हिंदू गृहस्थिती आणि समाजस्थिती व्याख्यान व नाट्यप्रयोग

ऑक्सफर्ड येथील वास्तव्याच्या अखेरच्या दिवासात विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेली एक विशेष गोष्ट म्हणजे तेथील युनिटेरियन समाजापुढे दिलेले एक व्याख्यान व त्याच्या जोडीने दाखविलेले नाट्यरूप देखावे. ऑक्सफर्डमधील सर्व युनिटेरियन समाजातील स्त्री-पुरुषांचा परिचय व्हावा, विचारविनिमय वाढावा म्हणून वर्षातून निदान एक तरी मोठे स्नेहसंमेलन भरविण्यात येत असे. मार्चच्या आरंभी भरलेल्या अशा स्नेहसंमेलनात शिंदे यांनी हिंदुस्थानातील गृहस्थिती व समाजस्थिती या विषयावर निबंध वाचला व ती कशी असते हे प्रत्यक्षपणे दाखविण्यासाठी मध्यम स्थितीतील कुटुंबाच्या देखाव्याची सजावट करून दाखविली.

व्याख्यानाच्या प्रारंभीच त्या श्रोतृवर्गापुढे ह्या विषयावर बोलणे कसे अडचणीचे आहे हे त्यांनी नमूद केले. “ह्या आधुनिक आणि सुसंस्कृत समजल्या जाणा-या जगातील सर्वसामान्य स्त्री-पुरुष जेव्हा ह्या विषयावरील व्याख्यान ऐकायला येतात तेव्हा आपली करमणूक व्हावी ही त्यांची अपेक्षा असते; उद्बोधक विचार ऐकायला मिळावेत अशी त्यांची अपेक्षा नसते. हिंदुस्थानात राहून आलेले ख्रिस्ती मिशनरी, तसेच सखोल निरीक्षण व चांगली सहानुभूती असलेली अन्य मंडळी ह्यांनी ह्या प्राचीन गौरवशाली देशाचे आपल्याला समजलेले सत्य म्हणून जी चित्र रेखाटलेली आहेत ती काही फारशी स्पृहणीय नाहीत आणि ह्याची भारतीयांना कल्पना नाही असे नाही. अशा परिस्थितीत आपल्या भारताच्याच एका पुत्राने आपल्या पवित्र गृहस्थितीची आणि समाजाची अंगे परकीयांसमोर उघडी करावीत हे त्यांना खचित आवडणारे नाही. कारण ह्या परकीयांच्या सहानुभूतीची त्यांना खात्री असत नाही. मात्र सध्याच्या युगात आपण आपल्या पूर्वजांपेक्षा एकमेकांना अधिक सहजपणे समजून घेऊ शकतो असा माझा विश्वास आहे. मात्र हेही आपण विसरता कामा नये की, हा या युगाचा प्रारंभकाळ आहे. हिंदू जीवनातील संगीत युरोपियनांच्या कानांपर्यंत पोहोचत नाही. पौर्वात्यांचा पेहराव, घर, सामानांपैकी कित्येक वस्तू युरोपियनांच्या डोळ्यांना काहीशा चमत्कारिक, फार झाले तर प्रेक्षणीय वाटतात. जी गोष्ट सौंदर्यकल्पनेबाबतची आहे तशीच औचित्य-कल्पनेबाबतचीही आहे आणि हा मतभेद केवळ तुमच्याच पक्षी आहे असे नव्हे. मागच्या राज्याभिषेकाच्या वेळी येथे मोरोक्कोचा प्रतिनिधी आला होता. त्याच्याबाबत असे सांगितले जाते की, परतीच्या वेळी तो म्हणाला, ‘इंग्लंड हा देश मोठा आहे; पण मला समाधान वाटते की मी संस्कृतीकडे परत जात आहे.’ ह्यावरून एवढेच दिसते की जगाचे सौंदर्यशास्त्र त्याचप्रमाणे नीतिशास्त्र परंपरेच्या आणि राष्ट्रीय पक्षपाताच्या पाशातून अजून मुक्त झाले नाही.

“माझा प्रस्तुतचा प्रयत्न हा माझ्या देशवासीयांना अप्रयोजकपणाचा वाटण्याची शक्यता आहे आणि हा धोका मी पत्करलाही नसता. परंतु तुमच्यामध्ये असताना मला कुठल्याही प्रसंगी मी तुमच्यात परका आहे, अशा प्रकारची जाणीव व्हावी असा प्रसंग कधीही घडला नाही. मला तुमच्याकडून सौहार्द व हे समाश्वसन मिळाल्यामुळे माझ्या देशवासीयांच्या जीवनाबद्दल बोलायला मला संकोच वाटत नाही.” या प्रकारची प्रस्तावना केल्यानंतर त्यांनी आपल्या व्याख्यानात पुढीलप्रमाणे प्रतिपादन केले, “हिंदुस्थान हे केवळ एक भौगोलिक नाव आहे अशा समजुतीनेच अनेकदा उल्लेख केला जातो. मला म्हणावेसे वाटते की, असे समजणे रास्त नाही. जो देश युरोपच्या निम्म्याइतका आकाराने मोठा आहे त्यात तुमच्या इंग्लंडातल्याप्रमाणे राजकीय एकात्मता, त्याचप्रमाणे जीवनपद्धतीतील बाह्य सारखेपणा यांची कशी अपेक्षा करता येईल? इंग्लंड शब्दाने मला तुमचे ‘चिमुकले इंग्लंड’ अभिप्रेत आहे; इंग्रजांचे साम्राज्य नव्हे. हिंदुस्थान देशाने प्रचंड उलथापालथ करणा-या घटना इतिहासकाळात अनुभवलेल्या आहेत हेही आपण लक्षात घेतले पाहिजे. एक चिनी लोकांचा अपवाद वगळला तर भारतीयांप्रमाणे भूतकाळ जगणारे अन्य लोक जगाच्या पाठीवर नाहीत. शिवाय हेही खरे आहे की, हिंदुस्थानने जितके म्हणून वंश आणि धर्म आपल्यात सामावून घेतले आहेत तसे जागाच्या पाठीवर इतर कोणत्याही देशाने केलेले नाही. थोडक्यात, हिंदुस्थान म्हणजे मानवंशशास्त्रज्ञासाठी एक परिपूर्ण भांडार आहे. मात्र एवढी सारी विविधता असल्यामुळे हिंदुस्थान म्हणजे केवळ एक भौगोलिक नाव आहे असे म्हणणे न्याय्य ठरणार नाही. ह्या खंडप्राय देशात ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत कौटुंबिक आणि सामाजिक जीवनाचा समान नमुना सहजपणे शोधून काढता येतो. हिंदुस्थानची चारपंचमांश लोकसंख्या हिंदू म्हणविणारे आणि जैन, शीख, लिंगायत व बौद्ध यांची आहे. मात्र त्यांच्या धार्मिक श्रद्धा आणि उपासनेचे प्रकार यांचा त्यांच्या दैनंदिन जीवनाशी फारसा संबंध असत नाही. सामाजिकदृष्ट्या ते सर्व हिंदू आहेत. एवढेच नव्हे तर लोकसंख्येच्या पाचव्या हिश्श्याने असलेले मुसलमान हेही त्यांच्या राहाटीच्या दृष्टीने आपल्या अन्य देशबांधवांसारखेच आहेत; अन्य देशातील मुसलमानांसारखे नाहीत. म्हणून ज्या एखाद्या गावावर अथवा नगरावर पाश्चात्त्य कल्पनांचा प्रत्यक्ष प्रभाव पडलेला नाही तेथील हिंदू कुटुंबाचे मी जर वर्णन केले तर एक पार्शी सोडून ते कोणत्याही समाजाचे प्रातिनिधिक वर्णन ठरेल.”

भारतीय गृहस्थितीचे वर्णन करताना त्यांनी म्हटले, “भारतीय घर हे एका प्रचंड वृक्षासारखे असते. मुख्य आधार, आईवडिल यांचे खोड. त्यालाच मुलगे आणि नातू यांच्या कुटुंबाच्या अनेक फांद्या फुटलेल्या असतात. मात्र त्यांच्यामध्ये सजीव ऐक्य असते. ही सारी मिळून एक सेंद्रीय पूर्ण (ऑरगॅनिक होल) बनते. कर्ती मुले आणि नातवंडे स्वतः कमाई करीत असली तरी सामान्यतः ह्या व्यवस्थेपासून ते विभक्त होत नाहीत. कुटुंबाची वाढ ही एखाद्या वडाच्या झाडाप्रमाणे होत असते. शाखांपासून निघणारी मुळे जमिनीत रुजत असतात व कालांतराने ही मुळेच खोड अथवा सोट बनतात व मूळ वृक्षाची ताकद व विस्तार वाढवीत असतात. कधी कधी कुटुंबे विभक्त झाल्याची उदाहरणे आढळतात खरी; परंतु हा इथल्याप्रमाणे नित्याचा प्रकार नसून क्वचित संभवणारा असतो त्यामुळे कधी कधी असेही दृश्य दिसते की, एखाद्या घरात चाळीस-पन्नास माणसे गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. असे घर म्हणजे ‘देवाचे राज्य’ म्हटले नाही तरी ‘देवाची वसाहत’ म्हणता यावे असे असते. सख्यभाव नष्ट झाला अथवा विपरीत परिस्थितीने घरापासून फुटून राहावे लागले तर फुटून निघणारे कुटुंब मूळ घराच्या समोरच राहाते. कधी कधी अशी कुटुंबे एखाद्या गल्लीच्या मुख्य भाग बनतात. आणि ती गल्ली त्या कुटुंबाच्या नावाने ओळखली जाते.
 
“अशा कुटुंबात चालणारी सत्ता राजेशाही पद्धतीची असते आणि कुटुंबातील वडीलधारा पुरुष हा राजाप्रमाणे सत्ता चालवीत असतो. मात्र आपल्या पत्नीच्या सौम्य आणि मधुर इच्छेनुसार आपल्या निर्णयात बदल करीत असतो वा मुरड घालीत असतो. हा अधिकारशहा ज्या वेळेला वृद्ध होतो तेव्हा आपले अधिकार सामान्यतः आपल्या थोरल्या मुलाकडे सुपूर्त करतो आणि हा थोरला भाऊ आपल्या इतर भावांना बापाच्या ठिकाणी असतो. एवढेच नव्हे तर त्याच्या बायकोला आईसारखा मान मिळत जातो. अर्थातच हा जुना आदर्श आजच्या काळात पूर्णपणाने पाळला जाईल असे नाही. मात्र जेथे तो पाळला जात नाही तेथेसुद्धा या मूळ आदर्शाची जाणीव निश्चितच असते.”

ह्यानंतर शिंदे यांनी घरामध्ये सुनेची स्थिती कशी असते याचे मोठे परिणामकारक चित्र रेखाटले आहे. “अशा ह्या हिंदू कुटुंबातील कारुण्याचे आस्थाकेंद्रच वाटावी अशी अतुलनीय व्यक्ती म्हणजे घरातील सून. ही सून म्हणजे दुःखभोग आणि स्वार्थत्याग यांची प्रतीमा असते. ती म्हणजे हिंदुस्थानातील स्त्रीवर्गाचा आत्माच होय. कुटुंबातील तिचे स्थान सगळ्यांत खालचे, सर्वांत उपेक्षित असते. कधी कधी छळही होणारी ही सून क्रमशः स्वतःचे सामर्थ्य वाढवीत भावी काळातील पालनकर्ती बनत असते. दैवी वाटावेत असे कौटुंबिक सद्गुण तिच्या ठिकाणी असतात. आईबापांकडून या लहानगीचे लाड होत असतानाच ती कळायच्या आधीच विवाहित होते आणि अनोळखी लोकांमध्ये फेकली जाते. तिला स्वतःचे असे सुख मिळविता येत नाही. घरातल्या लहानग्यांपासून तो थोरापर्यंत सगळ्यांना खूष ठेवण्याची जबाबदारी मात्र तिची असते. सगळ्यांच्या शेवटी ती झोपायला जाणार आणि सगळ्यांच्या आधी तिला उठावे लागणार. इतर उभे असताना तिने खाली बसता कामा नये. परक्यांसमोर घरातील कुणाही पुरुषव्यक्तीबरोबर बोलता कामा नये. आईवडील अथवा इतर वडीलधारे ह्यांना ती नव-यासोबत दिसणे हा त्यांचा अपमान. तिने तो कधीही करता कामा नये आणि बायकोला नावाने हाक मारणे म्हणजे
वडीलधा-यासमोरचे उद्धट वर्तन. घराच्या ह्या भावी राणीला या दिव्यातून जावे लागते.” हिंदू घरातील सुनेचे हे वर्णन करताना शिंदे यांच्या मनासमोर त्यांची कारुण्यमूर्ती आई प्रतीकरूपाने असणार.

त्यानंतर शिंदे यांनी हिंदू घरातील मुलीचे लग्न ही बाब कशी महत्त्वाची असते आणि लग्नाचा सोहळ कसा चालतो याचे वेधक वर्णन केले आहे. ते म्हणाले, “सगळ्या घराचे लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे लहानग्या मुलीचे लग्न. कधी कधी ही बाब चिंतेचीही ठरते. मुलीचे वय फार वाढलेले असते-म्हणजे बारा वर्षांहून जास्त झालेले असते. ह्यामुळे आईबापांना तिच्या चिंतेचा घोर कसा लागतो याचे मराठी नाटकातही वर्णन केले आहे.

“अखेर विधिवशात म्हणा अथवा मध्यस्थाच्या योजकतेने म्हणा लग्न जुळते आणि मग कधी कधी पंधरवडाभर टिकणारा लग्नाचा जो आनंदोत्सव चालतो त्याचे वर्णन काय करावे? जवळची आणि दूरची शेकडो माणसे ह्या नवरा-नवरीभोवती गोळा होतात आणि त्या बिचा-या नवरा-नवरीला या उत्सवामध्ये आपले काय स्थान आहे याची फारशी जाणीवही नसते. मी हिंदू विवाहपद्धतीतील एका सत्यपूर्ण गोष्टीचा निर्देश करतो आणि ती म्हणजे हिंदू विवाह हा सर्वार्थाने संस्कार असतो. विवाह म्हणजे एक सामाजिक करार असतो; व्यक्तिगत सुखाची बाब असते; अशा कल्पनांचा हिंदू विवाहाशी दूरत्वानेही संबंध असत नाही. तो एक धार्मिक भूमिकेतून केलेला स्वार्थत्याग असतो. व्यवहारी वृत्तीच्या पश्चिम जगाचा यावर विश्वास बसणे कठीण. परंतु हजारो वर्षांपासून चालत आलेली हिंदुस्थानातील ही वस्तुस्थिती आहे. त्यामध्ये वेदनादायक भाग एवढाच की, ही विवाहपद्धती पुरुषजातीच्या बाबतीत पक्षपाती असते. स्त्रीजातीला मात्र ही पद्धती भूषणावह ठरणारी नाही.”

विवाह समारंभातील मांडव कसा असतो, चारी बाजूला केळीचे खुंट उभारलेले असतात, हे केळीचे खुंट स्वार्थत्यागाचे आणि स्त्रियांमधील सद्गुणांचे प्रतीक असतात वगैरे गोष्टींचे निवेदन केल्यानंतर ह्या विवाहविधीने कालपर्यंत जी एक खेळकर मूल होती तिचे रूपांतर आज मर्यादशील वागणा-या पत्नीमध्ये झालेले असते, असे ते नमूद करतात.

“हिंदू घरामधील आनंदाचा दुसरा प्रसंग म्हणजे पुत्रजन्म होणे. मुलाच्या जन्माने आनंद तर मुलीच्या जन्माने निराशा. मुलासाठी संस्कृतमध्ये पुत्र हा जो शब्द आहे त्याचा अर्थच मुळी आपल्या पूर्वजांना पूनामक नरकात जाण्यापासून वाचविणारा असा आहे. माणसामध्ये असणारी वंशसातत्याची जी स्वाभाविक इच्छा असते तिला ही समजूत बळकटी आणणारी आहे. जन्मणारा मुलगा जेवढ्या संपत्तीचा वारसदार होणार असतो तिच्या भूमितीश्रेणीच्या पटीने हा आनंद वाढत असतो. मी एकदा हिंदुस्थानातील एका संस्थानाच्या राजधानीतील पुत्रजन्माचा सोहळा चालला होता त्या वेळी उपस्थित होतो. अग्रभागी संस्थानचा प्रचंड हत्ती व पाठीमागून घोडे व हत्ती अशी मिरवणूक निघाली होती. हत्तीच्या पाठीवर चांदीचे एक भले मोठे पात्र साखरेने भरले होते. त्यातून वाटी वाटी साखर रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या प्रत्येक घरामध्ये पाठविली जात होती. ही मिरवणूक पंधरवडाभर चालली होती.”१

निबंधाच्या प्रारंभी प्रास्ताविकात शिंदे यांनी असे विधान केले आहे की हिंदू जीवनातील संगीत युरोपियनांच्या कानापर्यंत पोहोचत नाही. प्रत्यक्ष निबंधात मात्र ह्या विधानाचे विवरण आढळत नाही. ह्या निबंधाचे ‘सम पिक्चर्स इन् ए हिंदू होम’ ह्या शीर्षकाखाली केलेले काही मुद्यांचे टाचण पाहावयास मिळते.२ त्यामध्ये त्यांनी असे विधान केले आहे की, “आज राजा आणि राम (गृहिणी सचिवः) यांनी पत्नीवियोगानंतर केलेल्या विलापातून, त्यांच्या झुरण्यातून आणि रुदनातून हिंदू प्रेमाचा सर्वोत्कृष्ट आविष्कार पाहावयास मिळतो.” हे व्याख्यान त्यांनी केवळ वाचून दाखविले नसावे तर अधूनमधून ते भाष्यही करीत असावेत, निबंधात न केलेल्या विवरणाची भर घालीत असावेत, असे दिसते.

व्याख्यानाच्या दुस-या भागामध्ये शिंदे यांनी हिंदुस्थानातील समाजस्थिती, तेथील सुधारणा व इंग्रज सरकारची व लोकांची त्याबद्दलची भूमिका यासंबंधी महत्त्वाचे विचार मांडले. ते म्हणाले, “मागच्या शतकात हिंदुस्थानचा चेहरामोहरा बदललेला आहे. धर्म, समाज राजकारण, उद्योग यांची स्थिती अशी झालेली आहे की, ती सारी जणू काय एका प्रचंड कढईत फेकल्यामुळे खदखदत आहेत. तेथे चाललेल्या पुनर्घटनेला चालना देण्याची अंतिम श्रेय ब्रिटनला मिळणार आहे. मात्र सध्याचा विकास एवढा दांडगा आहे की त्याचे श्रेय ब्रिटनसारख्या मानवी यंत्रणेला, मग ती कितीही मोठी असो, देणे रास्त ठरणार नाही. या सनातन देशातील लोकांची धारणा हळूहळू, किंवा माझ्या मताने तर वेगाने पुनर्घटित होत आहे. केशवचंद्र सेन ह्यांच्यासारख्या धर्मनिष्ठ व्यक्तीला तर त्यामागे दैवी योजना आहे असे वाटते.

“सध्याच्या काळी हिंदुस्थानच्या सामाजिक स्थितीबाबत बोलणे याचा अर्थच तेथील सामाजिक सुधारणेविषयी बोलणे असा होतो. सगळे लोकनेते आणि बंडखोर पुरुष हे मूलतः समाजसुधारकच आहेत - मग ते मान्य करोत अथवा न करोत. प्रारंभाच्या काळात ब्रिटिश सरकारने राजा राममोहन रॉय आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांसारख्या आद्य सुधारकांना सतीची चाल बंद करण्यासाठी, विधवांना पुनर्विवाहाची मुभा देण्यासाठी कायदे करून साहाय्य केले. परंतु लवकरच त्यांना आपल्या मर्यादांची जाणीव झाली आणि सध्या ते अशा बाबतीत उदासीन आहेत. सगळ्या देशाच्या पातळीवर शिक्षणप्रसार करणे हा जरी सुधारणेचा प्रभावी मार्ग असला आणि केवळ सरकारच या बाबतीत खूप काही करू शकत असले तरी ते ह्या बाबतीत आपली जबाबदारी टाळीत आहेत ही गंभीर बाब आहे.”

यानंतर शिंदे यांनी असे विधान केले की “जगातल्या कित्येक मोठ्या चळवळीप्रमाणे हिंदुस्थानातील सामाजिक सुधारणेचा प्रारंभकाळ हा अतिशय रोमँटिक कालखंड होता.” ब्राह्मसमाजाचे सुप्रसिद्ध पुढारी पंडित शिवनाथशास्त्री यांनी प्रसिद्ध केलेल्या साहित्यातील दोन महत्त्वाच्या घटना त्यांनी सांगितल्या. त्यांपैकी पहिली बंगालमधील बारीसाल येथे १८६२ मध्ये राहणा-या एका तरुण ब्राह्म वकिलासंबंधीची होती. त्याच्या वडिलांनी पहिली पत्नी निवर्तल्यानंतर आपल्या आईच्या सांगणावरून त्या वेळच्या चालीप्रमाणे नऊ-दहा वर्षांच्या मुलीशी लग्न केले. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर ह्या लहानग्या सावत्र आईची जबाबदारी तरुण ब्राह्म वकिलावर पडली. आपल्या सावत्र आईची करुण अवस्था पाहून ह्या ब्राह्म वकिलाने आपल्या पत्नीच्या सहकार्याने एक व्यूह आखला व अनेक संकटांना तोंड देत आपल्या सावत्र आईचे लग्न आपल्या एका विश्वासू मित्राबरोबर लावून दिले, वगैरे चित्तथरारक हकिकत त्यांनी निवेदन केली.

दुसरी रोमांचकारी हकिकत जी सांगितली ती १८७० मधील एका सतरा वर्षांच्या कुलीन म्हणजे उच्चवर्णीय मुलीबाबतची होती. तिच्या कर्मठ चुलत आजोबाने तिचा विवाह आधीच तेरा लग्ने केलेल्या एका धर्मनिष्ठ ब्राह्मणाशी करण्याचा बेत आखला होता. ह्या तरुण कुलीन मुलीने ब्राह्म असलेल्या आपल्या दोन चुलत बहिणींना ही हकिकत कळवून, आपली सुटका केली नाही तर आपण आत्महत्या करू असे पत्र लिहून कळविले. ह्या ब्राह्म चुलत बहिणींनी तरुण विद्यार्थ्यांच्या साहाय्याने तिची सुटका करून विशाल पद्मा नदीला प्रचंड पूर आला असतानाही नावाड्याला नदीत नाव सोडावयाल भाग पाडले आणि कलकत्त्याला तिच्या ब्राह्म बहिणींच्या स्वाधीन केले. कालांतराने तिचा विवाह प्रतिष्ठित अशा ब्राह्माशी झाला.

सुधारणेच्या पहिल्या पर्वातील या प्रकारच्या रोमांचकारी घटनांचे शिंदे यांनी वर्णन करून सध्या या प्रकारचा रोमान्स-अद्भुत घडण्याचा भाग-जोरात असल्याचे सांगितले. सुधारणेचे पूर्ण यश हे बहुजन समाजात होणा-या शिक्षणप्रसारावर अवलंबून आहे ही बाबही निदर्शनास आणली.

हिंदुस्थानातील जातिव्यवस्था आणि तेथील इंग्रज लोक यांविषयी शिंदे नंतर बोलले, “हिंदुस्थानात सुमारे तीनशे मोठ्या जाती आहेत आणि जवळ जवळ तितक्या पोटजाती आहेत. जातिव्यवस्था हा हिंदुस्थानच्या राष्ट्रीय स्वास्थ्याला अत्यंत विघातक ठरणारा अडथळा आहे. ह्या क्षेत्रात सुधारकांना करावा लागणारा झगडा अत्यंत बिकट स्वरूपाचा आहे.

“हिंदुस्थानच्या सामाजिकतेला असा एक पैलू आहे की, ज्याचा संबंध तेथे राहणा-या इंग्रजांशी पोहोचतो. हे लोक तेथील जातिव्यवस्थेचा निषेध करणा-याच्या कामी अजिबात मागे नाहीत. मात्र त्यांचे स्वतःचे वर्तन ह्या निषेधाशी जुळणारे कितपत असते? अँग्लो-इंडियनांचा वेगळेपणा जेवढा म्हणून राखला जातो आणि त्यांना जेवढे म्हणून संरक्षण मिळते तेवढे संरक्षण अन्य कोणत्याही जातीला मिळत नाही. ब्राह्मण आणि शूद्र एकत्र जेवणार नाहीत. आंतरजातीय लग्ने करणार नाहीत हे खरे; पण बाकी बाबतीत मात्र त्यांचे संबंध अगदी सलोख्याचे असतात. इंग्रज माणसे शंभर वर्षांपूर्वी जितकी परकी होती तितकीच परकी आजही आहेत. एवढेच नव्हे तर भविष्यातदेखील तसेच राहण्याचा त्यांचा निर्धार दिसतो. हिंदुस्थानचे कमांडर इन चीफ लॉर्ड रॉबर्ट्स नेहमी आग्रहपूर्वक सांगत की, हिंदुस्थान तलवारीच्या जोरावर जिंकला आहे तलवारीच्या जोरावर राखला जाईल. लॉर्ड रॉबर्ट्स हे लष्करातील पुरुष आहेत आणि त्यांच्याकडून अधिक चांगल्या अपेक्षा करता येणार नाहीत. पण ऑक्सफर्ड विद्यापीठातील इतिहासाचे नामवंत प्राध्यापक मिस्टर ट्राऊड ह्या विधानाचा पुनरुच्चार करतात आणि भरीला म्हणतात की, पराभवाची नामुष्की पत्करल्याशिवाय आम्ही हिंदुस्थान सोडू असे म्हणणे म्हणजे जाणीवपूर्वक प्रचंड भ्रमात राहण्यासारखे ठरेल. असे जर आहे तर अँग्लो-भारतीयांनी हिंदुस्थानात स्वतःची एक वेगळीच (जखडबंद) जात तयार केली, यात नवल ते काय? ह्या अप्रिय बाबीचा निर्देश करताना मला बरे वाटत नाही. ह्या बाबीशी अन्य गंभीर प्रश्न जर गुंतलेले नसते तर मी ह्या अप्रिय बाबीचा उल्लेख टाळला असता. हे प्रश्न राष्ट्रीय स्वरूपाचे नाहीत; ते आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे आहेत. त्यांचा संबंध अखिल मानव जातीशी येतो. फक्त भारतातच प्राचीन आणि आधुनिक जगे एकत्र येत आहेत. प्राचीन धर्म आणि प्राचीन तत्त्वज्ञान, जुन्या आकांक्षा आणि जुनी वैशिष्ट्ये त्यांच्या शुद्ध स्वरूपात तेथेच जतन केली आढळतात. आता तेथेच आधुनिक विचार आणि आधुनिक जीवनप्रणाली हळूहळू भूतकाळाच्या खडकाळ आणि खोलवर भूमीत मुळे रुजवीत आहेत. इतिहासात अनन्यसाधारण असलेल्या अशा आणीबाणीच्या काळात हिंदुस्थानातील इंग्रज हे स्वतःला संकुचित राजकीय आणि व्यापारी जाणिवेपेक्षा उंचावू शकले नाहीत. हिंदुस्थानात जी दैवी घटना घडत आहे ती ध्यानात न घेता हिंदुस्थानला जिंकण्याचा किरकोळ प्रसंग जर ते विसरू शकले नाहीत; मानवी सुसंवाद आणि एकात्मता ह्याऐवजी ते जर स्वतःचे एकांगी वंशश्रेष्ठत्व प्रस्थापित करण्याचा आग्रह धरीत बसले आणि याउप्पर “केवळ पराभवाची नामुष्की पत्करावी लागली तरच हिंदुस्थान सोडू” अशा प्रकारची भाषा अहंकाराने बोलत राहिले, तर तेथे सुरू झालेल्या दैवी प्रयोगाचे ते जे नकळतपणे साधन झालेले आहेत त्या प्रयोगाला त्यांनीच जाणीवपूर्वक व सहेतुकपणे अडथळा आणला असे होईल.”

ह्या मुद्दयाचा समारोप करताना शिंदे म्हणाले, “कदाचित कुणी विचारू शकेल की, ज्या परकीयांच्या विरोधात एखादे राष्ट्र आहे त्याच्यामध्ये कसे मिसळावयाचे? मी परवा नुकतेच निधन पावलेले ब्रटिश अँड फॉरेन युनिटेरियन असोसिएशनचे हिंदुस्थानातील प्रतिनिधी असलेले रेव्ह. फ्लेचर विल्यम्स यांच्या स्मारकासंबंधीचा वृत्तान्त वाचीत होतो. मी स्वतःलाच प्रश्न केला की, यांचे स्मारक काय म्हणून? आणि एवढ्या मनःपूर्वकपणे एकमताने त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उत्सव कलकत्त्यातील ब्राह्म आणि ब्राह्मेतर का बरे साजरा करीत आहेत? त्याचे उत्तर मला सापडले. त्यांनी इंग्लंडचे प्रतिनिधित्व अत्यंत यशस्वीपणे केले आणि त्यांच्या यशाचे रहस्य हे की, ते भारतीय लोकांमध्ये राहिले, लोकांत वावरले, त्यांच्यामध्ये मिसळले, त्यांच्या पैकीच एक बनून गेले. हिंदुस्थानच्या अंतःकरणात स्थान मिळविणारा एक फ्लेचर विल्यम्स हा त्यांच्या दृष्टीने सरहद्दीवर रानटी टोळ्यांशी लढणा-या अर्धा डझन लॉर्ड रॉबर्टसपेक्षा जास्त मोलाचा आहे. राजकीय हिंदुस्थान ही केवळ ब्रिटिश साम्राज्याच्या इतिहासातील एक अवस्था आहे, तर सामाजिक इंग्लंडशी जुळणारा आणि संवादी असणारा सामाजिक हिंदुस्थान ही जगाच्या इतिहासातील एक अवस्था ठरेल.”

शिंदे यांनी १९०३ सालच्या मार्चच्या पहिल्या आठवड्यात ऑक्सफर्डमध्ये दिलेले हे व्याख्यान अनेक दृष्टींनी महत्त्वाचे वाटावे असे आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व अनेक अंगांनी प्रगल्भ बनले होते हे त्यामधून जाणवते. एकेश्वरी धर्माची उदात्त व्यापक बैठक त्यांच्या मनोधारणेला व विचारांना प्राप्त झाली होती. ह्या भूमिकेतूनच ते संपूर्ण जगाच्या इतिहासाचे व संस्कृतीचे अवलोकन करतात. वरवरचे भेद मिटून खराखुरा बंधुभाव विश्वात्मक पातळीवर प्रस्थापित व्हावा ही आध्यात्मक जाणीव त्यामधून प्रकट होते. ह्या उन्नत पातळीवरू इंग्रजांच्या उणिवा त्यांच्यासमोर निर्भीडपणे सांगण्याचा आत्मविश्वासही त्यांच्या ठिकाणी होता. या व्याख्यानातून त्यांची राष्ट्रीय वृत्ती दिसून येते खरी; मात्र ती एकांगी, पक्षपाती स्वरूपाची नाही. त्यांच्या राष्ट्रीय भूमिकेला आध्यात्मिक अधिष्ठान होते. ज्या समानधर्मीयत्वामुळे महात्मा गांधी हे त्यांना पुढच्या काळात आदरणीय वाटू लागले, तशाच प्रकारची वैशिष्ट्ये आणि आध्यात्मिक वृत्ती शिंदे यांच्या या व्याख्यानातून प्रकट होताना दिसते.

ऑक्सफर्डमधील युनिटेरियनांच्या स्नेहसंमेलनाच्या प्रसंगी त्यांनी हे व्याख्यान दिले ही गोष्टही औचित्यापूर्ण होती. विश्वात्मक स्वरूपाच्या एकेश्वरी धर्माचे अनुयायी असलेले इंग्रज स्त्री-पुरुष हे शिंदे यांची भूमिका समजून घेण्याची शक्यता होती. अन्यत्र त्यांनी हेच व्याख्यान दिले असते तर त्याला संपूर्णपणे राजकीय रंग प्राप्त होणे जास्त संभवनीय होते. योग्य व्यासपीठावरून हे व्याख्यान दिल्यामुळे त्याला योग्य ती प्रसिद्धीही मिळाली. इंग्लंडमधील युनिटेरियन समाजाचे मुखपत्र असलेल्या ‘दि इन्क्वायरर’ मधून १४ मार्च १९०३ रोजी ते प्रसिद्ध झाले. मिस्टर हॉजसन पॅट नावाच्या गृहस्थाने त्याचे फ्रेंचमध्ये भाषांतर करून ‘ला पेक फ्रान्स’ नावाच्या वृत्तपत्रात १६ एप्रिल १९०३ रोजी ते प्रसिद्ध केले.

शिंदे यांनी हे व्याख्यान या स्नेहसंमेलन प्रसंगी वाचून दाखविले, एवढेच नाही तर हिंदू गृहपद्धती व सामाजिक स्थिती कशी असते हे प्रत्यक्ष दाखविण्याकरिता मध्यम स्थितीतील कुटुंबाच्या देखाव्याची सजावट करून छोटेखानी नाट्यप्रयोग सादर केला.३ शिंदे यांच्या ठिकाणी मुळातच एक प्रकारची रसिकता होती. हा निबंध लिहिताना संगीत ‘शारदा’ हे नाटक त्यांच्या मनासमोर तरळत होते. त्यामधील काही घटनांचाही निर्देश त्यांनी आपल्या निबंधात केलेला आहे. स्वाभाविकपणेच त्यांना असे वाटले की, केवळ निबंधातून हिंदू गृहस्थितीचे आणि समाजस्थितीचे वर्णन करण्यापेक्षा त्यासंबंधीचे काही देखावे जर साक्षात उभे केले तर ते अधिक प्रत्ययकारी ठरतील व त्याप्रमाणे त्यांनी योजनाही केली. ऑक्सफर्डमध्येच विविध वस्तूंचा संग्रह करणा-या एका कराचीच्या व्यापा-याची त्यांना माहिती मिळाली. त्याच्याकडून त्यांनी हिंदू घरामध्ये असतात तशा वस्तू, फर्निचर, तसेच पोशाख, नकली दागदागिने वगैरे मिळविले व त्याची मांडणी करून हिंदू घर जसे असते तसे पूर्णपणे सजविले. काही इंग्रज तरुण-तरुणींना हिंदी पद्धतीप्रमाणे पोशाख देऊन हिंदू पद्धतीप्रमाणे बसविण्यात आले होते. नवीन लग्न झालेली सूनबाई कोप-यात भिंतीकडे तोंड करून कशी बसते, जवळ आलेल्या परीक्षेसाठी तिचा नवरा मोठमोठ्याने घोकंपट्टी करीत दुस-या कोप-यात कसा बसतो, कुणी वडीलधारे माणूस अवचित आल्यावर दोघे उठून कसे नमस्कार करतात वगैरे दृश्ये हावभावासकट दाखविण्यात आली. शिंदे यांचे व्याख्यान व देखाव्याचा प्रयोग असा सगळाच कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला. कार्यक्रम संपल्यानंतर अनेक श्रोत्यांनी शिंदे यांना भेटून त्यांचा सुस्पष्ट निबंध व कष्ट घेऊन केलेला प्रयोग आवडल्याचे सांगून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व भरपूर आभार मानले. ‘दि इन्क्वायरर’च्या संपादकांनी काही आठवड्यानंतर शिंदे यांना त्यांच्या निबंधाच फ्रेंचमध्ये झालेला अनुवाद अनेकांना आवडला असल्याचे आवर्जून कळविले.

संदर्भ
१.    विठ्ठल रामजी शिंदे, रोजनिशी, पृ. ४४. शिंदे यांनी शाहूमहाराजांस पुत्र झाल्याच्या निमित्ताने कोल्हापुरात  आनंदोत्सव चालला होता तो पाहिला होता. त्याचेच वर्णन पस्तुत व्याख्यानात केले आहे.
२.    शिंदे यांची कागदपत्रे.
३.    Domestic and Social Life in India हा निबंध लिहिलेली शिंदे यांची वही. या निबंधाच्या अखेरीस शिंदे यांनी ह्या नाट्यप्रयोगासंबंधीची माहिती देणारी नोंद २३ मार्च १९२६ रोजी पुणे येथे केली.