बहुमान, अवमान आणि निष्ठा

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कृतिशील जीवनाला प्रारंभ झाल्यापासून त्यांना अनेकवार भारताच्या विविध प्रांतांत प्रवास करावा लागला. ब्राह्मसमाजाचे कार्य असो, की डिप्रेस्ड क्लासेस मिशनचे काम असो, संपूर्ण भारत हे त्यांचे कार्यक्षेत्र होते. कार्यानिमित्त केलेल्या ह्या प्रवासामध्ये भारतातील विविध प्रांतांतील मंडळींना शिंदे यांच्या कार्याचा परिचय झाला, त्याचप्रमाणे त्यांनी अपूर्व स्वार्थत्याग करुन अस्पृश्यांनिवारणाचे अत्यंत कळकळीने चालविलेले कार्य पाहून त्यांच्याबद्दल आदराची भावना ह्या मंडळींच्या मनात स्वाभाविकपणे निर्माण होत होती. ह्या आदरांच्या पोटी भारतातील विविध संस्थांनी शिंदे यांना मानपत्र अर्पण करुन त्यांचा गौरव केला. मुंबई प्रांतामध्ये त्यांच्या कार्याबद्दल गौरव होणे ही गोष्ट स्वाभाविक होती. भारतातील अन्य प्रांतांमध्येही त्यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला ही गोष्ट विशेष म्हणावी लागेल.


शिंदे यांना मिळालेल्या मानपत्रांपैकी काही मानपत्रे खाली नमूद केल्याप्रमाणे :
१) पालघाट, मलबार.
२) हुबळी, कर्नाटक.
३) २३ एप्रिल १९२३ रोजी मिशनच्या पुणे शाखेचे शिक्षक व विद्यार्थी यांजकडून ५१ व्या वाढदिवसानिमित्त.
४) मिशनच्या पुणे शाखेच्या शिक्षिका व विद्यार्थिनी यांच्याकडून ५१ व्या वाढदिवसानिमित्त.
५) २३ एप्रिल १९२५ रोजी पुमे येथे ब्राह्मणेत्तर पुढा-यांतर्फे.
६) १९२८ साली दौलतपूर (पूर्व बंगाल) कॉलेज विद्यार्थ्यांतर्फे.
७) २३ डिसेंबर १९३३ रोजी चोखामेळा बोर्डिंग, आर्वी, नागपूर, मध्यप्रदेश.
८) डिसेंबर १९३३ मध्ये नागपूर अस्पृश्यवर्गातर्फे गणेश आकाजी गवई यांच्याकडून.
९) १८ जून १९३४ रोजी मुंबई येथे ४१ संस्थांतर्फे.


शिंदे यांनी आपल्या जीवितकार्याला प्रारंभ केल्यापासून मराठा जातीतील व्यक्तींनी आणि पुढा-यांनी त्यांच्याबद्दल एक अपेक्षा व्यक्त केलेली दिसून येते. ती ही की, शिंदे यांनी ब्राह्मसमाजाचे कार्य न करता तसेच अस्पृश्यवर्गासाठी कार्य न करता मागासलेल्या स्वजातीय मराठ्यांसाठीच कार्य करावे, क्वचित मराठा जातीची कक्षा वाढवून ब्राह्मणेतर पक्षाने शिंदे यांनी बहुजन समाजासाठी कार्य करावे, ही अपेक्षा प्रकट केलेली आढळते. डिसेंबर १९०३ पासून म्हणजे मुंबई प्रार्थनासमाजाचे प्रचारक म्हणून कामाला आरंभ केल्यापासून शिंदे यांची ह्या प्रश्नाबाबत निश्चित स्वरुपाची भूमिका दिसून येते व ती तितक्याच दृढपणाने आयुष्यभर टिकून राहिलेली आढळते. ब्राह्मधर्म प्रचाराचे कार्य म्हणजे सर्व जातिधर्मीयांना उन्नत धर्माची शिकवण देण्याचे व्यापक पातळीवरील कार्य त्यांनी आरंभिले होते. ह्या कामाचा संकोच करुन केवळ मराठी जातीपुरते संकुचित स्वरुपाचे काम करण्याची कल्पना त्यांना पटली नाही. शिंदे हे ऑक्सफर्ड येथील शिक्षण आटोपून स्वदेसी नुकतेच आले होते. ऑक्टोबर १९०३ मध्ये ते बडोद्यास गेले असताना तेथील मराठा मंडळींनी त्यांच्या सत्कारार्थ पानसुपारीचा कार्यक्रम आयोजित केला होता. ह्या प्रसंगी वक्त्यांची एका मागून एक जी भाषणे झाली, त्यामधून प्रतिकूलच सूर निगू लागला. शिंदे यांचे शिक्षण मराठा समाजाच्या खर्चातून झालेले असल्याने व विलायतेचा प्रवासखर्चही महारांजांच्या पैशातून झालेला असल्याने शिंदे यांनी मराठा समाजाच्या सेवेला हजर राहणे योग्य होते, ते प्रार्थनासमाजात शिरले हे बरे झाले नाही, असा बहुतेक व्याख्यात्यांचा विरोधात्म सुर होता. अशी भाषणे झाल्यानंतर मंडळी ज्या वेळेला त्यांच्या गळ्यात माळ घालावयास आली, तेव्हा उत्तर देताना शिंदे म्हणाले, "असे जर आहे, तर मी ही माळ घालण्यास लायक नाही. म्हणून ती हातातच घेत आहे. प्रार्थनासमाज सर्वांसाठी आहे आणि त्यासाठी मला तयार केले, हे मराठ्यांस-विशेषतः महाराजांना-भूषणावहच आहे. स्वतः महाराज हेच जर केवळ मराठ्यांकरिता नाहीत, तर त्यांचा अनुयायी मी निराळा कसा होऊ?"


धर्मकार्याचाच एक भाग म्हणून शिंदे यांनी ऑक्टोबर १९०६ मध्ये डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना करुन अस्पृश्यतानिवारणाचे कार्य सुरु केले होते, ही गोष्टही मराठा समाजातील काही व्यक्तींना रुचली नाही. गणपतराव भिकाजीराव जाधव ह्या एका अपरिचित मराठी गृहस्थाने ५ डिसेंबर १९०६ रोजी विठठल रामजी शिंदे यांना पत्र लिहून आपली नापसंती अगदी स्पष्टपणाने नमूद केली आहे. त्यांनी म्हटले,"आपल्यासारख्या दुर्मीळ विद्वानांचे लक्ष सध्या आमचे लोकांची पीछेहाट व दैना उडाली तिकडे दुर्लक्ष महारमांगांची स्थिती सुधारण्याकडे लागावी व आम्ही जे पूर्वी उत्तम अवस्थेत होतो, ते सध्याच्या अवनत स्थितीकडे पोहचलो असता, तिकडे दुर्लक्ष व्हावे ही केवढी खेदाची गोष्ट! हे आपले करणे घरची माणसे उपाशी ठेऊन दुस-यास पक्वान्न घालण्यासारखे आहे. आपण ज्या समाजात जन्मलो आणि ज्या समाजाच्या मदतीने पदवीधर झालो, व एवढे नावारुपास चढलो, त्या समाजाची काय दैना उडाली आहे इकडे आपले पहिल्याने लक्ष गेले पाहिजे होते. आपण प्रार्थनासमाजात शिरला ते माझ्या मते बरे झाले नाही. पुन्हा प्रार्थना करुन सांगतो की, आपण प्रचारात नसलेला पोशाख व राहणीमा बदला, असे करण्यास परमात्मा आपणास बुद्धी देवो."


कार्यारंभीच आपल्या समाजामध्ये आपल्याबद्दल काहीएक अपेक्षा निर्माण झाली आहे, हे शिंदे यांना जसे जाणवले, त्याचप्रमाणे आपण धर्मप्रसाराचे व अस्पृश्यतानिवारणाचे जे काम पत्करले आहे, त्याबद्दल मराठी समाजात आपल्याबद्दल नाराजी निर्माण झाली आहे हेही त्यांच्या लक्षात आले होते. परंतु याबाबत शिंदे यांची भूमिका स्वच्छ व दृढ स्वरुपाची होती. मराठी समाजाची व एकंदर बहुजन समाजाची उन्नती व्हावी, अशी त्यांची इच्छा जरूर होती. विद्याबल, द्रव्यबल व अधिकारबल यांच्याअभावी बहुजन समाज हा दुबळा झालेला आहे व त्याची प्रगती व्हावी हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी १९२० सालची निवडणूक लढविताना आपल्या बहुजन पक्षाचा जाहीरनामा तयार केलेला होता. मात्र मराठी समाज व बहुजन समाज यापेक्षा अस्पृश्यतेचा प्रश्न अतिशय निकडीचा आहे; कारण अस्पृश्यतेमुळे होणारा अन्याय दारुण स्वरुपाचा असून मनुष्यतेला कलंक लावणार आहे, असे त्यांना वाटत असल्यामुळे अस्पृश्यतानिवारणाच्या कामाची अत्यंत निकड त्यांना जाणवत होती व आपले शक्तिसर्वस्व वेचून अस्पृश्यतानिवारणाचेच कार्य आपण करावे असे त्यांनी योजिले होते. बहुजन समाजासाठी कार्य व अस्पृश्यतानिवारणाचे कार्य यासंबंधीचा तणाव त्यांच्या मनात पुढील काळात राजकीय व सामाजिक काम करीत असतानाही दिसून येतो. १९२३ साली मिशनच्या प्रत्यक्ष जबाबदारीतून ते मुक्त झाले असले तरी अस्पृश्यतानिवारणकार्याचा त्यांचा ध्यास हा यत्किंचितही कमी झाला नव्हता. त्यांना मिळालेल्या विविध मानपत्रांना त्यांनी जी उत्तरे दिली, त्यामधूनही त्यांची अस्पृश्यतानिवारणाकार्यावरील निष्ठा किती अढळ आणि उत्कट होती, याचे प्रत्यंतर आपणाला येते.


शिंदे यांच्या ५३ व्या वाढदिवशी २३ एप्रिल १९२५ रोजी ब्राह्मणेतर समाजाच्या वतीने त्यांना जे मानपत्र देण्यात आले त्यांच्या उत्तरादाखल केलेल्या भाषणात त्यांच्या मनाचे प्रतिबिंब उत्तम प्रकारे उमटलेले दिसते. ते आपण मागील एका प्रकरणात विस्ताराने पाहिले आहे. त्या वेळी उत्तरदाखल केलेल्या भाषणात त्यांना होऊन बसला हे आत्यंतिक तळमळीने सांगितले.


१८ जून १९३४ रोजी मुंबईतील ४१ संस्थांच्य वतीने विठ्ठल रामजी शिंदे यांना मानपत्र देण्याचा समारंभ भव्य प्रमाणात साजरा झाला. महात्मा गांधी ह्या समारंभाचे अध्यक्षस्थान घेणार हे प्रसिद्ध झाल्याने परळच्या दामोदरदास ठाकरसी हॉलमध्ये अलोट गर्दी झाली होती. काँग्रेस कार्यकारिणीची बैठक लवकर संपू न शकल्याने महात्मा गांधींच्या ऐवजी मथुरादास वसनजी यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ पाड पडला. मानपत्र दिल्याबद्दल अण्णासाहेब शिंदे यांनी विविध संस्थांचे आभार मानले व पुढे ते म्हणाले, "जोपर्यंत समाजाच्या अंतःकरणातून अस्पृश्यतेसारखे दूषण पुसून टाकले जात नाही व अंतःकरणे शुद्ध होत नाहीत, तोपर्यंत ह्या मानपत्राचा काहीही उपयोग नाही. जोपर्यंत अस्पृश्यतेचा हा कलंक आपण पुसून टाकीत नाही, तोपर्यंत मातृभूमीच्या स्वराज्याचे स्वप्न आपण बघू शकत नाही. खिश्चन, इस्लाम अथवा झरतुष्ट्र यांसारखे धर्म अस्पृश्यतेला थारा देत नाहीत. केवळ हिंदूच जातीजातींमध्ये अशा प्रकारचा गलिच्छ भेदभाव करतात." उत्तरादाखल केलेल्या भाषणात ते पुढे असेही म्हणाले की, "हिंदुस्थानातील अस्पृश्यतेसारखा एक मोठा अन्याय स्वस्थ बसून चालू दिल्याबद्दल सर्व जग अपराधी आहे. म्हणून या कामात सर्व जगाने भाग घेतला पाहिजे. "


आपल्या होणा-या या बहुमानाच्या प्रसंगी अण्णासाहेब शिंदे यांनी आपल्या कुटुंबीयांनी दिलेल्या सहकार्याचे व अस्पृश्यतानिवारणार्थ केलेल्या कामाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केले. "ह्या कार्यास माझ्या भगिनी, आई-बाप ह्यांनी रात्रदिवस झटून मदत केलेली आहे. विरोध तर नाहीच नाही, नसुता आशीर्वादच नव्हे तर ह्या कार्यामध्ये माझे नोकर म्हणून माझ्या आईबापांनी मिशनमध्ये काम केले आहे. ग्लोब मिलच्या आजूबाजूची वस्ती म्हणजे पूर्वी नरकपुरीच होती. त्या ठिकाणी हरिजनांच्या आजारी बायांना आपल्या अंथरुणात निजवून ठेऊन माझ्या आईने त्यांची सेवा निरपेक्षबुद्धीने केली आहे." पुढे ते म्हणाले, "स्वराज्य मंदिरातील लाकडी दारे मोकळी केल्याने अस्पृश्यतेचा कलंक नाहीसा होणार नाही, तर आत्मिक दारे उघडल्यानेच ते काम होणार आहे. महात्मा गांधी आज येथे आले असते तर त्यांना पूर्वीच्या एका गोष्टीची आठवण करुन दिली असती. त्या वेळी मी त्यांना म्हणालो, "गांधीजी, मी मोठा देशद्रोही (टेरर) आहे. कारण मला तुमचे स्वराज्य नको आहे, स्वराज्याचा नाद सोडून प्रथम तुम्ही महारवाड्यात जाऊन रहा कसे व प्रथम त्यांची अस्पृश्यता नष्ट करा पाहू, नंतर स्वराज्याच्या पाठीमागे लागा." महात्माजी त्या वेळी हसले व म्हणाले, "मि. शिंदे, तुमचे म्हणणे बरोबर आहे, पण सध्या तरी मला माझ्या मताप्रमाणे वागू द्या." उत्तरादाखल केलेल्या भाषणाच्या अखेरीस ते म्हणाले, "अस्पृश्यता अजून नष्ट झालेली नाही व ती नष्ट करण्याचा आपण कसून प्रयत्न कराल ह्या अटीवर मी ह्या मानपत्राचा स्वीकार करीत आहे." प्रत्येक मानपत्राच्या वेळी उत्तरादाखल केलेल्या भाषणात अस्पृश्यतानिवारणाकार्याबद्दलची त्यांची तीव्र तळमळ आणि ह्या कामाबद्दलची अव्यभिचारी निष्ठा प्रकट होते.


१९१७-१८ नंतर देशात राजकारणाचे जोरदार वारे वाहू लागल्यानंतर राजकीय स्वार्थ साधण्याची प्रेरणा प्रबळ होऊ लागली. त्याचा स्वाभाविक परिणाम म्हणून शंदे यांच्यावर ब्राह्मणेत्तर पक्षीय त्याचप्रमाणे अस्पृश्यवर्गीय मंडळींकडून टीकेचे आघात होऊ लागले. मराठवर्गाला राष्ट्रीय चळवळीच्या प्रवाहात ओढण्याच्या उद्देशाने शिंदे यांच्या प्रेरणेने मराठा राष्ट्रीय संघाची पुण्यामध्ये स्थापना करण्यात आली. एका कडव्या ब्राह्मणेतर व्यक्तीने हितचिंतक या टोपणनावाने शिंदे यांना परखड शब्दात दूषणे दिली आहेत. ह्या पत्रामध्ये मराठी स्वराज्य संघाची स्थापना करणारे तुम्ही मूर्खातले मूर्ख आहात असेही शिंदे यांना या पत्रलेखकाने म्हटले आहे. "तुम्हाला हे ब्राह्मणलोक हरभ-याच्या झाडावर चढवीत आहेत. तुमच्या हातून ते मराठ्यांत फूट पाडीत आहेत. तुमच्या सर्व गुप्त व्यवहाराची किंवा कटाची बातमी सी. आय. डी. च्या मार्फत गव्हर्नरसाहेब यांजकडे कळविण्यात आली आहे." इत्यादी मजकूर लिहून मिशनचे चंबूगबाळे लवकर आपटून आपणास कायमचा रामराम ठोकावा लागेल आणि मग खुशाल ब्राह्मलोकांच्या पायाचे तीर्थ चाटीत बसाल वगैरे मजकूर लिहून मराठी स्वराज्य संघ मोडून टाका व तुमच्या मिशनशिवाय दुसरे कोणतेही कार्य करु नका असा सल्ला या 'हितचिंतकाने' दिला आहे. कडव्या मराठी अभिमानी माणसांची शिंदे यांच्याकडे बघण्याची कोणती दृष्टी होती हे प्रातिनिधिक स्वरुपात या पत्रावरुन दिसून येते.


माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा जाहीर झाल्यानंतर भारताच्या व महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार वावटळ निर्माण झाली. अस्पृश्यवर्गाचे कायदेकौन्सिलात कोणत्या प्रकारे प्रतिनिधी जावेत, ह्याबद्दल शिंदे यांच्या मताचा विपर्यास काही अस्पृश्यवर्गीय मंडळींनी केलेला दिसतो. शिंदे हेच जणू काय अस्पृश्यांचे कडवे शत्रू आहेत, असे समजून त्यांच्यावर केवळ कठोरच नव्हे, तर अत्यंत अश्लाघ्य स्वरुपाची टीका अस्पृश्यांनी चालविलेल्या वृत्तपत्रातून येत राहिली. ज्यांच्यासाठी घरदार सोडून अत्यंत खडतर अशा प्रकारे सेवाव्रत दीड पट शिंदे यांनी चालविले होते, त्यांच्याकडून होणारी या प्रकारची निंदा पचविणे हे शिंदे यांना काही सोपे गेलेले नसणार. मात्र ऋषितुल्य अशा प्रकारच्या समजसपणाने त्यांनी याही टीकेकडे पाहिले. मानपत्रातून केलेला गौरव असो की, वर्तमानपत्रातून झालेली टीका असो, या दोन्हीकडे विठ्ठल रामजी शिंदे हे समवृत्तीने पाहत होते. बहुमान अथवा अवमान यांकडे बघण्याची त्यांची दृष्टी कशी प्रगल्भ, समभावाची आणि समंजस विनोदाची होती, याची कल्पना त्यांनी मानपत्राला दिलेल्या एका उत्तराच्या भाषणावरुन येऊ शकते. त्यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त मिशनच्या शिक्षकवर्गाने २३ एप्रिल १९२३ रोजी त्यांना मानपत्र अर्पण केले होते, या प्रसंगी त्यांनी उत्तरादाखल जे भाषण केले त्यामध्ये त्यांची मनोभूमिका उत्तर प्रकारे दिसून येते. "मनुष्याच्या चरित्रात ज्या कित्येक आपत्ती येतात त्यातील आपली झालेली अकटोविकट स्तुती आपल्याच कानांने ऐकणे ही होय. जेव्हा जेव्हा असे दुर्धर प्रसंग माझ्यावर येतात, तेव्हा ते सहन करण्याचा एकच तोडगा माझ्याजवळ आहे. तो हा की, इतर वेळेला जी माझी निंदा व अपमान झालेला असतो त्याची मी आठवण करतो आणि या स्तुतिनिंदेचे ओझे ब्रह्मार्पण करुन, मी माझ्या कार्यास मोकळा होतो." हे मानपत्र शिंदे यांना दिले गेले, त्या काळातच शिंदे यांच्या राजकारणविषयक भूमिकेबाबत व मिसनबाबत टीकेची झोड उठविली गेली होती. कठोर अशा स्वरुपाच्या टीकेने त्यांच्या मनावर खोल आघात झालेले असणार. ह्या अवमानाकडेही वरच्या पातळीवरुन बघण्याची प्रगल्भता अण्णासाहेबांच्या ठिकाणी होती. निंदा असो की स्तुती असो की आपल्या अंगाला लागू नये, यासाठी विनोदाचा अस्त्र म्हणूनही उपयोग करण्याची तरल विनोदबुद्धी शिंदे यांच्या ठिकाणी होती, म्हणून वरील उत्तरादाखल केलेल्या भाषणात ते पुढे म्हणाले, "विठ्ठल रामजी शिंदे आणि मानपत्र आणि तेही पुण्यासारख्या शङरात ! हा प्रकार विचित्र खरा, नेहमी जाच करुन घेण्याची एखाद्या गाढवाला सवय असावी, त्याला एखाद्याने कुरवाळून झूल घातली, तर ती त्यास जशी असह्म होईल, तद्वतच आजचे मानपत्र मला झाले आहे."

अण्णासाहेब शिंदे हे टीकेचे निराकरण करण्याच्या भरीस पडताना कधी दिसत नाहीत. स्तुती मात्र त्यांना अगदीच सहन होत नाही, असे दिसते. ही स्तुती अथवा गौरव झटकून टाकल्याशिवाय त्यांना बरे वाटत नाही. त्यांची विनोदबुद्धीच अशा वेळी त्यांना उपयोगी पडते. १९३० सालच्या कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्यामुळे त्यांना जी शिक्षा झाली होती, ती भोगून ते येरवड्याच्या तुरुंगातून १४ ऑक्टोबर १९३० रोजी सुटून बाहेर आले. दुस-या दिवशी रे मार्केटमध्ये त्यांच्या अभिनंदनार्थ सभा झाली. गौरवपर भाषणे झाल्यानंतर त्यांच्या गळ्यात माळ घातली, तेव्हा ते म्हणाले, "आता कायदेभंग करुन तुरुंगात जाणे इतकी सामान्य गोष्ट झाली आहे की, अशा माळा तुरुंगातून परत आलेल्यांच्या गळ्यात न घालता त्या माळा अद्यापि तरुंगात न गेलेल्यांच्या गळ्यात घातलेल्या ब-या."