मिशनची घटना व पुणे येथील अंगभूत शाखा

डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी इंडिया या संस्थेला कायदेशीर स्वरूप देण्याच्या दृष्टीने संस्थेच ट्रस्टडीड ९ जुलै १९१० रोजी रजिस्टर करण्यात आले व १८६०च्या कायद्यानुसार ही संस्था धर्मादाय संस्था म्हणूनही नोव्हेंबर १९१० मध्ये रजिस्टर करण्यात आली. ही संस्था कोणत्याही ब्राह्म अथवा प्रार्थनासमाजाशी अंगभूतपणे निगडित नसली तरी तिची उद्दिष्टे प्रार्थनासमाजाशी सुसंगत असवी आणि कार्य आध्यात्मिक पातळीवरून-मात्र धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) भूमिकेवरून-व्हावे हे निश्चित करण्यात आले होते. म्हणजे हिंदू अथवा ख्रिश्चन अशा कोणत्याही धर्मानुसार या संस्थेचे कार्य होणे अभिप्रेत नव्हते.
मिशनच्या घटनेमध्ये संस्थेची उद्दिष्टे म्हणून पुढील गोष्टी नमूद केल्या होत्या. अस्पृश्य मानल्या गेलेल्या, उदाहरणार्थ, महार, चांभार, पारिया, नामशूद्र, धेड आणि अशाच अन्य अस्पृश्य समजल्या जाणा-या जातींची सामाजिक आणि आध्यात्मिक स्थिती उंचावण्याच्या हेतूने कार्य करणारे मिशन चालविणे. हे उद्दिष्ट पुढील प्रकारे साध्य केले जाईलः १) या वर्गामध्ये शिक्षणाचा प्रसार करून २) त्यांना काम उपलब्ध करून तसेच त्यांची व्यक्तिगत नैतिकता आणि नागरिकता यांचे संवर्धन करून हे उद्दिष्ट साध्य केले जाईल.
संस्थेच्या घटनेमध्ये मिशनच्या कामाला वाहून घेणा-या मिशनरीला महत्त्वाचे स्थान देण्यात आले. पाच वर्षांहून अधिक काळ संस्थेत मिशनरी म्हणून काम करणा-या व्यक्तीस आजीव सदस्य म्हणून मान्यता देण्याची तरतूद करण्यात आली. मिशनरींना प्रतिष्ठा देण्यात आली. याचे कारण हे मिशनरीच संस्थेचा कणा होत, ही जाणीव संस्थेची घटना तयार करताना ठेवण्यात आली.१

शिंदे यांनी मांडलेल्लया कल्पनेनुसार मिशनचे स्वरूप देशी होते. मिशनचे कार्य हे ब्राह्मसमाज व प्रार्थनासमाज यांच्या तत्त्वानुसार चालणारे असेल असे नमूद केले व त्याप्रमाणे धर्मातीत (सेक्युलर) असेही म्हटलेले आहे. ह्या दोन विधानांमध्ये विरोध नाही, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. आपण ज्या धर्मात जन्माला आलेलो आहोत, त्या धर्माचा त्याग न करता त्याच्या पलीकडे जाऊन आध्यात्मिक पातळीवरील मतांचा स्वीकार करणे असेच प्रार्थनासमाजाचे ध्येय आहे. ख्रिस्ती मिशनप्रमाणे धर्मप्रचाराच हेतू त्यात अनुस्यूत नव्हता.

मुंबई येथे मध्यवर्ती संस्थेची कामे जोरात सुरू होऊन एका नमुनेदार मातृसंस्थेची उभारणी झाली. ही उभारणी झाल्यानंतर जनरल सेक्रेटरी ह्या नात्याने विठ्ठल रामजी शिंदे हे मातृसंस्थेच्या पत्यक्ष शासनाखाली प्रांतिक, मुख्य शाखा तयार करावयाच्या कामाला लागले. मिशन ही संस्था कायद्यानुसार रजिस्टार करण्यात आली होती. सर नारायणराव चंदावरकर अध्यक्ष, शेट दामोदरदास सुखडवाला उपाध्यक्ष व शिंदे जनरल सेक्रेटरी होते. संस्थेचे ट्रस्टी शेट दामोदरदास सुखडवाडा, रा. हरी सीताराम दीक्षित व विठ्ठल रामजी शिंदे हे होते. मिशनच्या घटनेनुसार मिशनच्या शाखांचे तीन प्रकार ठरले होते.

पहिला प्रकार अंगभूत शाखांचा. ह्या शाखा मिशनची जी मध्यवर्ती कार्यवाहक कमिटी होती तिच्या प्रत्यक्ष अमलाखाली चालावयाच्या होत्या. जमाखर्चाची सर्व जबाबदारी आणि इतर कारभार मिशनच्या मध्यवर्ती कमिटीच्या संमतीने चालावयाचा होता. प्रांतिक शाखांचे मुख्य चालक आणि त्यांच्या मदतनीस समितीचे सभासद हे मध्यवर्ती कमिटीच्या संमतीने नेमले जात. हा चालक स्वतःला वाहून घेऊन काम करणारा असल्यास त्याच्या पगाराची जबाबदारी मध्यवर्ती कमिटीकडे असे. बाकीचा सर्व खर्च चालविण्याची जबाबदारी ह्या मुख्य चालकांवर आणि त्याच्य कमिटीवर असे. जमाखर्चाच्या मान्यतेची जबाबदारी मध्यवर्ती कमिटीची असे. ह्या प्रांतिक शाखांची व त्यांच्या आश्रयाखाली चाललेल्या इतर शाखांच्या संस्थांची तपासणी जनरल सेक्रेटरीकडून होत असे. ह्या शाखांची वर्षाअखेर जी शिल्लक असे तीपैकी जास्तीतजास्त एक हजार रुपये मध्यवर्ती कमिटीद्वारे मातृसंस्थेकडे येत. शिवाय विशिष्ट हेतूने दिलेले कायमचे निधी असतील तर ते ट्रस्ट फंड ह्या नात्याने वरील ट्रस्टीकडे येत.

दुसरा प्रकार संलग्न शाखांचा. ह्या शाखांची जमाखर्चाची आणि कामाची जबाबदारी प्रत्यक्षपणे मध्यवर्ती कमिटीकडे नसे. मात्र कामाचे धोरण मिशनच्या हेतूला धरून चालले आहे की नाही हे जनरल सेक्रेटरी वेळोवेळी तापासून पाहत. मिशनच्या वार्षिक सर्वसाधारण अहवालात सामील करण्यासाठी अशा शाखांच्या जमाखर्चाचा तक्ता आणि कामाचा अहवाल जनरल सेक्रेटरीकडे सलग्न शाखेने वेळेवर पाठवावा अशी अपेक्षा असे.

मातृसंस्थेचे आद्य ट्रस्टीः १) नामदार गोकुळदास कहानदास पारेख, २) शेठ दामोदरदास गोवर्धनदास सुखडवाला व ३) श्री. विठ्ठल रामजी शिंदे असे होते.

शिंदे हे कामकाजाच्या बाबतीत दक्ष व हिशोबाबाबत अत्यंत चोख होते. मिशनचा कारभार हा वाढणारा आहे, किंबहुन वाढवावयाचा आहे अशी त्यांची कल्पना व इच्छा होती. म्हणून सर्व दृष्टींनी काटेकोर अशा प्रकारची मिशनची घटना तयार करून त्यांनी संमत करून घेतली होती.

प्रार्थनासमाजाचे कार्य करण्यासाठी शिंदे ह्यांनी काढलेल्या आपल्या प्रचारदौ-यात पुणे येथे रात्रीची शाळा काढली होती. ह्या शाळांची संख्या आणखी एकाने वाढविली. दोन शाळा प्रार्थनासमाजाच्या वतीने चालू केल्या. पुण प्रार्थनासमाजाच्या देखरेखीखाली असलेल्या ह्या शाळांचे कामकाज श्री. ए. के. मुदलियार हे पाहत होते. ह्या शाळांमध्ये अस्पृश्यवर्गीय विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाऊ लागले. ह्या मुलांच्या पालकांना महिना एक आणा एवढीदेखील फी भरण्याची ऐपत नाही हे लक्षात आल्यावर त्यांच्यासाठी मोफत शिक्षणाची सोय करण्यात आली.

विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनी मुंबईत डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना करून अस्पृश्य मानलेल्या वर्गातील मुलांना शिक्षण देण्याचे काम जोरात चालू केले आहे ह्याचा बराच बोलबाला लगेचच झाला. शिवाय पुण्यात शिंदे ह्यांच्या प्रेरणेने रात्रशाळांमधून काही अस्पृश्यवर्गातील मुलांना शिक्षण देण्याची सोय उपलब्ध केली आहे हे पुण्यातील अस्पृश्यवर्गातील काही पुढा-यांच्या ध्यानात आले होते. म्हणून पुणे येथे मिशनची शाखा स्थापन व्हावी व आपल्या वर्गातील मुलांना शिक्षण मिळू लागावे असे पुण्यातील अस्पृश्यवर्गातील पुढा-यांना तीव्रतेने वाटू लागले. तेव्हा हा हेतू मनात धरून मिशनचे जनरल सेक्रेटरी ह्या नात्याने विठ्ठल रामजी शिंदे ह्यांना पुण्यास भेट देण्याची कळकळीची विनंती केली. १९०८ सालच्या एप्रिलमध्ये शिंदे ह्यांनी पुण्यास भेट दिली. तेथील अस्पृश्यवर्गातील पुढारी त्याचप्रमाणे प्रार्थनासमाजाची मंडली ह्यांच्यासमवेत त्यांनी विचारविनिमय केला. मिशनच्या घटनेमध्ये अंगभूत शाखा स्थापन करण्याची तरतूद होती. तिला अनुसरून पुण्यास मिशनची पहिली अंगभूत शाखा असावी असे ठरविण्यात आले. पुढे दोन महिने शिंदे ह्यांनी आपले मदतीस सय्यद अब्दुल कादर यांना ह्या कामासाठी पुण्यास पाठविले. त्यांनी २२ जून १९०८ रोजी पुणे लष्कर येथील सेंटर स्ट्रीटमधील एका घरात पुणे शाखेची पहिली दिवसाची शाळा उघडली. पैशाची व्यवस्था तात्पुरतीच होती. शाळेचे सामान काहीच नव्हते. एका अस्पृश्यवर्गीय पुढा-याकडून एक टेबलखुर्ची तात्पुरती मिळाली होती. पुढील सर्व व्यवस्था करण्याचे काम ए. के. मुदलियार ह्यांच्यावर सोपविण्यात आले. मुदलियार ह्यांनी शाळेचे काम कळकळीने चालविले. वर्तमानपत्रांतून जाहिराती देऊन पाहिल्या. महिन्यात ५७७ रुपये जमविण्यात आले. बॅरिस्टर एच. ए. वाडिया ह्यांनी १०० रु.ची पहिली देणगी दिली. मध्यभागाचे कमिशनर डब्ल्यू. टी. मॉरिसन, डेक्कन कॉलेजचे प्रोफेसर वुडहाऊस ह्यांनी प्रत्येकी ३० रुपये देऊन सुरुवातीची गरज भागविली. शिक्षक मिळणे कठीण गेल्याने मातृसंस्थेकडून मुंबईतील ए. व्ही. गुर्जर ह्यांना पाठविण्यात आले. शाळेमध्ये लिहिणे-वाचणे ह्याच्या जोडीनेच संवाद, गाणी, चित्रकला, शिवणकाम व कसरत ह्यांचे शिक्षण दिले जाई. ह्याशिवाय स्वच्छता ठेवण्याचे शिक्षण व नीतिशिक्षण दिले जात असे. शाळेचा खर्च महिन्याकाठी सुमारे २०० रु. होत असे. पैकी जेमतेम ५० रुपये वर्गणीकाठी सेक्रेटरींना मिळत असत. ह्या अत्यंत उपयुक्त शाळेला देशबांधवांनी साहाय्य करावे म्हणून एक कळकळीचे पत्र अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या सह्यांनी ‘ज्ञानप्रकाशा’त प्रसिद्ध झालेले पाहावयास मिळते. निराश्रित साहाय्यकारी मंडळींच्या शाळेतील विद्यार्थी म्हणून साधू सखाराम वापजारे, महार(इयत्ता पाचवी), सुकाजी नारायण कांबळे, महार(इयत्ता पाचवी) व राधा दगडू चांभार(इयत्ता तिसरी), लक्ष्मी श्रीपती थोरात, महार(इयत्ता तिसरी) ह्या विद्यार्थ्यांनी सदर पत्राखाली सह्या केलेल्या आहेत.२

हिंदू लेडीज सोशल क्लबकडूनही पुणे येथील शाखेस प्रासंगिक स्वरूपात मदत मिळाल्याचा वृत्तान्त पाहावयास मिळतो. ज्ञानप्रकाशातील वृत्तान्त लिहिले आहे, “निराश्रित लोकांच्या उन्नतीस वाहिलेले रा. शिंदे ह्यांच्या भगिनी सौ. जनाबाई ह्या एकदा आमच्या क्लबात आल्या होत्या. त्यातही ब-याच शिकलेल्या आहेत व त्यांनी स्वतःस ह्या कामास वाहून घेतले आहे. सध्या रा. ए. के. मुदलियार यांनी मोठ्या खटपटीने पुणे येथे चालविलेल्या निराश्रित लोकांच्या शाळेमध्ये त्या काम करीत असत. त्यांच्या कामास मदत म्हणून आमच्या सभासदांनी १४ रुपयाची रक्कम दिली आहे.”३ अशा प्रकारे विविध ठिकाणांहून मिशनच्या पुणे शाखेच्या शाळांसाठी मदत मिळविण्याचा प्रयत्न होत असे. परंतु वाढत्या कामासाठी वाढत्या खर्चाची तरतूद कशी करात येईल ह्याची चिंता शाखेचे ए. के. मुदलियार ह्यांना सदैव पडलेली असे. त्यांनी एक वेगळा प्रयत्न त्या दिशेने केला. मुंबईचे त्या वेळचे गर्व्हनर सर जॉर्ज क्लार्क ह्यांच्याकडे १९ जुलै १९०८ रोजी विनंतीपत्र पाठविले. मिशनचे चालक कोण आहेत व मिशनचे कार्य कसे चालू आहे ह्याची योग्य ती चौकशी केल्यानंतर गव्हर्नरांच्या प्रायव्हेट सेक्रेटरीचे मुदलियार ह्यांना १८ ऑगस्ट १९०८च्या पत्राने पुढीलप्रमाणे उत्तर आलेः “आपले मिशन मदतीला लायक आहे आणि ते यशस्वी होवो अशी गव्हर्नरसाहेबांची इच्छा आहे. मदतीसंबंधी आपणास कळविण्यास येते की, गव्हर्नरसाहेबांनी आपली कन्या मिस् व्हायोलेट क्लार्क यांना पुढील महिन्यात एक जाहीर गायनाचा जलसा करण्याची परवानगी दिली आहे. जलशाच्या उत्पन्नातू मिशनला बरीचशी शिल्लक उरेल अशी आशा आहे.”४

हा गायनवादनाचा जलसा पुण्यात १९०८च्या सप्टेंबर महिन्यात करण्यात आला. प्रत्यक्ष गव्हर्नरसाहेबांचा आणि पुणे येथील सैन्य विभागाचे कमांडर मेजर आल्डरसन यांचा आश्रम होता, म्हणून ह्या इलाख्यातील ब-याच राजेरजवाड्यांनी आणि शेठ-सावकारांनी मुक्तहस्ते साहाय्य केले. खर्च वजा जाता ३ हजार ४६७ रुपये १३ आणे ६ पैसे एवढी शिल्लक ह्या मिशनला मिळाली. ती मातृसंस्थेच्या अध्यक्षांकडे मुंबईस पाठविण्यात आली. ह्या जलशाच्या निमित्ताने इलाख्यातील राजेरजवाडे व प्रतिष्ठित पुढा-यांना मिशनचे कार्य माहीत झाले ही महत्त्वाची गोष्ट साधली गेली. ह्या जलशाच्या निमित्ताने काही प्रमुख देणगीदारांकडू पुढीलप्रमाणे देणगी मिळालीः श्रीमंत सर सयाजीराव गायकवाड ५०० रुपये, श्रीमंत शाहू छत्रपती २०० रुपये, नामदार आगाखान ५०० रुपये, भोरचे अधिपती वगैरेंकडून देणग्या मिळाल्या.

शिंदे ह्यांनी पुणे शहरातील आणि आसपासच्या खेड्यांतील अस्पृश्य मानलेल्या लोकांची एक मोठी सभा भरवून गव्हर्नरसाहेब व मिस् क्लार्क यांनी ह्या लोकांसाठी सहानुभूती दाखवून त्यांची उन्नती करण्याच्या प्रत्यक्ष प्रयत्नामध्ये जो सहभाग घेतला त्यासाठी त्यांच्या आभाराच ठराव मंजूर करून त्यांच्याकडे पाठविला.५ डेक्कन कॉलेजचे प्रिन्सिपॉल एफ्. जी. सेल्बी हे पुणे शाखेचे अध्यक्ष व ए. के. मुदलियार सेक्रेटरी व मि. अर्जुनराव आर. मुदलियार, खजिनदार अशी मातृसंस्थेच्या अनुमतीने कमिटी नेमण्यात आली. ह्या कमिटीने झपाट्याने काम चालविले. १९०८ अखेर पुणे शाखेच्या पुढील संस्था कार्य करीत होत्या. १) पुणे लष्कर येथे दिवसाची शाळा, २) पुणे लष्कर येथे रात्रीची शाळा, ३) पुणे लष्कर येथे वाचनालय, ४) गंज पेठ येथील रात्रीची शाळा आणि ५) मंगळवार पेठ येथील रात्रीची शाळा.

१९१०च्या जूनमध्ये संपणा-या वर्षाच्या अखेरीपर्यंत पुणे शाखेच्या कामाचा बराच विस्तार झाला. नव्या कमिटीमध्ये डॉ. हॅरोल्ड एच्. मॅन, शेतकी कॉलेजचे प्रिन्सिपॉल हे अध्यक्ष, रँग्लर र. पु. परांजपे हे उपाध्यक्ष होते. कॅप्टन एच्. सी. स्टीव्ह, दि. ब. व्ही. एम. समर्थ, श्री. एम्. डी. लोटलीकर हे ह्या समितीत समाविष्ट होते. ए. के. मुदलियार हे सेक्रेटरी म्हणून काम करीत होते.

१९१२ नंतर श्री. मुदलियार यांना कौटुंबिक अडचणीमुले मिशनच्या कामामधून निवृत्त व्हावे लागले व अण्णासाहेब शिंदे पुणे शाखेचे काम बघू लागले. भगिनी जनाबाईंनी सुपरिटेंडेंटच्या कामाची जबाबदारी उचलली. सर्व शिंदे कुटुंबीयच मिशनच्या कामात कसे समरस झाले होते याचे वर्णन त्या काळातील सुप्रसिद्ध लेखिका आनंदीबाई शिर्के यांनी एका प्रसंगाच्या निमित्ताने केले आहे.

१९१७ सालच्या सुमाराची एक हकिकत आनंदीबाई शिर्के यांनी नमूद केली आहे. पुण्याच्या प्रा. मा. का. देशपांडे यांच्या भगिनी द्वारकाबाई या त्यांची मैत्रीण झाल्या होत्या. देशपांडे कायस्थ. त्यांची घरमालकीण ब्राह्मण. आनंदीबाई मुलाला घेऊन वाड्यातल्या विठोबाच्या देवळाच्या ओटीवर बसल्या होत्या. त्यांचा अडीच-तीन वर्षांचा शरद हा मुलगा पाय-या चढून देवळात जाणार तोच एक बाई ओरडली, “हा हा! आत नाही जायचं. तो ब्राह्मणांचा विठोबा आहे.” आनंदीबाईंनी पुढे लिहिले आहे, “मला घडलेले सदाशिवपेठी पुण्याचे प्रथमदर्शन हे असे होते. मी शरदच्या हाताला धरून ओढले आणि म्हटले, “अरे बाबा, तो ब्राह्मणांचा विठोबा ब्राह्मणांना राहू दे. आपण आपल्या महाराच्या विठोबाला जाऊ.”
“आणि चमत्कार असा की एका आठवड्यातच मला महारांच्या विठोबाचे दर्शन घडले” आणि त्यानंतर आनंदीबाईंनी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याशी परिचय कसा झाला याचे निवेदन केले आहे. ते त्यांच्याशी वडील भावासारखे वागत. काही दिवस त्यांनी आपल्याला स्वतःच्या घरी राहावयास नेल. अण्णासाहेबांची पत्नी रखमाबाई व भगिनी जनाबाई यांच्या सुशिक्षितपणाचे, स्वभावाच्या चांगुलपणाचे वर्णन करून त्यांनी ह्या सर्वांची संस्थेतील अस्पृश्य मुलांशी वागणूक कशी होती, ह्या संबंधाने लिहिले आहे. “ही शिंदेमंडळी अस्पृश्योद्धाचे कार्य करीत असत आणि भोकरवाडीतील त्यांच्या संस्थेच्या इमारतीत राहत असत. अण्णासाहेब शिंद्यांचे ठीक होते, पण ह्या स्त्रिया? त्या महार-मांगाच्या मुलांना आंघोळी घालीत, त्यांच्या उवा काढीत आणि त्यांना शिकवीत. अशी अंतर्बाह्म स्वच्छता व सुधारणा न कंटाळता, न किळसता त्या करीत. ते पाहून माझे मन आदराने भरून येई व वाटे, आपण काय रांधा, वाढा, उष्टी काढा, एवढे जाणतो. आपल्या जिण्याला कसलेच मोल किंवा अर्थ नाही आणि ही माणसे खालच्या थरातील माणसांशी समरस होऊन वागतात. मी अगदी दिपून गेले... एकदा सहभोजनाचा योग आला. तेव्हा अण्णासाहेब शिंदे, गणतराव शिंदे व बाबुरा जगपात यांच्या घरची बायकामुले, तसेच आणखी मराठा कुटुंबे या सहभाजनात निःसंकोचणाने भाग घेताना पाहून मला सानंद कौतुक वाटले...
“सहभोजन म्हणजे एके जागी स्वयंपाक होऊन पंक्तीला जेवणे असा नव्हे; तर महार, मांग, चांभार इत्यादी अस्पृश्य मानलेल्या मंडळींनी व इतर स्पृश्य मंडळींनी आपापल्या शक्तीनुसार व आवडीनुसार करून आणलेले शाकाहारी पदार्थ एकत्र करून सर्वांना प्रसादाप्रमाणे वाढणे व ते सर्वांनी आवडीने खाणे. खरे म्हणजे यांनी ते स्वच्छपणे केले असतील का, अशी शंका प्रथम माझ्या मनाला चाटून गेल्याशिवाय राहिली नाही. पण समोर बसलेला स्त्री-पुरुष समाज चांगला स्वच्छ कपडे घातलेला, नीटनेटका पाहून मी शंका सोडून त्या समारंभात समरस झाले! अण्णासाहेब शिंद्यांचे व त्यांच्या कुटुंबीय मंडळींचे कार्य पाहून मला खरोखरच महाराच्या विठोबाचे दर्शन घडल्यासारखेच वाटले!६

संदर्भ
१.    व्ही. आर्. शिंदे, दि डिप्रेस्ड क्लासे मिशन सोसायटी ऑफ इंडिया – व्हाट इट इज् अँण्ड व्हाट इट डज, मुंबई, १९१२.
२.    ज्ञानप्रकाश, ७ मे १९१०.
३.    तत्रैव, ९ जुलै १९०९.
४.    विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. २३६.
५.    डी. सी. मिशन सोसायटी ऑफ इंडिया, पूना ब्रँच, फर्स्ट हाफ इयरील रिपोर्ट, जून १९०८, डिसेंबर १९०८, अँपँडिक्स ४, पृ. २४.
६.    आनंदीबाई शिर्के, सांजवात, मौज प्रकाशन, मुंबई, १९७२, पृ. १९०-९२.