धर्म-१

हल्लीचे काळी धर्माच्या बाबतीत अंतस्थ भेद आणि भ्रांती ह्यांचा जितका सुळसुळाट माजलेला आहे तितका जीवनाच्या इतर कोणत्याही बाबतीत आढळून येणार नाही. एका पक्षाचे म्हणणे असे की, जीवनयात्रा सुव्यवस्थित होऊन ती प्रामाणिकपणे चालविता यावी ह्याकरिता धर्माचा सर्वस्वी त्याग करणे जरूर आहे. कारण गत युगातून चालत आलेली धर्म ही एक केवळ अनिष्ट परंपरा असल्यामुळे त्याच्यायोगे आमच्या विचारात गोंधळ उडून जातो. आयुष्याची यत्नशक्ती कुंठित होते आणि परस्परांमध्ये अत्यंत तीव्र द्वेष माजतो. एकंदरीत आमच्या जीवनक्रमावर त्याचे मोठे दडपण पडते. उलपक्षी इतरांचे म्हणणे असे की, प्रस्तुत युगामध्ये ज्या आध्यात्मिक गरजा भासत आहेत आणि समाजामध्ये जो गोंधळ माजलेला आहे तो लक्षात आणला असता धर्मच हा एक केवळ दृढ आधार आहे. व्यक्तीची उन्नती आणि अखिल मानवजातीचे अंतस्थ ऐक्य साधणारी, मानवी जीवित्वाचे रहस्य दाखविणारी आणि अनंत व सनातन वस्तूशी जीवनाचा संबंध जोडणारी जर कोणती एकादी बाब असेल तर ती धर्मच होय.

ह्या दोन्ही पक्षांची स्वमताविषयी कळकळ सारखीच दिसून येते. निषेधपक्षाला केवळ “नास्तिक” हे नाव देऊन त्याची अवहेलना करून चालत नाही. कारण जीवितामध्ये सत्यवृत्तीचा फैलाव व्हावा, ह्याविषयीची खरी कळकळ ह्या निषेधपक्षाच्या अनुयायांपैकी पुष्कळांमध्ये आढळून येते. दोन्ही पक्षांच्या अभिमानाचा डाग अंगास न लागावा म्हणून वादाच्या मुख्य मुद्याचा नि:पक्षपाताने विचार करणे जरूर आहे. आणि तत्त्वज्ञानाचे तर हे मुख्य काम आहे.

धर्माची जी आजकाल अवनती झाली आहे तिचेविषयी खरे तत्त्वज्ञानी कधीही बेपर्वा राहणार नाहीत. इतिहासाचे अवलोकन केले असता, जेव्हा धर्माचे अनियंत्रित साम्राज्य चालू होते अशा प्राचीन काळी मानवी जीविताचा जो प्रकार होता तो आता पार बदलून गेला आहे, असे दिसून येते. विश्व आणि मानवी जीवित ह्यांचा त्या काळी अदृश्य आणि निसर्गातीत जगाशी जो संबंध कल्पिण्यात येत असे त्याच्याच मानाने विश्वाची आणि जीविताची किंमत करण्यात येत असे. आमच्याभोवती जे भौतिक जग विस्तारलेले आहे त्याची किंमत आधुनिक काळ्या प्रगतीमुळे आम्हांला जास्त कळू लागली आहे आणि जसजसे ह्या भौतिक जगतासंबंधी आमचे प्रयत्न अधिकाधिक वाढत आहेत, तसतशी श्रद्धेच्या जगाला अधिकाधिक उतरती कळा लागत आहे. हल्लीच्या ज्या परिणत अवस्थेला आम्ही येऊन पोहोचलो आहोत, तिच्या तीन पाय-या आढळून येतात. आधुनिक ज्ञानाचा पहिला आविर्भाव होऊन गेल्यावर दैवी शक्तिविषयी जो आदरभाव कायम राहिला तो तिचा व्याप नैसर्गिक सर्व व्यापारात जो दिसून येत असे त्याविषयी जितक्या अंशाने राहिला तितक्या तिच्या अतिंद्रीयपणाविषयी राहिला नाही. त्यानंतर दुसरी पायरी काव्य आणि मीमांसा ह्यांनी स्थापिलेल्या अद्वैत सिद्धांताची होय. तिच्याद्वारे जगत आणि ब्रह्म ह्यांमधील अभेद स्थापण्यात आला.

त्यानंतरची तिसरी पायरी ही की, अमर्याद निसर्गाचा छडा लावीत लावीत राजकीय आणि सामाजिक जीविताचा विस्तार करीत करीत शेवटी मनुष्याला आपल्या कर्तबगारीची साहजिकपणे इतकी घमेंड वाटू लागते की अतिंद्रिय जगताविषयीची त्याची भावना जवळजवळ मावळून गेली आणि अशा जगताविषयीचे सर्व विचार म्हणजे केवळ निष्फळ आणि अनाठायी असे प्रतिपादणारा अज्ञेयवाद बळावू लागला. जीवितासंबंधी हा जो फरक आढळून आला आहे तेवढ्यावरूनच धर्मावरील आमचे लक्ष कमीअधिक डळमळू लागले आहे. पण आधुनिक युग धर्माला ह्याहूनही अधिक विघातक होत आहे. ते असे की, धर्मविकासाचा पाया जीविताच्या ज्या तत्त्वावर रोवलेला आहे त्या तत्त्वाच्या मुळावरच ह्या युगाचे कार्य आणि त्याची मुख्य धोरणे ह्यांच्या कुठारेचा रोख आहे. सर्व विश्वाचा आपण मध्यबिंदू अशी जी मनुष्याची आजवर समजूत होती त्या समजुतीला आधुनिक भौतिक शास्त्राने पार हुसकून लाविले आहे. इतकेच नव्हे तर, स्वत: निसर्गाचा आत्माही त्याने हिरावून घेतला आहे. मानवी इतिहास आणि मानवी स्थितीमध्ये अविश्रांत घडून येणारा बदल ह्यांच्या अवलोकनामुळे तर केवळ सत्य म्हणून काही पदार्थ आहे किंवा नाही ह्याविषयीची श्रद्धाच मुळी डळमळू लागली आहे. तसेच ख्रिस्ती धर्माच्या उगामाविषयी पाहू गेले असता ह्याविषयीची परंपरागत मते आणि ऐतिहासिक शोधामुळे ख्रिस्ती धर्मासंबंधी हल्ली झालेल्या भावना ह्यांमध्ये मोठी तफावत पडत चालली आहे. भौतिक सृष्टीवर परिणाम घडवून तिच्यावर अंमल गाजविण्याची शक्ती वाढविणे ह्यातच मानवी ध्येयाची पराकाष्टा आहे असे आधुनिक संस्कृतीमुळे वाटू लागले आहे. ह्या अपौरूषेय आदर्शाच्या दृष्टीने पहाता ख्रिस्ती धर्माचे रहस्य जी आध्यात्मिकता जीविताचा एक गौण आणि काल्पनिक भाग आहे, असे कित्येकास वाटू लागले आहे. आधुनिक जगताच्या ह्या निरनिराळ्या प्रवृत्ती एकवटून त्यांचा एकमेकाला दुजोरा मिळतो. त्यामुळे मानवी जीविताच्या केंद्रस्थानापासून धर्माचे उच्चाटन होते आणि त्याच्या सिद्धांताविषयी पूर्वीची अभेद्य स्थिती नष्ट होऊन धर्म म्हणजे सोडविण्यास कठीण असा एक प्रश्न आहे, अशी एकाद्याची साहजिक वृत्ती होते. त्यामुळे धर्म ही स्वत:सिद्ध बाब आहे अशा समजुतीमुळे मानवी जीविताला पूर्वी जे स्वास्थ्य आणि सुरक्षितता आली होती ती आता नष्ट होऊ लागते. ह्यायोगे आधुनिक विचारी मनुष्याच्या अंत:करणामध्ये धर्मबुद्धीचा झरा, त्यांच्या अंतर्जीविताचा एक अवश्य परिणाम ह्या रूपाने फुटून वर येत नसेल तर धर्माचे दुर्बोधत्व त्याना दु:सह होत असेल त्यात काय नवल? धर्माच्या निर्जीव चालीरीतीचे दडपड त्यांच्या अंत:करणप्रवृत्तीला ह्याप्रकारे दु:सह होऊन शेवटी एकाएकी जी क्रांती घडून येते तिच्यामुळे सत्याचा बचाव करण्यासाठी धर्माचा त्याग करणे हा एकच मार्ग आहे असे वाटू लागते. धर्म म्हणजे फलज्योतिष किंवा किमया ह्यासारखाच गतकाळी उदयास आलेला एक भ्रांतिमूलक प्रकार आहे आणि उत्तरोत्तर विस्तारणा-या ज्ञानप्रकाशापुढे त्याचा अंती पूर्ण निरास व्हावयाचा आहे, असे वाटू लागते.

धर्माचा वर सांगितल्याप्रमाणे केवल निषेध केल्याने जीविताचे कोडे सर्व सरळ आणि सुलभ रीतीने सुटत नाही असा अनुभव आल्याने धर्माला अनुकूल असे बरेच कार्य होते आणि दुसरे असे की, धर्माचा पाया डळमळला असता त्याच्याबरोबर ज्या पुष्कळ गोष्टी आधुनिक मनुष्यालाही टाकाव्या असे वाटत नाही. त्यांचाही पाया डलमळू लागतो. काय असेल ते असो ही गोष्ट खरी की, सत्याच्या खोल पायाशी मनुष्याचा संबंध धर्मामुळेच जडलेला आहे. सर्व जीविताला जो एक विशेष आदर्श लाभलेला आहे तो धर्मामुळेच आणि धर्मामूळेच जीविताची किंमत आहे. जीवित म्हणजे केवळ स्वसंरक्षण ही जी अहंकारमूलक हीनवृत्ती आणि अशाच प्रकारचे दुसरे नीच हेतू ह्या सर्वांस दाबात ठेवून मनुष्यजातीची आध्यात्मिक संघटना धर्मानेच केली आहे. हे कार्य अनावश्यक आणि निष्फळ असे मुळीच म्हणता येणार नाही. धर्मतत्त्वाचा त्याग केला तरी ह्या कार्याची जोडणी अन्य कोणत्या तरी त-हेने करणे आवश्यक झाले असते. अशा रीतीने जीविताची पुनर्घटना करू लागले असता, धर्माचा निषेध किती लंगडा आहे, हे खेदपूर्वक कळून येते. मानवी मन थोर आणि उदार आहे, असा त्याचा गौरव करणे, ज्ञानाची शक्ती किंवा बाह्य घटना ह्यांच्याद्वारे उन्नती होते अशी अंधश्रद्धा बाळगणे, एकाद्या गोष्टीची कारणे सांगितली असताना त्यांचा त्याग करून पुन्हा त्याच गोष्टीच्या कार्याला नकळत वश होऊन एकंदरीत विचारांचा गोंधळ माजविणे इत्यादी प्रकारे धर्माचा आवेशाने निषेध केल्यामुळे ज्यांच्या मनोवृत्तीचा तोल आणि विवेकाचा नि:पक्षपातीपणा नष्ट झाला आहे, त्यांचीच दिशाभूल होणे शक्य आहे. मानवी जीविताचा विश्वाशी अंतरबाह्य सर्व संबंध तोडून टाकल्यावर मागे अवशेष काय उरले हे पाहिले असता असेच आढळून येईल की, धर्माचा सर्वस्वी त्याग करून वागू लागलो तर एकंदर मानवी अस्तित्वाला भयंकर धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

पण वरील विचार करून धर्माच्या निषेध पक्षापासून आम्ही सावध असावे असे जरी असले तरी तेवढ्यावरून धर्माची जी परंपरा चालत आलेली आहे तिलाच आम्ही चिकटून राहावे असे होत नाही. जीवितामध्ये ज्या मोठमोठ्या घडामोडी होऊन राहिल्या आहेत त्यांचा तसा अर्थ करून त्यांना वाटेस लावणे शक्य नाही, किंवा त्यांचे महत्त्वही कमी होणार नाही. त्यांची खरी कदर ओळखून धर्माशी त्यांचा समेट करणे जरूर आहे. ह्या फेरफाटामुळे युगधर्म आणि सनातनधर्म ही धर्माची मुलतत्त्वे आणि त्यांची बाह्य अंगे ह्यामधील सीमा अनिश्चित झाल्या आहेत. विशेषत: केवळ हटवादाच्या दृष्टीने धर्माचा विचार करणे आता अशक्य झाले आहे. कॅथॉलिक आणि प्रॉटेस्टंट धर्मामध्ये जो विरोध पडला तो आधुनिक ज्ञानाच्या पूर्वयुगातून निर्माण झाला होता. ह्या विरोधाच्या वेळी धर्माचा जो प्रश्न होता त्याहून भिन्न हल्लीचा प्रश्न आहे ख्रिस्तीधर्माची मांडणी बहुजनसमाजाच्या तंत्राने व्हावी की थोर पुरूषांच्या तंत्राने व्हावी असा त्यावेळी प्रश्न होता आणि आता पहावे तर ख्रिस्तीधर्माच्या अस्तित्वावरच गदा आली आहे. मानवी प्रयत्नाचाओघ अन्य दिशांनी वाहत चालल्यामुळे ख्रिस्तीधर्माच्या मूळ तत्त्वाचीच धडगत लागेनाशी झाली आहे. कॅथॉलिक आणि प्रॉटेस्टंट ह्या स्वत: प्रत्येकामध्ये दोन निरनिराळे विरोध चालू आहेत. कॅथॉलिक धर्मामधील दोन भेद असे की, एकाच्या दृष्टीने मठाचा अधिकार ही महत्तवाची गोष्ट वाटते तर दुस-यास व्यक्तीची आधअयात्मवृत्ती हीच महत्त्वाची बाब वाटते. आधुनिक संस्कृतीमुळे हा भेद प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रीतीने अधिकच वाढला आहे. विशेषत: जर्मन देशाच्या बाहेर कॅथॉलिक धर्माची आध्यात्मिकता वाढविण्याची एक जोराची चळवळ सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रॉटेस्टंट धर्मामध्ये जो विरोध चालू आहे तो असा की, एका बाजूने सोळाव्या शतकामध्ये धर्माधिका-यांची सत्ता चालू होती, तीच कायम ठेवण्याचा प्रयत्न चालला आहे आणि दुस-या बाजूने आधुनिक संस्कृतीला अनुलक्षून धर्माला उत्तरोत्तर सनातन आणि स्वतंत्र स्वरूप देण्याचा प्रयत्न चालू आहे. परंतु जोपर्यंत पक्षाभिमान आणि हटवाद ह्यांमुळे मुख्य धोरण लोकांच्या मनात येत नाही तोपर्यंत ह्या विरोधाचे स्पष्ट स्वरूप त्यांना दिसून येणार नाही. आणि त्यांचे कार्यही जोराने चालत नाही. ह्यामुळे  परस्परांहून भिन्न मते आणि भिन्न पक्ष उदयाला येतात. ह्या भिन्न मतांची आणि पक्षांची उभारणी गतकालाच्या अनुरोधाने न होता प्रस्तुत समयाला उचित होईल असे करणे हे आधुनिक तत्त्वज्ञानाचे अवश्य कर्तव्य आहे.

आम्हांला जगताचा ज्या ज्या प्रकारे अनुभव येतो त्या त्या प्रकारांची प्रांजलपणाने मीमांसा करणे एवढेच तत्त्वज्ञानाचे कर्तव्य आहे असे नव्हे तर धर्मविषयांचे विवरण करून तत्संबंधी काही विधानपूर्वक सिद्धांत ठरविणे हेही तत्त्वज्ञानाचे काम होय. ह्या ग्रंथामध्ये सांगितलेली जी जीवनमीमांसा तिचे मुख्य लक्षण ब्रह्मवाद, त्याचीही निश्चितपणे चर्चा व्हावयास पाहिजे आणि तत्त्वज्ञानाची वर सांगितलेली कामगिरी बजावण्याकरिता ब्रह्मवादाची पात्रता काय हे दाखविण्यात आले पाहिजे.

ब्रह्मवादाच्या दृष्टीने इतिहासाला धर्माच्याबाबतीत फारसे प्राधान्य देता येत नाही. ऐतिहासिक विचारपद्धतीवरच विशेष मदार ठेवणे हा एक कोतेपणाच आहे. आध्यात्मिक जीवनाच्या कसाला उतरावयाचे झाल्यास इतिहासावर विशेष भार न ठेवता स्वतंत्ररीतीने आपले सत्यत्व सिद्ध करावयास पाहिजे असा ब्रह्मवादाचा आग्रह आहे. इतक्या स्वतंत्र रीतीने धर्माचे सत्यत्व सिद्ध होत असेल तरच ऐहिक उत्क्रांतीमध्ये जे मायिक सत्य भासमान होत आहे त्याचा दुजोरा अतिंद्रिय सत्याला मिळून तेवढा अतिंद्रिय सत्याचा भाग मानवतेच्या आटोक्यात आला असे होईल.