अस्पृश्यतानिवारक संघ

हिंदुस्थानांतील सर्व लोकांमध्यें राजकारणाची जागृति होऊं लागली.  अशा वेळीं ह्या मिशनला कोणत्याही राजकीय पक्षाशीं तादात्म्य न पावतां केवळ तिर्‍हाईत दृष्टीनें मागासलेल्या लोकांच्या हितसंबंधाचा पुरस्कार करणें भाग पडलें.  हें राजकारणाचें काम मिशनच्या शैक्षणिक कामापासून निराळें ठेवून स्वतंत्र रीतीनें चालविणें इष्ट होतें.  त्यासाठीं एक निराळीच सहकारी संस्था काढणें जरूर पडलें.  म्हणून त्यासाठीं पुणें येथें अखिल भारतीय अस्पृश्यतानिवारक संघ (All India Untouchability League) ही संस्था स्थापण्यांत आली.  तिच्या द्वारें अस्पृश्यांसंबंधी वेळोवेळीं जे राजकीय प्रश्न निघत, त्यांचा विचार आणि पुरस्कार करणें बरें पडेल म्हणून हा स्वतंत्र संघ काढला.

मिसेस् बेझंट  :  या वेळीं डी. सी. मिशनकडे कित्येक राष्ट्रीय पक्षाच्या प्रमुख पुढार्‍यांचें लक्ष वेधलें होतें आणि ते मिशनची वर्गणी देऊन कळकळीचे सभासदही झाले होते.  याचें कारण मुंबई आणि पुणें या ठिकाणीं राष्ट्रकार्यवाहकांचें ऐक्य व्हावें आणि बहुजनसमाज आणि अस्पृश्यांनीं ह्या ऐक्यांत भाग घ्यावा म्हणून वरील संघानें केलेले प्रयत्‍न होत.  ह्या सुसंधीचा फायदा घेऊन सर्व पक्षांची आणि विशेषतः अस्पृश्य वर्गाच्या पुढार्‍यांची एक अखिल भारतीय परिषद मुंबईला घडवून आणण्याचा मी प्रयत्‍न करूं लागलों.  १९१७ सालच्या अखेरीस कलकत्ता येथें जें काँग्रेसचें अधिवेशन भरलें त्याचें अध्यक्षस्थान मिसेस् बेझंट ह्या बाईंनीं स्वीकारलें होतें.  ह्या थोर बाईंनीं डी. सी. मिशनची मुंबईतील परळ येथील शाखा व वसतिगृहाचें काम स्वतः डोळ्यांनीं पाहिलें होतें.  म्हणून काँग्रेसमध्यें अस्पृश्यतानिवारणाचा एक ठराव आणावा म्हणून मीं त्यांना निकराची विनंती केली होती.  ह्यापूर्वी मी सतत १० वर्षे अशा प्रकारची विनंती काँग्रेसला केली असतांही तिची दाद लागली नव्हती.  थिऑसॉफिस्टांनीं मद्रासकडे अस्पृश्यांसाठीं पुष्कळ काम केलें होतें.  ह्या बाईंच्या वजनामुळें माझ्या विनंतीस मान देऊन हा ठराव काँग्रेसनें प्रथमच पास केला.  

काँग्रेसचा ठराव  :  ठराव  :- ही राष्ट्रीय सभा हिंदुस्थानांतील सर्व लोकांस अशी जाहीर विनंती करते कीं, अस्पृश्यवर्गावर आजपर्यंत जो अनन्वित जुलूम होत आहे तो ताबडतोब बंद करण्यांत यावा.  हा ठराव मद्रासचे जी. ए. नटेशन् यांनीं मांडला.  कलकत्त्याचे एस. आ. बमनजी यांनीं त्यास अनुमोदन दिलें.  पुण्याचे रा. एस. के. दामले आणि कालिकतचे मि. मंजेरी रामय्या यांनीं पुष्टी दिली.  हा ठराव सर्वानुमतें पास झाला.  ह्यानंतर मोठमोठ्या राष्ट्रीय मंडळींनीं मिशनच्या कामांत सक्रीय भाग घेण्यास सुरुवात केली.

अस्पृश्यतानिवारक परिषद  :   ता. २३ मार्च १९१८ रोजीं श्रीमंत सयाजीरावमहाराज यांच्या अध्यक्षत्वाखालीं अखिल भारतीय अस्पृश्यतानिवारक परिषदेला सुरुवात झाली.  चौपाटीजवळील फ्रेंच ब्रिजनजिकच्या पटांगणांत भव्य मंडप घालण्यांत आला होता.  हिंदुस्थानांतील प्रमुख पुढार्‍यांना आमंत्रणें गेलीं होतीं.  स्वागत मंडळाचे अध्यक्ष सर नारायणराव चंदावरकर आणि सभासद ना. सी. व्ही. मेहता, ना. व्ही. जे. पटेल, ना. बेळवी, बाबू बिपिनचंद्र पाल, एस. आर. बमनजी, जमनादास द्वारकादास, पी. के.तेलंग, आर. जी. प्रधान, लक्ष्मीदास तेरसी, बॅ. जयकर, भुलाभाई देसाई, डॉ. साठ्ये, वेलकर वगैरे बडी बडी मंडळी प्रामुख्यानें झळकत होती.  सभेचें काम ता. २३, २४, २५ असें तीन दिवस झालें.

पहिल्या दिवशीं सुमारें ५००० तर तिसरे दिवशीं ७००० चे वर इतकी चिक्कार गर्दी जमली होती.  त्यांत अर्ध्याहून जास्त अस्पृश्य स्त्री-पुरुष यांची भरती होती.  स्वागताध्यक्ष सर नारायणराव यांनीं फार कळकळीचें भाषण केलें.  ते म्हणाले,- ''इतिहास आपणांस असें सांगतो कीं, ज्यापासून राष्ट्राचा विकास होतो अशा सर्व प्रकारच्या प्रागतिक चळवळींचा उगम थोड्यांशा व्यक्तींच्या कार्यांतच आढळतो.  प्रस्तुतच्या बाबतींत त्या व्यक्ति म्हणजे ज्यांची प्रथम प्रथम अत्यंत हेटाळणी झाली ते डी.सी. मि. चे कार्यकर्ते होत.  त्यांच्या कार्यानें प्रचंड हिंदुसमाजाची सदसद्विवेकबुद्धि जागृत झाली.''  भाषण संपवितांना सर नारायणरावांनीं निरनिराळ्या संस्थानिकांचा - विशेषतः गायकवाडसरकारांचा - आपापल्या संस्थानांत अस्पृश्योद्धारार्थ केलेल्या कार्याबद्दल आभारपूर्वक उल्लेख केला.  नंतर श्रीमंत सर सयाजीराव महाराजांनीं अध्यक्षस्थान स्वीकारलें.  त्यानंतर जनरल सेक्रेटरींनीं सर्व हिंदुस्थानांतून अभिनंदनाच्या ज्या तारा आल्या त्या वाचून दाखविल्या.  महात्मा गांधी, डॉ. रवीन्द्रनाथ टागोर, करवीर मठाधिपति शंकराचार्य वगैरेंच्या तारा प्रमुख होत्या.  द्वारकापीठाच्या शंकराचार्यांकडून एक विलक्षण तार आली होती.  त्यांत ''सर सयाजीरावमहाराज, रा. वि. रा. शिंदे हे आधुनिक काळांतील महान् कलिपुरुष आहेत'' म्हणून त्यांचा तीव्र निषेध केला हाता.  त्यानंतर श्रीमंत सर सयाजीरावमहाराजांचें विचारपरिप्लुत असें भाषण झालें.

प्रमुख ठराव  :  सभेचा पहिला मुख्य ठराव बॅ. जयकर यांनीं मांडला :- ''निकृष्ट वर्गावर लादलेली अस्पृश्यता यापुढें ताबडतोब काढून टाकण्यांत यावी आणि या कार्यासाठीं प्रत्येक प्रांतांतील वजनदार व विचारी कार्यकर्त्या पुढार्‍यांनीं एक अस्पृश्यतानिवारक जाहीरनामा काढून निकृष्ट वर्गांस शाळा, दवाखाने, न्यायकचेर्‍या, सार्वजनिक खर्चानें चालविलेल्या सर्व सार्वजनिक संस्थांत तसेंच विहिरी, तळीं, म्युनिसिपालिटीचे नळ अशा सार्वजनिक पाणवठ्यांस, व्यवहाराचीं व करमणुकीचीं ठिकाणें व देवालयांसारख्या सार्वजनिक ठिकाणीं कोणत्याही प्रकारें प्रतिबंध न राहतां पूर्ण मोकळीक करून द्यावी असें ह्या परिषदेचें मत आहे.''  अशा प्रकारच्या जाहिरनाम्याचा मसुदा करून त्यावर राष्ट्रांतील पुढार्‍यांच्या सह्या घेण्याचा अधिकार मिशनच्या जनरल सेक्रेटरीस देण्यांत आला.  मसुद्याच्या शेवटीं वरील ठरावांत सांगितल्याप्रमाणें अस्पृश्यतानिवारणाचे कामीं जाहीरनाम्याचे खाली सही करणार्‍यांनीं व्यक्तिशः जबाबदारी घेण्याचें कलम मुख्य व महत्त्वाचें होतें.  हेंच कलम ह्या परिषदेच्या कार्याचें मुख्य लक्षण होतें.  ह्या ठरावास मुंबई आर्य समाजाचे प्रचारक पं. बाळकृष्ण शर्मा ह्यांनीं अनुमोदन दिलें.  हा ठराव श्रीमंत सर सयाजीरावांनीं सभेपुढें मांडल्यावर तो सर्वानुमतें पसार झाला.

श्रीमंत सर सयाजीरावमहाराजांच्या प्रकृतीला स्वास्थ्य नव्हतें.  वातामुळें गुडघे दुखत असतांही परिषदेला हजर राहून त्यांनीं आतांपर्यंत काम केलें.  त्यानंतर त्यांना मुळींच बसवेना म्हणून सभेची परवानगी घेऊन ते निघून गेले.  त्यांच्या जागीं सर नारायणरावांची योजना झाली.  त्यानंतर दुसरा ठराव सभेपुढें आला.  निकृष्ट वर्गावर लादलेले धार्मिक निर्बंध ज्या वेळीं नाहीसे होतील त्याच वेळीं त्यांच्या उन्नतीचें कार्य अत्यंत झपाट्यानें व यशस्वितेनें पार पडेल.  याकरितां ही सभा हिंदु धर्मसंस्थाधिपतींकडून खालील कामें करून घेत आहे :  (१) अस्पृश्यता नाहींशी करण्याकरितां धार्मिक आज्ञापत्रें काढणें.  (२) हिंदु धर्मावरील अस्पृश्यांची श्रद्धा दृढ करण्याकरितां धर्मशिक्षक नेमून त्यांच्यांत हिंदु धर्मतत्त्वांचा फैलाव करणें.  (३) हिंदु लोकांकडून पाळल्या जाणार्‍या सर्वसाधारण धार्मिक समारंभांत भाग घेण्याची अस्पृश्यांना परवानगी देणें.  हा ठराव पास करतांना जमनादास द्वारकादास यांनीं गुजराथींतून भाषण केलें.  त्यांच्यानंतर श्री. बिपिनचंद्र पाल यांनीं टाळ्यांचा जयघोषांत ठरावाला अनुमोदन दिलें.  गुजराथेंतील धेड जातीचे धर्मगुरु महंत मोहनदास यांनीं उपरोक्त ठरावास पुष्टी दिल्यावर हा ठराव सर्वानुमतें पास झाला.

व्यंगचित्र :  बक्षीससमारंभ हा या परिषदेचा शेवटचा कार्यक्रम होता.  मंडप इतका गच्च भरून गेला होता कीं, पुष्कळांना जागेच्या अभावीं बाहेर उभें राहावें लागलें होतें.  जमलेल्या प्रचंड समुदायापैकीं ३४ तरी अस्पृश्यांपैकीं होता.  समारंभाचें अध्यक्षस्थान लेडी लक्ष्मीबाई चंदावरकर यांनीं स्वीकारलें होतें.  त्यांनीं आपलें भाषण थोडक्यांत व सहानुभूतीचें केलें.  जनरल सेक्रेटरींनीं त्यांचे आभार मानले.  हा तीन दिवसांचा अपूर्व समारंभ आटोपल्यावर वर्तमानपत्रकारांनीं ह्या कार्याचें निरनिराळ्या रीतीनें अभिनंदन केलें; पण 'जागरूक'कारांनीं (रा. वालचंद कोठारी) मात्र या परिषदेस ''रा. वि.रा. शिंद्यांची सर्कस'' ह्या नांवाखालीं एक व्यंगचित्र देऊन निरनिराळ्या पक्षांच्या पुढार्‍यांनीं निरनिराळ्या प्राण्यांचीं रूपें धरून परिषदेंत कशीं कामें केलीं हें दाखविलें होतें.

सही नाहीं  :  ह्यानंतर लवकरच परिषदेंतच्या जाहीरनाम्याचा मसुदा तयार करण्यांत आला.  त्याच्या शेंकडों छापील प्रती प्रांतोप्रांतींच्या पुढार्‍यांकडे सह्यांसाठीं पाठविण्यांत आल्या.  त्यांत मुख्य विशेष हा कीं, मसुद्याखालीं जाड्यां टाइपांत टीप होती.  टीप :-  ''मी खाली सही करणार ठरावांतल्या अटी स्वतः अक्षरशः पाळीन आणि मी स्वतः हरप्रयत्‍न करून दुसर्‍याकडूनही त्या पाळल्या जातील असे प्रयत्‍न सतत करीन.''  जवळजवळ ३०० च्या वर सर्व प्रांतांच्या ठळक ठळक पुढार्‍यांच्या सह्यांच्या स्वाक्षर्‍या मिळविण्यांत आल्या.  पहिली सही कविसम्राट् डॉ. रवींद्रनाथ टागोर यांची पडली.  परंतु सांगण्यास खेद वाटतो कीं, लो. टिळकांची सही कांहीं केल्या मिळेना.  ती देण्यास त्यांच्या अनुयायांकडून त्यांना संमती मिळेना.  नवलाची गोष्ट ही कीं, हे अनुयायी आपल्या सह्या देऊन चुकले होते.  जणूं काय त्यांच्या प्रमुखानें सही दिली नाहीं तर त्यांतच सर्व पक्षाची इज्जत शिल्लक राहणार होती !  एवढी एक गोष्ट सोडून दिल्यास राष्ट्रीय सभेच्या कामीं आणि अस्पृश्यतानिवारण्याच्या कामीं लो. टिळकांनीं मोठ्या मोकळ्या मनानें सारखी देवाण-घेवाण शेवटपर्यंत चालविली होती.  त्याचें एक ठळक उदाहरण आठवतें.

लोणावळें येथील परिषद  :  १९१७ सालीं कलकत्त्याच्या काँग्रेसच्या अधिवेशनाच्या ठरावानंतर त्या शहरीं पुढें ज्या प्रांतिक व जिल्हानिहाय राजकीय परिषदा भरूं लागल्या त्यांतून कलकत्त्यांतील ठरावाचा व मुंबईस भरलेल्या अखिल भारतीय अस्पृश्यतानिवारक परिषदेंत लो. टिळकांनीं मांडलेल्या ठरावाचा अनुवाद होऊं लागला.  पुढें लवकरच लोणावळें येथें जिल्हा राजकीय परिषद भरली होती.  आमंत्रणावरून मीही तेथें हजर होतों.  सभेंतील स्वराज्याचा मुख्य ठराव मीं स्वतः पुढें मांडावा अशी परिषदेची इच्छा दिसली.  मीं स्पष्ट सांगितलें कीं, ''अस्पृश्यतानिवारणाचा ठराव या परिषदेनें एकमतानें पास करून घ्यावा म्हणजे मीही स्वराज्याचा ठराव आनंदानें पुढें मांडीन.''  माझे मित्र प्रसिद्ध मद्यपाननिषेधक रा. शंकरराव लवाटे यांनीं माझ्या म्हणण्यास विरोध केला.  त्या वेळीं 'केसरी' पक्षांतील सगळे तरुण पुढारी माझ्या बाजूला आले व म्हणूं लागले, ''रा. लवाटे ह्यांच्याशिवाय बहुतेक मंडळी माझ्या मताला अनुकूल दिसतात, म्हणून मीं स्वराज्याचा ठरावा मांडावा.''  मीं नम्रपणें सांगितलें, ''अस्पृश्यतानिवारणाचा ठराव एकमतानें पास होण्यांतच विशेष आहे.  असा महत्त्वाचा ठराव काँग्रेसच्या मुख्य अधिवेशनांत एकमतानें पास झाला असतांना जिल्हा परिषदेंत तो नुसत्या बहुमतानें पास होणें म्हणजे राष्ट्रानें माघार घेण्यासारखें आहे.  शिवा त्यांत राष्ट्रीय सभेची शिस्तही मोडते.''  अशी भवति न भवति चालून हा प्रश्न सभेपुढें दुपारच्या अधिवेशनांत यावा असें ठरलें.  कांहीं केल्या तडजोड होईना. लो. टिळक सभेच्या बाहेर कांहीं कामांत गुंतले होते.  त्यांच्याकडे रा. लवाटे यांना नेण्यांत आलें.  टिळकांनीं पोक्त विचार करून अखेरचा सल्ला दिला कीं, ''धर्माची सबब काढून अस्पृश्यतानिवारण्याचे कामीं कुचराई करण्याचा काळ गेला आहे.  रा. शिंदे यांना अनुकूल करून घेऊन स्वराज्याचा ठराव एकमतानें पास करून घ्यावयाचा असेल तर त्यांचा अस्पृश्यतानिवारणाचा ठरावही एकमतानेंच पास झाला पाहिजे.  हें जर रा. लवाटे यांना पटत नसेल तर त्यांनीं अस्पृश्यतानिवारणाचे ठरावावर मतें घेतांना मंडप सोडून जावें हें इष्ट.  या सभेला यश यावें.''  त्याप्रमाणें लवाट्यांनीं मान्य केल्यावर वरील दोन्ही ठराव सभेंत एकमतानें पास झाले.

नागपूरचें शिष्टमंडळ  :  मागें सांगितल्याप्रमाणें मिशनच्या कामाला हिंदुस्थानांतील निरनिराळ्या पक्षांचे पुढारी आणि अखेर राष्ट्रीय सभा यांचें सहकार्य मिळालें.  सरकारची सहानुभूति आणि मिशनशीं सहकार्य हीं या पूर्वीच मिळालेलीं होतीं. यासंबंधी मुंबई सरकारनें सर्वांत आघाडी मारली हें वर आलेंच आहे.  याचें कारण मिशनचा आरंभ मुंबईलाच झाला व तेथून प्रांतोप्रांतीं वाढ सुरू झाली.  नागपूरची शाखा संघटित रूपानें स्थापित झाल्यावर १९१६-१७ च्या सालीं त्या वेळचे नागपूरचे चीफ कमिशनर सर रॉबर्टसन (प्रांताधिपति) यांच्याकडे एक शिष्टमंडळ नेण्यांत आलें.  त्याचे मुख्य सर मोरोपंत जोशी हे होते.  ह्या प्रांतांत अस्पृश्य मुलांची संख्या जरी बरीच शिकत होती तरी मुंबईतील मुलांप्रमाणें त्यांना स्वतंत्र शाळा नव्हती.  अनुभव घेऊन पाहण्याकरितां कांहीं नमुनेदार शाळा सरकारनें चालवाव्यात अशी शिष्टमंडळानें मागणी केली.  ह्या मिशनच्या शाळा व वसतिगृहें नागपूर, अकोला व यवतमाळ वगैरे ठिकाणीं होतीं.  त्यांना सरकारनें खास सवलती आणि पुरेशी मदत द्यावी अशी दुसरी मागणी होती.  महारांच्या वतनाची जी जुनी संस्था होती ती आतां निरुपयोगी ठरत असल्यानें व ती चालू असेतोंपर्यंत अस्पृश्यतानिवारणास प्रतिबंध होत आहे असा अनुभव आल्यानें ही वतनसंस्था बंद करून रोख नेमणुका द्याव्यात अशी तिसरी मागणी होती.  ह्या वतनासंबंधीं वर्‍हाड व नागपूर प्रांतांत मोठी चळवळ चालू होती.

सर रॉबर्टसनसाहेबांनीं शिष्टमंडळाचें मोठ्या प्रेमानें स्वागत केलें व त्यांच्या मागणीचा उदारपणें विचार करूं असें आश्वासन दिलें.  ह्या वेळीं एक मजेदार गोष्ट घडून आली तिचा उल्लेख करणें बरें होईल.

रंगपंचमीचा अनुभव  :  हे दिवस शिमग्याच्या सणाचे होते.  महाराष्ट्रांत आमच्या मिशनच्या विद्यमाने निरनिराळ्या जिल्ह्यांतून होलिकासंमेलनाचा थाटानें समारंभ करून होळींतील अत्याचारांना आळा घालण्याचा प्रयत्‍न केला जात असे व त्यांत यशही बरेंच येत चाललें होतें.  ह्या वेळीं मी नागपुरांत असल्यामुळें तेथील टाऊनहॉलमध्यें होलिकासंमेलनाची जाहीर सभा बोलावण्याचा मीं घाट घातला.  ह्या सभेचें अध्यक्षस्थान सर मोरोपंत जोशी यांनी स्वीकारलें.  प्रसंग नवीन असल्यामुळें गांवांतील बरीच पुढारी मंडळी हजर होती.  गर्दीही बरीच जमली होती.  सुशिक्षित समाजावर बराच परिणाम झाला.  पण बहुजनसमाजाचें मन अजून तयार झालें नव्हतें.  सभा बरखास्त होऊन मंडळी घरोघर गेल्यावर मी सायकलवर बसून पांचपावली येथें मिशनच्या ठिकाणीं जाण्यास निघालों.  दिवस रंगपंचमीचा असल्यानें भर बाजारांत दोन प्रहरीं रंगाची दंगल चालली होती.  गाड्यांवर रंगांचे हांडे भरून आल्या-गेल्यावर रंगाच्या पिचकार्‍या सुटत होत्या.  जाहीर सभेचा उपद्व्याप मींच केला असल्यामुळें लोकांच्या डोळ्यांवर मी आलों होतों.  बाजाराच्या मुख्य वेशीच्या खालीं माझी सायकल आल्यावर कांहीं टोळभैरवांनीं मला सन्मानानें पकडलें.  ''महाराज, तुम्ही मोठे सुधारक आमच्या गांवीं आलां आहांत.  तुमची योग्य संभावना करणें हें आमचें कर्तव्य आहे.''  असे म्हणून रंगाच्या बालड्यांन् बालड्यां भरून त्यांनीं मला नखशिखांत न्हाऊं घातलें.  मला सायकलवरून खालीं देखील उतरूं न देतां चौघा धठिंगणांनीं मला सायकलवरच रंगस्नान घातलें.  सर्व कपडेच नव्हेत तर शरीरसुद्धां रंगानें भिजून चिंब झालें.  स्नानविधि चालू असतां होळीचा अर्वाच्य ध्वनि दुमदुमू लागला.  इतक्या थाटानें लग्नांतसुद्धां माझें स्नान झालें नव्हतें !  स्वदेशबांधवांच्या लीला म्हणून मीं कौतुकानें हंसत हंसत हा सर्व प्रकार सहन केला.  शेवटीं मंडळींनीं परवानगी दिल्यावर तशाच स्थितींत मी बिर्‍हाडीं परत आलों.  म्हणजे सर्व गांवांत माझी वरातच निघाली म्हणायची !

दुसरेच दिवशीं गव्हर्नमेंट हाउसमध्यें आमचें शिष्टमंडळ जावयाचें होतें.  माझ्या एकुलत्या एका चांगल्या पोषाखाची अशी शोभ झाल्यामुळें प्रांताधिपतींकडे कसें जावयाचें याची मला पंचाईत पडली.  सर मोरोपंत जोशांच्याकडे हा सविस्तर निरोप पाठवून कोट, फेटा आणि धोतर मागविलें.  कपड्यांची सोय कशीबशी झाली; पण रंग पक्का असल्यामुळें तोंड, केंस व हातपायांना तो इतका चिकटला होता कीं, साबण संपला तरी रंग कांहीं जाईना.  शेवटीं नाइलाजानें तसाच गव्हर्नमेंट हाउसमध्यें गेलों.  शिष्टमंडळाचें काम सुरू होण्यापूर्वी आपल्या दिवशीं बाजारांत झालेल्या 'स्वागत समारंभाची' हकीकत मी कमिशनरसाहेबांच्या कानांवर घातली.  त्यांच्या प्रांतांतील लोकांच्या प्रेमळ पाहुणचाराचा संदेश मी ज्या ज्या प्रांतांत जाईन तेथें आनंदानें कळवीन असें मीं सांगितलें.  कमिशनरसाहेब पोट धरधरून हांसले.  मोठ्या सावधगिरीनेंच त्यांनीं माझ्याशीं हस्तांदोलन केलें.  आदल्या दिवसाचे अध्यक्ष सर मोरोपंत जोशी आपल्या मोटारींतून घरीं गेलें म्हणून वांचले.  नाहीं तर त्यांनाही प्रसाद मिळून आजचें शिष्टमंडळ 'रंगीत शिष्टमंडळ' म्हणून इतिहासांत गाजलें असतें.