कुटुंबातील मृत्यू

१९१७ सालापासून पुढची पाच-सहा वर्षे अण्णासाहेबांच्या आयुष्यात अतिशय व्यग्रतेची ठरली. सार्वजनिक जीवनामध्ये अनेक कटू प्रसंगांना त्यांना सामोरे जावे लागले. त्याचप्रमाणे कौटुंबिक जीवनातही जिव्हाळ्याच्या माणसांच्या मृत्यूचे दुःख त्यांच्या वाट्याला आले.


१९१८ साली मुंबईमध्ये इन्फुएंझाची मोठी साथ सुरू झाली व पुणे शहरातही या साथीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाली. मिशनचे ठाणे त्या वेळी लष्करातील ताबूत स्ट्रीटमध्ये होते. म्युनिसिपालटीकडून इन्फुएंझा मिक्शचरच्या मोठमोठ्या बाटल्या भरून आणून लष्करात गरीब लोकांच्या घरी वाटण्याचे काम मिशनच्या मार्फत सुरू करण्यात आले.

अण्णासाहेबांच्या घरची मंडळीही इन्फुएंझाने आजारी पडली होती. बरे वाटल्यावर औषध वाटण्याचे काम तीही करू लागली. अण्णासाहेबांचे धाकटे बंधू एकनाथराव हे त्या वेळेला मुंबईस राहत होते व त्यांच्या पत्नी मथुराबाई आठ महिन्यांच्या गरोदर असताना या साथीच्या रोगाने आजारी पडल्या व त्यांना ‘रुक्मिणी हॉस्पिटल’ मध्ये दाखल केल्याचे कळताच अण्णासाहेब मुंबईस गेले. या अवस्थेतच मथुराबाई वाळंत झाल्या व त्यांचे नवजात मूल वारले. सोनापूरचे दहन स्मशानभूमीचे ट्रस्टी व मुंबईचे मराठे यांमध्ये वाद निर्माण झालेला होता व मराठ्यां प्रेत जाळण्याला ट्रस्टींकडून हरकत घेतली जात असे. विठ्ठल रामजींनी स्मशानातील रजिस्टारची भेट घेतल्यानंतर घेतल्यानंतर मृत अर्भकाला पुरण्यासाठी खड्डा मिळाला. हा अंत्यविधी आटोपून अपरात्री ते घरी आल्याबरोबर त्यांना दुःखद वार्ता समजली की हॉस्पिटलमध्ये मथुराबाई निवर्तल्या. मथुराबाई ह्या त्यांच्या मामाच्या कन्या. अभ्यासात हुशार होत्या म्हणून अण्णासाहेबांनी त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले होते. पुण्यास ट्रेनिंग कॉलेजात घातले होते. त्यांचे अवांतर वाचन होण्यासाठी त्यांना पुस्तके घेऊन देत असत. घरातील इतर माणसांच्या बरोबरच त्यांच्याशीही पत्रव्यवहार ठेवीत. मथुराबाईंवर अण्णासाहेबांचा त्यांच्या गुणांमुळे लोभ जडलेला होता. स्वाभाविकपणेच त्यांचा मृत्यू हा अण्णासाहेबांना दुःखदायक ठरला. मथुराबाईंचे प्रेत दुस-या दिवशी सोनापूर स्मशानभूमीत नेले असता तेथे एका वेगळ्याच अडचणीला तोंड द्यावे लगले. इन्फ्लुएंझाच्या साथीमुळे होणा-या मृत्यूचे प्रमाण प्रचंड असल्यामुळे स्मशानभूमीत लाकडाचा तुटवडा पडला होता. अण्णासाहेबांचे मित्र लक्ष्मीदास तेरसी यांची तेथे गाठ पडली. तेरसी हे अण्णासाहेबांचे एकेरी भाषेतील जवळचे मित्र होते. अण्णासाहेब हे अशा प्रकारच्या अडचणीत सापडले आहेत हे लक्षात आल्यावर तेरसींनी स्मशानभूमीत लाकडे आणण्याची व्यवस्था केली. लाकडाच्या ओंडक्यांनी भरलेल्या लॉ-या सोनापुरात येऊ लागल्या. एका लॉरीवर तर स्वतः तेरसी व दुसरीवर म्युनिसिपालटीचे अध्यक्ष सी. व्ही. मेहता हे गाडी हाकीत आले व अशा दुःखद वातावरणामध्ये निर्माण झालेल्या अण्णासाहेबांच्या अडचणीचे निराकरण ह्या दोन प्रतिष्ठित मंडळींनी केले.


१९२० साली कुटुंबातील आणखी दोन व्यक्तींच्या मृत्यूचे दुःख अण्णासाहेबांना सहन करावे लागले. १९२० सालच्या प्रारंभी ताबूत स्ट्रीटमधून मिशनच्या काही शाळा नव्याने बांधकाम चाललेल्या मिशनच्या भोकरवाडीतील इमारतीत नेण्यात आल्या होत्या. मिशनच्या इमारतीच्या बांधकामाची धमाल गर्दी चालली असतानाच अण्णासाहेबांच्या घरी त्यांच्या धाकट्या बहिणीच्या मृत्यूची दुःखद घटना घडली. त्या सुमारास अण्णासाहेब ताबूत स्ट्रीटवरील मिशनच्या शाळेत राहत होते. ३ जानेवारी १९२० रोजी पहाटे तान्याक्का ऊर्फ सौ. मुक्ताबाई काळे ह्यांच्या मृत्यू झाला. गावात आणि लष्करात ही बातमी पसरल्यावर स्मशानयात्रेसाठी ब्राह्मण, मराठे, मुसलमान, ख्रिस्ती इत्यादी जातींतील माणसांची गर्दी लोटली. अस्पृश्यांची तर विशेष गर्दी होती. भजनीमंडळांनी भजन सुरू केले. प्रेतास खांदा कोणी द्यावा या प्रकारची कुजबूज व हलक्या आवाजातील पृच्छा सुरू झाली, तेव्हा अण्णासाहेबांनी स्पष्टपणे सांगितले, “ही बहीण माझीच नव्हे, तर सर्वांची आहे . हिने अखेरपर्यंत महारा-मांगांची सेवा केली आहे. म्हणून आपण कृतज्ञपणे इतके जमले आहात. ज्यांच्या मनात असेल तर त्याने निःशंकपणे प्रेतास खांदा द्यावा.” प्रेतयात्रा निघाल्यानंतर अस्पृश्यांसह सगळ्या जातीचे लोक भराभर आळीपाळीने खांदा देऊ लागले. बुधवार चौकीत प्रेतयात्रा आल्यानंतर सेठ त्रिकमदास यांना अण्णासाहेब शिंदे यांची बहीण वारल्याचे कळले. हे राष्ट्रीय वृत्तीचे गृहस्थ सामाजिकबाबतीत कर्मठ होते व स्मशानभूमीचे प्रमुख ट्रस्टी होते. स्मशानभूमीमध्ये सौ. मुक्ताबाईंचे प्रेत जाळण्यासाठी कुणी आडकाठी करू नये म्हणून तत्परतेने पुढे लकडी पूलावरील स्मशानभूमीमध्ये गेले. श्री. पां. नं. भटकर यांच्या संपादकत्वाखाली त्या वेळी निघणा-या मूकनायकमध्ये ह्या दुःखद घटनेसंबंधी पुढील वृत्त आले आहेः “आम्हांस कळविण्यास वाईट वाटते की, रा. विठ्ठल रामजी शिंदे या पुण्यात्म्याची धाकटी बहीण सौ. मुक्ताबाई काळे यांना तारीख ३ जानेवारी रोजी पुणे येथे देवाज्ञा झाली. निराश्रित साह्यकारी संस्थेच्या कामी आत्म्यज्ञ करिताना या थोर विभूतीस घरदारची कोणीही माणसे पुरली नाहीत हे काम शिरावर घेतल्यापासून विश्वासाचे घर म्हणून ज्या काही थोड्या व्यक्तींवर रा. शिंदे यांना विसंबून राहणे प्राप्त झाले त्यांपैकी कै. मुक्ताबाई आपल्या बंधूंचे साह्म करण्यास फार उपयोगी पडल्या.


“बाईंची प्रेतयात्रा अगदी अपूर्व आणि संस्मरणीय अशी झाली. त्यांच्या प्रेतयात्रेस जुन्या-नव्या मताचे मराठे, ब्राह्मण, महार, मांग, चांभार, मुसलमान, ख्रिस्ती, पारशी तसेच शिक्षित, अशिक्षित, श्रीमंत आणि गरीब अनेक जातींच्या व दर्जाच्या लोकांची गर्दी झाली होती. एवढेच नव्हे तर जातधर्म किंवा उच्चनीच हा भेदभाव न ठेवता अस्पृश्यवर्गातसुद्धा सर्व लोकांनी प्रेतांस खांदा दिला. हिंदू धर्माच्या किंवा हिंदुस्थानच्या इतिहासातील असा हा पहिलाच प्रसंग असावा. बाईंच्या पुण्याईने स्मशानातही कोणी रोखले नाही. उलट पुण्यासारख्या ठिकाणी हिंदूंच्या स्मशानभूमीत अस्पृश्यवर्गाची प्रेते नेण्याची बंदी काढून इहलोक सोडताना हे महत्कार्य करून त्या कृतार्थ झाल्या. रा. शिंद्यांना तर हा महोत्सवच वाटून ते आपल्या कर्तव्याचे प्रधान अंगच आहे अशा सदभावनेने संतोषच झाला आहे. बाईंच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो. रा. शिंदे यांच्या ह्या अभंगव्रताचे कोणी मानकरी होतील काय?”१ मूकनायकाचे त्या वेळचे संपादक पां. नं. भटकर हे मिशन बोर्डिंगचे विद्यार्थी होते. ते अण्णासाहेबांच्या सर्व कुटुंबीयांना ओळखणारे व त्यांच्या वृत्ती व हेतू जाणणारे होते. ते स्वतः अस्पृश्यवर्गातील असल्यामुळे स्मशानभूमीवरील अस्पृश्यांचा प्रवेश ह्या घटनेचे सामाजिकदृष्ट्या ऐतिहासिक महत्त्व काय आहे हे त्यांनी जाणले होते. म्हणूनच अशा प्रकारची प्रतिक्रिया ह्या स्फुटातून प्रकट केली आहे. मुक्ताबाई काळे ह्या अतिशय साध्या, भोळ्या, मिशनचे काम निष्ठेने करणा-या व सर्वांशी प्रेमाने वागणा-या होत्या, म्हणून त्यांना ओळखणा-या सगळ्यांना त्यांच्या मृत्यूचा चटका लागला. श्री. वामनराव सोहोनी यांनी अण्णासाहेबांना जे सांत्वनपर पत्र पाठवले त्यामध्ये मुक्ताबाईंच्या स्वभावाचे व कामावरील निष्ठेचे यथार्थ वर्णन केले आहे.


यानंतर अण्णासाहेबांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या मनावर दुसरा मृत्यूचा आघात झाला तो म्हणजे त्यांच्या चिमुकल्या चार वर्षांच्या मुलीच्या मृत्यूचा. मुक्ताबाईंच्या मृत्यूनंतर लवकरच मिशनच्या शाळा भोकरवाडीतील नवीन इमारतीत गेल्या. राहण्यासाठी बांधलेल्या जागा व वसतिगृहाच्या इमारती कशाबशा पूर्ण झाल्या होत्या. पण भिंती व गिलावा नीट सुकलेला नव्हत. फरशा व दारे-खिडक्या बसवण्याचे काम घाईने चालूच होते. इमारत ओलसर अवस्थेत असतानाच अण्णासाहेबांनी कुटुंबीयांसह तेथे जाऊन राहावे लागले. भोवतालची साफसफाई चालू होती. ह्या वेळी अण्णासाहेबांची एकुलती एक धाकटी मुलगी चार वर्षांची होती. अण्णासाहेबांना मुलींची आवड फार. त्यातून ही चिमुकली मुलगी दिसण्यास सुंदर व चरूचरू बोलणारी होती. इमारतीचे बांधकाम करणा-या अस्पृश्य मजुरांमध्ये ती खेळीमेळीने हिंडत असे. त्यामुळे मजुरांमध्येही ती प्रिय झालेली होती. तिच्या चुणचुणीतपणामुळे अण्णासाहेबांची ती फार लाडकी होती. दिवसभर ती ओल्या इमारतीतून हिंडायची व उन्हातही वावरायची. त्या कारणाने तिची प्रकृती बिघडली व तिला मॅनिंजायटिस ह्या नावाचा मेंदूचा विकार झाला. अण्णासाहेबांनी सतत एक महिना तिल मांडीवर घेऊन अहोरात्र तिची शुश्रुषा केली. वास्तशांती न करता अण्णासाहेबांचे कुटुंबीय तेथे राहावयास गेले म्हणून बाधा झाली असे भेटीस येणा-या अशिक्षित बायका म्हणू लागल्या. त्या त्याच धर्तीचे उपाय त्यांना सुचवीत असत, परंतु अशा गोष्टींवर अण्णासाहेबांचा विश्वास नव्हता. भोवतालच्या दूषित वातावरणामुळे त्या लहान मुलीला आजारपण आले असेच त्यांना वाटत होते. शेवटी ६ जून १९२० रोजी ह्या चिमुकल्या जीवाचा अंत झाला. ‘घरचा बळी घेऊन वास्तुशांती झाली’ असे वारंवार म्हणत अण्णासाहेबांच्या पत्नी सौ. रुक्मिणीबाई शोक करू लागल्या.२ मिशनमध्ये काम करणारे मजूर आणि तेथे राहणा-या सगळ्या मंडळींच्या मनाला ह्या चिमुकल्या जीवाच्या मृत्यूने फार चटका लावला. अण्णासाहेबांनी तर मुलींची फार हौस होती. आपल्या एकुलत्या एका मुलीच्या निधनाचे अण्णासाहेबांना अतोनात दुःख झाले.


संदर्भ
१.    मूकनायक, १४ फेब्रुवारी १९२०.
२.    विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. ३०५.