श्रीशाहू छत्रपतींच्या मनाचा विकास

श्रीशाहूरायांच्या चरित्राकडे शास्त्रीयदृष्ट्या आणि सहानुभूतीने पाहू गेल्यास एक गोष्ट दिसून येते ती ही की, त्यांचे मन उत्क्रमणशील होते आणि तशीच दुसरी गोष्ट ही की, ते उत्कर्षशील होते. श्रीशाहू गादीवर येण्यापूर्वी कोल्हापूरचा इतिहास म्हणजे एक मोठी अंधारी रात्र होती. अंधा-या रात्रीत अनेकविध पापे घडतात आणि ती कोणास कळून येत नाहीत. त्याचप्रमाणे ह्या राजवटीत पेशव्याच्या काळापासून तो श्रीशाहूंच्या मनाचा विकास होऊ लागून त्यांच्या ख-या पौरुषास सुरुवात होईपर्यंत स्वकीय व परकीयांचा जो धुमाकूळ चालला होता त्याची खरी कहाणी कोणी मार्मिकपणे सांगेल तर अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. प्रत्यक्ष श्रीशाहूरायांच्या बाळपणी त्यांचे पुढे विकसलेले पौरुष त्यांच्यात होते की नाही हे कोणास आजमावता आले नसते इतके ते दिसण्यात साधे किंबहुना बावळट होते असे सांगतात. पण ह्या बावळटपणाच्या पडद्याआड त्यांच्या चारित्र्याचा जीव आणि जागृती ही दोन्ही सुरक्षित होती. हा पडदा नसता तर ही दोन्ही ह्या फारा दिवसांच्या विषारी वातावरणात केव्हाच करपून गेली असती. बाळपणाप्रमाणेच ह्यांच्या तारुण्यातही ह्यांच्या सार्वजनिक चारित्र्याचा अंकुर योग्य वेळेच्या पूर्वीच बाहेर फुटून आला नाही हेही बरे झाले.

सन १९०६-७ साल हा मोठा मुहूर्तकाळ होता. जगात आणि विशेषतः हिंदुस्थानात हा मुहूर्त बराच जाणवला. युरोपात ह्या वेळी महायुद्धाची हांडी शिजत होती तर हिंदुस्थानात राजकीय, सामाजिक व एकंदरीत सर्व बाजूने राष्ट्रीय जागृतीचा स्फोट होत होता. पुण्यातून टिळकाला जरी प्रत्यक्ष उचलून मंडाले येथे कारागृही ठेवण्यात आले तरी टिळकशाही अधिकच फोफावू लागली होती. पण तिच्याच तोडीची परंतु अधिक विधायक स्वरूपाची राष्ट्रीयता डिप्रेस्ड क्लासेस मिशन, सेवासदन, सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटी, सोशल सर्व्हीस लीग वगैरे सर्व राष्ट्रभर पसरणा-या प्रागतिक संस्थांच्या रूपाने उदय पावू (फूट नोट- दैनिक सत्यवादी, राजर्षी शाहू खास अंक, १९२८ ऑगस्ट.) लागली होती. वसंत ऋतूत वनराजीत जशी एकदम जीवनकळा चहूंकडे फुटून दिसते, त्याप्रमाणे ह्या एक दोन वर्षांतच सर्वांगसुंदर राष्ट्रीयता सर्वत्र चमकू लागली. ह्याच मुहूर्ताला पडद्याआड बेमालूम वाढत असलेले शाहूरायाचे पौरुष एकदम फुटून बाहेर आले. तरी त्याच्या आत हळूहळू कोणाला न कळत त्याचा विकास होत होता.

शाहू राजा नुसता मराठा नव्हता. ब्राह्मणेतरही नव्हता. तो नवयुगातला स्वयंपूर्ण राष्ट्रपुरुष होता. तो परकीयांची नांगी ओळखून होता ही गोष्ट ज्यांनी त्यांच्याशी गुजगोष्टी केल्या त्यांना तरी सांगणे नको. तो हाडाचा मराठा असल्याने जो गनिमी कावा त्याच्या हाडांत भिनला होता तो त्याच्या हाडांत भिनला होता तो आता त्याच्या वर्तनात उघड चमकू लागला. हा कावा त्याने पत्करला नसता तर महाराष्ट्राच्या जनतेला जागी करून तिच्या पायांवर उभी करण्याचे अवघड काम त्याच्या हातून झाले नसते. टिळक आणि ज्योतीबा फुले ह्या दोघांचेही हल्ले सामन्यांचे होते. श्रीशाहू जरी आता पडद्याबाहेर पडला होता तरी त्याने कधी कोणाला सामना दिला नाही.

पण प्रत्येकाच्या बगलेतील हाडे त्यांना नकळत ह्या राष्ट्रसेवकाने हासत हासत खिळखिळ करून टाकली. इतकी की, भटशाहीप्रमाणेच पुढे पुढे नोकरशाहीलाही हे कोल्हापुरी कोडे विचार आणि कौतुकही करावयास भाग पाडू लागले. ह्या वर्णनावरून श्रीशाहू एकादा हा लेनीनच्या वळणावरचा क्रांतिकारक उत्पात होता, असे कोणी समजेल तर तेही खरे नाही. तो महाराष्ट्राच्या विकासाचा एक मोठा स्वाभाविक तरंग होता हेच जास्त बरे.

माझा आणि त्यांचा जो अल्पसा प्रत्यक्ष परिचय होता त्यावरून सामाजिक बाबतीत तरी त्यांच्या मनाची जी उत्क्रांती घडली तिचे काही टप्पे मला जसे दिसले तसे येथे थोडक्यात देणे प्रासंगिक वाटते. भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीची स्थापना झाल्यावर तिच्या अव्वल अमदानीत माझ्या व त्यांच्या ज्या भेटी झाल्या त्यावेळी अस्पृश्यांविषयी त्यांची सहानुभूती अद्यापि बनली नव्हती, असे माझ्या स्पष्ट नजरेस आले. मात्र अस्पृश्यांविषयी द्वेष त्यांच्या कोमल मनात असणेच शक्य नव्हते. द्वेष नसणे आणि प्रेमाचा पाझर फुटणे ह्यात जमीन अस्मानाचे अंतर आहे. पण तेही अंतर त्यांनी हळूहळू ओलांडले. महाराज ब्राह्मसमाजाचे चहाते होते. म्हणून त्यांनी दोन-चार वेळा कोल्हापुरात प्रार्थनासमाजाच्या उत्सवाच्या व इतर समारंभाच्या वेळी दरबारी मदत सढळ हाताने दिली. तथापि त्यांचा ओढा ब्राह्म अथवा प्रार्थनासमाजापेक्षा आर्यसमाजाकडे होता हे उघडच दिसत होते. पण ह्याचे कारण ब्राह्म आणि आर्यसमाज ह्यांचा जो धार्मिक मतभेद आहे त्यात नसून ब्राह्मांपेक्षा आर्य हे ऐहिक झटापटीत अधिक धाडसी आणि लोकसंग्राहक आहेत ह्याच गोष्टीत होते. पुढे महायुद्धाच्या प्रसंगाने महाराजांना विलायत प्रवास घडला. तिकडून परत आल्यावर महाराजांचे सार्वजनिक चारित्र्य पूर्ण बनलेले दिसले. अस्पृश्यता निवारणच काय पण समग्र जातिभेदाची इमारतही सत्याला आणि स्वातंत्र्याला कोंडून ठेवण्यासाठी तयार केलेली धूर्ताची एक पुरातन कारवाईच अशी त्यांची खात्री झालेली दिसली. भेटीव्यवहाराची काय कथा, पण उघडउघड रोटीव्यवहार आणि बेटीव्यवहारालाही ते स्वतः छाती ठोकून जितके तयार होते त्याहून जास्त तयार मला दुसरा कोणीही लोकनायक दिसला नाही. मेसापोटेमियातील एका वेढ्यात जे मराठे सापडले, त्यांनी घोड्यांचे मांस खुशाल खावे, कोणी जातीबाहेर टाकल्यास आपण स्वतःच्या जवळच्या आप्तांशी त्याचा शरीरसंबंध करू अशी जाहीर खबर त्यांनी दिली. हिंदुस्थानातल्या निरनिराळ्या राजेरजवाड्यांत मिश्रविवाह व्हावेत असे त्यांचे मतच नव्हे तर प्रयत्नही होते हे मला माहीत आहे.

महाराजांप्रमाणे इतरही थोडे सुधारक असतील. पण त्यांचा विशेष हा आहे की, ते राजपदावर असल्यामुळे त्यांच्या कार्यात यश येऊन अखिल महाराष्ट्र जसा हालला तसा व तितका दुस-या कोणाच्या प्रयत्नाने हालला नाही. ह्याचे प्रत्यंतर पाहावयाचे झाल्यास कोल्हापुरास जाऊन कोणीही पाहावे. बेटीव्यवहार आणि रोटीव्यवहार मराठ्यांचा तरी इतर खालील समजल्या जाणा-या कोणत्याही जातीशी तेथे राजरोस चालला आहे. अस्पृश्यांची तर गणना जवळजवळ मराठ्यांतच होऊ लागली आहे. ब्राह्मणात काय प्रकार आहे ते सांगवत नाही. त्यांच्यात काही सोवळे अद्यापि उरले असेल तर ते कदाचित श्रीशाहूरायाच्या नितांत प्रयत्नाची प्रतिक्रिया म्हणून असेल; पण ब्राह्मणेतरांत तरी अपमानकारक सोवळे आता फारसे राहिले नाही. हे सत्यशोधक समाजाच्या तेथील वार्षिक सहभोजनावरून स्पष्ट दिसते. केवळ समारंभाचे वेळीच सहभोजन होत नसून घरगुती एरव्हीच्या प्रसंगी देखील अस्पृश्यांशी उघड पंक्तिव्यवहार झालेला मी पुष्कळ वेळां प्रत्यक्ष पाहिला आहे. हा सर्व प्रभाव केवळ श्रीशाहूंच्या धडाडीचा म्हणून त्यांचे नाव इतिहासात अजरामर राहील आणि ज्या प्रागतिकांनी परिषदांतून त्यांचेविषयी औपचारिक दुःखवट्याचे ठराव पास करण्याचेही नाकारिले त्यांचा विसर महाराष्ट्राला आताच पडत चालला आहे; मग पुढे त्यांची आठवण कोण काढणार !