मुख्यपान

महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांच्याविषयी...

समाजशास्त्र अभ्यासणारे पहिले क्रियाशील अभ्यासक व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला अनुकूल पार्श्र्वभूमी तयार होईल असे पूरक कार्य करणारे थोर समाजसुधारक!
विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म जमखंडी (कर्नाटक) या गावी झाला. घरातील वारकरी सांप्रदायिक वातावरणाचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला. त्यांना मराठी व कानडी या भाषा चांगल्या अवगत होत्या. पुढे ते संस्कृत, पाली, इंग्रजी व इतर प्राकृत भाषा शिकले. पुण्यात फर्ग्युसनमध्ये शिकत असताना त्यांना डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली. १८९८ साली ते बी. ए. झाले आणि एल्‌. एल्‌. बी. च्या पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केला. पुढे बडोदे संस्थानात नोकरी करण्याच्या अटीवर सयाजीराव महाराजांनी त्यांना दरमहा २५ रुपयांची शिष्यवृत्ती सुरू केली. याच साली शिंदे प्रार्थना समाजाकडे आकृष्ट झाले. १९०१ साली ते विलायतेतील मँचेस्टर कॉलेजात गेले. तेथे त्यांनी दोन वर्षे तौलनिक धर्म, पाली भाषा आणि बौद्ध धर्म या विषयांचा अभ्यास केला. समाजाचा, समाजशास्त्राचा तसेच अस्पृश्यतेसह अनेक सामाजिक समस्यांचा त्यांनी शास्त्रशुद्ध रीतीने अभ्यास केला. असा अभ्यास करणारे ते भारतातील पहिले शास्त्रज्ञ - अभ्यासक मानले जातात. १९०३ च्या ऑक्टोबर महिन्यात ते मुंबईस परत आले. १९०५ मध्ये त्यांनी अस्पृश्यांसाठी रात्रशाळा उघडली. साधारणपणे १९०३ ते १९१० या काळात त्यांनी एकेश्र्वरवादी तत्त्वज्ञानाचा प्रचार करत प्रार्थना समाजाचे कार्य केले.

महात्मा फुले यांना शिंदे गुरुस्थानी मानीत. १८ ऑक्टोबर, १९०६ रोजी त्यांनी मुंबईत भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळीची (डिप्रेस्ड क्लास मिशन) स्थापना केली. मिशनचे हेतू पुढीलप्रमाणे निश्चित केले गेले- शिक्षण प्रसार;  निराश्रितांना नोकर्‍या मिळवून देणे; सामाजिक अडचणींचे निराकरण करणे; सार्वत्रिक धर्म, व्यक्तिगत शील, नागरिकता वगैरे गुणांचा प्रसार. मिशनतर्फे पुढील दोन वर्षे मोफत दवाखान्याचेही काम चालू होते.
१४ मार्च, १९०७ रोजी सोमवंशीय मित्र समाजाची स्थापना महर्षी शिंदे यांनी केली. अस्पृश्य लोकांकरवीच स्व-उद्धारार्थ धार्मिक व सामाजिक सुधारणा करवून घेणे हा त्यामागचा हेतू होता. १९१० पासून त्यांनी प्रार्थना समाजाशी असलेले संबंध संपवले.
१९१२ साली डिप्रेस्ड क्लास मिशनच्या एकंदर १४ ठिकाणी २३ शाळा, ५५ शिक्षक, ११०० मुले, ५ वसतिगृहे, इतर बारा संस्था व ५ प्रचारक होते. निरनिराळ्या सात प्रांतांत मिशनचे काम पसरले होते. १९१७ साली त्यांनी अखिल भारतीय निराश्रित अस्पृश्यता निवारक संघ स्थापन केला.

मुंबईला अखिल भारतीय पातळीवरील अस्पृश्यता निवारक परिषद आयोजित केली. अशा अनेक अस्पृश्यता विरोधक परिषदा आयोजित करून त्यांनी समाजसुधारणेचे प्रयत्न केले. १९२२ साली त्यांनी ‘अहिल्याश्रम’ बांधून पूर्ण केला. १९२५-२६ मध्ये ते ब्राह्मदेशाच्या दौर्‍यावर गेले आणि तेथील समाज व बौद्धधर्माचा अभ्यास करून परतले.

Read more...