प्रकरण २. स्थानिक कार्यक्रम

स्थानिक कार्यक्रम    
परत आल्यावर मुंबईंतील कामाचा कार्यक्रम मी ठरवूं लागलों. धर्मकार्यांचीं दोन मुख्य अंगें आहेत. पहिलें आचार्य कार्य; दुसरें प्रसार कार्य. ज्यांनीं धर्माचा स्वीकार करून दीक्षा घेतलेली असते अशांच्या धर्माचरणाची व्यवस्था राखण्यासाठीं प्रयत्न करणें; दर आठवडयाला साप्ताहिक उपासना चालविणें; घरोघरीं भेट देऊन कौटुंबिक धर्माचरणाची निगा ठेवणें; समाजांत जे निराश्रित आणि अपंग असतील त्यांची शुश्रूशा ठेवणें; नामकरण, उपनयन, विवाह, अंत्येष्टि, इत्यादि गृहविधी चालविणें; सभासदांतील परस्पर परिचय वाढवून तो दृढ व्हावा म्हणून वेळोवेळीं स्नेहसंमेलनें करणें इत्यादि इत्यादि. स्त्रियांसाठीं दर शनिवारीं आर्य महिला समाज, मुलांसाठीं रविवारचे धर्म व नाति शिकविण्याचे वर्ग, तरुणांसाठीं तरुण ब्राह्ममंडळ, वृध्दासाठीं संगतसभा आणि बाहेरच्यांसाठीं व्याख्यानें हा क्रम आठवडाभर चाले. ह्यांत मीं आल्यावर खालील नवीन संस्थांची भर टाकली.

मी विलायतेंत असतांना तेथील स्त्रियांनीं चालविलेलें युनिटेरियन पोस्टल मिशन हें कार्य निरखून पाहिलें होतें. माझे पोस्टल मिशन मित्र वासुदेवराव सुखटणकर यावेळीं पुण्यास होते. त्यांच्याकडून अशाच थाटावर ब्राह्म पोस्टल मिशन ही घटना मीं स्वेदशीं येण्यापूर्वीच करविली होती. ब्राह्म धर्मांच्या तत्वावर आणि उपासना पध्दतीवर लहान लहान पुस्तकें छापवून तीं टपालमार्गें लोकांस वाटून त्यावर वाचकांकडून जीं प्रश्नोत्तरें येतील त्याबाबत सतत पत्रव्यवहार ठेवून, सवडीप्रमाणें वाचकांस भेटीस बोलावून, धर्मप्रसार करण्याच्या पध्दतीला पोस्टल मिशन हें नांव आहे. या कामांत युनिटेरियन लोकांकडून त्यांचीं लहानमोठीं पुस्तकें व द्रव्यनिधीचीहि मदत मिळविली. मी स्वदेशीं आल्यावर सुखटणकर माझ्या जागीं विलायतेला गेले. त्यांचें पुण्यांतील हें कार्य मीं मुंबईला आणून तें वाढविलें. ह्या कामीं माझे मित्र व समाजाचे सभासद सय्यद अबदुल कादर ह्यांची मोठी मदत झाली. ह्या मिशनसंबंधानें पहिल्या सात आठ वर्षांच्या अवधींत एकंदर ३४३८ बाह्म धर्मावरील पुस्तकें, १२७०० लहानसहान पत्रकें, ६३३ युनिटेरियन पुस्तकें व ५००० युनिटेरियन पत्रकांचा प्रसार करण्यांत आला. ह्यांतील पुष्कळशीं फुकट वाटण्यांत आलीं व काहींची अल्प किंमत घेण्यांत येत असे. जे कोणी पुस्तकांची मागणी करीत अगर पत्रव्यवहार करीत त्यांची नांवें एका पुस्तकांत दाखल करण्यांत येत असत व त्यांच्याशीं पत्रव्यवहार करून उदार धर्मवार्ता त्यांस कळावी अशी व्यवस्था करण्यांत आली होती. मी दोन वेळां मुंबई इलाख्यांतील कांहीं ठिकाणीं प्रवास करून व्याख्यानें दिलीं. त्या दोन्हीं सफरींचा खर्च युनिटेरियन असोसिएशननें त्यावेळीं दिला होता. पुढें प्रार्थनासमाजाशीं धर्मप्रचारक या नात्यानें असलेला माझा संबंध सुटल्यानंतर हें काम बंद पडलें.

हायस्कुलांतील व कॉलेजांतील तरुनण विद्यार्थ्यांना मौलिक धर्मग्रंथांचे वाचन करण्याची सवय लागावी म्हणून हा उदार धर्मग्रंथ वाचनवर्ग (Liberal Religious Reading Class) हा वर्ग काढण्यांत आला. ह्या वर्गांत महाराष्ट्रीयन, गुजराथी, ख्रिश्चन आणि मुसलमान अशा भिन्न धर्मांच्या विद्यार्थ्यांचा समावेश होत असे. म्हणून हा वर्ग इंग्रजी पुस्तकांचा इंग्रजींत चालवावा लागे. हा दर बुधवारी सायंकाळीं प्रार्थनामंदिरांत भरत असे. ह्याच्या प्रसिध्दीसाठीं वेळोवेळीं जाहीर व्याख्यानें करावीं लागत. डॉ. आर्म्सस्ट्राँगचे God and Soul, इमर्सनचीं पुस्तकें, प्रो. डॉयसेनचें Philosophy of Upanishad  अशा पुस्तकांचें अध्ययन चालत असे. समाजांतील डॉ. भांडारकर फ्री लायब्ररीमधून ह्या वाचनाला पोषक अशीं पुस्तकें विद्यार्थ्यांना

इकडील प्रांतीं ब्राह्मधर्माचा स्वीकार आणि प्रसार प्रार्थना समाजाकडून आतांपर्यंत कित्येक वर्षे चालला असला तरी ब्राह्मधर्माच्या तत्वाप्रमाणें सभासदांचे गृह संस्कार व विधी चालविण्याचें काम त्यामानानें फार चाललेलें असे. तत्वाप्रमाणें विधी चालविण्याला अनुष्ठान हे नांव असें. ह्या अनुष्ठानाचा परिणाम ब्राह्म कुटुंबामधील तरुणांपासूनच घडविण्याचा प्रयत्न करणें बरें आणि त्यासाठीं तरुणांनीं ब्राह्मधर्मानुसार उपासना चालविण्यास शिकावें, त्यांनीं परस्परांत स्नेहवर्धन करावें, गृह्य संस्काराचे वेळीं एकमेकांत मिसळावें, आपल्या घरीं असे संस्कार चालविण्याचा आग्रह धरावा वगैरे हेतु साध्य करण्यासाठीं सन १९०५ सालच्या दस-याच्या दिवशीं मीं तरुण ब्राह्म संघ (Young Theists Union) ही महत्त्वाची संस्था स्थापन केली. प्रार्थना समाजांत समाविष्ट झालेल्या तरुणांनीं कट्टर अनुष्टानाला तयार व्हावें म्हणून मीं ह्या संघाच्या घटनेचे
नियम मोठया कसोशीनें तयार केले. बाहेरच्या तरुणांनीं हे नियम पाळण्याची प्रतिज्ञा घेतल्यास त्यांनाहि आंत येण्यास वाव असे. या कार्याशिवाय लोकशिक्षण आणि परोपकाराचीं कृत्यें करण्यासाठीं प्रार्थना समाजाच्या इतरहि संस्था होत्या. मजुरांसाठी रात्रींच्या शाळा मुंबई शहरांत निरनिराळया १०|१२ ठिकाणीं चालत. त्यांतच दोन शाळा अस्पृश्यांसाठीं होत्या. त्यांची देखरेख मला ठेवावी लागे. पंढरपुरांत बालहत्या प्रतिबंधकगृह म्हणून एक नमुनेदार संस्था समाजाकडून चालविण्यांत येत आहे. समाजाचें मुखपत्र ‘सुबोध पत्रिका’मराठी आणि इंग्रजी बाजूनें दर आठवडयास प्रसिध्द होत आहे.  त्यांचाहि मला नेहमीं परामर्ष घ्यावा लागे. अशीं निरनिराळीं स्थानिक कामें चालवून शिवाय मुंबई प्रांत आणि त्याबाहेरहि मला वरचेवर प्रवास करावा लागे.