शिंदे आणि ब्राह्मणेतर पक्ष

विठ्ठल रामजी शिंदे यांनी १९०३च्या अखेरीपासून धर्मप्रचाराच्या कार्याला सुरुवात केली व अस्पृश्यतानिवारणाचे कार्यही धर्मकार्यच आहे असे समजून दोन-तीन वर्षांनंतर त्याही कार्याला जोरदार प्रारंभ केला. मिशनची स्थापना केल्यानंतर पाच-सहा वर्षांतच मिशनच्या कामाचा प्रसार महाराष्ट्रात आणि गुजरात, कर्नाटक, मद्रास ह्या प्रांतांमध्ये वेगाने झाला. शिंदे यांचे अस्पृश्यवर्गासाठी जोमाने कार्य चालू होते. त्या सुमारास म्हणजे विसाव्या शतकाच्या दुस-या दशकामध्येच महाराष्ट्राच्या आणि हिंदुस्थानच्या राजकारणाचे चित्र झपाट्याने बदलू लागले.


छत्रपती शाहूमहाराज कोल्हापूर संस्थानच्या गादीवर आल्यापासून संस्थानच्या कारभारामध्ये लक्ष घालू लागले. त्यांच्या असे लक्षात आले की, आपल्या संस्थानातील महत्त्वाच्या अधिकारपदांवर, त्याचप्रमाणे नोकरीच्या जागांवर ब्राह्मण जातीतीलच लोक आहेत. शाळा-कॉलेजातील शिक्षकवर्ग ब्राह्मणच व शिकणा-या विद्यार्थ्यांत बहुसंख्य आणि नाममात्र बहुजन समाजातील विद्यार्थी असत. हे चित्र बदलून टाकणे आवश्यक आहे असे शाहूनहाराजांना वाटू लागले व त्यांनी कोल्हापूर संस्थानात व शहरात बहुजन समाजाला शिक्षणविषयक सवलती उपलब्ध करून दिल्या. बहुजन जमाजाच्या विविध जातींसाठी बोर्डींगे काढून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचा प्रसार अधिकाधिक प्रमाणात व्हावा यासाठी जोराने प्रयत्न सुरू केले. न्यायाच्या दृष्टीने हे करणे आवश्यकच होते. परंतु भावी काळात आपण अधिकारपदांना व सोयीसवलतींना आचवणार या कल्पनेने ब्राह्मणवर्गाने शाहूमहाराजांवर ब्राह्मणद्वेषाचा आरोप करावयास सुरुवात केली. तशातच कोल्हापुरात वेदोक्त प्रकरण उदभवले व त्यातून ब्राह्मणांचा अहंकार उफाळून आल्याचे चित्र दिसले. त्यात भर म्हणून लो. टिळकांनी कोल्हापुरातील ब्राह्मवर्गाची बाजू उचलून धरली. केवळ केसरीनेच नव्हे तर सातारचे विश्ववृत्त, नाशिकचे प्रकाश इत्यादी ब्राह्मणी वृत्तपत्रे शाहूमहाराजांवर अन्याय्य स्वरूपाची टीका करू लागली. ह्या सा-याचा परिणाम होऊन महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण व ब्राह्मणेतर असे दोन तट पडले. १९११ नंतर सत्यशोधक समाजाची अधिवेशने महाराष्ट्रातील लहानमोठ्या गावांमध्ये भरू लागली. बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार थोडाफार वाढला व ब्राह्मणेतरांच्या जातीनिहाय परिषदा भरू लागल्या. एकंदरीत बहुजन समाजात, निदान सामाजिक पातळीवर जागृतीचे चिन्ह दिसू लागले. लो. टिळकांनी तुरुंगातून सुटून आल्यानंतर १९१५च्या सुमारास होमरूल चळवळीस आरंभ केला. ही चळवळ आपल्या विरोधात आहे असे ब्राह्मणेतरवर्गातील लोकांना वाटू लागले. ह्या सगळ्या बाबींचा परिणाम होऊन ब्राह्मणेतरांची राजकीय चळवळ सुरू झाली.


शाहूमहाराजांच्या प्रोत्साहनाने पुण्यामध्ये बाबुराव जेधे व अन्य मराठा समाजातील पुढारी सत्यशोधक चळवळीचे पुरस्कर्ते बनले. परंतु या चळवळीला केवळ सत्यशोधक समाजाची चळवळ एवढेच स्वरूप न राहता ब्राह्मणविरोधाची धार अधिक तीव्र होऊ लागली. भास्करराव जाधवांसारखे बुद्धिमान नेते चळवळीला मिळाले. त्याचप्रमाणे वा. रा. कोठारी हेही काही काळ म्हणजे १९१६ ते १९२३ पर्यंत पाच-सात वर्षे ह्या चळवळीशी संबंध ठेवून होते. मराठा, जैन व लिंगायत ह्या जातींतील पुढारी प्राधान्याने ब्राह्मणेतर पक्षाचे कार्य करू लागले. सत्यशोधक समाजाचे सामाजिक सुधारणेचे व्यापक विचारसरणीचे अधिष्ठान ढळून प्रखर ब्राह्मणविरोधी असे काहीसे स्वरूप ह्या चळवळीला येत गेले. अर्थात ह्याचा दोष मात्र सर्वस्वी ब्राह्मणेतरवर्गाकडे जात नाही. विठ्ठल रामजी शिंदे यांनीच एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे, “ब्राह्मणेतरांचा जातिवाद हा ब्राह्मणांच्या जातिवादाची प्रतिक्रिया असतो.”


विठ्ठल रामजी शिंदे यांना म. जोतीबा फुले यांच्या विचारसरणीबद्दल आदर वाटत होता. जोतीबा फुले यांचा पहिला उल्लेख त्यांनी डिसेंबर १९०५ मध्ये इंडियन मेसेंजरमध्ये लिहिलेल्या इंग्रजी लेखात केलेला आहे. फुले यांच्या सार्वजनिक सत्यधर्मात प्रकट झालेली उन्नत धर्मदृष्टी हीही शिंदे यांना जवळची वाटत असणार. मात्र १९१६च्या सुमारास सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर मंडळी यांनी एकत्र येऊन जी ब्राह्मणेतर चळवळ सुरू केली तिच्यातील सगळे धोरण शिंदे यांना मान्य होण्याजोगे नव्हते. ब्राह्मणेतर पक्षातील आत्यंतिक राजनिष्ठेचा भाग शिंदे यांना मंजूर नव्हता. त्या वेळेला राजकीय पटलावर चित्र असे होते की, टिळकपक्षीयांना अथवा राष्ट्रवादी जहालांना (यामध्ये प्रामुख्याने शिकलेले ब्राह्मण होते) स्वराज्य पाहिजे आहे व ब्राह्मणेतर मंडळींना मात्र इंग्रजांचे राज्य चालू राहण्यात आपले म्हणजे बहुजन समाजाचे हित आहे व त्यासाठी इंग्रजांचीच सत्ता येथे चालू राहावी अशी त्यांची धारणा बनलेली होती. नेमस्त मंडळी व ब्राह्मणेतर यांच्यामध्ये इंग्रजनिष्ठा व सामाजिक सुधारणा ह्यामध्ये सारखेपणा होता. मात्र सगळ्याच सामाजिक सुधारणेबद्दल जी आच ब्राह्मणेतरांना होती ती त्या प्रमाणात नेमस्तांना नव्हती. वा. रा. कोठारी हे एक प्रकारे ब्राह्मणेतर व नेमस्त यांच्यामधील दुवा होते. परंतु ब्राह्मणेतरांच्या एक-दोन सभांमध्ये येऊन प्रा. वा. गो. काळे यांनी तेवढी भाषणे केली. प्रा. केशवराव कानिटकर, हरिभाऊ लिमये, काकासाहेब लिमये, बापूराव आंबेकर, एस्. जी. वझे ह्या नेमस्त मंडळींचा ब्राह्मणेतर पक्षाला प्रत्यक्ष कार्यरूपाने फारसा पाठिंबा मिळाला नाही.


महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणेतरांबद्दल व विशेषतः मराठ्यांबद्दल ते स्वातंत्र्यविरोधी आहेत असे जे चित्र निर्माण झाले होते, ते रास्त नाही व वस्तुस्थितीला धरूनही नाही असे शिंदे यांना वाटत होते. अमरावतीच्या जाहीर सभेत शिंदे यांनी प्रथम ह्या बाबीची स्पष्टता करून मराठे हे स्वातंत्र्यप्रेमी व राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या बाजूचे आहेत असे स्पष्टपणे सांगितले व १९१७ साली पुण्यास शनिवारवाड्यासमोर त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व जातींची सभा भरून राष्ट्रीय स्वातंत्र्याला पाठिंबा जाहीर करण्यात आला. ह्या घटनेचा प्रतिक्रियात्मक परिणाम म्हणून ब्राह्मणेतर पक्ष अधिक संघटित होऊ लागला.


राष्ट्रवादी टिळपंथी हे स्वराज्याला अनुकूल होते व सामाजिक सुधारणेला विरोधी होते. सामाजिक सुधारणेचा पाठपुरावा केला तर शिकलेल्या उच्चवर्णीयांचे आपल्याला पाठबळ राहणार नाही व त्यामुळे स्वराज्याची चळवळ कमकुवत होईल असे त्यांना वातट होते. हा केवळ स्वराज्याविषयक धोरणाचाही भाग असेलच असे खात्रीपूर्वक म्हणता येत नाही. ह्या पक्षात असलेल्या बहुतेक उच्चवर्णीय ब्राह्मणांना अन्य मगासवर्गीयांची उन्नती व्हावी व ते आपल्या दर्जाचे बनावेत असे मनोमन वाटत नसले पाहिजे असे सातारच्या दादासाहेब करंदीकरांच्या वेळोवेळी प्रकट झालेल्या प्रतिक्रियांवरून वाटते. एक प्रकारचा तुच्छताभाव उच्चवर्णीयांच्या ठिकाणी इतर जाती व अस्पृश्यवर्ग यांच्याबद्दल असला पाहिजे. म्हणून सामाजिक सुधारणेची उपेक्षा करून स्वराज्याच्या प्राप्तीला ते अग्रक्रम देत होते. उलट ब्राह्मणेतर पक्षातील मंडळींना असे वाटत होते की, स्वातंत्र्य मिळाले तर केवळ उच्चशिक्षित ब्राह्मवर्गाचाच फायदा होईल आणि शिक्षणाच्या अभावी ब्राह्मणेतरवर्ग मात्र तसाच अवनत स्थितीत राहील व ब्राह्मणी वर्चस्वाखाली त्यांचे हाल होत राहतील. राजकीय पारतंत्र्यापेक्षाही सामाजिक पातळीवरील नीचत्वाची दशा ही ब्राह्मणेतरांच्या चिरंतन दुःखाचे मूळ ठरू शकेल. म्हणून इंग्रजांना विरोध न करता त्यांच्या राज्यात बहुजन समाजाची जास्तीतजास्त सुधारणा करून घ्यावी, इंग्रजी राज्यात आपला फायदा करून घ्यायचा असेल तर इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले पाहिजे, ह्या धोरणानुसार ब्राह्मणेतर पक्ष वागत असे.


राष्ट्रवादी जहाल आणि इंग्रजानुकूल ब्राह्मणेतर पक्ष यांच्यापेक्षा विठ्ठल रामजी शिंदे यांची भूमिका वेगळी वैशिष्ट्यपूर्ण अशी होती. शिंदे हे अस्पृश्यादीवर्गाच्या आणि बहुजन समजाच्या शिक्षणाला जरून महत्व देत होते. परंतु स्वातंत्र्याची वृत्ती शालेय शिक्षणाच्या अभावीसुद्धा असू शकते अशी त्यांची धारणा होती. मराठा समाज तर इतिहासकाळापासून स्वातंत्र्यप्रेमी व स्वातंत्र्यासाठी लढणारा व स्वातंत्र्य उपभोगणारा म्हणून प्रसिद्ध आहे. ह्यासाठी ब्राह्मणेतरांनी अथवा बहुजन समाजाने स्वराज्यविरोधी असण्याचे मुळीच कारण नाही. शिंदे हे विद्यार्थिदशेपासूनच राष्ट्रवादी विचारसरणीचे होते. ऑक्सफर्ड युनिटेरियनांच्या स्नेहसंमेलनात तेथील इंग्रज श्रोतुवर्गासमोर त्यांनी आपले जहाल राष्ट्रवादी विचार प्रकट केले होते हे आपण पाहिले आहेच. अस्पृश्यतानिवारणाचे कार्य हाती घेतल्यानंतर आपली राजकीय मते ह्या कार्याच्या आड येऊन नयेत यासाठी आपल्या राजकीय मतांच्या प्रकटीकरणाच्या संदर्भात शिंदे एक प्रकारे संयम दाखवीत आले होते. परंतु १९१६-१७च्या सुमारास राजकीय चित्र बदलल्यानंतर मराठे हे राष्ट्रीवृत्तीचे आहेत हे स्पष्टपणाने सांगणे व त्यासाठी ‘मराठा राष्ट्रीय संघा’ची स्थापना करणे त्यांना गरजेचे वाटले. या काळातील विविध पक्षांच्या भूमिकांपैकी शिंदे यांना कोणत्याही एका पक्षाची भूमिका पूर्णपणे मान्य करम्याजोगी वाटत नव्हती. राजकीयदृष्ट्या जे जहाल होते त्यांचा सामाजिक सुधारणेबद्दलचा प्रतिगामीपणा त्यांना मंजूर नव्हता. राजकीय मवाळ सामाजिक सुधारणेबद्दल निदान शाब्दिक पाठिंबा का होईना प्रकट करत होते तो शिंदे यांना योग्य वाटत असला तरी मवाळांची इंग्रजांचा अनुनय करण्याची वृत्ती त्यांना मंजूर नव्हती. राजकीय जहाल असो की, मवाळ असो बहुजन अथाव ब्राह्मणेतर यांची सुधारणा व्हावी अशी खरीखुरी तळमळ ह्या दोघाच्याही ठिकाणी नव्हती. शिंदे यांना बहुजन समाजाची सर्वांगीण उन्नती होणे महत्त्वाचे वाटत होते. ब्राह्मणेतर पक्षाचा बहुजन समाजाचा कैवार आणि ब्राह्मणेतरांची सुधारणा करण्याची भूमिका शिंदे यांना मान्य होती, मात्र त्यांचा इंग्रजधार्जिणेपणा व स्वराज्यविरोधी दृष्टिकोण त्यांना पसंत नव्हता. कोठारींसारख्या ब्राह्मणेतर चळवळीती प्रारंभीच्या नेत्यांना अस्पृश्यांच्या शिक्षणाबद्दल व सुधारणेबद्दल कळकळ होती. (निदान वा. रा. कोठारी आपल्या आठवणींमध्ये ही बाब पुनःपुन्हा उल्ले खितात) मात्र स्वतः कोठारींनी ह्याबाबत कोणतेही भरीव काम केले नाही की, ब्राह्मणेतर पक्षातील आपल्या सहका-यांना अशा प्रकारचे काम करण्यास प्रवृत्त केल्याचे दिसत नाही. शिंदे यांचा स्पष्ट आक्षेप ऐकून तो खोटा पाडावा ह्या भूमिकेतून सोलापूर जिल्ह्यातील आपल्या बावी या गावी कोठारींनी अस्पृश्यांसाठी एक बोर्डिंग उभारले, व शिंदे यांच्यावर डी. सी. मिशनच्या बाबतीत अस्पृश्यवर्गांनी टीका करावयास सुरुवात केली त्या वेळेला डॉ. मॅन यांच्या अध्यक्षतेखाली शिवराम जानबा कांबळे यांच्या सहकार्याने अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीसाठी एक संस्था काढली. परंतु तिची एकही बैठक न होता सात वर्षांनी ती त्यांना विसर्जित करावी लागली. १९२३ पासून ते कायदेकौन्सिलात असतानाही अस्पृश्यवर्गासाठी त्यांनी काही केल्याचे दिसत नाही. अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीबद्दल वारंवार शाब्दिक सहानुभूती प्रकट करणा-या वा. रा. कोठारींची ही स्थिती होती. इतर ब्राह्मणेतर पुढा-यांबद्दल मग विचारावयास नको. अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीबद्दल त्यांच्यापैकी कोणाला कळकळ होती असे दिसत नाही. मग त्यांच्या कार्यक्रमात ह्या बाबीचा अंतर्भाव होणे दूरच.


सत्यशोधक आणि ब्राह्मणेत्तर पक्षातील पुढारी ह्यांना अस्पृश्यवर्गाच्या सुधारणेबद्दल कळकळ वाटत नव्हती याबद्दलचे स्पष्ट विधान त्याच काळात शिंदे यांनी केलेले पाहावयास मिळते. १९१६ साली निपाणी येथे भरलेल्या सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनास विठ्ठल रामजी शिंदे उपस्थित राहिले होते. भास्करराव जाधवांनी ह्या परिषदेत पुढाकार घेतला होता. पुष्कळसे लिंगायत व जैन गृहस्थ तसेच माळी, तेली वगैरे जातींतील लोक ह्या परिषदेस हजर होते. त्यामानाने अस्सल मराठे म्हणविणारे लोक संख्येने कमी होते. सर नारायणराव चंदावरकरांनी “ह्या परिषदेस अस्पृश्यवर्गाच्या प्रतिनिधींना येण्याची परवानगी होती का”, अशी पृच्छा केली असता शिंदे यांनी उत्तर दिले की “त्यांचेकडून परवानगी मिळणे शक्य नाही हे जाणूनच त्या व्रागातील कोणी लोक आले नव्हते.” चंदावरकरांनी पुढे शिंदे यांना स्पष्ट विचारले, “पण ह्या लोकांना अस्पृश्यांसंबंधी काही सहानुभूती तरी वाटते काय?” शिंदे उत्तरले, “त्यांना काही सहानुभूती वाटते असे मला वाटत नाही. माझा तर असा अनुभव आहे की, मागासलेले म्हणून आपल्याला म्हणविणा-या लोकांपेक्षा अस्पृश्यांच्या उद्धाराविषयी ब्राह्मणांनाच अधिक कळकळ वाटत असून त्यांचीच ह्या कार्यी अधिक सहानुभूती आहे.”१


सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर पक्षाच्या ह्या भूमिकेमुले शिंदे त्यांच्याशी सहमत होऊ शकत नव्हते.


तात्पर्य, स्वराज्यवादी राहावयाचे आणि सामाजिक सुधारणांचाही पुरस्कार करावयाचा व प्रत्यक्ष कार्यही करावयाचे, बहुजनांच्या उन्नतीचा विचार करावयाचा व त्यासाठी कार्यप्रवण राहावयाचे अशी शिंदे यांनी खास त्यांचीच म्हणता येईल अशी वैशिष्ट्यपूर्ण भूमिका होती.


विठ्ठल रामजी शिंदे यांची अस्पृश्यतानिवारणाच्या कार्याबद्दल अविचल निष्ठा होती, तर ब्राह्मणेतर पक्षातील विविध गट हे अस्पृश्यतानिवारणाच्या कार्याबद्दल सामान्यतः उदासीन असणारे लोक होते. या कारणेही विठ्ठल रामजी हे ब्राह्मणेतर पक्षात सदस्य म्हणून कधी गेले नाहीत अथवा त्यांच्या ध्येयधोरणाशी समरस झाले नाहीत. य. दि. फडके यांनी असे म्हटले आहे, “ब्राह्मणेतर पक्षात राहून त्याला आपल्याला हवे तसे वळण देण्याचा प्रयत्न करणा-या अशा मंडळींम्ध्ये कर्मवीर विठ्ठल रामजी ऊर्फ अण्णासाहेब शिंदे हे एक होते.”२ पुढे फडके यांनी असे म्हटले आहे, “विठ्ठल रामजी शिंदे ब्राह्मणेतर पक्षात असेल तरी शाहू छत्रपती किंवा भास्करराव जाधव यांचे इंग्रज राज्यकर्त्यांना खूश राखण्याचे धोरण त्यांना मंजूर नव्हते.”३ फडके यांनी शिंदे यांच्या धोरणाबद्दल केलेले विधान रास्त असले तरी ‘शिंदे हे ब्राह्मणेतर पक्षामध्ये होते’ हे त्यांचे विधान वस्तुस्थितीला धरून नाही. ब्राह्मणेतर या वर्गीकरणात मोडणारे लोक हे सत्ता-संपत्ती, विद्या-अधिकार यांपासून वंचित असलेले व वरिष्ठवर्गाकडून नाडविले जाणारे, शोषण केले जाणारे लोक असल्यामुळे त्यांच्याबद्दल शिंदे यांना ममत्व व आपुलकी जरूर वाटत असे. १९२० सालच्या त्यांच्या बहुजन पक्ष या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये अशा लोकाच्या उन्नतीसाठीच आपण प्रयत्न करणार असेही त्यांनी जाहीर केले होते. मात्र ब्राह्मणेतर अथवा मराठेतर अशा प्रकारचा शब्दप्रयोग करून कोणाला तरी वगळण्याची भूमिका त्यांना सर्वस्वी नापसंत होती. काही विशिष्ट बाबतीत ब्राह्मणेतरांची अथवा मवाळांची भूमिका त्यांना मान्य असेल तर ते तेवढ्या बाबीपुरता आपला पाठिंबा प्रकट करीत, परंतु आपण मवाळ पक्षाचे अथवा ब्राह्मणेतर पक्षाचे आहोत असे कुणी गृहीत धरू नये, याबद्दलही योग्य ती दक्षता घेत असत. याचा पडताळा एका विशिष्ट प्रसंगी विशेषत्वाने आला.


चिराल खटल्याचे काम संपवून टिळक इंग्लंडहून २७ नोव्हेंबर १९१९ रोजी मुंबईस परतले. ७ डिसेंबरला पुणेकरांच्या वतीने टिळकांना मानपत्र देण्याचा समारंभ होणार होता. ४ डिसेंबरला रँग्लर परांजपे यांच्या अध्यक्षतेखाली टिळकांच्या मानपत्राला विरोध करणा-यांची जेधे मॅन्शनमध्ये सभा झाली. विरोध करणा-यांत रँग्लर परांजपे, काळे, देवधर वगैरे मवाळ ब्राह्मण पुढारी जसे होते, तसेच श्रीपतराव शिंदे, वालचंद कोठारी, केशवराव बागडे, जेधे बंधू, जवळकर वगैरे ब्राह्मणेतर पुढारी आणि शिवराम जानबा कांबळे यांच्यासारखे दलित नेतेही होते. या पुढा-यांनी कालेल्या पत्रकावर सही करताना विठ्ठल रामजी शिंदे यांनी लिहिले, “सामाजि बाबतीत रा. टिळकांचे धोरण समतेच्या व स्वयंनिर्णयाच्या तत्त्वास विघातक असल्याने त्यांना पुण्याच्या सर्व नागरिकांतर्फे मानपत्र देणे योग्य नाही. या वैगुण्यामुळे ते माझ्यामते खरे राष्ट्रीय पुढारी नाहीत.”४ शिंदे यांनी विरोधाचे आपले कारण नमूद केले ते सहेतुकपणे असणार. टिळकांच्या नेतृत्वातील नेमक्या उणिवेवर त्यांनी बोट ठेवले. त्याचवेळी आपली भूमिका सरसकट मवाळ वा ब्राह्मणेतर पुढा-यांसारखी नव्हे हे दर्शविण्याकरिता टिळकांच्या राजकीय नव्हे, तर त्यांच्या सामाजिक धोरणाचाच केवळ निर्देश केला आहे.


ब्राह्मणेतर समाजातर्फे त्यांना २३ एप्रिल १९२५ रोजी पुण्यामध्ये मानपत्र देण्याचा समारंभ झाला. ह्या मानपत्राला उत्तर देताना त्यांनी जे भाषण केले, त्यामधून ब्रह्मणेतर समाजाबद्दल त्यांना आस्था वाटत असल्याचे प्रकट होत असले तरी ते ब्राह्मणेतर पक्षामध्ये नव्हते हेही स्पष्ट होते. ब्राह्मणेतर पक्षाबद्दल आत्मीयता आणि दुरावा असा जो ताण त्यांच्या मनामध्ये होता तो प्रकट होतो. दूर राहून पण आत्मीयतेने ब्राह्मणेतर पक्षाला उपदेशाच्या दोन गोष्टीही सांगितल्या आहेत. ह्या उत्तरादाखल केलेल्या भाषणातून अस्पृश्यतानिवारणकार्यावरील त्यांची अविचल निष्ठ व तळमळ प्रकट होते.


ब्राह्मणेतर समाजाच्या वतीने द्यावयाच्या ह्या मानपत्राचे वाचन मुंबई प्रांतिक ब्राह्मणेतर काँग्रेस कमिटीचे चिटणीस के. सी. बागडे यांनी केले. मध्य भागाचे कमिशनर मि. मॅकी यांनी एका सुंदर चांदीच्या पात्रातून हे मानपत्र शिंदे ह्यांना अर्पण केले. याप्रसंगी उत्तरादाखल विठ्ठल रामजी शिंदे यांनी पुढीलप्रमाणे भाषण केलेः


“अध्यक्ष महाराज आणि मित्रहो!,
“माझा त्रेपन्नावा वाढदिवस आपण याप्रकारे साजरा केला व मानपत्र देऊन माझा गौरव केला याबद्दल माझे अंतःकरण भरून आले आहे. मात्र मी आपल्यासमोर स्पष्टपणाने सांगू इच्छितो की, आपण केलेल्या बहुमानाला मी अजिबात पात्र नाही. कारण ब्राह्मणेतरांसाठी मी जवळ जवळ काहीही केलेले नाही, असे म्हटले तरी चालेल. जी काही अल्पशी सेवा मी माझ्या आयुष्यात करू शकलो ती कोणत्याही विवक्षित जातीची अथवा पंथाची नव्हे. याला फक्त अपवाद आहे तो म्हणजे ज्या जातिसमूहाला अथवा समाजाला अत्यंत अन्यायीपणे अस्पृश्य मानले जाते त्यांचा. त्या समाजाची मी काही सेवा करू शकलो. वस्तुतः माजे आयुष्य म्हणजे अस्पृश्यता निवारकार्याच एक प्रदीर्घ ध्यास होय. याचा परिणाम म्हणून इतर अनेक महत्ताचे विषय आणि माझ्या आयुष्यातील कर्तव्ये यांकडे दुर्लक्ष करून अन्याय केलेला असणार. मला असे वाटते की, माझ्यावर हा कर्जाचा मोठा बोजा आहे व मला कितीही दीर्घ आयुष्य मिळाले तरी तो मी फेटू शकणार नाही. मला नेहमी असे वाटत आले आहे की एखाद्या उचितप्रसंगी तुम्हा सर्वांची आणि माझ्याबद्दल आस्था असणा-या मित्रांची एकदा सपशेल माफी मागावी. कारण तुमच्या माझ्याकडून ज्या अपेक्षा होत्या, त्याकडे मी सातत्याने दुर्लक्ष केले आहे. माझ्या अंतःकरणावरील हा भार कमी करण्याची आपण मला संधी दिली याबद्दल मी आपला ऋणी आहे. मी आतापर्यंत केवळ एकांगीपणे प्रयत्न करीत राहिलो ह्याचे समर्थन केवळ एका मुद्यावरून शक्य आहे. तो म्हणजे अस्पृश्यतेच्या प्रश्नाची प्रचंड व्याप्ती आणि तो सोडविण्याची निकड. मला आणकी शंभर जन्म मिळाले तरी नरबळी घेणा-या अस्पृश्यतेच्या वेदीवर अर्पण करण्यासाठी मी मागेपुढे पाहणार नाही.


“ज्या ब्राह्मसमाजाचा मी एक नम्र पाईक आहे, त्या ब्राह्मधर्माने मला हे कार्या करण्याची प्रेरणा दिली. अधूनमधून मी राजकारण आणि सामाजिक सुधारणा, शिक्षण, स्वच्छता आदी नागरिक महत्त्वाच्या बाबींमध्ये जरूर भाग घेतला आहे. परंतु अस्पृश्यतानिवारण करणे हा माझा कायमचा ध्यास राहिला आहे. अस्पृश्यतेचे निवारण अद्यापि झाले नाही याची मला अन्य काणापेक्षाही तीव्र अशी जाणीव आहे. ह्या वास्तवापेक्षा माझी श्रद्धा अधिक कणखर आहे आणि ही श्रद्धा माझ्या कानात गुणगुणत आहे की, अस्पृश्यता निश्चित नष्ट होणार केवळ ह्या श्रद्धेवरच माझ्या मनाची शांती टिकून आहे.


“आपण मला अर्पण केलेले मानपत्र हे एका पक्षाला प्रमाण मानून केल्यासारखे वाटते. परंतु मी माझ्या मुख्य अथवा आनुषंगिक कार्यामध्ये कोणत्याही एका पक्षाच्या अथवा पंथाच्या अधीन झालो नाही. माझा पक्ष केवळ परमेश्वराचा आणि माझी सदसदविवेबुद्धी माझा प्रतोद. मला माहीत आहे की, अशा प्रकारचा मनुष्य कोणालाही खूष ठेवू शकत नाही. अशा परिस्थितीत माझा आपण आत्मीयतेने गौरव करण्यासाठी पुढे आलात ही वस्तुस्थिती, माझ्यात विशेष काही असण्यापेक्षा तुमचेच सहनशील औदार्य प्रकट करते.” असे सांगून आपण कोणत्याही राजकीय पक्षाच्या अधीन नसतो ही आपली भूमिकाच त्यांनी स्पष्ट केली आहे.


मात्र एक प्रकारच्य आत्मीयतेमधून ब्राह्मणेतर पक्षाला पुढीलप्रमाणे मार्गदर्शन केले आहे. ते करीत असताना त्या पक्षामधील उणिवांचाही स्पष्टपणे निर्देश करून कोणत्या प्रकारची नैतिकदृष्ट्या उन्नत भूमिका असावी हे सुचविले आहे.


शिंदे आपल्या भाषणात पुढे म्हणाले, “ब्राह्मणेतरांमध्ये जागृती करणे; त्यांचे संघटन करणे हे जे तुमचे उद्दिष्ट आहे ते अतिशय कठीण आहे. दलितवर्गासंबंधीचे उद्दिष्ट निश्चितच कठीण आहे. तरीही त्याला जमेची एक बाजू अशी आहे की, जिवंत अंतःकरणाच्या माणसाटी सहानुभूती त्यासाठी मिळविता येते. तुमच्या कार्यासाठी मात्र सहजासहजी अशी सहानुभूती मिळणार नाही. परंतु तुम्ही कोणत्याही प्रकारच्या दयेची अथवा कृपेची अपेक्षाही करू नये. संपूर्ण भविष्यकाळ तुमचा आहे. त्याचा काही भाग तुमच्या ताब्यातही आला आहे.


“तुमच्यापुढे जे धोके आहेत त्याकडेही मी तुमचे लक्ष वेधू इच्छितो. तुमचे उद्दिष्ट न्याय्य स्वरूपाचे नसेल आणि तुमच्या वृत्ती निर्मळ नसतील; सूड घेण्याची अथवा द्वेषाची भावना जोपर्यंत तुम्ही समूळ काढून टाकणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही व मिळूही नये. मी स्वतः अस्वच्छ हातांनी मिळविलेल्या सहज यशापेक्षा वारंवार मिळणारे अपयश पसंत करीन.”


भाषणाच्या अखेरीस आपल्या अंतःकरणातील कृतज्ञतेची भावना प्रकट करताना शिंदे म्हणाले, “मी पुण्यातच राहावे ही आपण केलेली विनंत ऐकून माझे हृदय भरून आले. माझीही हीच इच्छा आहे हे मी आपणास खात्रीपूर्वक सांगतो. तुम्ही जे अंतःकरणपूर्वक प्रेम प्रकट केले, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. माझ्या भगिनीने केलेली सेवा आपण ध्यानात ठेवली याबद्दलही मी आपले आभार मानतो. आपल्या प्रेमास आम्ही दोघांनी सदैव पात्र राहावे, अशीच आमची प्रार्थना राहील.”


आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये मि. मॅकी यांनी शिंदे ह्यांनी केलेल्या मूलभूत स्वरूपाच्या कामाचा गौरव करून ते उदगारले, “श्रीयुत शिंदे यांनी आपल्या ऑक्सफर्ड येथील अभ्यासानंतर जीवितकार्य म्हणून जे निवडले ते कार्य कठीणतम स्वरूपाचे आहे. व्यक्तिगत पातळीवर त्यांनी काहीएक स्वतःपुरते काम निवडेल असते तर त्यामध्ये त्यांनी उत्तम प्रकारचे यश संपादन केले असते. परंतु त्यांनी उदात्त समर्पणशीलतेने आपले आयुष्य घालवावयाचे ठरविले. श्रीयुत शिंदे हे मोठे भाग्यवान आहेत. अत्यंत कठीण स्वरूपाचे कार्य जरी त्यांनी निवडले असले तरी त्यांना त्यामध्ये मिळालेले यश आपल्या डोळ्यांनी पाहता आले. अस्पृश्यतेचा प्रश्न नीट सोडविण्यासठी त्यांनी उत्तम प्रारंभ केला. उत्तम नैतिक गुणांचा निर्देश केला.५


शिंदे हे ब्राह्मणेतर पक्षाच्या भूमिकेशी सहमत होऊ शकत नसले तरी या पक्षाशी प्रसंगोपात साहचर्य ठेवीत असत. त्यांची दोन कारणे संभवतात. एक, अस्पृश्य मानल्या गेलेल्या वर्गाच्या हिताचा त्यांना अखंड ध्यास लागला असल्यामुले ब्राह्मणेतरवर्गाची भूमिका अस्पऋश्यवर्गाच्या हिताकडे वळविण्याचा प्रयत्न करावा असे त्यांना वाटत असणार व दुसरे, बहुजनवर्गाचे हित साधण्यासाठी ब्राह्मणेतर पक्षाचा उपयोग करून घ्यावा, असे त्यांना वाटत असणार. शब्दांचा कधी कधी वक्र प्रयोग करून विनोदात्मक बोलण्याची अण्णासाहेब शिंदे यांची शैली होती. त्यामुळे ते गैरसमजाच्या आपत्तीतही सापडत. पुण्यास लँड लीगच्या स्थापनेच्या वेळी शिंदे यांनी भाषण करताना, “मी ब्राह्मणेतर पक्षात मतलबाकरिता जातो,” असे विधान केल्याचे ज्ञानप्रकाशात प्रसिद्ध झाल्यामुळे ब्राह्मण-ब्राह्मणेतर वृत्तपत्रांत त्यांच्यावर टीका येऊ लागली. तेव्हा त्यांनी खुलासा केला की, “मी हे विधान विनोदाने केले होते आणि माझा ‘मतलब’ केवळ अस्पृश्यांची बाजू मांडण्याकरिता मला इतर ठिकाणांप्रमाणे ब्राह्मणेतर पक्षातही जावे लागते एवढाच असतो; हे त्याच सभेत मी स्पष्ट बोलून दाखविले होते. कल्याणच्या ब्राह्मणेतर परिषदेत तर मुंबई इलाखा शेतकरी परिषदेस अखिल ब्राह्मणेतरांचा पाठिंबा मिळविण्यासाठीच मला जावे लागले.”६


म्हणजे ब्राह्मणेतर पक्षाशी अण्णासाहेब शिंदे जो संबंध ठेवीत होते तो प्रामुख्याने अस्पृश्यवर्गाच्या हितासाठी. दुसरे कारण म्हणजे बहुजनांबद्दल त्यांना वाटणारा कळवळा.


संदर्भ
१.    द्वा. गो. वैद्य, नारायण गणेश चंदावरकर, नर्नाटक पब्लिशिंग हाऊस, मुंबई, १९३७, पृ. ५२३-२४.
२.    य. दि. फडके, केशवराव जेधे, श्रीविद्या प्रकाशन, पुणे, १९८२, पृ. ९.
३.    तत्रैव, पृ. ९.
४.    माधवराव श्रीपतराव शिंदे, विजयी मराठाकार श्रीपतराव शिंदे, युवराज प्रकाशन, औरंगाबाद, १९७३, पृ. ३२.
५.    दि इंडियन मेसेंजर, ४ एप्रिल १९२६.
६.    ज्ञानप्रकाश, ११ ऑगस्ट १९२९.