उपसंहार (कानडी)
शब्दकोश, व्याकरण, वाक्यव्यवस्था, लकबा आणि वाङ्मयवृद्धि इ. भाषेच्या निरनिराळ्या अंगांच्या दृष्टीनें, मराठी आणि कानडी ह्या दोन भाषांमध्यें किती व कसें साम्य आहे ह्याचें शक्य तितक्या संक्षेपानें आतांपर्यंत विवरण केलें आहे.
ह्या विषयाचें यथार्थ स्वरूप, सामान्य लोकांच्या तर राहोच, पण विद्वानांच्याहि लक्षांत भरण्यास तौलनिक भाषाशास्त्राचा अभ्यास पौरस्त्य विश्वविद्यालयांतून सुरू झाला पाहिजे. अशा तुलनात्मक इतिहासाचा अवतार होईल तेव्हां होवो. तो दूरचा प्रश्न आहे. तूर्त आपल्या अर्वाचीन भाषांचा जरी तौलनिक अभ्यास चालू राहिल तरी आम्हीं पुष्कळ मिळविलेसें होईल ! निदान मराठी व कानडी ह्या दोन भाषांचें तरी तुलनात्मक अध्ययन ह्यापुढें लांबणीवर पडूं नये. ह्या दोन भाषांच्या परस्परसंबंधाचें महत्त्व तौलनिक भाषाध्ययनांत कांही विशेष प्रकारचें आहे, हें तौलनिक व्याकरणवेत्त्यांच्या लक्षांत जितकें लवकर भरेल तितकें लवकर फायदेशीर होईल. तामील ती द्राविडी भाषा हें निर्विवाद. पण कसेंही असलें तरी मराठ्यांच्या मूळ पीठिकेचा छडा अद्यापि तितका निर्विवाद लागलेला नाही.
मराठी व कानडी ह्या दोघींचा उगम कदाचित् भिन्न असेल. तूर्त मराठीची मूळ पीठिका प्राकृत व कानडीची तामील असें म्हणण्यास कांहीं हरकत नाहीं. प्राकृत आणि तामील ह्या दोहोंचें मूळ शोधणें हा फार खोल प्रश्न आहे. मराठी आणि कानडी ह्या मुळात जरी अगदी भिन्न असतील, तरी त्यांच्यामध्यें अद्यापि जें कांही ध्यानांत घेण्यासारखे साम्य आढळत आहे तें ह्या निबंधांत कांहीं अंशीं दाखविण्यांत आलें आहे. विशेषतः हें साम्य व्याकरणदृष्ट्या नवीन मराठी आणि नवीन कानडी हयांमध्यें असलेलें आणि शब्दकोशदृष्ट्या जुनी मराठी व नवीन कानडी ह्यांमध्यें असलेलेंच ह्या निबंधांत दाखविण्यांत आलें आहे. हेतु इतकाच कीं, जुनी संस्कृत, प्राकृत आणि तामील, कानडी, आदिकरून जुन्या द्राविड भाषा यांचा तुलनात्मक अभ्यास व्हावा. निदान अशा अभ्यासाच्या सहाय्याशिवाय मराठीची व्युत्पत्ति करूं इच्छिणा-यांनीं केवळ संस्कृत-प्राकृतादि आर्य भाषांच्या माहितीवरच अवलंबून अनुमानें बांधीत राहूं नये. एवढीच अखेरची सप्रेम सूचना आहे.