बहिष्कृत भारत


* मुंबई गॅझेटियर, ठाणे, पुस्तक १३, भाग १, पान १९०.
-------------------------

महार, चांभार, मांग, ढोर वगैरे सर्व अस्पृश्य वर्ग आमच्या हिंदुधर्मांतच मोडतात, ह्यांना जर कोणीं परधर्मीयांनीं बाटविलें आणि त्यांची स्थिति सुधारली, तर आम्ही धर्माभिमानी आमच्या धर्माची महान हानि झाली म्हणून आक्रोश करितों, पण ज्या महारांना ते हिंदु धर्मांतच राहून कितीही चांगले धंदे करून संपन्न असले तरी आम्ही स्पर्श करण्यास किंवा आमच्या उंबरठ्याचे आंत येऊ देण्यास तयार नसतों, तेच महार ख्रिस्ती किंवा मुसलमान झाले कीं, त्यांच्याशीं हात हालविणें किंबहुना प्रसंगी आडजागीं एकादा चहाचा पेलाही झोंकणें, ह्यात आम्हांला कांहीं वाटत नाहीं ! मग हा जो बहिष्कार आहे, तो ह्या अंत्यज मंडळीवर की त्यांच्यामध्यें असलेल्या हिंदुधर्मावर ?  एका बाजूनें अशा मंडळीस ख्रिस्ती मिशनऱ्यांनीं बाटविले कीं, आक्रोश करावयाचा, आणि दुसऱ्या बाजूनें अशा ह्या बाटग्या अंत्यजांवरचा सर्व बहिष्कार काढून त्यांना उद्योगधंद्यांत आणि स्पर्शव्यवहारांत मोकळीक ठेवावयाची, आणि जे हिंदु राहिले त्यांचा मात्र तिरस्कार करावयाचा, हा कोण विसंगतपणा !

मनुस्मृतींत दहाव्या अध्यायांत स्पष्ट म्हटलें आहे -

शत्तेफ्नापि हि शूद्रेण न कार्यो धनसंचयाः ।
शूद्रो हि धनमासादय ब्राह्मणानेव बाधते ॥१२९॥

अर्थ - अंगीं सामर्थ्य असलें तरी शूद्रानें धनसंचय करू नये, कारण अशापासून ब्राह्मणास बाधा होते.

शूद्रालाच संपन्नता मिळविण्याची धर्मशास्त्रांत परवानगी नाहीं ! मग अतिशूद्राला ती कोठून असणार ?  पण अशा अतिशूद्रानें वाटल्यास ह्या हिंदुधर्माच्या कचाट्यांतून सुटून परधर्मांत जावें. म्हणजे त्याला मनुष्यजातीचे सर्व उपजत हक्क मिळतात ? असें समजून वरील विसंगतपणा टाळावयाचा कीं काय ?

ह्या लोकांच्या पूर्वजांनीं असा कोणता गुन्हा केला असेल कीं, त्यांच्या वंशजास आम्हीं अजूनही अशी भयंकर सजा द्यावी ?  वर्णसंकर, व्यभिचार, देशद्रोह, राजद्रोह, धर्मद्रोह ह्यांपैकी कोणताही भयंकर गुन्हा, हल्लीं कोणी करीत नाहीं काय ?  जे करतात त्यांना अशी जबर शिक्षा हल्लीं समाजाकडून होत आहे काय ?  तर मग, ह्यांच्या पूर्वजांनीं तो केला म्हणून ह्यांनाच हा बहिष्कार भोगावा लागतो, ह्याचें कारण काय ?  केवळ रूढी चालत आली आहे, आणि ह्या बाबतींत पुढारी मंडळी जोरानें चळवळ करून लोकमत जागृत करीत नाहीं व सतत प्रयत्न होत नाहीं, म्हणूनच हा प्रकार चालू आहे. ईश्वरानें निर्माण केलेला असा कोणताही प्राणी नाहीं कीं, तो अस्पर्श मानला आहे ! मनुष्यप्राण्यांपैकीं मात्र ह्या लोकांना बाहेर ठेवलें जात आहे ! महाराच्या घरच्या कुत्र्यालाही आम्ही शिवूं, पण त्या महाराला शिवणार नाहीं  !

बहिष्कारामुळें झालेली हल्लींची स्थिति

वर सांगितल्याप्रमाणें आज हजारों वर्षें हा असा बहिष्कार भोगल्यामुळें व हल्लींच्या प्रगतीच्या काळींही हा बहिष्कार व्हावा त्या मानानें कमी न झाल्यामुळें, ह्या दुर्दैवी लोकांची स्थिति सांपत्तिक, नैतिक व धार्मिक इत्यादि सर्वच बाजूंनीं अगदीं करुणास्पद झाली आहे. तथापि कांहीं सुशिक्षित मंडळींस हें म्हणणें पटत नाहीं, ह्याचें कारण असें कीं, अलीकडे रेलवे वगैरे संबंधीं लहानमोठी कंत्राटें घेऊन क्वचित् महार मंडळी चांगली श्रीमंत झालेली आढळते; पण असे अपवाद किती थोडे आहेत ह्याचा विचार करावयाला नको काय ?  दुष्काळ किंवा प्लेग वगैरे आधिदैविक संकटें ह्या गांवाबाहेरच्या लोकांस कशीं भोंवतात, त्यांची प्रत्यक्ष उदाहरणें डोळे उघडे ठेवणारास पावलोपावलीं दिसून येतील.

कोणी कोणी असेंही म्हणतात कीं, नीच मानलेल्या लोकांना वाटेल तें काम करण्याची मुभा असल्यामुळे त्यांना इतरांपेक्षां मजुरी चांगली मिळते. हाडें, कातडें, चरबी वगैरे संबंधी सर्व उद्योग चांभार, ढोर ह्या खालच्या जातींकडेच आहे हें खरें; पण ह्या धंद्यांत केवळ मजुरी मात्र ह्या लोकांकडे राहिली आहे व भांडवल आणि व्यापाराचा सर्व फायदा उच्च वर्गाच्या हिंदूंनीं नसला तरी मद्रासी मुसलमान व बोहऱ्यांनीं बळकाविला आहे. याचें कारण हेंच कीं, या लोकांची सभ्यता, संस्कार व एकंदरीत सर्व सामाजिक स्थिति बहिष्कारामुळें अत्यंत हीन राहिल्यामुळें, जरी चांभार वगैरे वर्गाची मिळकत व पुंजी कोळ्यामाळ्यापेक्षा बरी असली, तरी त्या स्थितीचा फायदा घेऊन यांना आपली हिंदुसमाजांत बढती करून घेण्यास कांहीं वाव उरला नाहीं. यामुळें आपलें वडिलोपार्जित डबोलें चुलीजवळ पुरून ठेवून फाटकी लंगोटी आणि फुटकें मडकें यांवरच पिढ्यान पिढ्या गुजारा करण्याची चांभार वगैरे जातींना संवय लागली आहे. बहिष्काराचा वरवंटा डोक्यावर सारखा फिरत असल्यामुळे त्याखालीं त्यांच्या महत्त्वाकांक्षेला अवकाशच रहात नाहीं. असा प्रकार असतांना त्यांची सांपत्तिक स्थिति चांगली आहे म्हणून एखाद्या कुणब्याला हेवा वाटेल काय ?  सुशिक्षित मंडळीकडूनच असा आक्षेप केव्हां केव्हां निघतो, ह्याचें कारण केवळ बहिष्कार-कुठाराच्या दुसऱ्या धारेचा परिणामच होय. दुसरें काय !

केवळ शारीरिक आरोग्याच्या दृष्टीनें पाहतांही ह्या लोकांच्या स्थितींत कसा फरक दिसून येतो, त्याचा एक मासला खालील आकड्यांवरून दिसेल. हे आंकडे इ. स. १९०१ सालच्या हिंदुस्थानच्या खानेसुमारीवरून घेतलेले आहेत.
मुंबई इलाखा (PDF साठी येथे क्लिक करा)

नैतिक बाबतींत विशेष लिहावयास नकोच ! अलीकडच्या कोणत्याही लष्करी छावणींत गेल्यास तेथें ज्या हतभागी स्त्रियांनीं दुकानें मांडून स्वतःचे देह विकावयास ठेविलेले आढळतात त्या कोणत्या वर्गांतल्या असतात हें प्रसिद्ध आहे.

धार्मिक बाबतींत तर विचारच करावयाला नको. हिंदुधर्म बोलूनचालून ह्या वर्गांसंबंधीं बेजबाबदार ! इतकेंच नव्हे, तर त्यानें आज इतकीं वर्षें ह्या पामरांवर बहिष्कारशस्त्र धरलें आहे. वास्तविक पाहतां, हे धर्मबाह्यच आहेत. अलीकडील देशाभिमानाचें वारें अंगांत शिरल्यापासून कांहीं 'दे. भ.', 'दे. बं.' ह्या वर्गांशीं नुसता शाब्दिक आपलेपणा जोडीत आहेत; पण खरे धर्माभिमानी ह्यांना कितपत आपले म्हणतात हें जगजाहीर आहे ! मुसलमानांनींही आजवर ह्यांचा तिरस्कारच केला आहे. मुसलमानांचा सगळा रोंख हिंदु म्हणविणारांना बाटविण्याकडे होता. तेव्हां त्यांना ह्या ग्रामबाह्य लोकांना सहज मुसलमान करून घेतां आलें असतें; परंतु तसा प्रकार कोठें आढळत नाहीं, ह्यावरून अव्वल मुसलमानींत ह्या वर्गाची गणना हिंदूंत होती की नाहीं, ह्याबद्दल शंका येते. ख्रिस्ती मिशनऱ्यांनीं मात्र ह्यांच्यासाठीं पुष्कळ प्रयत्न चालविले आहेत व त्यांत त्यांना बरेंच यशही आलें आहे. केवळ परोपकाराच्या दृष्टीनें पाहतां इतर बाबतींप्रमाणेंच ह्याही बाबतींत ख्रिस्ती धर्माची आणि मिशनरी मंडळीची, करावी तितकी स्तुति थोडीच आहे.

एकंदरींत कोणत्याही दृष्टीनें पाहतां हल्लीं अस्पृश्य मानलेल्या ह्या वर्गाची स्थिति अत्यंत शोचनीय आहे, हें आपल्यांपैकीं पुष्कळांस कबूल होत नसल्यास इतकेंच म्हणणें भाग पडतें कीं 'जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे !'  पण राष्ट्रीय दृष्टीनें पाहतां यांची स्थिति सर्व राष्ट्राला घातक आहे, हें तरी निदान त्यांच्या वंशास न जातांहि कळावयाला पाहिजे आहे !

संख्या

येथवर ह्या हतभागी लोकांची मूळ उत्पत्ती, त्यांच्यावर पुरातन काळापासून आजपर्यंत पडलेला घोर बहिष्कार व त्यामुळें त्यांची सर्व बाजूंनीं आज दिसून येणारी हीनदीन स्थिति वगैरे, गोष्टींचा स्थूल दृष्टीनें विचार केला. आतां ह्या अफाट देशांत अशा हीन दशेप्रत पोहोंचलेल्या वर्गांतील लोकांची एकंदर संख्या किती आहे, हें पाहूं.

वर सांगितलेल्या भयंकर अन्यायाचे प्रसंग ह्या लोकांवर कितीहि गुदरले असले, आणि सहृदय मनुष्यास लाज आणणारे हे प्रकार हजारों वर्षें जरी घडत असले, तथापि त्याचा दुष्परिणाम ज्यांना प्रत्यक्ष भोगावा लागतो, अशांची संख्या अगदीं थोडीथोडकी असती, आणि मग तिकडे आमच्या लोकांनीं दुर्लक्ष्य केलें असतें, तर एकादे वेळीं चाललें असते ! कारण, हल्लीं आमच्या देशाचा पाया सर्वच दिशांनीं पाहतां खोलांत चालला आहे, अशा वेळीं आमच्या पुढाऱ्यांना पुष्कळ मोठमोठ्या राष्ट्रीय महत्त्वाच्या गोष्टींत मन घालावें लागत असल्यामुळें कांहीं व्यक्तींवर, किंबहुना एकदोन जातींच्या एक दोन लाख माणसांवर एकादा स्थानिक अथवा प्रासंगिक तात्पुरता अन्याय होत असता आणि तिकडे आमच्या उद्योगी पुढाऱ्यांचें लक्ष वेधलें नसतें, तर त्यांत फारसें आश्चर्य नव्हतें. पण वस्तुतः तसा प्रकार मुळींच नाही ! उलट अतिशय आश्चर्याची गोष्ट ही कीं, हिंदु साम्राज्यांत ह्या अंत्यज वर्गाची प्रचंड संख्या असून व ती ह्या खंडवजा विशाल देशांत सर्वत्र पसरली असून, ती किती आहे व कशी पसरली आहे, ह्याची बरोबर कल्पना करून घेण्याची कोणाला इच्छाहि होत नाहीं ! दर दहा वर्षांनीं सरकारी खानेसुमारींत ह्या वर्गाची संख्या प्रसिद्ध होत असते. तथापि ती एकत्र केली असतां किती मोठी होईल, हें देखील कोणी पाहण्याची तसदी घेत नाहीं  !

ता. ३१ मार्च १९०१ रोजीं रात्रीं करण्यांत आलेल्या हिंदी साम्राज्यांतील (बलुचिस्थान, ब्रह्मदेश, निकोबार, अंदमान हीं सर्व मिळून) खानेसुमारीवरून हिंदुस्थानची एकंदर लोकसंख्या २९,४३,६१,०५६ होती. ह्यांत एकंदर अंत्यज संख्या ५,३२,३६,६३२ आहे. हा एकूण आंकडा सन १९०१ च्या सेन्सस रिपोर्टाच्या भाग १, पान ५६०-५६९ मध्यें जी जातवारी दिली आहे; हा तिच्यावरून तयार केला आहे. तयार करतांना मूळ कोष्टकांत ज्या जातींना Untouchable or Depressed Classes म्हणजे अस्पृश्य अथवा निकृष्ट झालेल्या जाति असें नांव दिलें आहे, त्यांचाच अंत्यज नांवाखालीं समावेश करण्यांत आला आहे. मुसलमान लोकांमध्येंहि अश्राफ (वरिष्ठ) अजलाफ (मध्यम) आणि अर्जाल (हीन), असे भेद दाखविण्यांत आले आहेत व त्यांची संख्या उत्तर हिंदुस्थानांतील गणतीमध्यें निरनिराळी दाखविली आहे. अर्जाल वर्गाचे मुसलमान बहुतेक मूळचे अंत्यज जातींतून मुसलमान झाले असावे, आणि म्हणूनच ह्यांनीं धर्मांतर केलें तरी इस्लामसारख्या एकांतिक धर्मांतहि ह्यांना हीन मानण्यांत येत असावें. हिंदुस्थान देशांत एकंदर मुसलमानांची संख्या ६,२४,५८,०७७ आहे व त्यांपैकी उत्तर हिंदुस्थानांत हीन मुसलमानांची संख्या ८६,२८,५६६ दाखविण्यांत आली आहे. पण ह्यांचा समावेश वरील अंत्यज संख्येंत करण्यांत आलेला नाहीं. कारण, हे मुसलमान असल्यानें ह्यांची स्थिति कितीहि हीन असली तरी हिंदु अंत्यजाइतकी ती असेल कीं काय, ह्याबद्दल शंका आहे. तथापि हिंदु जातिभेदाचा परिणाम कडकडीत मुसलमानी धर्मावरही कसा घडत आहे, ह्याचें वरील हीन मुसलमानांची संख्या हें एक चांगलें उदाहरण आहे. बलुचिस्थान व सरहद्दीवरील तुर्की -इराणी प्रदेशांतील सुलतानांमध्यें उत्तम, मध्यम व कनिष्ठ असा भेद केलेला दिसत नाहीं.  ह्याचे कारण, तेथील मुसलमानांमध्यें हिंदूंतून मुसलमान बनविलेल्यांची भेसळ क्वचितच झालेली आहे हें होय. तसेंच दक्षिणेंतील मुसलमानांमध्येंहि असा भेद केलेला नाहीं. ह्याचें कारण असें असावें कीं, इकडील हल्लींचे बहुतेक मुसलमान पूर्वींचे हिंदूच असलयानें असा भेद असणे शक्य नाहीं. मध्यंतरीं उत्तर हिंदुस्थानांतल्या मुसलमानांतच हा उच्चनीच भेद दिसून येणें शक्य आहे व तो तसा दाखविण्यांत आला आहे. ह्याप्रमाणें बलुचिस्थान व वायव्य सरहद्द आणि तसेंच नर्मदेच्या खालचें सर्व दक्षिण हिंदुस्थान इतका भाग वगळला असतां बाकी जो अस्सल उत्तर हिंदुस्थानचा भाग पंजाब, काश्मीर, राजपुताना, संयुक्त प्रांत, बंगाल, बिहार, ओरिसा इत्यादी राहतो, त्यामध्यें मुसलमानांची एकंदर संख्या ४,७०,४८,५८१ आहे आणि त्यापैकीं ८६,२८,५६६ महणजे एक षष्ठांशाहून अधिक हीन मानलेले मुसलमान आहेत. तथापि ह्यांची गणना अंत्यजांत केलेली नाहीं, हे वर सांगितलेंच आहे.

अंत्यज आणि एकूण हिंदूंची प्रांतनिहाय संख्या (PDF साठी येथे क्लिक करा)

ज्यांचें वर्गीकरण करतां आलें नाहीं व जे अर्धवट रानटी स्थितींत आहेत; अशा हिंदु लोकांची संख्या ह्याशिवाय आहे. ती धरली असतां एकूण हिंदूंची संख्या २०,७१,४७,०२६ इतकी होते.

हिंदुस्थानांतील निरनिराळ्या भागांतील एकूण हिंदुसंख्येमध्यें अति उच्च मानलेल्या व अति नीच मानलेल्या जातींचें दर शेंकडा प्रमाण खालीं दिल्याप्रमाणें आढळून येतें.

तक्ता १ - (PDF साठी येथे क्लिक करा)
अत्यंज अथवा पंचम वर्गाच्या कांहीं मुख्य जातींची सर्व हिंदुस्थानांतील एकूण संख्या
तक्ता २ - (PDF साठी येथे क्लिक करा)

ह्या आंकड्यांवरून असें सिद्ध होतें कीं, हिंदु लोकांपैकीं एकचतुर्थांशापेक्षां अधिक संख्या हीन मानलेल्या अंत्यज जातीची आहे, व मुसलमान लोकांपैकीं जवळ जवळ एक सप्तमांश हीन मानलेल्या अर्जाल वर्गांची आहे. ह्या हीन मुसलमानांची संख्या विचारांत न घेतां नुसत्या हिंदु अंत्यजांची संख्या हिंदुस्थानांतील एकंदर लोकसंख्येशीं ताडून पाहिली तरी ती तिच्या एक षष्ठांशाहून अधिक भरते ! म्हणजे, प्रत्येक सहा हिंदी माणसांमध्ये (मग ते कोणत्याही जातीचे किंवा धर्माचे अथवा रंगाचे असोत) एक अगदीं टाकाऊ-शिवून घेण्याला देखील अयोग्य मानलेला असा मनुष्यप्राणी सांपडतो !!!

पुढें काय ?

येथवर ह्या भारत देशानें आपल्याच एका भागावर कसा कडक बहिष्कार घातला आहे ?  ह्या बहिष्काराचा आतांपर्यंत काय परिणाम झाला आहे ? आणि हा बहिष्कृत झालेला ह्या देशाचा कितवा भाग आहे, याविषयीं विचार झाला. आतां पुढें काय करावयाचें व त्यासंबंधीं हल्लीं काय चाललें आहे याचा विचार करण्यापूर्वीं या गोष्टी संबंधीं एकदोन आगंतुक मुद्द्यांचा विचार करणें अवश्य आहे.

इंग्रजी अमलांतील स्थिति

इंग्रजी या शब्दानें आमच्या देशांतील इंग्रज सरकार आणि पाश्चात्य आधुनिक सुधारणा या दोन्हींचा अंमल दर्शित करण्यांत येतो. एका पिढीच्या मागें इंग्रज सरकार म्हणजे माबाप सरकार (Parental Government) अशी तत्कालीन समजुतदार माणसाची कल्पना होती. इंग्रज सरकार हें शहाणें आणि जबरदस्त आहे आणि त्याच्यापासून हिंदुस्थानचें हित बरेंच झालें आहे आणि पुढेंही होण्याची आशा अद्यापि नष्ट झाली नाहीं, असें पुष्कळ समजुतदार माणसांना अद्यापिही वाटत आहे. हल्लीं युगांतर झपाट्यानें होत असल्यामुळें या कल्पनेस प्रस्तुत काळीं बराच आळा बसला आहे. आणि हें योग्यच आहे. कारण, आईबापांची कामगिरी सरकारी रीतीनें मागें कधींच झाली नाहीं आणि पुढें होईल अशी आशा करणें मनुष्यजातीला शोभत नाहीं. म्हणून इंग्रज सरकारला ते माबाप नाहींत म्हणून दोष देणाऱ्या माणसांत मुळीं माणुसपणाच कमी आहे, असें म्हणणें फारसें वावगें होणार नाही. इंग्रज लोक या देशांत केवळ आधुनिक सुधारणेचा अंमल गाजविण्याकरितां जरी आले नाहींत - माबापगिरी बाजूला राहिली - तरी पर्यायानें त्यांच्यामुळें सुधारणेचा हितकारक अंमल बसत चालला आहे, हें त्यांच्या शत्रूंसही कबूल करावें लागेल. इंग्रजी राज्य आणि आधुनिक सुधारणा ह्यांचें प्रस्तुत विषयाला अनुलक्षून पाहतां एक प्रकारें ऐक्य आहे, असें दिसून येईल.

आतां अलीकडे इंग्रजी राज्यांत आणि सुधारलेल्या मनूंत ह्या बहिष्काराचा कडकपणा पुष्कळ कमी झाला आहे की काय, असा सहजच प्रश्न उत्पन्न होतो. ह्या मध्यंतरींच्या दीर्घ काळांत ह्यांची कडक अंमलबजावणी झाली आहे, ह्याला पुष्कळ दाखले सांपडतील, पण हल्लीं इंग्रजीच्या महात्म्यानें हा कडकपणा बऱ्याच ठिकाणीं कांहीं अंशीं कमी झाला आहे; ही गोष्ट ह्या लोकांच्या अत्यंत कळकळीच्या कनवाळूसही कबूल करावी लागेल, आणि ह्याबद्दल त्याला आनंदहि वाटेल. तथापि, हल्लींच्या सर्व बाजूंनीं होणाऱ्या प्रगतीच्या मानानें व इंग्रज सरकारच्या सत्तेच्या, संपत्तीच्या आणि शहाणपणाच्या मानानें पाहतां ह्या लोकांची आज जी दाद लागत आहे, ती फारच अल्प होय, असें म्हटल्यावांचून आमच्यानें राहवत नाहीं. मिठावरचा आणि जमिनीवरचा कर, जकात आणि दुसऱ्या अशाच सर्वसाधारण करांची वसुली करते वेळीं सरकार अमूक जाति उच्च आणि अमुक जाति नीच हा भेद पाहत नाहीं; पण असें असूनही न्याकोर्टे, दवाखाने, शाळा, पोस्ट ऑफिसें इत्यादि सार्वजनिक जागीं नीच मानलेल्या वर्गांस उच्च म्हणविणारांच्या दृष्टीनें वागविण्यांत येतें, त्यामुळें ह्या आधींच रंजलेल्या बापड्यांस अनेक अपमान, अडचणी आणि पुष्कळ वेळां अन्यायही सोसावे लागतात. कर घेतेवेळीं सरकार जी समदृष्टी ठेवितें ती प्रजापालनाचे वेळीं का ठेवित नाहीं ?  ती ठेवणें जर कांहीं राजकीय धोरणामुळे अशक्य किंवा अनिष्ट असेल, तर कर घेण्यांतहि तशीच विशेष सूट असावयाला नको होती काय ?  असो; ह्या बाबतीत सरकारचा कदाचित फारसा दोष नसेल. आपल्या राज्यांत सर्वांना सारखे हक्क आहेत असें सरकारने जाहीर केले आहे व तशी त्याची इच्छा आहे व प्रयत्नहि आहेत. पण ह्या जाहीर इच्छेची अखेरची अंमलबजावणी आमच्या लोकांवरच अवलंबून असल्यामुळें सरकार केव्हां केव्हां अगदी पंगू बनून जाते. तथापि, सरकारचा फार नसला तरी थोडा तरी दोष आहेच. लोकांच्या धर्मसमजुतींत हात घालावयाचा नाहीं, हें सरकारचें धोरण जरी फार इष्ट आणि अवश्य आहे, तरी प्रजेपैकीं कांहीं वर्गांच्या धर्मसमजुती, सार्वजनिक शांतता, वगैरे सबबींवरून एखाद्या वर्गाच्या उपजत हक्कांची पायमल्ली होते तेव्हां सरकारानें तिकडे कानाडोळा करणें म्हणजे आपल्या प्रजापालनाच्या कर्तव्यास अंशतः तरी चुकणेंच होय. वऱ्हाडप्रांतांत अंत्यज मुलांस शाळांतून इतरांबरोबर बसविण्यांत येतें; इतकेंच नव्हे, तर सरकारी नोकरींतहि ह्या जातींपैकीं थोड्यांचा शिरकाव झाला आहे, ही गोष्ट खरी आहे, आणि ती तेथील सरकारी अंमलदार आणि उच्च वर्ग ह्या दोघांनांहि भूषणावह आहे. तथापि इतर प्रांतांत मोठमोठ्या शहरांतूनहि याच्या अगदी उलट प्रकार राजरोस चालू आहेत ! सरकारच्या तगाद्यामुळे म्युनिसिपालिट्यांनी मोठमोठ्या गांवीं अंत्यजांसाठीं वेगळ्या शाळा काढिल्या आहेत; पण अत्यंत शाळेकरितां चांगले हुशार मास्तर नेमण्यासंबंधीं म्युनिसिपल बोर्डांकडून फारच थोडी काळजी घेण्यांत येते. एखादी धर्मार्थ शाळा उघडली कीं, आपलें कर्तव्य आटोपलें, असें बोर्डास वाटतें. शाळा कोठें तरी दूर कोपऱ्यांत असावयाची, तेथें एक अर्धवट शिकलेला मुसलमान मास्तर ठेवावयाचा - आणि असा जुलमाचा रामराम करून वेगळें व्हावयाचें !

सरकारी नोकरीसंबंधीहि या लोकांवरचा बहिष्कार वऱ्हाड प्रांताबाहेर जशाचा तसाच आहे. मागे लष्करखात्यांत या लोकांची चांगली बढती होत असल्यामुळें यांच्यांत काहीं चांगली पेन्शनर मंडळी अद्याप आढळते; पण १८९२ सालापासून ह्या बाबतींतहि कांही अकल्पित धाड आल्यामुळें ह्यांची पीच्छेहाट होत आहे. ह्या नोकरीच्या बाबतींत आपलेच लोक आपल्या ह्या दीन देशबांधवांस कसे खाली रगडीत आहेत, हें खालील गोष्टींवरून कळण्यासारखें आहे.

मंगळूर येथें तेथील ब्राह्मसमाजाच्या सेक्रेटरींनीं पंचम लोकांकरितां एक शाळा काढिली आहे. त्या शाळेंत शिकून तयार झालेल्या विद्यार्थ्यांना कोठेतरी चांगली नोकरी मिळवून देण्याकरितां हे गृहस्थ फार झटत असतात. त्यांच्याकडून आलेल्या एका खासगी पत्रांत पुढील मजकूर आहे :

''मीं किती खटपट केली तरी एकाहि विद्यार्थ्यांस नोकरी मिळवून देतां आली नाहीं !  शेवटीं एका भल्या युरोपियन डिस्ट्रिक्ट जज्जांनीं पुढें जी चपराशाची जागा रिकामी होईल ती पंचमास द्यावी, असा ठराव केला. जागा रिकामी होऊन एका पंचमाचा अर्ज गेल्याबरोबर त्या सर्व खात्यांतील सुमारें १०० शिपाई मिळून जज्जसाहेबांच्या बंगल्यावर जाऊन आडवे पडले आणि मेहेरबानांनी पंचमाला नोकरीवर घेऊन आपल्यास हिणवूं नये; अशी मागणी इतक्या नेटानें केली, कीं शेवटीं मेहेरबानांस ती मान्य करावीच लागली !''

ह्या बाबतींत जो अन्याय घडला तो स्वदेशी कीं परदेशी, ह्याचा निर्णय वाचकांनींच
करावा  !मुळीं अन्यायच घडला नाहीं, असा निर्णय करणारे वाचक भेटल्यास लेखकाचें नशीब म्हणावयाचें !!

असो. बहिष्काराचे ह्यापेक्षांही खडतर मासले नित्य आपल्या डोळ्यांसमोर दिसत आहेत; आणि त्रावणकोरसारख्या अगदीं सुधारलेल्या संस्थानांत देखील ह्या लोकांची जी अपेष्टा चाललेली सर्वांच्या ऐकण्यांत येते, तीवरून आधुनिक सुधारणेच्या मानानें आमचें पाऊल ह्या बहिष्काराच्या बाबतींत अद्यापि फारच मागें आहे, असें कष्टानें कबूल करावें लागते.

ख्रिस्ती पंथ

व्यवहारांत धर्मांच्या नावानें जितक्या चुका झाल्या आहेत व होत आहेत तितक्या कशानेंच झाल्या नसतील ! केवळ व्यवहारांतच नव्हे, तर भाषेंतही तितक्याच चुका होतात. खरे पाहूं जाता धर्म एकच आहे आणि हिंदु, मुसलमानी, ख्रिस्ती इत्यादी केवळ त्याचे पंथ होत. असें असतां, हे सर्व पंथ निरनिराळे धर्मच मानण्यांत आल्यामुळें त्या परस्परांतील तेढी अत्यंत तीव्र झालेली आहे. मनुष्यप्राण्याला स्वभावसिद्ध असलेली ही धर्मप्रवृत्ती ह्या सर्वच पंथांत निरनिराळ्या रूपानें व कमी-अधिक शुद्ध स्थितींत प्रगट होत आहे. ही धर्मवृत्तीच कायती शाश्वत आणि हे सर्व पंथ देशकालमानाप्रमाणें बदलत जाणारे आहेत, हें इतिहासावरून उघड दिसत असतांहि ख्रिस्त्यांना असें वाटतें कीं, ख्रिस्ती धर्मच काय तो सार्वत्रिक धर्म  -Universal Religion - आणि हिंदूंनी तर आपल्या धर्माला 'सनातन' हे नांव कधींच दिलेलें आहे !

धर्म आणि त्याचे पंथ यांविषयी वरील शुद्ध आणि निरपेक्ष सत्य ध्यानांत ठेवून ख्रिस्ती पंथानें प्रस्तुत विषयासंबंधीं जी कामगिरी बजाविली आहे, तिचा थोडक्यांत कृतज्ञपणानें पण निर्भीडपणें विचार करूं या. हे आमचे विचार ख्रिस्ती, हिंदु, ख्रिस्ती झालेले किंवा हिंदूच राहिलेले अस्पृश्यवर्ग ह्यापैकीं पुष्कळांना पटणार नाहींत, हें आम्ही जाणून आहों; पण त्याला इलाज नाहीं. हिंदुपंथाने हीन समजून टाकून दिलेल्या ह्या जातींचा ख्रिस्ती पंथाने जो आजवर परामर्श घेतला आहे व त्याची अंशतः तरी उन्नति केली आहे, त्याबद्दल ह्या पंथाचे जितके धन्यवाद गावे तितके थोडेच आहेत. या बाबतींत ख्रिस्ती मिशनरी केवळ परोपकारबुद्धीनें काम न करितां ह्या गरीब लोकांना आपल्या कळपांत ओढण्याचा त्यांचा कावा असतो; असा जो कांहींसा आक्षेप असतो, त्यांतही विशेष अर्थ नाही. ख्रिस्ती मंडळीला जर आपला पंथ चांगला वाटतो, तर त्यांत दुसऱ्यांनीं यावें असा त्यांनीं प्रयत्न करणें हेंच त्यांच्या ख्रिस्तीपणाला शोभते. उलट, ज्या हिंदूला ह्या गरीब जाती आपल्या धर्मांत राहिल्या काय अथवा गेल्या काय सारख्याच वाटतात, आणि ह्या लोकांनीं हिंदुधर्मांत असे तोंपर्यंत मात्र दूर रहावें आणि ख्रिस्ती होऊन पोषाख बदलून जवळ आल्यास हरकत नाहीं, असें वाटतें, त्यांच्या उदासीनपणाला व विसंगतपणाला दुसऱ्या कशाचीहि उपमा दिसत नाहीं  !

पण मुख्य प्रश्न बाजूलाच राहिला आहे. तो हा कीं, जवळ जवळ ५॥ कोटी प्रजेनें अशा हीन स्थितींत राहून चालेल काय ? हिंदुपंथ तर आपला सोंवळेपणा सोडावयाला तयार नाही, आणि तो सोंवळेपणा कायम आहे तोंपर्यंत या जातीला पुढें सरकावयाला जागा नाहीं. तर मग हें व्हावें कसें ?  इतक्या सगळ्यांनी एकदम ख्रिस्ती व्हावें ? यक्षिणीची कांडी फिरवून इतक्या लोकसमुदायाला कोणी एकदम ख्रिस्ती करील म्हणावें तर तेंही संभवनीय नाहीं. तथापि हिंदु लोकांची उदासीनता व विसंगतता शाश्वत राहिली, तर मात्र वरील चमत्कारही घडण्याचा संभव आहे. असा प्रकार खरोखरीच घडून आला तर राष्ट्रीय दृष्ट्या काय प्रकार होईल पहा. हल्लीं भारतीय साम्राज्यांत खालील प्रमाणें लोकसंख्या आहे.

(इतर १५ + हीन ५॥ मिळून) २१ कोटी हिंदु. (इतर ५ + हीन १ मिळून) ६ कोटी मुसलमान. ३० लक्ष ख्रिस्ती. १ कोटी जंगली. १ कोटी बुद्ध, जैन, शीख वगैरे.

हिंदुपंथाची उदासीनता आणि ख्रिस्ती पंथाची चळवळ आतांप्रमाणेंच कायम राहील तर पुढें  खाली दिल्याप्रमाणें गणना होण्याचा संभव आहे :

१५ कोटी हिंदु, ६ कोटी मुसलमान.  ७ कोटी ख्रिस्ती.  १ कोटी बुद्ध, जैन, शीख व.  म्हणजे राष्ट्रीयदृष्ट्या आतां जी हिंदुमुसलमानांची दुही आहे, तिच्याऐवजीं वरील प्रकार घडलाच तर हिंदु, मुसलमान, ख्रिस्ती यांचा तिरपगडा होणार !  १५ कोटी मवाळ हिंदु आणि जवळजवळ तितकेच कडवे मुसलमान आणि ख्रिस्ती मिळून या तिघांचे सूत कसें जमणार ईश्वर जाणे !

यावर कांहीं ख्रिस्ती मंडळीचें म्हणणें असें पडतें कीं, ५॥ कोटी हीन दशेंतल्या महारमांगांचें व त्यांना दूर दूर ठेवणाऱ्या १५ कोटी इतर हिंदूंचे आतां तरी कोठें सूत जमत आहे ?  हे ५॥ कोटी महारमांग ख्रिस्ती होऊन सुशिक्षित आणि सुखवस्तु झाल्यानें राष्ट्राचें पाऊल मागें पडण्यापेक्षां पुढेंच पडणार नाहीं कशावरून ?  इतके लोक ख्रिस्ती झाल्यावर ते ह्या देशांतलेच कायमचे राहणारे असल्यानें इतर हिंदूंशीं ते राष्ट्रीय बाबतींत विरोधानेंच वागतील कशावरून ? दुसऱ्या पक्षीं, कांहीं जुन्या मताच्या आणि तटस्थ वृत्तीच्या हिंदु मंडळींचें असें म्हणणें पडतें कीं, वरिष्ठ हिंदु कितीहि उदासीन राहिले तरी हीन मानलेले लोक कालांतरानें आपली आपणच सुधारणा करून घेऊन एक वेगळी जात बनवून सुखानें रहाणार नाहींत कशावरून ? मग त्यांच्या उद्धारासाठीं एवढा खटाटोप कशाला हवा आहे ?

हिंदूंचा उदासीनपणा कायम धरून चार प्रकारचे परिणाम संभवतात. (१) हे ५॥ कोटी लोक अशाच स्थितींत राहतील, किंवा (२) आपणच आपला उद्धार करून नवी जात बनवीतील, किंवा (३) ख्रिस्ती होऊन हिंदूंशीं विरोधानें वागतील किंवा (४) धर्म बदलला तरी राष्ट्रीय बाबतींत सलोख्यानें वागतील.  पण हे चारी प्रकार हिंदुस्थानांतील कोणाहि बाणेदार, प्रगमनशील हिंदूला समाधानकारक वाटणार नाहींत. हिंदुस्थानांतील जातिभेद हिंदी राष्ट्राला घातक आहे, हें आतां इतके दिवस सामाजिक प्रगतीच्या उलट असलेलीं 'काळ', 'भाला', 'केसरी' सारखीं पत्रेंहि कंठरवानें सांगूं लागलीं आहेत ! हिंदूंच्या तटस्थपणाचा आता बहुतेकांला बाट येऊन चुकला आहे. ह्या ५॥ कोटी प्राण्यांचा उद्धार होऊन हे भावी हिंदी समाजांत व हिंदी साम्राज्यांत एकजीव होऊन जावे, अशी सर्वांची अंतःकरणपूर्वक इच्छा आहे. पण ही संजीवनी देणारा द्रोणागिरी कोणीं उचलून आणावा, हाच प्रश्न आहे. हिंदू, ख्रिस्ती, मुसलमान इत्यादि पंथांचे जुनाट आणि जाड कवच फोडून धर्मप्रवृत्तीचा नवीनच एक अंकुर बाहेर आला पाहिजे. धर्मसंचाराशिवाय केवळ स्वार्थी आणि हिशोबी प्रवृत्तीच्या जोरावर हें काम होण्यासारखें नाही. आणि धर्माची प्रेरणा झाली तरी ती पंथाची जाड भिंत फोडण्याइतकी बळकट नसेल तर आंतल्याआंतच विरून जाण्याचा संभव आहे. ही भिंत फोडून कांही नवीन अंकुर ब्राह्मसमाज, प्रार्थनासमाज, आर्यसमाज ह्यांच्या रूपानें ह्या देशांत वर येऊ लागले आहेत. त्यांच्यांत अंतरींचे बल किती आहे हें पाहण्याची कसोटी प्रस्तुत विषयांत आहे.

विचार करतां करतां आपण प्रेरणेच्या प्रदेशांत येऊन पोहोंचलों. या प्रदेशांत आपल्या दृष्टीस काय काय पडत आहे, या हीन-दीन लोकांच्या उद्धारासाठीं आपल्या लोकांचे कसकसे प्रयत्न चालले आहेत व ते कितपत सफल झाले आहेत अगर होण्याचा संभव आहे, याचा विचार पुढील भागीं करूं.