हुजूरपागा शाळा आणि शांता सुखटणकरची करुण कहाणी

पुण्यात आल्यानंतर आणि विशेषतः फिमेल हायस्कूलमधील अभ्यासक्रम पार पाडीत असता­ जनाबाईंना एका नवीन जीवनसरणीचा परिचय झाला. हुजूरपागा ही एक नमुनेदार मुलींची शाळा होती. हे फिमेल हायस्कूल हुजूरपागेच्या जागेत भरत असल्याने शाळेला हुजूरपागा असे नाव पडले. तेथील शिक्षिका आपले काम निष्ठेने करणा-या होत्या. मिस् हरफर्ड यांना मुलींनी सायंकाळच्या वेळी चकाट्या पिटीत बसण्याऐवजी बोर्डिंग समोरच्या जागेत निरनिराळे खेळ खेळावेत, त्यांना व्यायाम घडावा असे वाटत असे. कधी कधी त्याही खेळात भाग घेत असत. त्यांना जात्याच स्वच्छता, टापटीप, आधुनिक पाश्चात्त्य पद्धतीची सभ्यता यांची आवड होती व मुलींनीही तसेच वागावे अशी त्यांची अपेक्षा असायची. जनाबाई ह्या इतर मुलींच्या मानाने वयाने प्रौढ असल्या तरी त्यांच्या ठिकाणी मनाचा मोठेपणा व खिलाडूवृत्ती होती. भिमा मोरे ही दिसावयास अत्यंत कुरूप परंतु बुद्धीने एकदम तल्लख होती. जनाक्काला खेळकर, चेष्टेखोर मुलींबद्दल कौतुक असायचे. गुलाब जव्हेरे, कृष्णाबाई केळवकर, यमुनाबाई केळवकर ह्या त्यांच्या इतर मैत्रिणी. पुढच्या आयुष्यात त्या भेटल्यानंतर भिमा मोरे विनोदी वृत्तीच्या आठवणी काढण्यात रंगून जात असत.

भिमा मोरेप्रमाणेच जनाबाईंना कौतुक वाटायचे ते सई जोशी नावाच्या मुलीबद्दल. ही सडपातळ बांध्याची, हुशार आणि चुणचुणीत अशी तेरा-चौदा वर्षांची परकर घालणारी मुलगी होती. हुजूरपागेच्या वसतिगृहात आपल्या आईसह राहून शिक्षण घेत होती. अमेरिकेला पहिल्या प्रथम गेलेल्या आनंदीबाई जोशी यांची ही पुतणी, (हीच पुढे प्रसिद्ध रॅंग्लर रघुनाथराव परांजपे यांची पत्नी झाली.). सई जोशी आपल्या कुशाग्र बुद्धीमुळे शाळेतील मुलींमध्ये आणि शिक्षिकांमध्ये प्रिय असे. सदानकदा खेळात रमलेली सई अभ्यासातही हुशार व पहिला नंबर न सोडणारी. भिमा मोरेप्रमाणेच ही पण थट्टेखोर स्वभावाची होती. एकदा तर मदरलाच एप्रिल फूल करण्याचा घाट तिने घातला व यशस्वीपणे पार पाडला. सईची खेळकर वृत्ती पुढेही टिकून राहिली. रॅंग्लर परांजपे यांच्याशी लग्न झाल्यानंतर जनाबाईंना त्यांनी आपल्या घरी एकदा निमंत्रित केले असता त्यांच्या तोंडून अप्पा हे नाव येऊ लागले. जनाबाईंनी हे अप्पा कोण? असे सईंना विचारताच “अप्पा होय, अप्पा माझे मित्र आहेत” असे खोडकरपणे उत्तर दिले आणि म्हटलं, “अप्पा, थोडं आत या बघू.” आणि आत आले ते खुद्द रघुनाथरावच होते. हुजूरपागेतील शिक्षण घेण्याच्या काळात जनाबाईंच्या वृत्तीचा मोकळेपणा, आनंदीपणा, खिलाडूपणा प्रकट होत होता. त्याचप्रमाणे जनाबाईंच्या ठिकाणी दुसरी एक गंभीर वृत्ती होती ती व्यापक सहानुभवाची; निरपेक्ष सेवावृत्तीची आणि जबाबदारीची. जनाबाईंच्या आयुष्यात केवळ करुणरसाची मूर्ती अशी एक व्यक्ती आली ती म्हणजे शांता सुखटणकर. तिच्या अनुषंगाने जनाबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचा दुसरा गंभीर पैलू हृदयंगमपणे प्रकट होताना दिसतो.

विठ्ठलरावांच्या मित्रवर्गापैकी कोल्हापूरचे श्री. वासुदेव अनंत सुखटणकर हे एक होते. हे मूळचे कोल्हापूरचे. विठ्ठलराव इंटरमीजिएटच्या वर्गात असताना त्यांची भेट झाली. त्यांच्या सालस स्वभावामुळे विठ्ठलरावांची व त्यांची लगेच मैत्री जुळली. त्यांच्याही घरची अत्यंत गरिबी. १८९८ मध्ये अण्णांनी जनाबाईंना घेऊन मित्रवर्गासमवेत कोल्हापूर, पन्हाळा, विशाळगड अशी सहल केली. विशाळगडास जाताना वासुदेवरांच्या आग्रहास्तव पन्हाळ्यात त्यांच्या बहिणीच्या घरी १-२ दिवस मुक्काम केला. वासु्देवरावांची आई सुंदराबाई ही त्याचवेळी मुलीच्या बाळंतपणासाठी तिथे आली होती. सकाळच्या वेळी वेणीफणी करण्यासाठी एका अडगळीवजा खोलीत जनाबाई गेल्या असता कोप-यात एक वळकटी पडल्याचे त्यांना दिसले. पण त्या वळकटीत हालचाल दिसली व क्षीण आवाजात कोणीतरी कण्हल्याचा आवाज त्यांनी ऐकला. इतक्यात सुंदराबाई पेजेची वाटी घेऊन खोलीत आल्या आणि त्यांच्याकडून खुलासा झाला. ही आजारी मुलगी म्हणजे सुखटणकरांची ११-१२ वर्षांची बहीण शांता. नवज्वराच्या आजारातून ती मरता मरता वाचली आणि पक्षाघाताच्या विकाराने तिच्यावर झडप घातली. पक्षाघाताने तिचे सारे अंग लटलटत होते. मान ठरत नव्हती म्हणून मान धरून आईला पेज भरवावी लागत होती. ती उठणे-बसणे करू शकत नव्हती. डोक्याचे केस  पार गेले होते. तोंडावरून वारे गेल्यामुळे बोलणे नीटसे उमजत नव्हते. असे असूनही मुलगी नाजूक बांध्याची, रेखीव जिवणीची, गौरवर्णाची आणि दहाजणीत उठून दिसणारी आहे असे जनाबाईंना वाटले, तिला ह्या द्यनीय अवस्थेत बघितल्यावर ह्या पोरीचं पुढं कसं होईल, ह्या विचाराने जनाबाईंचे मन ग्रासून गेले. तिच्याबद्दल अंतःकरणात कळवळा उत्पन्न झाला. शांताचे जनाबाईला झालेले हे पहिले दर्शन.

त्यानंतर दोन वर्षांनी १९०० सालच्या सप्टेंबर महिन्यात जनाबाईंनी तिला पाहिले ते स्वतःच्याच घरी जमखंडीस. वासुदेव सुखटणकर सारस्वत जातीचे. त्यांचे वडील एकाएकी वारले. रूढीला अनुसरून आईचे केशवपन करावे असे नातलगांनी ठरविले होते. परंतु विठ्ठलरावांप्रमाणेच वासुदेवरावही सुधारणेचे कट्टे पुरस्कर्ते असल्यामुळे आईच्या केशवपनास त्यांनी हरकत घेतली. आईचे मन वळवून तीस केशवपनापासून परावृत्त केले. तरीदेखील गावात राहून लोकनिंदेचा मारा सहन करण्यापेक्षा अन्यत्र थोडे दिवस राहावे या विचाराने विठ्ठलरावांच्या संमतीने त्यांच्या जमखंडीतील घरातच आपली आई, शांता व धाकटा भाऊ राजाराम अशा त्रिवर्गास ठेवले होते. १९०० सालच्या सप्टेंबर महिन्यात बाबा फार आजारी असल्यामुळे विठ्ठलरावांसमवेत जनाबाई जमखंडीला आल्यावर आपल्याच घरात जनाबाईंनी दुस-यांदा शांताला पाहिले. लुगडे कसेबसे गुंडाळून घेतलेले. नीट चालता, उभे राहता येत नसे. जीभ जड असल्याने बोलणे अडखळतच. प्रतापच्या पाळण्याची दोरी ओढताना पाळण्याअगोदर तिचे हातच लटलटा कापत असत. फार वेळ उभे राहता येत नव्हते. केव्हा मटकन खाली बसेल याचा नेम नसायचा. तिचे तोंड धुणे, हात घासणे, अंग धुणे ही सारी कामे तिच्या आईलाच करावी लागत असत.

सुंदराबाई ह्या कर्त्यासवरत्या सुशिक्षित मुलाचा आग्रह म्हणून सोवळ्या झाल्या नव्हत्या. तरी पण ती गोष्ट त्यांच्या मनाला बरीच लागून राहिली असावी. त्या आतल्या आत कुढत असाव्यात. उपासतापासाच्या सबबीखाली स्वतःच्या प्रकृतीची बुध्याच हेळसांड करून इहलोकीचे आपले आयुष्य शक्य तितक्या लवकर संपुष्टात आणण्याचा त्यांचा प्रयत्न चालला होता, अशीच जनाबाईंची कल्पना झाली. नवरा वारलेली, घरची अत्यंत गरिबी. केवळ नाइलाज म्हणून सहा-सात महिन्यांसाठी आपण दुस-याकडे राहत आहोत ही जाणीव ठेवून त्यांचे सर्वांशी वागणे असे. १९०१ साली विठ्ठलराव विलायतेस शिक्षणासाठी गेल्यानंतर त्यांचे मित्र गोविंदराव सासने आणि वासुदेवराव सुखटणकर हे जनबाईंच्या शाळेत अधूनमधून येत व विचारपूस करून जात असेच, एकदा आले असता वासुदेवरावांनी आपल्या आईचा मृत्यू झाल्याची बातमी जनाबाईंस सांगितली. जनाबाईंना त्यांच्या आईच्या निधनापेक्षा शांताच्या पुढील असाध्य, परावलंबी, लाजिरवाण्या जीवनाची भयानकताच अधिक जाणवू लागली. थोड्याच दिवसांनी वासुदेवरावांची गाठ पडताच शांतेला हुजूरपागेत ठेवावे असे त्यांनी वासुदेवरावांस सुचविले. डॉ. भांडारकरांचा परिचय असल्यामुळे व शाळेचे तेच अध्वर्यू असल्यामुळे ते शक्य होईल, असाही निर्वाळा त्यांनी दिला आणि शांतेची जबाबदारी कोण घेणार, ह्या प्रश्नाला जनाबाईंनी निर्धाराने उत्तर दिले, “शांतेला हुजूपागेत राहण्याची परवानगी मिळाली तर तिची सारी जबाबदारी माझ्याकडे लागली. मग तुम्ही चिंता सोडा. असं समजा, मीच तिची आई.” डॉ. भांडारकरांनी परवानगी दिली. लेडिज सुपरिटेंडेंट मिस सोराबजी यांना होकार देणे प्राप्त झाले आणि अशा रीतीने शांता जनाबाईंजवळ वसतिगृहात आली.

खरे तर जनाबाई स्वतःच दुःखमय अशा परिस्थितीत होत्या. परंतु त्यांना शांतेचे जीवन किती कष्टात, दुःखपूर्ण, परावलंबी व लाजिरवाणे आहे हे जाणवून ही मुलगी आपल्यापेक्षाही दुर्दैवी आहे, असे वाटत होते. जनाक्काचे मन शांतेबद्दल करूणेने अपरंपार भरून आले. शांतेचा सांभाळ करण्याचा जनाबाईंचा विचार कोणालाही फारसा पसंत पडला नव्हता. मिस् सोराबजींना तर त्यांच्याबद्दल काहीसा रागच आला होता. खुद्द आई-बाबांनाही जनाबाईंचे करणे पसंत नव्हते.  मैत्रिणींनी तर त्यांना मूर्खातच काढले. परंतु शांतेची संपूर्ण जबाबदारी आपण घ्यावी, तिची सेवाशुश्रूषा करावी असा पक्का निर्धार जनाबाईंनी केला होता.

शांताच्या हातापायाच्या दुर्बळ स्नायूंना कामाचा सराव जितका होईल तेवढा लाभदायक ठरेल असे डॉक्टरांचे मत होते. प्रथम प्रथम जनाबाई  तिचे तोंड धुण्यापासून सगळी कामे करीत असत. वेळ मिळेल  तेव्हा शांताच्या हाताला धरून बागेत हिंडावे, तिला घेऊन जात्यावर दळत बसावे, मुसळ हातात घेऊन मसाला वगैरे कुटत बसावे ही कामे करण्याचा उपक्रम क्रमशः चालू ठेवला. थोड्या दिवसांतच तिच्यात सुधारणा दिसू लागल्यावर जनबाईंचा उत्साह दुप्पट झाला. आंघोळीच्या वेळेस सर्वांगास तेल लावून चोळणे, रात्री तिच्या हाताच्या बोटांना तेलाने चोळणे इत्यादी कामे जनाबाई करीत असत. आधी पंगतीमध्ये लहान मुलाप्रमाणे घास भरवावा लागे. थोड्याच दिवसांमध्ये श्रमाचे चीज झाल्याचे दिसून येऊ लागले. शांताच्या प्रकृतीत समाधानकारक सुधारणा दिसू लागली. ती आपली कामे स्वतःच करू लागली. न अडखळता चालू लागली. पुढे पुढे तर ती इतकी सुधारली की आपल्या हुशारीने वर्गातल्या परीक्षेत तिने बराच वरचा क्रमांक पटकावला. शांता अभ्यासातच नव्हे तर इतर अनेक बाबतीत एकसारखी प्रगती करू लागली. अक्षर तर ती इतके वळणदार व सुंदर काढी की त्याचा नमुना म्हणून वर्गशिक्षक इतर मुलींपुढे ठेवत असत. शिवाय कामातही तिची प्रगती प्रशंसनीय होती. सा-या शाळेत तिचा बोलबाला झाला. लेडिज सुपरिटेंडेंट मिस् सोराबजींना शांता म्हणजे आपल्या शाळेचे भूषणच वाटे. जे प्रतिष्ठित व सन्मान्य गृहस्थ शाळा पाहण्यास येत, त्यांच्यापुढे शांताला उभी करून “पक्षाघाताच्या विकाराने शारीरिक दुर्बलता पावलेल्या मुलीने आपल्या हिमतीवर मोठ्या प्रयासाने अभ्यासात, शिक्षणक्रमात, चित्रकलेत अनपेक्षित प्रगती केलेली असून तिच्या प्रगतीचे सारे श्रेय ह्या मुलीकडे आहे,” असे म्हणून जनाबाईंनाही शांताच्या बरोबर सर्वांस दाखविले जाई. एकदा बडोद्याचे श्रीमंत सयाजीराव महाराज यांनी शाळेस भेट दिली असता लेडिज सुपरिटेंडेंटनी शांताबरोबर जनाबाईंचीही नेहमीप्रमाणे माहिती करून दिली आणि म्हटले की, “या मुलीचा भाऊ नुकताच धर्माभ्यासाचे उच्च शिक्षण घेण्यासाठी विलायतेस रवाना झाला आहे.” ते ऐकताच महाराज कौतुकाने जनाबाईंकडे पाहू लागले. कारण विठ्ठल रामजींना कॉलेजच्या शिक्षणासाठी, त्याचप्रमाणेच विलायतेस जाण्याच्या खर्चासाठी आधार दिला होता तो सयाजीराव महाराजांनीच. शांता ही जनाबाईंच्या सेवाशुश्रूषेमुळेच आजारातून उठून माणसात आली हे सयाजीरावांना कळल्यावर फार आनंद झाला. ‘आपण ज्या होतकरू विद्या्र्थ्यास इंग्लंडला पाठविण्यास आर्थिक साहाय्य दिले त्याची बहीणदेखील लोकोपयोगी कृत्य करण्यात तत्पर आहे तर’, असे कौतुकाचे आणि गौरवाचे उद्गार त्यांनी लेडिज सुपरिटेंडेंटजवळ काढले आणि मोठ्या कुतूहलपूर्वक जनाबाईंची तर विचारपूस केलीच, शिवाय आई, बाप, भाऊ कसे आहेत याचीही महाराजांनी आत्मीयतेने चौकशी केली.१ शांतेची आपण घेतलेली जबाबदारी समाधानकारकपणे आपल्या हातून पार पडली याचा जनाबाईंना अधिक आनंद होत होता. शांताची सेवाशुश्रूषा करण्याची ऊर्मी हा जनाबाईंच्या सेवाभावी वृत्तीचा, उदात्त अशा माणुसकीचाच आविष्कार होता आणि काही वर्षानंतर विठ्ठल रामजींनी स्थापन केलेल्या ‘भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळी’ च्या अंतर्गत असलेल्या निराश्रित सेवासदनाची जबाबदारी जनाबाईंनी आपल्या शिरावर घेतली व ती मोठ्या सेवाभावाने पार पाडली. याचा पूर्वपाठच एक प्रकारे शांताची त्यांनी केलेली जी शुश्रूषा आहे त्यामध्ये पाहावयास मिळतो. पुणे येथील वास्तव्यात विठ्ठल रामजींच्या व्यक्तिमत्त्वाची घडण काही एका प्रमाणात होत होती तशीच जनाबाईंच्या व्यक्तिमत्त्वाची घडणही पुण्यामध्ये होत होती व त्याचाच एक पैलू म्हणून त्यांच्या सेवावृत्तीचा आविष्कार शांता सुखटणकरांच्या या हकीकतीत आपणास पाहावयास मिळतो.

पण शांतेच्या बाबतीत विधिलिखित वेगळेच होते. तिच्या जीवनाचा अंत शोकात्म व्हावयास होता व नियतीलाही यशाचे माप जनाबाईंच्या पदरात टाकावयाचे नव्हते. दुर्दैवाने दोन-एक वर्षांतच शांताला क्षय झाल्याचे कळून आले. शांतेला शाळेत न ठेवता रास्ता पेठेतील इस्पितळात उपचारार्थ ठेवणे भाग पडले. संसर्गजन्यतेमुळे शांताची भेट घेण्यासही इतरांना मनाई करण्यात आली. मिस् सोराबजींची शांता एवढी लाडकी पण त्यांनीही कठोरणा धारण केला आणि इतरांनाही तिच्याकडे जाण्यास बंदी केली. रविवारी प्रार्थनासमाजात वासुदेवराव सुखटणकर शांतेला टांग्यात घालून येत. अशी एक-दोनदाच शांताची व जनाबाईंची भेट झाली. जनाबाईंनी शांतेला म्हटले, “शांते, धीर सोडायचा नाही बरं! मरूबिरू नकोस, नाही तर मग बघ, मेलीस तर चांगलीच ठोकून काढीन.”२ जनाबाईंचे उद्गार ऐकून तिच्या मैत्रिणी व शांताही खूप हसल्या. शांताची प्रकृती बिघडतच गेली. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे तिचे केस कापण्याचे ठरले. शांताची आई वारल्यापवर तिच्या केसाची निगा जनाबाईंनीच घेतली. त्या रोज रात्री खोबरेल तेल तिच्या डोक्यावर जिरवीत असत. केस लवकर उगवले नाहीत आणि शांतानेही प्रयत्न सोडायला सांगितला. तरीही जनाबाईंनी चिकाटी सोडली नाही. पुढे पुढे शांताच्या डोक्यावर केस येऊ लागले व अखेरीस तिचा तिचा केशसंभार एवढा विपुल झाला की, तिच्या मैत्रिणींना हेवा वाटावा. इतक्या परिश्रमानंतर वाढविलेले केस कापणे शांताच्या जीवावर आले होते. परंतु ते कापावेच लागले. कापल्यानंतर ते फेकून देण्याच्या देण्याच्या आधी ते केस जनाबाईने बघावे असा शांताने आग्रह धरला. शांता थोड्याच दिवसांची सोबतीण होती. सर्वांनीच तिची आशा सोडली होती. म्हणून तिच्या आग्रहाखातर वासुदेवराव शाळेत येऊन लेडिज सुपरिटेंडेंटकडे जनाबाईला घेऊन जाण्याची परवानगी मागू लागले. मोठ्या मिनतवारीने फक्त दहा मिनिटे भेटण्याच्या अटीवर मिस् सोराबजींनी परवानगी दिली. जनाबाई स्वतः प्लुरसीच्या रुग्ण होत्या, म्हणून त्या विशेष काळजी घेत होत्या. अधिकची दक्षता म्हणून घेऊन येण्यासाठी शाळेच्या गड्यालाही त्यांनी पाठवून दिले. जनाबाईंनी शांताची अखेरची भेट घेतली. तिच्यासमोर एका टोपलीत तिचे केस काढून ठेवले होते. ते बघताच जनाबाईंच्या डोळ्यांत टचकन पाणि आले दुःखातिशयाने दोघींच्याही डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. दोघी एकमेकींकडे पाहून आपल्या भावनांना वाट करून देत होत्या. स्वतःजवळ येण्याची खूण करून शांताने जनाबाईला पाठीवरून हात फिरवण्यास क्षीण आवाजात सांगितले. त्या हात फिरवू लागताच शांता म्हणाली, “जनाक्का, मागे तुम्ही मला ताकीद केली होती ना, की मरू नकोस म्हणून आणि मेलीस तर ठोकून काढीन म्हणून. तर आता काही मी तुमचे ऐकत नाही. तेव्हा मी मरायच्या अगोदरच मारून घ्या बरं. आतापर्य़ंत ठोकून ठोकूनच मला इतक्या सुस्थितीत आणून सोडलीत, पण नशिबच फुटकं माझं. तेव्हा आता शेवटचं ठोकून घ्या बघू.”३

मरणाच्या दारातील शांताच्या तोंडचे हे शब्द ऐकून जनाबाईंचे अंतःकरण फाटून गेले.  त्यांच्या अंतःकरणात दुःखाचा जो कल्लोळ माजला असेल त्याची केवळ अपुर्ती कल्पनाच आपण करू शकतो. एका निरागस अश्राप जीवाची जगण्यासाठीची धडपड आणि त्या जीवाला जगविण्यासाठी आधार द्यावा म्हणून दुस-या एकीने केलेले अविश्रांत श्रम आणि उत्कट सेवाभाव ह्यांचा ठसा शांताची ही करुण कहाणी आपल्या मनावर उमटविते.
             
संदर्भ
१. जनाबाई शिंदे, स्मृतिचित्रे, साप्ताहिक तरूण महाराष्ट्र.
२. तत्रैव, १०-६-१९४९.         
३. तत्रैव, १०-६-१९४९.