मँचेस्टर कॉलेजमध्ये आठवड्यात अभ्यासाचे चारच दिवस असत आणि शनिवार, रविवार, सोमवार या दिवशी सुटी असे. सलग तीन दिवस सुटी ठेवण्याचा उद्देश हा असे की, इतर गावातील कुठल्याही एका युनिटेरियन समाजामध्ये एखाद्या वेळी उपासना चालविणारे आचार्य नसले तर मँचेस्टर कॉलेजातील विद्यार्थ्याला उपासना चालविण्यासाठी पाठविण्यात येत असे. त्याबद्दल त्याला येण्याजाण्याचे भाडे व पाहुणचारासह दोन पौंड मोबदला मिळत असे. विठ्ठल रामजी शिंदे यांचीही अशा प्रकारची उपासना चालविण्यासाठी वर्णी लागत असे. ब्रह्मसमाजाचा प्रतिनिधी म्हणून विशेष आवडीने त्यांना निवडण्यात येत असे.
१५ मार्च १९०२ पासून त्यांच्या कॉलेजला सहा आठवड्याची ईस्टरची सुटी सुरू झाली. १६ तारखेला ब्रिडपोर्ट येथील युनिटेरियन चर्चमध्ये उपासना चालविण्याचे त्यांना निमंत्रण मिळाले होते. त्याच परिसरात इतर ठिकाणीही उपासना चालविण्याची आणि व्याख्याने देण्याची निमंत्रणे त्यांना होती. डेव्हनशायर या नावाने ओळखल्या जाणा-या विभागातील इंग्लंडच्या दक्षिण किना-यावर असलेल्या डेव्हनशायर या परगण्यातील ब्रिडपोर्ट या शहरी जाण्यासाठी १५ मार्चल सकाळी ९ वाजता ते रेल्वेने निघाले. त्यांचे मित्र जे. वॉल्टर कॉक यांच्या परिचयाचे मि. कॉर्निक हे ब्रिडपोर्टमधील एक दुकानदार त्यांना नेण्यासाठी दीडच्या सुमारास स्टेशनवर आले होते. ते जुन्या वळणाचे मेथॉडिस्ट पंथाचे होते. शिंदे यांच्याशी ते फार स्नेहभावाने वागले.
ब्रिडपोर्ट हे इंग्लंडच्या दक्षिण किना-यावरील टुमदार शहर आहे. एकेकाळी दोरखंडे आणि जाळीसाठी सुप्रसिद्ध असलेले हे शहर मुळात दोन गावांनी मिळून तयार झाले आहे. शहरामधील ईस्ट स्ट्रीटवर युनिटेरियन देवळाची १७९४ मध्ये बांधलेली साधी, सुंदर इमारत आहे.१ संध्याकाळी युनिटेरियन मंदिरामध्ये आचार्य मि. सॉली यांची शिंदे यांनी भेट घेऊन उपासनाक्रम समजून घेतला. दुस-या दिवशी रविवारी सकाळी त्यांची उपासना झाली. उपासनेनंतर मि. कॉलफॉक्स ह्या श्रीमंत युनिटेरियन गृहस्थांची भेट झाली. हे मि. कॉलफॉक्स मँचेस्टर कॉलेजचे अध्यक्ष होते. त्यांच्या भेटीनंतर शिंदे शहरापासून दीड मैलावर कॉर्निकच्या आईवडिलांच्या घरी गेले. ते फळझाडाची लागवड करीत असत. शेतीबद्दल विठ्ठल रामजींना कुतूहल असल्यामुळे फळझाडांच्या आणि जिराईत जमिनीच्या लागवडीसाठी किती भाडे द्यावे लागते ह्याची त्यांनी चौकशी केली.
शिंदे यांची ब्रिडपोर्ट येथील युनिटेरियन मंदिरातील उपासना व त्यांचे व्याख्यान हा ब्रिडपोर्ट शहरातील संस्मरणीय प्रसंग ठरला. मँचेस्टर कॉलेजमधील भारतीय विद्यार्थी मि. व्ही. आर. शिंदे हे रविवारी १६ तारखेच्या संध्याकाळी उपासना चालविणारे हे दोन आठवड्यापूर्वीच जाहीर झाले होते. त्यामुळे तेथील युनिटेरियन समाजामध्ये मोठे कुतूहल निर्माण झाले होते. ब्रिडपोर्ट न्यूज मध्ये प्रसिद्ध झालेल्या ह्या उपासनेच्या वृत्तान्तामधील मुख्य भाग असाः उपासनेसाठी मोठा समाज जमला होता. शिंदे हे हिंदुस्थानातून आलेले काळ्या वर्णाचे गृहस्थ असून त्यांनी गुलाबी फेटा बांधलेला असल्याने आकर्षक दिसत होते. त्यांनी आठवी उपासना फारच प्रभावी रीतीने वाचली. उपासनेनंतर त्यांनी ब्राह्मधर्मावर उद्बोधक व्याख्यान दिले. ब्राह्मसमाज १८३० मध्ये राजा राममोहन रॉय यांनी स्थापन केला व केशवचंद्र यांनी तो वाढविला. शिंदे स्वतः ब्राह्मसमाजाचे उपासक आहेत. हा एकेश्वरी पंथ म्हणजे भारतामधील युनिटेरियन धर्म म्हणता येईल. शिंदे आपल्या भाषणात म्हणाले की, परमेश्वर विशिष्ट लोकांपुरता प्रकट झाला, ज्यू लोक हे त्याने निवडलेले त्याचे खास लोक होत असे समजणे, ह्यावर विश्वास ठेवणे अज्ञपणाचे म्हणावे लागेल. आपण कोणीतरी विशेष लोक आहोत असे समजणे हा प्रकार इतर धर्मांतही दिसतो. उदाहरणार्थ, ख्रिश्चन हे इतरांना धर्मभ्रष्ट समजतात. हिंदू स्वतःला उच्च आणि इतरांना हीन समजतात. येथील युनिटेरियनप्रमाणे भारतामधील ब्राह्मसमाज प्रारंभी छोटासा पंथ होता. ब्राह्म आणि युनिटेरियन हे दोन्ही पंथ प्रेमळ भगिनीप्रमाणे असून उत्तरोत्तर विकास पावणारे आहेत. कोणीही एक पंथ दुस-याकडे श्रेष्ठपणाच्या प्रौढीने पाहत नाही. हिंदुस्थानातील ब्राह्मधर्म म्हणजे ख्रिस्ती मिशन-यांच्या कामाचे फलित होय असे समजणे चुकीचे ठरेल. कारण ब्राह्मधर्म पूर्णतया वेगळा असून धर्माग्नी प्रज्वलित झाल्यामुळे पारंपरिक हिंदू धर्ममतातून विवेकपूर्ण रीतीने घडलेला तो आंतरिक विकास होय. केशवचंद्र सेन इंग्लंडमध्ये आले असताना विविध धर्मपंथांच्या श्रद्धांबद्दल ते असे म्हणाले : “मी इंग्लंडमध्ये आल्यापासून पाहतो की, विविध नावे धारण करणारे धर्मपंथ आपण ख्रिश्चन असल्याची घोषणा करतात. मला वाटते की, मी एका भल्या मोठ्या मार्केटात आलो आहे. प्रत्येक पंथ म्हणजे लहानसे दुकान असून तेथे विशिष्ट प्रकारचा ख्रिश्चन धर्म हा विक्रीसाठी ठेवला आहे. मी जेव्हा ह्या दाराकडून त्या दाराकडे जातो, ह्या दुकानाकडून त्या दुकानाकडे जातो त्या वेळेला प्रत्येक धर्मपंथ पुढे येऊन आपला बायबलचा विशिष्ट अर्थ आणि आपली विशिष्ट ख्रिश्चन श्रद्धा मला देऊ पाहतो. माझा असा पक्का विश्वास आहे आणि मला स्पष्टपणे म्हणावेसे वाटते की, कोणताही ख्रिस्ती धर्मपंथ खराखुरा आणि परिपूर्ण ख्रिस्त पुढे करीत नाही, तर तो ब-याच ठिकाणी विरूप स्वरूपात प्रस्तुत केला जातो आणि अधिक लज्जास्पद गोष्ट कोणती असेल तर काही ठिकाणी नकली ख्रिस्त पुढे केला जातो. मात्र मी हे सांगू इच्छितो की मी इंग्लंडमध्ये ख्रिस्त शोधण्यासाठी आलो नाही. ही परमेश्वराची कृपा आहे की, माझा ख्रिस्त माझ्याजवळ आहे.” उपदेशक म्हणाले की, “ब्राह्मांचा आणि युनिटेरियनांचा गेल्या सात-आठ वर्षांत घनिष्ठ संबंध येत आहे. मात्र ब्राह्मांचे खरे बळ परमेश्वराच्य अदृश्य धर्मसंघात साठविले आहे.”२
शिंदे यांनी आठवी उपासना लिटनी पद्धतीने वाचली. या पद्धतीत आचार्य व उपासक आळीपाळीने काही वाक्ये म्हणतात. त्यामुळे दोघांचेही लक्ष उपासनेत लागते. युनिटेरियनाशिवायही बरेच लोक उपासनेसाठी जमले होते. एकंदरीत श्रोतृसमाज साडेतीनशेपर्यंत होता. शिंदे यांचे ब्राह्मसमाजावरील व्याख्यान त्यातील स्पष्ट प्रतिपादनामुळे अनेकांना आवडले.३
विठ्ठल रामजी शिंदे यांच्या ब्रिडपोर्ट भेटीच स्मरण असणारी एक व्यक्ती १९८३ मध्ये हयात होती. रे. बेसिल शॉर्ट यांनी आपल्या परिचयाच्या ८९ वर्षांच्या स्त्रीजवळ विठ्ठल रामजी शिंदे यांच्या १९०२ मधील ब्रिडपोर्ट भेटीचा उल्लेख केल्यावर त्या उदगारल्या, “हो, मला आठवतं की, मि. शिंदे ब्रिडपोर्टला आले होते. त्या वेळेला संडे स्कूलमध्ये एक सभा झाली होती. त्या वेळेला पुढच्या रांगेत मि. शिंदे बसले होते. त्यांनी मला आपल्या मांडीवर घेतले होते.”४
“त्या बाईचे सध्याचे नाव मिसेस फुलर. लग्नाआधी त्यांचे नाव हेनरीएटा ऍबट होते. ह्या बाईंची आई मंदिराची देखभाल करण्याचे काम करीत होती व वडील बांधकामाचे कंत्राटदार होते.”५
ही उपासना चालविण्यात आपण फार रंगलो होतो असे शिंदे यांनी नमूद केले आहे. उपासनेचा व त्यानंतरच्या त्यांच्या व्याख्यानाचा वृत्तान्त इतरही वृत्तपत्रांत आला. शिंदे यांनी काहीशा विनोदाने म्हटले आहे, “रविवारच्या नेहमीच्या पोशाखाप्रमाणे माझ्या डोक्यावर गुलाबी फेटा होता. निरनिराळ्या वर्तमानपत्रांत जो रिपोर्ट आला त्यात ब्राह्मसमाजापेक्षा माझ्या फेट्याचे आणि विशेषतः शेमल्याचेच अधिक वर्णन होते.”६
दुस-या दिवशी सकाळी साडेदहा वाजता विठ्ठल रामजी शिंदे रेव्ह. सॉली यांच्याबरोबर संभाषण करीत समुद्रकाठी फिरावयास गेले. वेस्ट बेवरील टेकडीचा दीडशे फूट उंचीचा कडा तुटलेला होता. इंग्लंडमधील हा एक अप्रतिम समुद्रकिनारा समजला जातो. शिंदे यांना एकंदर देखावा फार उदात्त व रमणीय वाटला.७
खेडेगाव आणि शिक्षक हे दोन्हीही विठ्ठल रामजी शिंदे यांच्या आस्थेचे विषय होते. ब्रिडपोर्टसारख्या ठिकाणी आल्यावर इंग्रजी खेड्यातील शिक्षण स्वतः डोळ्याने पाहण्याची उत्कट इच्छा मिस्टर कॉर्निक ह्यांस त्यांनी दर्शविली. त्यानुसार ब्रिडपोर्टच्या पूर्वेला तीन मैलावर असलेल्या सुमारे ७०० वस्तीच्या बर्टन खेडेगावातील शाळा त्यांना पाहावयास मिळाली. गावाबाहेर एका जुन्या पण स्वच्छ इमारतीत ही शाळा होती. मुलांची संख्या ७१ व मुलींची संख्या ६७ होती. इंग्लंडात सात वर्षावर व चौदा वर्षाखाली प्रत्येक मुलामुलीने शाळेत गेलेच पाहिजे असा सक्तीचा कायदा होता. हा कायदा मोडल्यास पालकास दंड अगर कैदेची शिक्षा होते. हे सक्तीचे शिक्षण मुलांना मोफत असे. शासनाची ही बाजू विठ्ठल रामजी शिंदे यांना महत्त्वाची वाटत असणार. शाळेत एक लहानसे म्युझियम होते. मुलांचा सगळा अभ्यास शाळेतच करून घेतला जात असे. घरी करावयाच्या अभ्यासाचा बोजा त्यांच्यावर पडत नसे. मुलांना फी तर पडत नसेच शिवाय काही स्कॉलर्शिपा होत्या. शाळेची शिस्त वाखाणण्याजोगी होती. हेडमास्तरांबद्दल शिंदे यांनी लिहिले, “मि. मिलबोर्न ह्या कामाला अगदी लायक दिसला. मुलावर त्याची अशी जरब होती की, कधी न पाहिलेल्या माझ्या फेट्याकड् फारसे न पाहता नेहमी पाहिलेल्या त्याच्या तोंडाकडे सावधपणे पाहात...”८ समुद्रकाठच्या डोंगराळ प्रदेशातील आडवळणाच्या खेडेगावातील शाळांची ही व्यवस्था पाहून विठ्ठल रामजी शिंदे यांच्या डोक्यात विचारांचे व मनात विकारांचे काहूर माजले. “इतका पैसा व अक्कल इकडे खर्च होत असूनही राष्ट्रीय शिक्षणाची हेळसांड होत आहे अशी ओरड पत्रांतून, सभांतून ऐकू येते; तर आमच्याकडे १०० स ७ला लिहिण्यावाचण्यास येते तर नोक-या मिळत नाहीत म्हणून शिक्षण फार सवंगले असे कधी कधी उदगार ऐकू येतात.”९
शिंदे यांचा बी. ए. च्या परीक्षेत इतिहास हा अभ्यासाचा विषय होता. रोमच्या साम्राज्याचा इतिहास त्यांनी आवडीने वाचला होता. त्यामुळे ब्रिडपोर्टपासून सहा-सात मैलावर एग्गार्डन टेकडीवर रोमन छावणीचे अवशेष आहेत असे कळल्यावरून १८ मार्च रोजी सकाळी ९ वाजता मि. कॉर्निक व रेव्ह. वुइंटर यांच्यासह ते ही टेकडी पाहावयास गेले. एग्गार्डन टेकडीची उंची समुद्रसपाटीपासून ८१२ फूट असून टेकडीच्या माथ्यावरून जुन्या रोमन काळाची एक सडक सरळ बाणासारखी खाली जाते. सडका अगदी सरळ करण्याची चाल रोमन आहे. टेकडीच्या माथ्यावरील रोमन छावणीचे अवशेष त्यांनी पाहिले. मधे दोन पुरुष खोल खंदक व दोन्हीकडे समांतर बांध असे एक मोठे वर्तुळ टेकडीच्या माथ्यावर बघितल्याचे त्यांनी नमूद केले आहे.१०
एग्गार्डन हिलवरून परत येताना मि. कॉर्निक यांनी त्यांना एका खेड्यातील मेथॉडिस्ट चर्चमध्ये नेले. नंतर गरीब लोकांच्या दोन घरात जाऊन त्यांची स्थिती त्यांनी पाहिली. पैकी एक बाई १० वर्षे आजारी होती व अलीकडील ५/६ वर्षे अगदी अंथरुणाला खिळून होती. शिंदे तिच्याजवळ जाऊन तिला भेटले व तिच्यासाठी प्रार्थना केली. त्या रुग्ण बाईल फारच आनंद वाटला. मेथॉडिस्ट समाजाची गरीब लोकांमध्ये पद्धतशीरपणे सेवावृत्तीने काम करण्याची वृत्ती व हातोटी त्यांना फारच चांगली वाटली. आठवडाभर आपापला कामधंदा करणारे तरुण उत्साहाने खेडोपाड्यांमध्ये रविवारी उपासना करण्यास जातात. मि. कॉर्निक हे अशा लोकांपैकी होते. दर रविवारी ते दोन-तीन खेड्यांमध्ये फेरी मारून येत असत.
मि. व्हाईट ह्या मेथॉडिस्ट गृहस्थांचा ब्रिडपोर्टच्या मुक्कामामध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांना परिचय झाला. हे व्यापारी गृहस्थ विनोदी स्वभावाचे होते. गौतमबुद्धबद्दल त्यांना चांगली माहिती व आदरभाव होता. शिंदे यांना त्यांनी १९ तारखेस जेवावयास बोलाविले. त्यांच्या कुटुंबातील मुले आणि मुली मोठ्या स्नेहभावाने वागली.
शिंदे यांचा ब्रिडपोर्टमधील आठ दिवसांचा मुक्काम चांगला झाल. वर्तमानपत्रांमध्ये त्यांच्या उपासनाबद्दल बातम्या येत होत्या. ब्रिडपोर्टपासून जवळ असलेल्या डेव्हनपोर्ट येथेही उपासना चालविण्याची त्यांना निमंत्रणे आली होती. २२ मार्चला ब्रिडपोर्टहून क्रुकर्न स्टेशनवर जाण्यासाठी ते मुद्दाम बसगाडीने निघाले. दरीत खोलवर दिसणारी गावातील कौलारू घरे रमणीय दिसत होती. दुपारी साडेतीनला ते डेव्हनपोर्टला आले. स्टोक नावाच्या खेडेगावातील चार क्रमांकाच्या घरामध्ये त्यांनी मुक्काम केला.
डेव्हनपोर्ट, प्लीमथ व स्टोन हाऊस ही तीन शहरे एकमेकांस अगदी भिडून तिन्हीचे आता दोन लाखाचे एकच गाव बनलेले दिसत होते. ही गावे टेकडीवर वसली असल्याने एकही रस्ता सपाट दिसला नाही. मात्र उंच-सखलपणामुळे सगळ्या गावाला रम्यपणा प्राप्त झालेला दिसत होता.
ब्रिडपोर्टमधील युनिटेरियन आणि इतर ख्रिश्चन मंडळींमध्ये धर्माबद्दल जो उत्साह त्यांना आढळला तो डेव्हनपोर्टमध्ये दिसून आला नाही. वाढत्या लोकवस्तीचा आणि शहरीकरणाचाही हा प्रभाव असण्याची शक्यता आहे. डेव्हनपोर्ट येथील युनिटेरियन मंदिरात सकाळी ११ वाजता शिंदे यांची उपासना झाली. विषय ‘लौकिक व धार्मिक जीवन’ हा होता. त्यांना देऊळ भव्य दिसले पण युनिटेरियन चळवळ मंदावलेली वाटली.११ उपासकांची संख्या तीसपेक्षा जास्त नव्हती. संध्याकाळच्या उपासनेत ‘ब्राह्मसमाज’ हा विषय होता. सुमारे ५० उपासक आले होते. मंगळवारी युनिटेरियन मंदिरात त्यांचे, लिटररी सोसायटीच्या वतीने ‘पाश्चात्त्यांचे हिंदू समाजावर परिणाम’ या विषयावर व्याख्यान झाले. युनिटेरियनांच्या ठिकाणी हिंदुस्थानाबद्दल आस्था असल्याचे त्यांना जाणवले. शिंदे यांनी प्लीमथ येथील ऑक्सफर्ड स्ट्रीटवरील बोर्ड स्कूल २६ तारखेस पाहिले. ही शाळा शहरातील असल्यामुळे मोठी होती. ३६४ मुले हजर होती. ह्या बोर्ड स्कूलमध्ये केवळ कामकरीवर्गातील लोकांची मुले येत होती. शिक्षण सक्तीचे, मोफत व योग्य प्रकारचे चालल्याचे शिंदे यांना दिसून आले. २७ तारखेला संध्याकाळी डेव्हनपोर्टच्या दक्षिण भागातील गरीब लोकांची वस्ती पाहण्यासाठी ते मुद्दाम गेले. लोकांची घरे गलिच्छ व सडकाही घाणेरड्या दिसल्या. श्रीमंत लोकांची वस्ती आणि गरिबांची मोहल्ले यांमध्ये पुष्कळच तफावत असल्याचे त्यांना जाणवले.
डेव्हनपोर्टमध्ये असतानाच २८ मार्चला गुड फ्रायडेचा दिवस आला. ख्रिस्तास सुळी दिल्याचा हा दिवस सोमवार संध्याकाळपर्यंत धार्मिक लोक, विशेषतः रोमन कॅथॉलिक, व्रतस्थपणे पाळतात. विठ्ठल रामजी शिंदे शुक्रवारच्या संध्याकाळी रोमन कॅथॉलिक कॅथीड्रलमध्ये उपासनेस गेले. गुड फ्रायडेची उपासना किती कर्मठपणाने केली जाते याबद्दलचे सगळे कर्मकांड त्यांनी निरखून पाहिले. उपासना संपल्यानंतर देवळातील गॅसचे दिवे एकदम मालविले जातात व सर्वत्र अंधार केला जातो. कारण येशूस फाशी दिल्यावर सर्वत्र अंधार पडून धरणीकंप झाला असे बायबलमध्ये वर्णन केले आहे. शेवटी धरणीकंपाची नक्कल करण्यासाठी एका कोप-यात धड्धड् असा बारीक आवाज करण्यात आला वगैरे गोष्टी त्यांनी पाहिल्या. प्रॉटेस्टंट देवळात अशा नकला होत नाहीत. परंतु व्याख्यानाचा सूर असाच असतो. युनिटेरियन देऊळ गुड फ्रायडेच्या दिवशी बंद होते आणि ईस्टरच्या रविवारी म्हणजे ३० मार्च १९०२ रोजी विठ्ठल रामजी शिंदे यांनी त्यातील दोन्ही उपासना चालविल्या.
शिंदे यांनी मँचेस्टर कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्याला सहा महिने झाले होते. इंग्लंडच्या दक्षिण किना-यावरील ब्रिडपोर्ट आणि डेव्हनपोर्ट ह्या दोन गावी त्यांनी ईस्टरच्या सुटीत १५ दिवस वास्तव्य केले. ब्रिडपोर्ट आणि डेव्हनपोर्ट येथे चार उपासना चालविल्या व दोन स्वतंत्र व्याख्याने दिली. उपासना चालविण्याची त्यांची उत्तम तयारी झाली होती हे उपासकांच्या प्रतिसादावरून स्पष्ट होत होते. शिंदे यांचा आत्मविश्वास वाढावा. त्यांना समाधान वाटावे अशी ही बाब होती. बर्टन या खेड्यातील, प्लीमथ या शहरातील गरीब वस्तीतील प्राथमिक शिक्षण देणा-या शाळा बघितल्यानंतर मुलांमुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करणे आवश्यक आहे हे त्यांच्या मनावर चांगल्या त-हेने बिंबले असावे. (पुढे १९१९ साली पुणे म्युनिसिपालिटीने केवळ मुलांसाठीच सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय उपलब्ध करून द्यावी असा विचार चालला होता तेव्हा विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुलांच्या जोडीने मुलींनाही ही सोय मिळावी यासाठी चळवळ करून हा प्रश्न धसाला लावला.) मि. व्हाईट, मि. कॉर्निक इत्यादी मेथॉडिस्ट धर्मपंथांच्या मंडळींना त्यांनी जवळून पाहिले. त्यांची गोरगरिबांबद्दलची कळकळ आणि त्यांच्यासाठी अंग झाडून काम करण्याची वृत्ती शिंदे यांच्या अनुभवास आली. ब्रिडपोर्ट, डेव्हनपोर्टकडील १५ दिवसांचा दौरा आटोपून ते समाधानाने ऑक्सफर्डला परतले.
संदर्भ
१. बेसिल शॉर्ट, ए रिस्पेक्टेबल सोसायटीः ब्रिडपोर्ट, १५९३ ते १८३५, मून रेकर प्रेस, ब्रॅफर्ड-ऑनअँव्हॉन, १९७६, पृ. ८-९
२. ब्रिडपोर्ट न्यूज, ब्रिडपोर्ट, शुक्रवार, २१ मार्च १९०२.
३. विठ्ठल रामजी शिंदे रोजनिशी, पृ. ९२.
४. रेव्ह. बेसिल शॉर्ट यांचे मला व माझ्या पत्नीला आलेले १६ ऑक्टोबर १९८३चे पत्र. शिंदे यांच्यासंबंधी संशोधन करण्यासाठी मी सप्टेंबर १९८३ मध्ये पत्नीसह ब्रिडपोर्टला गेलो होतो त्या वेळी रेव्ह. शॉर्ट यांनी आम्हास ब्रिडपोर्ट न्यूजच्या कार्यालयात नेले व इतरही आवश्यक माहिती दिली.
५. गो. मा. पवार, ‘महर्षीच्या पावलांमागे इंग्लंडमध्ये : ब्रिडपोर्टमधील एक दिवस’, सिंहासन, दिवाळी, १९८४, पृ. ६१.
६. विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. १३८.
७. वेस्ट बेच्या किना-यावरील वाळू म्हणजे विविध रंगाचे, आकारचे, चपटे लंब वर्तुळाकार गोटे होत. काही तळहाताएवढे मोठे तर काही करंगळीच्या नखाहून लहान. यांचा स्पर्शही मुलायम. वेस्ट बेवर आम्हाला घेऊन जाणारे आमचे सोबती मि. लेस्ली ह्यांनी सांगितले की, ह्या वाळूची न्यायला बंदी केली आहे.
८. विठ्ठल रामजी शिंदे, रोजनीशी, पृ. ९६.
९. तत्रैव, पृ.९७.
१०. तत्रैव, पृ.९७.
प्रस्तुत लेखकाने १९८३ साली हे स्थळ बघितले. शिंदे यांनी वर्णन केल्याप्रमाणे आता तेथील खंदक दोन पुरुष राहिलेला नव्हता. ५-६ फूट खोल वाटत होता.
११. ४ आणि ५ ऑक्टोबर १९८३ रोजीम मी डेव्हनपोर्ट येथे असताना युनिटेरियन मंदिराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु आता तेथे युनिटेरियन मंदिर अस्तित्वात राहिलेले नाही. त्याचे एका सार्वजनिक करमणुकीच्या (पबमध्ये) रूपांतर झाले असे तेथे जाण्यापूर्वी ऐकले होते ते खरे ठरले.