१९२० सालातील निवडणूक

लॉर्ड साऊथबरो यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानात आलेल्या फ्रँच्याइज कमिटीने आपला अहवाल ब्रिटिश पार्लमेंटला सादर केला. सदर अहवालाच्या संदर्भात आपले मत, प्रतिक्रिया आणि शिफारशी हिंदुस्थान सरकारने भारमंत्र्यांना कळविल्या व अखेरीस पार्लमेंटने मतदारसंघाची निश्चिती करून राखीव तसेच सर्वसाधारण मतदारसंघ जाहीर केले. जाहीर करण्यात आलेल्या योजनेनुसार मराठा व तस्तम जाती असा एक गट करण्यात आला व त्यांच्यासाठी मुंबई इलाख्यात सात जागा राखून ठेवण्यात आल्या. मराठा व तत्सम जाती या नव्या वर्गीकरणात मराठा, कुणबी, माळी, कोळी, भंडारी, शिंपी, लोहार, कुंभार, धनगर, भोई इत्यादी जातींचा स्पष्ट नामनिर्देश करून समावेश होईल असे स्पष्ट केले. ह्या नव्या योडनेनुसार नोव्हेंबर १९२० मध्ये निवडणुका होतील असेही सरकारने जाहीर केले.


विठ्ठल रामजी शिंदे यांनी निवडणुकीत जातीय तत्त्व आणण्याच्या कल्पनेला १९१७ पासूनच जाहीरपणे विरोध केलेला होता. त्यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या राष्ट्रीय मराठा संघाने आयोजित केलेल्या शनिवारवाड्यापुढील १६ डिसेंबर १९१७च्या सभेत सर्व जातींच्या प्रतिनिधींनी एकमुखाने राष्ट्रसभेच्या लखनौ येथे ठरलेल्या धोरणाला पाठिंबा दिला होता व राजकीय सुधारणेबाबत अथवा होमरूलबाबत आपली एकोप्याची भूमिका प्रकट केली होती. शिंदे यांच्या या भूमिकेला पुण्यातील मातब्बर मराठा नेत्यांचा पाठिंबा होता. त्यामध्ये त्र्यंबक हरी आवटे, काशिनाथ ठकुजी जाधव, नारायण गुंजाळ, बॅ. व्ही. एम्. पवार हे प्रमुख होते व राष्ट्रीय मराठा संघाचे ते प्रमुख कार्यकर्ते होते. तारीख १० व ११ नोव्हेंबर १९१७ रोजी बेळगाव येथे व-हाडातील बॅ. रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतवासी मराठा परिषद भरली. विठ्ठल रामजी शिंदे यांचाही या परिषदेला पाठिंबा होता. ह्या परिषदेमध्ये मराठा जातीसाठी स्वतंत्र अथवा राखीव जागा असू नयेत असेच मत प्रकट केले होते. विठ्ठल रामजी शिंदे यांचीच भूमिका बडोदा येथील जागृतीचे संपादक भगवंतराव पाळेकर हे मांडीत होते.


मात्र मराठा जातीसाठी लीगने मराठा राष्ट्रीय संघाच्या विरुद्ध भूमिका मांडावयास सुरुवात केली. शाहू छत्रपतींनी १९१७ सालच्या अखेरीस खामगाव येथे भरलेल्या अकराव्या मराठा शिक्षण परिषदेत बोलताना निदान दहा वर्षे आम्हाला जातवार प्रतिनिधी निवडून देण्याचा अधिकार असला पाहिजे अशी जाही मागणी केली. ब्रिटनमधील संसद सदस्यांना जातवार प्रतिनिधित्वाच्या मागणीपाठीमागची भूमिका पटवून देण्यासाठी मराठा लीगच्या वतीने श्री. भास्करराव जाधव १९१९च्या जुलैमध्ये इंग्लंडला गेले होते. प्रत्यक्ष इंग्लंडमध्ये गेल्यावर भास्करराव जाधवांच्या भूमिकेत पालट झाला. तरी त्यांनी संयुक्त संसदीय समितीसमोर साक्ष देताना मुंबई इलाख्यातील कायदेमंडळावर एकंदर शेकडा तीस जागा मराठा वगैरे मागासवर्गाच्या प्रतिनिधींसाठी राखून ठेवाव्यात असे प्रतिपादन केले. ब्राह्मणेतर पक्षाचे पुढारी व डेक्कन रयत असोसिएशनचे अध्यक्ष प्रतिनिधी वा. रा. कोठारी यांनीही जातवार प्रतिनिधित्वाची भूमिका आपल्या निवेदनातून मांडली होती. साऊतबरो कमिटीच्या अहवालातही मराठ्यांना जातवार प्रतिनिधित्व का असावे याबद्दलची कारणमीमांसा नमूद केली आहे. “अस्पृश्यवर्गाशिवाय ज्यांना जातवार प्रतिनिधित्व देण्याचा विचार करावा असा वर्ग म्हणजे मराठ्यांचा समाज. मराठ्यांच्या बाजूने असे म्हणणे शक्य आहे की शिखांबाबत स्वतंत्र जागा देण्यासंबंधी जो युक्तिवाद केला जातो तो मराठ्यांनाही लागू आहे. म्हणजे अनेक जिल्ह्यांत एकंदर लोकसंख्येत त्यांची बहुसंख्या आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यावर ब्राह्मणी वर्चस्व इतके दांडगे आहे की जेथे त्यांची बहुसंख्या आहे तेथेसुद्धा ते स्वजातीचा प्रतिनिधी निवडून आणू शकत नाहीत. मात्र एकंदर लोकसंख्या आणि महत्त्व यांचा विचार करता त्यांना प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक आहे. हे प्रतिनिधित्व त्यांच्यासाठी जातवार मतदारसंघ निर्माण करून अथवा सर्वसाधारण मतदारसंघात जातवार जागा राखून देता येऊ शके.” कमिटीने हेही नमूद केले आहे की मराठा समाजाच्या आकांक्षा जर सफळ झाल्या नाहीत तर गंभीर स्वरूपाचा असंतोष निर्माण होण्याची भीती आहे. ह्या भूमिकेला विरोधी असणारे दुसरे मत म्हणून मुसलमानांप्रमाणे मराठ्यांचा विचार करता येत नाही असेही नमूद केले आहे. मराठ्यांना जातवार जागा देण्यात प्रमुख अडचण म्हणजे मराठा या संज्ञेची व्याप्ती निश्चत करणे कठीण असल्याचे तिसरे मतही कमिटीने नमूद केले आहे.१


मराठा जातीच्या प्रतिनिधित्वासंबंधी एवढे उलटसुलट विचारमंथन झाल्यावर अखेरच्या निर्णयात मात्र सरकारने मराठा व तत्सम जातींसाठी सात जागा राखून ठेवल्या.
नोव्हेंबर १९२० मध्ये निवडणुका होणार हे जाहीर झाल्यानंतर पुण्यातील मराठा समाजाच्या दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा उत्साह दाखविला व निवडणुकीच्या संदर्भात जेधे मॅन्शनमध्ये एक सभा बोलावली. ह्या सभेस विठ्ठल रामजी शिंदे यांना आग्रहपूर्वक बोलावणे केले होते. आगामी निवडणुकीमध्ये शिंदे यांनी उमेदवार म्हणून उभे राहावे असे दोन्ही पक्षांच्या मंडळींनी आग्रहपूर्वक सांगितले. शिंदे यांनी याप्रसंगी मी राखीव जागेसाठी उभा राहणार नाही. त्यातील जातिवाचक तत्त्वाच्या मी विरुद्ध आहे असे ठामपणे सांगितले. मात्र पुणे शहराच्या सर्वसाधारण जागेसाठी सर्व पक्षांनी मिळून मदत करावयाची ठरवल्यास आपण निवडणुकीस उभे राहण्यास तयार आहोत, असे सांगितले.


१९२० पर्यंत सक्रिय राजकारणातून सदैव दूर राहणा-या विठ्ठल रामजी शिंद्यांनी कायदेमंडळाच्या निवडणुकीत भाग घ्यावयाचे जे ठरविले, त्यापाठीमागे काहीएक कारमे संभवतात. माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा जाहीर झाल्यापासून हिंदुस्थानातील राजकारणाचे चित्र बदलले होते. वेगवेगळ्या स्तरावरील जातीच्या लोकसमाजामध्ये राजकीय आकांक्षा निर्माण होऊ लागल्याचे स्पष्टपणाने दिसून येऊ लागले. याचे अनेक बरेवाईट परिणाम सामाजिक जीवनातही दिसून येऊ लागले.


अस्पृश्य मानलेल्या वर्गालाही ह्या नव्या राजकीय घटनेचा लाभ व्हावा, असे शिंदे यांना वाटत होते. सभा-परिषदा घेऊन त्यांच्यामध्ये सर्वांगीण जागृती करण्याचे कामही शिंदे यांनी चालविले होते. बदललेल्या वातावरणात अस्पृश्यवर्गामध्ये काही एका प्रमाणात राजकीय जागृती झाल्याची चिन्हे दिसत होती. मात्र त्याचबरोबर आपल्या लोकांसाठी शिंदे यांनी स्थापन केलेली संस्था आपण आपल्या ताब्यात घ्यावी व शिदे यांचे नेतृत्व सर्वस्वी झुगारू द्यावे, अशा प्रकारचा प्रयत्न अस्पृश्यवर्गातील काही मंडळींकडून सुरू झाल्याचे शिंदे यांना जाणवू लागलेले होते. अस्पृश्यवर्गीय पुढा-यांचा विरोध वाढतच जाणार अशी चिन्हे त्यांना दिसू लागली तेव्हा आतापर्यंत आपण अस्पृश्यवर्गाची उन्नती हेच जे कार्यक्षेत्र मानले होते व संघटित स्वरूपात आपण त्यांच्यासाठी संस्थात्मक पातळीवरून जे काम केले ते तसेच चालू ठेवण्यास स्वारस्य नाही. लवकरच ही संस्था त्या मंडळींच्या ताब्यात द्यावी. असे शिंदे यांनी मनोमन ठरविले असणार. अस्पृश्यवर्गाची सेवा ही तर त्यांची जीवननिष्ठा बनून राहिली होती. यापुढे कायदेकौन्सिलात जाऊन ह्या वर्गाची सेवा करत आली तर पाहावे, असा विचार त्यांच्या मनात आला असणे शक्य आहे.


अस्पृश्यवर्गाच्या जोडीनेच समाजातील शेतकरी, स्त्रिया यांसारके वर्ग मागासलेले आहेत व त्यांचीही स्थिती सुधारणे आवश्यक आहे, असेही त्यांना वाटले असावे. बहुसंख्य असलेल्या मराठावर्गामध्ये राष्ट्रीय स्वरूपाच्या जाणिवा निर्माण करणेही त्यांना आवश्यक वाटले होते वत्या दृष्टीने त्यांनी मराठा राष्ट्रीय संघ स्थापन करण्याच्याबाबतीत पुढाकार घेतला होता. त्या निमित्ताने मराठा समाजातील कर्तबगार नेते त्यांच्याजवळ आले होते.


सक्रिय राजकारणात भाग घेऊन देशकार्य करावे असे त्यांच्या जर मनात आले, तर काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळवावी असे त्यांना का वाटले नाही? बहुजन पक्ष असा स्वतंत्र जाहीरनामा काढून स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्यापाठीमागे विठ्ठल रामजी शिंदे यांची वैचारिक भूमिका असणार. स्वराज्या मिळविणे हा काँग्रेसचा निकडीचा प्रश्न होता. हे स्वराज् अथवा स्वातंत्र्य मिळविल्यावर देशाची भावी घटना कशी असावी ह्या प्रश्नामध्ये काँग्रेसने लक्ष घातले नव्हते. त्याबद्दल काँग्रेसला विशेष आस्था असल्याचेही जाणवत नव्हते. त्यांच्या ददृष्टीने काँग्रेसमधील जहाल व मवाळ हे ध्येयावरून नव्हे, तर पद्धतीवरून पडलेले भेद होते. तेव्हा स्वराज्य मिळाले तरी दलित, शेतकरी, स्त्रिया इत्यादी दुर्बल समाजघटकांची दाद काँग्रेसकडे सत्ता आली तरी लागेलच अशी शिंद्यांना खात्री नव्हती. म्हणून विद्या, सत्ता, संपत्ती यांनी आचवलेल्या व म्हणून दुर्बल राहिलेल्या बहुजन जमाजातील विविध गटांचा कैवार घेणारा बहुजन पक्ष या नावाने जाहीरनामा काढून आपली भूमिका विशद करून निवडणूक लडवावी असे विठ्ठल रामजी शिंदे यांनी ठरविले असावे. आपण राजकारणात का भाग घेत आहोत यासंदर्भात आपली भूमिका कोणती आहे हे प्रकट व्हावे यासाठी शिंदे यांनी ‘बहुजन पक्ष’ ह्या नावे आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. शिंदे यांचा जाहीरनामा पुढीलप्रमाणे होताः


बहुजन पक्ष
हिंदुस्थानातील एकंदर लोकसंख्येचे केवळ राजकीयदृष्ट्या दोन मुख्य भाग पडत आहेत. ते हे की, (१) विद्याबल, द्रव्यबल किंवा अधिकारबलाने पुढारलेला वर्गा आणि (२) दुसरा, यातील कोणतेच बल अंगी नसल्याने व नाइलाजाने मागासलेला वर्ग किंवा बहुजन समाज. ह्या दुस-या वर्गातच अत्यंत तिरस्कृत अशा अस्पृश्यवर्गाचा अंतर्भाव होतो. हल्लीच्या राजकीय सुधारणेचा अरुणोदय होतो न होतो तोच या दोन भागांत मोठा विरोध भासू लागला आणि या विरोधानुसार बहुजन समाजाचा अथवा मागासलेल्या वर्गाच एक नवीन पक्षच होऊन चुकला आहे. ह्यालाच ब्राह्मणेतर पक्ष असे नाव दिले जाते. पण नाइलाज आणि बलहीनता ही जी मागासलेल्या वर्गाची मुख्य लक्षणे ती ह्या वर्गाच्या पक्षास ब्राह्मणेतर पक्ष असे जातिविशिष्ट नाव दिल्याने अगदी काटेकोर रीतीने सार्थ होत नाही. म्हणूनच ह्या नवीन पक्षास बहुजन पक्ष असे जातिविशिष्ट नाव दिल्याने अगदी काटेकोर रीतीने सार्थ होत नाही. म्हणूनच ह्या नवीन पक्षास बहुजन पक्ष अथवा जनपद पक्ष असे अगदी सार्थ व निर्विकल्प नाव दिल्याने त्यावर कसलाही आक्षेप आणण्यास जागा उरणार नाही.


कार्यपद्धती : हा नवीन पक्ष इतरांशी स्वतंत्रपणाने वागणारा आहे. तरी जेथे त्याच्या हितसंबंधाचा प्रश्न उभा राहील तेथे तेथे समानतेचा दर्जा संभाळून जी कोणी व्यक्ती असो की पक्ष असो त्याला सक्रिय साहाय्य करण्यास तयार असेल त्याच्यासाठी तेवढ्यापुरते सहकार्य करायला हा पक्षही तयार राहील. कारण ह्या पक्षाच्या पायाखाली केवल पोकळ भावना नसून भरीव हितसंबंध आहेत. ह्या पक्षात खालील वर्ग मोडतात.


पहिला, शेतकरीवर्ग : ह्यात डोईजड जमीनदारांचा किंवा पिढीजात जहागीरदारांचा समावेश मुळीच होत नाही. जो आपल्या मालकीचे अथवा कौलाचे शेत आपणच वाहतो आणि त्या कामासाठी पुरेशा मजुरांना समान दर्जाने योग्य वेतन देऊन संभाळतो तोच शेतकरी जाणावा.


दुसरा, शिपाईवर्ग : ह्यात सरदारांची गणना मुळीच नाही. पण सामान्य शिपायाने हितसंबंध आमच्या पक्षाशीच राखले पाहिजेत. कारण ते मागासलेलेच आहेत. कुणबी हा ह्या सर्वांचा खरा पोशिंदा आणि मोठमोठे ऐतखाऊ जमीनदार व जहागींरदार हे केवळ त्याचे पोष्य होत. तसेच हाताव शिर घेऊन लढणारा एकांडा शिलेदार हाच खरा क्षत्रिय, तो केवळ पट्टेवाला चपराशी नव्हे.


तिसरा, शिक्षकवर्ग : ह्यात सोवळे शास्त्री, हक्कदार, पुरोहित किंवा बलुते जोशी हे किंवा इतर ऐतखाऊ यांची गणना करत येत नाही. वाङमयाचे किंवा उद्यमाचे व्यावहारिक शिक्षण देण्याला जे कोणी लायक आहेत व जे आपल्या वृत्तीचा पिढाजात हक्क न सांगता बाजारभावाप्रमाणे चालू वेतन घेण्यास तयार आहेत त्यांची जात धर्म काही असो, त्यांचे हितसंबंध ह्या पक्षाने राखणे जरूर आहे.


चौथा, उदमी : सुतार, सोनार, शिंपी, तेली, तांबोळी, गवळी इत्यादी लहान लहान धंदे करून राष्ट्राची सेवा करणारे जे अशिक्षित व अनधिकारी वर्ग आहेत तेही राष्ट्राचे धारक असून त्यांचा दर्जा शेतकरी किंवा शिपाई यांपेक्षा रतिभरही कमी नाही.


पाचवा, दुकानदार : ह्यात व्याज देऊन दुस-याचे भांडवल वळवून आणून त्यावर गबर होणारे पेढीवाले किंवा कंपनीवाले वर्ज्य आहेत. परंतु उदमी लोकांच्या व मजुरांच्या साहाय्याने जी राष्ट्रीय संपत्ती शेतक-याने निर्माण केली व शिपायांनी राखली तिची देशभर वाटणी होण्याला बिनव्याजी भांडवलवाल्या दुकानदारांची तितकीच जरुरी आहे. हा वर्ग डोईजड होऊन बहुजन समाजाचे रक्त बिनहक्क शोषणार नसेल तर ह्यालाही पुढे आणण्यासाठी आमच्या पक्षाने झटणे अवश्य आहे.


सहावा, मजूरवर्ग : ह्यात बाजारभावाप्रमाणे वेतन घेऊन अंगमेहनत करणारेच नव्हेत तर बद्धिचातुर्य लढवणारे वकील, डॉक्टर यांचाही समावेश होण्याचा संभव आहे. परंतु हा दुसरा वर्ग आपल्या विद्याबळामुळे आपल्या गरजेपेक्षा जास्त धनसंचय करून अधिकारपदावरही सहजच जाऊन बसतो. इतकेच नव्हे तर आपल्या विद्येच्या व चळवळी स्वभावाच्या जोरावर बहुजन समाजाचे पुढारीपणही बहुतेक हिस्से त्याच्याच वाट्याला येते. असे लोक तत्त्वतः मजून असले तरी वस्तुतः मागासलेले नसल्यामुळे त्यांच्या हितसंबंधांची जबाबदारी त्यांच्यावरच टाकणे बरे. बाकी उरलेल्या ख-या अंगमेहनती मजुरांची दाद आमच्या पक्षाशिवाय इतर कोठेच लागणे शक्य नाही. मजूरही डोईजड झाल्यास त्यांची समजूत करण्याचा अधिकार बहुजन पक्षालाच आहे.


सातवा, अस्पृश्यवर्ग : अस्पृश्यपणामुले हा वर्ग मागासलेलाच आहे; एवढेच नव्हे तर चिरडला गेला आहे. धर्माची, परंपरेची, रूढीची अगर दुसरी बहुजन समाजात एकजीव करणे हे ह्या पक्षाचे केवळ पवित्र कार्य आहे. पुष्कळशी संधी वायफळ वादात, ढोंगी ठरावात व मतलबी सहानुभूतीत अगोदरच दवडली गेली असल्यामुळे ह्या वर्गातील व्यक्तींना साहजिकच भलतेच वळण लागू लागले, म्हणून आमच्या पक्षाने सावध राहिले पाहिजे.


आठवा, स्त्रीवर्ग : चालू राज्यक्रांतीत आमच्या देशातील स्त्रीवर्गाच्या हाती काहीच लाभले नाही. आमचा पक्ष विद्वानांचा नाही; वक्त्यांचा नाही; ओरडणा-यांचा नाही, म्हणून तो स्त्रीवर्गाला विसरणारा आहे असे थोडेच होणार आहे? स्त्रीवर्ग म्हणजे तर आमचा पाळणा. त्यांची हयगय करू तर पाळण्यातच आमचे थडगे डोलू लागेल. हे आम्ही पूर्ण जाणून आहोत.


येथवर आम्ही केवळ वर्गवारीने हितसंवर्धनाचै निरीक्षण केले. पण ज्यांची वर्गवारी मुळीच करता येत नाही असे पुष्कळ हितसंबंध आहेत. सक्तीच्या शिक्षणाचा, मद्यपाननिषेधाचा, धार्मिक विधी व सामाजिक परंपरा पाळण्याच्या बाबतीत स्वयंनिर्णयाचा इत्यादी कोणताही पक्ष घ्या. हे सर्व राष्ट्रीय असूनही स्वतःस ‘राष्ट्रीय’ म्हणवून घेणाराच पक्ष जेव्हा त्यांच्या आड येतो आणि ‘प्रागतिक’ म्हणवून घेणारा आपले हात टेकतो तेव्हा बहुजन समाजास जागे करून त्याला स्वतःच्या पायावर उभे करण्याचे कठीण काम करण्यासाठी आमच्यासारख्या एखाद्या स्वतंत्र व नवीन पक्षाला पुढे येणे जरूर आहे. राष्ट्रहिताची ज्याला चाड असेल त्याच्या हिताला आमचाही विरोध नसेल. ते सर्व आम्हांला सामील होतील, निदान साहाय्य तरी करतील अशी आम्हांला उमेद आहे.”२

विठ्ठल रामजी शिंदे
नानाची पेठ, भोकरवाडी, पुणे
१ सप्टेंबर १९२०


समाजामधील अस्पृश्यवर्ग, शेतकरीवर्ग, स्त्रीवर्ग तसेच इतर मागासलेले वर्ग ह्या सा-यांची उन्नती करण्याबद्दल विठ्ठल रामजी शिंदे यांच्या मनात अतीव तळमळ होती. सामाजिक पातळीवरून विशेषतः अस्पृश्यवर्गाची सेवा करण्याचा आतापर्यंत तळमळीने प्रयत्न केला होता. प्रत्यक्ष राजकाणात प्रवेश करून व कायदेमंडळावर प्रतिनिधित्व करून ह्या सा-या मागासवर्गाची सेवा अधिक परिणामकारक रीतीने करता येईल काय हे शिदे यांना पाहावयाचे होते असे दिसते. अस्पृश्यवर्गाची उन्नती करण्यासाठी आतापर्यंत केले त्यापेक्षाही अधिक प्रयत्न जारीने करणे आवश्यक आहे त्यांना वाटत होते. अस्पृश्यवर्गाबद्दल त्यांना वाटणारी आस्था तिळमात्र कमी झालेली नव्हती अशी वस्तुस्थिती असली तरी गेल्या दोन-तीन वर्षांपासून मिशनबद्दल व खुद्द शिंदे यांच्याबद्दल केवळ तक्रारीचाच नव्हे तर टीकेचा सूर अस्पृश्यवर्गातून शिकलेल्या तरुणांकडून आणि काही पुढा-यांनकडून तीव्रपणे उमटू लागला होता. कदाचित या कारणांनीही असेल. अस्पृश्यवर्गाबद्दलची उन्नती करण्याची आपली भूमिका व प्रयत्न कायम ठेवून कायदेमंडळात जाऊन आपल्या कार्याचे क्षेत्र अधिक विस्तृत करावे व लोकप्रतिनिधी म्हणून अस्पृश्यांसकट अन्य मागासवर्गाची सेवा करावी, त्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी झटावे असे शिंदे यांना वाटले असावे व म्हणूनच त्यांनी निवणुकीस उभे राहण्याची आपली तयारी दाखविली असावी.


निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याच्या प्रारंभिक अवस्थेत राष्टवादी मराठे तसेच सत्यशोधकी अथवा ब्राह्मणविरोधी मराठे ह्या दोन्ही पक्षांनी शिंदे यांच्या उमेदवारीस जोराच पाठिंबा दर्शविला खरा, परंतु हे चित्र शेवटपर्यंत तसेच टिकून राहिले नाही. ह्यामध्ये दिसून आलेली मतमतांतरे व भूमिकांमधील पालट चित्तव्धक म्हणावेत अशा प्रकारचे दिसून आले. पुण्याच्या ह्या जागेसाठी श्री. न. चिं. केळकर हे जहालांमार्फत, शेठ मानूरकर हे मवाळांमार्फत आणि वासुदेवराव गुप्ते व विठ्ठल रामजी शिंदे हे दोघे स्वतंत्र असे चार उमेदवार उभे होते. विठ्ठल रामजी शिंदे यांनी लिहिले आहे की, “पैकी वासुदेवराव गुप्ते यांना कोल्हापूरचे श्रीमंत शाहू छत्रपती यांचा पूर्ण पाठिंबा होता. स्वतः महाराज आणि त्यांचे दिवाण रा. ब. सबनीस हे पुण्यास येऊन राहिले होते.” शिंदे यांनी असे जरी नमूद केलेले असले तरी निवडणूकीच्या प्रारंभी श्रीमंत शाहू छत्रपतींनी विठ्ठल रामजी शिंदे यांना पाठिंबा प्रकट केला होता. शिंदे यांनी इलेक्शनला उभे राहण्याचे ठरवल्यानंतर शाहूमहाराजांना समाधान वाटले. ते त्यांनी पुढील पत्रातून प्रकट केले.


आपण आम्हा सर्वांचे विनंतीस मान देऊन इलेक्शनला उभे राहण्याचे कबूल केले याबद्दल आम्हास आपले उपकार वाटत आहेत. आपल्यासारखे योग्य पुरुष मराठा समाजाला काय तर कोणत्याही समाजाला लाभले तर फारच उत्तम आहे. इलेक्शनच्या कामी माझ्या हातून जी सेवा होईल ती मोठ्या आनंदाने करीन.

शाहू छत्रपति३


विठ्ठल रामजी शिंदे यांना मदत करण्यासाठी त्यांचे बडोद्याचे मित्र श्री. खासेराव जाधव पुण्यास दोन महिने येऊन राहिले होते व निवडणुकीच्या खर्चाची जबाबदारी त्यांनी स्वतः उचलली होती. विठ्ठल रामजी शिंदे यांनी पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली भवानी पेठेत सभा भरली होती. या सभेमध्ये आपली बाजू मांडण्यासाठी श्री. न. चिं. केळकर यांनी भाषण केले त्यात त्यांनी आपले वाडवडील शेतकरी होते. आपण मराठा पत्राचे संपादक आहोत म्हणून मराठेच आहोत असे सांगितले. ही बातमी ऐकल्यानंतर श्रीमंत शाहूमहाराजांनी स्वतःच्या सहीने विठ्ठल रामजी शिंदे यांना पत्र पाठविले ते असे:


रायबाग कँप
रा. रा. विठ्ठल रामजी शिंदे ह्यांस
सप्रेम लोभाची वृद्धी असावी ही विनंती.
मला मनापासून आपले अभिनंदन करण्याची परवानगी द्या. आपण शहरातर्फे निवडून यावे अशी माझी आशा आहे. नरसिंह चिंतामण केळकर म्हणतात की “मी मराठा आहे म्हणून मला निवडून द्यावे. कारण मी मराठा वर्तमानपत्र चालवितो.” त्याच्यावर मी म्हणतो की, माझ्या बैलाचे नाव ‘ब्रिटानिया’ ठेवले आहे, माझ्या आवडत्या घोड्याचे नाव ‘टर्किश फ्लॅग’ ठेवले, माझ्या गायीचे नाव ‘जपानिका’ ठेवले म्हणून का मी जपानी अगर टर्की लोकांचा पुढारी होणे योग्य होईल? वि. रा. शिंदे मराठेवर्गापैकी आहेत. जपानातील सामुराई वर्गाने (क्षत्रिय) आपले उच्च स्थान सोडून सर्व लोकांस आपल्या बरोबरीचे केले व देशोन्नती केली तसे शिंद्यांनी केले आहे. मी पुण्यास लवकर येणार आहे. भेटीअंती सर्व खुलासा होईल. परमेश्वर आपणास इलेक्ट करो.


ता. क. जहाल असो किंवा मवाळ असो, जपानी असो की टर्किश असो आमचे धोरण असेच की, ज्यात जनतेचे धोरण त्याशी आम्ही सहाय्य करणेचे व आमचा पक्ष स्वतंत्रच रहावयाचा. सत्य पक्षाशी नेहमी सहाय्य करण्याचे हेच ना आम्ही ध्येय ठेवण्याचे? ह्यात काय चुकत असल्यास लिहून कळवावे. आपण वृद्ध अनुभवशीर आहात म्हणून मी आपल्या उपदेशाची अपेक्षा करीत आहे.


ता. क. आम्ही कोणातच मिळू इच्छित नाही. सत्य असेल तेथे मिसळल्याशिवाय राहणार नाही. हेच ना आम्ही मुलांनी ध्येय ठेवायचे? लोभ करावा ही विनंती.
शाहू छत्रपति४


छत्रपती शाहूमहाराजांनी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबद्दल अतीव आदराची भावना प्रकट केली व निवडणुकीत त्यांना यश लाभावे याबद्दलही पत्रामधून शुभेच्या प्रकट केल्या, मात्र श्रीमंत शाहू छत्रपती शाहूमहाराजांनी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबद्दल अतीव आदराची भावना प्रकट केली व निवडणुकीत त्यांचा यश लाभावे याबद्दलही पत्रामधून शुभेच्या प्रकट केल्या, मात्र श्रीमंत शाहू छत्रपतींची ही भूमिका अखेरपर्यंत टिकून राहिली असे मात्र दिसत नाही. ह्या संदर्भात एक घटना नोंद घेण्याजोगी घडली असे दिसते. या निवडणूकीच्या धामधुमीच्या काळात श्री शिवाजी मराठा सोसायटीची एक सभा भवानी पेठेतील पालखीच्या विठोबाच्या धर्मशाळेत ३ ऑक्टोबर १९२० रोजी भरली होती. काही दिवसांपूर्वीच कोल्हापुरास क्षात्रजगदगुरूच्या निर्मितीची कल्पना उदित झाली होती. या बाबतीत मराठा समाजातले लोकमत आजमावून पाहावे असे शाहू छत्रपतींना वाटत होते. सभेच्या प्रारंभी श्री. शिवाजी मराठा सोसायटीच्या विद्यार्थ्यांचे कसरतीचे व लाठीकाठीचे खेळ झाल्यावर संस्थेचे सेक्रेटरी श्री. बाबुराव जगताप यांनी संस्थेचा अहवाल वाचला. छत्रपतींनी जो मराठा क्षात्रजगदगुरू नेमण्याचा विचार चालवला होता ह्या संदर्भात तेथे जमलेल्या प्रमुख मंडळींनी आपले विचार मांडावेत असे आवाहन केले. ह्या बाबतीत रा. ब. वंडेकर यांचे भाषण झाले. त्यानंतर विठ्ठल रामजी शिंदे यांनीही आपली भूमिका मांडावी असे शाहू छत्रपतींनी सुचविल्यानंतर शिंदे म्हणाले, “धार्मिकबाबतीत काही वाद निघाल्यास त्यात अखेरचे मत अभिषिक्त राजाने द्यावे अशी परंपरा पहिल्या शाहूमहाराजापासून आहे, असे इतिहास सांगतो. आता छत्रपती शाहूमहाराजांनी दुस-या कोणास जगदगुरू न नेमता त्याचे सर्व अधिकार आपणच चालवावेत.” विठ्ठल रामजी शिंदे यांची भूमिका ही त्यांच्या प्रार्थना अथवा ब्राह्मसमाजाच्या भूमिकेशी सुसंगत अशीच होती. परमेश्वर आमि भक्त यांच्यामध्ये कोणीच मध्यस्थ असू नये ह्या भूमिकेचे हे मतप्रतिपादन स्वाभाविक पर्यवसान होते. मराठ्यांचे अभिमानी असणा-या मंडळींना अथवा तीव्र स्वरूपाचा ब्राह्मणविरेध असणा-या मंडळींना शिंदे यांची भूमिका पटणारी नव्हती. शिंदे यांच्यानंतर भास्करराव जाधव यांचे आवेशयुक्त भाषण झाले. जाधवांच्या भाषणातील एका विधानावर मुंबईचे श्री. रामचंद्र अर्जुन गोळे यांनी आक्षेप घेतला. त्यावर गोंधळ माजून सभेत प्रत्यक्ष मारामारीस सुरुवात झाली. अशा स्थितीतही खासेराव जाधवांनी श्री. शाहू छत्रपतींचे आभार मानून सभा विसर्जन केल्याचे जाहीर केले. ह्या मारामारीत श्री. बाबुराव जेझे व गं. मु. काळभोर यांना बराच मार बसला. जागृतीकार पाळेकरही ह्या सभेला उपस्थित होते, परंतु त्यांच्या डोक्यावर बडोद्याचे पागोटे असल्यामुळे ते परस्थ आहेत या समजुतीने मारामारीतून बचावले.”५


ह्या उधळल्या गेलेल्या सभेचा परिणाम शिंदे यांच्या निवडणुकीवर निश्चितपणे झाला. कारण ज्या सर्व पक्षांच्या मराठ्यांनी मिळून त्यांना निवडणुकीसाठी उभे केले होते त्यांच्यामध्येच फूट पडली. राष्ट्रवादी मराठ्यांच्या म्हणजेच शिंदे यांच्या विरोधात सत्यशोधकी विचाराची अथवा ब्राह्मणेतरवादी मराठा मंडळी गेली.


या सुमारास महात्मा गांधींनी कौन्सिलप्रवेशावर बहिष्कार टाकण्याची असहकाराची चळवळ जोरात सुरू केली. म्हणून न. चिं. केळकर यांनी आपली उमेदवारी मागे घेतली व शिंदे यांनाही निवडणुकीत अपयश आले. सत्यशोधकी विचाराच्या मराठ्यांप्रमाणे छत्रपती शाहूमहाराजांची शिंदे यांच्याबद्दलची भूमिका कदाचित ह्या सभेत प्रकट झालेल्या मतामुले बदलली असण्याची शक्यता आहे. कारण छत्रपती शाहूमहाराजांचा पूर्ण पाठिंबा वासुदेवराव गुप्ते यांना होता व स्वतः महाराज व त्यांचे दिवाण रा. ब. सबनीस हे पुण्यास येऊन राहिले होते असे शिंदे यांनी याबाबतीत नमूद केलेले आहे. एवढे खरे की, शाहू छत्रपतींचे ह्या निवडणुकीत साहाय्य मिळाले नाही. मात्र शिंदे यांचे मित्र खासेराव जाधव ह्यांनी या निवडणुकीनिमित्त दोन महिने आपला मुक्काम पुण्यामध्ये ठेवला. शिंदे यांना मते मिळावीत यासाठी घरोघर हिंडण्याचे परिश्रम घेतले व हजारो रुपयांचा खर्च केला. खासेराव जाधवांनी दाखविलेले प्रेम व केलेले कष्ट याबद्दल विठ्ठल रामजी शिंदे यांना त्यांच्याबद्दल अतिशय कृतज्ञता वाटली. पुण्यातील स्थानिक मंडळींपैकी ‘विजयी मराठा’कार श्रीपतराव शिंदे, गंगारामबुवा काळभोर, बाबुराव जेधे व केशवराव जेधे आणि शिंदे यांचे लष्करातील मित्र डॉ. मोदी यांनी जी निष्कामपणे ह्या निवडणुकीत शिंदे ह्यांना मदत केली त्याबद्दलही शिंदे यांना त्यांच्याबद्दल कृतज्ञता वाटली. ह्या निवणुकीत मराठा मंडळींमध्ये पडलेली फूट व मराठा समाजात निर्माण झालेला अंतर्गत पुढील काळात टिकून राहिला.


संदर्भ

१.    दि रिफॉर्म्स कमिटी, Vol.II कलम ६४०४-०६.
२.    वि. रा. शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. ३०६-३०८.
३.    तत्रैव, पृ. ३०९.
४.    तत्रैव.
५.    भगवंत पाळेकर, जागृतिकार पाळेकरः आत्मवृत्त आणि लेखसंग्रह, बडोद, पृ. ४२-४३.

हुजूरपागा शाळा आणि शांता सुखटणकरची करुण कहाणी

पुण्यात आल्यानंतर आणि विशेषतः फिमेल हायस्कूलमधील अभ्यासक्रम पार पाडीत असता­ जनाबाईंना एका नवीन जीवनसरणीचा परिचय झाला. हुजूरपागा ही एक नमुनेदार मुलींची शाळा होती. हे फिमेल हायस्कूल हुजूरपागेच्या जागेत भरत असल्याने शाळेला हुजूरपागा असे नाव पडले. तेथील शिक्षिका आपले काम निष्ठेने करणा-या होत्या. मिस् हरफर्ड यांना मुलींनी सायंकाळच्या वेळी चकाट्या पिटीत बसण्याऐवजी बोर्डिंग समोरच्या जागेत निरनिराळे खेळ खेळावेत, त्यांना व्यायाम घडावा असे वाटत असे. कधी कधी त्याही खेळात भाग घेत असत. त्यांना जात्याच स्वच्छता, टापटीप, आधुनिक पाश्चात्त्य पद्धतीची सभ्यता यांची आवड होती व मुलींनीही तसेच वागावे अशी त्यांची अपेक्षा असायची. जनाबाई ह्या इतर मुलींच्या मानाने वयाने प्रौढ असल्या तरी त्यांच्या ठिकाणी मनाचा मोठेपणा व खिलाडूवृत्ती होती. भिमा मोरे ही दिसावयास अत्यंत कुरूप परंतु बुद्धीने एकदम तल्लख होती. जनाक्काला खेळकर, चेष्टेखोर मुलींबद्दल कौतुक असायचे. गुलाब जव्हेरे, कृष्णाबाई केळवकर, यमुनाबाई केळवकर ह्या त्यांच्या इतर मैत्रिणी. पुढच्या आयुष्यात त्या भेटल्यानंतर भिमा मोरे विनोदी वृत्तीच्या आठवणी काढण्यात रंगून जात असत.

भिमा मोरेप्रमाणेच जनाबाईंना कौतुक वाटायचे ते सई जोशी नावाच्या मुलीबद्दल. ही सडपातळ बांध्याची, हुशार आणि चुणचुणीत अशी तेरा-चौदा वर्षांची परकर घालणारी मुलगी होती. हुजूरपागेच्या वसतिगृहात आपल्या आईसह राहून शिक्षण घेत होती. अमेरिकेला पहिल्या प्रथम गेलेल्या आनंदीबाई जोशी यांची ही पुतणी, (हीच पुढे प्रसिद्ध रॅंग्लर रघुनाथराव परांजपे यांची पत्नी झाली.). सई जोशी आपल्या कुशाग्र बुद्धीमुळे शाळेतील मुलींमध्ये आणि शिक्षिकांमध्ये प्रिय असे. सदानकदा खेळात रमलेली सई अभ्यासातही हुशार व पहिला नंबर न सोडणारी. भिमा मोरेप्रमाणेच ही पण थट्टेखोर स्वभावाची होती. एकदा तर मदरलाच एप्रिल फूल करण्याचा घाट तिने घातला व यशस्वीपणे पार पाडला. सईची खेळकर वृत्ती पुढेही टिकून राहिली. रॅंग्लर परांजपे यांच्याशी लग्न झाल्यानंतर जनाबाईंना त्यांनी आपल्या घरी एकदा निमंत्रित केले असता त्यांच्या तोंडून अप्पा हे नाव येऊ लागले. जनाबाईंनी हे अप्पा कोण? असे सईंना विचारताच “अप्पा होय, अप्पा माझे मित्र आहेत” असे खोडकरपणे उत्तर दिले आणि म्हटलं, “अप्पा, थोडं आत या बघू.” आणि आत आले ते खुद्द रघुनाथरावच होते. हुजूरपागेतील शिक्षण घेण्याच्या काळात जनाबाईंच्या वृत्तीचा मोकळेपणा, आनंदीपणा, खिलाडूपणा प्रकट होत होता. त्याचप्रमाणे जनाबाईंच्या ठिकाणी दुसरी एक गंभीर वृत्ती होती ती व्यापक सहानुभवाची; निरपेक्ष सेवावृत्तीची आणि जबाबदारीची. जनाबाईंच्या आयुष्यात केवळ करुणरसाची मूर्ती अशी एक व्यक्ती आली ती म्हणजे शांता सुखटणकर. तिच्या अनुषंगाने जनाबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचा दुसरा गंभीर पैलू हृदयंगमपणे प्रकट होताना दिसतो.

विठ्ठलरावांच्या मित्रवर्गापैकी कोल्हापूरचे श्री. वासुदेव अनंत सुखटणकर हे एक होते. हे मूळचे कोल्हापूरचे. विठ्ठलराव इंटरमीजिएटच्या वर्गात असताना त्यांची भेट झाली. त्यांच्या सालस स्वभावामुळे विठ्ठलरावांची व त्यांची लगेच मैत्री जुळली. त्यांच्याही घरची अत्यंत गरिबी. १८९८ मध्ये अण्णांनी जनाबाईंना घेऊन मित्रवर्गासमवेत कोल्हापूर, पन्हाळा, विशाळगड अशी सहल केली. विशाळगडास जाताना वासुदेवरांच्या आग्रहास्तव पन्हाळ्यात त्यांच्या बहिणीच्या घरी १-२ दिवस मुक्काम केला. वासु्देवरावांची आई सुंदराबाई ही त्याचवेळी मुलीच्या बाळंतपणासाठी तिथे आली होती. सकाळच्या वेळी वेणीफणी करण्यासाठी एका अडगळीवजा खोलीत जनाबाई गेल्या असता कोप-यात एक वळकटी पडल्याचे त्यांना दिसले. पण त्या वळकटीत हालचाल दिसली व क्षीण आवाजात कोणीतरी कण्हल्याचा आवाज त्यांनी ऐकला. इतक्यात सुंदराबाई पेजेची वाटी घेऊन खोलीत आल्या आणि त्यांच्याकडून खुलासा झाला. ही आजारी मुलगी म्हणजे सुखटणकरांची ११-१२ वर्षांची बहीण शांता. नवज्वराच्या आजारातून ती मरता मरता वाचली आणि पक्षाघाताच्या विकाराने तिच्यावर झडप घातली. पक्षाघाताने तिचे सारे अंग लटलटत होते. मान ठरत नव्हती म्हणून मान धरून आईला पेज भरवावी लागत होती. ती उठणे-बसणे करू शकत नव्हती. डोक्याचे केस  पार गेले होते. तोंडावरून वारे गेल्यामुळे बोलणे नीटसे उमजत नव्हते. असे असूनही मुलगी नाजूक बांध्याची, रेखीव जिवणीची, गौरवर्णाची आणि दहाजणीत उठून दिसणारी आहे असे जनाबाईंना वाटले, तिला ह्या द्यनीय अवस्थेत बघितल्यावर ह्या पोरीचं पुढं कसं होईल, ह्या विचाराने जनाबाईंचे मन ग्रासून गेले. तिच्याबद्दल अंतःकरणात कळवळा उत्पन्न झाला. शांताचे जनाबाईला झालेले हे पहिले दर्शन.

त्यानंतर दोन वर्षांनी १९०० सालच्या सप्टेंबर महिन्यात जनाबाईंनी तिला पाहिले ते स्वतःच्याच घरी जमखंडीस. वासुदेव सुखटणकर सारस्वत जातीचे. त्यांचे वडील एकाएकी वारले. रूढीला अनुसरून आईचे केशवपन करावे असे नातलगांनी ठरविले होते. परंतु विठ्ठलरावांप्रमाणेच वासुदेवरावही सुधारणेचे कट्टे पुरस्कर्ते असल्यामुळे आईच्या केशवपनास त्यांनी हरकत घेतली. आईचे मन वळवून तीस केशवपनापासून परावृत्त केले. तरीदेखील गावात राहून लोकनिंदेचा मारा सहन करण्यापेक्षा अन्यत्र थोडे दिवस राहावे या विचाराने विठ्ठलरावांच्या संमतीने त्यांच्या जमखंडीतील घरातच आपली आई, शांता व धाकटा भाऊ राजाराम अशा त्रिवर्गास ठेवले होते. १९०० सालच्या सप्टेंबर महिन्यात बाबा फार आजारी असल्यामुळे विठ्ठलरावांसमवेत जनाबाई जमखंडीला आल्यावर आपल्याच घरात जनाबाईंनी दुस-यांदा शांताला पाहिले. लुगडे कसेबसे गुंडाळून घेतलेले. नीट चालता, उभे राहता येत नसे. जीभ जड असल्याने बोलणे अडखळतच. प्रतापच्या पाळण्याची दोरी ओढताना पाळण्याअगोदर तिचे हातच लटलटा कापत असत. फार वेळ उभे राहता येत नव्हते. केव्हा मटकन खाली बसेल याचा नेम नसायचा. तिचे तोंड धुणे, हात घासणे, अंग धुणे ही सारी कामे तिच्या आईलाच करावी लागत असत.

सुंदराबाई ह्या कर्त्यासवरत्या सुशिक्षित मुलाचा आग्रह म्हणून सोवळ्या झाल्या नव्हत्या. तरी पण ती गोष्ट त्यांच्या मनाला बरीच लागून राहिली असावी. त्या आतल्या आत कुढत असाव्यात. उपासतापासाच्या सबबीखाली स्वतःच्या प्रकृतीची बुध्याच हेळसांड करून इहलोकीचे आपले आयुष्य शक्य तितक्या लवकर संपुष्टात आणण्याचा त्यांचा प्रयत्न चालला होता, अशीच जनाबाईंची कल्पना झाली. नवरा वारलेली, घरची अत्यंत गरिबी. केवळ नाइलाज म्हणून सहा-सात महिन्यांसाठी आपण दुस-याकडे राहत आहोत ही जाणीव ठेवून त्यांचे सर्वांशी वागणे असे. १९०१ साली विठ्ठलराव विलायतेस शिक्षणासाठी गेल्यानंतर त्यांचे मित्र गोविंदराव सासने आणि वासुदेवराव सुखटणकर हे जनबाईंच्या शाळेत अधूनमधून येत व विचारपूस करून जात असेच, एकदा आले असता वासुदेवरावांनी आपल्या आईचा मृत्यू झाल्याची बातमी जनाबाईंस सांगितली. जनाबाईंना त्यांच्या आईच्या निधनापेक्षा शांताच्या पुढील असाध्य, परावलंबी, लाजिरवाण्या जीवनाची भयानकताच अधिक जाणवू लागली. थोड्याच दिवसांनी वासुदेवरावांची गाठ पडताच शांतेला हुजूरपागेत ठेवावे असे त्यांनी वासुदेवरावांस सुचविले. डॉ. भांडारकरांचा परिचय असल्यामुळे व शाळेचे तेच अध्वर्यू असल्यामुळे ते शक्य होईल, असाही निर्वाळा त्यांनी दिला आणि शांतेची जबाबदारी कोण घेणार, ह्या प्रश्नाला जनाबाईंनी निर्धाराने उत्तर दिले, “शांतेला हुजूपागेत राहण्याची परवानगी मिळाली तर तिची सारी जबाबदारी माझ्याकडे लागली. मग तुम्ही चिंता सोडा. असं समजा, मीच तिची आई.” डॉ. भांडारकरांनी परवानगी दिली. लेडिज सुपरिटेंडेंट मिस सोराबजी यांना होकार देणे प्राप्त झाले आणि अशा रीतीने शांता जनाबाईंजवळ वसतिगृहात आली.

खरे तर जनाबाई स्वतःच दुःखमय अशा परिस्थितीत होत्या. परंतु त्यांना शांतेचे जीवन किती कष्टात, दुःखपूर्ण, परावलंबी व लाजिरवाणे आहे हे जाणवून ही मुलगी आपल्यापेक्षाही दुर्दैवी आहे, असे वाटत होते. जनाक्काचे मन शांतेबद्दल करूणेने अपरंपार भरून आले. शांतेचा सांभाळ करण्याचा जनाबाईंचा विचार कोणालाही फारसा पसंत पडला नव्हता. मिस् सोराबजींना तर त्यांच्याबद्दल काहीसा रागच आला होता. खुद्द आई-बाबांनाही जनाबाईंचे करणे पसंत नव्हते.  मैत्रिणींनी तर त्यांना मूर्खातच काढले. परंतु शांतेची संपूर्ण जबाबदारी आपण घ्यावी, तिची सेवाशुश्रूषा करावी असा पक्का निर्धार जनाबाईंनी केला होता.

शांताच्या हातापायाच्या दुर्बळ स्नायूंना कामाचा सराव जितका होईल तेवढा लाभदायक ठरेल असे डॉक्टरांचे मत होते. प्रथम प्रथम जनाबाई  तिचे तोंड धुण्यापासून सगळी कामे करीत असत. वेळ मिळेल  तेव्हा शांताच्या हाताला धरून बागेत हिंडावे, तिला घेऊन जात्यावर दळत बसावे, मुसळ हातात घेऊन मसाला वगैरे कुटत बसावे ही कामे करण्याचा उपक्रम क्रमशः चालू ठेवला. थोड्या दिवसांतच तिच्यात सुधारणा दिसू लागल्यावर जनबाईंचा उत्साह दुप्पट झाला. आंघोळीच्या वेळेस सर्वांगास तेल लावून चोळणे, रात्री तिच्या हाताच्या बोटांना तेलाने चोळणे इत्यादी कामे जनाबाई करीत असत. आधी पंगतीमध्ये लहान मुलाप्रमाणे घास भरवावा लागे. थोड्याच दिवसांमध्ये श्रमाचे चीज झाल्याचे दिसून येऊ लागले. शांताच्या प्रकृतीत समाधानकारक सुधारणा दिसू लागली. ती आपली कामे स्वतःच करू लागली. न अडखळता चालू लागली. पुढे पुढे तर ती इतकी सुधारली की आपल्या हुशारीने वर्गातल्या परीक्षेत तिने बराच वरचा क्रमांक पटकावला. शांता अभ्यासातच नव्हे तर इतर अनेक बाबतीत एकसारखी प्रगती करू लागली. अक्षर तर ती इतके वळणदार व सुंदर काढी की त्याचा नमुना म्हणून वर्गशिक्षक इतर मुलींपुढे ठेवत असत. शिवाय कामातही तिची प्रगती प्रशंसनीय होती. सा-या शाळेत तिचा बोलबाला झाला. लेडिज सुपरिटेंडेंट मिस् सोराबजींना शांता म्हणजे आपल्या शाळेचे भूषणच वाटे. जे प्रतिष्ठित व सन्मान्य गृहस्थ शाळा पाहण्यास येत, त्यांच्यापुढे शांताला उभी करून “पक्षाघाताच्या विकाराने शारीरिक दुर्बलता पावलेल्या मुलीने आपल्या हिमतीवर मोठ्या प्रयासाने अभ्यासात, शिक्षणक्रमात, चित्रकलेत अनपेक्षित प्रगती केलेली असून तिच्या प्रगतीचे सारे श्रेय ह्या मुलीकडे आहे,” असे म्हणून जनाबाईंनाही शांताच्या बरोबर सर्वांस दाखविले जाई. एकदा बडोद्याचे श्रीमंत सयाजीराव महाराज यांनी शाळेस भेट दिली असता लेडिज सुपरिटेंडेंटनी शांताबरोबर जनाबाईंचीही नेहमीप्रमाणे माहिती करून दिली आणि म्हटले की, “या मुलीचा भाऊ नुकताच धर्माभ्यासाचे उच्च शिक्षण घेण्यासाठी विलायतेस रवाना झाला आहे.” ते ऐकताच महाराज कौतुकाने जनाबाईंकडे पाहू लागले. कारण विठ्ठल रामजींना कॉलेजच्या शिक्षणासाठी, त्याचप्रमाणेच विलायतेस जाण्याच्या खर्चासाठी आधार दिला होता तो सयाजीराव महाराजांनीच. शांता ही जनाबाईंच्या सेवाशुश्रूषेमुळेच आजारातून उठून माणसात आली हे सयाजीरावांना कळल्यावर फार आनंद झाला. ‘आपण ज्या होतकरू विद्या्र्थ्यास इंग्लंडला पाठविण्यास आर्थिक साहाय्य दिले त्याची बहीणदेखील लोकोपयोगी कृत्य करण्यात तत्पर आहे तर’, असे कौतुकाचे आणि गौरवाचे उद्गार त्यांनी लेडिज सुपरिटेंडेंटजवळ काढले आणि मोठ्या कुतूहलपूर्वक जनाबाईंची तर विचारपूस केलीच, शिवाय आई, बाप, भाऊ कसे आहेत याचीही महाराजांनी आत्मीयतेने चौकशी केली.१ शांतेची आपण घेतलेली जबाबदारी समाधानकारकपणे आपल्या हातून पार पडली याचा जनाबाईंना अधिक आनंद होत होता. शांताची सेवाशुश्रूषा करण्याची ऊर्मी हा जनाबाईंच्या सेवाभावी वृत्तीचा, उदात्त अशा माणुसकीचाच आविष्कार होता आणि काही वर्षानंतर विठ्ठल रामजींनी स्थापन केलेल्या ‘भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळी’ च्या अंतर्गत असलेल्या निराश्रित सेवासदनाची जबाबदारी जनाबाईंनी आपल्या शिरावर घेतली व ती मोठ्या सेवाभावाने पार पाडली. याचा पूर्वपाठच एक प्रकारे शांताची त्यांनी केलेली जी शुश्रूषा आहे त्यामध्ये पाहावयास मिळतो. पुणे येथील वास्तव्यात विठ्ठल रामजींच्या व्यक्तिमत्त्वाची घडण काही एका प्रमाणात होत होती तशीच जनाबाईंच्या व्यक्तिमत्त्वाची घडणही पुण्यामध्ये होत होती व त्याचाच एक पैलू म्हणून त्यांच्या सेवावृत्तीचा आविष्कार शांता सुखटणकरांच्या या हकीकतीत आपणास पाहावयास मिळतो.

पण शांतेच्या बाबतीत विधिलिखित वेगळेच होते. तिच्या जीवनाचा अंत शोकात्म व्हावयास होता व नियतीलाही यशाचे माप जनाबाईंच्या पदरात टाकावयाचे नव्हते. दुर्दैवाने दोन-एक वर्षांतच शांताला क्षय झाल्याचे कळून आले. शांतेला शाळेत न ठेवता रास्ता पेठेतील इस्पितळात उपचारार्थ ठेवणे भाग पडले. संसर्गजन्यतेमुळे शांताची भेट घेण्यासही इतरांना मनाई करण्यात आली. मिस् सोराबजींची शांता एवढी लाडकी पण त्यांनीही कठोरणा धारण केला आणि इतरांनाही तिच्याकडे जाण्यास बंदी केली. रविवारी प्रार्थनासमाजात वासुदेवराव सुखटणकर शांतेला टांग्यात घालून येत. अशी एक-दोनदाच शांताची व जनाबाईंची भेट झाली. जनाबाईंनी शांतेला म्हटले, “शांते, धीर सोडायचा नाही बरं! मरूबिरू नकोस, नाही तर मग बघ, मेलीस तर चांगलीच ठोकून काढीन.”२ जनाबाईंचे उद्गार ऐकून तिच्या मैत्रिणी व शांताही खूप हसल्या. शांताची प्रकृती बिघडतच गेली. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे तिचे केस कापण्याचे ठरले. शांताची आई वारल्यापवर तिच्या केसाची निगा जनाबाईंनीच घेतली. त्या रोज रात्री खोबरेल तेल तिच्या डोक्यावर जिरवीत असत. केस लवकर उगवले नाहीत आणि शांतानेही प्रयत्न सोडायला सांगितला. तरीही जनाबाईंनी चिकाटी सोडली नाही. पुढे पुढे शांताच्या डोक्यावर केस येऊ लागले व अखेरीस तिचा तिचा केशसंभार एवढा विपुल झाला की, तिच्या मैत्रिणींना हेवा वाटावा. इतक्या परिश्रमानंतर वाढविलेले केस कापणे शांताच्या जीवावर आले होते. परंतु ते कापावेच लागले. कापल्यानंतर ते फेकून देण्याच्या देण्याच्या आधी ते केस जनाबाईने बघावे असा शांताने आग्रह धरला. शांता थोड्याच दिवसांची सोबतीण होती. सर्वांनीच तिची आशा सोडली होती. म्हणून तिच्या आग्रहाखातर वासुदेवराव शाळेत येऊन लेडिज सुपरिटेंडेंटकडे जनाबाईला घेऊन जाण्याची परवानगी मागू लागले. मोठ्या मिनतवारीने फक्त दहा मिनिटे भेटण्याच्या अटीवर मिस् सोराबजींनी परवानगी दिली. जनाबाई स्वतः प्लुरसीच्या रुग्ण होत्या, म्हणून त्या विशेष काळजी घेत होत्या. अधिकची दक्षता म्हणून घेऊन येण्यासाठी शाळेच्या गड्यालाही त्यांनी पाठवून दिले. जनाबाईंनी शांताची अखेरची भेट घेतली. तिच्यासमोर एका टोपलीत तिचे केस काढून ठेवले होते. ते बघताच जनाबाईंच्या डोळ्यांत टचकन पाणि आले दुःखातिशयाने दोघींच्याही डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. दोघी एकमेकींकडे पाहून आपल्या भावनांना वाट करून देत होत्या. स्वतःजवळ येण्याची खूण करून शांताने जनाबाईला पाठीवरून हात फिरवण्यास क्षीण आवाजात सांगितले. त्या हात फिरवू लागताच शांता म्हणाली, “जनाक्का, मागे तुम्ही मला ताकीद केली होती ना, की मरू नकोस म्हणून आणि मेलीस तर ठोकून काढीन म्हणून. तर आता काही मी तुमचे ऐकत नाही. तेव्हा मी मरायच्या अगोदरच मारून घ्या बरं. आतापर्य़ंत ठोकून ठोकूनच मला इतक्या सुस्थितीत आणून सोडलीत, पण नशिबच फुटकं माझं. तेव्हा आता शेवटचं ठोकून घ्या बघू.”३

मरणाच्या दारातील शांताच्या तोंडचे हे शब्द ऐकून जनाबाईंचे अंतःकरण फाटून गेले.  त्यांच्या अंतःकरणात दुःखाचा जो कल्लोळ माजला असेल त्याची केवळ अपुर्ती कल्पनाच आपण करू शकतो. एका निरागस अश्राप जीवाची जगण्यासाठीची धडपड आणि त्या जीवाला जगविण्यासाठी आधार द्यावा म्हणून दुस-या एकीने केलेले अविश्रांत श्रम आणि उत्कट सेवाभाव ह्यांचा ठसा शांताची ही करुण कहाणी आपल्या मनावर उमटविते.
             
संदर्भ
१. जनाबाई शिंदे, स्मृतिचित्रे, साप्ताहिक तरूण महाराष्ट्र.
२. तत्रैव, १०-६-१९४९.         
३. तत्रैव, १०-६-१९४९. 

हिंदू गृहस्थिती आणि समाजस्थिती व्याख्यान व नाट्यप्रयोग

ऑक्सफर्ड येथील वास्तव्याच्या अखेरच्या दिवासात विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेली एक विशेष गोष्ट म्हणजे तेथील युनिटेरियन समाजापुढे दिलेले एक व्याख्यान व त्याच्या जोडीने दाखविलेले नाट्यरूप देखावे. ऑक्सफर्डमधील सर्व युनिटेरियन समाजातील स्त्री-पुरुषांचा परिचय व्हावा, विचारविनिमय वाढावा म्हणून वर्षातून निदान एक तरी मोठे स्नेहसंमेलन भरविण्यात येत असे. मार्चच्या आरंभी भरलेल्या अशा स्नेहसंमेलनात शिंदे यांनी हिंदुस्थानातील गृहस्थिती व समाजस्थिती या विषयावर निबंध वाचला व ती कशी असते हे प्रत्यक्षपणे दाखविण्यासाठी मध्यम स्थितीतील कुटुंबाच्या देखाव्याची सजावट करून दाखविली.

व्याख्यानाच्या प्रारंभीच त्या श्रोतृवर्गापुढे ह्या विषयावर बोलणे कसे अडचणीचे आहे हे त्यांनी नमूद केले. “ह्या आधुनिक आणि सुसंस्कृत समजल्या जाणा-या जगातील सर्वसामान्य स्त्री-पुरुष जेव्हा ह्या विषयावरील व्याख्यान ऐकायला येतात तेव्हा आपली करमणूक व्हावी ही त्यांची अपेक्षा असते; उद्बोधक विचार ऐकायला मिळावेत अशी त्यांची अपेक्षा नसते. हिंदुस्थानात राहून आलेले ख्रिस्ती मिशनरी, तसेच सखोल निरीक्षण व चांगली सहानुभूती असलेली अन्य मंडळी ह्यांनी ह्या प्राचीन गौरवशाली देशाचे आपल्याला समजलेले सत्य म्हणून जी चित्र रेखाटलेली आहेत ती काही फारशी स्पृहणीय नाहीत आणि ह्याची भारतीयांना कल्पना नाही असे नाही. अशा परिस्थितीत आपल्या भारताच्याच एका पुत्राने आपल्या पवित्र गृहस्थितीची आणि समाजाची अंगे परकीयांसमोर उघडी करावीत हे त्यांना खचित आवडणारे नाही. कारण ह्या परकीयांच्या सहानुभूतीची त्यांना खात्री असत नाही. मात्र सध्याच्या युगात आपण आपल्या पूर्वजांपेक्षा एकमेकांना अधिक सहजपणे समजून घेऊ शकतो असा माझा विश्वास आहे. मात्र हेही आपण विसरता कामा नये की, हा या युगाचा प्रारंभकाळ आहे. हिंदू जीवनातील संगीत युरोपियनांच्या कानांपर्यंत पोहोचत नाही. पौर्वात्यांचा पेहराव, घर, सामानांपैकी कित्येक वस्तू युरोपियनांच्या डोळ्यांना काहीशा चमत्कारिक, फार झाले तर प्रेक्षणीय वाटतात. जी गोष्ट सौंदर्यकल्पनेबाबतची आहे तशीच औचित्य-कल्पनेबाबतचीही आहे आणि हा मतभेद केवळ तुमच्याच पक्षी आहे असे नव्हे. मागच्या राज्याभिषेकाच्या वेळी येथे मोरोक्कोचा प्रतिनिधी आला होता. त्याच्याबाबत असे सांगितले जाते की, परतीच्या वेळी तो म्हणाला, ‘इंग्लंड हा देश मोठा आहे; पण मला समाधान वाटते की मी संस्कृतीकडे परत जात आहे.’ ह्यावरून एवढेच दिसते की जगाचे सौंदर्यशास्त्र त्याचप्रमाणे नीतिशास्त्र परंपरेच्या आणि राष्ट्रीय पक्षपाताच्या पाशातून अजून मुक्त झाले नाही.

“माझा प्रस्तुतचा प्रयत्न हा माझ्या देशवासीयांना अप्रयोजकपणाचा वाटण्याची शक्यता आहे आणि हा धोका मी पत्करलाही नसता. परंतु तुमच्यामध्ये असताना मला कुठल्याही प्रसंगी मी तुमच्यात परका आहे, अशा प्रकारची जाणीव व्हावी असा प्रसंग कधीही घडला नाही. मला तुमच्याकडून सौहार्द व हे समाश्वसन मिळाल्यामुळे माझ्या देशवासीयांच्या जीवनाबद्दल बोलायला मला संकोच वाटत नाही.” या प्रकारची प्रस्तावना केल्यानंतर त्यांनी आपल्या व्याख्यानात पुढीलप्रमाणे प्रतिपादन केले, “हिंदुस्थान हे केवळ एक भौगोलिक नाव आहे अशा समजुतीनेच अनेकदा उल्लेख केला जातो. मला म्हणावेसे वाटते की, असे समजणे रास्त नाही. जो देश युरोपच्या निम्म्याइतका आकाराने मोठा आहे त्यात तुमच्या इंग्लंडातल्याप्रमाणे राजकीय एकात्मता, त्याचप्रमाणे जीवनपद्धतीतील बाह्य सारखेपणा यांची कशी अपेक्षा करता येईल? इंग्लंड शब्दाने मला तुमचे ‘चिमुकले इंग्लंड’ अभिप्रेत आहे; इंग्रजांचे साम्राज्य नव्हे. हिंदुस्थान देशाने प्रचंड उलथापालथ करणा-या घटना इतिहासकाळात अनुभवलेल्या आहेत हेही आपण लक्षात घेतले पाहिजे. एक चिनी लोकांचा अपवाद वगळला तर भारतीयांप्रमाणे भूतकाळ जगणारे अन्य लोक जगाच्या पाठीवर नाहीत. शिवाय हेही खरे आहे की, हिंदुस्थानने जितके म्हणून वंश आणि धर्म आपल्यात सामावून घेतले आहेत तसे जागाच्या पाठीवर इतर कोणत्याही देशाने केलेले नाही. थोडक्यात, हिंदुस्थान म्हणजे मानवंशशास्त्रज्ञासाठी एक परिपूर्ण भांडार आहे. मात्र एवढी सारी विविधता असल्यामुळे हिंदुस्थान म्हणजे केवळ एक भौगोलिक नाव आहे असे म्हणणे न्याय्य ठरणार नाही. ह्या खंडप्राय देशात ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत कौटुंबिक आणि सामाजिक जीवनाचा समान नमुना सहजपणे शोधून काढता येतो. हिंदुस्थानची चारपंचमांश लोकसंख्या हिंदू म्हणविणारे आणि जैन, शीख, लिंगायत व बौद्ध यांची आहे. मात्र त्यांच्या धार्मिक श्रद्धा आणि उपासनेचे प्रकार यांचा त्यांच्या दैनंदिन जीवनाशी फारसा संबंध असत नाही. सामाजिकदृष्ट्या ते सर्व हिंदू आहेत. एवढेच नव्हे तर लोकसंख्येच्या पाचव्या हिश्श्याने असलेले मुसलमान हेही त्यांच्या राहाटीच्या दृष्टीने आपल्या अन्य देशबांधवांसारखेच आहेत; अन्य देशातील मुसलमानांसारखे नाहीत. म्हणून ज्या एखाद्या गावावर अथवा नगरावर पाश्चात्त्य कल्पनांचा प्रत्यक्ष प्रभाव पडलेला नाही तेथील हिंदू कुटुंबाचे मी जर वर्णन केले तर एक पार्शी सोडून ते कोणत्याही समाजाचे प्रातिनिधिक वर्णन ठरेल.”

भारतीय गृहस्थितीचे वर्णन करताना त्यांनी म्हटले, “भारतीय घर हे एका प्रचंड वृक्षासारखे असते. मुख्य आधार, आईवडिल यांचे खोड. त्यालाच मुलगे आणि नातू यांच्या कुटुंबाच्या अनेक फांद्या फुटलेल्या असतात. मात्र त्यांच्यामध्ये सजीव ऐक्य असते. ही सारी मिळून एक सेंद्रीय पूर्ण (ऑरगॅनिक होल) बनते. कर्ती मुले आणि नातवंडे स्वतः कमाई करीत असली तरी सामान्यतः ह्या व्यवस्थेपासून ते विभक्त होत नाहीत. कुटुंबाची वाढ ही एखाद्या वडाच्या झाडाप्रमाणे होत असते. शाखांपासून निघणारी मुळे जमिनीत रुजत असतात व कालांतराने ही मुळेच खोड अथवा सोट बनतात व मूळ वृक्षाची ताकद व विस्तार वाढवीत असतात. कधी कधी कुटुंबे विभक्त झाल्याची उदाहरणे आढळतात खरी; परंतु हा इथल्याप्रमाणे नित्याचा प्रकार नसून क्वचित संभवणारा असतो त्यामुळे कधी कधी असेही दृश्य दिसते की, एखाद्या घरात चाळीस-पन्नास माणसे गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. असे घर म्हणजे ‘देवाचे राज्य’ म्हटले नाही तरी ‘देवाची वसाहत’ म्हणता यावे असे असते. सख्यभाव नष्ट झाला अथवा विपरीत परिस्थितीने घरापासून फुटून राहावे लागले तर फुटून निघणारे कुटुंब मूळ घराच्या समोरच राहाते. कधी कधी अशी कुटुंबे एखाद्या गल्लीच्या मुख्य भाग बनतात. आणि ती गल्ली त्या कुटुंबाच्या नावाने ओळखली जाते.
 
“अशा कुटुंबात चालणारी सत्ता राजेशाही पद्धतीची असते आणि कुटुंबातील वडीलधारा पुरुष हा राजाप्रमाणे सत्ता चालवीत असतो. मात्र आपल्या पत्नीच्या सौम्य आणि मधुर इच्छेनुसार आपल्या निर्णयात बदल करीत असतो वा मुरड घालीत असतो. हा अधिकारशहा ज्या वेळेला वृद्ध होतो तेव्हा आपले अधिकार सामान्यतः आपल्या थोरल्या मुलाकडे सुपूर्त करतो आणि हा थोरला भाऊ आपल्या इतर भावांना बापाच्या ठिकाणी असतो. एवढेच नव्हे तर त्याच्या बायकोला आईसारखा मान मिळत जातो. अर्थातच हा जुना आदर्श आजच्या काळात पूर्णपणाने पाळला जाईल असे नाही. मात्र जेथे तो पाळला जात नाही तेथेसुद्धा या मूळ आदर्शाची जाणीव निश्चितच असते.”

ह्यानंतर शिंदे यांनी घरामध्ये सुनेची स्थिती कशी असते याचे मोठे परिणामकारक चित्र रेखाटले आहे. “अशा ह्या हिंदू कुटुंबातील कारुण्याचे आस्थाकेंद्रच वाटावी अशी अतुलनीय व्यक्ती म्हणजे घरातील सून. ही सून म्हणजे दुःखभोग आणि स्वार्थत्याग यांची प्रतीमा असते. ती म्हणजे हिंदुस्थानातील स्त्रीवर्गाचा आत्माच होय. कुटुंबातील तिचे स्थान सगळ्यांत खालचे, सर्वांत उपेक्षित असते. कधी कधी छळही होणारी ही सून क्रमशः स्वतःचे सामर्थ्य वाढवीत भावी काळातील पालनकर्ती बनत असते. दैवी वाटावेत असे कौटुंबिक सद्गुण तिच्या ठिकाणी असतात. आईबापांकडून या लहानगीचे लाड होत असतानाच ती कळायच्या आधीच विवाहित होते आणि अनोळखी लोकांमध्ये फेकली जाते. तिला स्वतःचे असे सुख मिळविता येत नाही. घरातल्या लहानग्यांपासून तो थोरापर्यंत सगळ्यांना खूष ठेवण्याची जबाबदारी मात्र तिची असते. सगळ्यांच्या शेवटी ती झोपायला जाणार आणि सगळ्यांच्या आधी तिला उठावे लागणार. इतर उभे असताना तिने खाली बसता कामा नये. परक्यांसमोर घरातील कुणाही पुरुषव्यक्तीबरोबर बोलता कामा नये. आईवडील अथवा इतर वडीलधारे ह्यांना ती नव-यासोबत दिसणे हा त्यांचा अपमान. तिने तो कधीही करता कामा नये आणि बायकोला नावाने हाक मारणे म्हणजे
वडीलधा-यासमोरचे उद्धट वर्तन. घराच्या ह्या भावी राणीला या दिव्यातून जावे लागते.” हिंदू घरातील सुनेचे हे वर्णन करताना शिंदे यांच्या मनासमोर त्यांची कारुण्यमूर्ती आई प्रतीकरूपाने असणार.

त्यानंतर शिंदे यांनी हिंदू घरातील मुलीचे लग्न ही बाब कशी महत्त्वाची असते आणि लग्नाचा सोहळ कसा चालतो याचे वेधक वर्णन केले आहे. ते म्हणाले, “सगळ्या घराचे लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे लहानग्या मुलीचे लग्न. कधी कधी ही बाब चिंतेचीही ठरते. मुलीचे वय फार वाढलेले असते-म्हणजे बारा वर्षांहून जास्त झालेले असते. ह्यामुळे आईबापांना तिच्या चिंतेचा घोर कसा लागतो याचे मराठी नाटकातही वर्णन केले आहे.

“अखेर विधिवशात म्हणा अथवा मध्यस्थाच्या योजकतेने म्हणा लग्न जुळते आणि मग कधी कधी पंधरवडाभर टिकणारा लग्नाचा जो आनंदोत्सव चालतो त्याचे वर्णन काय करावे? जवळची आणि दूरची शेकडो माणसे ह्या नवरा-नवरीभोवती गोळा होतात आणि त्या बिचा-या नवरा-नवरीला या उत्सवामध्ये आपले काय स्थान आहे याची फारशी जाणीवही नसते. मी हिंदू विवाहपद्धतीतील एका सत्यपूर्ण गोष्टीचा निर्देश करतो आणि ती म्हणजे हिंदू विवाह हा सर्वार्थाने संस्कार असतो. विवाह म्हणजे एक सामाजिक करार असतो; व्यक्तिगत सुखाची बाब असते; अशा कल्पनांचा हिंदू विवाहाशी दूरत्वानेही संबंध असत नाही. तो एक धार्मिक भूमिकेतून केलेला स्वार्थत्याग असतो. व्यवहारी वृत्तीच्या पश्चिम जगाचा यावर विश्वास बसणे कठीण. परंतु हजारो वर्षांपासून चालत आलेली हिंदुस्थानातील ही वस्तुस्थिती आहे. त्यामध्ये वेदनादायक भाग एवढाच की, ही विवाहपद्धती पुरुषजातीच्या बाबतीत पक्षपाती असते. स्त्रीजातीला मात्र ही पद्धती भूषणावह ठरणारी नाही.”

विवाह समारंभातील मांडव कसा असतो, चारी बाजूला केळीचे खुंट उभारलेले असतात, हे केळीचे खुंट स्वार्थत्यागाचे आणि स्त्रियांमधील सद्गुणांचे प्रतीक असतात वगैरे गोष्टींचे निवेदन केल्यानंतर ह्या विवाहविधीने कालपर्यंत जी एक खेळकर मूल होती तिचे रूपांतर आज मर्यादशील वागणा-या पत्नीमध्ये झालेले असते, असे ते नमूद करतात.

“हिंदू घरामधील आनंदाचा दुसरा प्रसंग म्हणजे पुत्रजन्म होणे. मुलाच्या जन्माने आनंद तर मुलीच्या जन्माने निराशा. मुलासाठी संस्कृतमध्ये पुत्र हा जो शब्द आहे त्याचा अर्थच मुळी आपल्या पूर्वजांना पूनामक नरकात जाण्यापासून वाचविणारा असा आहे. माणसामध्ये असणारी वंशसातत्याची जी स्वाभाविक इच्छा असते तिला ही समजूत बळकटी आणणारी आहे. जन्मणारा मुलगा जेवढ्या संपत्तीचा वारसदार होणार असतो तिच्या भूमितीश्रेणीच्या पटीने हा आनंद वाढत असतो. मी एकदा हिंदुस्थानातील एका संस्थानाच्या राजधानीतील पुत्रजन्माचा सोहळा चालला होता त्या वेळी उपस्थित होतो. अग्रभागी संस्थानचा प्रचंड हत्ती व पाठीमागून घोडे व हत्ती अशी मिरवणूक निघाली होती. हत्तीच्या पाठीवर चांदीचे एक भले मोठे पात्र साखरेने भरले होते. त्यातून वाटी वाटी साखर रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या प्रत्येक घरामध्ये पाठविली जात होती. ही मिरवणूक पंधरवडाभर चालली होती.”१

निबंधाच्या प्रारंभी प्रास्ताविकात शिंदे यांनी असे विधान केले आहे की हिंदू जीवनातील संगीत युरोपियनांच्या कानापर्यंत पोहोचत नाही. प्रत्यक्ष निबंधात मात्र ह्या विधानाचे विवरण आढळत नाही. ह्या निबंधाचे ‘सम पिक्चर्स इन् ए हिंदू होम’ ह्या शीर्षकाखाली केलेले काही मुद्यांचे टाचण पाहावयास मिळते.२ त्यामध्ये त्यांनी असे विधान केले आहे की, “आज राजा आणि राम (गृहिणी सचिवः) यांनी पत्नीवियोगानंतर केलेल्या विलापातून, त्यांच्या झुरण्यातून आणि रुदनातून हिंदू प्रेमाचा सर्वोत्कृष्ट आविष्कार पाहावयास मिळतो.” हे व्याख्यान त्यांनी केवळ वाचून दाखविले नसावे तर अधूनमधून ते भाष्यही करीत असावेत, निबंधात न केलेल्या विवरणाची भर घालीत असावेत, असे दिसते.

व्याख्यानाच्या दुस-या भागामध्ये शिंदे यांनी हिंदुस्थानातील समाजस्थिती, तेथील सुधारणा व इंग्रज सरकारची व लोकांची त्याबद्दलची भूमिका यासंबंधी महत्त्वाचे विचार मांडले. ते म्हणाले, “मागच्या शतकात हिंदुस्थानचा चेहरामोहरा बदललेला आहे. धर्म, समाज राजकारण, उद्योग यांची स्थिती अशी झालेली आहे की, ती सारी जणू काय एका प्रचंड कढईत फेकल्यामुळे खदखदत आहेत. तेथे चाललेल्या पुनर्घटनेला चालना देण्याची अंतिम श्रेय ब्रिटनला मिळणार आहे. मात्र सध्याचा विकास एवढा दांडगा आहे की त्याचे श्रेय ब्रिटनसारख्या मानवी यंत्रणेला, मग ती कितीही मोठी असो, देणे रास्त ठरणार नाही. या सनातन देशातील लोकांची धारणा हळूहळू, किंवा माझ्या मताने तर वेगाने पुनर्घटित होत आहे. केशवचंद्र सेन ह्यांच्यासारख्या धर्मनिष्ठ व्यक्तीला तर त्यामागे दैवी योजना आहे असे वाटते.

“सध्याच्या काळी हिंदुस्थानच्या सामाजिक स्थितीबाबत बोलणे याचा अर्थच तेथील सामाजिक सुधारणेविषयी बोलणे असा होतो. सगळे लोकनेते आणि बंडखोर पुरुष हे मूलतः समाजसुधारकच आहेत - मग ते मान्य करोत अथवा न करोत. प्रारंभाच्या काळात ब्रिटिश सरकारने राजा राममोहन रॉय आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांसारख्या आद्य सुधारकांना सतीची चाल बंद करण्यासाठी, विधवांना पुनर्विवाहाची मुभा देण्यासाठी कायदे करून साहाय्य केले. परंतु लवकरच त्यांना आपल्या मर्यादांची जाणीव झाली आणि सध्या ते अशा बाबतीत उदासीन आहेत. सगळ्या देशाच्या पातळीवर शिक्षणप्रसार करणे हा जरी सुधारणेचा प्रभावी मार्ग असला आणि केवळ सरकारच या बाबतीत खूप काही करू शकत असले तरी ते ह्या बाबतीत आपली जबाबदारी टाळीत आहेत ही गंभीर बाब आहे.”

यानंतर शिंदे यांनी असे विधान केले की “जगातल्या कित्येक मोठ्या चळवळीप्रमाणे हिंदुस्थानातील सामाजिक सुधारणेचा प्रारंभकाळ हा अतिशय रोमँटिक कालखंड होता.” ब्राह्मसमाजाचे सुप्रसिद्ध पुढारी पंडित शिवनाथशास्त्री यांनी प्रसिद्ध केलेल्या साहित्यातील दोन महत्त्वाच्या घटना त्यांनी सांगितल्या. त्यांपैकी पहिली बंगालमधील बारीसाल येथे १८६२ मध्ये राहणा-या एका तरुण ब्राह्म वकिलासंबंधीची होती. त्याच्या वडिलांनी पहिली पत्नी निवर्तल्यानंतर आपल्या आईच्या सांगणावरून त्या वेळच्या चालीप्रमाणे नऊ-दहा वर्षांच्या मुलीशी लग्न केले. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर ह्या लहानग्या सावत्र आईची जबाबदारी तरुण ब्राह्म वकिलावर पडली. आपल्या सावत्र आईची करुण अवस्था पाहून ह्या ब्राह्म वकिलाने आपल्या पत्नीच्या सहकार्याने एक व्यूह आखला व अनेक संकटांना तोंड देत आपल्या सावत्र आईचे लग्न आपल्या एका विश्वासू मित्राबरोबर लावून दिले, वगैरे चित्तथरारक हकिकत त्यांनी निवेदन केली.

दुसरी रोमांचकारी हकिकत जी सांगितली ती १८७० मधील एका सतरा वर्षांच्या कुलीन म्हणजे उच्चवर्णीय मुलीबाबतची होती. तिच्या कर्मठ चुलत आजोबाने तिचा विवाह आधीच तेरा लग्ने केलेल्या एका धर्मनिष्ठ ब्राह्मणाशी करण्याचा बेत आखला होता. ह्या तरुण कुलीन मुलीने ब्राह्म असलेल्या आपल्या दोन चुलत बहिणींना ही हकिकत कळवून, आपली सुटका केली नाही तर आपण आत्महत्या करू असे पत्र लिहून कळविले. ह्या ब्राह्म चुलत बहिणींनी तरुण विद्यार्थ्यांच्या साहाय्याने तिची सुटका करून विशाल पद्मा नदीला प्रचंड पूर आला असतानाही नावाड्याला नदीत नाव सोडावयाल भाग पाडले आणि कलकत्त्याला तिच्या ब्राह्म बहिणींच्या स्वाधीन केले. कालांतराने तिचा विवाह प्रतिष्ठित अशा ब्राह्माशी झाला.

सुधारणेच्या पहिल्या पर्वातील या प्रकारच्या रोमांचकारी घटनांचे शिंदे यांनी वर्णन करून सध्या या प्रकारचा रोमान्स-अद्भुत घडण्याचा भाग-जोरात असल्याचे सांगितले. सुधारणेचे पूर्ण यश हे बहुजन समाजात होणा-या शिक्षणप्रसारावर अवलंबून आहे ही बाबही निदर्शनास आणली.

हिंदुस्थानातील जातिव्यवस्था आणि तेथील इंग्रज लोक यांविषयी शिंदे नंतर बोलले, “हिंदुस्थानात सुमारे तीनशे मोठ्या जाती आहेत आणि जवळ जवळ तितक्या पोटजाती आहेत. जातिव्यवस्था हा हिंदुस्थानच्या राष्ट्रीय स्वास्थ्याला अत्यंत विघातक ठरणारा अडथळा आहे. ह्या क्षेत्रात सुधारकांना करावा लागणारा झगडा अत्यंत बिकट स्वरूपाचा आहे.

“हिंदुस्थानच्या सामाजिकतेला असा एक पैलू आहे की, ज्याचा संबंध तेथे राहणा-या इंग्रजांशी पोहोचतो. हे लोक तेथील जातिव्यवस्थेचा निषेध करणा-याच्या कामी अजिबात मागे नाहीत. मात्र त्यांचे स्वतःचे वर्तन ह्या निषेधाशी जुळणारे कितपत असते? अँग्लो-इंडियनांचा वेगळेपणा जेवढा म्हणून राखला जातो आणि त्यांना जेवढे म्हणून संरक्षण मिळते तेवढे संरक्षण अन्य कोणत्याही जातीला मिळत नाही. ब्राह्मण आणि शूद्र एकत्र जेवणार नाहीत. आंतरजातीय लग्ने करणार नाहीत हे खरे; पण बाकी बाबतीत मात्र त्यांचे संबंध अगदी सलोख्याचे असतात. इंग्रज माणसे शंभर वर्षांपूर्वी जितकी परकी होती तितकीच परकी आजही आहेत. एवढेच नव्हे तर भविष्यातदेखील तसेच राहण्याचा त्यांचा निर्धार दिसतो. हिंदुस्थानचे कमांडर इन चीफ लॉर्ड रॉबर्ट्स नेहमी आग्रहपूर्वक सांगत की, हिंदुस्थान तलवारीच्या जोरावर जिंकला आहे तलवारीच्या जोरावर राखला जाईल. लॉर्ड रॉबर्ट्स हे लष्करातील पुरुष आहेत आणि त्यांच्याकडून अधिक चांगल्या अपेक्षा करता येणार नाहीत. पण ऑक्सफर्ड विद्यापीठातील इतिहासाचे नामवंत प्राध्यापक मिस्टर ट्राऊड ह्या विधानाचा पुनरुच्चार करतात आणि भरीला म्हणतात की, पराभवाची नामुष्की पत्करल्याशिवाय आम्ही हिंदुस्थान सोडू असे म्हणणे म्हणजे जाणीवपूर्वक प्रचंड भ्रमात राहण्यासारखे ठरेल. असे जर आहे तर अँग्लो-भारतीयांनी हिंदुस्थानात स्वतःची एक वेगळीच (जखडबंद) जात तयार केली, यात नवल ते काय? ह्या अप्रिय बाबीचा निर्देश करताना मला बरे वाटत नाही. ह्या बाबीशी अन्य गंभीर प्रश्न जर गुंतलेले नसते तर मी ह्या अप्रिय बाबीचा उल्लेख टाळला असता. हे प्रश्न राष्ट्रीय स्वरूपाचे नाहीत; ते आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे आहेत. त्यांचा संबंध अखिल मानव जातीशी येतो. फक्त भारतातच प्राचीन आणि आधुनिक जगे एकत्र येत आहेत. प्राचीन धर्म आणि प्राचीन तत्त्वज्ञान, जुन्या आकांक्षा आणि जुनी वैशिष्ट्ये त्यांच्या शुद्ध स्वरूपात तेथेच जतन केली आढळतात. आता तेथेच आधुनिक विचार आणि आधुनिक जीवनप्रणाली हळूहळू भूतकाळाच्या खडकाळ आणि खोलवर भूमीत मुळे रुजवीत आहेत. इतिहासात अनन्यसाधारण असलेल्या अशा आणीबाणीच्या काळात हिंदुस्थानातील इंग्रज हे स्वतःला संकुचित राजकीय आणि व्यापारी जाणिवेपेक्षा उंचावू शकले नाहीत. हिंदुस्थानात जी दैवी घटना घडत आहे ती ध्यानात न घेता हिंदुस्थानला जिंकण्याचा किरकोळ प्रसंग जर ते विसरू शकले नाहीत; मानवी सुसंवाद आणि एकात्मता ह्याऐवजी ते जर स्वतःचे एकांगी वंशश्रेष्ठत्व प्रस्थापित करण्याचा आग्रह धरीत बसले आणि याउप्पर “केवळ पराभवाची नामुष्की पत्करावी लागली तरच हिंदुस्थान सोडू” अशा प्रकारची भाषा अहंकाराने बोलत राहिले, तर तेथे सुरू झालेल्या दैवी प्रयोगाचे ते जे नकळतपणे साधन झालेले आहेत त्या प्रयोगाला त्यांनीच जाणीवपूर्वक व सहेतुकपणे अडथळा आणला असे होईल.”

ह्या मुद्दयाचा समारोप करताना शिंदे म्हणाले, “कदाचित कुणी विचारू शकेल की, ज्या परकीयांच्या विरोधात एखादे राष्ट्र आहे त्याच्यामध्ये कसे मिसळावयाचे? मी परवा नुकतेच निधन पावलेले ब्रटिश अँड फॉरेन युनिटेरियन असोसिएशनचे हिंदुस्थानातील प्रतिनिधी असलेले रेव्ह. फ्लेचर विल्यम्स यांच्या स्मारकासंबंधीचा वृत्तान्त वाचीत होतो. मी स्वतःलाच प्रश्न केला की, यांचे स्मारक काय म्हणून? आणि एवढ्या मनःपूर्वकपणे एकमताने त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उत्सव कलकत्त्यातील ब्राह्म आणि ब्राह्मेतर का बरे साजरा करीत आहेत? त्याचे उत्तर मला सापडले. त्यांनी इंग्लंडचे प्रतिनिधित्व अत्यंत यशस्वीपणे केले आणि त्यांच्या यशाचे रहस्य हे की, ते भारतीय लोकांमध्ये राहिले, लोकांत वावरले, त्यांच्यामध्ये मिसळले, त्यांच्या पैकीच एक बनून गेले. हिंदुस्थानच्या अंतःकरणात स्थान मिळविणारा एक फ्लेचर विल्यम्स हा त्यांच्या दृष्टीने सरहद्दीवर रानटी टोळ्यांशी लढणा-या अर्धा डझन लॉर्ड रॉबर्टसपेक्षा जास्त मोलाचा आहे. राजकीय हिंदुस्थान ही केवळ ब्रिटिश साम्राज्याच्या इतिहासातील एक अवस्था आहे, तर सामाजिक इंग्लंडशी जुळणारा आणि संवादी असणारा सामाजिक हिंदुस्थान ही जगाच्या इतिहासातील एक अवस्था ठरेल.”

शिंदे यांनी १९०३ सालच्या मार्चच्या पहिल्या आठवड्यात ऑक्सफर्डमध्ये दिलेले हे व्याख्यान अनेक दृष्टींनी महत्त्वाचे वाटावे असे आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व अनेक अंगांनी प्रगल्भ बनले होते हे त्यामधून जाणवते. एकेश्वरी धर्माची उदात्त व्यापक बैठक त्यांच्या मनोधारणेला व विचारांना प्राप्त झाली होती. ह्या भूमिकेतूनच ते संपूर्ण जगाच्या इतिहासाचे व संस्कृतीचे अवलोकन करतात. वरवरचे भेद मिटून खराखुरा बंधुभाव विश्वात्मक पातळीवर प्रस्थापित व्हावा ही आध्यात्मक जाणीव त्यामधून प्रकट होते. ह्या उन्नत पातळीवरू इंग्रजांच्या उणिवा त्यांच्यासमोर निर्भीडपणे सांगण्याचा आत्मविश्वासही त्यांच्या ठिकाणी होता. या व्याख्यानातून त्यांची राष्ट्रीय वृत्ती दिसून येते खरी; मात्र ती एकांगी, पक्षपाती स्वरूपाची नाही. त्यांच्या राष्ट्रीय भूमिकेला आध्यात्मिक अधिष्ठान होते. ज्या समानधर्मीयत्वामुळे महात्मा गांधी हे त्यांना पुढच्या काळात आदरणीय वाटू लागले, तशाच प्रकारची वैशिष्ट्ये आणि आध्यात्मिक वृत्ती शिंदे यांच्या या व्याख्यानातून प्रकट होताना दिसते.

ऑक्सफर्डमधील युनिटेरियनांच्या स्नेहसंमेलनाच्या प्रसंगी त्यांनी हे व्याख्यान दिले ही गोष्टही औचित्यापूर्ण होती. विश्वात्मक स्वरूपाच्या एकेश्वरी धर्माचे अनुयायी असलेले इंग्रज स्त्री-पुरुष हे शिंदे यांची भूमिका समजून घेण्याची शक्यता होती. अन्यत्र त्यांनी हेच व्याख्यान दिले असते तर त्याला संपूर्णपणे राजकीय रंग प्राप्त होणे जास्त संभवनीय होते. योग्य व्यासपीठावरून हे व्याख्यान दिल्यामुळे त्याला योग्य ती प्रसिद्धीही मिळाली. इंग्लंडमधील युनिटेरियन समाजाचे मुखपत्र असलेल्या ‘दि इन्क्वायरर’ मधून १४ मार्च १९०३ रोजी ते प्रसिद्ध झाले. मिस्टर हॉजसन पॅट नावाच्या गृहस्थाने त्याचे फ्रेंचमध्ये भाषांतर करून ‘ला पेक फ्रान्स’ नावाच्या वृत्तपत्रात १६ एप्रिल १९०३ रोजी ते प्रसिद्ध केले.

शिंदे यांनी हे व्याख्यान या स्नेहसंमेलन प्रसंगी वाचून दाखविले, एवढेच नाही तर हिंदू गृहपद्धती व सामाजिक स्थिती कशी असते हे प्रत्यक्ष दाखविण्याकरिता मध्यम स्थितीतील कुटुंबाच्या देखाव्याची सजावट करून छोटेखानी नाट्यप्रयोग सादर केला.३ शिंदे यांच्या ठिकाणी मुळातच एक प्रकारची रसिकता होती. हा निबंध लिहिताना संगीत ‘शारदा’ हे नाटक त्यांच्या मनासमोर तरळत होते. त्यामधील काही घटनांचाही निर्देश त्यांनी आपल्या निबंधात केलेला आहे. स्वाभाविकपणेच त्यांना असे वाटले की, केवळ निबंधातून हिंदू गृहस्थितीचे आणि समाजस्थितीचे वर्णन करण्यापेक्षा त्यासंबंधीचे काही देखावे जर साक्षात उभे केले तर ते अधिक प्रत्ययकारी ठरतील व त्याप्रमाणे त्यांनी योजनाही केली. ऑक्सफर्डमध्येच विविध वस्तूंचा संग्रह करणा-या एका कराचीच्या व्यापा-याची त्यांना माहिती मिळाली. त्याच्याकडून त्यांनी हिंदू घरामध्ये असतात तशा वस्तू, फर्निचर, तसेच पोशाख, नकली दागदागिने वगैरे मिळविले व त्याची मांडणी करून हिंदू घर जसे असते तसे पूर्णपणे सजविले. काही इंग्रज तरुण-तरुणींना हिंदी पद्धतीप्रमाणे पोशाख देऊन हिंदू पद्धतीप्रमाणे बसविण्यात आले होते. नवीन लग्न झालेली सूनबाई कोप-यात भिंतीकडे तोंड करून कशी बसते, जवळ आलेल्या परीक्षेसाठी तिचा नवरा मोठमोठ्याने घोकंपट्टी करीत दुस-या कोप-यात कसा बसतो, कुणी वडीलधारे माणूस अवचित आल्यावर दोघे उठून कसे नमस्कार करतात वगैरे दृश्ये हावभावासकट दाखविण्यात आली. शिंदे यांचे व्याख्यान व देखाव्याचा प्रयोग असा सगळाच कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला. कार्यक्रम संपल्यानंतर अनेक श्रोत्यांनी शिंदे यांना भेटून त्यांचा सुस्पष्ट निबंध व कष्ट घेऊन केलेला प्रयोग आवडल्याचे सांगून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व भरपूर आभार मानले. ‘दि इन्क्वायरर’च्या संपादकांनी काही आठवड्यानंतर शिंदे यांना त्यांच्या निबंधाच फ्रेंचमध्ये झालेला अनुवाद अनेकांना आवडला असल्याचे आवर्जून कळविले.

संदर्भ
१.    विठ्ठल रामजी शिंदे, रोजनिशी, पृ. ४४. शिंदे यांनी शाहूमहाराजांस पुत्र झाल्याच्या निमित्ताने कोल्हापुरात  आनंदोत्सव चालला होता तो पाहिला होता. त्याचेच वर्णन पस्तुत व्याख्यानात केले आहे.
२.    शिंदे यांची कागदपत्रे.
३.    Domestic and Social Life in India हा निबंध लिहिलेली शिंदे यांची वही. या निबंधाच्या अखेरीस शिंदे यांनी ह्या नाट्यप्रयोगासंबंधीची माहिती देणारी नोंद २३ मार्च १९२६ रोजी पुणे येथे केली.

स्वदेशी आगमन, बडोदा भेट आणि धर्मप्रचारकार्याला आरंभ

नेपल्सहून निघालेली रुबातिने ही बोट ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता मुंबई बंदराला पोहोचली. विठ्ठल रामजी शिंदे यांचे स्वागत करण्यासाठी मुंबई समाजाची बरीच लहानथोर मंडळी मोठ्या उत्साहाने जमली होती. मायभूमीला पोहोचल्याचा, मित्रमंडळी भेटल्याचा आनंद स्वाभाविकपणेच त्यांना झाला. शिंदे विलायतेहून धर्मशिक्षण घेऊन आल्यानंतर मुंबई प्रार्थनासमाजाचे प्रचारक म्हणून काम करणार, तर त्यांच्या राहण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी तसेच समाजामध्ये परप्रांताहून, बाहेरगावाहून येणा-या पाहुणेमंडळींच्या निवासाचीही व्यवस्था व्हावी या हेतूने प्रार्थनासमाजाचे उपाध्यक्ष शेठ दामोदरदास गोवर्धनदास सुखडवाला यांनी प्रार्थनामंदिराच्या आवारात एक ‘राम मोहन राय आश्रम’ नावाची तीन मजली इमारत ते येण्यापूर्वीच बांधून ठेवली होती. प्रार्थनासमाजाची मंडळी शिंद्यांच्या आगमनाची उल्हासाने वाट पाहत होती. ४ ऑक्टोबर १९०३च्या सुबोधपत्रिकेच्या अंकामध्ये होळकर या सहीने एक चमत्कृतिपूर्ण स्वागतपर पद्यबंध प्रसिद्ध झालेला पाहावयास मिळतो. ह्या रचनेमध्ये शिंदे यांचे गुणगान केलेले असून त्यांच्या हातून विविध प्रकारची कार्ये घडोत व त्यांचा सहवास मिळो अशी इच्छा प्रकट केली आहे. ही पद्यरचना आर्या वृत्तात सात कडव्यांची असून तिच्या मध्यभागी इंग्रजी S ह्या अक्षरात रा. रा. विठ्ठल रामजी शिंदे, बी. ए. अशी अक्षरे येतील अशा खुबीने शब्दयोजना केलेली आहे.१

दुस-या दिवशी बुधवारी सायंकाळी शिंदे यांच्या स्वागतासाठी समाजबंधूंचे एक संमेलन भरले. प्रार्थनामंदिराच्या लगत भगवानदास माधवदास नावाचे समाजबंधू राहत होते. त्यांच्या बंगल्यात हे संमेलन आयोजित करण्यात येत आहे अशा प्रकारची सूचनाही रविवारच्या सुबोधपत्रिकेच्या अंकात प्रसिद्ध झाली होती. ह्या स्वागत समारंभासाठी बरीच लहानथोर समाजीय मंडळी उपस्थित राहिली होती. डॉ. भांडारकर, न्यायमूर्ती चंदावरकर, दीनानाथराव माडगावकर ह्यांनी उपस्थित राहून मोठ्या आनंदाने स्वागतपर भाषणे केली. याप्रसंगी शिंदे यांच्या स्वागतार्थ गायिलेली तीन पद्ये सुबोधपत्रिकेच्या अंकामध्ये आलेली आहेत. शिंदे यांना विलायतेला जातेवेळी निरोप देण्याच्या प्रसंगी त्यांचे वृद्ध मित्र दीनानाथराव माडगावकर यांनी एख पद्ये रचले होते. आता त्यांच्या आगमन प्रसंगीही त्यांनी रचलेले पद्ये गायिले.

तरुण असता स्वार्थत्यागी।
तुम्ही दिसता भले।।
प्रभुवर कृपे धर्माभ्यासी।
तुम्हां यश लाभले।।
तरि तुमचिया हस्ते।
धर्मप्रचार बरा घडो।।
तनुमन तसे देवापायी।
सदा तुमचे जडो।।

शिंदे यांच्या स्वागतानिमित्त न्या. मू. चंदावरकर यांनी उपासना चालविली.२

विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबद्दल समाजबंधूंच्या मनात मोठ्य अपेक्षा झाल्या होत्या. ह्या अपेक्षा निर्माण व्हाव्यात अशा प्रकारची गुणवत्ता त्यांच्या ठिकाणी आहे याची प्रचिती समाजबांधवांना आलेली होती. सुबोधपत्रिकेच्या ११ ऑक्टोबर १९०३च्या अंकामध्ये संपादकीयाऐवजी रा. रा. विठ्ठल रामजी शिंदे यांस अनावृत्त पत्र प्रसिद्ध करण्यात आले असून त्यामध्ये शिंदे यांच्या ठिकाणी असणा-या व प्रत्ययाला आलेल्या गुणवत्तेचा नेमकेपणाने निर्देश केलेला असून शिंदे यांच्यापासून समाजबांधवांच्या कोणत्या अपेक्षा आहेत हे प्रकट केले आहे.३ मुंबईचा समाज व आपली अनेक मित्रमंडळी आपले स्वागत करण्याचा विचार काय म्हणून करीत आहेत असा प्रश्न उपस्थित करून पत्रलेखकाने म्हटले आहे, “आपण एका उदारमतप्रचारक पाठशाळेत दोन वर्षांपर्यंत उत्तम रीतीने धर्माध्यन केलेत म्हणूनच समाजाने आपले स्वागत केले असे मला वाटत नाही. त्याचप्रमाणे परदेशी असता आपण जी जी स्थळे पाहिली, आपण जो जो अनुभव प्राप्त करून घेतला, ज्या ज्या नवीन गोष्टी शिकलात त्यासंबंधाने सुबोधपत्रिकेच्या वाचकांसाठी आपल्य रसाळ व काव्यरसप्रचुर भाषेत मोठमोठी पत्रे लिहिली व ती ती स्थले आपण प्रत्यक्ष पाहत आहोत, त्या त्या लोकांशी आपला प्रत्यक्ष परिचय होत आहे अगर त्या त्या नवीन गोष्टी आपणच स्वतः शिकत व अनुभवीत आहोत अशा प्रकारची मनोवृत्ती आपली पत्रे वाचणा-या अनेक वाचकांची होत असे, म्हणूनही हा स्वागतसमारंभ झालेला नसावा. परदेशी असता आपल्या सुटीच्या दिवसात आपण निरनिराळ्या ठिकाणी ईश्वरोपासना चालविल्या, आपल्या देशातील पुरातन उन्नत असा धर्मासंबंधाने तद्देशीय लोकांस ज्ञान प्राप्त करून दिलेत म्हणून आपला सन्मान झाला नसावा; तर आपण आमच्या समाजाला एक उत्तम बागवान सापडला आहात आणि आपण एका अमृतवल्लीचा रोपा लाविला आहात असा अनुभव आल्यावरून व आशा बागवानावाचून आणि त्याच्या त्या अमृतवल्लीशिवाय समाजाचे कार्य नीटसे होणे शक्य नाही, असा अनुभव असल्यामुळे आपला तो जोमात असलेला रोपा पाहून आपले स्वागत करणे, आपणास त्या रोप्याच्या कामी एक प्रचंड वृक्ष निर्माण करण्याच्या कार्यी उत्तेजन देणे हे आपले कर्तव्य होय असे समाजास वाटून हा समारंभ झाला असावा.”

पत्रलेखकाने आपल्या समाजाचे धर्मप्रचाराचे कार्य म्हणजे एक प्रचंड बागाईत जमीन आहे असे म्हटले असून तेथे ज्ञानप्रसाराची, धनदानाची वल्ली आणि विद्वत्तेचाही रोपा आढळेल. मात्र त्याची नीट जोपासना झालेली आढळणार नाही असे म्हणून शिंदे यांना “आपण स्वार्थत्यागरूपी अमृतवल्लीचा जोमदार रोपा त्या जागेत लावल्यामुळेच आपण आम्हास फार आदरणीय झाला आहात. त्या रोप्याचा मोठा वृक्ष झाला पाहिजे. त्याची जोमदार कलमे जिकडेतिकडे लावून त्यांचेही मोठे वृक्ष झाले पाहिजेत.” असे म्हटले आहे. पुढे आपल्या उदाहरणाच्या योगे आम्हा तरुणांमध्ये स्वार्थत्यागाची आवड उत्पन्न कराल अशी आशा प्रकट केली आहे.

प्रस्तुत अनावृत पत्रामध्ये शिंदे यांनी धर्मप्रचार कार्यासाठी जो अपूर्व स्वार्थत्याग केला त्याची यथार्थ जाण दाखविली आहे. आमच्या या बागेमध्ये स्वार्थत्यागारूपी अमृतवल्लीचा रोपा औषधालाही सापडावयाचा नाही. आजपर्यंत त्या अमृतवल्लीचा रोपा लावण्याचा कुणी प्रयत्न केला नाही तो आपण केला, म्हणून आपले अभिनंदन करणे हे पत्रलेखकास आपले कर्तव्य वाटले. आपले स्वीकृत कार्य अत्यंत बिकट आहे हे नमूद करूनही बिकट प्रसंगीसुद्धा स्वीकृत कार्य करीत राहण्याची स्फूर्ती आपणास सदैव मिळो अशी पत्रलेखकाने अखेरीस प्रार्थना केलेली आहे.

विठ्ठल रामजी शिंदे यांना हिंदुस्थानात परत आल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट करावयाची होती ती म्हणजे श्रीमंत सयाजीराव महाराज यांना भेटणे. शिंदे विलायतेहून निघण्यापूर्वी त्यांना महाराजांकडून पत्र आले होते की, स्वदेशी आल्यावर प्रथम त्यांना भेटावे. त्यानुसार ते लगोलग महाराजांना भेटण्यासाठी बडोद्यास गेले. त्यांनी श्रीमंत सयाजीराव महाराज यांची आदरपूर्वक भेट घेतली. त्या वेळी बडोद्यास महाराजांनी सुरू केलेल्या अस्पृश्यांसाठीच्या दिवसा चालणा-या चार प्राथमिक शाळा होत्या. त्या शिंदे यांनी तपासाव्यात व काही सूचना करावयाच्या असल्यास प्रत्यक्ष महाराजांना भेटून त्या समक्ष करावयास सांगितले. शाळातपासणीविषयी व्यवस्था करण्यास महाराजांनी विद्याधिका-यांना फर्माविले. शिंदे यांनी तत्परतेने या शाळा तपासल्या. सर्व शाळा जोरात चालल्या होत्या. तरीही अस्पृश्यवर्गातील मुलांसाठी केवळ शालेय शिक्षणाचे प्रयत्न कितीह सद्हेतुमूलक असले तरी अशा प्रयत्नांची मर्यादा ध्यानात आली. मराठी पाचवी अथवा इंग्रजी दुसरी किंवा तिसरीचे शिक्षण संपताच ही मुले शाळा बंद करून हिंडत असत. कारण त्यांना पुढे नोकरीधंद्यात वाव नसे. पुस्तकी शिक्षणामुळे ती आपल्या वडिलांचे हलके धंदे करण्यास नाखूष होती. आपल्या जातीचा पारंपरिक अशोभनीय धंदा करण्यापेक्षा आळसात दिवस काढणे ती पसंत करीत असत. मराठी सहावी पास झालेली काही महार मुले रस्त्यावरून रिकामटेकडेपणाने फिरत असतात हे स्वतः शिंदे यांनी पाहिले. प्रत्यक्ष भेटीत महाराजांनी यांना शाळांच्या तपासणीबाबत विचारले असता आपल्याला जाणवलेली वस्तुस्थिती महाराजांना त्यांनी सांगितली. ह्या शिकलेल्या मुलांच्या नोकरीविषयी काही सोय करता आली तर करावी असे सुचविले. ह्या मुलांना जर पुढे नोकरीत वाव मिळाला नाही तर त्यांच्या या शाळांची वाढ तर होणार नाहीच; उलट त्या कितपत चालू राहतील याबद्दल आपल्याला शंका वाटते असेही त्यांनी महाराजांच्या निदर्शनास आणले. महाराजांनी लोकमत अनुकूल नसल्याने तुर्त ते शक्य नाही असे सांगितले. पण स्कॉलरशिपा देऊन पुढील शिक्षणाची सोय करता येईल असे ते म्हणाले.४

थोड्याच दिवसानंतर अस्पृश्यवर्गातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी मोठ्या रकमांच्या स्कॉलरशिपची सोय महाराजांनी केली आहे असे वृत्तपत्रात शिंदे यांना वाचावयास मिळाले.

बडोद्याच्या या मुक्कामातच विठ्ठल रामजी शिंदे यांना एका बिकट प्रसंगाला तोंड द्यावे लागले. शिंदे बडोद्याला येत आहेत हे समजल्यानंतर शहरातील प्रमुख मंडळींनी त्यांचे स्वागत करण्यासाठी पानसुपारीचा एक जाहीर समारंभ करण्याचे ठरविले. श्री. खासेराव जाधव यांचा या बाबतीत पुढाकार होता. समारंभामध्ये एकामागून एक जी वक्त्यांची भाषणे झाली त्यामधून प्रतिकूल सूरच निघू लागले. शिंदे यांचे सर्व शिक्षण मराठा समाजाच्या खर्चातून झाले आहे, विलायेतेला जाण्यायेण्याचा खर्चही महाराजांकडून मिळाला आहे असे असता हे मराठा समाजाच्या सेवेला हजर न होता प्रार्थनासमाजात शिरले हे बरे केले नाही, अशा प्रकारची भाषणे करून शिंदे यांच्या गळ्यात जेव्हा माळ घालावयास मंडळी पुढे आली तेव्हा त्यांनी म्हटले, “असे जर आहे तर मी ही माळ घालण्यास लायक नाही. म्हणून मी हातातच घेत आहे. प्रार्थनासमाज सर्वांसाठी आहे आणि त्यासाठी मला तयार केले हे मराठ्यांस, विशेषतः महाराजांना भूषणावहच आहे. स्वतः महाराज हेच जर केवळ मराठ्यांकरिता नाहीत तर त्यांचा अनुयायी मी निराळा कसा होऊ?”५ शिंदे हे मुळातच जातिभेदातील अशा कौटुंबिक संस्कारात वाढले होते. आता तर ते केवळ जातीच्या, पारंपारिक धर्माच्या पलीकडे असलेल्या एकेश्वरी उदार विश्वधर्माचे पाईक बनलेले होते. बडोदेकर मराठा मंडळींना त्यांनी अश प्रकारचे उत्तर देणे त्यांच्या वृत्तीशी आणि भूमिकेशी सुसंगत होते. ह्या उत्तरातून विठ्ठलराव शिंदे संतुष्ट असले पाहिजेत. श्रीमंत सयाजीराव महाराज यांच्याविषयी त्यांना अतीव आदर होता. महाराजांचे केवळ आर्थिक साह्यच त्यांना मिळाले होते असे नव्हे, तर पत्करलेल्या धर्मकार्यासाठी त्यांच्याकडून प्रोत्साहनही मिळाले होते. या भेटीत शिंदे यांना त्यांच्याबद्दलही कृतज्ञता प्रकट करता आली असणार आणि दुसरे, अस्पृश्य मुलांसाठी असलेल्या शाळा तपासण्याचे काम त्यांना करता आले. आयुष्यात त्यांनी महत्त्वाच्या मानलेल्या दुस-या एका कार्याचा प्रारंभही अशा प्रकारे झाला होता.

बडोद्याहून आल्यानंतर मुंबई प्रार्थनासमाजातील वडीलधा-या स्नेही मंडळींच्या आणि तरुण मित्रांच्या गाठीभेटी घेण्यात, चर्चा करण्यात शिंदे यांचे चार-सहा दिवस गेले. आपल्या वृद्ध, प्रेमळ मातापित्यांना भेटण्यास ते स्वाभाविकपणे उत्सुक असणार. मुंबईहून ते जमखंडीस गेले. त्यांच्या सहवासात काही दिवस राहून ऑक्टोबरच्या २७ तारखेस कोल्हापुरास आले. कोल्हापूरून लिहून आलेल्या व सुबोधपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या शिंदे यांच्याबद्दलच्या मजकुरावरून त्यांच्या ठिकाणी धर्मप्रचाराची तळमळ किती उत्कट होती, त्यांचा उत्साह किती दांडगा होता व कामाचा झपाटाही कसा वेगवान होता याची कल्पना येते. त्यात म्हटले आहे, “इंग्लंडहून येऊन १०/१५ दिवस झाले नाहीत तोच इकडे कोल्हापुरात हिंदुस्थानातील आपल्या धर्मप्रचाराच्या कार्यास त्यांनी सुरुवात केली असे म्हणावयास हरकत नाही. येथे असताना तीन-चार दिवसांत आपल्या मित्रमंडळींबरोबर बोलण्यास त्यांना ब्राह्मसमाजाशिवाय दुसरा विषयच नव्हता."६

कोल्हापुरातील तीन-चार दिवसांच्या मुक्कामातील पहिल्या रात्री राजारामीय क्लबमध्ये त्यांना निमंत्रित केले होते, तेथे जमलेल्या विद्वान मंडळींशी त्यांनी संभाषण केले. दुसरे दिवशी नेटिव्ह जनरल लायब्ररीमध्ये ‘धर्माचे शुद्ध स्वरूप’ या विषयावर व्याख्यान दिले. व्याख्यानात प्रत्येक धर्माचे मूळ स्वरूप अत्यंत शुद्ध असून परिस्थितीप्रमाणे त्यांचे स्वरूप अशुद्ध कसे होत जाते ते दाखवून दिले. तसेच हल्ली शुद्ध धर्माची स्थापना होण्यासाठी सुधारलेल्या जगात त्याचप्रमाणे हिंदुस्थानातील ब्राह्मसमाज, प्रार्थनासमाज यांसारख्या संस्थांचे जे प्रयत्न चालले आहेत त्यांची माहिती देऊन सांगितलेल्या गोष्टींविषयी कळकळीने विचार करण्याची विनंती केली. तिस-या दिवशी उपासना चालवली. उपदेशासाठी तुकारामांचा ‘धाई अंतरिच्या सुखे। काय बडबड वाचा मुखे।‘ हा अभंग घेतला होता.

पत्रलेखकाने अखेरीस शिंदे यांच्या ठिकाणी आरंभीचा उत्साह असल्यामुळे काम झपाट्याने करण्याची उमेदही जबर आहे असा अभिप्राय प्रकट करून “तथापि त्या उमेदीमध्ये आपल्या प्रकृतीची हयगय न होऊ देण्याबद्दल त्यांस विनंती केल्याशिवाय राहवत नाही” असे अगत्यपूर्वक म्हटले आहे.

शिंदे यांच्या ठिकाणी धर्मप्रचाराचे काम करण्याचा उत्साह व काम झपाट्याने करण्याची उमेद जबरदस्त आहे असे जे म्हटले ते अगदी सार्थ होते. त्यांनी पुढील काळात मुंबई प्रार्थनासमाजाचे व अखिल भारतीय पातळीवर जे कार्य विविध प्रकारे केले ते पाहता ह्या अभिप्रायाची सत्यता पटते. कोल्हापूरहून निघून शिंदे हे साता-यास १ तारखेस पहाटे ४ वाजता पोहोचले आणि आधी ठरल्याप्रमाणे प्रार्थनासमाजामध्ये सकाळी ८ ते १० उपासना चालविल्या. सातारा प्रार्थनासमाजाचे निष्ठावंत ज्येष्ठ सभासद सीतारामपंत जव्हेरे यांनी त्यांना निमंत्रित केले होते. सातारा येथील उपासनेचा विशेष म्हणजे अंत्यजादी जातींचीही बरीच मंडळी जमली होती. उद्बोधन, स्तवन, प्रार्थना हा उपक्रम पद्धतशीरपणे झाल्यानंतर तुकाराममहाराजांच्या ‘बुद्धि झाली साह्य परि नाही बळ । अवलोकितो जळ वाहे नेत्री।' ह्या अभंगाच्या आधारे अखेरीस उपदेश केला. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रा. ब. काळे यांच्या घरी संगतसभेप्रमाणे काही वेळ धार्मिक विषयाचे विवेचन झाले. त्यानंतर सातार युनियन क्लबमध्ये ठरल्याप्रमाणे साडेसहा ते साडेसात शिंदे यांचे भाषण झाले. श्रोतृवर्ग दीडेशेपेक्षाही जास्त होता. क्लबच्या धोरणानुसार अंत्यजादिक मानलेल्या मंडळींनाही निमंत्रण होते. व्याख्यान सगळ्यांना मनोवेधक वाटले. अध्यक्ष रावबहादूर नाडकर्णी यांनी व्याख्यात्याची प्रशंसा केली. रा. जव्हेरे यांनीही व्याख्यात्यांची साधी वागणूक वगैरे गुणांची प्रशंसा केली. सोमवारी दुपार होऊनही शिंदे उत्साहाने कार्यक्रमात भाग घेत होते. ४ ते ६ पर्यंत शहरातील रा. चिरमुले, रा. काळे, डॉ. बासू, रावबहादूर जोशी वगैरे मंडळींसमवेत वेगवेगळ्या ठिकाणी चर्चा, संवाद झाले. संध्याकाळी सव्वासहा ते साडेसातपर्यंत एका अंत्यजाच्या घरी त्यांनी उपासना चालविली व उपदेश केला. बायका-मुलांसह सुमारे पन्नाससाठ अंत्यजादिक मंडळी उपस्थित होती. उदार धर्माच्या तत्त्वाचे यथार्थ परिपालन शिंदे यांच्या कार्यक्रमामधून दिसून येते. कोल्हापूरच्या पत्रलेखकाने नमूद केल्याप्रमाणे शिंदे यांच्या ठायी असलेला उत्साह व झपाट्याने काम करण्याची प्रचंड उमेद याचा पडताळा त्यांच्या कार्यकालाच्या प्रारंभापासून मिळत राहिला.

जमखंडी येथे जाऊन आई-वडिलांना भेटून व कोल्हापूर, सातारा येथील दौरा आटोपून ४ नोव्हेंबरच्या सुमारास विठ्ठलराव मुंबईस परतले. रविवार दिनांक ८ नोव्हेंबर रोजी त्यांनी प्रार्थनामंदिरात ‘कर्मयोग’ या विषयावर धर्मपर व्याख्यान दिले.७ भगद्गीतेतील ‘यस्त्विन्द्रियाणि मनसा’ हा भगवद्गीतेली तिस-या अध्यायातील श्लोक व तुकाराममहाराजांच्या ‘प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी’ या अभंगाचे सूत्र घेऊन त्यांनी सखोल तसेच सुलभ विवेचन केले. ज्ञानानंतर म्हणजे यथार्थ ज्ञानानंतर दोन प्रकारची म्हणजे वेदांतांची व भक्तांची नैष्कर्म्य वृत्ती कशी निर्माण होते ह्याचे सुलभ दृष्टांताधारे विवरण केले. “ज्ञानयोग साधून संसारातून उठावे आणि प्रकृतीचे दास्य करावे की कर्मयोग साधून ईश्वराचे मित्र होऊन पृथ्वीवर स्वर्ग आणावा ह्या दोन भागांपैकी हा कर्मयोग साधणे आमच्या समाजाचा धर्म आहे. संसारात आनंदाने राहणे आणि तदंगभूत कौटुंबिक, सामाजिक, राजकीय इत्यादी जी अनेक सत्कर्मे असतील ती केवळ जडहित साधण्याच्या हेतूनेच नव्हे तर ईश्वरी योजना असे समजून, त्याची सेवा जाणूनबुजून करणे म्हणजे वरील कर्मयोग होय. अशा प्रकारे कर्मयोगाचे त्यांनी विवरण केले. प्रार्थनासमाजातील या अगदी प्रारंभिक व्याख्यानात त्यांनी संसारत राहून जी कर्मे करावयाची त्यामध्ये कौटुंबिक कर्माबरोबर सामाजिक, राजकीय सत्कर्मांचा निर्देश केला होता. शिंदे यांची स्वतःची धारणाही अशीच बनलेली होती. प्रार्थनासमाजाने धार्मिक अंगाच्या जोडीने सामाजिक कार्याला प्रत्यक्ष आरंभ केला होताच. राजकारणही त्यांना वर्ज्य नव्हते.
 
शिंदे यांची धर्मप्रचारक म्हणून औपचारिक नेमणूक अद्याप व्हावयाची होती. न्यायमूर्ती चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई प्रार्थनासमाजाची साधारण सभा १५ नोव्हेंबर १९०३ रोजी झाली व तीमध्ये शिंदे यांना सर्वानुमते समाजाचे धर्मप्रचार नेमण्याचे ठरले.८

शिंदे यांनी धर्मप्रचारकाच्या कार्याला आधीच आरंभ केला होता. आपल्या अंतःप्रेरणेने त्यांनी धर्मकार्याला वाहून घेण्याचा निश्चय केला होता. औपचारिक नेमणुकीची ते थोडीच वाट पाहणार?

संदर्भ
१.    होळकर ह्या नावानेही पद्यरचना श्री. आत्माराम सदाशिव केळकर यांनी केलेली आहे, अशी माहिती श्री. बी. बी. केसकर यांच्या हस्तलिखित टिपणात आहे. आत्मारामपंत हे सदाशिवराव केळकरांचे चिरंजीव. ह्यावेळी केळकर कुटुंबीयांचे वास्तव्य इंदुरास होते. म्हणून होळकर हे टोपण नाव. शिंदे यांची कगदपत्रे.
२.    बी. बी. केसकर यांचे हस्तलिखित टिपण, शिंदे यांची कागदपत्रे.
३.    सुबोधपत्रिका, ११ ऑक्टोबर १९०३. हे अनावृत्त पत्र एका तरुण सभासदाकडून आलेले म्हणून छापलेले आहे.
४.    वि. रा. शिंदे, ‘इलेव्हेशन ऑफ दि डिप्रेस्ड क्लासेस’, सुबोधपत्रिका, १७ डिसेंबर १९०५.
५.    विठ्ठल रामजी शिंद, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. १८९.
६.    सुबोधपत्रिका, नोव्हेंबर १९०३.
७.    तत्रैव, १५ नोव्हेंबर १९०३.
८.    तत्रैव, २२ नोव्हेंबर १९०३.

सत्याग्रहात सहभाग आणि नेतृत्व

विठ्ठल रामजी शिंदे हे मिशनच्या दगदगीच्या कामातून निवृत्त झाले होते. मात्र त्यांच्या आस्थेचे अनेक प्रश्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. धर्मकार्य ही तर त्यांची जीवननिष्ठा होती. मंगलोरहून परत आल्यावर पुण्यात कौटुंबिक उपासना मंडळाच्या कार्याला त्यांनी चालना दिली. १९२९ साली ब्राह्मसमाजाच्या शतसावंत्सरिक उत्सवनिमित्त त्यांनी मोठाच प्रचारदौरा काढला व उत्तरेकडील मोठा प्रवास संपवून ते परत आले. १९३०च्या आरंभीच्या काळात देशातील वातावरण बदलून गेले होते. म. गांधींच्या नेतृत्वाने सर्व हिंदुस्थानात एक प्रकारे चैतन्याचे वारे खेळत होते व भारतीय समाज स्वातंत्र्याच्या आकांक्षेने प्रभावित झाला होता. म. गांधींचे द. आफ्रिकेतील कार्य जेव्हापासून प्रकाशात येऊ लागले तेव्हापासून शिंदे म. गांधीच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झाले होते. गांधींच्या राजकारणाला धर्माचे अधिष्ठान आहे ही गोष्ट त्यांच्यामध्ये इतर राजकारण्यांहून वेगळी व अपूर्व आहे असे शिंदे यांना वाटत होते. ह्या कारणाने म. गांधीबद्दल त्यांच्या मनात नितांत आदराची भावना निर्माण झाली होती व ते म. गांधींना आजपर्यंत जगात निर्माण झालेल्या लोकोत्तर विभूतींपैकी मानू लागले होते. म. गांधीबद्दलची ही आदराची भूमिका त्यांच्या लेखनामधून, व्याख्यानांतून स्पष्टपणे जाहीर होऊ लागली होती. १९३० च्या प्रारंभी गांधीच्या प्रभावाने हिंदुस्थानातील वातावरण बदलले असतानाच स्वत: विठ्ठल रामजी शिंदे कृतिशील राजकारणात ओढले जावेत अशा प्रकारची घटना घडली.


पुणे शहर सत्याग्रही मंडळाधिकारी
दे. भ. बाळूकाका कानिटकर व हरिभाऊ फाटक यांनी विठ्ठल रामजींची मार्च १९३० मध्ये भेट घेतली व एप्रिल महिन्यात पुणे जिल्ह्यातील कायदेभंग चळवळीचे त्यांनी नेतृत्व करावे अशी विनंती केली.१ ह्या प्रकारच्या कामाला शिंदे यांच्या मनाची सर्वथैव अनुकूलताच होती. कानिटकर, फाटक यांची विनंती शिंदे यांनी मान्य केली. विठ्ठल रामजी शिंदे यांचा प्रभाव आणि देशातील राजकीय परिस्थितीचा बदललेला देखावा याचा परिणाम होऊन केशवराव जेधे हे काँग्रेसच्या राजकारणाला अनुकूल झाले होते. सत्यशोधक समाज आणि ब्राह्मणेतर पक्ष यांच्याकडे असलेला त्यांचा ओढा कमी झालेला होता वक काँग्रेसच्या राजकारणाकडे ते आकृष्ट झाले होते. विठ्ठल रामजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रहाच्या चळवळीत केशवराव जेधे यांनीही सामील व्हावयाचे ठरवले  त्याप्रमाणे ते झालेही.


पुणे जिल्ह्यातील खेडोपाडी पायी दौरा करुन लोकांमध्ये जागृती करणे व अखेरीस मिठाचा सत्याग्रह करणे असे या चळवळीचे स्वरुप होते.


अण्णासाहेब शिंदे यांनी एप्रिल महिन्याच्या तिस-या आठवड्यात सोमवारी सकाळपासून आपला पहिला दौरा हवेली तालुक्यात काढायचे ठरवले. त्यांच्याबरोबर दहा-पंधरा स्वयंसेवकांची तुकडी होती. बरोबर प्रो. धर्मानंद कोसंबी व केसवराव जेधे होते. दौ-यासाठी तुकडी जेव्हा निघत असे तेव्हा सत्याग्रहाचा मोठा झेंडा पथकाच्या अग्रभागी फडकत असे.

बाजाची पेटी, टाळ ही साधने पथकाबरोबर असत. त्याचप्रमाणे प्रभातफेरीच पद्यावली प्रत्येकाच्या हातात असे.

 

डफ-तुणतुण्यासहित पोवाडेवाल्यांचा एक ताफाही त्यांच्याबरोबर असायचा. खेडेगावात प्रचारदौरा काढण्याच्या दृष्टीनेच अनुरुप अशी ही सगळी सिद्धता शिंदे यांनी केली होती. खरे तर ब्राह्मधर्माच्या प्रचारार्थ शिंदे ज्या वेळेला खेडेगावात व अस्पृश्य वस्तीत फेरी काढत असत, तेच स्वरुप या सत्याग्रहाच्या दौ-यामध्ये त्यांनी ठेवले होते.


फर्ग्युसन कॉलेज ही अण्णासाहेबांच्या दृष्टीने केवळ शिक्षणाच्या बाबतीतच मातृसंस्था होती असे नव्हे, तर त्यांच्या दृष्टीने उदात्त कार्याचे ते एक पवित्र ठिकाणही होते. १९०९ साली मिशनचा पहिला त्रैवार्षिक बक्षीस समारंभ श्रीमंत सयाजीराव गायकवाडांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी फर्ग्युसन कॉलेजच्या परिसरातच साजरा केला होता. त्याप्रमाणे डॉ. रा. गो. भांडारकर यांच्या अध्यक्षतेखाली १९९२ साली मिशनची ऐतिहासिक स्वरुपाची महाराष्ट्र परिषदही तेथेच भरविली होती. असा या फर्ग्युसन कॉलेजच्या समोर येऊन त्यांच्या पथकाने प्रथम झेंडावदन केले व दापोडी गावास जाण्यासाठी कूच केले.


तेथून पुढे प्रत्येक खेडेगावात प्रथम प्रभातफेरी म्हणत उभ्या उभ्याच व्याख्याने देत ते पुढच्या गावी जात असत. ह्या सत्याग्रही पथकाचे स्वागत करण्याच्या बाबतीत खेडेगावच्या लोकांत अतिशय उत्साह दिसून येत होता. दोन प्रहरी एखाद्या गावी जेवणाचा बेत आधीच ठरलेला असे. स्नान वगैरे आटोपल्यावर जेवणास वेळ असल्यास पोवाडे सुरु होत.

चिचवड, देहू, आळंदी, लोणी, लोहगाव वगैरे लहान-मोठी सर्व गावे करुन पाहिल्या आठवड्यात बहुतेक हवेली तालुक्यातील प्रचारदौरा संपविला. या पहिल्या आठवड्यात जवळ जवळ शंभर मैलाचा पायी प्रवास झाला. दौ-याचा कार्यक्रम वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध होत असे. पथकाच्या स्वागतार्थ बायकामुले झेड्यांची वाट पाहत हद्दीवर येऊन बसत. शिंदे यांच्या नेतृत्वाखालचा दौरा इतका लोकप्रिय झाली की, एका गावचे लोक त्यांना निरोप देण्यासाठी गावाच्या हद्दीपर्यंत पोहोचवायला जात, तर दुस-या गावचे लोक स्वागतासाठी सामोरे येत.


ह्या काळात स्वातंत्र्याच्या आकांक्षेने सगळे वातावरण कसे भारुन गेले होते याचा निदर्शक हा एक प्रसंग पहिल्या आठवड्याचा हा दौरा संपवून शेवटचे खेडेगाव-लोहगाव-तेथून त्यांचे पथक येत होते. येरवड्याच तरुंग वाटेवरच होता. तुरुंगाच्या बाहेर उभे राहून पथकाने एक गाणे म्हटले.  झेंड्याचा जयजयकार झाला. त्यामध्ये कौद्यांनीही भाग घेतला व पोलीसही कौतुकाने पाहत होते.


येरवड्याजवळील धर्मशाळेत पथकाची उतरण्याची सोय केली होती. तेथे सहभोजन झाले. त्यामध्ये खेडेगावातील शिष्टमंडळीही सहभागी झाली. सायंकाळी पुण्यात प्रवेश करुन शिवाजीमहाराजांच्या पुतळ्यास हार घालून बुधवार चौकातून मिरवणुकीने सदाशिव पेठेतील शिवाजी मंदिरात सर्वजण आले. तेथील सभेत शिंद्यांनी आपल्या आठवड्याच्या दौ-याचा वृत्तान्त सांगितला. हा दौरा म्हणजे धार्मिक वारक-यांची एक दिंडीच बनलेली होती. कारण त्यांचे नेतृत्व हे राजकारणाकडेही धर्मनिष्ठ वृत्तीने बघणा-या विठ्ठल रामजींकडे होते. भल्या पहाटे उठून साडेपाच वाजता सर्वजण उपासनेस बसत. उपासनेच्या वेळीं शिंदे त्यांना पथकाची शिस्त, त्यांनी चालविलेल्या कार्याचे पावित्र्य आणि जबाबदारी, अनत्याचार आणि सहनशीलता यांचे महत्त्व समजावून सांगत असत. शिंद्यांचा उपदेश हा केवळ शिस्तीच्या पालनासाठी नव्हता, तर राजकारणात आवश्यक असलेल्या नैतिक आचरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता.


अण्णासाहेबांनी दुसरा दौरा खेड तालुक्यामध्ये काढला. यावेळी पथकात वीस स्वयंसेवक होते. मंचर, जुन्नर, नारायणगाव वगैरे खेड्यांतून दौ-याचे मोठ्या थाटाने स्वागत झाले. ह्या दौ-यात प्रथम मीठ विकण्याचा कायदेभंग सुरु केला. दांडी येथून मिठाची मडकी आणली होती. त्याला गांधीमीठ असेही म्हणण्यात येत असे. केव्हा केव्हा मिठाचा लिलाव होऊन पैसे जम. स्वयंसेवक कॅप्टन कृष्णाराव महादेव काळे हे तडफदार तरुण होते. गाडगीळ व लिमये ही दोन मुले बहारदार पोवाडे म्हणत, असे त्यांनी नमूद केले आहे.


उन्हाळ्याचे दिवस असल्याने काही ठिकाणी जत्रा भरलेल्या होत्या. याचा फायदा दौ-याला झाला. सभेतील व्य़ाख्यान झाल्यावर विदेशी कापडाची होळी होत असे. मात्र त्या वेळी कोणावरही जुलूम होणार नाही याची दक्षता घेतली जाई. काही सरकारी अधिका-यांची मुले आपल्या वडिलांच्या देखत आपल्या डोक्यावरच्या किमती विदेशी टोप्या होळीत फेकीत असत. सभेला पाचृसात हजारांचा जमाव जमत असे. लोकांना जणू काय या दौ-याचे वेडच लागले होते.


तिसरा दौरा भीमाशंकर व त्यापलीकडील गावी निघाला. ह्या बाजूला कोळ्यांची वस्ती विशेष प्रमाणात होती. त्यांना दारु न पिणे, चोरी न करणे, अत्याचार न करणे वगैरे सात्त्विक तत्त्वे समजावून सांगणे कठीण गेले. एक-दोन ठिकाणी सभेमध्ये ज्या वेळेला अस्पृश्यांना वेगळे बसविल्याचे शिंदे यांना दिसून आले त्या वेळी पथकाने आपले ठाणे अस्पृश्य जमावात नेले व अस्पृश्येतरांनाच वेगळे ठेवले. अस्पृश्यता मोडण्याचे असे प्रात्यक्षिक फारच परिणामकारक होते. दौ-यामधील व्याख्यानांतून समतोल स्वरुपाची शिकवण सांगितली जात असे. सरकारचा द्वेष करावा असे कधीच सांगितले गेले नाही. सरकारचे पुष्कळ कायदे आपल्या हिताचेच आहेत, ते अवश्य पाळावे असे सांगितले जाई. जे कायदे प्रजेच्या हिताचे नसतात व जे प्रजेच्या विरोधात न जुमानता केलेले असतात असेच कायदे पाळू नयेत, असे प्रतिपादन दौ-यामधून केले जात असे.


दौ-याचे स्वरुप चैतन्यदायी होते. आपला पहिला दौरा संपवून विठ्ठल शिंदे, धर्मानंद कोसंबी व केशवराव जेधे पथकासह पुण्यास परत आले. ह्या तिघांचीही सत्याग्रहाच्या दौ-यात आलेल्या अनुभवाचे कथन करण्यासाठी ता. १६ एप्रिल रोजी सायंकाळी पुण्याच्या शिवाजी मंदिरमध्ये सभा भरविण्यात आली. 'शांततामय स्वातंत्र्ययुद्धास मदत करा.', 'मिठाचा कायदा मोडा, मीठ तयार करा', 'गांधीमीठ विका', अशा पाट्या झळकवीत व महात्मा गांधीचा जयघोष करीत ते तिघे सत्याग्रही वीर शिवाजी मंदिरात पोहोचले. सभेला रा. ब. डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली. पुणे शहर सत्याग्रही मंडळाधिकारी बाळूकाका कानिटकर यांचे 'लाभेल त्याच काळा स्वातंत्र्य भारताला' हे पद झाल्यावर अध्यक्ष डोंगरे यांनी अण्णासाहेबांना भाषण करण्याची विनंती केली. शिंदे यांना दौ-याचे फारच श्रम झाले होते, त्यांचा आवाज बसला होता, तरीही त्यांनी ह्या प्रसंगी भाषण केले. "आपण या कामाला का पडलो, खेडेगावातच जाण्याचे कारण काय ह्याबद्दलची भूमिका मांडणे तसेच खेडेगावात आलेले अनुभव सांगणे हा आपला मुख्य उद्देश असल्याचे" त्यांनी म्हटले.

"अलीकडील पाच-दहा वर्षांत चळवळ करण्याबाबतीत आपण वस्तुत: निवृत्त झालो होतो. राष्ट्रीय चळवळीत पडण्यापूर्वी सर्वांनी म्हणजे-ब्राह्मण-अब्राह्मण यांनी-एक झाले पाहिजे व एका राष्ट्रीय पक्षात असावयास पाहिजे ही माझी भूमिका आहे. मी शहर सोडून खेड्यात गेलो याचे कारण शहरातील सुशिक्षित लोकांची प्रवृत्ती खेडेगावाकडे नाही.

कलकल्ता, मद्रास वगैरे मोठ्या शहरांत सत्याग्रहाचा वणवा पेटला आहे. परंतु माझे मत वेगळे होते. ब्राम्हण विद्वान पंडित जागृत झाले आहेत. तरी नोकरशाहीच्या पोटाला चिमटा बसविणारा एकच वर्ग म्हणजे शेतकरी हे आहेत. (टाळ्या). पंचम जॉर्ज, पार्लमेंट, कोणीही दोषी नाही. नोकरशाही दोषी आहे. यांचा पगार २१,००० पासून खाली येण्याकरिता शेतकरी जागे झाले पाहिजेत. शेतकरी खरे मालक आहेत. नोकरशाहीला पगार देण्याला तेच समर्थ आहेत.... शेतक-यांना भेटायला आम्ही मोटारीतून जाऊ नये. पायी गेले पाहिजे.

मोटारीतून गेल्यास त्यांना वाटते, कलेक्टर आला की काय! आम्ही त्यांच्यासारखे होऊन खेड्यातून, काट्यांतून गेलो, मिठाचा कायदेभंग ही सरकारला 'डेंजरस सेंटिमेंट' वाटते स्वातंत्र्याची भावनाही त्यांना 'डेंजरस' वाटते. म. गांधीची सक्त आज्ञा आहे की दोषयुक्त वर्तन कराल तर मी प्रायोपवेशन करीन, मात्र आम्हाला अन्यायाची चीड आली पाहिजे. पण शेतक-यांना राग कसा आणणार? जर शेतक-याला सांगितले की, सरकार तुमचे नोकर आहे तर त्यांना वाटणार मायबाप सरकार आमचे नोकर कसे होतील? त्यांची मन:सरणी पहावयास आम्ही तेथे गेलो. सरकार उत्तम प्रकारचे नोकर नाहीत, अशी त्यांची समजूत पाडावी, असा आम्ही प्रयत्न  केला.


"ह्या दौ-यात आम्ही एकंदर २६ गावे हिंडलो. ४० व्याख्याने झाली. सर्व प्रवास पायी केला. ह्या प्रवासात काही विशेष गोष्टी आढळल्या. एखाद्या वेळी खेडेगावात दूध मिळणे मुश्कील होऊन जाई. हे ऐकून तुम्हास आश्चर्य वाटेल. आम्हांस गुरे भेटली, पण दूध मात्र नाही. याचे कारण दूध शहराकडे. दूध, तूप पाहिजे असेल तर मुंबई, पुण्यासच राहिले पाहिजे; खेडेगावात मिळणे मुश्कील. दुसरी अडचण भाषेची. शेतक-यांची भाषा मराठी. आमची भाषा मराठी पण फरक इतका की, आमची सुधारलेली मराठी असल्याने त्यांना समजण्यास कठीण जाते. खेड्यांतील कुणब्यांची मराठी आम्हांस आली पाहिजे. आपणास इंग्रजी येत असल्यामुळे पूर्ण मराठी येत नाही.


"शेतक-याला कायद्याची भीती वाटते, तितकी दुष्काळाची, एखाद्या भुताचीसुद्धा वाटत नाही. खेड्यांत आणखी एक विशेष गोष्ट पाहण्यास येते. पुरुषवर्ग फारसा घरी नसतो. खेड्यांत दुसरे साधन न राहिल्यामुळे हे पुरुष शहरांतून फॅक्टरीमध्ये कामाला गेलेले आढळले. पुण्यातील पंचक्रशीतील बरेच शेतकरी खडकीच्या दारुगोळ्याच्या फॅक्टरीत आहेत.
"आम्ही खेड्यांतून फिरत असता आणखी एक गोष्ट माझ्या नजरेस आली. एक खेड्यात-चिंचोळीला मराठ्यांच्या मुलाबरोबर महारांच्या मुलाला शाळेत घेतले जात नाही. त्यांच्या उलटही प्रकार दिसला. मराठ्यांजवळ महारांची मुले बसली होती.


"एकंदर आम्ही सतराजण अकरा गावी गेलो. येथील विद्यार्थिवर्ग खेड्यापाड्यांतून फिरून येईल. तर त्यांना दिसेल की, खेड्यांतच खरे हिंदुस्थान भरले आहे. गांधींचे नाव खेडोपाडीसुद्धा माहीत आहे. गावची मुले आमच्यामागे लागून 'गांधीजी की जय' ओरडत. एक खेड्यात तर एकाने आम्हांस विचारले, गांधींचे मीठ आणले आहे काय? हा प्रश्न विचारणारा मारवाड्याचा मुलगा होता. आम्ही शेवटी येरवड्यास जाऊन आलो. तेथे जाताच राष्ट्रगीत म्हणण्यास सुरुवात केली. तेथील त्या उंच उंच भिंती, पोलीस सार्जेंट. त्यांच्यासमोर तुरुंगाच्या दारात झेंडा उभा केला. इतक्यात मिलिटरी ऑफिसर येऊन प्रथम झेंड्याला सलामी करुन म्हणाला, "परेड चालली आहे, गाणे बंद करा." समोरून कैद्यांचा एक तांडा येत होता, त्यांच्यासमोर म. गांधी की जय म्हणताच आतील दोन हजार कैदी म. गांधी की जय करु लागले." व्याख्यानाच्या शेवटी अण्णासाहेबांनी आणखी एक चित्तवेधक घटना सांगितली. "पुढे जाताना येरवड्यास एक तमाशा सुरु होता. मी प्रथम तेथे गेलो. मी तेथे जाताच एकाने मला म्हटले पुढे बसू नका. त्याला वाटले की मी तमाशा बघण्यास आलो आहे. मी सांगितले की मी एकटाच नसून आमची आणखी पंधरा माणसे यावयाची आहेत. आम्ही गांधींचा निरोप तुम्हास सांगावयास आलो आहे. हे सांगताच सर्व मंडळी तो तमाशा सोडून आमचा निरोप ऐकण्यास येऊन उभी राहिली. त्याच कित्येक वडारी बायकासुद्धा येऊन उभ्या राहिल्या. याप्रमाणे कार्य करुन परत आता येथे आलो आहोत."


शिंदे यांनी जागृतीचे कार्य खेडेगावांतील शेतक-यांतच करणे कसे आवश्यक आहे हे प्रारंभी सांगितले. आपल्या भाषणातून म. गांधीची अनत्याचारी सत्याग्रहाची भूमिका कोणत्या पायावर उभी आहे, याबद्दलचा संदेश खेडेगावातील लोकांपर्यंत आपण कसा पोहोचविला याचे कथन केलेच, पण खेडेगावांतील वातावरणसुद्धा म. गांधींच्या प्रभावाने कसे भारले होते याचे यथातथ्य चित्र उभे केले.


प्रो. धर्मानंद कोसंबीनी आपल्या भाषणात तरुणांना सांगितले की, " एक वर्ष तुम्ही शाळा सोडली तरी चालेल पण बाळूकाकाच्या पथकात नाव नोंदवून खेडेगावची सफर करा." केशवराव जेधे म्हणाले, "आम्ही म. फुले पथक काढणार आहोत, ब्राह्मणेतर सत्याग्रहात सामील होण्यास तयार आहेत. आम्ही या चळवळीविरुद्ध नाही. स्वराज्य अज्ञजनाकरिता पाहिजे. शेतकरी लोकांकरिता पाहिजे. आम्ही लोकगावच्या म्हारवाड्यात गेलो. तेथे त्यांना उपदेश केला, की ही चळवळ तुमच्या हिताकरिता आहे. गुरुवर्य शिंदे, प्रो.कोसंबी हे तुरुंगात जाण्यास तयार आहेत. मी मराठा आहे हे विसरुन अस्पृश्यांकरिता या मडळीस सामील झालो. ब्राह्मणेतर सत्याग्रहात भाग घेण्यासाठी तयारच आहेत," सभेच्या शेवटी बाळूकाका कानिटकरांनी साकल्याने सत्याग्रहाबद्दलची माहिती सांगितली व "तारीख १७ला संध्याकाळी पेण व मालवण येथे दोन पथके रवाना होत असून त्यामध्ये दोन मुसलमान बोहरी दाखल झाले आहेत," हे सांगून गांधींच्या "या सत्याग्रहास मुसलमानांची सहानुभूती नाही" हा टाइम्सकाराचा आरोप खोटा असल्याचे प्रतिपादिले. हिंदू, मुसलमान, अस्पृश्य, शहरी लोक आणि खेडेगावांतील शेतकरी ह्या सर्वांमध्ये स्वातंत्र्याची जाणीव व एकोप्याची भावना जागृत झाल्याचे ह्या सत्याग्रहाच्या रुपाने दिसून आले.


केशवराव जेधे आपल्या भाषणात म्हणाले होते की, "गुरुवर्य़ शिंदे, प्रो. कोसंबी तुरुंगात जाण्यास तयार आहेत." दोघांपैकी निदान शिंदे यांच्याबाबतचे जेध्यांचे भाकीत खरे ठरले. तीन आठवड्यांनंतर शिंदे यांना १२ मे रोजी तुरुंगाच्या दारातून आत प्रवेश करावा लागला.


पुणे जिल्ह्यातील सत्याग्रह चळवळीला नेतृत्व देऊन व तीमध्ये सहभागी होऊन राजकीय चळवळीला आध्यात्मिक अधिष्ठान देऊन तिचे कसे उन्नयन करता येते याचा एक आदर्श वस्तुपाठच अण्णासाहेब शिंदे यांनी दिला असे म्हणता येते. महात्मा गांधींचे ते खरेखुरे समानधर्मी होते याचा उत्तम प्रत्ययही आपल्याला या निमित्ताने येतो.