शिंदे, विठ्ठल रामजी (Maharshi Vitthal Ramji Shinde)

महाराष्ट्रातील अस्पृश्यतानिवारण कार्यातील थोर समाजसुधारक, ब्राह्मधर्म प्रचारक, संशोधक व लेखक. त्यांचा जन्म कर्नाटक राज्यातील जमखंडी या संस्थानच्या गावी खानदानी मराठा कुटुंबात २३ एप्रिल १८७३ झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजीबाबा व आईचे नाव यमुनाबाई. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह आत्याची मुलगी रुक्मिणी हिच्याशी झाला. घराण्याची पूर्वापार श्रीमंती गेल्यामुळे वडील रामजीबाबा हे संस्थानामध्ये काही काळ शिक्षकाची व कारकुनी स्वरूपाची नोकरी करीत होते. ते पंढरपूरचे वारकरी होते. आई सात्त्विक वृत्तीची होती व घरातील वातावरण जातिभेदाला थारा न देणारे होते.

जमखंडी येथील इंग्रजी शाळेतून १८९१ साली ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले व १८९३ मध्ये पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात पुढील शिक्षणासाठी दाखल झाले. विठ्ठल रामजींची धाकटी बहीण जनाबाई हिचा तिच्या सासरी छळ होऊ लागल्यामुळे तिलाही त्यांनी पुण्यास आणून हुजूरपागा शाळेत घातले. श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्याकडून मिळणारी कर्जाऊ शिष्यवृत्ती व खाजगी शिकवण्यांची अल्पस्वल्प मिळकत यांवर काटकसरीने राहून १८९८ मध्ये ते बी.ए. झाले. १८९५ साली अमेरिकन युनेटिरियन मिशनरी रेव्ह. जे. टी. संडरलंड यांच्या व्याख्यानामुळे एकेश्वरमताचा परिचय होऊन तसेच माक्स म्यूलर यांचे ग्रंथ वाचून त्यांची आंतरिक धर्मप्रेरणा प्रबळ झाली. एकेश्वरवादी प्रार्थनासमाजातील न्या. रानडे, रा. गो. भांडारकर, का. बा. मराठे यांच्या विचारांचा व सहवासाचा त्यांच्यावर प्रभाव पडून १८९८ मध्ये त्यांनी प्रार्थनासमाजाची दीक्षा घेतली. त्याचवर्षी ते कायद्याच्या पदवी परीक्षेचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी मुंबईस गेले. मुंबई येथील प्रार्थनासमाज व कोलकात्याचा ब्राह्मो समाज यांनी शिंदे यांची शिफारस केल्यावर ब्रिटिश अ‍ॅण्ड फॉरिन असोसिएशनने त्यांची ऑक्सफर्ड येथील मँचेस्टर कॉलेजात धर्मशिक्षणासाठी निवड केली. १९०१ ते १९०३ ही दोन वर्षे त्यांनी मँचेस्टर कॉलेजात तौलनिक धर्मशास्त्र, पाली भाषा व बौद्ध धर्म, ख्रिस्ती धर्मसंघाचा इतिहास, समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास केला. भारतात येण्यापूर्वी १९०३ च्या सप्टेंबरमध्ये अ‍ॅमस्टरडॅम येथे भरलेल्या त्रैवार्षिक आंतरराष्ट्रीय उदारधर्म परिषदेस ब्राह्मो समाजाचे भारतातील प्रतिनीधी म्हणून उपस्थित राहून ‘हिदुस्थानातील उदारधर्म’ या विषयावरील निबंध त्यांनी सादर केला. १९०३ च्या अखेरीस मुंबई प्रार्थनासमाजाचे धर्मप्रचारक म्हणून त्यांनी कार्यास आरंभ केला.

धर्मप्रचारकार्यात त्यांनी आपली कल्पकता व आपले संघटन कौशल्य दाखवले. पोस्टल्अ मिशन, उदारधर्मग्रंथ वाचनवर्ग, तरुण ब्राह्मोसंघ हे उपक्रम सुरू केले. मुंबई व मुंबईबाहेरील प्रार्थनासमाजात शेकडो धर्मपर व्याख्याने दिली. प्रार्थनासमाजाच्या सुबोधपत्रिका या मुखपत्रात सातत्याने धर्मविषयक लेखन केले. शिंदे यांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मिशन स्थापून धडाडीने चालविलेले काम तसेच त्यांची राजकारणविषयक जहाल मते मुंबई प्रार्थनासमाजातील धुरीणांना पसंत नसल्याने प्रार्थनासमाजचे प्रचारक म्हणून असलेला त्यांचा संबंध १९१० मध्ये संपुष्टात आला. त्यानंतरदेखील त्यांचे धर्मकार्य चालूच राहिले. १९२३ मध्ये मंगळूर येथे ब्राह्मो समाजाचे आचार्य म्हणून कार्य केले. १९२८ मध्ये पुण्यास कौटुंबिक उपासना मंडळाची स्थापना करून ते चालविले. १९३३ पासून वाई येथील ब्राह्मो समाजाच्या धर्मविषयक कार्यात ते सहभागी होत राहिले. जीवनाच्या अंतापर्यंत ते एकनिष्ठ ब्राह्म होते.