मुंबई प्रार्थनासमाजाशी दुरावा आणि फारकत

विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यतानिवारणाचे व अस्पृश्य मानलेल्या वर्गाच्या उन्नतीचे कार्य हाती घेतले होते ते धर्मकार्य म्हणूनच. त्यासाठी स्थापन केलेल्या डिप्रेस्ड क्लासेस मिशनचे काम मोठे जोरात चालले असताना शिंदे यांच्या आयुष्यातील पहिली शोकात्म घटना घडली. ती म्हणजे, ज्या प्रार्थनासमाजाचे ते आंतरिक प्रेरणेने प्रचारक बनले होते, त्याच्याशी त्यांचा क्रमशः दुराव निर्माण होत गेला व अंतिमतः त्याचे पर्यवसान प्रार्थनासमाजाशी त्यांचे असलेले संबंध संपुष्टात येण्यात झाले. ज्या प्रार्थनासमाजाचे प्रचारकपद अत्यल्प वेतनावर पत्करून आयुष्यभर धर्मप्रचाराचे काम करण्याचा निर्णय त्यांनी स्वार्थत्यागपूर्वक घेतला होता, त्याच्याशी त्यांचा प्रचारक या नात्याने असलेला संबंध कायमचा संपुष्टात आला. एवढेच नव्हे, तर पुढील काळात विठ्ठल रामजी शिंदे यांची दखल घेण्याचेच मुंबई प्रार्थनासमाजाने बंद केले. प्रार्थनासमाजासी वियुक्त होण्याचा हा प्रसंग शिंदे यांनी मोठ्या धैर्याने सहन केला. याची प्रमुख दोन कारणे संभवतात. एक म्हणजे, परमेश्वरावर असलेला त्यांचा अढळ विश्वास व दुसरे, आपण अस्पृश्यतानिवारणाचे जे कार्य करी आहोत ते ईश्वराचेच काम आहे, ते धर्मकार्यच होय ही त्यांची दृढ श्रद्धा.

मुंबई प्रार्थनासमाज व विठ्ठल रामजी शिंदे यांच्यामध्ये जो दुरावा निर्माण झाला त्याची कारणे मुख्यतः मुंबई प्रार्थनासमाजातील मंडळींचै सामाजिक सुधारणेबद्दल असणारा दृष्टिकोण व त्यांची कार्यपद्धती यामध्येच पाहावा लागतो. शिंदे यांनी अस्पृश्यवर्गाची सुधारणा करण्याच्या कार्यात जी धडाडी दाखविली व त्यांनी त्या कामात स्वतःला जे झोकून दिले ते प्रार्थनासमाजीय मंडळींना फारसे भावण्याजोगे नव्हते. वस्तुतः अस्पृश्य मानलेल्या वर्गाबद्दल प्रार्थनासमाजीय मंडळींना कळकळ होती व त्यांची सुधारणा व्हावी, त्यांच्यात शिक्षणाचा प्रसार व्हावा, त्यांच्या ठिकाणी उन्नत धर्मबुद्धी जागृत करावी असे प्रार्थनासमाजातील धुरिणांना वाटत होते खरे; मात्र याबाबतीत प्रत्यक्ष कृती करण्याच्या संदर्भात त्यांचे धोरण मवाळ, सावधपणाचे होते. लोकांकडून आक्षेप येणार नाही, प्रवाद निर्माण होणार नाही याची ही मंडळी नेहमी दक्षता घेत होती. मुंबई प्रार्थनासमाजाने दिवसा नोकरीधंदा करणा-यांसाठी काही रात्रीच्या शाळा १८७६ मध्ये उघडल्या होत्या. १८९० मध्ये महार, चांभार वगैरे जातींच्या लोकांकरिता मदनपु-यात एक स्वतंत्र शाळा स्थापन करण्यात आली होती. श्री. बाबण बापू कोरगावकर यांच्या प्रेरणेने ही शाळा स्थापन करण्यात आली होती. मुंबई म्युनिसिपालटीत ड्रेनेज खात्यात काम करणा-या एकजणाला बढती पाहिजे होती. म्हणून त्याला बढतीचे आमिष दाखवून कोरगावकरांनी त्याच्याकरवी ही शाळा चालविली होती. त्या वेळेला लोकमतच असे होते की, शाळेतील सवर्ण मुलांची अस्पृश्यवर्गीय मुलांबरोबर खाऊ स्वीकारण्याचीही तयारी नव्हती. त्या वेळच्या वातावरणाची कल्पना एका प्रसंगावरून येऊ शकते. समाजाच्या वार्षिक उत्सवामध्ये रात्रीच्या शाळेतील मुलांच्या बक्षीस समारंभात सर्वांना एकत्र करून त्यांना उपदेश करून मिठाई वाटण्याची पद्धत होती. अस्पृश्य शाळेतील विद्यार्थांस वेदीच्या उजव्या बाजूस बसविण्यात आले. रात्रशाळेच्या स्पृश्य मुलांना वेदीच् डाव्या बाजूस बसलेल्या काही स्पृश्य विद्यार्थ्यांनी मिठाई घेतली नाही, तर घेतलेल्यांनी ती फेकून दिली.ही घटना १८९० मधली.१ याघटनेवरून अस्पृश्यांकडे बघण्याचा स्पृश्यांचा दृष्टिकोण कस अवहेलनेचा होता याची कल्पना येऊ शकते. अस्पृश्यांसमवेत भोजन करणे, त्यांना स्पर्श करणे ह्या गोष्टी तर अमलात आणण्याची कोणी कल्पनाही करू शकत नव्हते.

उन्नत धर्माच्या प्रसारकार्यामध्ये अस्पृश्यवर्गीयांना सामील करून घ्यावे, त्यांच्यापर्यंत ब्राह्मधर्माचा संदेश पोहोचवावा असे सातारा प्रार्थनासमाजाचे जुने कार्यकर्ते श्री. सीताराम यादवराव जव्हेरे यांना कळकळीने वाटत होते व ह्या मंडळींना ब्राह्म समाजाच्या अनेक स्थानीय समाजांपैकी सातारा येथील श्री. जव्हेरेंचे कार्य हे या दृष्टीने मोलाचे होते. मात्र धर्मविषयक प्रवचन ऐकण्यासाठी अस्पृवर्गायांना एकत्र जमविणे ह्यापलीकडे जाऊन अस्पृश्यतानिवारण्याचे काम करण्यापर्यंत सातारा प्रार्थनासमाजाचीही मजल जाऊ शकत नाव्हती. एकंदरीतच मुंबई प्रर्थनासमाजाने अस्पृश्यवर्गाच्या सुधारणेसाठी चालविलेले हे काम मुंगीच्या गतीनेच चालले होते असे म्हणावे लागेल. ह्याला कारण अस्पृश्यतेच्या संदर्भात असलेले त्या काळातील लोकमत. ह्या लोकमताला मान देण्याची प्रार्थनासमाजीय धुरिणांची असलेली वृत्ती होय. आपल्या मताचा प्राभाव समाजावर पाडून समाजाला आपल्या मताकडे ओढू घ्यावे, त्यांनी आपले अनुयायी करावे व समाजमनामध्ये पालट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावा ही धडाडी ह्या धुरिणांमध्ये नव्हती.

न्या. रानडे यांच्यासारखा लोकोत्तर पुरुषाची एकंदरीत सामाजिक सुधारणेबद्दल मनोवृत्ती काय होती हे पाहिले असता प्रार्थनासमाजाच्या दृष्टिकोणाचीही आपल्याला कल्पना येऊ शकते. पुणे येथील प्रार्थनासमाजाच्या वतीने धर्मविषयक व अन्य महत्त्वाच्या प्रश्नांबाबतची चर्चा करण्यासाठी संगतसभा भरत असे. १८८०-८१ मध्ये ह्या संगतसभेत झालेल्या चर्चेला पुढील वृत्तात द्वा. गो. वैद्य यांनी प्रार्थनासमादाचा इतिहास ह्या आपल्या पुस्तकात उदधृत केला आहे.

वडिलांच्यासंबंधाने व परस्परांसंबंधाने कर्तव्ये इत्यादी
बळवंतराव गोडबोलेः अमुक एक गोष्ट अशा प्रकारची आहे, तिच्यासंबंधाने आपण अशा रीतीने वागणे अगर न वागणे हे आपले कर्तव्य आहे व त्याप्रमाणे वागल्यास अगर न वागल्यास परमेश्वराचे आपण दोषी होऊ, अशा रीतीची आपली खात्री झाल्यावर आपल्या वडिलांची समजूत आपल्याहून निराळी आहे, यामुळे आपल्या अशा वागण्याने अथवा न वागण्याने त्यां वाईट वाटणार आहे अशा आपत्तीचे प्रसंगी आपण केवळ वडिलांस संतोषविण्याकरिता आपल्या समजुतीविरुद्ध त्यांच्या इच्छेप्रमाणे वागणे हाच आपला धर्म आहे की काय?

रा. ब. रानडेः आपली समजूत जरी एक प्रकारची झाली, तरी तिजप्रमाणे आपण एकदम आचरण करू नये. त्या समजुतीप्रमाणे आपले विचार आहेत असे बोलावे. आपल्याप्रमाणे आपल्या वडिलांचे व दुस-यांचे विचार होण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या विचारांप्रमाणे पुष्कळांचे विचार झाल्यावर त्याप्रमाणे इतरांनी दुस-या काही कारणांनी आचरण न केले तरी आपण करावे. पण जोपर्यंत पुष्कळांची समजूत आपल्या समजुतीहून निराळी आहे तोपर्यंत आपल्या समजुतीप्रमाणे आचरण करणे बरोबर नाही.

कित्येक२: प्रत्येकाने आपल्या समजुतीप्रमाणे वागावे. आपल्याहन दुस-याची समजूत निराळी असली तरी ती बदलण्याचा आपण प्रयत्न करावा, परंतु त्यांची समजूत बदलेपर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. अशी वाट पाहत राहिल्याने सुधारणेचे पाऊल कधीच पुढे पडावयाचे नाही. प्रत्येक मनुष्य परमेश्वरापाशी आपल्यापुरता बांधलेला आहे.

प्रश्नः अमुक गोष्ट जनसमूहाच्या हितास आवश्यक आहे असे आपल्याला दिसल्यावर व ती न करणे हे ईश्वराच्या आज्ञेच्या विरुद्ध आहे असे वाटल्यावर ती जर पुष्कळ लोकांच्या समजुतीविरुद्ध किंवा रूढीविरुद्ध असेल तर ती आपण करावी की नाही?
 
रा. ब. रानडेः ती करतीलते धन्य, पण न करतील ते दोषी नाहीत.

कित्येकः लोकविरुद्ध असली तरी केला असता ती गोष्ट होणे साध्य आहे, अशी स्थिती असल्यास ती करावी हेच धर्मदृष्टीने आपले कर्तव्य; साध्य नसल्यास साध्य होण्याची वेळ नजीक आणण्यासाठी झटणे हे कर्तव्य होय.३

न्या. रानडे यांचा सामाजिक सुधारणा करण्याचा जो दृष्टिकोण ह्या चर्चेतून दिसून येतो तोच सामान्यतः प्रार्थनासमाजाच्या धुरीण मंडळींचा होता.

आपल्याला विचारपूर्वक जे वाटते ते बोलावे व आपण जे बोलतो त्याप्रमाणे कृती करावी असा विठ्ठल रामजी शिंदे यांचा निश्चित स्वरूपाचा दृष्टिकोण होता. म्हणून शिंदे यांचा विद्यार्थिदशेपासून उक्ती व कृतीमध्ये संगती व ऐक्य असावे असा सदैव आग्रह असल्याचे दिसून येते. जेथे ते पाहावयास मिळत नाही तेथे तेथे त्याबद्दल ते नापसंती प्रकट करतात. २९ मे १८९८ रोजी मुंबई प्रार्थनासमाजाबद्दलचा अभिप्राय रोजनिशीत नोंदविताना त्यांनी म्हटले आहे, “समाजाचे (प्रार्थनासमाजात कसल्याही प्रकारचे जातिभेद असता कामा नये, असे असता इतर सुधारकांत व (प्रार्थना) समाजात मला काही भेद दिसत नाही. म्हणजे दोघेही अद्याप जातिभेद उघड उघड झुगारण्यास तयार आहेतसे दिसत नाही.”४ विचाराला कृतीचे जोरदार पाठबळ असल्याशिवाय सुधारणेचे पाऊल पुढे पडणार नाही अशीच कृतिवीर अण्णासाहेब शिंदे यांची भूमिका अखेरपर्यंत होती. १९३७ साली वाई प्रांतातील पसरणी येथील सभेतील भाषणात महात्मा जोतीराव फुले यांच्या कृतियुक्त सुधारणेचा गौरव करताना ते म्हणाले, “त्यांनी निंदा-अपमान सोसून धैर्याने, कृतीने समाजाची सुधारणा घडवून आणली. नुसती व्याख्याने देऊन किंवा जाडे ग्रंथ लिहून, त्यात विचार मांडून सुधारणा होते असे नाही. प्रत्यक्ष विचाराप्रमाणे कृती हवी. तरच सुधारणा घडून येते.”

घरातील जातिभेदविरहित वातावरण आणि वारकरी संप्रदायाचे उदारमतवादी संस्कार यांमुळे, तसेच त्यांच्या ठिकाणच्या विवेकशीलतेमुळे अस्पृश्यवर्गाच्या सर्वांगीण उन्नतीबद्दल शिंदे यांच्या मनात विद्यार्थिदसेपासूनच कळकळ निर्माण झाली होती. त्यांच्या या मनोधारणेला पुढे धर्ममताचाही आधार मिळाला.

“सर्व मनुष्ये एका परमेश्वराची लेकरे आहेत, म्हणून भेद न राखिता परस्पराशी बंधुभावाने वागावे हे ईश्वरास प्रिय आहे आणि हे मनुष्याचे कर्तव्य आहे,” हे प्रार्थनासमाजाचे एक तत्त्व आहे. हे तत्त्व सत्य म्हणून जर आपण स्वीकारले असेल तर त्याला अनुसरूनच भेदभाव न करता इतरांशी वागावयास पाहिजे असे शिंदे वाटत होते. जातिभेदच काय, अस्पृश्यता पाळणे हे या तत्त्वाशी विसंगत आहे अशी त्यांची श्रद्धा होती. या भूमिकेनुसारच अस्पृश्यत नष्ट करणे व अस्पृश्य बांधवांची उन्नती करणे हे त्यांना धर्मकार्यच वाटत होते. सत्यावर आणि ईश्वरावर शिंदे यांची आत्यंतिक श्रद्धा होती. १९०८ साली मुंबई प्रार्थनासमाजात वार्षिक उत्सवात ‘ईश्वर आणि विश्वास’ ह्या विषयावर दिलेल्या भाषणामध्ये त्यांनी म्हटले आहे, “ईश्वर सत्त्वप्रवर्तक आहे असे नुसते मत असून चालत नाही, तर तो सत्याचा आणि शुभाचा प्रवर्तक आहे, म्हणूनच मी सत्याचा आग्रह धरून राहिलो तर, माझे कितीही हाल झाले तरी हानी-माझी किंवा कोणाचीही-मुळीच होणार नाही, असा विश्वास पाहिजे.अशा विश्वासामुळेच ईश्वराचा व आपला खरा आणि निकट संबंध जडतो, बुद्धीने जडत नाही.”५

महात्मा गांधींचा सत्याबद्दलचा आग्रह त्यांच्या जीवनकार्यातून जस दिसून येतो त्या प्रकारचाच सत्याबद्दलचा आग्रह आणि आपण धर्मकार्य म्हणून जे कार्य स्वीकारले त्यावरील निष्ठा शिंदे यांच्या कार्यातून आणि विचारांतून दिसून येते. आपले कार्य म्हणून जे कार्य स्वीकारले त्यावरील निष्ठा शिंदे यांच्या कार्यातून आणि विचारांतून दिसून येते. आपले कार्य आणि ईश्वरावरील अढळ निष्ठा शिंदे यांच्या ठिकाणी एकरूप झालेल्या होत्या. अस्पृश्यतानिवारणाचे कार्य धर्मकार्य म्हणून त्यांनी अत्यंत स्वाभाविकपणे स्वीकारले होते. ते कार्य उताविळीने करावे अशी उत्कंठा त्यांना लागून राहिली होती. समाज काय म्हणेल असा विकल्प त्यांच्या मनात आला नव्हता. उलट समाजमनाचा पालट करून, अस्पृश्यता नष्ट करणे त्यांना निकडीचे वाटत होते. म्हणून त्यांनी ह्या कामाला धाडाडीने हात घातला.

विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबई प्रार्थनासमाजाचे प्रचारकपद स्वीकारल्यापासून धर्मकार्याचा झपाट्याने विस्तार केला. प्रांतभरच्या कामामध्ये वेगवेगळ्या शहरांतील स्थानिक प्रार्थनासमाजामध्ये उत्साह निर्माण केला. मुंबई प्रार्थनासमाजात कामाची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने वाचनवर्ग, तरुण ब्राह्मसंघ यांसारख्या चळवळी आणि संस्था सुरू केल्या, हे आपण पाहिले आहेच. या सा-याचा परिणाम म्हणून प्रार्थनासमाजाच्या कार्याबद्दल उत्साहाची भावना सार्वत्रिकपणे निर्माण झाली. १९०६ साली मिशनची स्थापना केल्यानंतर त्याही कामाचा शिंदे यांनी झपाट्याने विस्तार केला. महाराष्ट्रभर अस्पृश्यतेच्या प्रश्नाबाबत अपूर्व जागृती निर्माण होण्यात त्यांच्या कामाचे पर्यवसान झाले. मिशनच्या स्थापनेनंतर वेगवेगळ्या शहरांमध्ये ते जे दौरे काढत त्यामध्ये प्रार्थनासमाजाच्या प्रचारकार्याच्या जोडीने स्वाभाविकपणेच मिशनचेही कार्य करीत. फरक एवढाच पडलेला असणार की मुंबई शहरातील प्रार्थनासमाजाच्या नैमित्तिक विधिसंस्कारादी कामासाठी ते जितका वेळ देऊ शकत होते तेवढा वेळ देणे शक्य होत नसणार. प्रार्थनासमाजाच्या पगारी प्रचारकाने मिशनच्या कामाचा एवढा उठाव करावा व त्यामध्ये आपली कार्यशक्ती आणि बराचसा वेळ खर्च करावा याबद्दल प्रार्थनासमाजातील काही मंडळींच्या मनामध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली. वस्तुतः विठ्ठल रामजी शिंदे व मुंबई प्रार्थनासमाज यांच्यामध्ये हा जो दुरावा निर्माण झाला त्याची कारणे मुंबई प्रार्थनासमाजाच्या मवाळ, पांढरपेशा धोरणाताच पाहावी लागतात. शिंदे यांनी आपल्या खाजगी डायरीत १७ जानेवारी १९३५ रोजी एक नोंद केली आहे. ती अशी, “माझे व मुंबई प्रार्थनासमाजाचे सहकार्य आज जवळ जवळ २०-२५ वर्षे बंद पडले होते. कारण १) राजकारण, २) मी स्वतंत्र ‘अस्पृश्या’ साठी मिशन काढले, ३) माझा स्वतंत्र व सरळ बहाणा.”६

प्रार्थनासमाजाच्या काही पुढारीमंडळींच्या असंतोषाचा परिणाम म्हणून शिंदे यांच्या धर्मविषयक प्रचारकार्यावर नियंत्रण राहावे म्हणून प्रार्थनासमाजाच्या मॅनेजिंग कमिटीने एक पोटकमिटी नेमून स्वतंत्र नियम तयार केले व तिच्या तंत्राने त्यांनी वागावे असा निर्णय घेण्यात आला. शिंदे यांच्य स्वतंत्र प्रकृतीला ते पटेनासे झाले. खरे तर पैशाची फारशी तरतूद नसतानाही त्यांनी धर्मकार्याचा जोमाने विस्तार चालविला होताच. अधी काम करावे, मग अनुभव घ्यावा आणि मग योग्य वेळी नियम करावे हा स्वाभाविक क्रम त्यांना बरा वाटत होता. एकीकडे पैशाची तरतूद नाही, दुसरीकडे कामाचा नीट अंदाज नाही अशा स्थितीत शाब्दिक नियमांचे नियंत्रण त्यांना अप्रस्तुत वाटू लागले.

शिंदे यांचे मित्र वासुदेवराव सुखटणकर १९०७च्या सुमारास जर्मनीमध्ये बॉन विद्यापीठात पीएच्. डी. चा अभ्यास करीत होते. शिंदे त्यांना इकडील वर्तमान वस्तुनिष्ठपणे कळवून त्यांचा अभिप्राय मागवीत होते व सुखटणकरही आपले मत मनमोकळेपणाने शिंदे यांना कळवीत असत. प्रचारकाने सभासदाच्या घरी गृहृसंस्कार चालविण्याचे काम ठरविलेल्या संस्कारासंबंधीनेच करावे अशा अर्थाचा एक नियम होता. ब्रह्मसमाजाच्या स्वातंत्र्याला हा नियम बाधक होता म्हणून तो वगळावा असे सुखटणकरांचे मत पडले. शिंदे यांना तर नियमांचा हा सारा घाटच अनावश्यक व चालत्या गाडीला खीळ घालणारा वाटून त्यांचे मन उद्विग्न झाले. शिंदे यांनी आपल्या कामाची डायरी ठेवावी, वरचेवर अहवाल द्यावा वगैरेही अपेक्षा करण्यात येऊ लागल्या. शिंदे डायरी ठेवण्याचे हे काम स्वयंस्फूर्तीने कामाच्या ओघात व कामाचा भाग म्हणूनही पहिल्यापासूनच करीत होते. धर्मकार्यार्थ केलेला प्रचारदौरा, त्यामध्ये व्याख्याने देऊन, उपासना चालवून वगैरे केलेले धर्मसाधन या संबंधीचा भाग सुबोधपत्रिकेमधून वरचेवर प्रसिद्ध होत होता. त्यांच्या या प्रसिद्ध होणा-या वृत्तान्तावरून शिंदे यांच्या प्रचाराचे काम किती सखोलपणे, व्यापक पातळीवर व वरच्या दर्जाने चालले होते याची कल्पना येऊ शकते. परंतु शिंदे यांच्या मिशनच्या कामाबाबत अनुत्साही असलेली प्रार्थनासमाजातील मंडळी असंतुष्टच होती. शिंदे हे स्वयंस्फूर्तीने उत्तम दर्जाचे काम करीत असताना त्यांनी ही कामे अमक्यावेळी व अमक्याच पद्धतीने करावीत हा सुसुरू केलेला नियमाचा जाच त्यांना अनावश्यक वाटू लागला. त्यांचे व समाजा मंडळींचे मतभेद वाढीला लागले.

शिंदे यांच्या निकट नसणारी समाजातील मंडली तर असंतुष्ट होतीच, पण शिंदे यांच्या जिव्हाळ्यातील काही मंडळींनाही शिंदे यांचे धोरण नापसंत होते. श्री. बापू कोरगावकर हे शिंदे यांचे जवळचे स्नेही व खरेखुरे हितचिंतक होते व मनोधारणेने ते एकनिष्ठ ब्राह्म होते. त्यांनीही शिंदे यांना आपला मतभेद पत्राद्वारे कळविला. नाशिक येथील सॅनिटेरियमध्ये कोरगावकर प्रकृतिस्वास्थ्यासाठी १९०७च्या मार्चपासून राहिलेले होते. १९ मे १९०७ रोजी शिंदे यांना लिहिलेल्या पत्रामध्ये ते म्हणतात, “डिप्रेस्ड क्लास मिशनच्या कामाचे मला काहीच महत्त्व वाटत नाही, असे तुम्ही म्हणता ते मी कबूल करीत नाही. पण आपल्या वेळाचा तुम्ही अपव्यय करित असे मला वाटते. जे तुम्ही म्हणता ते मात्र खरे आहे. मनुषाचे सामर्थ्य फार परिमित नव्हे तर अत्यंत अल्प आणि समाजोन्नतीची कामे एकापेक्षा एक पडली आहेत की कोणीही मनुष्य एकटा एकही काम नीट करू शकणार नाही. आपल्या (प्रार्थना) समाजाने जी कामे आधीच उचलली आहेत तीच त्यातील कर्तबगार माणसांच्या मानाने त्यास अधिक आहेत, घेतलेली कामे समाधानकारकरीत्या उचलली आहेत तीच त्यातील कर्तबगार माणसांच्या मानाने त्यास अधिक आहेत, घेतलेली कामे समाधानकारकरीत्या चालू राहिल्यास त्यातील सभासदांनी आपली शक्ती दुसरीकडे लावणे बरोबर नाही असे माझे मत आहे. कर्वे, वेलीणकर यांची कामे जशी जोराने चालू आहेत तशी आपल्या समाजाची चालू आहेत असे तुम्हास वाटते काय? डिप्रेस्ड क्लास मिशनचे काम तुम्हास अधिक महत्त्वाचे व प्रिय वाटत असेल; परंतु तुम्ही अगोदरच एका सर्वात श्रेष्ठ व इतर सर्व कामास चालना देणारे अशा कामास आपण वाहून घेतले आहे त्याची वाट काय? ब्राह्मधर्मासारख्या सर्वव्यापक धर्माच्या प्रचारकाचे काम जे तुम्ही पत्करले आहे तेच जर नीट कराल तर मला वाटते तुमच्या डिप्रेस्ड क्लास मिशनचे काम करण्यास दुसरी माणसे उत्पन्ना होतील व झाली पाहिजेत. सध्याचा तुमचा मार्ग घोड्याच्या पुढे गाडी ठेवण्यासारखा दिसतो. ते काही असो, समाजाचे ज्या कामाकरिता तुम्हास नेमले आहे व जे काम करण्याचे तुम्ही स्वीकारले आहे, त्या कामाकडे तुमचा जावा तितका वेळ व लक्ष जात नाही असे मला एकट्याला नव्हे, तर निदार बहुतेक सभासदांस वाटत आहे. मला समाजाचे काम फारच महत्त्वाचे वाटते म्हणून जर मी ऑफिसात जाऊन ऑफिसच्या कामाची हेळसांड करून समाजाचे काम करीत असलो तर तुम्ही मला कामचोर नाही का म्हणणार? आणि माझे असे करणे ईश्वराला तरी आवडले काय? आता तुम्हास असे वाटत असेल की, डिप्रेस्ड क्लास मिशन हे समाजाचेच एक काम आहे, परंतु मी म्हणतो की, याचा निर्णय समाजाने केला पाहिजे, तुम्हास असे वाटून उपयोग नाही, असो.”७

कोरगावकरांचा दृष्टीकोण समाजातील सभासदांचा प्रातिनिधिक दृष्टिकोण म्हणता येईल. प्रचारकाचे काम हे मुख्यतः धर्मप्रचार करणे व समाजाची आनुष्ठानिक कामे करणे हे होय व मिशनसारखे लोकोपयोगी काम करणे याला कोरगावकर दुय्यम स्थान देतात. मात्र शिंदे यांच्या मताने धर्मकार्य व अस्पृश्यतानिवारण्याचे काम यामध्ये अभेद आहे, म्हणून हे मिशनचे काम हे धर्मकार्यच होय अशी त्यांची प्रारंभापासून अखेरपर्यंत अढळ श्रद्धा होती. कोरगावकरांनी आपल्या पत्रामध्ये एक मुद्दा असा मांडला की, धर्मविषयक कामातूनच मिशनचे काम करण्यासाठी लोक पुढे येतील. कोरगावकरांचा आशावाद फारसा वस्तुस्थितीच्या पायावर आधारलेला वाटत नाही. मुंबई प्रार्थनासमाजाची स्थापना १८६७ मध्ये झाली. मात्र या ४० वर्षांच्या अवधीत शिंदे यांनी मिशन सुरू केले. अशा प्रकारचे काम करणारा शिंदे यांच्याशिवाय अन्य कोणीही पुरुष पुढे आलेला दिसत नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्राधान्याने पांढरपेशा मनोवृत्तीच्या समाजाच्या सभासदांच्या अंतःकरणामध्ये अस्पृश्याच्या प्रश्नांची खरी आचच नव्हती. तिच्याअभावी असे कार्य करणारा पुरुष कसा निर्मा होणार? शिंदे समाजामधून प्रचारक म्हणून बाहेर पडल्यानंतरच्या काळातही समाजातून अशा प्रकारचे कार्य करणारा कोणी पुरुष पुढे आला नाही ही बाब याचीच निदर्शक म्हणता येईल.

श्री. वासुदेवराव सुखटणकर यांचा या बाबतीतील विचार थोडासा वेगळा होता. मिशनी स्थापना झाल्याबरोबर हे मिशन प्रार्थनासमाजाच्य स्वाधीन असावे की समाजाहून स्वतंत्र वेगळे असावे असा प्रश्न उपस्थित झाला होता. २५ ऑक्टोबर १९०७ रोजी बॉनवरून लिहिलेल्या पत्रात सुखटणकर म्हणतात, “मिशन हे समाजाच्या स्वाधीन असावे. समाजाने तुम्हांस त्यावर मिशनरी नेमावे. असे झाले म्हणजे कुरकुरीस काही जागा न राहता मिशनचे काम तुमचे मुख्य कर्तव्य होईल. पण त्याबद्दल तुम्ही समाजास जबाबदार राहावे. जशा रात्रीच्या शाळा किंवा पंढरपूरचे ऑर्फनेज तसेच मिशन ही समाजाची एक संस्था असावी.”७ सुखटणकरांची सूचना निश्चित सद्हेतुमूलक होती. परंतु तिला वस्तिस्थितीचे पाठबळ होते असे मात्र म्हणता येणार नाही. अस्पृश्यांसाठी चालविण्याच्या मिशनचे काम करण्यासाठी जी वृत्ती, दृष्टी व धडाडी आवश्यक असते ती शिंदे यांच्या ठिकाणी होती. अन्य पांढरपेशा प्रार्थनासमाजीय सदस्यांमध्ये ती असल्याचे पूर्वी दिसून आले नव्हते व पूर्वानुभव ध्यानात घेता पुढे दिसून येईल हे फारसे संभवनीय वाटत नव्हते. मिशन प्रार्थनासमाजाचा एक भाग म्हणून चालवावे की नाही ही केवळ तांत्रिक व्यवस्थापनाची बाब नव्हती. तिचा अंतःकरणाशी संबंध होता. अस्पृश्यवर्गाच सुधारणा करणे आणि सवर्णांच्या मनातील अस्पृश्यतेची भावना नष्ट करणे ह्या बाबतीत शिंदे यांच्यासारखी आत्यंतिक तळमळ असणारी मंडळी समाजामध्ये नव्हती.

मिशन स्थापन झाल्याबरोबरच ते कोणाच्या ताब्यात असावे यासंबंधी प्रश्न उपस्थित झाला. ते मुंबई प्रार्थनासमाजाने आपल्या ताब्यात ठेवून आपल्या जबाबदारीखाली एक अंगभूत काम या दृष्टीने चालवावे की ते सर्व राष्ट्राचे काम आहे, म्हणून सर्वांचे सहकार्य मिळवून शक्य तेवढी त्याला बाहेरूनच मदत करावी? असे दोन पक्ष होते. डॉ. भांडारकरांचे मत प्रारंभी पहिल्या बाजूने होते सुरुवातीच्या काळात मिशनच्या मध्यवर्ती कमिटीवर सर्व अधिकारी आणि सभासद प्रार्थनासमाजाचेच पुढारी होते. प्रार्थनासमाजाचे अध्यक्ष तर नारायण चंदावरकर व उपाध्यक्ष शेठ दामोदरदास गोवर्धनदास या दोघांचा विठ्ठल रामजी शिंदे यांच्या मिशन काढण्याच्या कल्पनेला व प्रयत्नांना पाठिंबा व प्रोत्साहन होते. त्यांच्या सहकार्याने आणि साह्याने शिंदे यांनी मिशनच्या कामाला प्रारंभ केला. मिशनचे अध्यक्ष व उपाध्यक्षही प्रारंभीच्या काळात हे दोघेच होते. मिशनचा सामाजिक हेतू प्रर्थनासमाजाला पूर्ण मान्य होता व मिशनचे काम धार्मिक पायावरच चालवायचे होते. हा  पायाही प्रार्थनासमाजाला मान्य होता. मात्र अस्पृश्यवर्गातून समाजाला सभासद मिळावेत, असा समाजाने हेतू कधीच बाळगला नाही व मिशननेही अशा प्रकारचे प्रयत्न कधी केले नाहीत. मिशन चालवून अस्पृश्यवर्गातून प्रार्थनासमाजाला सभासद मिळविले जातात अशी तक्रार करायला स्वाभाविकपणेच कोणालाही कधी अवसर मिळाला नाही. एवढे असूनही प्रार्थनासमाजाने मिशन चालविण्याऐवजी ते स्वतंत्र ठेवणे शिंदे यांना योग्य वाटत होते. याचे कारण मिशनचे काम नेहमी वाढते राहणार होते. अस्पृश्यतानिवारण्याचा प्रश्न जरी हिंदूपुरता असला तरी अस्पृश्यतानिवारण्याची जबाबदारी ब्रिटिश सरकार आणि हिंदुस्थानात राहणा-या प्रत्येक जातीवर आणि धर्मावर पडते ही शिंदे यांची भूमिका होती. पैशाची मदत जर सर्वांकडून घ्यायची तर त्याचा विनियोग आणि सर्व कामाच्या जबाबदारीचा वाटा खुशीने घेतील त्यांच्याकडेच देण्याचे धोरण योग्य राहील असे शिंदे यांना वाटत होते. सर नारायणराव चंदावरकर आणि कमिटीचे इतर सभासद त्यांच्या मताशी सहमत होते. म्हणून मिशनच्या कामात सर्वांना मोकळीक ठेवावी हे धोरण शेवटी डॉ. भांडारकरांनाही पटले व त्यानुसार मिशनच्या कामाला प्रारंभ झाला. मात्र अशा त-हेने मिशनच्या प्रारंभापासून वर्षभरातच सुरू झालेले वादंग १९१०च्या मध्याला तीव्र स्वरूपाचे बनले व शिंदे यांनी प्रार्थनासमाजाच्याच कामाला चिकटून राहावे अशा स्वरूपाच्या निर्बंधाचा काच सुरू झाला आणि शिंदे यांना तर जनतेची सेवा हीच ईश्वराची सेवा असे ब्रह्मसमाज व प्रार्थनासमाज नेहमी जे प्रतिपादित असे तेच प्रमाण वाटत होते व अस्पृश्यवर्गाची सेवा करण्यात आपण प्रार्थनासमाजाची सेवा विशेष उत्कटत्वाने करीत आहोत असी त्यांची धारणा होती. शिंदे आपल्या मनःस्थितीचे वर्णन करताना लिहितात, “पण मी मिशनमध्ये वेळ खर्च न करता समाजालाचन चिकटून राहावे; असा व्यक्तिशः मजसंबंधी वाद सुरू झाला तेव्हा माझी स्थिती नाजूक झाली. मला दगदग, चिंता पडत होती. त्यात आत्मसमर्थनाचा बोजा माझ्यावर येऊ लागला; तो जड वाटू लागला. मिशनची आणि समाजाची दोन्ही कामे मी सांभाळीत होते.”८

मुंबई प्रार्थनासमाजाच्या धुरिणांच्या धोरणाबद्दल काही तरुण तळमळीच्या समाजीयांच्या मनात तीव्र स्वरूपाचा असंतोष होता. प्रार्थनासमाजाचे पहिले प्रचारक श्री. सदाशिव पांडुरंग केळकर यांचे चिरंजीव डॉ. माधव हे एक होत. १९१० साली त्यांनी स्त्रियांची गुलामगिरीपासून सुटका ह्या पुस्तकात सभासदांचे खरे दोष दाखविले होते. नंतर पाच वर्षांनी लिहिलेल्या एका वेड्या समाजिस्टाचे बरळणे अथवा महाराष्ट्रातील प्रार्थनासमाजाचे अंतरंग या पुस्तिकेत त्यांनी नमूद केले आहे की, त्या दोषांपैकी एकाही गोष्टीत ह्या पाच वर्षांत सुधारणा झाली नाही. उलट ते पुस्तक बाहेर पडले त्याच दिवशी रा. शिंदे यांस समाजाचे मिशनरी म्हणू नये असा साधारण सभेत ठराव झाला, ही दैवदुर्विलासाची गोष्ट म्हणूनही त्यांनी नमूद केली आहे. मुंबई प्रार्थनासमाजाच्य धोरणाचे त्यांना प्रतीत झालेले मर्म त्यांनी पुढलप्रमामे सांगितलेः “समाजाचा धर्म म्हणजे सवडीचा, फुरसतीचा धर्म आहे हे महासूत्र लक्षात ठेवल्याशिवाय समाजासंबंधी काही कळायचे नाही.”९ शिंदे यांच्याबाबत प्रार्थनासमाजाने हे धोरण अवलंबिले त्याला पूर्वीची परंपरा आहे हे सांगताना डॉ. माधव केळकर यांनी असेही म्हटले आहे, “मुंबई समाजाचे आजपर्यंत तीन मिशनरी झाले आणि तिघांसही समाजाच्या कमिटपुढे हात टेकावे लागले.”१०

शिंदे यांचे अस्पृश्यवर्गीयांसाठी चालविलेल्या मिशनसंबंदीचे कार्य मुंबई प्रार्थनासमाजाला रुचत नव्हते आणि समाज त्यांच्यावर नाराज होता याचे मुख्य कारण प्रार्थनासमाजाचे पांढरपेशा स्वरूप हेच होय. असे म्हणत येईल. जे. व्ही नाईक यांनी प्रार्थनासमाजाचे पांढरपेशा स्वरूप कसे होते ते सभासदांची जातवार संख्या, सभासदाचा व्यवसाय वगैरेंची माहिती देऊन साधार दाखविले आहे. प्रार्थनासमाजाची सभासदसंख्या कोणत्याही वर्षी दोनशेपेक्षा जास्त नव्हती. ब्राह्मण आणि सारस्वत ह्या वरच्या जातीतीलच सदस्य बहुसंख्येने असत व ते शिक्षक, वकील, डॉक्टर असे पांढरपेशा व्यवसायातील असत. १९०७ पर्यंत दोन पारशी, दोन मुसलमान व एक बेने इस्त्रायली ज्यू असे पाच हिंदूंशिवाय अन्य धर्मातील सदस्य झालेले होते. (अस्पृश्यवर्गातील गणेश आकाजी गवई व किसन फागुजी बनसोडे व सय्यद अब्दुल कादर हे मुसलमान गृहस्थ शिंद्यांच्या प्रभावामुळे समाजात आले होते.). जे. व्ही. नाईक यांनी म्हटले आहे, “प्रार्थनासाजातल्या जडणघडणीत फक्त अल्पसंख्य उच्चवर्णी हिंदूंचाच सहभाग होता हे सत्य डोळ्याआड करता येणार नाही. हे सर्वजण नागरी किंवा तत्सम विभागातील बुद्धिजीवी सुशिक्षित होते.” पुढे त्यांनी असेही म्हटले आहे, “प्रार्थनासमाजाचे नेते व्यासपीठावरून जातिभेदाच्या दुष्परिणामाबद्दल बोलत राहिले. परंतु जातिभेदाने पोखरलेल्या हिंदू समाजाच्या सामाजिक गुलामगिरीविरुद्ध बंड करून आपले मानवी बंधुत्वाचे मूलभूत तत्त्व प्रत्यक्षात आणण्याचा ठोस प्रयत्न प्रार्थनासमाज या संस्थेने केला नाही.”११ नाईकांचे म्हणणे रास्त आहे. विठ्ठल रामजी शिंदे यांनी चालविलेला अस्पृश्यतानिवारणकार्याचा प्रयत्न प्रार्थनासमाजाच्या पांढरपेशा संवेदनशीलतेला रुचला नाही.

मुंबई प्रार्थनासमाजाचे दोन प्रचारक असावेत असे ठरले होते व १९०७ साली शिंदे यांचे मित्र वासुदेवराव सुखटणर हे जर्मनीहून पीएच्. डी. होऊन परत आले व प्रार्थनासमाजाच्या प्रचारकपदाची जबाबदारी त्यांनी घेतली. पण योगायोग असा, की सहा-आठ महिन्यांच्या अवधीतच त्यांना हे काम सोडून सिंध प्रांतातील हैदराबाद येथे जावे लागले. याचा अर्थ प्रार्थनासमाजाच्या पाढत्या कामाचा भार शिंदे यांनाच उचलावा लागत असे. पण समाजाचे पदाधिकारी म्हणजे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि इतर सभासद यांना कळून चुकले होते की मिशनच्या कामातून शिंदे यांची सुटका होणे अशक्य. शिंदे आणि प्रार्थनासमाज यांच्यामध्ये मिशनच्याबाबतीत तणाव निर्माण झाला होता. आता त्यामध्ये दुस-या एका कारणाची भर पडली.

ही दुसरी बाब म्हणजे शिंदे यांची राजकारणविषयक भूमिका ही होय. १९०७-०८च्या सुमारास हिंदुस्थानच्य राजकारणात राष्ट्रीय पक्ष आणि प्रागतिक पक्ष अथवा जहाल आणि मवाळ असे दोन पक्ष प्रमुख होते. मवाळांचे लक्ष समाजसुधारणेकडे आणि सरकारशी जुळते घेऊन काम करण्याकडे अधिक असे, तर जहालांचे लक्ष सरकारशी संघर्ष करून अधिकाधिक राजकीय हक्क मिळविण्याकडे अधिक असे. सरकारशी विरोध हा जणू काय त्यांच्या मनोवृत्तीचा भाग बनला होता. मात्र शिंदे यांना प्रार्थनासमाजाच्या कामात आणि विशेषतः मिशनच्या कामाच्या संदर्भात होता होईल तेवढे सर्वांचे सहकार्य आवश्यक होते आणि या धोरणाने काम करीत असताना कोणतीही आपत्ती आली तरी आपले मतस्वातंत्र्य आणि आचारस्वातंत्र्य अबाधित ठेवणे याबाबत शिंदे दक्ष होते. आपल्या मतासाठी आणि कार्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची आणि संकटांना तोंड देण्याची त्यांनी सदैव तयारी ठेवलेली होती. राजकारणात त्यांची मते आणि कल पूर्णतः राष्ट्रीय बाजूकडे होता, तथापि त्या पक्षाशीही ते पूर्णपणे तादात्म्य पावले नाहीत. कारण अशा तादात्म्यामुळे स्वतःच्या मतांना मुरड घालण्याची पाली येते. शिंदे यांच्या भूमिकेत ही गोष्ट बसणारी नव्हती. उदाहरणच घ्यावयाचे झाले तर असे म्हणता येईल, सामाजिक सुधारणांच्या बाबतीत राष्ट्रीय पक्षाचे लोक उदासीन अथवा प्रसंगी विरुद्धही होते. तर शिंदे हे सामाजिक सुधारणांबाबतही राजकीय भूमिकेइतकेच आग्रही होते व आता तर सामाजिक सुधारणेच्या कार्यामध्ये त्यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले होते. मात्र आपली राजकीय मते प्रार्थनासमाजावर लादण्याचा प्रयत्न त्यांनी कधीही केला नाही.

१९०७ साली लो. टिळकांनी मद्यपान निषेधाची चळवळ मोठ्या धामधुमीने सुरू केली. तीत अनेक पक्षांनी आणि काही ख्रिश्चन मिशन-यांनही भाग घेतला. शिंदे यांचा जहाल पक्षाकडे व काँग्रेसच्या विधायक कामाकडे ओढा होता. १८९५च्या काँग्रेसमध्ये त्यांनी स्वयंसेवक म्हणून काम केलेले होते याचा उल्लेख आलेलाच आहे. टिळकांच्या मद्यपाननिषेधाच्या सभेमध्ये पुण्यात २३ एप्रिल १९०७ रोजी स्वतः शिंदे सामीलही झाले होते. डॉ. भांडारकर, हॅरॉल्ड एच्. मॅन हेही ह्या सभेमध्ये सहभागी झाले होते. ह्या सुमारास टिळकांवर सरकारचा विशेष रोष निर्माण झाला होता याचे कारण टिळकांचा काँग्रेसमधील वाढलेला प्रभाव. सुरत येथे झालेले काँग्रेसचे अधिवेशन त्यांनी उधळून लावलेले होते व काँग्रेसला आपल्या कक्षेत खेचले होते. टिळकांच्या या वाढत्या प्रभावामुले व मद्यपाननिषेधाच्या चळवळीतून दिसू येणा-या त्यांच्या आक्रमणामुळे सरकारचा हा रोष वाढला होता. परिणामी मद्यपाननिषेधाच्या एका जाहीर सभेत सरकारविरोधी बोलण्याचे निमित्त करून सरकारने त्यांना सहा वर्षांची जबर कारावासाची शिक्षा ठोठावली. ह्या शिक्षेमुळे शिंदे यांनी लोकमान्यांचा गहिवरून उल्लेख केला, “एवढ्या मोठ्या कारावासात ह्या जनतेच्या पुढा-याला आय़ुरारोग्य लाभो. शरीराला विश्रांती आणि मनाला शांती मिळो. इतकेच नव्हे तर त्याचे कोठे चुकत असेल तर उच्च सत्याचा त्याला मार्ग दिसो.” अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी प्रार्थना केली. ह्याबद्दल समाजात खळवळ उडाली. सर नारायणराव चंदावरकर व डॉ. भांडारकर वगैरे गुरुजनांनी याबद्दल शिंदे यांना समक्ष बोलावून खुलासा मागितला. त्यांनी नम्रतापूर्वक सांगितले, “मला आपण विश्वासाने आचार्य आणि प्रचारक नेमले आहे. समाजात सर्व प्रकारची, सर्व मतांची आणि सर्व दर्जाची माणसे आहेत हे मी पूर्ण जाणून आहे. ईश्वरापुढे उभा राहून प्रार्थना करीत असता भारताचे संकलित भवितव्य ओळखून प्रार्थना करणे माझे जरूर आणि पवित्र कर्तव्य आहे. ह्यात ब्रिटिश सरकारची कदर ओळखून माझे आध्यात्मिक कर्तव्य करणे भाग आहे. ह्यात मी जर कच खाल्ली तर स्वतःशी अपात्र ठरेन. आपला विश्वास असेल तरच मला ह्या जागेवर ठेवा. पण माझ्या कामात मला आणि माझ्या ईश्वराला जबाबदार राहू द्या.” शिंदे यांचे हे निर्वाणीचे उत्तर ऐकून चंदावरकर व भांडारकर यांनी योग्य तो विचार केला. शिंदे यांच्या संदर्भात ह्याबाबतीत कोणतीही कारवाई करणे रास्त ठरणार नाही हे त्यांना मनोमन उमगले. आपली भूमिका समजून घेतली याबद्दल शिंदे यांच्या मनात ह्या गुरुजनांबाबत कृतज्ञतेची भावना निर्माण झाली.

ह्या घटनेनंतर महाराष्ट्रात दुसरेच एक प्रचंड काहूर उठले. १९०८ साली नाशिक शहरामध्ये एक अत्यंत खेदजनक प्रकार घडला. तो म्हणजे तेथील लोकप्रिय कलेक्टर जॅक्सन यांचा झालेला खून. जॅक्सन यांच्या खुनाच्या बातमीने महाराष्ट्रातील प्रगल्भ विचाराच्या लोकनेत्यांना धक्का बसला आणि ब्रिटिश अधिका-यांमध्ये एक प्रकारची अस्वस्थता व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यतानिवारणाच्या कार्यासंबंधी एक धोरण ठरविले होते ते म्हणजे समाजातील सर्व वर्गांतील जबाबदार पुढा-यांना व व्यक्तींना ह्या कामामध्ये सहभागी करून घ्यावयाचे. ह्या धोरणाला अनुसरून अस्पृश्यवर्गाचे पुढारी, सवर्णामधील मवाळ-जहालांचे पुढारी त्याचप्रमाणे संस्थानिक यांना ते आपल्या कार्यात सहभागी करून घेत होते. यांच्या जोडीनेच आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे इंग्रजांची राज्ययंत्रणा चालविणारा प्रभावी वर्ग म्हणजे येथील ब्रिटिश मुलकी व लष्करी अंमलदार हा होय. कोणत्याही जिल्ह्याच्या ठिकाण अस्पृश्यतानिवारणाच्या कामासाठी नव्याने एखादी कमिटी निर्माण करावयाची झाल्यास प्रथमतः शिदे हे तेथील कलेक्टरांची भेट घेत असत व मिशनच्या कामाची आणि उद्देशाची त्यांना योग्य प्रकारे माहिती करून देऊन ह्या कामात सहभागी होण्याची विनंती करीत असत. धारवाड येथे त्यांनी याच प्रकारे कलेक्टरला सहभागी करून कमिटीचे अध्यक्षपद त्यांच्याकडे सुपूर्द केले होते. नाशिक येथील कलेक्टर जॅक्सन यांनाही मिशनच्या स्थानिक कमिटीमध्ये सहभागी करून ह्या कामासाठी त्यांचे साहाय्य घेतले होते. हे धोरण शिंदे यांनी सार्वत्रिक अवलंबिले होते. इंग्रज अधिका-यांच्या जोडीनेच उदारमनस्क ख्रिस्ती मिशन-यांनाही शिंदे यांनी या कामामध्ये ओढले होते. केवळ कलेक्टर नव्हे, तर मुंबई राज्याच्या गव्हर्नरांनाही या कामाचे महत्त्व शिंदे यांनी पटवून दिले होते व त्या वेळचे गव्हर्नर सर जॉर्ज क्लार्क यांनी आपली कन्या मिस् व्हायोलेट हिला मिशनच्या साहाय्यासाठी गाण्याचा जलसा करण्याची परवानगी दिली होती. पुण्याच्या शाखेवर डॉ. हॅरॉल्ड एच. मॅन. कर्नल स्टीन, मि. सिजविक यांसारखे मुलकी आणि लष्करी अधिकारी सभासद होऊन निधी जमविण्याच्या कामी मदत करीत होते. इतर पुढा-यांबरोबरच ब्रिटिश अधिका-यांचे फार मोलाचे साहाय्य या कामासाठी होत असतानाच इंग्रज अधिका-याच्या खुनासारखी निंद्य घटना ही अशा कामाला अपशकुन ठरणारी होती. ब्रिटिश अधिकारी व एतद्देशीय समाज यांच्यामध्ये दुरावा व अविश्वासाचे वातावरण निर्माण करणारी होती. ह्या घटनेमुळे मिशनच्या स्थानिक पदाधिका-यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. वस्तुतः ह्या खुनाचा मिशनच्या कार्याशी काडीमात्र संबंध नव्हता. तथापि ह्या घटनेचा परिणाम म्हणून मिशनच्या स्थानिक शाखेत अस्वस्थता निर्माण झाली व पुणे शाखेकडून शिंदे यांना व अध्यक्ष चंदावरकर यांना तातडीची पत्रे आली. चंदावरकरांना फारच चिंता वाटू लागली. शिंदे त्यांना भेटले व आपण पुण्यास जाऊन तेथील मंडळींना भेटून संशयाचे निराकरण करून परत येतो असे आश्वासन यांनी चंदावरकरांना दिले व ते पुण्यास गेले. त्या वेळी सर जॉन म्यूर मॅकेंझी हे मुंबई सरकारच्या कार्यकारी मंडळाचे मुख्य सभासद होते. त्यांची पत्नी लेडी म्यूर मॅकेंझी या मिशनच्या महिला कमिटीच्या अध्यक्षा होत्या. मिशनची ध्येयधोरणे व मिशनचे काम याबद्दल या दोघांनाही चांगल्या प्रकारची माहिती होती. मिशनच्या सोज्वळपणाबद्दल शिंदे यांनी या दोघांची खात्री पटविली. ह्या भेटीत शिंदे यांना सर जॉन म्यूर मॅकेंझी यांनी स्पष्ट सांगितले की, “सर नारायण चंदावरकरांच्या नावामुळे आणि तुमच्या कामाच्या तपशीलवार माहितीमुळे तुमच्याबद्दल तिळमात्रही संदेह आमच्या मनात येणार नाही हे पक्के ध्यानात ठेवा आणि तुमचे काम निर्वेधपणे पुढे चालवा. झालेल्या गुन्ह्याबद्दल सरकार योग्य तो बंदोवस्त करील. त्याची झळ तुम्हाला लागणार नाही.” सर मॅकेंझी यांचे विश्वासूपणाने काढलेले धीर देणारे हे उदगार ऐकून शिंदे यांचा जीव भांड्यात पडला. कमिटीचे अध्यक्ष डॉ. मॅन हे पुणे शाखेच्या कामामध्ये मन लावून जातीने लक्ष घालीत असत. त्यांना कोणत्याच प्रकारचा संशय आला नव्हता. पुण्याच्या भेटीमध्ये योग्य त्या प्रकारचे वातावरण निर्माण करून शिंदे मुंबईस परत आले. पाहतात तो त्यांच्या टेबलावर सर नारायणराव यांच्या राजीनाम्याचे पत्र आढळले. शिंदे ताबडतोब चंदावरकरांकडे गेले. पुणे येथे सर जॉन म्यूर मॅकेंझी यांच्या भेटीचा सगळा वृत्तान्त कथन केला. मिशनसंबंधी सर जॉन म्यूर मॅकेंझी, डॉ. मॅन अथवा अन्य कोणाही ब्रिटिश अधिका-यांच्या मनात मिशनसंबंधी किल्मिष नाही वगैरे गोष्टी स्पष्ट केल्या. अशा धामधुमीच्या वेळी नामदार गर्व्हनरांना भेटणे योग्य ठरणार नाही. ही लाट ओसरून गेल्यानंतर मिशनने एक शिष्टमंडळ नामदार गर्व्हनरांकडे न्यावे; घडलेल्या शोचनीय प्रकाराचा कोणत्याही प्रकारे संबंध न दाखवता मिशनच्या गरजा त्यांच्यापुढे ठेवून त्यांची सहानुभूती व सहकार्य मिळविण्याचा प्रयत्न करावा असा पोक्त सल्ला सर जॉन म्यूर मॅकेंझी यांनी दिला, वगैरे त्या दोघांमधील संभाषणाचा तपशील सर नारायण चंदावरकर यांना त्यांनी सांगितला. शिंदे यांचे हे सगळे बोलणे ऐकल्यावर त्यांनी राजीनाम्याचा आग्रह धरला नाही. मात्र शिंदे यांच्यासंबंधी काहीसे किल्मिष त्यांच्या मनामध्ये राहून गेलेले असणार. अर्थातच शिंदे यांचा अत्याचारी मार्गावर विश्वास आहे असे त्यांना कदापि वाटणे शक्य नव्हते ही गोष्ट जरी खरी असली तरी शिंदे यांचा जहालांकडे असलेला कल, त्यांचा लोकमान्य टिळकांशी असणारा संबंध ह्या बाबी चंदावरकरांना निश्चितच पसंत पडणा-या नसणार. लो. टिळकांच्या बरोबरीने शिंदे हे मद्यपाननिषेधाच्या सभांमध्ये भाग घेत असत. मद्यपाननिषेधाची चळवळ ही डॉ. भांडारकरांनाही मंजूर होती. चंदावरकरांनाही ती मंजूर असणारच. मात्र शिंदे यांनी जहाल राजकारण्यांशी असणा-या साहचर्यामुळे आपण एखादे वेळी अडचणीत येऊ ही आशंका मात्र चंदावरकरांच्या मनात असणार, त्याचप्रमाणे चंदावरकरांसारखीच भूमिका असणा-या प्रार्थनासमजातल्या इतर मंडळींनाही शिंदे यांची राजकीय भूमिका फारशी आवडणारी नव्हती. प्रार्थनासमाजाच्या धुरिणांना शिंदे यांच्याबद्दल दुरावा वाटण्याचे हे आणखी एक कारण.

एकंदरीत शिंदे यांनी काढलेले अस्पृश्यांसाठी मिशन व ते स्वतंत्रपणाने चालविण्याची त्यांची भूमिका, मिशनच्या कामासाठी ते मोठ्या प्रमाणात देत असणारा वेळ, त्यांची राजकारणाविषयक स्वतंत्र व जहालांकडे झुकणारी मते व वेळप्रसंगी राजकीय पुढा-यांनी चालविलेल्या चळवळीतील त्यांचा सहभाग ह्या अनेकविध कारणांमुळे मुंबई प्रार्थनासमाजातील मंडळींच्या मनात शिंदे यांच्याबद्दल हळूहळू दुराव निर्माण होऊ लागला. १९०७-०८ नंतरच्या एक-दोन वर्षांत हे अंतर वाढतच गेले. शिंदे यांचे मिशनचे काम मात्र झपाट्याने वाढत होते. त्यांच्या ह्या कामाला मोठी मान्यता आणि प्रतिष्ठा प्राप्त होत होती.

सर जॉन म्यूर मॅकेंझी यांनी प्रत्यक्ष भेटीत सुचविल्याप्रमाणे एक वजनदार शिष्टमंडळ मुंबई इलाख्याचे गव्हर्नर सर जॉर्ज क्लार्क यांच्याकडे नेण्याचे ठरविले व त्याप्रमाणे हे शिष्टमंडळ २५ ऑगस्ट १९१० रोजी पुण्यातील गव्हर्मेट हाऊसमध्ये गव्हर्नरांना भेटले. सदर शिष्टमंडळामध्ये सौ. सईबाई परांजपे(प्रिन्सपॉल र. पु. परांजपे यांच्या पत्नी), डॉ. हॅरॉल्ड एच. मॅन, बॅ. एच. ए. वाडिया, दि. ब. गोडबोले, प्रो. धोंडो केशव कर्वे आणि स्वतः शिंदे एवढी मंडळी होती. प्रथम सौ. सईबाईंनी भाषण केले. नंतर शिंदे यांनी भाषण करून मिशनच्या सविस्तर लेखी अर्ज सादर केला.

ह्या अर्जामध्ये प्रामुख्याने पुढील मागण्या करण्यात आल्या :
१) ना. गव्हर्नरांनी मिशनच्या घटनात्मक नियमाप्रमाणे मिशनचे पेट्रन म्हणून
५,०००/-रु. देऊन उदार आश्रयदाते व्हावे. २) मुंबई सरकारने मातृसंस्थेला उदार वर्षासन (ग्रॅन्ट-इन-एड्) द्यावे. ३) मिशनच्या स्वतंत्र फंडातून सरकारी मान्यतेच्या शाळांमधून अस्पृश्य विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे ठरविले आहे. त्यांपैकी खर्चाचा तिसरा हिस्सा सरकारने ग्रॅन्ट म्हणून द्यावा. ह्या फंडाला मिस् व्हायोलेट क्लार्क मोमोरियल शिष्यवृत्ती हे नाव देण्यास परवानगी असावी. (मिस् व्हायोलेट क्लार्क यांनी गाण्याचा जलसा करून मिशनला त्याद्वारा मोठे आर्थिक साहाय्य केले होते. त्यांचा आकस्मिक, दुदैवी अंत एक वर्षापूर्वी झाला होता.) ५) मुंबई इलाख्याच्या शिक्षण खात्याच्या दुय्यम शाळांतून इलाख्यातील अस्पृश्य विद्यार्थ्यांचा अधिक प्रवेश व्हावा आणि त्या विषयीचे सविस्तर अहवाल शिक्षण खात्याने प्रसिद्ध करावे, असे त्या खात्याला हुकूम देण्यात यावेत. इलाख्यातील म्युनिसिपालट्यांना आणि इतर स्थानिक संस्थांना अस्पृश्यांसाठी नवीन शाळा काढण्यासाठी आणि जुन्या शाळांतून हजेरीची संख्या वाढविण्यासाठी सूचना देण्यात याव्यात.

गव्हर्नरसाहेबांनी वरील मागण्यांना योग्य ती उत्तरे दिली. लोकमतावर परिणाम करण्याचे मिशनचे काम सर्वात महत्त्वाचे आहे आणि शिक्षणाच्या बाबतीत नुसते वाङमयीन शिक्षण देऊन न राहता औद्योगिक शिक्षणाकडे मिशनने लक्ष पुरवावे, असा आपला अभिप्राय प्रकट केला. गव्हर्नरसाहेबांनी शिष्टमंडळाचे योग्य त्या प्रकारे आतिथ्य केले व प्रत्येक सभासदाचे आस्थेवाईकपणे स्वागत केले.

गव्हर्नर सर जॉर्ज क्लार्क यांच्याशी मिशनच्या शिष्टमंडळाची झालेली भेट महत्त्वपूर्ण तशीच मिशनच्या कामाला अत्यंत उपयुक्त ठरली. मुंबई सरकारने लवकरच असा ठराव पास केला. मिशनच्या मागण्यांचा अर्ज आणि त्याला गव्हर्नरांनी दिलेले समर्पक उत्तर यांच्या निराळ्या प्रती छापून प्रत्येक जिल्ह्यातील अधिका-याकडे पाठवून द्याव्यात आणि त्याला मिशनच्या मागण्यांकडे जिल्ह्यातील म्युनिसिपालट्यांचे लक्ष वेधून घ्यावे असा मुंबई सरकारने ठराव केला. मुंबई सरकारच्या या ठरावामुळे अस्पृश्यतेच्या प्रश्नाकडे सरकार आस्थेवाईकपणाने लक्ष देत आहे ही जाणीव निर्माण होऊन ह्यासंबंधी कामाला चालना मिळण्यास साहाय्य झाले. स्वतः गव्हर्नर मिशनच्या कामामुळे प्रभावित झाले होते. ह्या सुमारास त्यांनी फर्ग्युसन कॉलेजला भेट दिली असता त्यांनी जे भाषण केले त्या भाषणामध्ये तरुण विद्यार्थ्यांचे लक्ष मिशनच्या कामाकडे वेधून घेतले. ते म्हणाले, “हिंदुस्थानातील निरनिराळ्या भिन्न जातींना एकत्र करून हिंदुस्थानात एकराष्ट्राची उभारणी करावी हा सरकारचा हेतू आणि कर्तव्य आहे. हे कार्य सर्वत्र चालू झाल्याची लक्षणे हल्ली दिसत आहेत. त्यात भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीच्या (म्हणजे डी. सी. मिशनच्या) कार्यामुळे हिंदुस्थानात विश्वबंधुत्व निर्माण होत आहे; त्याचा मी येथे विशेष उल्लेख करतो. इंग्लंडातील पुष्कळ कॉलेजातून अशा मिशनसाठी मिशन-यांचा पुरवठा होत आहे. तुम्हीदेखील ह्या बाबतीत आपला शक्य तो वेळ पुरवून पुणे येथील कार्याला मदत कराल तर बरे होईल.”

मिशनच्या चौथ्या बक्षीस समारंभानिमित्त पाच दिवस उत्सव करण्यात आला. ह्या प्रसंगी गव्हर्नरांनी केलेल्या भाषणातही मिशनच्या कार्याचे धोरण व महत्त्व ह्यावर नेमके बोट ठेवले. ते म्हणाले, “ह्या मिशनचे काम दुहेरी. एका बाजूस वरिष्ठवर्गाच लक्ष अस्पृश्यवर्गाच्या दुःखाच्या कहाणीकडे वेधणे, दुस-या बाजूला ह्या अस्पृश्यांना शिक्षण देऊन वर आणणे.” गव्हर्नर सर जॉर्ज क्लार्क यांनी मिशनच्या कामाची मोकळेपणाने स्तुती केली व ह्या कामाचे महत्त्व सांगितले. आदल्या वर्षी कलेक्टर जॅक्सनच्या खुनामुळे मिशनसंबंधी काही अधिका-यांच्या मनात एक व्यर्थ गैरसमज पसरला होता. गव्हर्नर जॉर्ज क्लार्क ह्या प्रांताधिपतीनेच केलेला मिशनचा हा गौरव पाहून मिशनसंबंधीच्या संशयाचा निरास झाला.

मिशनसंबंधी राजकीय स्वरूपाच्या संशयाचे जे पटल जॅक्सनच्या खुनानंतर निर्माण झाले होते ते अशा त-हेने वर्ष दोन वर्षांच्या कालावधीत दूर झाले. मिशनच्या कामाची थोरवी आणि विश्वासार्हता गव्हर्नरसारख्या जबाबदार अधिका-याने जाहीरपणे प्रकट केली. असे असले तरी मुंबई प्रार्थनासमाजातील मंडळींच्या मनामध्ये शिंदे यांच्यासंबंधी निर्माण झालेला दुरावा कमी तर झाला नाहीच, उलट वाढत गेला. शिंदे यांनी आरंभिलेल्या अस्पृश्यतानिवारणाच्या कामाचा उठाव मोठ्या प्रमाणात झाला, त्याचा बोलबाला मोठ्या प्रमाणात होऊ लागला. ह्या कामाला सार्वत्रिकपणे चालना मिळू लागली व मान्यता वाढू लागली असेही दृश्य दिसू लागले. ह्या काळामध्ये महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक वातावरणात विठ्ठल रामजी शिंदे यांचे चित्र उठावदारपणे दिसू लागले ते प्राधान्याने त्यांनी आरंभिलेल्या त्या अस्पृश्यतानिवारणाच्या कार्यामुळे. मिशन म्हणजे शिंदे एवढे दोहोंचे एकरूपत्व त्या काळामध्ये जाणवू लागले होते. नकळत याचाच परिणाम मुंबई प्रार्थनासमाजाच्या धुरिणांवर प्रतिकूल स्वरूपाचा झाला असणार. शिंदे यांची जहाल स्वरूपाची राजकीय मते तर या मंडळींना रुचणारी नव्हतीच. त्यामध्ये शिंदे यांच्या मिशनच्या कार्याचा झालेला वाढता बोलबाला. ह्यामुळे त्यांच्याबद्दलचा दुरावा प्रार्थनासमाजात वाढीस लागला असावा. एक प्रकारच्या विरोधामध्येही त्याचे रूपांतर झाले. त्याचेच पर्यवसान म्हणून प्रचारकांनी अमक्या अमक्य नियमाप्रमाणे वागावे, वेळोवेळी कामाचे अहवाल पाठवावेत, रोजनिशी ठेवावी, अशा प्रकारचा आग्रह चालू राहिला. शिंदे वर्षाकाठी अहवाल तर लिहीतच होते. वेळोवेळी वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करीत होते. नित्यनैमित्तिक उपासना चालवीत होते. त्यामधून ब्राह्ममताला अनुरून प्रगल्भ स्वरूपाचे विचार सुबोधपणे मांडून धर्मजागृतीचे कार्य करीत होते. त्यांचे कामाचे अहवाल आणि व्याख्यानाचे वृत्तान्त वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध होत होते. कारण त्यांच्या कार्याला प्रसिद्धीची आवश्यकताही असे. किंबहुना प्रसिद्धी हा त्यांच्या कार्यविस्ताराचाच भाग होता. शिंदे हे प्रार्थनासमाजाचे कार्य अशा प्रकारे जबाबदारीने पार पाडीत असताना त्यांनी आपले काम नियमाच्या चौकटीत बसवावे हा आग्रह शिंदे यांना रुचणारा नव्हता की परवडणारा नव्हता. यावेळच्या आपल्या मनःस्थितीचे त्यांनी वर्णन केले आहे ते असे, “ह्यामुळे मी वेळोवेळी रंजीस येऊ लागलो. समाजाचे काम मी माझे आध्यात्मिक काम म्हणून पत्करले होते. एखाद्या ऐहिक नोकरीप्रमाणे लेखी राजीनामा देऊन तीतून सुटू जाणे मला इष्ट वाटेना. ज्या नोकरीसाठी मी अर्ज केला नव्हता ती कशी संपणार?” एक प्रकारच्या अंतःप्रेरणेने त्यांनी स्वतःला प्रचारक म्हणून वाहून घेण्याचा निर्णय घेतला होता. ह्यातून सुटण्याचा त्यांना एकच मार्ग दिसू लागला तो हाच की, समाजाने देऊ केलेले अल्पसे वेतन बंद करावे पण समाजाची नोकरी सोडू नये. कारण धर्मप्रचार करणे हा त्यांचा जीवन जगण्याचाच अविभाज्य भाग झाला होता. धर्मप्रचारकाचे काम करीत ते सतत फिरतीवर असत. त्यांनी घरी पत्र लिहिले की, आपल्या पश्चात कोणी हे वेतन आणू दिल्यास घरच्या मंडळींनी ते स्वीकारू नये.

अंतिमतः ह्या दुराव्याचे पर्यवसान असे झाले की, १९१०च्या नोव्हेंबर महिन्यात मुंबई प्रार्थनासमाजाच्या कमिटीने ठराव केला, विठ्ठल रामजी शिंदे यांना इतःपर मुंबई प्रार्थनासमाजाचे प्रचारक समजण्यात येऊ नये. अशा त-हेने १९०३ नोव्हेंबरपासून मुंबई प्रार्थनासमाजाचे प्रचारक म्हणून ७ वर्षे अखंडपणे व अविश्रांतपणे काम गेल्यानंतर मुंबई प्रार्थनासमाजाशी असलेला प्रचारक या नात्याचा संबंध संपुष्टात आला. शिंदे यांच्या आयुष्यातील हा एक निर्वाणीचा प्रसंग. ज्या ज्या कामामध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांनी कोणतीही लौकिक स्पृहा मनात न ठेवता स्वतःला समर्पित केले त्या संस्थेमधून बाहेर पडण्याचे, तिच्याशी फारकत घेण्याचे दुर्धर, शोकात्म प्रसंग शिंदे यांच्या आयुष्यात येत राहिले. त्यापैकी शिंदे यांच्यावर ओढवलेला हा पहिला प्रसंग होता. हा आघात सहन करण्यासाठी खचितच त्यांना आपले आध्यात्मिक बल एकटावे लागले असेल. ह्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी त्यांची सत्यावर असलेली अविचल निष्ठा उपयोगी पडली असणार.

संदर्भ
१.    द्वा. गो. वैद्य, प्रार्थनासमाजाचा इतिहास, पृ. ११४.
२.    ‘ह्या कित्येकात कोण होते कळण्यास आधार नाही’ अशी टीप द्वा. गो. वैद्य यांनी दिली आहे.
३.    द्वा. गो. वैद्य, प्रार्थनासमाजाच इतिहास, पृ. १४८-४९.
४.    विठ्ठल रामजी शिंदे, रोजनिशी, पृ. २८-२९.
५.    विठ्ठल रामजी शिंदे, धर्म, जीवन व तत्त्वज्ञान, पृ. १८७.
६.    शिंदे यांची १९३५ची छोटी डायरी, शिंदे यांची कागदपत्रे.
७.    शिंदे यांचा पत्रव्यवहार.
८.    विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. २६५.
९.    माधव केळकर, एका वेड्या समाजिस्टाचे बरळणे अथवा महाराष्ट्रातील प्रार्थनासमाजाचे अंतरंग, पृ. ५.
१०.    तत्रैव.
११.    जे. व्ही. नाईक, ‘प्रार्थनासमाजाची जडणघडण’, लोकसत्ता, दिवाळी १९९५.