प्रकरण सहावे - ब्रह्मदेशांतील बहिष्कृतवर्ग

निरीक्षण पहिलें : सगाईन – सोमवार ता. १४ मार्च १९२७ रोजी चौथे प्रहरीं ४ वाजतां सगाईन शहरांतून सगाईन टेकडीकडे जाण्यासाठी आम्ही उं मॉं मॉं चे मोटारींतून निघालो. ऐरावती नदीचे कांठी मंडालेपासून ८ ते १० मैलांवर हें शहर आहे. माझेबरोबर रा. भिडे व वृद्ध ब्रह्मी पेन्शनर गृहस्थ उ. पो. विन हे तुबायाझा लोकांची लहान वस्ती होती. हे लोक स्मशानांतील थडगीं खणण्याचा धंदा व इतर मार्तिकासंबंधी कामें करितात. हे लोक आपणास फयाचून लोकापेक्षा श्रेष्ठ समजतात. फयाचून हे साधारण देवळी गुलाम असून तुबायाझा हे आपण राजवंशांतील आहों असें समजतात; कारण 'याझा' हें यांच्या नांवांतील शेवटलें पद 'राजा' या शब्दाचा अपभ्रंश आहे. 'तुबा' हे 'शुभ' याचा अपभ्रंश आहे. पूर्वीहा शब्द अशुभ असा होता, त्यांतील अ जाऊन शुभ-तुबा हा अपभ्रंश उरला. ह्या राजवंशाने भिक्षेशिवाय दुसरा कोणताच धंदा करतां कामा नये, ह्यामुळें ह्यांना केबा ( मला मदत करा) हें नांवही पडलें. असेंही कोणी सांगतात. वस्ती एकंदरीत स्वच्छ व नीटनेटकी दिसली. तरुण मुलींना लिहितां वाचतां येत होतें. वस्तीच्या मध्यावरील झोपडी चांगली प्रशस्त बंगलीवजा होती. ती म्युनिसिपालिटीने बांधिली आहे. या लोकांनी वस्तींत आपलें स्वत:चें चांगले देवस्थान उभारलें आहे. त्यांत म. गौतम बुद्धाच्या व नाटांच्या (बूत यक्षाच्या) पुष्कळ मूर्ति होत्या. फौजी (बौद्ध भिक्षू ) ह्यांच्याकडे जेवणाला, भिक्षेला व धार्मिक कृत्याला येत आहेत; तरी यांच्यांत विशेष महत्त्वाकांक्षा दिसली नाही. एकंदर स्थिती मागासलेली व करुणास्पद दिसली. माझे बरोबरीचे उपो विन हे वृद्ध व श्रीमंत गृहस्थ असूनही ह्या लोकांबरोबर उघडपणें बसून जेवण्यासही आपण तयार आहों. असें म्हणाले. ह्या लोकांना मी विचारलें की, तुम्ही इतरांप्रमाणें सुशिक्षण मिळवून मोठीं हुद्याची कामें कराल काय? तेव्हा ह्या प्रश्नाचा अर्थच त्यांना कळला नाही. कारण हें कसें घडले? हें अशक्य कोटींतलें त्यांना वाटलें. एकंदर स्थिती अज्ञानाची, आत्मविश्वासाच्या अभावाची व अल्पसंतुष्टतेची दिसली. पुष्कळ अशी हिंदुस्थानांतही हल्ली हाच प्रकार आहे !


निरीक्षण दुसरें : मेंढाई - ऐरावती नदीच्या किना-यावरील अमरपुरा शहराजवळ केबांचा हा गांव ता. १८ मार्च १९२७ रोजीं शुक्रवारी सकाळीं पाहिला. ऐरावतीच्या किना-यापासून पूर्वेकडे एक मैलाच्या आंत मेंढाई नांवाचा सुमारे २५० लोकवस्तीचा एक गाव आहे. त्याला लागून २ व ३ फर्लांगांवर केबांची एक लहान वस्ती आहे. या वस्तीत सुमारे ५ त ७ झोंपड्या व त्यांत २० ते २५ बायका व पुरुष पाहिलें. सर्व कोष्टयाचा धंदा करितात. गुजराथेंत व नागपुराकडे धेड लोक नुसती खादी विणतात पण हे केबा उत्तम रेशमी कापडही विणतात. गुजराथेंत तर ह्या अस्पृश्यांना वणकर असेंच नांव आहे. येथील केबा खाऊन पिऊन स्वतंत्र आहेत. ते केबा हें आपलें नांव सांगत नाहीत म्हणून माझ्या दुभाष्याला त्यांच्या स्वत:विषयीं जातिवाचक माहिती विचारण्याचें धैर्यच होईना. तथापि ते केबाच होते, याची त्याला खात्री होती. पुढे आम्ही मेंढाई गांवांत जाऊन चौकशी केली. मेंढाईचे लोकही सर्व विणकराचा धंदा करीत होते. त्यांतील एका प्रमुख विणकराच्या घरीं गेलों. तो ब्रह्मी राष्ट्रीय शाळेंत थोड्याच दिवसांपूर्वी शिक्षक होता. हा मनुष्य उ. उत्तमाच्या राष्ट्रीयपंथाचा आहे. त्याने सांगितले की, जवळच्या केबांशी मेंढाईचे लोक संबंध ठेवीत नाहीत, तरी त्यांच्यांत व मेंढाईचे लोकांत कांही फरक नाही. रोटी बेटी किंवा भेटीव्यवहार होत नाही, याचा अर्थ ते अस्पृश्य आहेत, असें मुळींच नव्हे. ब्रह्मदेशांत अस्पृश्यता अशी पूर्वींही नव्हती, आता तर मूळीच नाही. अशी विधानें जरी ह्या एका व्यक्तीन केलीं तरी पण या बहिष्कृत लोकांना लग्नामुंजीत किंवा अशा सामाजिक प्रसंगी वरिष्ठवर्ग भेटीव्यवहाराचें आमंत्रण करीत नाहीत, हा खरा प्रकार आहे. पूर्वी त्यांना गावांत येण्याचीही मनाई होती. भिक्षेपुरतें यावें, पुन: बाहेर जावे. पण याची स्थिती आता इतकी सुधारली आहे किंवा मनु पालटला आहे की त्यांना कोणीही उघड आमंत्रण करीत नसलें तरी त्यांना 'दूर सर' म्हणण्याची कोणाचीही छाती नाही. फौंजीच्या शाळेंत त्यांची मुलें जाऊं शकत, पण सरकारी शाळेंत कोठे कोठे जाऊं शकत नाहीत. त्यांच्याकडे फौंजी भिक्षेलाही पूर्वी येत नसत, पण आता येतांना मीच पाहिलें. फार तर काय, त्यांची ग्रामबाह्यता आता पुष्कळ ठिकाणी नष्ट होत चालली आहे. धंद्यामुळे त्यांना पूर्वीच्या रिवाजाला चिकटून राहावे लागतें. स्थान व धंदा बदलला तर कोणी त्यांचे मूळ विचारीत नाही. ते साधारण समाजात मिसळून जातात. हिंदुस्थानच्या व ब्रह्मदेशाच्या बहिष्कारांत हा विशेष फरक आहे की, हिंदुस्थानांत ह्याला केवळ लौकिक व सामाजिक रूप आहे. हिंदूंतील ब्राह्मणादि वरिष्ठ वर्ग बहिष्कार कडकडून पाळतात, पण ब्रह्मदेशांत फौंजी ह्यांची भिक्षा आता सर्सास उघडपणें घेतात व त्यांना शाळांतून शिकवितात. मात्र त्यांना पूर्वी फौंजीची दीक्षा मिळण्यास अडचण पडे, कारण ती दीक्षा देण्यापूर्वी तो मनुष्य स्वतंत्र पुरुष असावयास पाहिजे, दास स्थितींत असून चालायचें नाही, असा नियम आहे. आता हे लोक स्वत:च फौंजी होऊ शकतात ब्रह्मदेशांतला फौंजी व हिंदुस्थानांतला वैदिकी करणारा ब्राह्मण ह्यांत असा हा फरक आहे. यानंतर मेंढाई येथील नाथाचे देऊळ पाहिले. बौद्ध धर्मांपूर्वी ब्रह्मदेशांत नाथ ऊर्फ नाटू म्हणजे भूत अथवा पिशाच ह्यांची पूजा चालत असे. खालील व पुष्कळशा वरील वर्गांतही अद्यापि ती चालू आहे. ही नाथाची देवळे मीं पुष्कळ टिकाणीं पाहिली. या देवळांत दोन मूर्ति आसनावर व एक घोड्यावर अशा बसलेल्या पाहिल्या. हे पूर्वी मुसलमान बंधू होते. किना-यावर यांची नाव बुडाली, तेव्हा ते ब्रह्मी राजाच्या आश्रयाला राहिले. ते मेल्यावर त्यांची ही क्षुद्र देवळें झाली. मुसलमानाशिवाय सर्व लोक त्यांना भजतात. वार्षिक यात्रा होते, तेव्हा या गावासाठी एक रेल्वेचे स्वतंत्र स्टेशन करावें लागतें. या (मुसलमान) नाथांची नांवे श्वेफिजी श्वेफिगल अशी आहेत. कोणी प्रसिद्ध पुरुष अपघाताने मेला तर त्यांचे देऊळ होतें, त्याला नाट म्हणतात.


निरीक्षण तिसरें : पगान - पगानचे दक्षिणेकडे एक मैलावर नदीकाठीं टॉटवा नांवाचे तुबायाझाचें एक स्वतंत्र खेडे आहे. तें पगानच्या स्मशानालगतच आहे. २६ मार्च रोजी शनिवारी सकाळी ९ वाजतां मी प्रिन्सिपाल उ सैन ( लॅकर स्कूलचे ) यांच्यासह तेथे गेलों. गांवांत सुमारे ७० घरें व लोकसंख्या ४०० आहे. ही तपासणी तीन तासांवर बारकाईने केली. गांव नदीकांठावर असल्यामुळे पाण्याची सोय नैसर्गिक आहे. म्युनिसिपालिटीची शहरांतच विशेष सोय नाही, मग ह्यांना कोठून मिळणार? सर्वत्र शाळा नाहीत, पण फौजींच्या शाळांत सर्वांबरोबर शिकण्यास ह्यांना हरकत नाही. तेथे मुलांमुलींचा भेद नाही. पण फौजीच्या मठांत मुलींना शिकता येत नाही. येथे भिक्षुणीचा मठ नसल्याने मुली घरीं शिकतात. दोनचार बायकांना लिहिता वाचतां येतें. ब्रिटिश राज्य होईपर्यंत ह्यांच्यावर कसलाही कर नव्हता. कारण हे बहिष्कृतच होते. आता कर आहेत पण त्याचा उपयोग मात्र त्यांच्या उन्नतीकडे होत नाही. हाच प्रकार हिंदुस्थानांत आहे. ब्रिटीश राज्याचा "घेऊं जाणें परि देऊं ना जाणें " हा भोळेपणा सर्वत्र प्रसिद्धच आहे !

माझ्यासमक्ष फौंजींना भिक्षा शिजलेल्या भाताचीच मिळाली. थडगें खणणें. टेप विणणें, वैद्यकी करणें, शिवाय सर्वसामान्य भिक्षा मागणें इ. यांची हक्काची कामें आहेत. कित्येक घरांची दारें लागलेलीं होती; कारण पुरुष, बायका, मुलें सगळींच भिक्षेस गेलीं होतीं. भिक्षेचे तांदूळ स्वस्त दराने विकून पैसा करितात. मग त्यांनी इतर कबाडकष्ट कां करावेत ? राहणी आमच्याकडील चांभारांपेक्षा पुष्कळ बरी दिसली. तरी पण गांवात घाणेरडेपणा, बागबगीचे, टापटीप यांची मिसळ दिसली. सर्वसाधारण ब्रह्मदेशांत घराभोवती पुष्कळ जागा असतेच. त्यांत कुंड्यांतून गुंफा लावून फुलझाडें आणि भाजीपाला करण्याची चाल चहूकडे आहे. ब्रह्मी लोक ( बहिष्कृतांसह ) फुलांच्या माळांचे मोठे शोकी ! या महारवाड्यासारखीं कांही स्वच्छ आंगणे व फुलांच्या वेलींचे मंडप मला हिंदुस्थानांतील खेड्यांमधून ब्राह्मणांच्या सुद्धा परसांत आढळतील की नाही, याची शंकाच आहे ! तरी पण या खेड्यांत मला कुजलेल्या मांसाची दुर्गधि येतच होती. अशा खेड्यांतून डुकरें कोठेच दिसली नाहीत, पण गावगुंड कुत्री मात्र ब्रह्मदेशांत वतनदार इनामदारांप्रमाणे वावरत आहेत. जेथे जावें तेथे स्वागत आहेच ! नंतर आम्ही खालील ७ घरें बारकाईने पाहिली.


पहिलें घर - वृद्ध मालकीण बैलासाठी सुंभी काढण्या वळीत बसली होती. इतरांप्रमाणे सर्व घर सहा फूट उंच खांबावर बांधिलें होतें. तें सर्व लांकूड व बांबूचें होतें. पक्ष्याच्या घरट्याप्रमाणे शोभत होतें; हवेचा तोटा नव्हता. पुढे पडवी, बाजूस सैपांकाची खोली, नंतर माजघर, त्याचे बाजूस निजावयाची खोली, अशी प्रशस्त सोय होती. प्रत्येक खोली अजमासें १२ x १० फूट लांब रुंद  होती. स्वयंपाकाचीं भांडी मातीचीं, माजघरांत एक मोठा आरसा, भिंतीस पूर्वेकडचे बाजूस पूजेसाठी बुद्धाचें चित्र, निजावयाचे खोलींत मच्छरदाणी असें सामान होतें. भिंती व जमीन बांबूच्या कुडाच्याच होत्या. आई, मुलगा, सून अशीं तीन माणसें. पैकी मुलगा व सून भीक मागावयास गेली होती ! हें मध्यम प्रकारचें घर म्हणावयाचें.


दुसरें घर - मालक तरुण व धडधाकट होता. धंदा भीक मागण्याचा .


तिसरें घर - मालकाचें वय ७३ वर्षे, त्याच्या बायकोचें वय ७७ वर्षे. त्याचा पहिला मुलगा वय ५५, बायको व तीन मुलें. दुसरा वय ५०, बायको व तीन मुलें. तिसरा वय ४०, बायको व दोन मुलें. अशा एकंदर सोळा माणसांचे हें कुटुंब होतें. म्हाता-याचा धंदा वैद्यकीचा. शिवाय भिक्षा ही आहेच. मधला मुलगा दुसरीकडे आपल्या बायकोच्या घरी राहात होता. नवराबायकोशिवाय सर्व माणसें भिक्षेला गेली होतीं. कारण सकाळची भिक्षेची वेळ. चमत्कार हा की, स्वत: भिक्षा मागणा-या बहिष्कृतांचे घरी सर्वांत पूज्य व श्रेष्ठ मानिलेला फौंजी वर्ग सकाळी भिक्षा मागायला येत होता. घराला प्रशस्त व स्वच्छ अंगण होतें. उजव्या बाजूस चांगला लतामंडप व भोंवताली कुंड्यांतू फुलझाडें होती. मंडपांत एक लाकडी मंचक होता. बसावयाची ही आरामवाटिका होती. डाव्या बाजूस स्वतंत्र स्वयंपाकाची जागा होती. हें पहिल्या प्रकारचें घर म्हणावयाचें.


चौथें घर - मालकाचें वय ५२, धंदा वैद्यकीचा, भिक्षा भागत नाही. घर दोन मजली व मजबूत लाकडी होतें. बायकोचें वय ४२ चार मुलें. कोणासही लिहिता वाचतां येत नव्हतें.


पांचवें घर - मुख्य मालकीण नवार विणीत बसली होती. नवरा, बायको व मुलें. राहावयास एकच खोली. हें कनिष्ठ प्रकारचें घर.


सहावें घर - मालक तरुण ताजातवाना. धंदा वैद्यकीचा. बायको व तीन सुंदर मुलें. भिक्षा मागत नाही.


सातवें घर - हे सर्व खेड्यांत सुंदर होय. सागवानी लाकडाचें खालवर बांधिलेलें, वारनीस केलेलें, अगदी पेटीसारखे. पण नवरा बायकोचा धंदा केवळ भिक्षेचा ! भिक्षेला गेल्यामुळे घर बंद होतें. प्रशस्त अंगणही होतें.


एक देवालय होतें, तें गांवक-यांनी स्वत:च्या खर्चाने बांधिलेलें. पुढे सभामंडप होता. गाभा-यात उंच कट्ट्यावर १० लहान मोठ्या बुद्धाच्या मूर्ति होत्या. त्या सर्व सोनेरी वर्खाने मढविलेल्या होत्या. शिवाय दोन मूर्ति संगमरवरी दगडाच्या सुंदर होत्या. चातुर्मात्यानंतर (नवंबरच्या सुमारास ) वार्षिक महोत्सव होतो. त्यावेळी पगान गावांतील सर्व लोक देवास नैवेद्य आणितात. त्यांस मांस, मासे, इ. सर्व प्रकार असतात पण देवळापुढे बळी मारला जात नाही. गांवांत कॉलरादेवी वगैरे आजार झाल्यावर ह्यांतील एक मूर्तीचा छबिना शांतिप्रीत्यर्थ गावांतून मिरविण्यात येतो. येणेंप्रमाणे मरीआईचें काम बुद्धाला आणि महार मांगाचे अधिकार ह्यांना आहेत. हा सर्व हिंदू परिणाम. फौंजी येऊन ह्या लोकांच्या मुलांचे उपनयनविधि ह्या सभामंडपात करितात. ही मुलें फौजीच्या शाळेमध्ये इतरांबरोबर समान दर्जाने राहतात. फौंजीच्या मठात भेदभाव नाही. ह्या लोकांतील भिक्षुणी इतर भिक्षुणींच्या संघांत राहू शकतात. अशी एक भिक्षुणी सध्या आहे.


प्रिन्सिपाल सैन यानी दुभाष्याचें काम उत्तम कौशल्याने व धोरणाने केलें म्हणून ह्या लोकांचा विश्वास आम्हांवर बसला. त्यांनी आपला खरा वृत्तांत सांगितला. एरव्ही उडवाउडवीच केली असती. आम्ही जाऊं तेथे स्त्रीपुरुषांचा घोळका जमत असे. नागडीं, उघडीं, शेंबडी मुलें काखेंत व जात्याच्या खुंट्याएवढा मोठा चिरूट तोडांत धरून धुराचे लोट हवेंत सोडीत बायका भोवतालीं जमत असत. प्रथम ज्यांनी भुंकून हैराण केलें तींच कुत्री तपासणी चालली असतां पायाशी स्वस्थ निजून राहात. जणूं काय भुंकणारे वेगळेच होते !


शेवटी मीं सभामंडपांत मंडळीस बसावयास सांगून ब्राह्मसमाज आणि डिप्रेस्ड क्लासेस मिशन ह्यांवर सुमारें १५ मिनिटें व्याख्यान दिलें. तें प्रि सैन यांनी ब्रह्मी भाषेंत समजावून सांगितलें. मंडळीना तें आवडले. असेंच मिशन ब्रह्मदेशांत काढावें. अशी त्यांनी कळकळीची इच्छा दाखविली. प्रि. सैन 'आपण या कामीं मदत करु.' म्हणाले. वेळवाच्या टोपल्यांवर लाख मढवून सुंदर भांडी करण्याच्या सरकारी शाळेचे ते प्रिन्सिपाल आहेत. त्याला लॅकर (लाख) स्कूल (शाळा) असें नांव आहे. पण त्या शाळेंत ह्यांच्या मुलांना घेण्यास मात्र प्रि. सैन तयार नव्हते. कारण यांची शाळा निघून तीन वर्षे झालीं, तरी ती अद्यापि प्रयोगाचे अवस्थेंत आहे. यांची मुलें आल्यास वरिष्ठ वर्गांची मुलें शाळा सोडतील ही त्यांना अद्यापि भीति आहे ! हो सर्व तपासणी व माझें डिप्रेस्ड क्लासेस मिशन प्रि. सैनच्या पत्नीला फार आवडलें. दोन प्रहरीं पत्तें खेळतांना तिने जो पैसा जिंकला होता तो सर्व ह्या कामासाठी ध्या, असें म्हणाली !


निरीक्षण चौथें : न्यॉंऊ-२७ मार्च १९२७ रविवारी सकाळी ९ वाजतां आम्ही न्यॉंऊ पश्चिम येथे पोचलों. श्वेझिंगो पगौडा पाहिला. हा अनिरुद्धाने (इ.स. १०४४-१०७७ ) बांधण्यास सुरुवात केली. याची पूर्ति त्याचा समजला गेलेला मुलगा कॅझिटा ह्या राजाने ( इ.स. १०८४-१११२) केली. अनिरुद्धाने थाटूनचा राजा मनुहा ह्याला युद्धांत जिंकून त्याच्या सगळ्या प्रजेला कैदी करुन पगानला आणिलें. मनुहाने इ. सन. १०५९ त "मनुहाचें देऊळ" म्हणून प्रसिद्ध असलेला पगोडा पगानमध्ये बांधिला. शेवटी त्याला असें मोकळें ठेवणें इष्ट न वाटल्यामुळें, अनिरुद्धानें त्याच्या कुटुंबांतील सर्व माणसें व त्याचे सर्व लहानथोर चाकर व अनुयायी यांना देवळी गुलाम करुन त्यांचा सामाजिक दर्जा अत्यंत क्रूरपणाने अतिशय नीच करुन टाकिला. श्वेझिंगो देवळाची झाडलोट करण्याचे कामावर इतरांप्रमाणे मनुहाची नेमणूक झाली. त्यापूर्वींही देवळी गुलाम होतेच. मात्र मनुहाच्या वंशाला अशा देवळी गुलामांचे 'राज्यपद' देऊन दु:खावर अपमानाचा डाग दिला. अगदी आतापर्यंत श्वेतछत्र, पायात सोन्याचा कलाबतूचा जोडा, घराला सरळ उभा जिना इ. राजचिन्हें मात्र मनुहाच्या वंशजास अद्यापि कायम आहेत. मात्र त्यांना देवाचा नैवेद्य व देव्हा-यावरच्या देणगीशिवाय उपजीविकेचें साधन दुसरें नव्हतें. हें त्यांना पूर्वी मुबलक मिळत असावें. एरव्ही त्यांना अशा लवाजम्याने कसें राहतां येईल?


अशा देवळी नोकरांना फयाझून - देऊळ + नोकर-अशी संज्ञा आहे. तुबायाझा आणि फयाचून हे एकमेकांस महाराष्ट्रातील महारार्मागांप्रमाणे कमी लेखितात. तुबायाझाचें म्हणणें आपण कधी जिंकलेले गुलाम नव्हतों. फयाझुनापैकी मनुहाच्या खानदानी अनुयायांचे म्हणणें तर उघडपणेंच आपण श्रेष्ठ असून कोणतेंही हलकें काम आपण केले नाही. पण ज्याअर्थी ते जिंकलेले गुलाम आहेत, त्याअर्थी कोणी त्यांच्याकडे तिरस्काराशिवाय पाहणार नाहीत. आम्ही ह्या गांवी या लोकांचा राजा म्हणा, पाटील म्हणा, जो होता, त्यांची भेट घेतली. त्याचें नांव उ बा ल्वीन ( Ubalwin) वय २७. हल्ली हा आपल्या बायकोच्या घरी राहतो. तिचा बाप खाऊन पिऊन सुखी व स्वत: रबाबदार दिसला. बायकोच्या माहेरचें मध्यम प्रकारचें दुकान व तिच्या बापाचा वैद्यकीचा धंदा आहे. घर दोन मजली व भोवताली स्वच्छ आंगण, लतामंडप, भोंवतालीं कुंड्यांतन फुले दिसली. उ बा ल्वीन आता फायाझुन गांवचा राजा अथवा थजी ऊर्फ पाटील झाला आहे. ह्यांनी सरकारी रजिष्टर काढून दाखविलें. त्यावरुन ह्या फायाझून वाडींत ५०९ घरें आहेत, असें आढळलें. लोकसंख्या सुमारे २००० असावी. ह्या गावासाठी एक सरकारी प्राथमिक मोफत शाळा आहे. पण ह्या लोकांवरचा बहिष्कार पूर्वीप्रमाणे आता कडक नाही. ह्यांच्या विहिरींतील पाणी वरचे वर्ग खुशाल पितात. उघड रोटी बेटी व बेटी व्यवहार मात्र अद्यापि होत नाहीत. ह्यांच्यापैकी बरेच लोक दुसरीकडे खाऊन पिऊन सुखी आहेत, व ते बिनबोभाट वरच्या वर्गांत मिसळून जातात.


पक्कोक म्हणून एक जिल्ह्याचा गाव आहे, तेथे एक गृहस्थ ४० ते ५० हजाराचे मालक आहेत. ते म्युनिसिपालिटीचे सभासद आहेत, घऱीं स्वत:च्या मोटारी आहेत, लाखेची भांडी व इतर बरेच धंदे करितात. तुबायाझाप्रमाणे थडगीं खणणें व भिक्षा मागणें हें ते करीत नाहीत. मात्र देवळाचे दारांतून फुलें, मेणबत्या, उदकाड्या, पंखे वगैरे विकणा-या दुकानांची जी रांग असते, ती ह्याच लोकांची. नंतर आम्हाला उ बा ल्वीन यांनी पगानचे रस्त्याचे पश्चिम बाजूकडील वाडींत असलेला आपला वंशपरपरागत खास राजवाडा दाखविला. हा खरोखरच आमच्याकडील खेड्यांतील एखाद्या श्रीमंत पाटलास शोभण्यासारखा आहे. वाड्याच्या नैऋत्य कोप-याला लागून एक लाकडी मनोरा दिसला. तो सर्व घरापेक्षा उंच होता. ह्यावर रखवालदार बसून रात्रीं पहारा करण्याची ही जागा. वाडा इतर घरांप्रमाणे खांबाच्या एक मजल्यावर उभा केला होता. सर्व घर एकच मजली पण भक्कम व रुबाबदार दिसलें. पूर्वी ह्याला दोन जिने (एक समोर व दुसरा आडवळणाचा भिंतीला समांतर असा) होते. समोरचा जिना पडल्यामुळे आता दिसला नाही. ह्या समोरच्या जिन्याच्या पाय-या चढण्यास मात्र देशाच्या बादशहाशिवाय इतरांला अधिकार नसे. सफाईदार सागवानी लाकडाचें सर्व काम होतें. खिडक्यांना व्हिशिअन शटर्स ( झडपें) होती. दरवाजे विशेष सफाईदार दिसले. दिवाणखाना, निजण्याच्या खोल्या, स्वंयपाक घर ही सर्व ऐसपैस, उंच व रुंद होती. एक मोठा रुंद लाकडी पलंग व त्यावर सुंदर मच्छरदाणी होती. घरांतील चट्याही खानदानी थाटाच्या होत्या. एकंदरीत थाट मोडकळीस आलेल्या इनामदारीचा दिसला. हें पाहून वाईट वाटलें.


उ बा ल्वीन पाटलाची आई ६० वर्षांची वृद्ध आहे. तरी तिचें वय दिसण्यांत सुमारें ५० वर्षांचे दिसले. चेहरा शांत प्रसन्न खानदानाची दिसला. तिचे सर्व दांत स्वच्छ, बळकट, डोळे मोठे व पाणीदार दिसले. हिचा नवरा उ नान पाटील वारून आता १८ वर्षे झालीं, असें तिने सांगितले. त्याच्यामागें तिच्या दोन मुलांला पाटिलकीची वस्त्रें मिळालीं. तेही वारल्यामुळें सर्वांत लहान मुलगा उ बा ल्वीनला आता पाटिलकी मिळाली आहे. मी हिंदुस्थानांतील एक उदार ( ब्राह्म ) धर्माचा प्रचारक, विशेषत: निकृष्ट वर्गाचा एक सेवक आहें, असें तिला सांगण्यांत आलें होतें, त्यामुळे ह्या देशांतील फौंजीपुढे जमिनीवर लवून त्रिवार नमस्कार करितात, तसा तिने मलाही नमस्कार केला. आमचें संभाषण चाललें असतां तिने माझें काम व हृद्गत लवकर ताडलें. त्यामुळें तिचे पाणीदार डोळे दाबून ठेविलेल्या विरळ अश्रूनें स्निग्ध झालेले दिसू लागले. शेवटीं सरकारला सांगून कांही तरी आपली दाद लावा, अशी स्पष्ट विनंती केल्यावाचून तिला राहवेना. हें माझ्या हातून या धांवत्या सफरींत व उतार वयांत कसें व्हावें, हे आठवून मीही किंचित् गडबडलों. मी केवळ मन:पूर्वक आशीर्वाद देऊन माझें समाधान करुन घेतलें.


दक्षिण ब्रह्मदेशांत मोलमेनच्या उत्तर किना-यालगत थटून हें शहर इतिहासप्रसिद्ध आहे. ह्या स्थानी दक्षिणेकडील सिंहली हीनयान बुद्ध धर्मांची पहिली उठावणी झाली. येथे कांची येथूनही बुद्ध धर्माची लाट आली. येथील राजे आंध्र वंशांतील हिंदी क्षत्रिय कुळांतील असून तेलंग ह्या नांवाने एक हजार वर्षांपूर्वी त्यांचा दबदबा सा-या ब्रह्मदेशांत होता. पण इ.स. १०५० चे सुमारास पगानचा ब्रम्ही राजा अनिरुद्ध याने थटून राज्यावरुन सफाई नांगर फिरवून ह्या क्षत्रियांना आता अत्यंत हीन बनविलेलें प्रत्यक्ष पाहण्याची पाळी माझ्यावर आली! इतिहासाची पुनरावृत्ति चहूकडेच होते. आमच्या देशांत ज्या आज महार, मांग, पारिया, चिरुमा, नामशूद्र इ. अनेक नांवांच्या जाती आहेत, त्यांनीही एकेकाळी राज्यवैभव भोगिलें, असें माझ्या संशोधनांत आढळले आहे. पण इतका अलीकडचा उघड पुरावा मला आजवर मिळाला नव्हता; त्यामुळे मला संशोधनाच्या दृष्टीने आनंद होत होता, किंवा मानवी स्वभावांतील आनुवंशिक विषारीपणाचा मासला प्रत्यक्ष पाहून दु:ख होत होतें, हें उघड सांगण्यांत कांही तात्पर्य नाही. मी करीत आहें, हें कार्य पवित्र आहे, येवढेंच मला पुरें आहे.


निरीक्षण पांचवे - शुक्रवार ता. १ एप्रिल १९२७ रोजी सायंकाळी प्रोम येथील श्वेमानडो ह्या मुख्य पगोडाच्या बाजूस असलेला तुबायाझाचा गाव पाहिला. गाव गरीब लोकांचा दिसला. गाव दाखवावयास एक इंग्रजी जाणणारे ब्रह्मी गृहस्थ बरोबर होते; परंतु ह्या खेड्यांत शिरून चौकशी करण्याचें त्यांना धैर्य झालें नाही. एकाद्याची खासगी चौकशी करण्याची ब्रह्मी लोकांस फार भीड व भीति वाटते, असें दिसते. मोलमेनमध्ये मला हाच अनुभव आला. ह्या गृहस्थांनी मला मुकाट्याने गावापासून दूर नेले. मला ब्रह्मी येत नसल्याने स्वत: चौकशी करिता आली नाही व हे गृहस्थ तर फारच भित्रे दिसले. माझी खडकर निराशा  झाली. तेव्हा मी जवळच्या पगोड्यांत गेलो. तेथे एका वृद्ध गृहस्थाजवळ थोडी चौकशी केली. 'हे तुबायाझा आहेत' ह्यापलीकडे हे गृहस्थ कांही सांगू शकले नाहीत. आटपलें.

 
येणेंप्रमाणे ब्रह्मदेशांतील मूळ बहिष्कृत वर्गांची हल्लीची स्थिती आहे. हिंदुस्थानांतून अलीकडे गेलेले अस्पृश्य जातींचे लोक ब्रह्मदेशांत ठिकठिकाणी पोटासाठी अनेक हलकीं सलकीं व काबाडकष्टाची कामे करुन पुष्कळ आहेत. पण ते बहिष्कृत नाहीत.