व अनुष्ठान पाहून ह्याच योजनेंत मँचेस्टर कॉलेजसारख्या उदार धर्माची योजना कशी बसवावी हा एक प्रश्नच होता.  ह्यासाठीं बडोद्यांतले कांहीं अधिकारी मदतीला घेऊन ही योजना मीं तयार केलीं.  ह्या मंडळींत प्रो. चिं. वि. जोशी आणि ट्रेनिंग कॉलेजचे प्रि. रा. व्होरा होते.  योजना तयार करून महाराजांपुढें ठेवावयाचे वेळीं ते आजारी पडले.  खाजगी रवानगी खात्यातर्फे श्रीमंत संपतराव गायकवाड यांना ह्या योजनेंत लक्ष घालण्यास महाराजांनीं फर्मावलें.  शेवटीं सर्व योजना दिवाणसाहेबांकडे त्यांच्या विचारासाठीं पाठवण्यांत आली.  शेवटीं हें प्रकरण संस्थानच्या कौन्सिलकडे जाणार हें जाणून कौन्सिलचे एक मुसलमान सभासद माझ्या ओळखीचे होते आणि माझ्याबरोबर ते गेस्ट हाउसमध्येंच राहात होते, त्यांची मीं भेट घेतली व त्यांना योजना दाखवली.  हल्लींची पैशाची स्थिति ध्यानांत घेतां कौन्सिल ही योजना मुळींच पास करणार नाहीं, असें त्यांनीं आपलें खात्रीलायक मत सांगितलें.  इतक्यांत महाराज विलायतेला गेले म्हणून मीहि पुण्यास आलों.  एकंदरींत लक्षण पाहतां या विषयाचा अनुकूल विचार होणार नाहीं म्हणून मीं त्याचा नाद सोडून दिला.

१९३३ सालच्या जानेवारी महिन्यांत बडोद्याहून हुजुर-कामदार-ऑफिसांतून एक गृहस्थ मला भेटावयास आले, आणि त्यांनीं कळविलें कीं, १९३२-३३ सालचें ''श्रीमंत सयाजीराव गायकवाड पारितोषिक'' कमिटीनें तें पारितोषिक मला देण्याचा ठराव पास केला आहे.  पारितोषिक १ हजार रु. आणि फक्त १९३३ सालापूर्वी दरमहा १०० रु. ची तैनात मिळून बावीसशें रुपये मला एकंदर रोख मिळाले.  वार्षिक तैनात १२०० रु. मला मिळावी अशा शब्दयोजनेमुळें लोकांचा असा गैरसमज झाला कीं, मला संस्थानाकडून तहाहयात १०० रु. पेन्शनच मिळाली.  ही चुकीची बातमी कांहीं वर्तमानपत्रकारांनीं प्रसिद्धही केली; पण खरा प्रकार एक वर्षासाठींच १२०० रु. मिळावयाचे असा होता.  मला ही दुरुस्ती कांहीं वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध करावी लागली.

ता. १७-१-३३ रोजीं मी बडोद्यास गेलों.  मला तेथें बरींच सार्वजनिक आणि खाजगी कामें थोड्यां वेळांत उरकावयाचीं होतीं, म्हणून मी माझे मित्र रा. बी.बी. केसकर यांस बरोबर घेतलें.  हें पारितोषिक हिंदुस्थानांतील सर्वमान्य मोठमोठे साहित्यिक, ग्रंथकार, लोकसेवक यांसारख्यांना नोबेल प्राइझच्या धर्तीवर देण्याचें बडोदें सरकारनें ठरवलें आहे.  मीं केलेल्या समाजसेवेसाठीं सार्वजनिक मान्यता देण्याच्या हेतूनें हें पारितोषिक स्वीकारणार्‍यांनीं बडोद्यास एक आठवडा येऊन संस्थानचे पाहुणे म्हणून राहावें आणि सवडीनुसार एकदोन व्याख्यानें द्यावींत असा नियम होता.  त्याप्रमाणें मी बडोद्यास गेलों.  ह्याच वेळीं माझें 'भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न' हें संशोधनात्मक पुस्तक नागपूरचे प्रो. श्रीनिवास नारायण बनहट्टी यांनीं आपल्या नवभारत ग्रंथमालेतर्फे प्रसिद्ध केलें होतें.  तो ग्रंथ मीं श्रीमंत सयाजीरावमहाराजांस अर्पण केला होता.  ता. १८ जानेवारी १९३३ रोजीं सायंकाळीं बडोदा कॉलेजहॉलमध्यें श्रीमंत सरकार सयाजीराव महाराज ह्यांच्या अध्यक्षतेखालीं माझें पहिलें मुख्य व्याख्यान ठरलें होतें.  पण महाराजांची आकस्मिकरीत्या प्रकृति बिघडल्यानें त्यांनीं तशाही स्थितींत व्याख्यानास थोडा वेळपर्यंत हजर राहण्याचें औदार्य दर्शविलें.  

मीं नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या माझ्या पुस्तकांतील विषय 'अस्पृश्यतेचा प्रश्न' ह्यांतील मुख्य मुख्य मुद्द्यांचें माझ्या व्याख्यानांत विवरण केलें.  दरबारचे लहानमोठे अधिकारी व इतर शिष्टजनांनीं कॉलेजचा हॉल भरून गेला होता.  ह्याशिवाय महाराजांचे आज्ञेनुसार पुन्हां एकदां 'लक्ष्मीविलास' पॅलेसमध्यें एक खास व्याख्यान झालें आणि त्यानंतर प्रो. माणिकराव ह्यांच्या प्रसिद्ध आख्याड्यांत एक व्याख्यान 'समाजसुधारणा' ह्या विषयावर सार्वजनिक रीत्या झालें.

बडोदा राज्यांतील अस्पृश्यवर्गाचें एक शिष्टमंडळ मला भेटून आपल्या तक्रारी सांगण्यासाठीं ता. १९।१।३३ रोजीं आलें.  त्यांच्या एकंदर चौदा तक्रारी होत्या.  (१) बडोद्यांतील कांहीं शाळांमधून आणि कॉलेजांतून अस्पृश्य मुलांना प्रवेश मिळण्यास अडचण येते.  (२) जिल्ह्यांतील सार्वजनिक मोटार सर्व्हिसमध्यें बसून प्रवास करण्यास मज्जाव होतो.  (३) बडोद्याखेरीज इतरत्र मंदिर प्रवेशास अटकाव होतो.  (४) खानावळी, उपाहारगृहें वगैरे सार्वजनिक ठिकाणीं शिरकाव होत नाहीं.  (५) पगाराचें मान फार कमी आहे.  (६) वेठ धरण्याचे बाबतींत जुलूम होतो.  (७) नळाचे पाण्याविषयीं गैरसोय.  (८) कँपमधील (बडोद्याजवळील ब्रिटिश रेसिडेन्सीचा भाग) शाळांतून मुलें दाखल करतांना ख्रिश्चन म्हणून दाखल करावें लागतें वगैरे वगैरे.  ह्या सर्व तक्रारी रीतसर नमूद करून मीं त्या विद्याधिकारी भाटे ह्यांच्याकडे पाठवल्या व त्यांचे लेखी खुलासे शिष्टमंडळाकडे पाठवले.  ह्याशिवाय बडोदा शहराचे आसपास १०।१५ मैलांतील कांहीं निवडक खेडेगांवीं जाऊन त्या ठिकाणची अस्पृश्याची वस्ती, अस्पृश्यांच्या सोयी-गैरसोयी वगैरे गोष्टी प्रत्यक्ष पाहिल्या.  ह्या वेळीं अस्पृश्यांचे पुढारी धनजीभाई व बडोद्यांतील सुप्रसिद्ध केशवराव देशपांडे यांना मीं बरोबर घेतले होते.  श्रीमंत महाराजांकडे यऊन मीं ही हकीकत कळवली.

६ वें परिवर्तन  :   १९३३ साल संपत आलें त्याबरोबर (पान १२ वर) लिहिल्याप्रमाणें माझें ६ वें परिवर्तन घडून आलें, तें असें.  माझ्या हाताचीं बोटें गाउटनें सुजूं लागलीं.  अंगांत ताप वगैरे कांहीं नसतांहि शीणभाग भासूं लागला.  बोटें लवकर बरीं होईनात म्हणून सहज डॉक्टरनें लघवी तपासली.  बरीच साखर जात असल्याचें त्यानें निदर्शनास आणलें.  मला मधुमेह झाला होता; पण तो उघडकीस यावयास चार वर्षे लागलीं.  हा रोग मला बहुतकरून मी १९३० सालीं तुरुंगांत असतांनाच जडला असावा असें वाटतें.  मुंबईला राहून उपचार करून आलों.  पण रोगानें मांडलेलें ठाण कांहीं निघेना.  हातापायांचा कंपवात वाढूं लागला.  थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे माझी धडाडीची सार्वजनिक कामगिरी बहुतेक येथेंच संपली.'