प्रकरण पाचवे : उत्तरयुगीन अथवा अर्वाचीन अस्पृश्य


निराकार दक्षिणरु विप्र होए जात।।
उत्तर अड्गरु जान गोपाल सम्भूत ।।१७।।


वदन अंतरे विश्वमित्र मुनि कहि ।।
ताहांकु अडंरे वाउरि जात होइ ।।१८।।


तार तहु तेर सुत हइल जनम ।।
ताहार पत्नीर नाम पद्म लया जान ।।२५।।


कनिष्ठ पत्नीरे चित्र उर्वशी तार नाम ।।
गंधकेशी वलीण तार दुतिय भार्य्या जान ।।२६।।


वायुरेखा वलिण से चतुर्थक काहि ।।
वार सुत जन्म हेले चारि पत्नी तेहि ।।२७।।


भावार्थ : निराकाराच्या (शून्य ब्रह्माच्या) उजव्या कुशींतून विप्र जन्मले, डावीतून गोपाल, तोंडांतून विश्वामित्र, त्याच्यापासून बाउरी जात उभ्दवली. पद्मालया, उर्वशी गंधंकशी आणि वायुलेखा अशा चार पत्नीपासून विश्वमित्राला १२ पुत्र झाले.


भाष्य : एवे वाउरि वारपुत्र नामक हिवा ! पद्मालयापुत्र दुलि वाउरि अटत्नि ब्राह्मणसड्डे वेद पदु यान्ति । ब्राह्मण ज्येष्ठ वाउरि कनिष्ठ ।
ए पदुथिले राजा प्रतापरुद्रड्ग ठारु गोप्य करि रखि अच्छन्ति ।...
पद्मालयापुत्र वायोकांडी परमानन्द भोइ राधी शासमल ।
Modern Buddhism, पान १५-१६


ऋग्वेदाच्या ऐतरेय ब्राह्मणांत विश्वमित्राचे पुत्र शंबर असे म्हटलें आहे. त्याच्याशी वरील माहितीचा संदर्भ नगेंद्र बाबूंनी जुळविला आहे. पण ह्याशिवाय या बलरामदासाच्या मताला दुस-या कुठल्याही हिंदु अथवा बौद्ध पुराणांचा आधार नाही असें नगेंद्र बाबू कबूल करितात.


पुढे आणखी 'गणेश विभूती'त म्हटलें आहे की :
 

 

पदमालया तिन पुत्र ज्येष्ठ से प्रमाण ।
विष्णुंड्ग सड्गते से -हुयुत्नि सम्माषणं ।।


सड्गासुर मारि प्रभू सड्भ ताड्कु दिले ।
पज्भजन सड्भ तुम्म सम्माल वोइले ।।


आउ नव भाइ अश व्कुइ न जुगाइ ।
विचारि जानिलेटी संशय केली सेहि ।।१२।।


अर्थ : पद्मालयाच्या पांच पुत्रांना विष्णूने आपला शंख दिला पण इतर तीन बायकांच्या मुलांना मात्र विष्णूने आपणास स्पर्शही करु दिला नाही.


ह्या वाक्यांतील सड्भ ह्या शब्दाचा अर्थ नगेंद्रबाबू बौद्ध संघ असा करतात व शून्य पुराणांत सड्ख हे पंद संघ ह्या अर्थाने योजिलेले आढळते. असा दाखला देतात. अशिक्षितांमध्ये संघाचा अपभ्रंश संख होणे सहाजिक आहे. वरील वाक्याचा लाक्षणिक अर्थ असा होईल की बाउरी जातीच्या प्रमुख ग्रामणीने आपल्या शत्रूंचा संहार करुन संघाचे आधिपत्य मिळविले. म्हणजे बाउरी जातीचाच बौद्ध धर्मांत शिरकाव होऊन ते मान्यतेला पावले. बाकीच्या शबर जाती बौद्ध धर्माचा स्वीकार न करितां तशाच जंगली स्थितीत राहिल्या. (Modern Buddhism, पान २०)


'गणेशविभूतीं' त गणेशाला पुढे बाउरी जातीसंबंधी हेंही गुह्य सांगण्यांत आलें आहे : -
 

 

कलियुगे न छुइव । वाउरि छुइले सकल पातक क्षय हव ।
वोलि विष्णुमाया करि गोप्य कोरि रखि अच्छन्ति ।
शुन हे गणेश वड गाहनए गुप्त करि थुइवु ।
एथि सकाशरु वाउरिगार काटिले ब्राह्मण निभाइ पारन्ति नहि ।
मर्घ्ना पातक क्षय हव वोलि शाप्यकु मानियान्ति ।। ( अध्याय १२)


अर्थ : - कलियुगांत बाउरींना शिवू नये; शिवल्यास सकळ पापांचा क्षय होतो, म्हणून जो तो त्यांना शिवेल यासाठी त्यांना अस्पृश्य ठेवण्यांत विष्णूची माया आहे.


वर सिद्धांतांडबरामध्ये सांगितल्याप्रमाणे हल्लीच्या बाथुरी उर्फ बाउरी ह्या अस्पृश्य जातीचा ब्राम्हणांशी कांही सबंध आहे काय ह्या प्रश्नाला नगेंद्रबाबू खालील उत्तर देत आहेत - "मयूरभंज संस्थानांत शोधाअती आम्हाला जी अनेक प्रकारची सामग्री मिळाली आहे तीवरुन हल्लीची बाथुरी ही जात खरोखरी आर्यवंशीय असावी असें आम्हांस वाटतें. ह्या प्रांतांत ही सामग्री भरपूर आहे. मयूरभंज संस्थानांतील सिंहलीपाल दुर्गावरील सुंदर इमारतीचे अवशेष, प्राचीन 'आठवा देऊळ' नांवाचे दगडी मंदिर, जोशीपूर किंवा दासपूर नांवाचा चिरेबंदी किल्ला वगैरे पुराव्यांवरुन बाथुरी हे आर्य आहेत, इतकें नव्हे तर ह्या प्रांती हे लोक पूर्वी पराक्रमी राजकर्ते, मंत्री व सेनानी होते, अशी जी थोड्याच दिवसांमागे समजूत होती ती साधार आहे, असें दिसतें. अद्यापि हे लोक ब्राह्मणांप्रमाणे जानवीं घालतात, दहा दिवसांचे सुतक पाळतात, श्राद्ध करितात, आणि ह्यांच्या श्राद्धांचे जेवण ब्राह्मण आणि वैश्यही जेवतात. ह्या जातीच्या प्रमुखाला आजही महापात्र हा किताब आहे. खरा बाउरी ब्राह्मणच्याही हातचें खात नाही; त्याच्या जातीमध्ये त्याला फारच मान आहे. ह्याच्या पूर्वजांनीच हल्लीच्या भंजराजाला राज्यस्थापनेमध्ये मदत केली. पूर्वी ह्या राजाचे २२ सामंत होते. त्यांत सिंहलीपाल, आदिपूर, दासपूर आणि करुंजा येथील अनुक्रमे चार जमीनदार बाउरी जातीचे होते. ह्यांना भंजांकडून रुप्याच्या छत्रचामराचा मान होता. पण आता ह्या सर्व गत गोष्टी झाल्या. हे सर्व कर्जबाजारी होऊन खायाची भ्रांत,अशी कठीण स्थिती झाली आहे. भोंवतालच्या कोळी, सांताळ लोकांत मिसळून त्यांच्याच चालीरीती आचरुं लागले आहेत." (Modern Buddhism पान ३२)


जी अवस्था बाउरींची पश्चिम बंगाल व ओरिसामध्ये तीच पोंडांची (पौंड १) मध्य बंगाल्यांत आणि नामशुद्रांची (चांडाल) पूर्वबंगाल्यांत आहे. इ. स. १९०१च्या खानेसुमारीत ह्या दो जातीसंबंधाने पुढील उल्लेख आहे :-


" नामशूद्र १८,६१,००० आणि पोड ५,००,००० आहेत. पण ह्यांच्यापैकी फार मोठी संख्या मुसलमान झाल्याने ह्यांचा खरा विस्तार दृष्टीआड झाला आहे. पूर्व बंगाल्यांत १, ०५, ००,००० मुसलमान आहेत. पैकी निदान ९,००,००० ह्याच जातींतून गेले असावेत. दंतकथेवरुन ह्यांचा संबंध प्राचीन पौंडवर्धन राजाशी पोहोचतो. ह्याची राजधानी खारा तोय नदीवर होती. ह्यांनी आपल्या पूर्वीच्या बौद्धधर्माची अद्यापि आठवण राखिली आहे. धर्मराज व धर्मठाकूर ह्या रुपाने ते अद्यापि बुद्दाचीच पूजा करितात. ह्यांचा वंश बहुश: मोंगली (मांगोलियन) आहे. हे प्रथम ब्रह्मपुत्रानदीच्या दरींतून ईशान्येकडून उत्तर बंगाल्यांत शिरले असावेत. तेथेच त्यांचे राज्य असावे. तेथून मग कोच, राजत्रंशी, इत्यादि लोकांनी त्यांना हुसकून लाविल्यामुळे ते खाली समुद्रकिना-यापर्यंत आले असावेत. गेल्या १० वर्षांत नामशूद्र शेंकडा १० व पोड शेंकडा ११ ह्या प्रमाणांत वाढले आहेत."


सन १९२३ आणि सन १९२८ ह्या दोन सालीं मी ब्राह्मसमाजाच्या प्रचाराकार्यासाठी पूर्व बंगाल्यांतील जेसोर जिल्ह्यांत फिरतीवर होतो. दोन्ही वेळा सुमारे महिनाभर ह्या नामशूद्रांच्या खेड्यांत त्यांच्याशी अगदी मिळून मिसळून राहिलों. ह्या लोकांत आमच्या 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन'च्या शाळा व हायस्कूलें त्यांनी स्वत: चालविलेल्या ब-या चालल्या आहेत. ह्यांच्या धार्मिक उपासना व समाजिक चालीरीती. ह्यांची नावें व गृह्यसंस्कार वगैरेचे बारीक निरीक्षण केल्यावरुन, ही मोठी जात पूर्वी बौद्धधर्मानुयायी असून ह्यांनी राजवैभव एक काळी चांगले भोगिले असावे अशी माझी खात्री झाली. हे हल्ली शेतीचा धंदा यशस्वी रीतीने करितात. विशेषत: ताडीच्या झाडांपासून गुळ करण्याचे कारखाने घरोघरी दिसले.


असो. एथवर या उत्तरयुगांतील टप्प्याची लक्षणें सांगितली. ह्या युगांत अस्पृश्य समाजांत जी भली मोठी भर पडली ती प्राचीन युगातल्या वर्णव्यवस्थेमुळे किंवा मध्ययुगांतल्या ग्रामसंस्थेमुळे नसून भलत्याच अवांतर कारणांनी म्हणजे हिंदूच्या दुष्ट राजनीतीमुळे व आत्मघातकी कोतेपणामुळे किंवा वृत्तिमात्सर्यांमुळे पडली आहे. दक्षिण हिंदुस्थानांत बुद्धधर्माचा नायनाट इ.स. ८००-९०० या शतकांत झाला तसा तो उत्तर हिंदुस्थानांत १२००-१५०० च्या दरम्यान झाला. दक्षिणेंत हा अत्याचार शैव आणि वैष्णव पंथांनी केला पण उत्तरेस त्या विघ्वंसाचें अपश्रेय जें एकट्या मुसलमानांच्याच कपाळावर कांही बंगाली पंडित व संशोधक चिकटवू पाहतात, त्याची मात्र खात्री पटत नाही.


मुसलमानांचे आगमन केवळ निमित्तमात्र होते. दक्षिणेकडे हे निमित्तही कोठे दिसत नाही. त्या अर्थी उत्तरेकडेही ह्या निमित्तावर फारसा भर इतिहाससंशोधकांनी ठेवून चालवयाचे नाही. मुसलमानांनी फार तर पुष्कळशा बौद्धांची कत्तल केली असेल  व पुष्कळ्यांना जबरीने बाटविले असेल. पण बाकी उरलेल्यांना अस्पृश्य करा आणि गांवाबाहेर ठेवा असा कांही  हिंदु वरिष्ठ वर्गांचा त्यांचा आग्रह असणें शक्य नाही. ह्या बाबतीत महामहोपाध्याय हरप्रसाद शास्त्री यांचे स्पष्टोद्वार फारच मार्मिक आणि निर्भीड आहेत. ते म्हणतात की मुसलमान आले तेव्हा पूर्व आणि उत्तर हिंदुस्थानांतील समाजाचा बौद्ध धर्मीय जातीच वरिष्ठ आणि वजनदार असा वरचा भाग होत्या. म्हणून त्याच मुसलमानांच्या डोळ्यावर आल्या. त्यांची अशी वाताहत झाल्याबरोबर दुराग्रही ब्राह्मणांनी तत्कालीन शिल्लक उरलेल्या हिंदू राजवटींतून आपलें वर्चस्व वाढविण्याकरिता मुसलमानांच्या छळांतून जिवंत उरलेल्या बौद्ध बहुजनसमाजाला बहिष्कृत करुन कायमचें दडपून टाकिलें. सन १९२१ ऑक्टोबरच्या Dacca Review ( 'डाक्का रिव्ह्यू') नांवाच्या मासिकाच्या अंकांत हरप्रसाद शास्त्री पुन: लिहितात की, "ज्यांना हल्ली डिप्रेस्ड क्लासेस असें लेखण्यात येतें, त्या जाती एकेकाळीं बंगाल्यात राज्य करीत असलेल्या - नव्हे साम्राज्य भोगीत असलेल्या बौद्ध जातींचेच अवशेष आहेत... नेपाळांतल्या दाखल्यावरुन असें दिसतें की बंगाल्यांतील आजचे तिरस्कृत वर्ग कांही शतकांपूर्वी बौद्धधर्मी असून तेव्हा ते हिंदूधर्मीयांशी जोराची स्पर्धा करीत असावेत. मुसलमानी स्वारीचा धक्का ह्यांनाच अधिक जाणवला ह्याचें कारण बौद्ध हे राज्यकर्ते होते आणि ब्राह्मण वाचले ह्यांचें कारण त्यांना त्या वेळीं कसल्याही प्रकारचें महत्व नव्हते.' शास्त्री महाशय स्वत: ब्राह्मण असूनही ते जोराजोराने आज गेले ३० वर्षें हा आपला सिद्धांत प्रतिपादन करीत आहेत. नेपाळांतील त्यांचा दाखला विशेष रीतीने लागू पडतो, तो असा की, "तेथील बौद्धधर्मीयांचे राज्य गुरखे नांवाच्या हिंदु क्षत्रियांनी बळकाविल्यावर तेथील ब्राह्मण आणि क्षत्रिय वृत्तीचे लोक तेवढे सारे हिंदू बनून बाकी उरलेल्या व्यापारी, कारागीर आणि श्रमोपजीवी जाती एक जात जशाच्या तशाच बौद्धधर्मीय उरल्या आहेत. त्याचप्रमाणे बंगाल्यांत नेपाळच्याही वर मजल गेली आहे. म्हणजे वरिष्ठ वर्ग मुसलमान अथवा हिंदू बनून उरलेल्या वैश्य, शूद्र जाती अनाचरणीय, बहिष्कृत आणि तिरस्करणीय झाल्या आहेत. ते खरोखरीच हीन नसून केवळ ब्राह्मणांच्या दृष्टीने अंत्यज आहेत." शास्त्री महाशयांचा हा सिद्धांत खरा असून ध्यानांत घेण्याजोगा आहे. बंगाल्यांत जो अत्याचार ब्राह्मणांना मुसलमानांच्या वावटळीत करता आला तो अत्याचार द्राविड देशांत जैन राजांना बाटवून तेथील शैवाचार्यांनी केला, ह्या कर्नल ऑल्कॉट यांच्या झणण्याला विजयनगर कॉलेजमधील दोन ब्राह्मण अध्यापकांकडून अर्ध्या अधिक पुराव्याचें पाठबळ मिळत आहे. पूर्वीच्या दोन युगांतील प्रकार घडला असेल तसा असो. पण बुद्धोत्तरकालीन ह्या तिस-या युगांत मात्र केवळ दडपशाहीनेच अस्पृश्यतेच्या पेवांत आजकालची भली भयंकर भर पडली हें उघड दिसतें.


आधुनिक युग डोळ्यांसमोरच आहे. आता ह्या डोळस युगांत मागील पापांचे नुसते संशोधनच नव्हे तर निश्चित गणनाहि दर दहा वर्षांला सार्वजनिक खर्चाने चालू आहे. ह्या शिरगणतीच्या रिपोर्टावरुन ह्या भरतखंडाचा निव्वळ सहावा हिस्सा अस्पृश्य ठरला हें जगजाहीर झालें आहे. हा सहावा हिस्सा एकदम आणि पूर्वीपासून स्वयंसिद्ध नसून तो कोणत्या कोणत्या टप्प्यांनी बनत आला आहे, हें उपलब्ध प्रमाणांनी संक्षेपत: व ढोबळ मानाने निर्दिष्ट करण्याचा वर प्रयत्न करण्यांत आला आहे.


पुढील ६ व्या प्रकरणात ब्रह्मदेशांतील अस्पृश्यांची काय स्थिती आहे तें पाहूं.